सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

तुम्हीच सांगा; अडाणी कोण? शहाणा कोण?    मी कधीकधी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण तालूक्यात महिमानगड नावाच्या खेड्यात विश्रांतीसाठी जाऊन मुक्काम करतो. तिथे शेजारी वास्तव्य करणार्‍या एका अशिक्षित म्हातारीला माझे नाव वर्तमानपत्रात छापून येते आणि मी लेखक वगैरे असल्याचे अकारण कौतुक आहे. तिने एकदा सहज प्रश्न विचारला, ‘मला सांगा भाऊ, शहाण्यात आणि अडाण्यात कितीसा फ़रक असतो?’ मी मनोमन हसलो आणि म्हणालो; तसा फ़ारसा नसतो आजी. चार पुस्तके शिकलेला आणि लिहिता वाचता आले; म्हणून लोक एखाद्याला शहाणा म्हणतात, इतकेच. पण मित्रांनो खरे सांगायचे, तर मी निरूत्तर झालो होतो तिच्या प्रश्नावर. मग दोन दिवसांनी तिने खोचकपणे पुन्हा विचारले, अजून उत्तर सापडले नाही का? मी निमूटपणे शरणागती पत्करून म्हटले आजी, तुम्हाला काय वाटते? तिने सहजगत्या मला शहाण्या व अडाण्याची व्याख्या सांगितली. त्या दिवसापासून आपण शहाणे असू नये असेच मला वाटू लागले. तिची व्याख्या पुढीलप्रमाणे:

   ‘जो नागडा असतो आणि आपण नागडे आहोत, याची त्याला लाज वाटते, म्हणून जो अब्रू झाकायची धडपड करतो ना? तोंड लपवू बघतो ना? तो अडाणी असतो. मात्र जो स्वत: नागडा असून दुसर्‍याच्या नागडेपणाकडे बोट दाखवून, त्याला अब्रू झाकण्याचे सल्ले देतो, त्याची कारणे सांगतो; पण स्वत:च नागडे असल्याचा त्याला थांगपत्ताही लागत नाही, तो शहाणा असतो.’

   ही व्याख्या इथे का सांगायची वेळ आली माझ्यावर, तर गेला आठ्वडाभर जी दिल्लीतल्या बलात्कार विषयावर चर्चा व गोंधळ चालू आहे, त्यात अनेक विद्वानांनी तोडलेले अकलेचे तारे, हे त्याचे कारण आहे. वाहिन्यांपासून वृत्तपत्रातले अनेक शहाणे कायद्याच्या तरतूदी बदलण्यापासून शिक्षेच्या कठोरतेपर्यंत सर्वच गोष्टींवर तावातावाने बोलत आहेत. त्यात पुन्हा अनेकजण निदर्शनात भाग घेणार्‍या मध्यमवर्गिय मुलीमुलांवर ताशेरे झाडत आहेत. त्या शहाण्यांच्या मते गावात वा गरीब वस्तीत बलात्कार होतात, तेव्हा ही सुखवस्तू मंडळी कुठे असतात? गुजरातच्या दंगलीत शेकडो लोक मारले गेले; तेव्हा यातले किती रस्त्यावर आले होते? त्यापैकी कोणी कधी मोदींना मुस्लिम हत्याकांडाचा जाब विचारला होता काय? असले प्रश्न ज्या शहाण्यांना पडतात, त्यांना आमची ती खेड्यातली आजी काय म्हणते; ते सांगणे मला खुप आवश्यक वाटले, म्हणुन तो अनुभव सांगितला. अकलेचे दिवाळे वाजले मग माणसे कसे बोलू लागतात, त्याचा हा नमूना आहे. दिल्लीत बलात्कार झाल्याच्या त्या घटनेने लोकांची झो्प उडाली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. मग त्यांच्या आंदोलनात कोण को्ण सहभागी झाले; त्याचीही झाडाझडती सुरू आहे. पण लोक इतके संतापून रस्त्यावर का उतरलेत; त्याचा शोध घेण्याची बुद्धी नाही, की इच्छा नाही. त्यात कोण उतरला किंवा कशासाठी आला; हा मुद्दा कुठून येतो? कुठलाही माणुस कुठल्या आंदोलनात सहभागी होतो, त्यानुसार त्या आंदोलनाचे मूल्यमापन करायचे असते, की त्या आंदोलनाने हाती घेतलेल्या प्रश्नावरून त्याने मूल्यमापन करायचे असते?

   उद्या मुंबईत वा पुण्यात रिक्षावाल्यांनी मिटरवाढीसाठी आंदोलन केले; मग त्यांना मोदींच्या दंगलीविषयी प्रश्न विचारणे हा निव्वळ मुर्खपणा नसतो का? आज जी मुले दिल्लीच्या रस्त्यावर घोषणा देत धरणी देऊन बसली आहेत, त्यांचे वय पंधरापासून पंचवीस वर्षाचे असेल. त्यांचे वय २००२ साली पाच ते पंधरा वर्षाचे असेल. तेव्हा गुजरातमध्ये झालेल्या दंगलीचा न्याय मागायला त्यांनी काय पाळण्यातून वा शाळेला दांडी मारून रस्त्यावर यायला हवे होते? गुजरात दंगलीचा संबंध काय दिल्लीतल्या आंदोलनाशी? पण असे प्रश्न विचारायचे आणि लोकांच्या मनात गोंधळ उडवून द्यायचा असतो. पण जे प्रश्न त्या आंदोलक वा निदर्शकांना विचारले जातात, तेच विचारणार्‍यांनी त्यासाठी स्वत: काय केले; हा प्रश्न कोणी विचारायचा?  यांनी वाहिन्या वा वृत्तपत्रातली नोकरी सोडून किंवा विद्यापिठातली प्राध्यापकी सोडून; कधी गुजरातच्या दंगलग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले आहे काय? मग दुसर्‍यांना असले सल्ले देणे म्हणजे नागड्याने लंगोटी नेसलेल्यांना जरा चांगले कपडे घालून येण्याचा सल्ला देणेच नाही काय? असे प्रश्न एकतर बुद्दू विचारू शकतो किंवा बदमाशच विचारू शकतो. ज्या लोकांना आंदोलन करायचे असते, ते त्यांच्या हेतूने आंदोलन करीत असतात. त्यांनी कोणत्या विषयावर आंदोलन करावे; असे दुसर्‍या कोणाला ठरवण्याचा अधिकार नसतो. तसा असेलच तर मग अयोध्येत मंदिर बांधण्याच्या आंदोलनात मुलायम मायावती का नाहीत; असा प्रश्न का विचारला जात नाही? संघ परिवार दंगलग्रस्त मुस्लिमांच्या न्यायासाठी काय करतो; असे विचारणार्‍यांची म्हणूनच कींव येते. कारण त्यासाठी संघाची स्थापना झालेली नाही किंवा तो त्या संघटनेचा हेतू नाही. जसा मुलायम वा कम्युनिस्ट अयोध्या आंदोलनात नसतात, तसेच संघवाले मुस्लिमांच्या न्यायाच्या भानगडीत नसणार. पण असे प्रश्न विचारले जातात, कारण लोकांची त्यातून दिशाभूल करायची असते.

   आज दिल्लीत लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते सामुहिक बलात्काराच्या एका भीषण घटनेमुळे आणि त्यात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी व्हायला कुठलीही अडचण असण्याचे काही कारण नाही. जे आंदोलन करतात, त्यात असे प्रश्न विचारणारे कधी सहभागी होतात काय? म्हणजे आम्ही सहभाग देणार नाही, आम्ही इथे बसून आंदोलनाची टवाळी करणार आणि पुन्हा आंदोलनात कोणाला घ्यायचे; त्याची परवनगी याच शहाण्यांकडून घ्यायची. कमाल आहे ना? यालाच नागडेपणा म्हणतात. हल्ली माध्यमांची एक बदमाशी चालू झालेली आहे, त्यातलाच हा प्रकार आहे. बलात्काराच्या प्रकरणात निष्क्रीय ठरलेल्या सरकारचा बचाव करता येता नाही, तर आंदोलकांवर शंका काढायच्या. त्यात रामदेव बाबा का आले? आंदोलन केजरिवाल कंपूने हायजॅक केले. ही भाषा शुद्ध बनवेगिरी आहे. कारण आंदोलनात कोण आले, त्यापेक्षा सरकारने त्या आंदोलनाला प्रतिसाद कसा दिला; हा गंभीर प्रश्न आहे. इतकी भीषण घटना दिल्लीत व देशाच्या राजधानीत भर वर्दळीच्या रस्त्यावर घडली आणि त्यावर लोकांमध्ये प्रक्षोभ माजला असतानाही; सरकार बिळात दडी मारून बसले आहे, ही मुळात गंभीर बाब आहे. जर सरकार लोकांच्या प्रक्षोभाला दाद देत नसेल, तर लोकही पोरकेपणाने कुणाचा सहारा मिळतो काय ते बघणार ना? मग त्यांच्या मदतीला व सहकार्याला विरोधी पक्ष वा अन्य संघटना आल्या, तर दोष कुणाचा? विरोधी पक्ष वा अन्य संघटनांचे दार वाजवायला लोक गेलेले नव्हते. मुळात लोक सरकारचेच दार ठोठावत येऊन उभे होते. त्यांना सरकारने कसा प्रतिसाद दिला? त्या लोकांच्या अंगावर पोलिस घातले गेले, त्यांच्यावर अश्रूधूर सोडण्यात आला. लाठीमार करून लोकांना पिटाळून लावण्यात आले. त्याबद्दल माध्यमांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. ते राहिले बाजूला आणि हेच माध्यमातील शहाणे आंदोलकांना दुसर्‍यांची मदत कशाला घेतली; म्हणून जाब विचारतात. याला आपल्या सामान्य मराठी भाषेत काय म्हणतात? आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना.

   ही आजच्या आपल्या देशातील शहाण्यांची शोकांतिका आहे. चक्क चौकात नागडे उभे राहून हे शहाणे अब्रूदार सामान्य जनतेला म्हणजे आम आदमीलाच लंगोटी कशाला नेसलास; असा जाब विचारता आहेत. यालाच बेशरमपणा म्हणतात. दुसरीकडे मग या आंदोलनाला नेताच नाही, असाही दावा केला जातो. नेता असेलच कसा? जेव्हा जेव्हा लोकांनी कुणा नेत्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, तर त्याला बदनाम करून हा कशाला आणि तो कशाला; असे विचारणारे हेच शहाणे असतात ना? अण्णांच्या आंदोलनात त्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप करायचा. स्वामी रामदेवच्या आंदोलनात तेच आरोप, केजरिवालवर तोच आरोप. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत; त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही. आता ताज्या आंदोलनात नेताच नाही, मग त्याला निर्नायकी म्हणायचे. म्हणजे यात एकच सिद्धांत ठरलेला दिसतो, सरकारविरोधात आंदोलन करू नका असे म्हणायचे नाही, पण तसे सुचवत रहायचे. कितीही अराजक असो, कितीही भ्रष्टाचार असो, त्या विरुद्ध आंदोलन करणे म्हणजे गुन्हा आहे, असेच लोकांच्या मनावर ठसवले जात आहे. याचाच दुसरा अर्थ जो काही अन्याय अत्याचार होत आहे, तो निमूटपणे सहन केला पाहिजे, असाच होतो. पण तो त्याच शब्दात सांगितला जात नाही. दाखवायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे, म्हणतात, तशी आज आपल्या माध्यमे व बुद्धीमंताची लाचार अवस्था झालेली आहे. अत्यंत बेशरमपणे गुन्हेगारी व सरकारी नाकर्तेपणाचे राजरोस समर्थन करण्यापर्यंत य शहाण्य़ांची मजल गेली आहे. त्यांच्यापेक्षा अडाणी अण्णा म्हणूनच लोकांना अधिक विश्वासार्ह वाटू लागले आहेत. त्यामुळेच नेता नसलेली जमावाची आंदोलने आकार घेऊ लागलेली आहेत.   (क्रमश:)
भाग   ( ३६ )    २५/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा