बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

अफ़वाबाज वाहिन्यांना शिक्षा कोण देणार?



    अफ़वा पसरवणे हा गुन्हा आहे असे नेहमी सांगितले जाते. पण कधीकधी शंका येते, की खरेच अफ़वा पसरवणे हा गुन्हा असता तर आजच्या या इतक्या वाहिन्या आपले आपले दुकान, इतके दिवस चालवू शकल्या असत्या काय? इतकी वृत्तपत्रे चालली असती काय? कारण जितकी अधिक पाने व जितक्या अधिक अफ़वा आणि वाहिन्या तेवढ्या अधिक अफ़वा; अशी आजची परिस्थिती झालेली आहे. काही वर्षापुर्वी मुंबईत तीन बॉम्बस्फ़ोट झाले. त्यातले दोन चर्नीरोडच्या जवळ मुंबादेवीच्या परिसरात आणि तिसरा गेटवेपाशी. पण त्या संध्याकाळी बहुतेक वाहिन्या चार स्फ़ोट झाल्याची रसभरित वर्णने ऐकवत होत्या. रस्त्यावर जो कोणी भेटेल त्याला प्रत्यक्ष दर्शी म्हणून पेश करत होत्या. त्यात ‘आजतक’ व ‘एनडीटीव्ह’ यांचा समावेश होता. मराठी वाहिन्यांचे पेव तेव्हा फ़ुटले नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून अखेर लोकांना सत्य समजू शकले. त्यात मुंबादेवी व झवेरीबाजार मिळून जे दोन स्फ़ोट झाले होते, त्याच्या जागांची ठिकाणे माहिती नसल्याने, दिल्लीच्या स्टुडीओमध्ये बसून रसभरित वर्णने सांगणार्‍यांना काहीच कळत नव्हते आणि बातमी देणार्‍यापासून ऐकणार्‍यापर्यंत सगळेच अंधारात चाचपडत होते. म्हणजेच चालू होती ती नुसती अफ़वाबाजी होती. पुढल्या काळात वाहिन्या वाढत गेल्या आणि सबसे तेज म्हणजे सर्वात आधी बातमी देण्याच्या नादात वाटेल ते सांगण्याची स्पर्धाच सुरू झाली. ज्यांच्याकडे काहीच बातमी नसेल ते बेधडक बातम्या घडवू लागले. म्हणजे वाटेल ते खोटेही सांगू लागले. त्यात झीन्युजचा सध्या गजाआड असलेला सुधीर चौधरी आघाडीवर होता. त्याने एका शाळेतील प्राचार्या विद्यार्थिनींना वेश्यावृत्तीला लावतात; अशी अफ़वा तयार करून खळबळ उडवून दिली होती. मग शाळेवर जमाव धावून गेला होता. त्यात त्याने चेहरा झाकलेली त्याच्याच वाहिनीची एक मुलगी वार्ताहर शाळेची विद्यार्थिनी म्हणून दाखवून खोटारडेपणा केला होता. थोडक्यात खोटेपणा आता माध्यमांचा स्वभाव बनू लागला आहे. मग त्याचा लाभ उठवणारे ग्राहकही तयार होणारच ना? चार नोटा तोंडावर फ़ेकल्या; मग कुठलीही अफ़वा पसरवणे आता सोपे झाले आहे.

   याचा ताजा अनुभव म्हणजे लोकांची आंदोलने सुरू झाली, लढे सुरू झाले; मग त्याच्या विरोधात कंड्या पिकवून बेदिली व गैरसमज पसरवायचे. त्यासाठी मग दिग्विजय सिंग यांच्यासारखे अफ़वाबाज सज्ज असतातच. दिल्लीच्या आंदोलनात तेच झाले आहे. जेव्हा त्या निदर्शनांवर कुठल्या राजकीय पक्ष वा संघटनेचा आरोप करण्याची सोय राहिली नाही; तेव्हा त्याचा ताबा गुंड समाजकंटकांनी घेतल्याच्या अफ़वा सुरू झाल्या. ज्याप्रकारची तोडफ़ोड व फ़ेकाफ़ेक त्या आंदोलनात झाली, त्याला समाजकंटकांनी केलेला धुमाकुळ म्हणायचे असेल; तर मग आपल्या देशातल्या तमाम पक्ष संघटना व त्यांच्या आंदोलनामध्ये केवळ गुंड व समाजकंटकांचाच भरणा असतो असे म्हणायला लागेल. शरद पवार यांच्या थोबाडीत दिल्लीमध्ये एका माथेफ़िरूने मारली, त्यानंतर पुण्यात जवळपास दोन दिवस बंद होता आणि मोडतोड चालू होती. त्यात आघाडीवर तिथले महपौरच होते. मग त्यांना समाजकंटक म्हणणार आहोत काय? आणि ज्याप्रकारांना समाजकंटकाची कृती म्हटले जाते, त्याचे रूप आजकाल अनेक विधानसभा व कायदेमंडळे, महापालिकांच्या सभागृहात दिसत असते. त्या सर्वांना गुंडच म्हणायला हवे. पण मग तसे म्हटले तरी चालत नाही. केजरिवाल किंवा शिसोदियांनी संसदेत गुंड बसलेत, त्यातल्या पावणेदोनशे लोकांवर गुन्हे दाखल आहेत म्हटले तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून उलट आरोप करण्यात माध्यमांचाच पुढाकार होता ना? मग परवा दिल्लीच्या दंगल वा निदर्शनामध्ये घडले त्याला नेमके काय म्हणायचे? गुंडगिरी की संसदिय कामकाज?

   अशा माध्यमांकडून खर्‍या बातम्या किंवा माहिती मिळणेच अशक्य आहे. म्हणूनच दिल्लीच्या निदर्शनांवर गुंडगिरीचा आरोप झाला तर नवल नव्हते. पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी एका पोलिसाच्या हत्येचा आरोप आंदोलकांवर लावला; तेव्हा कहर झाला. सुभाष तोमर नावाचा एक पोलिस शिपाई त्याच निदर्शनांच्या वेळी दगड लगून जखमी झाल्याच्या बातम्या सर्वप्रथम आल्या. मग त्याचा त्याच जखमेमुळे मृत्यू झाल्याचे सांगत त्यात केजरिवालच्या पक्षाचे कार्यकर्ते पकडल्याचा गवगवा माध्यमांनी केला. अखेरीस केजरिवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आठ लोक पकडले आहेत; त्यात पक्षाचा एकच कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तेवढेच नाही, ज्यांना तोमर हत्या प्रकरणी अट्क झाली होती, त्याबद्दल खुद्द न्यायमुतींनीच शंका व्यक्त केली. पोलिसांना त्या अटक व धरपकडीबद्दल समर्पक उत्तरे कोर्टामध्ये देता येत नव्हती. पण तोपर्यंत तमाम वाहिन्यांनी निदर्शकांनी पोलिसाचा हकनाक बळी घेतल्याच्या अफ़वा पसरवायला सुरुवात केली होती. मात्र हा पोलिस ज्या इस्पितळात आहे वा त्याच्यावर उपचार चालू आहेत, तिथून कुठली माहिती घेण्याची कोणाला गरज वाटली नाही. तो कुठल्या दगडाने जखमी झालेला नाही, किंवा त्याला दगड लागून जिव्हारी जखम झालेली नाही; असे उपचार करणारे डॉक्टर्स सांगतही होते. पण सबसे तेज दौडणार्‍यांना सत्य हवेच कुठे होते? पोलिस वा सरकारच्या इशार्‍यावर अफ़वा पसरवण्याचे कंत्राट घेतल्यासारखी माध्यमे कामाला लागली होती. पण माध्यमांचे दुर्दैव असे, की त्यांनीच केलेल्या चित्रणात सत्य नोंदले गेले होते. त्यात तो पोलिस म्हणजे सुभाष तोमर रस्त्यात पडलेला आणि त्याला मदत करणार्‍या दोघा निदर्शकांचेही चित्रण झालेले होते. एका निदर्शक जखमी मुलीनेच तोमरचे डोके मांडीवर घेऊन त्याला मदत चालविल्याचे दृष्य़ टिपले गेले होते. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षात त्या शिपायाला वाचवण्य़ाची धावपळ चालविली होती, त्यांच्यावरच दगडफ़ेक व खुनाचा आरोप माध्यमे करीत होती. पोलिस सांगत होते, आणि माध्यमे अफ़वा पसरवत होती.

   योगेंद्र नावाचा एक पत्रकारितेचा विद्यार्थी त्या घटनेचा साक्षिदार होता आणि तोमरला इस्पितळात पोहोचवण्यात सहभागी झाला होता. सहाजिकच अनेक चित्रात तो टिपला गेला होता. आता त्यानेच समोर येऊन सरकार, पोलिस व माध्यमांचा बुरखा फ़ाडला आहे. आपण व एक जखमी तरूणी त्या तोमरला कसे वाचवत होतो, त्याचे दाखले योगेंद्रने चित्रणाच्या मदतीनेच जगासमोर सिद्ध केले. त्यामुळे दिल्लीच्या पोलिस आयुक्तांचे तोंड काळे झाले आहे आणि सरकारच्या बेशरमपणाचा पुरावा जगासमोर आलेला आहे. पण त्याचवेळी त्या पापामध्ये माध्यमांनी शासनाला दिलेली साथ विसरता येईल काय? दगड लागून तोमर जखमी झाला आणि त्याच्या जीवावर बेतले; ही मुळातच अफ़वा होती. तिची शहानिशा दोन दिवस वाहिन्यांनी कशी केली नाही? पोलिस आयुक्त व सरकारी इशार्‍यावर अफ़वा पसरवणार्‍यांनी इस्पितळाचे डॉक्टर काय सांगतात, त्याकडे काणाडोळा करून थापा कशाला मारल्या? तोमर दगडफ़ेकीत जखमी झाला असेल तर त्याला पोटात आत इजा कशी झाली? दगड लागून शरीराच्या आत जखमा कशा होऊ शकतील? तोमर दिर्घकाळ हृदयविकाराचे उपचार घेत होता, हे सत्य पोलिसांनी लपवले होते. पण योगेंद्र पुढे आला नसता तर माध्यमांनी पसरवलेली अफ़वा सत्य ठरून गेली असती. अण्णा हजारे किंवा विरोधी पक्षांची विश्वासार्हता संपली काय याची उठताबसता चर्चा करणार्‍या माध्यमांची विश्वासार्हता किती उरली आहे? एका शिकावू पत्रकाराने बुधवारी एकूणच वाहिन्यांच्या संपादक व पत्रकारांची अब्रू वेशीला टांगली म्हणायची. कारण त्यांनीच चित्रित केलेल्या व टिपलेल्या चित्रणातून त्याने वाहिन्यांवरच्या बातम्यांना अफ़वा ठरवून दाखवले. जिथे हार्ट अटॅकने तोमर कोसळला होता, त्याची जी छायाचित्रे बुधवारी तमाम वाहिन्या दाखवत होत्या, त्यात जखमी पोलिसाला मदत करणारे दोन निदर्शक त्या संपादक पत्रकारांना का दिसले नव्हते? शिकावू पत्रकाराने डोळे उघडण्यापर्यंत हे वाहिन्यांचे संपादक डोळे झाकून बातम्या सांगत होते, की अफ़वा पसरवत होते? सवाल इतकाच आहे, की अफ़वा पसरवणे हा गुन्हा असेल तर तोमर दगडफ़ेकीमुळे जखमी होऊन जिवाला मुकला, अशी अफ़वा पसरवणार्‍यांचे काय? त्यात दिल्लीच्या पोलिस आयुक्तांपासून वाहिन्यांच्या पत्रकार संपादकांपर्यंत अनेकांचा समावेश होतो. तेही गुन्हेगार नाहीत काय? अशा अफ़वा पसरल्याने पोलिस बिथरले असते आणि त्यांनी निदर्शकांना झोडपून काढले असते; तर किती भीषण परिस्थिती ओढवली असती? या व्यापक प्रमाणात अफ़वा पसरवणार्‍या वाहिन्या व त्यांच्या पत्रकारांवर कोणती कारवाई होणार आहे?   ( क्रमश:)
भाग   ( ३८ )    २७/११/१२

1 टिप्पणी: