शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

शिवसेनेचा पहिला गाजलेला शिवाजीपार्क मेळावा



   १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी रानडे रोड दादर येथील आपल्या रहात्या घरातच साधा नारळ फ़ोडून केली. त्यासाठी कुठ्ला मोठा समारंभ आयोजित केला नव्हता किंवा व्हिजन डॉक्युमेंट वगैरे तयार केलेले नव्हते. त्यासाठी हॉल वा गर्दी जमवली नव्हती. त्यांच्या मनातली खदखद होती, तिच्याशी सहमत असलेल्या मोजक्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत ही संघटना स्थापन झाली. म्हणजे तिचे नामकरण झाले. तिची नोंदणी कुठल्या निबंधकाकडे झाली नव्हती, की केली नव्हती. बिल्ले वा कागदपत्रे, माहितीपत्रके तयार केली नव्हती. कदाचित अशी ही जगातली पहिली संघटना असेल. पण स्थापन झाल्यावर ‘मार्मिक’मधून तिचा प्रचार सुरू झाला होता व सदस्य होण्याचे आवाहन करण्यात येऊ लागले. त्यात कोण सहभागी होईल व सदस्य होईल; अशी बाळासाहेब वा त्यांच्या सहकार्‍यांची अपेक्षा होती? आणि त्यांना कुठून प्रतिसाद मिळू लागला? ‘मार्मिक’ वाचणारा मराठी तरूण आणि प्रामुख्याने जो समिती विस्कटल्याने नाराज होता; असा तरूण पर्याय शोधतो आहे आणि तो नव्या संघटनेत येणार, अशी त्यांना खात्री होती. आणि मग शिवसेनेची भूमिका मांडायला त्यांनी मुंबईभर फ़िरणे सुरू केले. अगदी गल्लीबोळातल्या लहानसहान मराठी तरूणांच्या ज्या संस्था व मंडळे होती, तिथे बाळासाहेब जाऊ लागले. त्या तरूणांशी त्यांचा संवाद सुरू झाला. पण शिवसेना नावाचे वादळ उठते आहे, त्याचा थांगपत्ता प्रस्थापित राजकीय पक्ष वा त्यांच्या नेत्यांना नव्हता. कारण हे पक्ष संघटित होते आणि त्यांच्याकडे संघटित कार्यकर्त्यांची ताकद होती. तसे शिवसेनेचे आरंभीचे तरी स्वरूप नव्हते. जिथे सभा वा बैठक व्हायची, तिथे एखादा चुणचुणीत स्मार्ट तरूण म्होरक्या म्हणून नेमला जायचा. अशा तरुणांशी संपर्क ठेवण्याचे काम माधव देशपांडे, श्याम देशमुख वा पद्माकर अधिकारी आदी मंडळी करायची. हा म्होरक्या म्हणजेच शाखाप्रमुख असायचा. पण शाखा म्हणजे काय, त्याची राजकीय वा भौगोलिक व्याख्या वा सीमा नव्हत्या. कालपरवाच मंत्रालयात श्रद्धांजलीच्या भाषणात छगन भुजबळ यांनी त्याची आठवण कथन केली. माझगावमध्ये भुजबळ नावाचा तरूण शिवसेनेचा शाखाप्रमुख झाला. मग त्याचे अधिकारक्षेत्र कुठवर होते? लागबागला बंडू शिंगरे किंवा ग. म. वराडकर आणि सातरस्त्याला रमेश लब्दे शाखाप्रमुख होते. पण त्यांच्या शाखेच्या सीमा त्यांनाही माहित नव्हत्या. कारण या सर्वच तरूणांमध्ये उत्साह प्रचंड असला तरी सार्वजनिक वा राजकीय कामाचा अनुभव अजिबात नव्हता. खरे तर त्यांनाच कशाला, खुद्द शिवसेनाप्रमुख होऊन नेतृत्वाची धुरा उचललेल्या बाळासाहेबांना तरी सार्वजनिक जीवनाचा काय अनुभव होता?

   प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या किंवा अन्य समाज सुधारणेच्या चळवळीत होते. पण बाळासाहेब वा श्रीकांत या त्यांच्या मुलांनी कधी कुठल्या राजकीय वा सामाजिक संघटनांमध्ये काम केलेले नव्हते. सहाजिकच शिवसेना स्थापन केली, तरी तिच्या संघटनेचे धोरण व संघटन याबद्दल खुद्द शिवसेनाप्रमुखही नवखेच होते. म्हणूनच आधीपासून राजकारण व सार्वजनिक जीवनात मुरलेल्या नेते व पक्षांना शिवसेनेचे महत्व कधीच वाटले नाही. चळवळीच्या निमित्ताने प्रबोधनकारांना जे एकाहून एक मराठी दिग्गज घरी भेटायला यायचे; त्यांच्यातल्या गप्पा आणि वादविवाद ऐकून बाळासाहेबांमध्ये परिपक्वता आलेली होती. आणि अशारितीने चाललेल्या त्यांच्या धडपडीला मार्गदर्शन व मदत करताना अनुभव असूनही प्रबोधनकारांनी त्यात कुठलीही ढवळाढवळ केली नाही, याला खास महत्व आहे. म्हणजे त्यांनी नव्या पिढीतले मराठी नेतृत्व आपल्या पायावर आपल्याच अनुभवातून उभे रहायला बहूमोलाची मदत केली; हे कोणी नाकारू शकणार नाही. ज्याला आजच्या काळात सुधारक व विचारवंत मानले जाते व तेव्हाही मोठीच राजकीय मान्यता होती; असा हा बुजूर्ग घरात असूनही त्याने शिवसेनेच्या कामात कुठेही हस्तक्षेप केला नाही, ही बाब सोपी नाही. बाळासाहेबांच्या धडपडीकडे व त्यांच्याकडे येणार्‍या तरूणांवर प्रबोधनकारांचे बारीक लक्ष होते. म्हणूनच त्यांनी संघटनेसाठी नाव सूचवले. गर्दी वाढतेय आणि नुसत्याच गप्पा चाललेल्या बघून त्यांनीच नाव काही ठेवले का; अशी चौकशी केली आणि पुत्राने नकार सांगितल्यावर "शि व से ना" असे सहज नाव सुचवले. त्यानंतर शिवसेना स्थापन झाली. पण म्हणून संघटना कशी असावी वा तिचे स्वरूप मांडणी कशी हवी, यात पित्याने कधी हस्तक्षेप केला नाही. नव्या पिढीला समजून घेण्याची व संधी देण्याची हीच क्षमता; हा त्यांचा मोठाच गुण होता आणि बाळासाहेबांनी तो आयुष्यभर जीवापाड जपला असे म्हणता येईल. अन्यथा शिवसेनेच्या शेहेचाळिस वर्षात त्यांना तीनचार पिढ्याच्या तरूण मनावर राज्य करताच आले नसते.

   तर अशा गल्लीबोळात सभा घेत फ़िरणारे बाळासाहेब एकटेच खंदा वक्ता होते आणि जशी व्याप्ती वाढत गेली; तसे त्यांना इतर सहकारी मिळत गेले. माध्यमे व राजकीय पक्षांनी त्यांची दखल घेतली; तेव्हा जी मंडळी शिवसेनेचे नेते म्हणून जगासमोर आले, त्यापैकी कोणीही तत्पुर्वी राजकीय संघटनेत पदाधिकारी वा नेता म्हणून काम केलेले नव्हते. नाही म्हणायला दत्ताजी साळवी हा एकमेव अनुभवी नेता म्हणायचा. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केलेले होते. गिरणी कामगार चळवळीचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. पण बाकी वामनराव महाडीक, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, लिलाधर डाके, मधुकर सरपोतदार असे जे नेते झाले; त्यांचा राजकीय वा सार्वजनिक अनुभव शुन्यच होता. पण चळवळ व संघटनाच त्यांना नेता म्हणून घडवत गेली. त्यांना आकार देत गेली. अशा आरंभकाळातील शिवसेनेच्या बैठका प्रामुख्याने गिरणगावातल्या व्यायामशाळांत झालेल्या होत्या. तिथे एक हिंमतबाज तरूणांचा संघटित उत्साही गट कायमस्वरूपी कार्यरत असतो. सहाजिकच तिथून पहिली सुरूवात झाली. अनेक घरात तर आजोबा कॉग्रेसनिष्ठ बाप समितीचा निष्ठावान आणि नुकतीच मिसरुड फ़ुटलेला पोरगा शिवसेना किंवा बाळासाहेबांच्या प्रेमात पडलेला; अशी स्थिती होती. त्या त्या घरात आणि चाळीत त्यावरून वादावादी सुद्धा चालायची. अशा संस्थांशी संपर्क आल्यामुळेच १९६६ च्या दसर्‍याला पहिली जाहीर भव्य सभा घेण्य़ाचे धाडस शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब करू शकले. त्यांना अनेक जाणकारांनी एवढ्या मोठ्या मैदानात सभा घेऊ नये; विचका होईल असा प्रेमळ सल्ला दिलेला होता. कारणही तसेच होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दिग्गज नेत्यांच्या गाजलेल्या सभांचा इतिहास त्या मैदानाला होता. तिथे लाखभर किमान गर्दी झाली नाही; तर बोजवारा उडाला असेच म्हटले जाणार होते. पण बाळासाहेबांचा त्यांना भेटलेले तरूण व त्यांच्या उत्साहावर मोठाच विश्वास होता. म्हणून त्यांनी शिवाजी पार्कची ती सभा घेतली आणि त्या सभेने मुंबईच्या क्षितीजावर एक नवी राजकीय शक्ती उभी रहात असल्याची चुणूक जगाला दाखवली.

   जितक्या भडक भाषेत ‘मार्मिक’ लिहित होता; तेवढ्याच तिखट भाषेत बाळासाहेबांनी तिथे भाषण केले आणि तिथून परतणार्‍या प्रक्षुब्ध तरूणांच्या जमावाने अनेक उडूपी हॉटेलची मोडतोड केली. आज ज्याला शिवसेनेची राडासंस्कृती म्हणून हेटाळणी अगत्याने केली जाते; त्याची सुरूवात तिथून झाली. शिवसेना म्हटले मग उडूपी हॉटेल मालकांच्या मनात धडकी भरावी; असाच तो प्रकार होता. त्या पहिल्या शिवसेनेच्या सभेत जे प्रमुख वक्ते होते त्यातले फ़ारसे कोणी पुढल्या काळात शिवसेनेमध्ये राहिले नाहीत. पुढे कॉग्रेसमध्ये जाऊन मंत्री झालेले व उपमुख्यमंत्रीपद भुषवलेले प्रसिद्ध वकील रामराव आदिक त्या सभेतले एक वक्ता होते. पण बाकी गोष्टी सोडुन दिल्या तरी त्या प्रचंड ऐतिहासिक सभेने शिवसेना मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनून गेली; ती आजवर कायम आहे. त्या सभेच्या बातम्या, त्यानंतर झालेला गदारोळ व धमाल; यामुळे उरलासुरला मुंबईचा मराठी तरूण शिवसेनेकडे अपेक्षेने बघू लागला. राजकीय आणि सार्वजनिक संघटना शिवसेनेची दखल घेऊ लागल्या. आणि अर्थातच त्या सभेत व ‘मार्मिक’मधून समितीवर जी बोचरी टिका केली जात होती, त्यामु्ळे समिती म्हणुन एकत्र असलेल्या डाव्या पक्षांना शिवसेनेची दखल घेणे भागच पडले. मात्र ती दखल अशी घेतली गेली, की अजून डाव्या समिती जो मराठी तरूण शिल्लक होता, त्याला शिवसेनेकडे ढकलण्या्चीच चुक त्यातून झाली. शिवसेनेला दुखावण्याच्या त्या उचापतीने प्रत्यक्षात मराठी तरूण दुखावत होता व सेनेकडे झुकत चालला होता. असे काय केले होते संपुर्ण महाराष्ट्र समितीने?    ( क्रमश:)  
भाग   ( २० )    ९/१२/१२

1 टिप्पणी:

  1. भाऊ तुमच्या या उलट तपासणीला पुस्तक रुपात प्रकाशित करा, किंबहुना तुम्ही आता लवकरच एखाद्या चांगल्या विषयावर पुस्तक लिहायला घ्या , तुमच्याकडे विषयांची कमी नाहीच !! आताच माझी प्रत राखून ठेवतो .

    उत्तर द्याहटवा