मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

तो छुपा रुस्तुम महेश भट्ट होता   जाफ़रभाई सरेशवाला नावाचा गुजराती मुस्लिम, ज्याने मोदींना थेट आंतराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलले होते; तो रातोरात सेक्युलर मंडळींचा  जगभर हिरो झाला होता. पण तितक्याच वेगाने तो रातोरात त्याच सेक्युलर महानाट्यातला खलनायकही होऊन गेला. कारण त्याने गुजरातच्या मुस्लिमांना व दंगलपिडीतांना न्याय मिळावा, म्हणून मुख्यमंत्री मोदींना भेटायचे ठरवले होते. त्यासाठी आधी त्याने आपल्या धर्माची म्हणजे इस्लामची त्याला मान्यता आहे किंवा नाही; याची इंग्लंडाम्ध्येच काही मौलवीकडून चाचपणी केली. तीन वेगवेगळ्या मौलवींना त्याने याबाबतीत विचारले. ज्याच्यावर मुस्लिमांना मारले किंवा छळ केल्याचा आरोप आहे; ज्याला मुस्लिमांचा शत्रू मानले जाते, त्याच्याशी संवाद करावा काय? त्या मौलवींनी जाफ़रभाईला होकारार्थी उत्तर दिले. तेवढेच नाही, तर त्यासाठी इस्लामिक धर्मग्रंथ कुराण व हादीसमधील उतारे व आयता काढून दिल्या. त्यांचे अर्थही सविस्तर समजावले. मात्र हे धर्ममार्तंडही सेक्युलर  दहशतीने किती भयभीत झालेले होते, ते बघण्यासारखे आहे. आज जगात सर्वात जिहादी व कडवे कट्टरपंथी म्हणून मुस्लिम मौलवींचा उल्लेख केला जातो. पण कुठल्याही कडव्या मुस्लिम मौलवी वा धर्मांध मुस्लिमापेक्षा सेक्युलर किती कट्टरपंथी ‘जिहादी’ आहेत; त्याचा हा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव मोठा थरारक आहे. डोळ्यात अंजन घालणारा आहे. कारण शत्रूशीही संवाद करून उपाय मिळत असेल, तर त्याला प्राधान्य दिले पाहिजे व संवादच कुठल्याही विवादाचे उत्तर असते; असे मौलवी जाफ़रभाईला सांगत होते. सेक्युलर मात्र विसंवादच उत्तर असते; असा अट्टाहास धरून बसलेले होते. एका बाजूला संवाद व सहिष्णूतेची प्रवचने सेक्युलर देत असतात. पण संवाद किंवा विचारांनी प्रश्न सोडवण्यात, त्यांचीच कशी आडकाठी असते; त्याचा हा नमूना आहे. पण त्यांच्या विरोधाला जाफ़रभाई जुमानत नव्हता. त्याला हिंदू-मुस्लिम लढवायचे नव्हते; तर त्यांच्यात सलोखा निर्माण करायचा होता आणि त्यासाठी कोणाशीही संवाद करायची त्याने मनोमन तयारी केली होती. पण त्याचा सुगावा लागताच सर्वत्र जाफ़रभाईच्या विरोधात सेक्युलर काहूर माजवण्यात आले. त्यावर तो म्हणतो, ‘मी व्यावसायिक आहे. त्यामुळे कोणी आरोप केले वा संशय घेतला तरी सहन करू शकतो. पण इस्लामसाठी ज्यांनी आपले आयुष्य नि:स्वार्थीपणे खर्ची घातले, त्या तिघा मौलवींच्या विरोधात उठवण्यात आलेले काहूर संतापजनक होते.’

   त्याच दरम्यान गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूकीसाठी परदेशी उद्योगपती व कंपन्यांच्या लोकाना भेटायला मोदी इंग्लंडला यायचे होते. तेव्हा दंगली संपुन दीड वर्षाचा कालावधी उलटलेला होता. ही माहिती मिळताच जाफ़रभाईने मोदींना तिथेच भेटायचे ठरवले. कारण मोदींना आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलल्याने, त्याला परत गुजरातला यायची भिती वाटत होती. कारण उघड होते. गुजरातमध्ये कोणीही मुस्लिम सुरक्षित नाही, असा जगभर गवगवा करण्यात आला होता. कोर्टात मुस्लिमांना न्याय मिळू शकत नाहीत व गुजरातचे पोलिस मोदींचा इशार्‍यावर कोणालाही गठडी वळून गजाआड ढकलतात, ही समजूत पक्की तयार झाली होती. अशा पार्श्वभूमीवर मोदींना भेटायला भारतात येण्याची जाफ़रभाईमध्ये हिंमत नव्हती. सहाजिकच इग्लंडला येणार्‍या मोदींना तिथेच भेटून संवाद साधायचा विचार त्याने केला होता. याची खबर लागताच जगभरच्या तमाम सेक्युलर माध्यमात व टोळ्यांनी जाफ़रभाईवर गद्दार असल्याचा हल्ला चढवला. विकला गेल्यापासून विविध स्वरूपाचे आरोप सुरू झाले. त्याला खलनायक बनवण्याशी जणू स्पर्धाच लागली. पण त्याचा निश्चय पक्का होता आणि त्याने प्रयत्नही सुरू केले होते. मात्र मोदीपर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग त्याला सापडत नव्हता. गुजरातच्या दंगलीनंतर जे सेक्युलर काहूर उठवले गेले होते, त्यातून गुजरात सरकारशी सामान्य मुस्लिमांचा संपुर्ण संपर्कच तोडण्यात आलेला होता. मुस्लिमांच्या विविध संस्था, शाळा, इस्पितळे वा इतर कुठल्याही गोष्टीसाठी सरकार दरबारी जायचे; तर मग सेक्युलर पक्ष वा संघटनांच्या मर्जीवर अवलंबून रहाण्याची वेळ आलेली होती. कारण मुख्यमंत्री मोदी वा अन्य कुणा भाजपावाल्याशी मुस्लिमांचा संपर्कच शिल्लक नव्हता. आणि भाजपाशी संपर्क म्हणजे गद्दारीचा आरोप. मग जाफ़रभाईने मोदींशी भेट घ्यायची तर ती निश्चित कोणी करून द्यायची? मोदींपर्यंत जायचे कसे? त्यात एक छुपा रुस्तुम निघाला. त्याचे नाव महेश भट्ट.

   मध्यस्थीला कुठलेच नाव सुचेना, तेव्हा जाफ़रभाईला अचानक चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचे नाव आठवले. त्यांनी गुजरातच्या दंगली झाल्यापासून सतत मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठवलेला होता. कदाचित महेश भट्ट त्यांचा कोणी परिचित आपली मदत करू शकेल, असे जाफ़रभाईला वाटले. त्यांनी महेश भटट यांच्याशी संपर्क साधला. पण तिथून नकारघंटाच ऐकू आली. मात्र काही दिवसांनी भट्ट यांनी स्वत: फ़ोन करून या कामी आपला मित्र इंडीया टीव्हीचा संपादक रजत शर्माचा मोदींशी संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून मोदींपर्यत पोहोचता येईल असे सुचवले. मात्र त्यासाठी जाफ़रभाईने रजत शर्माला तशी इमेल पाठवावी असे सुचवले. त्याप्रमाणे जाफ़रभाईने इमेल पाठवली आणि शर्मा यांनी ती मोदींपर्यंत पोहोचती केली. हा जाफ़रभाईने मोदींशी साधलेला पहिला संपर्क होता. याच माणसाने आपल्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचण्याचा उद्योग केला, याची मोदींना माहिती होती. पण त्याच्या अहमदाबाद येथील परिवाराची माहिती घेतल्यावर मोदींनी त्याला भेटायचे मान्य केले. पण अजून जाफ़रभाईच्या मनात अनिश्चितता होती. मोंदींच्या भेटप्रसंगी रजत शर्मा यांनीही हजर राहावे, असा आग्रह त्यांनी धरला. १७ ऑगस्ट २००३ या दिवशी मोदी इग्लंडला यायचे होते आणि जाफ़रभाईने आपल्या सल्लागार मौलवींसह त्यांची भेट घ्यायचे ठरवले होते. मात्र प्रत्यक्ष किती वेळ मिळणार याची काही खात्री नव्हती. आजवरचा जाफ़रभाईचा भारतीय मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा अनुभव असा होता, की फ़ारतर पाचदहा मिनीटांचा अवधी मिळेल आणि तेवढ्या वेळात आपण मुस्लिमांच्या न्यायाबद्दल कितीसे गार्‍हाणे मांडणार; अशी खंत त्याला होती. पण त्याची फ़िकीर नव्हती. कुठेतरी सरकारशी संवाद चालू व्हावा आणि शासकीय यंत्रणेकडून मुस्लिमांच्या समस्या व न्यायाचे गाडे सुरू व्हावे अशी त्याची अपेक्षा होती. आणि लक्षात घ्या त्यासाठी त्याला मोदींपर्यंतचा रस्ता प्रशस्त करणारा माणूस महेश भट्ट होता.

   किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? हाच माणुस नेहमी मोदींच्या विरोधात वाहिन्यांवर गरळ ओकताना दिसतो आणि कधीही त्याने खुलेपणाने जाफ़रभाई या मुस्लिमाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मोदींकडे पाठवल्याची वाहिन्यांवर बोलताना कबुली दिलेली नाही. जितक्या आवेशात वाहिन्यांवरून खोट्या अफ़वांवर हा माणुस मोदींच्या विरोधात बोलतो, त्यातले दोन सेकंद वापरून मोदींचा हा चेहरा त्याने का दाखवू नये? यालाच सेक्युलर दहशत म्हणतात. सत्य बोलण्याची हिंमत दाखवली; मग सेक्युलर टोळी तुमचा मुडदा पाडायला मागेपुढे बघत नाही. आपण मोदींच्या चांगल्या गोष्टीबद्दल खुलेपणाने बोललो; तर विनाविलंब जातीयवादी व हिंदूत्ववादी ठरवले जाण्याची भिती ज्याच्या मनात पक्की असते, त्याला सेक्युलर म्हणतात. आणि महेश भट्ट हा तसाच सेक्युलर आहे. म्हणूनच खुल्या व्यासपीठावर तो मोदींना शिव्या घालतो, पण खाजगीत मात्र मोदींच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतो. जाफ़रभाई पुरताच मोदींचा असा अनुभव नाही. वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनांच्या बाबतीतला खुद्द महेश भट्ट यांचा अनुभवही तितकाच धक्कादायक आहे. पण ते कधी त्याची जाहिर वाच्यता करणार नाहीत. कारण अर्थात त्यांना आपला सेक्युलर मुखवटा जपायचा असतो. जाफ़रभाई सोडा, महेश भट्ट सुद्धा मोदींचा अनुभव घेऊन बसला आहे. पण कधीतरी त्याने सत्य बोलण्य़ाची हिंमत केली आहे काय? असो, तर अशा मार्गाने प्रथम जाफ़रभाईचा मोदींशी संपर्क झाला आणि त्यांना मोदींना भेटण्याची संधी मिळाली. अर्थात तेव्हा मोदी हा खुप बदनाम माणूस होता. त्याला भेटायला कुठली गर्दी नव्हती. उलट त्याला भेटणे म्हणजेच पाप मानले जात होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. मोदींनी वेळ दिली होती आणि रजत शर्मा यांनी त्या बैठकीला हजर रहाण्याचे मान्य केले होते. अशा भेटीत काय होते, त्याचा जुना अनुभव जाफ़रभाईच्या गाठीशी होता, त्यामुळे कमीतकमी वेळात आपला विषय कसा मांडायचा याची फ़िकीर त्याला पडली होती. साधारणपणे मंत्री पाचदहा मिनीटे भेटतात. हस्तांदोलन, नावे विचारणे आणि मग अर्ज घेऊन निरोप. बाकी काही होत नाही. मोदी किती वेळ देणार, याची काही खात्री नव्हती. पण एकदा पाऊल उचलले तर माघार घेऊन चालणार नव्हते. जाफ़रभाईने आपल्या सोबत भाऊ तल्हा आणि एका वयोवृद्ध मौलवींना घेतले होते. आधी मोदींनी वेम्बली येथील एका हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता, तिथेच भेटायला बोलावले. पण खाजगीतच बोलायचे आहे असा आग्रह जाफ़रभाईने धरल्यावर, त्यांनी त्यांचा जिथे मुक्काम होता तिथे, म्हणजे जेम्स कोर्ट इथे बोलावले. संध्याकाळी पाच वाजताची वेळ दिलेली होती. अवघी पाचच मिनीटे आधी जाफ़रभाई तिथे जाऊन पोहोचले. पण तिथे त्यांना जो अनुभव आला, तो त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून गेला. यापुर्वी त्यांनी कॉग्रेसने बडे नेते व पंतप्रधान वा मंत्र्यांची भेट घेतली होती. पण त्या भेटी व मोदींची भेट, यातल्या फ़रकाने जाफ़रभाईला आपादमस्तक बदलून टाकले. काय असे घडले त्या भेटीत?   ( क्रमश:)
 भाग   ( १५८ )    १/५/१३

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

पॅलेस्टाईनचा निर्वासित आणि गुजरातच दंगलपिडीत

   मोजके शब्द पण त्याचा विपरित अर्थ निघेल अशी रचना असली; मग किती गोंधळ उडवता येतो, त्याचा नमूना मी कालच्या लेखातून पेश केला. आणि नेमकी हीच गोष्ट गुजरातच्या दंगलीच्या बाबतीत झाली आहे. जे घडले त्याच्या नेमक्या उलट्या बाजूने लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमे यशस्वी होऊन गेली. पण म्हणतात ना? तुम्ही काही लोकांना सर्वकाळ फ़सवू शकता. सर्वांना काही काळ फ़सवू शकता. पण सर्वकाळ सर्वांना फ़सवू शकत नाही. गुजरात दंगली व नरेंद्र मोदींच्या बाबतीत आता तेच घडू लागले आहे. सतत सातत्याने पसरवलेल्या खोट्याचा मुखवटा फ़ाटत चालला आहे. सत्य क्रमाक्रमाने लोकांसमोर येत चालले आहे. आणि सत्य इतके भीषण आहे, की ज्याला सैतान म्हणून लोकांसमोर पेश केला; तोच लोकांना आवडू लागला आहे. त्याचे कारण खोटे बोलणार्‍या व पसरवणार्‍यांनी अतिरेक करायचा नसतो, याचा सेक्युलर मंडळींना विसर पडला होता आणि आता उघडे पडायची वेळ आल्यावर आपणच विणलेल्या जाळ्यातून कसे बाहेर पडावे, त्याचा मार्ग त्यांना सुचेनासा झाला आहे.

   गडबड कशी होते? तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी खोटे बोलत असता आणि खोटे बोलता, तेव्हा ते लक्षात पक्के ठेवावे लागते. उलट सत्य बोलत असता, तेव्हा लक्षात ठेवावे लागत नाही. अगदी झोपेतून उठवले, तरी तुमच्या तोंडून सत्य चटकन अनवधानानेही बाहेर पडते. पण खोट्याचे तसे नसते. अनवधानाने खोटे बोलता येत नाही. त्यामुळेच गुजरातविषयी जो खोटा प्रचार झाला, तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा झाला. त्यात विरोधाभास होते आणि जेव्हा अशा थापा ऐकणारे वेगवेगळे लोक एकमेकांना भेटू लागले; तेव्हा त्यांनी ऐकलेल्या गोष्टी व तपशीलात फ़रक दिसू व जाणवू लागले. त्यातून काही मंडळी सत्याचा शोध घेऊ लागली आणि तसतसा सेक्युलर अपप्रचारातला खोटेपणा उघडा पडत गेला. आरंभीच्या खोटेपणात फ़सलेले अनेक लोक सत्य गवसल्यावर अधिक सत्य शोधून इतरांना समजावण्यात अगत्याने सहभागी होत गेले. त्यामुळे दहा वर्षांनंतर गुजरातच्या दंगलीचे सत्य समोर येऊ लागले आहे. जाफ़रभाई सरेशवाला त्यापैकी एक आहे, पण त्याच्याखेरीज मोदींविषयी सतत जहर ओकणारा चित्रपट निर्माता महेश भट्ट याचीही साक्ष धक्कादायक होऊ शकते. बेस्ट बेकरीची एकमेव साक्षीदार जाहिरा शेख हिने तीस्ताच्या खोटेपणाचा पर्दाफ़ाश केलेलाच आहे. पण त्याही प्रकरणात तीस्ताचा उजवा हात असलेला व अशा शेकडो दंगलपिडीतांना तीस्ताकडे न्यायासाठी घेऊन गेलेला रईसखान पठाणही; सत्याला सामोरा गेलेला आहे. अनेक अंगांनी सत्य समोर येत आहे. पण मी त्यांच्यापेक्षा जाफ़रभाईचा साक्षात्कार मोलाचा मानतो, कारण त्याने या विषयात खोल अभ्यास व तपशील समोर आणलेले आहेत. म्हणूनच मला त्याच्यातला बदल मोलाचा वाटतो.

   गुजरात फ़ेब्रुवारी २००२ मध्ये पेटला तेव्हा जाफ़रभाई दूर इंग्लंडमध्ये होता आणि ज्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या; त्याने तो विचलित झाला होता. पण जेव्हा त्याला नुसती तात्विक लढत व त्यात मुस्लिमांचे पिढ्यानुपिढ्या होणारे हाल यांची तुलना करावीशी वाटली; तिथून त्याने नवा विचार सुरू केला. मोदी किंवा जे कोणी अशा दंगलीला जबाबदार असतील, त्यांना कोर्टात खेचणे व शिक्षा देण्यापर्यंत घेऊन जाणे व्हायलाच हवे. पण तोपर्यंत दंगलीत उध्वस्त झालेले जे हजारो मुस्लिमांचे संसार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? मोजक्या बड्या राजकीय नेत्यांना खटल्यात गोवण्याने मुद्दा गाजतो, पण शेकडो लोक त्यात उध्वस्त झालेत, त्यांना न्याय मिळण्याचे काय? खटले लांबवत नेण्यातून काय साधले जाते; असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारताना जाफ़रभाईला एक पर्याय असा दिसला, की प्रत्येक न्याय हा कोर्टातच व्हायला हवा काय? आणि न्याय गुजरातच्या मुस्लिमांना मिळायला हवा असेल, तर तो त्यांनी स्वत: का मागायचा? गुजरात सरकार त्यांचे प्रतिनिधी आहे, तर सरकारने तो न्याय देण्यासाठी काही करायला नको काय? भले मोदीवर आरोप होत असतील. पण मुख्यमंत्री म्हणून आपल्याच मुस्लिम नागरिकांना, दंगलपिडीत असतील तर न्याय देणे ही मोदींची जबाबदारी नाही काय? हजारो दंगलपिडीत मुस्लिमांना कोर्टात जाणे शक्य नाही व स्वयंसेवी संस्था त्या प्रत्येकाचा खटला लढवू शकत नाहीत. मग त्यांच्या न्यायाचे काय? सरकारनेच ती जबाबदारी उचलायला हवी ना? म्हणजे पुन्हा मोदीनीच ते काम करायला हवे. पण ते व्हायचे कसे? मग न्यायासाठी मोदीलाच जाब का नाही विचारायचा? पण कसा विचारणार? जाफ़रभाईची मोदींशी ओळख नव्हती, की संपर्क नव्हता. पण असे करणे कितपत योग्य होते? जाफ़रभाई पक्का धर्मनिष्ठ होता व आहे. म्हणूनच आपला धर्म त्याबाबतीत काय सांगतो, त्याची माहिती घेण्याचा त्याने प्रयास केला. मोदी आपला व मुस्लिमांचा शत्रू असेल, तर त्याच्याशी संवाद करावा काय? तो धर्मद्रोह होईल काय? अशा प्रश्नांनी गडबडून गेलेल्या जाफ़रभाईने मग काही मौलानांशी चर्चा केली. त्याचेही कारण होते.

   त्याच दरम्यान पॅलेस्टाईन व इस्त्रायल यांच्यात अध्यक्ष बुश यांच्या पुढाकाराने वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. पाच दशके ज्यांनी एकमेकांवर रॉकेटने हल्ले केले, घातपात केले, हजारो माणसे मारली गेली आणि लाखो निर्वासित शिबीरात खितपत पडले आहेत, त्यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. त्यांचे निर्वासित छावण्यातील जीवन जाफ़रभाईने बघितले होते. मुंबईच्या कुठल्याही झोपडपट्टीतील बकाल वस्तीपेक्षा नरकवासाचे जीवन पॅलेस्टायनी निर्वासित जगत आहेत. पण त्यांचा लढा जागतिक व्यासपीठावर लढवणारे मात्र मौजमजेचे चैनीचे जीवन युरोपात जगत असतात. वाटाघाटी कितीही लांबल्या किंवा युद्धाचा भडका उडाला; म्हणून त्या नेत्यांच्या जगण्याला झळ पोहोचलेली नाही. मात्र ज्यांच्यासाठी ही ‘न्याय्य लढाई’ चालू आहे, ते प्रत्येक युद्धात उध्वस्त होतात व आणखीनच दुर्दैवी अवस्थेत जातात. मग या वाटाघाटी पाच दशके आधी सुरू झाल्या असत्या व तोडगा निघाला असता; तर आज पॅलेस्टायनी मुस्लिमांना असे भिकार्‍यासारखे जगावे लागले नसते. दोन तीन पिढ्यांमध्ये ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकले असते. युद्धाने वा तात्विक लढयाने त्यांना कुठलाही दिलासा व सुरक्षित जीवन दिलेले नाही. पण तरीही त्यांच्यात बोलणी होऊ शकतात, तर गुजरातचा मुस्लिम व मोदी यांच्यात संवाद का होऊ नये? शिवाय दंगलपिडीतांसाठी मदत गोळा करताना त्याला इंग्लंडमधल्या विविध देश व प्रांताच्या मुस्लिमांचा आलेला अनुभव धक्कादायक होता. दंगलपिडितांसाठी तोंडी सहानुभूती दाखवणारे व भाषणे देणारे आपल्या खिशातून काही मदत द्यायची वेळ आल्यावर तोंड लपवू लागले. गुजरातचा मुस्लिम भिकारी असल्यासारखी ही वागणुक जाफ़रभाईला हेलावून गेली. तिथेच कोर्ट व संघर्षाच्या पलिकडे जाऊन सरकारशी संवाद करण्याचा विचार बळावत गेला. आणि सरकार म्हणजे मोदी. शेवटी मोदी गुजराती मुस्लिमांचाही मुख्यमंत्री आहे. जाफ़रभाई आपल्या शंका घेऊन काही इस्लाम धर्मपंडितांना भेटला. त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनीही प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर अशा बोलण्यांसाठी धर्मतत्वांचा आधारही जाफ़रभाईला शोधून दिला.

   काम सोपे नव्हते. मोदीविषयी इतका अपप्रचार झालेला होता, की त्यांच्याशी मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून बोलणे म्हणजेच मुस्लिमांशी गद्दारी; असा आरोप होऊ शकत होता. आणि असा इशारा त्याच मौलवींनी जाफ़रभाईला दिला. मात्र तसे करण्यात गैर काहीच नाही, असा निर्वाळाही दिला. आजही आपण वातावरण पाहिले तर कुठलाही मुस्लिम मोदीविषयी दोन शब्द चांगले बोलला, तर तो लगेच गद्दार ठरवला जातो. तो काय बोलतो किंवा त्यात सत्य-तथ्य किती; याची दखल घेतली जात नाही. मोदी म्हणजे शत्रू आणि सैतान. तो चांगला असूच शकत नाही व तो काही चांगले करूच शकत नाही, अशी एकूणच ठाम मानसिकता निर्माण करून ठेवण्यात आलेली आहे. सहाजिकच सत्य व तथ्य कोणतेही शोधण्याची गरजच नाही. मग ते भाऊ तोरसेकरने सांगितलेले असो किंवा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव असो. तो तपासण्याची गरज नसते. मोदींवर कुठलाही आरोप करा, त्याच्या पुराव्याची गरज नाही आणि मोदीची कुठली सफ़ाई द्या, ती खोटीच असते, तपासण्याचे कारण नाही. अशी एक सेक्युलर दहशत निर्माण करण्यात आली आहे. आणि ती हिंदूंच्याच बाबतीतली नाही तर अगदी मुस्लिमांनाही तेवढीच असते. शाहीद सिद्दीकी व गुलाम वस्तानवी त्याचेच बळी झालेले आहेत. ही स्थिती आज इतक्या वर्षांनी असेल; तर २००३ म्हणजे दंगलीनंतर अवघ्या दिड वर्षांत किती दहशत असेल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. आपण मुस्लिम समाजातून बहिष्कृत होऊ आणि गद्दार ठरवले जाऊ, असा धोका जाफ़रभाईला उमगला होता. तात्काळ सेक्युलर माध्यमातून काहूर माजवले जाणार व आपल्या मुस्लिम असण्यावरच सवाल उभा केला जाणार, याची त्याला खात्री होती. पण त्याने तो धोका पत्करायचा निर्णय घेतला होता. बेकारी, गरीबी व उध्वस्तेतेचे बळी झालेल्या मुस्लिमांच्या यातना व दु:खाचे भांडवल करून व्यापार मांडणार्‍यांना आणि तोंडपाटिलकी करणार्‍याना शह देऊन गुजरातच्या दंगलपिडित मुस्लिमांना नव्याने आयुष्यात उभे करायचा निर्धार जाफ़रभाईने २००३ सालच्या उत्तरार्धात केला. तिथून त्याच्या धक्कादायक अनुभवाला सुरूवात झाली. कारण त्याच दरम्यान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लंडनला यायचे होते. तिथेच जाफ़रभाईने मोदींची भेट घ्यायचे ठरवले. पण त्याला मोदींपर्यंत कोण घेऊन गेला? मोदींना भेटण्याचा जाफ़रभाईचा मार्ग कोणी प्रशस्त केला? ते नाव ऐकून वाचकाला व अनेक मुस्लिमांना धक्काच बसेल.    ( क्रमश:)
 भाग   ( १५७ )    ३०/४/१३

रविवार, २८ एप्रिल, २०१३

त्याने जन्मदात्या आईलाच जाळून टाकले


  असे शिर्षक वाचले, मग तुमच्या मनात काय काय कल्पना तयार होतात बघा. पहिली गोष्ट म्हणजे असे ज्याने कोणी केले असेल; त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रचंड घृणा निर्माण होते. त्याचा तुम्हाला भयंकर राग येतो. असा पुत्र त्या माऊलीने कशाला जन्माला घातला, वगैरे वाटू लागते. मग हळूहळू त्याने असे राक्षसी कृत्य कशासाठी केले असेल, त्याच्या कल्पना तुमच्या डोक्यात येऊ लागतात. कारण जेवढे शब्द तुमच्या समोर आलेले वा मांडलेले आहेत, त्यातून एक ठराविक अर्थ तुम्हाला काढता येत असतो. बहुधा तो नशाबाज असेल, कसल्या तरी धुंदीत त्याच्याकडून असे घडले असेल. की त्याने मालमत्ता संपत्ती हडपण्यासाठी कुणाच्या नादाला लागून असे केले असेल? बहुधा त्याच्या लोभी पत्नीनेच त्याला असे करण्यासाठी फ़ुस लावली असेल. किती अगम्य कल्पना तुमच्या डोक्यात येतात ना? कारण समोर आलेल्या शब्दातून नुसतीच अमानुषता पोहोचत असते. शब्दांची ही इतकी भयंकर ताकद असते. शब्द असे मांडलेले व फ़ेकलेले असतात, की आणखी कुठली शक्यता असण्याचा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही. कुठलाही विचार व तपास न करता; तुम्ही तात्काळ त्या जळलेल्या आईच्या मुलाला गुन्हेगार ठरवून मोकळे होता. इतका शब्दांना वेग व त्यांची ताकद असते. पण आईला मुलाने ‘जाळून टाकावे’ अशा इतरही शक्यता असू शकतात, याकडे आपली तर्कबुद्धी वळूनही बघायला तयार नसते. आता हेच घ्या की हेच शब्द माझ्याविषयी सुद्धा वापरले जाऊ शकतात. आणि असे कोणी वापरले तर तुम्ही म्हणाल, भाऊ तोरसेकर असे करू शकतो? काही क्षण तुम्ही विचारात पडाल. पण आज कोणीही माझ्याबद्दलही असेच म्हणू शकतो, आणि त्यात तसूभरही खोटे नाही, दिड महिन्यापुर्वी मी सुद्धा नेमके असेच कृत्य केलेले आहे. मला माझ्या आईला जाळावीच लागली. पण ते का करावे लागले? त्याखेरीज माझ्यासमोर अन्य पर्यायच नव्हता.

   ८ मार्च रोजी माझ्या आईचे देहावसान झाले. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार म्हणजेच अग्नीसंस्कार करणे मला भागच होते. पण साध्या शब्दात मी आईला जाळून टाकले, ही वस्तुस्थिती आहे. फ़रक किंचित आहे. मी आईला जाळले वा अग्नी दिला नाही, तर तिच्या पार्थिवाला अग्नीच्या स्वाधीन केले. म्हणूनच ‘भाऊ तोरसेकरने आपल्या जन्मदात्या आईला जाळून टाकले’, असे माझ्याविषयी कोणी विधान केले तर ते शब्दश: खोटे म्हणता येणार नाही. पण त्यातले दोन शब्द किंवा संदर्भ लपवले तर किती भयंकर वेगळा अर्थ निघतो ना? त्याला शब्दांची किमया म्हणतात. सत्य सांगितल्याचा आव आणायचा. पण शब्दांची मांडणी अशी करायची, की नेमका अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आईच्या मृतदेहाला अग्नी दिला आणि आईला जाळले, यात शब्दाने काही फ़रक पडत नसला, तरी जाळले तेव्हा ती मृतदेह होती आणि तो मृतदेह अग्नीच्या स्वाधीन करणे अपरिहार्य होते, हे वास्तव आहे. पण मृत आई असे सांगायचे टाळले तर किती भयंकर अनर्थ करता येतो ना? आजकाल अशा अनेक बातम्या तुम्ही आम्ही ऐकत असतो आणि त्या तिथेच न थांबता त्यावर रसभरीत चर्चा व विश्लेषणेही केली जात असतात. म्हणजे असे की भाऊसारखा इतका बुद्धीमान पत्रकार, त्याने असे करावे? त्यामागे त्याचा काय डाव असेल? त्याला कोणाची फ़ुस असेल? कोण त्याचा साथीदार असेल? त्याविषयी पोलिसांनी अजून दखल का घेतलेली नाही? अजून त्याला अटक कशी होत नाही? पुढले पुढले प्रश्न व त्यांचे मनोरे उभे केले जात असतात. पण त्यात भाऊची आई मरण पावली होती आणि म्हणुनच अग्नीसंस्कार म्हणुन तिला जाळण्यात आले, याचा उच्चारही होऊ दिला जात नाही. थोडक्यात तुमच्या मनात भाऊविषयी शंका व संशय निर्माण करून त्याच्याबद्दल तुमच्या मनात संताप निर्माण करण्याचाच हेतू नसतो काय?

   हे कसे चालते, त्याचे शेकडो दाखले देता येतील. गेली दहा वर्षे एक धडधडीत खोटे लोकांच्या गळी मारण्यात आलेले आहे आणि आजही चर्चा होतात, तेव्हा मोठमोठे पत्रकार, अभ्यासक त्याचा दाखला देत असतात. गुजरातची दंगल झाली, तेव्हा देशाचे पंतप्रधान असलेले वाजपेयी यांनी गुजरातला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही.’ आजही तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकत असाल. पण हेच वाक्य मुळात धडधडीत खोटे आहे. वाजपेयी असे कधीच कुठेच बोलले नाहीत. त्यावेळी ते पत्रकारांना म्हणाले, ‘राजा असतो त्याने धर्म, पंथ संप्रदाय विसरून सर्वाना एक न्यायाने वागवले पाहिजे. त्याला राजधर्म म्हणतात व मोदींनी त्याचे पालन केले पाहिजे. आणि मला माहित आहे मोदी त्याचेच पालन करीत आहेत.’ वाजपेयी यांचे ते भाषण आजही जसेच्या तसे युट्युबवर उपलब्ध आहे. कोणीही ते ऐकू व बघू शकतो. पण सतत दहा वर्षे वाजपेयी न बोललेल्या वाक्याच्या बातम्या रंगवून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही, असे आपल्या कानीकपाळी ओरडून सांगण्यात आलेले आहे. यालाच बनवेगिरी म्हणतात आणि ती सातत्याने चाललेली आहे. आपण सगळेच त्या बनवेगिरीचे बळी असतो. वाजपेयी बोलले नाहीत ते त्यांच्या तोंडी घालून बातम्या द्यायच्या आणि मग त्यावर सातत्याने चर्चा रंगवायच्या. मग ते ऐकणारा प्रत्येक बाबतीत खरे खोटे तपासायला जात नाही. त्यामुळे अफ़वाच सत्य असे आपल्या गळी मारले जात असते. आणि ही एकच बाब नाही. मोदींच्या बाबतीत हे सातत्याने होत आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वरूण गांधी यांनी आवेशात काही वाक्ये बोलले. तर त्यांनी जातीय द्वेष भडकवणारे भाषण केल्याचा माध्यमांनी इतका गदारोळ केला, की मुख्यमंत्री मायावतींनी त्याना अटकच केली होती. अटकेतल्या मुलाला भेटायला मनेका गांधी पोहोचल्या; तर त्यांना भेट नाकारण्यात आली. आणि अखेरीस त्यातून काय निष्पन्न झाले? वरूण गांधी यांच्या त्या भाषणात कुठलाही शब्द वा वाक्य चिथावणी देणारे नव्हते; असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे. मग आधी त्यांना अटक तरी कशामुळे झाली? त्यांचे शब्द चिथावणीखोर असल्याचे कोणी ठरवले? माध्यमांनीच हा तमाशा व बनाव घडवूना आणलानव्हता काय?

   अगदी ताजी घटना घ्या गुरूवारी नरेंद्र मोदी हरीद्वार येथे बाबा रामदेव यांच्या पातंजली योगपीठ आश्रमात आचार्यकुलम या शाळेचे उदघाटन करायला गेलेले होते. तिथे भाषण करताना त्यांनी काही सांगितले त्याचाही असाच गैर अर्थ लावून गदारोळ करण्यात आला. मोदी म्हणाले, ‘२००२ची विधानसभा निवडणूक संपल्यावर केलेल्या पहिल्या भाषणात मी म्हणालो, ज्यांनी मला मते दिली वा नाही दिली, त्यांच्यासहीत ज्यांनी मतदानही केले नाही, अशा सर्वांचा आता मी मुख्यमंत्री आहे. कारण माझी परंपरा मला शिकवते, ‘सर्वसुखिना संतू’. यात सर्वे म्हणजे सगळे असा अर्थ आहे. फ़क्त हिंदू अशी शिकवण मला माझ्या परंपरेने दिलेली नाही. मी कधीच हिंदुंपुरता मुख्यमंत्री नव्हतो. आणि २००२ चे ते भाषण त्याचा पुरावा आहे.’ हे मोदींचे परवाचे भाषण आहे. त्यामध्ये त्यांनी आपण हिंदूंपुरते मुख्यमंत्री नाही, असे म्हटलेले नाही, तर दहा वर्षापुर्वीपासून आपली तीच भूमिका असल्याचा पुरावा दिलेला आहे. पण तमाम वाहिन्या व माध्यमांनी नेमके तेच वाक्य मोदी गुरूवारी प्रथम बोलले व आता पंतप्रधान व्हायचे आहे, म्हणून बोलले; असा कल्लोळ सुरू केला. यालाच शुद्ध बनवेगिरी म्हणतात. मोदी आपण हिंदूंचा नेता नाही, असे म्हणालेलेच नाहीत. आपण मुख्यमंत्री म्हणून कुठल्या एका पंथ धर्माचे नसतो, असे दहा वर्षेआधी त्यांनी म्हटलेले आहे. पण आजच ते तसे बोलले आणि पंतप्रधान होण्यासाठी बोलले, हीच मुळात फ़सवेगिरी आहे. आणि मग त्यावर तमाम जाणकार, अभ्यासक व राजकीय विश्लेषक राईचा पर्वत करण्यात रममाण झालेले होते. पण मुळात राई तरी कुठे आहे? निव्वळ फ़सवणूक नाही काय? माध्यमांची आजची स्थिती ही अशी अफ़वाबाज झालेली आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणात इंटरनेट, फ़ेसबुक वा अन्य सोशल मीडिया विकसित झाल्याने वाहिन्यांसहित माध्यमांच्या खोटेपणाचा प्रभाव निरुपयोगी ठरू लागला आहे. मुख्य माध्यमातील सेक्युलर बनवेगिरी व फ़सवणुकीला मोदी यांनी सोशल मीडियाचा कुशलतेने वापर करून चांगलच शह दिला आहे. त्यामुळेच आता माध्यमांचा व त्यांचे बोलविते धनी असलेल्या सेक्युलर भामट्यांचा खोटेपणा चालेनासा झाला आहे. पण किती सहजगत्या शब्दाच्या मांडणीतून लोकांची दिशाभूल करता येते; त्याचा हा नमूना. मात्र दहा वर्षांनी आता त्या खोटेपणा्चा बुरखा फ़ाटत चालला आहे. गुजरात व एकूणच नरेंद्र मोदीविषयक खोटारडेपणा उघड होऊ लागल्याने मोदींना रोखणे सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांना दिवसेदिवस अवघड होऊन बसले आहे. कारण आता लोक अन्य मार्गाने सत्य तपासू लागले आहेत व सत्य झाकून बसणार्‍या सेक्युलर माध्यमांना शह बसला आहे. त्यातूनच गुजरातचे सत्य लोकांपर्यंत जाऊ शकले आहे. सेक्युलर खोटेपणाचा हिडीस चेहरा लोकांसमोर येत चालला आहे.
( क्रमश:)
 भाग   ( १५६ )    २९/४/१३

शनिवार, २७ एप्रिल, २०१३

मोदींचा दंगलीत हात? हे तर तीस्ताचे कुभांड


   कुठल्याही सेक्युलर, पुरोगामी नेता किंवा विचारवंताच्या तोंडी आपण हिटलर किंवा त्याचा प्रचारमंत्री गोबेल्सचे नाव नित्यनेमाने ऐकत असतो. गोबेल्स म्हणायचा सतत खोटे लोकांच्या कानीकपाळी मारावे. मग हळूहळू त्यांना तेच खरे वाटू लागते. आणि एकदा अशा खोट्यावर विश्वास बसला, की बुद्धी चालेनाशी होते व खरे ऐकायचीही भिती वाटू लागते. असा हा हिटलर ज्य़ु धर्मियांची कत्तल करण्यासाठी इतिहास प्रसिद्ध झाला. परंतू ज्यूधर्मियांचा समूळ नाश करायचे त्याचे उद्दीष्ट होते काय? शत्रूला संपवण्याचे उद्दीष्ट म्हणजे नेमके काय असते, त्याबद्दल हिटलरचे मत जाणून घेण्य़ासारखे आहे, मग त्याचे किती काटेकोर पालन आपल्याकडले सेक्युलर व पुरोगामी करतात, त्याचा अंदाज येऊ शकेल. एकदा कोणीतरी हिटलरला विचारले, ज्यूधर्मियांचा संपुर्ण निर्वंश करावा असे तुझे मत आहे काय? त्यावर हिटलर उत्तरला-

   छे छे, ज्य़ू नावाचा कोणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची असेल तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल असा कोणीतरी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केव्ळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही. (हर्मान रॉशनिंग यांच्या ‘हिटलर स्पिक्स’ पुस्तकातून)

   ज्यांना समाजात दुफ़्ळी माजवून लोकांना चिथावण्या द्यायच्या असतात; त्यांना कोणीतरी खरा खोटा शत्रू दाखवून लोकांमध्ये आधी भिती निर्माण करावीच लागते. मग त्या भितीच्या पोटी लोकांना चिथावण्या देऊन आपल्याला हवे तसे झुंजवता येत असते. पण त्यासाठी लोकांना भयभीत करील असा शत्रू लोकांच्या डोक्यात भरवावा लागतो, त्याचे अक्राळविक्राळ रूप लोकांसमोर मांडावे लागते. तसा कोणी खराच नसला तरी बिघडत नाही. पण तो आहे व अत्यंत भयावह आहे, असे लोकांच्या डोक्यात भरवावे लागते. मुस्लिमांची मते मिळवायची तर असा कोणीतरी शत्रू त्यांच्या डोक्यात भरवायला हवा होता आणि म्हणूनच गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून असा चेहरा लोकांसमोर आणायची संधी आयती एनडीएच्या काळात हतबल सेक्युलर पक्ष व विचारवंतांना मिळाली. कारण अगदी हिंदूत्वाचा अजेंडा भाजपाने सोडला होता. अयोध्येतील मंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवला होता. त्यामुळे कॉग्रेसला भाजपावर मात करणे राजकीय दृष्टीने शक्य नव्हते. अशावेळी मग गुजरातची दंगल झाली आणि त्यात नवे काही नसले, तरी ती मुख्यमंत्री मोदींच्याच इशार्‍यावर झाली अशी एक आवई उठवण्यात आली. नेमका त्यावेळी हा मुख्यमंत्री नवखा होता. त्याला प्रशासनाचा किंवा सरकार चालवण्याचा अनुभव अजिबात नव्हता. त्यामुळेच अशा प्रसंगी लोकमताला किंवा माध्यमांना कसे सामोरे जावे, त्याविषयी अनभिज्ञ होता. त्याचा फ़ायदा उठवून माध्यमे व स्वयंसेवी संस्थांना पुढे करून त्याची मुस्लिमांचा खाटीक अशी प्रतिमा रंगवण्याचे कारस्थान शिजवण्यात आले. तसे पाहिल्यास त्यात काडीचेही तथ्य वा सत्य नव्हते. गुजरातमध्ये अशा दंगलीचा इतिहास जुनाच होता आणि तिथले प्रशानस जुन्या अनुभवानुसारच मुस्लिमांच्या बाबतीत तटस्थपणे वागत होते. त्याला नरेंद्र मोदी हा नवखा मुख्यमंत्री अजिबात जबाबदार नव्हता. त्याचा थोडाफ़ार हात असेल तर तो जुन्या परंपरेला छेद देऊन दंगल आटोक्यात आणायचा प्रयत्न करीत होता. पण अनुभवात कमी पडत होता. आणि म्हणूनच अकरा वर्षे होऊन गेली, तरी त्याच्या विरोधात एकही पुरावा समोर येऊ शकलेला नाही. नुसते आरोप व बिनबुडाचे आक्षेप यापेक्षा काही सिद्ध होऊ शकलेले नाही. उलट आजवर कधी झाले नाही, इतके दंगलखोरांवर गुन्हे नोंदले गेले, खटले भरले गेले व अनेकजण शिक्षाही भोगायला गेले. यापुर्वी कधी असे गुजरातमध्ये झालेले नाही. पण तरीही मोदींना मुस्लिमांचा शत्रू म्हणून रंगवण्याचे काम अव्याहत चालू आहे. यालाच हिटलरचा सिद्धांत म्हणतात. मात्र आता त्या गैरसमजातून गुजरातचा मुस्लिम बाहेर पडला आहे. कारण त्याचा अनुभवच त्याला सत्यापर्यंत घेऊन गेला आहे. पण देशातल्या मुस्लिमांना त्या सत्याला अजून सामोरे जायला वेळ लागणार आहे.

   आता कारस्थान असे विधान मी केले, मग अनेकांना मी सुद्धा बिनबुडाचा आरोप करतो असेच वाटेल. पण तो माझा स्वभाव नाही आणि मी पुरोगामी सेक्युलर सुद्धा नाही. त्यामुळे खोटे बोलण्या-लिहिण्याचे स्वातंत्र्य मला घेता येत नाही. मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू व कत्तलखोर असे आरोप करून त्यांचे तसे भयावह रूप उभे करण्याला मी कारस्थान का म्हणतो? तर तसे सुप्रिम कोर्टातल्या एका वकीलानेच म्हटले आहे. मोदी यांनीच दंगली घडवून आणल्या व मुस्लिमांच्या कत्तलीला प्रोत्साहन दिले; असा त्यांच्यावर सतत आरोप झालेला आहे आणि तसा आरोप करण्यात मुंबईच्या स्वयंसेवी संस्थाचालक तीस्ता सेटलवाड यांचाच पुढाकार राहिला आहे. त्यांच्याच पुढाकाराने तीनदा मोदींच्या विरोधात सुप्रिम कोर्टाने विशेष तापस पथक नेमलेले आहे आणि प्रत्येकवेळी तपास केल्यावर त्या पथकाने मोदी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. आधी हायकोर्टाने व दोनदा सुप्रिम कोर्टाने अशी पथके; ज्याला एस आय टी असे म्हटले जाते, त्यांची नेमणूक केली होती. शिवाय त्यात मोदी सरकारने हस्तक्षेप करू नये, असाही दंडक घातला होता. अखेर नेमलेल्या पथकामध्ये मुद्दाम कधीही गुजरातमध्ये काम न केलेल्या निवृत्त माजी पोलिस अधिकार्‍यांचा समावेश केलेला होता. त्यांनीही कसून तपास केला व खुद्द मुख्यमंत्री मोदी यांचीही जबानी घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवालात तीस्ता सेटलवाड यांनी हे सर्व कुभांड रचल्याप्रमाणे कारस्थान घडवून आणल्याचा अहवाल दिलेला आहे. म्हणूनच मूळ अर्जदार झकीया जाफ़री यांना त्या अहवालाची प्रत देताना, त्याची प्रत तीस्ता सेटलवाड यांना देऊ नये असे बंधन सुप्रिम कोर्टाने घातले होते. आता त्यावर फ़ेरविचार व्हावा असा अर्ज झाकीया जाफ़री यांच्या वतीने पुन्हा तीस्ताच्या पुढाकारने सुप्रिम कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी खुद्द तपास पथकाच्या अधिकार्‍यांवरच संशय घेतला आहे. म्हणजे तीन तीन खास पथके नेमली, तपास केला, पण कुठलाही पुरावा मिळु शकलेला नाही किंवा तीस्ताही कुठला पुरावा देऊ शकलेली नाही. नसेल तर पुरावा मिळणारच कसा?

   याचा अर्थ इतकाच, की पोलिस वा तपास पथकाने कोणता तरी खोटा पुरावा मोदी विरोधात निर्माण करावा आणि त्यात मोदी यांना गुंतवावे; असाच एकूण आग्रह आहे. कायदा पुराव्यानुसार वाटचाल करतो. तुम्हाला काय वाटते वा तुमच्या मनात शंका व संशय आहे, म्हणून कोणाला गुन्हेगार ठरवता येत नसते, दोषी मानता येत नसते. तीस्ता यांना नुसते आरोप करता आले, पण पुरावे देता आलेले नाहीत. कारण जे घडलेच नाही, त्याचे पुरावे मिळणार तरी कुठून? आणि आता चौथ्यांदा कोर्टात पुन्हा तेच नाटक करायला गेलेल्या तीस्ताचा मुखवटा पुरता फ़ाटला आहे. कारण शेवटचा तपास ज्या पथकाने केला; त्या पथकाच्या वकीलांनी आता थेट तीस्तावरच खोटेपणाचा व कोर्टासह लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप कोर्टातच केला आहे. गेल्या गुरूवारी सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठासमोर चौथ्यांदा चौकशीच्या मा्गणीसाठी सुरू असलेल्या फ़ेरसुनावणीच्या वेळी जामौर हे एस आय टीचे वकील म्हणाले, झाकीयाच नव्हेतर अनेक प्रकरणात तीस्ताने पुरावे व निवेदनांसह कबूली जबाबात खोटेपणा केलेला आहे. त्यांनी मोदी विरोधात निव्वळ कुभांड रचून हा खेळ चालविला आहे. मोदी यांनी कधीही दंगल करा व माणसांना बेधडक मारायचे आदेश दिले नाहीत. दंगल करणार्‍या लोकांना अडवू नका असे पोलिसांना आदेश दिले नाहीत, कारण तसे ठामपणे सांगणारा व त्याला पुरक पुरावा देणारा एकही साक्षीदार नाही, असे या वकीलाने कोर्टात सांगितले.

   वकीलाच्या या आरोपाला महत्व एवढ्यासाठीच आहे, की तो वकील मोदी सरकारने नेमलेला नाही. ती एस आय टी मोदी सरकारने नेमलेली नाही आणि तशी मागणीही मोदी सरकारची नाही. ती मागणी तीस्ताच्याच आग्रहाने वा अर्जावर सुप्रिम कोर्टाने केलेली होती. म्हणजेच हे लोक तीस्ताच्याच विश्वासाचे आहेत. इतकेच नाही, तर या पथकाने मोदींना साक्ष वा जबानी द्यायला बोलावले म्हणजेच मोदी कसे गुन्हेगार आहेत, असे सांगण्यात तीस्ताने दाताच्या कण्या केल्या होत्या आणि तमाम सेक्युलर माध्यमांनी आठ तास मोदींवर प्रश्नांचा कसा भडीमार झाला, त्याची रसभरीत वर्णने प्रक्षेपित केलेली होती. पण त्यातून मोदीना अडकवता येत नाही, म्हटल्यावर आता त्याच पथकावर तीस्ताने आरोप सुरू केले आहेत. म्हणजे जणू गुजरातच्या दंगलीविषयी त्यातल्या पिडीत वा बळी असणार्‍यांपासून कोर्ट व तपासकाम करणार्‍यांपर्यंत सगळे खोटे आहेत आणि कसलाही पुरावा देऊ न शकणार्‍या तीस्ताचा शब्द त्यात पुरावा आहे. हा निव्वळ बनाव झाला ना? त्यांच्याच विश्वासातला एक वकील आता तीस्तावर मोदी विरोधात कुभांड रचल्याचा आरोप करतो आहे. आणि हा पहिलाच माणुस नाही. यापुर्वी तीस्तावर बदमाशी व खोटेपणाचे आरोप तिच्या अनेक सहकार्‍यांनी केलेले आहेत. पण अशा बातम्या आपल्याला मुख्यप्रवाहातील वाहिन्या व वृत्तपत्रात वाचायला ऐकायला मिळणार नाहीत. तीस्ताने केलेल्या खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी मिळते. पण तीस्तावरच खोटेपणा केल्याचा सुप्रिम कोर्टात आरोप झाला; त्याची बातमी दोन दिवसात कुठे आली का? का येऊ नये? सेक्युलर पुरोगामी माध्यमे व पत्रकार तीस्ता इतकेच खोटारडे असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा आवश्यक आने काय? हीच नाही, झाकीया जाफ़रीच्या गुलमर्ग सोसायटीतून तीस्ताला मुस्लिम रहिवाश्यांनी हाकलून लावल्याची बातमी तरी कुठल्या पुरोगामी माध्यामने दिली होती? त्यांना सत्याचेच वावडे आहे ना? अशा माध्यमांकडून गुजरातविषयी सत्य समोर येऊ शकेल काय?   ( क्रमश:)
 भाग   ( १५५ )    २८/४/१३

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

सत्य जाणून घेण्याची हिंमत महत्वाची   गुरूवारी प्रसिद्ध झालेला माझा लेख वाचून अनेक वाचकांचे फ़ोन आले. त्यात सादीकभाई म्हणून एका मराठी वाचक मुस्लिमाचाही फ़ोन होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून ते बोलत होते. माझे लेख वाचून इतरांप्रमाणे त्यांनाही मोदीविषयक नवीच काही माहिती मिळाल्याने धक्का बसणे स्वाभाविक आहे. आजवर माध्यमातून मोदींच्या विरोधी इतका भयंकर प्रतिकुल प्रचार झाला आहे, की हा माणूस मुस्लिमांचा खाटीक अशी एक धारणा तयार झाली; तर नवल नाही. सहाजिकच त्याच्या कुठल्याही गुणांबद्दल वा त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल बोलले, तर विश्वास बसणे अवघडच आहे. थोडक्यात मोदी यांची इतकी मलीन वा खुनशी प्रतिमा बनवण्यात सेक्युलर माध्यमांनी मोठेच यश मिळवले, हे मान्यच करायला हवे. त्यामुळेच ही दुसरी बाजू वा त्यातले अनेक तपशील वाचून कुठलाही मुस्लिम वाचक अस्वस्थ होण्यात चुक नाही. त्या तपशीलावर मुस्लिमांचा विश्वास बसणे अवघड आहे. पण मी इथे जे तपशील व पुरावे देतो आहे व ज्यांची साक्ष काढतो आहे; ती वस्तुस्थिती नाकारणेही अशक्य आहे. कारण जाफ़रभाई सरेशवाला हा मुस्लिम आहे आणि तो नुसताच मोदींचे कौतुक करत नाही, तर त्यांच्या कारकिर्दीपेक्षा कॉग्रेसच्या कारकिर्दीमध्ये मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचतो आहे. तेवढेच नाही तर कॉग्रेसच्याच राज्यात गुजरातचे पोलिस व सरकारी यंत्रणेला मुस्लिमांच्या विरोधात वागण्याचे कसे संस्कार देण्यात आले; त्याचा सगळा इतिहासच जाफ़रभाई सांगतो आहे. तेव्हा कोणीही सामान्य बुद्धीचा मुस्लिम असेल, तर त्याचे त्याबद्दल कुतूहल निर्माण व्हायलाच हवे. शिवाय जी माहिती व तपशील जाफ़रभाई देतो, ती अदभूत वाटावी अशी असते. कारण ती माहिती कधीच सेक्युलर माध्यमांनी समोर आणलेली नाही. पण दुसरीकडे ती माहिती नाकारताही येत नाही. त्यामुळे तिच्याकडे कोणीही शहाणा किंवा समतोल बुद्धीचा माणूस दुर्लक्ष करू शकणार नाही. सादिकभाई मला तसाच माणुस वाटला. कारण त्यांनी मोदींचे कौतुक होते किंवा अशी काहीशी रागाची भाषा वापरली नाही, की तक्रार केली नाही. उलट या विषयावर मोहल्ल्यात येऊन भाषण प्रश्नोत्तरे करायचा आग्रह माझ्याकडे धरला. याला वैचारिक सहिष्णुता म्हणतात. ज्याच्याबद्दल आक्षेप आहेत, त्याचे निरसन करून घेण्याला महत्व असते.

   जसे सादिकभाई आहेत, तसेच अनेक नाराजही आहेत. त्यांना मोदींची बाजू वा त्यामागचा खरा तपशीलही ऐकायची भिती वाटते. मोदींबद्दल त्यांची मते ठाम आहेत आणि हा माणूस सैतान आहे याबद्दल खरेखोटे तपासण्याची त्यांना गरजही वाटत नाही. त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यात अशा नाराजांच्याही काही प्रतिक्रिया मला मिळालेल्या आहेत. पण त्याच्या अनेकपटीने मोदींच्या चहात्यांच्याही प्रतिक्रीया माझ्याकडे आलेल्या आहेत. यात चांगल्या प्रतिक्रीया अधिक व नाराजांच्या नगण्य आहेत, म्हणून मी खुश अजिबात नाही. कारण माझी भूमिका सत्य समोर आणावे एवढ्यापुरती मर्यादित आहे. म्हणूनच मी सत्याचा शोध घेऊन काही मांडतो आहे. विशेष म्हणजे अजून तरी मी कुणा मुस्लिमाची अशी साक्ष सादर केलेली नाही, की जो मोदींचे कौतुक करतो आहे. जाफ़रभाई असो, की आणखी कोणी गुजरातचा मुस्लिम असो, त्याने मोदी विरोधातील बातम्या व माहितीला छेद देणारे जे काही सांगितले, तेवढेच इथे मांडले आहे. किंवा आजवर मोदींच्या विरोधात वा दंगली संदर्भात जी माहिती समोर आली वा लपवली गेली; त्याचीच तुलना मी केलेली आहे. मोदी यांनी मुस्लिमांसाठी गुजरातमध्ये काय चांगले काम केले, त्याची वाच्यता मी अजून केलेली नाही. कारण ती मोदी विरोधकांना उलट्या आणायला भाग पाडणारी माहिती आहे. पण ती नंतर बघता येईल. आधी मोदींच्या विरोधात जे काही दहा वर्षात सांगितले गेले व त्यांच्याविषयी प्रयत्नपुर्वक सेक्युलर गोटातून मत बनवण्याचा प्रयास झाला; त्याचीच सत्यासत्यता तपासण्याची मर्यादा मी संभाळली आहे. कारण ती पार्श्वभूमी जोवर समोर येत नाही, तोपर्यंत गुजरातच्या २००२ च्या दंगलीचा खरा चेहरा आपल्याला ओळखता येणार नाही. तोच ओळखता आला नाही, तर मग त्यातला मोदींचा हिस्सा किंवा जबाबदारी ठरवता येत नाही. मग निर्माण होतात, ते निव्वळ गैरसमज असतात. म्हणूनच कालचा लेख वाचून सादिकभाईंचा फ़ोन आला व त्यांनी उत्सुकता दाखवली; ती मला खास आवडली. शेवटी जीवनात तुम्हाला सत्याकडे व वास्तवाकडे पाठ फ़िरवून जगता येत नसते. विशेषत: जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा वास्तवाचाच आधार घ्यावा लागत असतो. आणि गुजरातच्या दंगलीबद्दल गुजरात बाहेर पसरवलेले गैरसमज दूर होणे अगत्या्चे आहे, असे गैरसमज पसरवण्यामागचे दुष्ट हेतू उघड होणे आवश्यक आहे. तरच त्यापासून धडा घेता येऊ शकतो आणि वास्तविक जीवनातील प्रश्न भारतीय मुस्लिमांनाही सो्डवता येऊ शकतील. त्यांच्याच जीवनातील नव्हेतर एकूणच बिगर मुस्लिमांच्या मनातल्या अढी व गैरसमजांना त्याद्वारे दूर करणे शक्य होईल.

   जाफ़रभाईने तोच मार्ग चोखाळला, म्हणून त्याला दहा वर्षात मुस्लिमांसाठी गुजरातमध्ये काही काम करणे शक्य झाले. पण दुसरीकडे ज्यांनी याच काळात मुस्लिमांच्या न्यायासाठी व कल्याणासाठी मोठ्या आक्रमक पवित्र्याने लढाया केल्या; त्यांनी दंगलपिडीतांना कोणता न्याय दिला? की त्याच न्यायाची लढाई लढणार्‍यांनीच मुस्लिमांची घोर फ़सवणूक व दिशाभूल केली, तेही समजून घेणे अगत्याचे आहे. जाफ़रभाई ते समजून घेऊ शकला; म्हणून त्याला मुठभर का होईना गुजराती मुस्लिमांना न्याय मिळवून देणे शक्य झाले आहे आणि गुजराती मुस्लिम मोठ्या प्रमाणात सत्याला सामोरे जाऊ लागला आहे. तशीच काही उत्सुकता सादिकभाई वा तत्सम गुजरात बाहेरच्या मुस्लिमात निर्माण झाली, तरी या लेखमालेचे सार्थक झाले, असे मी समजेन. मजेची गोष्ट म्हणजे याच दरम्यान फ़ेसबुकवर एका सुशिक्षित बिगर मुस्लिम व्यक्तीने माझ्यावर थापा मारण्याचाही आरोप केला. गणेश पोटे असे त्यांचे नाव आहे. त्याला मी खोटे काय लिहिले ते सिद्ध कर म्हणजे मला माफ़ी मागता येईल; असेही खुले आव्हान दिले. तर त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्यांच्या मते गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीत मुस्लिमांची कत्तल झाली आणि असे असताना मोदींचे कौतुक करणे, हाच खोटेपणा आहे. मी मोदींचे कौतुक केलेले नाही. तर त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात जो खोटेपणा सातत्याने दहा वर्षे चालू आहे, त्यातले सत्य तपासण्याचा प्रयास केलेला आहे. शिवाय त्यातली बदमाशी समोर आणायचा प्रयत्न केला आहे. किंबहूना मुस्लिमांना न्याय देण्याच्या नावाखाली मुस्लिमांचीच कशी फ़सवणूक होत आलेली आहे; त्याला वाचा फ़ोडलेली आहे. पण ज्यांना सत्याची भिती वाटते, त्यांना सत्याला सामोरे जाण्याची हिंमतच होत नाही. आणि सेक्युलर विद्वानांची नेहमी अशी घाबरगुंडी उडालेली असते. असे लोकच मग अन्यायाला खतपाणी घालत असतात. गैरसमजाने मोदींच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला भरायला धावलेला जाफ़रभाई, त्याच अपप्रचाराचा बळी होता. पण सत्य समोर आल्यावर किंवा सत्य शोधण्याच्या इच्छेने त्याला आमुलाग्र बदलून टाकले. आणि जर त्याच्या इतका कडवा मोदी विरोधक सत्याला सामोरा जाऊन इतका बदलू शकत असेल; तर मग अन्य मुस्लिमांसमोर ते सत्य आणून हजर करणे मला मोलाचे वाटते. सहाजिकच ज्यांना खोटेपणातच रमायचे असते किंवा सत्य समोर आल्यास आपला मुखवटा फ़ाटण्याचे भय असते; त्यांनी बिनबुडाचे आरोप करीत रहाणेही स्वाभाविकच असते.

   गुजरातच्या दंगलीचे खापर संघ परिवार, भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर सातत्याने फ़ोडणरे कित्येक शहाणे आपण गेल्या दहा वर्षात बघितलेले आहेत. पण त्यापैकी कोणी तरी मोदी मुख्यमंत्री होण्या आधीच्या गुजरातमधल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास कधीतरी कथन केला आहे काय? गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री होण्याआधी बत्तीस वर्षे सर्वात भीषण दंगल होऊन पाच हजार मुस्लिम मारले गेले व तेव्हा कॉग्रेसची सत्ता होती; हे सांगितलेले आहे काय? दर दोनतीन वर्षांनी गुजरातमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली होऊन मुस्लिमांचे संसार नित्यनेमाने उध्वस्त व्हायचे; हे सत्य कथन केले आहे काय? स्वातंत्र्योत्तर काळात २००२ ते २०१३ अशी अकरा वर्षाचा दिर्घकाळ दंगल झाली नाही. सलग दहा वर्षापेक्षा अधिक काळ दंगल न होण्याची अपुर्वाई मोदींच्याच राज्यात झाली, हे सत्य कधी सेक्युलर माध्यमांनी सांगितले आहे काय? सततच्या दंगलीविषयी मौन धारण करणार्‍यांनीच दिर्घकाळ दंगली झाल्या नाहीत, याबद्दल मौन धारण करावे ही बदमाशी नाही काय? आधीच्या दंगलीविषयी मौन धारण केले; मग २००२ च्या दंगली म्हणजे प्रथमच घडलेली दंगल; अशी गैरसमजूत निर्माण करता येते आणि त्याच समजुतीवर मग देशभरच्या मुस्लिमांची मते मिळवता येतात, इतका हा संतापजनक फ़सवणूकीचा डाव आहे. मुस्लिमांना न्याय देण्याची गोष्ट दूरची झाली. पण त्यांना सत्य सांगण्याइतका प्रामाणिकपणा तरी सेक्युलर माध्यमे व राजकारण्यांनी दाखवला आहे काय? नसेल तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी करता येईल काय? सतत खोटे कानावर पडले किंवा कानीकपाळी मारले गेले, मग सत्याची भिती वाटू लागते. सत्याकडे बघायची हिंमतच उरत नाही. आज गुजरात बाहेरच्या मुस्लिमांची व अनेक भारतीयांची नेमकी तशीच अवस्था झालेली आहे. म्हणूनच इथे मी मांडत असलेले सत्य व तपशील धक्कादायक होतात. पण त्यातून सत्यशोधनाला चालना मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच खेड रत्नागिरी येथून सादिकभाईंनी साधलेला संपर्क मला एक लेख लिहिण्याइतका महत्वाचा वाटला.   ( क्रमश:)
 भाग   ( १५४ )    २७/४/१३

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

गुजरातची दंगल हा तर टाईमपासचा विषय
  जाफ़रभाई सरेशवाला हा कोणी मोदीचा हस्तक वा विकला गेलेला आहे, असेच त्याचे कथन वाचणार्‍याला वाटेल. पण प्रत्यक्षात जाफ़रभाई व त्याचे संपुर्ण कुटुंब जसे गुजरातच्या दंगलीचा बळी आहे, त्यापेक्षा अधिक तो सेक्युलर प्रयोगशाळेचा बळी आहे. त्यातूनच त्याला अनेक साक्षात्कार घडले आहेत. म्हणूनच अधिक तपशीलात जाण्यापुर्वी २००२ मध्ये गोध्रानंतर गुजरात पेटला, तेव्हा जाफ़रभाई कुठे होता, काय करत होता; तेही जाणून घेणे अगत्याचे असेल. गुजरात पेटला, तेव्हा जाफ़रभाई इंग्लंडमध्ये ड्युजबरी येथे रहात होता. तिथेच स्थायिक झालेले तीन गुजराती मुस्लिम कामानिमित्त गुजरातमध्ये आलेले असताना हिंमतनगर येथे जीवानिशी दंगलीत मारले गेले. हे अर्थातच जाफ़रभाईला इंग्लंडमध्येच कळले. त्या तीनपैकी एकाचे नाव असवाल असे होते आणि तो जाफ़रचा इंग्लंडमधला शेजारी होता. तिथे वसलेले गुजराती मुस्लिम गडबडून गेले. आपल्यासाठी व गुजराती मुस्लिमांसाठी कोणीच वाली राहिला नाही, अशा धारणेने हे मुस्लिम रडकुंडीला आलेले होते. दुसरा कोणी आपल्या मदतीला येत नसेल, तर हे सर्व थांबवायला आपणच हातपाय हलवले पाहिजेत असे जाफ़रभाईला वाटू लागले. पण करायचे तरी काय? त्याने गुजरात सरकारलाच कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. आपल्याला गुजरात सोडा भारतात न्याय मिळू शकत नाही, अशीच त्याची धारणा झाली होती. एकतर त्याचा अनेक वर्षांचा गुजरातच्या दंगलीचा अनुभव गाठीशी होता आणि आता तर तिथे मोदी नावाचा कोणी मुस्लिमांचा खाटीकच सत्तेवर बसलाय, अशी बातम्या वाचून त्याची खात्री पटलेली होती. म्हणूनच त्याने थेट आंतरराष्ट्रीय कोर्टातच दाद मागायचा निर्णय घेतला. योगायोग असा, की त्याच वेळी भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी युरोपच्या दौर्‍यावर होते आणि स्पेनमधून पुढे ब्रिटनमध्ये येण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. तातडीने जाफ़रभाईने तिथल्या एका कोर्टामध्ये अडवाणी हे जातियवादी असल्याने जातिय धार्मिक सलोखा बिघडवणारे आहेत, म्हणून त्यांच्या ब्रिटन येण्यावर बंदी घालण्याची मागणी स्थानिक कोर्टात केली. भारतासाठी व अडवाणी यांच्यासाठी त्यातून विचित्र स्थिती निर्माण झाली.

   त्याच कालखंडात लुईस फ़राखान यांना तिथल्या कोर्टाने कडव्या इस्लामिक संघटनेचे म्हणून ब्रिटनमध्ये येण्यास प्रतिबंध केला होता. धार्मिक भावनांना चिथावण्या देण्यामुळे त्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. त्याच पद्धतीने अडवाणी यांना रोखण्याचा मार्ग जाफ़रभाईने चोखाळला. पण तशी वेळच आली नाही. अडवाणी तिकडे फ़िरकले नाहीत. पुढे जाफ़रभाईची ती याचिका कोर्टाने फ़ेटाळून लावली. पण तेवढ्या एका कृतीने रातोरात जगभरच्या सेक्युलर लोकांत जाफ़रभाई हिरो होऊन गेला. गुजरातच्या मुस्लिमांना न्याय देण्याच्या लढाईतला तो बिनीचा शिलेदार ठरला. त्याच्यावर जगभरच्या व भारतातल्या तमाम सेक्युलर माध्यमातून स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली. त्याच्याही अंगावर मुठभर मास चढले. त्याने मग तोच पवित्रा मुख्यमंत्री मोदीच्या विरोधात घेतला. त्यासाठी ब्रिटनमधल्या अत्यंत यशस्वी व नामवंत कायदा संस्थेची मदत घेतली. मोदी विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली. मग काय तमाम माध्यमे व सेक्युलर जाफ़रभाईला डोक्यावर घेऊनच नाचू लागले. पण यातून खरोखरच गुजरातच्या मुस्लिमांना न्याय मिळणार आहे का? असे खटले किती काळ चालणार? त्याचा निकाल लागून गुजरातच्या मुस्लिमांची स्थिती कधी सुधारणार? आपण हिरो ठरवले जाऊ, योद्धा व लढवय्या म्हणून गौरवले जाऊ, पण न्यायाचे काय? मोदीना अटक वा त्यांच्याविरुद्ध निकाल निवाडे होण्यातून राजकीय हेतू साध्य होईल. पण गुजरातच्या मुस्लिमांचे भवितव्य काय? असे प्रश्न जाफ़रभाईला सतावू लागले. मोदीला धडा शिकवलाच पाहिजे. पण त्यासाठी गुजरातच्या मुस्लिमाला किती काळ नरकवासात पडून रहावे लागणार आहे? मोदीना शिक्षा झाली म्हणजे मुस्लिमांना न्याय मिळेल व त्यांच्या जीवनात समाधान येईल का? हे प्रश्न त्याचा पाठलाग करू लागले. योगायोग असा, की त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या पुढाकाराने पॅलेस्टाईन व इस्त्रायल यांच्यातल्या वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. त्याच्याही बातम्या इंग्लंडमध्ये बीबीसीवर जाफ़र बघत होता. सहा दशके म्हणजे तीन पिढ्या निर्वासित छावण्यांमध्ये खितपत पडलेल्या पॅलेस्टाईनी मुस्लिमांची अत्यंत दुरावस्था त्यात दाखवली जात होती. त्याचा संबंध गुजरातशी जोडून विचार करू लागल्यावर जाफ़रभाई सर्द झाला. आपण जे करतो आहोत ते मुस्लिमांच्या भल्यासाठी, की त्यांना दिर्घकाळ नरकवासात ढकळण्यासाठी; असा एक विचार त्याच्या मनात आला आणि चक्रे उलटी फ़िरू लागली.

   गेली सहा दशकांहून अधिक काळ पॅलेस्टाईन हा जगभरच्या मुस्लिम नेत्यांनी व राजकारण्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवून ठेवला आहे. त्यावर राष्ट्रसंघापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळीकडे मोठमोठे लढे चालू आहेत. परिषदा व मेळावे, निदर्शने व संघर्ष चालूच आहेत. पण त्या तत्वांच्या लढाईत पॅलेस्टाईनचा मुस्लिम मात्र पिढ्यानुपिढ्यांचा भरडला गेला आहे. हे तात्विक लढे व संघर्ष सुखरूप स्थानी बसून सुखवस्तू जीवन कंठणारे लढवत आहेत. पण ज्यांच्या न्यायाची ही लढाई आहे, ते मात्र नरकवासात खितपत पडलेले आहेत. त्यांचे मत कोणी विचारलेले नाही किंवा त्यांच्या अवस्थेची कोणाला फ़िकीर नाही. जणू या तात्विक प्रयोगशाळेतले ते मूक प्राणी असावेत, तसा त्यांच्यावर जीवघेणा प्रयोग चालू आहे. त्यांच्या जीवाला वा त्यांच्या जगण्याला कुठेच स्थान नाही. लेबानॉन वा अन्य अरब देशात मूळ निर्वासित म्हणून आलेले मरून गेलेत अणि त्यांच्या दुसर्‍या तिसर्‍या पिढीतले पॅलेस्टाईनी जनावरासारखे जगत आहेत. अगदी अरबी व मुस्लिम देशातही त्यांना कचरा असावा तशीच वागणूक मिळते आहे. आपण गुजराती मुस्लिमांची तीच अवस्था करायची काय? आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊन आपण हिरो होणार. पण आपले भाईबंद असलेल्या गुजरातमधल्या मुस्लिमांचे काय? त्यांनी सतत भितीच्या छायेखाली व निर्वासित छावण्यात जगावे काय? तत्वांची भाषा करणारे व त्यासाठी लढावू भाषा व भाषणे बोलणारे; कधी निर्वासित छावणीत जगत नाहीत. उलट लढवय्याचा आव आणून पाश्चात्य देशात सुखवतू चैनीचे जीवन कंठतात, ह्याची जाणिव जाफ़रभाईला चकीत करून गेली. त्याचेही कारण होते. तावातावाने गुजरात दंगली किंवा मुस्लिमांच्या अन्यायावर बोलणारे जेव्हा त्याच पिडीतांना मदत द्यायची वेळ येते; तेव्हा पाठ फ़िरवतात, हा अनुभव त्याचे खरे कारण झाला. गुजरातकडे कधी न फ़िरकणारे व लाखो डॉलर्स कमावणारे फ़क्त तोंडाची वाफ़ दवडतात व कृतीची वेळ आल्यावर पळ काढतात, हा अनुभव धक्कादायक व डोळ्यात अंजन घालणारा होता.

   इस्लाम म्हणजे जगभरचे मुस्लिम बांधव, अशी एक समजूत जाफ़रभाईला प्रेरीत करून होती. तिलाच तडा गेला. कारण युरोप वा ब्रिटनमध्ये वसलेले मुस्लिम अरब वा पाकिस्तानी असतील तर गुजरातला मदत करताना पाठ फ़िरवायचे. तोंडाने खुप बोलणारे मदत मागायला गेले, मग टाळाटाळ करायचे. त्यातून जाफ़रभाईचा भ्रमनिरास झाला. हेच पॅलेस्टाईनसाठी झाले व हेच गुजरातच्या दंगलीनंतर त्याच्याही अनुभवास आले. इतक्या दूरचे सोडा भारतातले मुस्लिमही कितपत गुजरातच्या मुस्लिमांच्या मदतीला आले? त्याचेही उत्तर नकारार्थीच होते. इंग्लंडच्या विविध मशीदी व मुस्लिम वस्त्यांमधून जाफ़रभाई दंगलपिडीत मुस्लिमांसाठी निधी गोळा करायला फ़िरत होता. संस्थांकडे थेट पैसे पाठवा असे आवाहन तिथल्या मुस्लिमांना करत होता. पण त्याला मिळणारा प्रतिसाद त्याचा भ्रम दूर करत गेला. गप्पा मारताना वा पार्टीमध्ये कबाब खाताना, विरंगुळ्याचा विषय म्हणून गुजरातची दंगल बोलली जाते. पण त्या गुजराती मुस्लिमाला मदत करायची इच्छा, त्यापैकी कोणा सुखवस्तू मुस्लिमांनाही नाही, ही जाणिव त्याचे डोळे उघडून गेली. त्यामुळेच अड्वाणी किंवा मोदी यांना कोर्टात खेचायला निघालेल्या जाफ़रभाईच्या डोक्यात वेगळे विचार घोंगावू लागले. आपल्याला लढवय्या म्हणून हिरो व्हायचे आहे, की खरोखरच गुजराती मुस्लिमांना न्याय द्यायचा आहे? त्यांना सुरक्षित जीवन मिळावे ही आपली इच्छा आहे, की आपल्याला निव्वळ लढायचे व नाव कमवायचे आहे? हे विचार त्याला बदलत गेले. वेगळ्या दिशेने जाफ़रभाई विचार करू लागला. मग कोणाही सच्चा मुस्लिमाप्रमाणे त्याने आपल्या प्रश्नांची व शंकांची उत्तरे कुराण व धर्माच्या शिकवणीमध्ये शोधायचा प्रयास सुरू केला. जगात पहिला इस्लामिक गुंतवणूक फ़ंड व त्याची कंपनी सुरू करणार्‍या जाफ़रभाईची मोठ्या श्रीमंत मुस्लिमात उठबस होती. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक मदतीने गुजरातच्य दंगल पिडीतांना न्याय व सुखरूप जीवन देण्याची कल्पना त्याच्या डोक्यात होती. पण अनुभव त्याला चक्रावून गेला. त्यापैकी कोणालाच मुस्लिमांच्या दु:ख दैन्याची फ़िकीर नव्हती. त्यापेक्षा आपला धंदा व सुखवस्तू जीवन प्यार होते. त्यांच्याप्रमाणेच न्यायाच्या लढ्याचे देखावे उभे करून मुस्लिमांची दिशाभूल करणे किंवा त्या गरीब मुस्लिमाच्या जीवनाला स्थैर्य आणणे, यापैकी कोणता मार्ग स्विकारायचा, अशी जाफ़रभाईच्या जीवाची घालमेल चालू झाली होती. मात्र मोदींबद्दलचा राग त्याच्या मनात कायम होता.      ( क्रमश:)
 भाग   ( १५३ )    २६/४/१३

बुधवार, २४ एप्रिल, २०१३

गुजरात: कॉग्रेसच्या हिंसक हिंदूत्वाची प्रयोगशाळा  १९६९ च्या गुजरात दंगलीच्या वेळी जाफ़रभाई सरेशवाला अवघा पाच वर्षाचा पोरगा होता. सतत वर्ष दोन वर्षानंतर उसळणार्‍या दंगली तो बघतच होता, त्यांचे चटके भोगतच होता. पण नंतर जीवन उध्वस्त करणारी पुढली मोठी दंगल गुजरातमध्ये झाली, ती १९८५ सालात. तेव्हा तर संपुर्ण देशातच भाजपाची धुळधाण उडालेली होती आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. तेव्हा तर एकट्या अहमदाबाद शहरात सलग दोनशे दिवस म्हणजे सात महिने कुठल्या ना कुठल्या भागात संचारबंदी चालूच होती.  संसदेत तर राजीव गांधींनी अफ़ाट बहूमत मिळवलेले होत. पण म्हणून गुजरातच्या मुस्लिमांना सुरक्षा लाभली नव्हती. दोन वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री बदलला तरी हिंदू-मुस्लिम दंगली काही संपत नव्हत्या. १९८७ सालात पुन्हा दंगली उसळल्या. कॉग्रेसचेच अमरसिंह चौधरी मुख्यमंत्री होते. पाच वर्षांनी पुन्हा १९९२ सालात मोठ्या दंगली गुजरातमध्ये झाल्या त्या बाबरी पतनानंतर. त्याही वेळी पुन्हा कॉग्रेस व जनता दलाचेच मुख्यमंत्री होते. चिमणभाई पटेल. पुढे त्यांनी जनता दल पक्षच कॉग्रेसमध्ये विसर्जित केला. अशा लागोपाठच्या दंगली हा गुजरातचा इतिहास आहे आणि त्या दंगलींना थोपवण्याचे कुठले प्रयास झाले नाहीत, की त्यातील गुन्हेगार दंगेखोरांना खटले भरून शिक्षा देण्याचाही कुठला प्रयत्न कधी झाला नाही. जणू कॉग्रेसच्या राज्यात गुजरात म्हणजे हिंदू-मुस्लिम दंगलीचाच प्रदेश होऊन राहिला होता. आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई त्यावेळी एनडीटीव्ही या वाहिनीचे राजकीय संपादक म्हणून काम करत होते आणि त्यांनी २००२ च्या दंगलीत गुजरात ही रा. स्व. संघाने हिंदूत्वाची प्रयोगशाळा केल्याचा आरोप केला होता. पुढे तो शब्दप्रयोग नित्यनेमाने वापरात आला. आणि तो शब्दप्रयोग अगदी योग्य असला, तरी गुजरातला दंगलीची किंवा सेक्युलर भाषेमध्ये हिंदूत्वाची प्रयोगशाळा कोणी बनवले, त्याचा हा इतिहास आहे. जेव्हा भाजपा किंवा संघाचे गुजरातमध्ये फ़ारसे प्राबल्य नव्हते; तेव्हापासून कॉग्रेसने तिथले प्रशासन व शासकीय यंत्रणेला मुस्लिमांच्या विरोधात काम करण्याची जणू सवयच लावून ठेवली होती. स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांना गुजरातमध्ये दुय्यम वागणूक देऊन विविध हिंदू समाजघटकांना मुस्लिमांच्या विरोधात चिथावण्या देण्याचे व लढवण्याचे राजकारण कॉग्रेस पद्धतशीरपणे खेळत राहिलेली आहे आणि त्याला अगदी २००२ सालची दंगलही अपवाद नव्हता. तोंडाने वा भाषणातून कॉग्रेसच्या कुठल्या नेत्याने कधी मुस्लिमांच्या विरोधात शब्द उच्चारला नाही. पण कृतीमधून मात्र कॉग्रेसने मुस्लिमांना निष्प्रभ करून टाकण्याचे डावपेच सातत्याने खेळलेले होते. त्यातूनच भाजपा किंवा संघाच्या हिंदूत्वासाठी पोषक अशी पार्श्वभूमी तयार करण्यात आली. त्याचे सारे तपशील दंगलीच्या इतिहासात आढळून येतात. तुलनाच करायला गेल्यास गुजरातमध्ये मोदींच्या कालखंडात दंगलीचे जितके गुन्हे नोंदले गेले वा दंगलीचा जसा बंदोबस्त करण्यात पुढाकार घेतला गेला; तसा कॉग्रेसच्या राज्यात कधीच घेतला गेला नव्हता हे इतिहासच कथन करतो. म्हणूनच जाफ़रभाईसारखा अस्सल गुजराती मुस्लिम कॉग्रेसच्या मुस्लिमप्रेमाला आव्हान देऊन उभा आहे आणि त्याच्या कुठल्याही प्रश्नाला सेक्युलर माध्यमे वा कॉग्रेस उत्तर देऊ शकलेली नाहीत.

   जाफ़रभाई म्हणतो, प्रत्येक दंगलीत आमचे घरदार व कारखाना बेचिराख झाला आहे. पण त्याचा एकदा तरी गुन्हा नोंदला गेला असेल, तर कोणी पुरावा आणून दाखवावा. नुसती दंगलीचीच गोष्ट नाही. मुस्लिम दंगलग्रस्तांना न्याय कुठूनही मिळू नये, याचा कॉग्रेस राजवटीत किती कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता, त्याचेही पुरावे व तपशील देताना जाफ़रभाई म्हणतो, त्या काळात (कॉग्रेसच्या राजवटीत) मुस्लिमाची साधी तक्रारही पोलिस नोंदवून घेत नव्हते. आणि जर पोलिस तक्रारच नोंदलेली नाही वा नुकसानाचा आढावाही नसेल, तर विमा कंपन्या भरपाई द्यायला नकार द्यायच्या. १९९२ सालात त्याचा कारखाना जाळण्यात आला. त्याचा दीड कोटी रुपयांचा विमा उतरलेला होता. पण याच कॉग्रेसी नितीमुळे आम्हाला कुठली भरपाई मिळू शकली नाही. १९९२ च्या दंगलीत भस्मसात झालेल्या करोडो रुपये किंमतीच्या कारखान्याची भरपाई म्हणून १९९८ सालात आम्हाला अवघा नऊ लाख रुपयाचा चेक देण्यात आला. ही मुस्लिमांची नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होण्याआधीपासूनची वा कॉग्रेसच्या राजवटीतली दुरावस्था होती. तेव्हा तर भाजपा सत्तेत नव्हता किंवा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री नव्हता. मग पोलिस मुस्लिमांशी असे का वागत होते? राज्य व सत्ता कॉग्रेसची सेक्युलर होती. मग मुस्लिमांना अशी अन्याय्य वागणूक गुजरातमध्ये कशाला मिळत होती? की सत्ता नसताना व मुख्यमंत्री नसतानाही भारत सरकारच्या विमा कंपन्यांचे निर्णय मोदीच घेत होते काय? २००२ पुर्वी आम्हा मुस्लिमांवर गुजरातमध्ये जो अन्याय व पक्षपात सुरू होता, त्याला जबाबदार कॉग्रेस नव्हती काय? यांचा तथाकथित सेक्युलर कारभारच मुस्लिमांचे हाल करीत नव्हता काय? कॉग्रेसच्या सरकारने मुस्लिमांना कधीच न्याय दिला नाही, की दंगलीनंतर त्यांचे पुनर्वसन केले नाही. उलट प्रत्येक दंगलीनंतर हिंदू समाजानेच मुस्लिमांना आपल्या पायावर उभे रहायला मदत केलेली आहे. जर गुजरातचा हिंदू धर्मांध असता व मुस्लिमांचा द्वेष करीत असता; तर एव्हाना गुजरातमध्ये औषधाला मुस्लिम शिल्लक उरला नसता. आणि हे फ़क्त कॉग्रेसचे राजकारण नव्हते किंवा कॉग्रेसी प्रशासनापुरतेच नव्हते. सरकारच्या दबावाखाली बॅन्का व आर्थिक संस्थाही मुस्लिमांना पक्षपातानेच वागवत होत्या, असेही जाफ़रभाई अगत्याने सांगतो.

   आणि हाच अनुभव मग २००२ सालातल्या दंगलीत मुस्लिमांना आला. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होऊन चार महिनेही झाले नव्हते व त्यांना प्रशासनावर मांडही ठोकता आलेली नव्हती. अशावेळी गुजरातमध्ये गोध्रा कांड होऊन भीषण दंगल उसळली. तेव्हा मोदी अननुभवी होते. पण कॉग्रेसने चार दशकात मुस्लिमांना झोडपून काढण्याचेच प्रशिक्षण दिलेले प्रशासन सज्ज होते. ते कॉग्रेसी पद्धतीने काम करीत गेले आणि नेहमीप्रमाणेच मुस्लिमांना झळ सोसावी लागली. पण एकच फ़रक होता, तो म्हणजे नवा मुख्यमंत्री कॉग्रेसी नव्हता आणि कॉग्रेसप्रमाणे मुस्लिमांची ससेहोलपट बघत बसणारा नव्हता. त्याने दंगलीकडे निष्क्रिय बघत बसण्यास नकार देऊन दंगली आटोक्यात आणायचा प्रयास केला, हा मोठा फ़रक होता. जे काम त्यापुर्वीच्या कुठल्याही कॉग्रेस मुख्यमंत्र्याने कधीच केलेले नव्हते, तेच नरेंद्र मोदी यांनी आरंभले होते. त्यांनी पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही बघितल्यावर थेट लष्कराला पाचारण करायचा निर्णय घेतला. तेवढेच नाही, त्यांनी शेजारी राजस्थान, महाराष्ट्र व मध्यपदेश सरकारांना अतिरिक्त पोलिस बळ पाठ्वायची विनंती केली. यापुर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्याने अशी पावले उचललेली नव्हती. मोदी हा एकमेव अपवाद होता. पण गंमत बघा. तीन बाजूला असलेल्या तिन्ही सेक्युलर कॉग्रेसी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला अतिरिक्त पोलिस बळ पाठवण्यास नकार दिला. त्यातच मध्यप्रदेशचे तात्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा समावेश होतो. आणि आज हाच माणूस गुजरातच्या दंगलीचे नित्यनेमाने भांडवल करून मोदींवर शरसंधान करीत असतो. किती विरोधाभास आहे ना? पण अर्थातच हा खोटारडेपणा इथेच संपत नाही. मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून कायदा व्यवस्थेचे योग्य पालन केले नाही; हा त्यांच्यावरचा सर्वात मोठा आरोप आहे. पण वस्तुस्थिती काय आहे?

   गुजरातमध्ये आजवर कित्येक दंगली झाल्या आणि त्यात अनेकांचे बळी पडले आहेत. पण कुठल्याही दंगलीत पोलिस गोळीबारात दंगेखोर मारले गेल्याच्या घटना विरळाच दिसतील. सर्वाधिक गोळीबाराचे बळी २००२ च्या मोदींच्या कारकिर्दीत पडलेले आहेत. म्हणजेच दंगलीला कठोर कृतीमधून पायबंद घालण्याचा प्रयास करणारा मोदी हाच गुजरातचा पहिला मुख्यमंत्री आहे. आणि त्यातही महत्वाची बाब म्हणजे मोदींच्या आदेशामुळे पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे गोळीबारात मारल्या गेलेल्यात बहुतांश मृत हिंदूच आहेत. म्हणजेच हिंदूंना मोदींनी मोकाट दंगल करू दिली किंवा पोलिसांना कठोर कारवाई करू दिली नाही, हे किती बकवास आहे, ते लक्षात येऊ शकेल. गुजरातची २००२ ची दंगल ही अशी पहिलीच आहे, की जी कमीतकमी दिवसात आटोक्यात आली. अन्यथा कॉग्रेसच्या कारकिर्दीत महिनोन महिने दंगल व संचारबंदीचा खेळ चालत होता. कसा विरोधाभास आहे बघा. ज्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत गोळीबारात अधिक बळी पडले व तेही प्रामुख्याने हिंदूच दंगेखोर मारले गेले, त्याच्यावरच मुस्लिमांना संरक्षण नाकारल्याचा व हिंदू दंगेखोरांना मोकाट जाळपोळ करू दिल्याचा आरोप सुरू झाला आणि मग गोबेल्सच्या प्रचार तंत्रानुसार खोट्याचा पाऊस पडला. दहा वर्षे उलटून गेली तरी सत्य बोलायला कोणी धजावत नाही आणि कोणी बोलू लागला, तर त्याची माध्यमांकडून गळचेपी सुरू होते. वातावरणच असे होते, की गुजरातबाहेर येणार्‍या सेक्युलर अफ़वाच बातम्या बनून गेल्या आणि सत्याचा गळा घोटला गेला. सतत असत्य ऐकल्यावर खरेही बघायची हिंमत होत नाही, तशीच देशभरच्या लोकांची व जगभरच्या मुस्लिमांची अवस्था होऊन गेली. त्यातच जाफ़रभाईसारखे अनेकजण गुरफ़टत गेले. सेक्युलरांनी विणलेल्या जाळ्यात फ़सत गेले. त्या प्रत्येक गुजराती मुस्लिमाची कहाणी धकादायक व चकीत करणारी आहे. सेक्युलर भामटेगिरीचे प्रकार तर काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणे म्हणजे काय त्याचे सेक्युलर किस्से तर अत्यंत घॄणास्पद आहेत.    ( क्रमश:)
 भाग   ( १५२ )    २५/४/१३

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

गुजरात दंगलीनंतरचे सर्वात विदारक सत्य
  जाफ़रभाई सरेशवाला हा गुजरातचा सुन्नी बोहरा मुस्लिम आहे. अडिचशे वर्षापुर्वी ह्या पंथाचे लोक सौदी अरेबियातून भारतात आले व स्थायिक झाले. त्यांनी प्रामुख्याने गुजरातमध्ये आपले बस्तान मांडले. गुजरातच्या विविध भागात किरकोळ वा मध्यम व्यवसाय, व्यापारात त्यांचे प्रस्थ फ़ार दिसते. दाऊदी बोहरा वेगळे आणि सुन्नी बोहरा वेगळे. हे सुन्नी कडवे धर्मप्रेमी मुस्लिम मानले जातात. काटेकोर धर्मपालन करणारी ही जमात आहे. आपल्या देशात उत्तरप्रदेशात देवबंद येथील मुस्लिम धर्मशिक्षण देणारा सर्वात जुना मदरसा म्हणून ओळखला जात असला, तरी तेवढाच जुना सुन्नी मदरसा दाभेल गुजरातमध्ये आहे आणि तो सुन्नी बोहरा जमातीचा आहे. दोन वर्षापुर्वी याच मदरशाचे इस्लामी विद्वान मौलाना गुलाम वस्तानवी यांची देवबंदच्या दारूल उलूमचे मुख्य प्राचार्य म्हणून निवड झाली होती. पण गुजरात दंगलफ़ेम सेक्युलरांनी त्यांचा बळी घेतला. असो, तो विषय नंतर लिहिता येईल. सध्या आपण जाफ़रभाईची ओळख करून घेऊ. हे सुन्नी बोहरा सौदी अरेबियाच्या सुन्नी पंथीय चालीरिती अत्यंत काटेकोरपणे पाळतात. अगदी वेशभूषेपासून दैनंदीन जीवनपद्धतीतही धर्माचरण काटेकोर असते. महिला बुरख्यात बंद असतात आणि दिवसात पाच वेळा नमाज पठण चालते. पण दुसरीकडे या मुस्लिम समाजात उच्चशिक्षितांचाही भरणा आहे. जाफ़रभाईच नव्हेतर त्यांच्या निकटवर्तियांनी दिर्घकाळ मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षण प्रसाराचे काम चालविलेले आहे. आणि म्हणूनच गुजरातच्या मुस्लिम समस्यांची जाण जाफ़रभाईला अगदी कोवळ्या वयातच झालेली आहे. मुस्लिमांच्या उत्थानासाठी शक्य तेवढे काम करीत रहाण्याचे बाळकडू जाफ़रला त्याच्या बालपणीच मिळाले, तसेच गुजरातमधल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचे चटकेही बालपणीच त्याला सोसावे लागलेले आहेत. आज सेक्युलर म्हणून मुस्लिमांच्या वेदनांवर पुस्तकी पांडित्य सांगणार्‍यापैकी जाफ़रभाई एक नव्हेत. हा दंगलीत होरपळून टिकलेला मुस्लिम कार्यकर्ताही आहे. अहमदाबादेत १९६९ सालात झालेली दंगल आणि त्यात त्याच्या कुटुंबाचे भस्मसात झालेले सर्वस्व, त्याला आजही चांगले आठवते. कोवळ्या वयात बघितलेली त्या दंगलीची आठवण जाफ़रभाई आजही सांगतो.

   तेव्हा आजच्यासारख्या चोविस तास बातम्या सांगणार्‍या वाहिन्या नव्हत्या, की टिव्ही नव्हते. त्यामुळे त्या दंगलीची बित्तंबातमी अहमदाबाद वा गुजरातबाहेर फ़ारशी कुठे पोहोचली नव्हती. तिचा गवगवा झालेला नव्हता. पण स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये अर्धशतकात सातत्याने झालेल्या दंगलीत तीच १९६९ सालची दंगल सर्वात भीषण होती. आणि ती सुद्धा गोध्रासारख्या भयंकर घटनेमुळे उसळली नव्हती. तुलनेने अत्यंत किरकोळ कारणाने १९६९ सालात गुजरात पेटला होता. गाय कापल्याच्या बातमीने ती दंगल सुरू झाली व तिने इतके रौद्ररूप धारण केले, की पाच हजाराहून अधिक मुस्लिमांचा त्यामध्ये बळी पडला होता. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि हितेंद्रभाई देसाई गुजरातचे मुख्यमंत्री होते. दोन्हीकडे कॉग्रेसचीच सत्ता व सरकारे होती. त्यात जाफ़रभाईच्या कुटुंबाचा कारखाना, कार्यालये जाळून भस्मसात करण्यात आलेली होती. काळूपूर नावाचा एक परिसर अहमदाबाद शहरात आहे. मुस्लिम वस्तीचे ते मध्यवर्ती स्थान आहे. तिथे रिलीफ़ रोडवर पोलिस ठाण्याच्या समोरच एक मोठी मशीद व तिच्या आसपास दुकानांची रांग होती. वस्ती व दुकाने मुस्लिमांची हे वेगळे सांगायला नको. पोलिस ठाण्याच्या नेमक्या समोर असलेल्या त्या मशिद व दुकानांची राखरांगोळी करण्यात आलेली होती. त्या दंगलीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी दंगलग्रस्त भागाला भेट देण्याकरता आल्या, तेव्हा जमलेल्या दंगलपिडीत मुस्लिमांच्या गर्दीत, आपल्या आजोबाचा हात घट्ट धरलेला अवघा पाच वर्षाचा एक मुलगा होता. तोच हा जाफ़रभाई. त्याला दंगलीची कारणे वा पंतप्रधान वगैरे गोष्टी कळत नव्हत्या. पण दंगलीची ती दाहकता नेमकी जाणवत होती. मनाचा थरकाप उडवणारी ती अनुभूती आजही त्याच्या मनात ताजी आहे. त्या पोलिस ठाण्यासमोरच इंदिराजी आपल्या गाडीतून उतरल्या आणि समोरचे दृष्य पाहून म्हणाल्या, ‘पोलिस ठाण्यासमोर चाळीस मिटर्सवर मशीद व दुकाने आहेत आणि तरीही त्यांची अशी राखरांगोळी झाली?’ कारण स्पष्ट होते, तेव्हा पद्धतशीर मुस्लिमांचे शिरकाण झाले होते आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे राज्य होते व कॉग्रेसचाच मुख्यमंत्री होता. त्यावेळची दंगल व हिंसाचार यासाठी कोणाला जबाबदार धरले गेले? किती लोकांवर खटले भरले गेले? सरकारवर कोणते आरोप झाले? मुख्यमंत्र्याकडे कोणी संशयाने तरी बघितले का? की तेव्हा सेक्युलॅरिझमचाच शोध लागला नव्हता?

   त्या १९६९ च्या दंगलीत पाच हजार मुस्लिमांचे शिरकाण झाले, हजारो मुस्लिमांची घरदारे जाळून राखरांगोळी करण्यात आली. त्यासंबंधाने चौकशी आयोग सुद्धा नेमला होता. त्याचा अहवाल (जगमोहन रिपोर्ट) धुळ खात पडला आहे चार दशके. कोणी त्यावरची धुळ तरी झटकली आहे काय? २००२ च्या दंगलीसाठी ऊर बडवणार्‍या कोणी तरी १९६९ च्या त्या सर्वात भयंकर दंगलीचे नाव तरी घेतले आहे काय? किती गुन्हे त्यावेळी नोंदले गेले? किती गुन्ह्यांचा तपास झाला? कितीजणावर आरोपपत्रे दाखल करण्यात आली? किती खटले चालले आणि किती दंगलखोर शिक्षा भोगायला गेले? आज मुस्लिमांच्या न्यायासाठी सेक्युलर पोपटपंची करणारा कोणीतरी जाफ़रभाईच्या या प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल काय? की गुजरातमध्ये १९६९ ची दंगल झालेलीच नाही? की गुजरात नावाचे राज्य २००२ची दंगल होण्यापुर्वी अस्तित्वातच नव्हते? की गुजरातमध्ये २००२ च्या दंगली होण्यापुर्वी मुस्लिमांचे वास्तव्यच नव्हते? मोदींच्या नावाने अखंड शिव्याशाप देणार्‍या कोणाकडे तरी या प्रश्नांची उत्तरे आहेत काय? अर्थात १९६९ ही एकच मोठी दंगल नाही. दर दोनचार वर्षांनी गुजरातमध्ये हिंदू मुस्लिम दंगल हा परिपाठच होता आणि त्यात अत्यल्प लोकसंख्या असल्याने सर्वात जास्त मुस्लिमच भरडला जाणार, हे सुद्धा ठरलेले समीकरण होते. प्रत्येक दंगलीत मुस्लिमांनी उध्वस्त व्हायचे आणि पुढल्या दोनचार वर्षात नव्याने आपली घरे वसवायची; असाच गुजरातच्या मुस्लिमांचा कॉग्रेसच्या सेक्युलर सत्ता काळातील इतिहास राहिला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर तीनच महिन्यात उसळलेली गोध्रानंतरची दंगल वगळता मागल्या दहा वर्षात पुन्हा एकही दंगल होऊ शकलेली नाही. पण हाच इतका मोठा सलग अकरा वर्षाचा कालखंड असा आहे, की मुस्लिमांना दंगलीपासून खरी मुक्तता मिळाली आहे. जाफ़रभाईने ओरडून सांगितलेले हे सर्वात विदारक सत्य आहे. सलग दहा अकरा वषे गुजरातमध्ये मुस्लिमांना दंगलीचे चटके बसले नाहीत, असा दुसरा कुठला कालखंड वा कुठल्या मुख्यमंत्र्याची कारकिर्द आहे, ते दाखवण्याचे आव्हान जाफ़रभाई म्हणूनच देतो. त्याचे तरी कुणा मोदीविरोधी सेक्युलर पोपटाकडे उत्तर आहे काय?

   कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते. कारण कुत्रा हा चावणराच प्राणी आहे. आणि तो पाळीव असल्याने माणसाच्या वस्तीतच असणारा पशू आहे. तेव्हा कुत्रा चावला ह्यात काही वेगळे नसते. पण एखादा माणूस कुत्र्याला चावला, तर ती बातमी असते. कारण त्यात वेगळेपणा व वैचित्र्य असते.  माणूस कुत्र्याला फ़ार तर लाथ मारील, दगड मारील. पण चावणे हे माणसाचे लक्षण नसते. बातमीची अशी प्राथमिक व्याख्या आहे. पण आजची सेक्युलर झालेली माध्यमे ती व्याख्याच विसरून गेली आहेत. म्हणूनच त्यांना बातमी कुठे व कशात आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही, किंवा त्यांना बातमीपेक्षा अफ़वा पसरवण्यातच धन्यता वाटत असावी. अन्यथा गेले काही दिवस मी इथे ‘उलटतपासणी’ सदरातून जी माहिती देतो आहे, त्याच्या अक्षरश: शेकडो ब्रेकिंग न्युज होऊ शकल्या असत्या. पण त्या झाल्या नाहीत किंवा अशी सर्व माहिती लपवली वा दडपून ठेवली गेली आहे. कारण यातली सगळी माहिती सहज उपलब्ध आहे आणि ती जाफ़रभाईने सांगण्याची गरज नाही. कुठल्याही प्रामाणिक पत्रकार व वार्ताहराला ती शोधता येऊ शकते, सापडू शकते किंवा मिळू शकते. आणि ती इतकी धक्कादायक आहे, की गेल्या दहा अकरा वर्षात जी माहिती वा बातम्या जगभर गुजरातच्या दंगलीच्या निमित्ताने पसरवल्या गेल्या, त्यांना जमीनदोसत करणारे असेच हे सगळे वास्तव आहे. मग ही माहिती लपवली का जाते? अशा बातम्या दडपल्या का जातात? तर आपल्याकडे पत्रकार वा माध्यमातून जे लोक घुसले आहेत, ते पत्रकार नसून आपापला राजकीय अजेंडा घेऊन लोकांमध्ये एकप्रकारची भूमिका वा मानसिकता तयार करण्याचे राजकीय कार्य करण्यासाठी माध्यमांना राबवले जात असते. त्या बातम्या किंवा त्यातील चर्चेत सहभागी करून घेतलेले लोक बघितले तरी लक्षात येते, की ही माणसे एका विशिष्ठ राजकीय विचारांची असून जनमानसात आपल्या भूमिका रुजवण्याच्या दिशेनेच माहिती् देण्याचे वा लपवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच मग लोकांमध्ये किती भ्रम निर्माण होतात, त्याचा जाफ़रभाई वा त्याच्यासारखे गुजराती मुस्लिम पुरावे आहेत. कारण गुजरातमध्येच हयात घालवल्यानंतरही त्यांची माध्यमांकडून किती सहजगत्या दिशाभूल झाली आहे ना? आज जाफ़रभाई जे सांगत आहेत, ते माध्यमांनी पसरवलेल्या भ्रमाच्या सापळ्यातून बाहेर पडल्यानेच त्यांना शोधता, बघता व मांडता आलेले आहे. त्यांनी ते कष्ट घेतले नसते, तर त्यांनाही सेक्युलर माध्यमांनी निर्माण केलेल्या भ्रमात व देखाव्यात भरकटत रहाणे भाग झाले असते.    ( क्रमश:)
 भाग   ( १५१ )    २४/४/१३

सोमवार, २२ एप्रिल, २०१३

सेक्युलरांकडून गुजराती मुस्लिमाची मुस्कटदाबी


   आता हा जाफ़रभाई सरेशवाला कोण आणि मला हा माणूस अचानक कुठे सापडला, असे वाचकांच्या मनात येऊ शकते आणि त्यात गैर काहीच नाही. कारण आपण हे नाव मुस्लिमांच्या संदर्भात वा गुजरात दंगलीच्या संदर्भात कधी वाचलेले ऐकलेले आपल्याला आठवणार सुद्धा नाही. कसे आठवेल? कोणी जर ते नाव वा ती व्यक्ती आपल्यासमोर कधी आणून उभीच केली नाही वा त्याच्याबद्दल कधी सांगितलेच नाही; तर आपल्याला तो आठवणार तरी कसा? आणि आठवायचा असेल तर आपल्याला त्याची ओळख पत्रकार वा माध्यमांनीच करून दिली पाहिजे ना? कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर किंव वृत्तपत्रात त्याची माहिती वा बातमी झळकली; तरच आपल्याला अशा नावाचा कुणी गुजरातमध्ये मुस्लिम व्यापारी आहे व त्याचेही कारखाने व दुकाने दंगलीत जाळून भस्मसात करण्यात आली, हे आपल्याला समजू शकेल. तेवढ्यासाठी आपण उठून गुजरातला जाणार नाही, की शोधाशोध करणार नाही. ते काम आपल्यासाठी माध्यमे व पत्रकार डोळ्यात तेल घालून करीत असतात; अशी आपली ठाम समजूत आहे. त्यामुळेच माध्यमात जाफ़रभाई सरेशवाला असे नाव कधी झळकले नसेल, तर असा कोणी मुस्लिम गुजरात वा जगाच्या पाठीवर असतो; हे आपल्याला कळूच शकत नाही. आपल्याला गुजरातचे जे मुस्लिम माहिती असतात, ते केवळ माध्यमांनी आपल्यासमोर आणलेले असतात. आणि माध्यमेही त्यासाठी फ़ारसे कष्ट घेत नाहीत, की कुठली शोधाशोध करीत नाहीत. त्यांना त्यांनी देखिल गुजरातचे मुस्लिम त्यांच्यासमोर आणायचे काम दोनतीन स्वयंसेवी संस्थांवर सोपवलेले आहे. तीस्ता सेटलवाड किंवा मुकूल रॉय असे त्या स्वयंसेवी संस्थांचे संचालक आहेत. त्यांच्याकडून ज्या मुस्लिमांची नावे किंवा बातम्या-माहिती माध्यमांकडे येते; तेवढीच मग पत्रकार जगाला सांगत असतात. या दोन वा तत्सम स्वयंसेवी संस्थांची मान्यता असल्याखेरीज गुजरातमध्ये कोणी मुस्लिम असूच शकत नाही, अशी एकूण सेक्युलर वास्तविकता आहे. त्यामुळेच माध्यमांकडून आपल्याला सलीमखान, जाफ़रभाई सरेशवाला. रईसखान पठाण, गुलाम वस्तानवी, अशी नावे आपल्यापर्यंत येऊच शकत नाहीत. जी तुमची स्थिती आहे, तीच काहीशी माझी सुद्धा आहे. त्यामुळेच काही महिन्यांपुर्वी जाफ़रभाई सरेशवाला मला ऐकूनही माहित नव्हता. मग त्याने केलेल्या गोष्टी वा त्याच्याशी संबंधित घटना तरी कशा माहिती असतील?

   चार महिन्यांपुर्वी गुजरातची विधानसभा निवडणुक झाली. तेव्हाही पुन्हा गुजरात दंगलीचा जुनाच कोळसा उगाळला गेला. पण त्यात काही नवे नव्हते म्हणून मी त्यासंबंधी बातम्यांकडे फ़ारसे लक्ष दिलेले नव्हते. पण विधानसभेचे मतदान होऊन निकाल लागले, त्याचे विश्लेषण ऐकत होतो. तेव्हा राजदीप सरदेसाई ज्याचा संपादक आहे, त्या आयबीएन वाहिनीवरील निवडणूक निकाल व त्यावरील चर्चा ऐकताना मला प्रथम धक्कादायक चित्र बघायला मिळाले. त्यातच हा जाफ़रभाई सरेशवाला सहभागी होता. तेवढेच नाही तर गुजराती जाफ़रभाई नावाचा एक मुस्लिम मोदींचे समर्थन करतो, हीच खरी धक्कादायक बातमी होती. शिवाय हा कोणी ऐरागैरा इसम नव्हता, तर खुद्द गुजरातमधला मुस्लिम होता. म्हणूनच तो काय बोलतो, ते मी कान देऊन ऐकू लागलो. अर्थातच त्याला राजदीप फ़ारसा बोलूच देत नव्हता हे वेगळे. त्यालाच हल्ली सेक्युलर पत्रकारिता म्हणतात. म्हणजे जो कोणी मोदींचे कौतुक करील वा भाजपाबद्दल चांगले बोलू लागेल; त्याच्या बोलण्यात संयोजकाने अडथळे आणण्याला व त्यांच्या विरोधात बोलणार्‍याला मुक्तपणे चिखलफ़ेक करण्याला सवड देण्य़ाला वाहिन्यांवरील पत्रकारिता म्हणतात. त्याला अनुसरून राजदीप या जाफ़रभाईला बोलू देत नव्हता. पण त्याने काही बिघडत नव्हते, मुस्लिमांनीही मोदींना मते दिली; हा एका मुस्लिमाचा दावा मला नवल वाटणारा होता. शिवाय राजदीपने आपल्या नेहमीच्या शैलीत जाफ़रभाईची खिल्ली उडवली, त्यामुळेच हा माणूस काहीतरी खरे बोलतोय, याची मला खात्री पटली. कारण राजदीपला झोपेतही सत्य सहन होत नाही, इतका तो भ्रमात व असत्यामध्ये आकंठ बुडालेला असतो. त्याने सतत जाफ़रभाईच्या बोलण्यात व्यत्यय आणला, त्याचा अर्थच हा माणुस काही गंभीर सत्य सांगतोय, याची मला खात्री वाटली होती.

   मुद्दे नसतात, तेव्हा माणुस उफ़राटे आरोप करीत असतो. राजदीपची देहबोली नेमकी त्याची सदोदीत साक्ष देणारी असते. कुठलेही सत्य समोर येऊ लागले; मग राजदीप चर्चेत हस्तक्षेप करून सत्याची सातत्याने मुस्कटदाबी करीत असतो. जाफ़रभाईच्या बाबतीतही त्याचे तेच चालले होते. मुस्लिमांनी मोदींना मते दिली काय, असा राजदीपचा सवाल होता आणि त्याला होकारार्थी उत्तर देताना जाफ़रभाई काही तपशील सांगत होता. तो तपशील श्रोते व प्रेक्षकांपर्यंत सत्य घेऊन जाईल, अशी भिती राजदीपला वाटणे स्वाबाविकच होते. म्हणून त्याने टोमणा मारत जाफ़रभाईला गप्प करण्याचा प्रयास केला. तुमच्यासारख्या श्रीमंत व्यापार्‍याला मोठ्या कंपन्यांच्या एजन्सी मिळाल्या; म्हणजे गुजरातच्या मुस्लिमांच्या समस्या संपत नाहीत, असा टोमणा राजदीपने हाणला. पण जाफ़रभाई वेगळेच काही सांगत होता. एकूण गुजरातच्या विकासाचे सारखेच लाभ मुस्लिमांनाही मिळत आहेत, आणि त्याचे श्रेय मोदीनाच आहे, असे जाफ़रभाईला सांगायचे होते. तेवढ्य़ा त्याच्या विधानाने माझे कुतूहल जागे केले. त्यामुळे पुढल्या काही दिवस इंटरनेट वा अन्य माध्यमातूम मी जाफ़रभाई व गुजरातच्या मुस्लिमांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयास केला. त्यासाठी दोन मार्ग जाणीवपुर्वक टाळले. पहिला सेक्युलर माध्यमांतून समोर आणली जाणारी माहिती व भाजपा वा मोदी यांच्या गोटातून येणारी माहिती टाळून; गुजरातच्या मुस्लिमांची दंगलीनंतरची माहिती मिळवायचा मी प्रयास केला. त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आले. ते म्हणजे सेक्युलर माध्यमे व संस्था संघटनांनी गुजरात बाहेरच्या मुस्लिम व बिगर मुस्लिमांची दिशाभूल केलेली आहेच. पण त्याचवेळी खुद्द गुजरातच्या मुस्लिम दंगलपिडीतांचीही मोठीच मुस्कटदाबी केलेली आहे.   गेल्या दहा अकरा वर्षात गुजरातची दंगल व त्यात झालेली मुस्लिमांची ससेहोलपट, या संबंधात जितकी माहिती जगासमोर आणली गेली, त्यात तिथले मुस्लिम नेते, कार्यकर्ते, व दंगलपिडीत किती आहेत? तीस्ता सेटलवाड किंवा मुकुल रॉय अशा लोकांनी माध्यमांना पुरवलेल्या माहितीच्याच आधारे बातम्या मांडल्या वा रंगवल्या गेलेल्या दिसतील. त्या माहिती वा बातम्यांना छेद देणारी वा खोटे पाडणारी माहिती कोणी समोर आणायचा प्रयास जरी केला, तरीही तात्काळ त्याची माध्यमातून मुस्कटदाबी झालेली दिसेल. आणि त्या मुस्कटदाबीतून मुस्लिमही सुटलेले नाहीत. सेक्युलर माध्यमांनी जे खोटे व असत्य आजवर पसरवले आहे, त्याचा खोटेपणा दाखवायचा कुणा दंगलपिडीत मुस्लिमाने जरी प्रयास केला; तरी त्याला लगेच वाळीत टाकले जाते किंवा त्याच्याच विरुद्ध मोहिम उघडली जाते. त्याला खोट्यानाट्या आरोपात गुंतवून त्याचे जगणे हराम करून टाकले जाते. याची उलट बाजू अशी, की मोदी विरोधात वाटेल ते खोटे बोलायला सज्ज असेल, त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळत जाते. जाफ़रभाई त्याचाच एक बळी आहे आणि बेस्ट बेकरी खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जाहिरा शेख त्यापैकीच एक बळी आहे. आजवर जगात दंगलपिडीत असलेल्या व्यक्तीलाच शिक्षा व कैद भोगायला कुठे लागली असेल काय? गुजरातची दंगल त्याही दृष्टीने अजब नमूना आहे. त्यात बेस्ट बेकरी जळीत कांडात जिचे अवघे कुटुंब व संसार उध्वस्त झाला; त्या जाहिरा शेखला खोटी साक्ष दिली वा सतत साक्ष बदलली म्हणून कैदेची शिक्षा भोगावी लागली आहे. तिचा गुन्हा कोणता असेल? तर प्रथम तिची जबानी पोलिसांनी लिहून घेतली व तिने पहिली साक्ष कोर्टात देताना तो कबुलीजबाब नाकारला होता. मग तिला पुन्हा तोच कबुलीजबाब द्यायला स्वयंसेवी संस्थांनी भाग पाडले आणि तोच खटला गुजरात बाहेर मुंबईत चालवला गेला. तिथेही तेच झाले. जाहिराने पुन्हा साक्ष देताना कबुलीजबाब नाकारला. म्हणून तिलाच कोर्टाची दिशाभूल केल्या प्रकरणी शिक्षा भोगावी लागली.

   एक अशिक्षित मुलगी इंग्रजीत लिहीलेल्या प्रतिज्ञापत्रावर विश्वासाने सही करते; तर तिला त्यासाठी गुन्हेगार मानून शिक्षा झाली. ती काय म्हणते याची दखल तरी माध्यमांनी घेतली काय? आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार असे आमिष दाखवून सह्या घेण्यात आल्या व पैसे देण्याची लालूच दाखवून पत्रकार परिषदेत वदवून घेतले, असे जाहिरा सांगत होती. पण कोणी तिच्यावर विश्वास दाखवला काय? दंगलपिडीत असून तिच्यावर कोणाचा विश्वास नाही. पण त्याच दंगलीबद्दल तीस्ता सांगेल, तेच माध्यमांसाठी एकमेव सत्य आहे. ही गुजरातच्या दंगलीबद्दल आपल्यासमोर आलेली स्थिती आहे. मग जाफ़रभाई आपल्याला कसा माहिती असणार? कारण तो त्यापेक्षा वेगळे काही सांगू पहातो आहे. व्यापारी व पैसेवाला म्हणून राजदीप त्याला खोटा म्हणणार. पण बेस्ट बेकरीची जाहिरा शेख तर पैसेवाली नाही आणि गरीब होती ना? मग तिच्यावर तरी कोणी विश्वास दाखवला काय? या दंगलीबद्दल सेक्युलर माध्यमांचा एकमेव निकष ठरून गेलेला आहे. मोदी विरोधी असेल तेच सत्य आणि मोदींच्या बाजूने कोणी साक्ष देत असेल, पुरावे समोर आणणार असेल, तर तो खोटा, हाच निकष असेल तर आपल्याला सत्यापर्यंत वास्तवापर्यंत, जाहिरा शेख, जाफ़रभाई, रईसखान, सलीमखान, इत्यादींपर्यंत पोहोचता येणारच कसे? आपल्याला माध्यमांनी निर्माण केलेया सेक्युलर भ्रमातच चाचपडत रहावे लागणार ना? म्हणूनच जाफ़रभाई सापडण्याला इतका उशीर लागला आणि त्याने उजेडात आणलेले सत्य डोळे दिपवून टाकणारे असेच आहे.    ( क्रमश:)
 भाग   ( १५० )    २३/४/१३

रविवार, २१ एप्रिल, २०१३

झोपी गेलेला जागा झाला; अर्थात जाफ़रभाई


   परवाच्या लेखामध्ये मी राजकपूरच्या ‘जागते रहो’ चित्रपटातील एक प्रसंग मुद्दाम कथन केला होता. त्यात ती चिडलेली व संतापलेली पत्नी रागाच्या भरात हाती लागेल ते आपल्या नवर्‍याच्या अंगावर फ़ेकत असते. तसे पाहिले तर चित्रपट बघताना तो विनोदी प्रसंग वाटतो. कारण घरातले भांडण आहे आणि राजकपूर तिच्या हाती एक एक वस्तू देत असतो. ती बेभान होऊन नवर्‍यावर त्या वस्तूने हल्ला चढवत असते. म्हणून आलल्याला तिचे हसू येते. पण वास्तव जीवनात त्यापेक्षा किती वेगळी परिस्थिती असते? ज्या वर्तनाला आपण असे मनापासून हसत असतो, नेमके तसेच त्या प्रसंगी आपण अनेकदा वागत असतो. आपल्याला तरी कोण कुठली वस्तू वा हत्यार आपल्या हाती हल्ला करण्यासाठी देते आहे किंवा कशासाठी देते आहे; याचे कितीसे भान असते? हातात काय आहे व त्याने हल्ला केल्यास त्याचे परिणाम काय संभवतात; याचे आपल्याला तरी कितीसे भान असते? कारण कोण काय हाती देते, याची आपल्याला अजिबात फ़िकीर नसते. त्या चित्रपटातील पत्नीला तरी कुठे फ़िकीर होती? ती आपल्या नवर्‍यावर संतापलेली होती आणि त्याच संतापाच्या भरात मिळेल ते नव्हेतर हाती मुद्दाम दिलेले फ़ेकत होती. ते देणारा कोण आहे व अशा वस्तू हाती देण्यामागचा त्याचा हेतूही तिला ठाऊक नसतो. तसेच आपलेही नसते का? आपणही अनेकदा कुणावर तरी रागावलेले असतो आणि त्यात कोणी आगीत तेल ओतल्याप्रमाणे चिथावणी देत असेल; तर त्याला बळी पडत नसतो का? त्याचे दुरगामी परिणाम अनुभवायला मिळतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे का होते? बहुतेकदा प्रत्येक माणसाचा असाच अनुभव असतो.

   माणसे अशी का वागतात? तर माणसे दोन प्रकारे प्रवृत्त होत असतात. एक म्हणजे काही आवडले वा प्रेम वाटले मग माणूस प्रवृत्त होतो आणि जे आवडले आहे, त्याच्यासाठी वाटेल ते करायला सज्ज होतो. त्यात तो आपल्या फ़ायद्यातोट्याचा विचारही करत नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की कोणावर आपण खुप रागावलेले असू किंवा काही नावडलेले असेल, तरी आपण नफ़्यातोट्याच्या पलिकडे जाऊन त्याच्या विरोधात उभे ठाकतो. खरे तर आपल्याला तितके त्यात पडायचीही गरज नसते आणि तेवढी ती रागावण्याची बाबसुद्धा नसते. पण आपल्या रागाचा कोणीतरी व्यवस्थित लाभ उठवून आपल्याला चिथावण्या देतो आणि आपण त्याला बळी पडत असतो. त्या चित्रपट प्रसंगात नवर्‍या बरोबरचे पत्नीचे भांडण खरे असेल. पण घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्ती वा चोरापेक्षा शेवटी तिचा नवराच तिच्या जवळचा असतो ना? मग कोणा अनोळखी व्यक्तीने वाटेल त्या वस्तू नवर्‍याला मारायला दिल्या तरी पत्नीने त्या फ़ेकून मारणे म्हणजे स्वत:चेच नुकसान करून घेणे असते. तिथे त्या नवर्‍याचे नुकसान अनोळखी राजकपूरलाही करायचे नसते. त्याला केवळ तो लपलाय तिकडे पत्नीचे वा तिच्या नवर्‍याचे लक्ष जाऊ नये; एवढाच हेतू साधायचा असतो. पण तेवढ्य़ासाठी तो त्या रागावलेल्या पत्नीची दिशाभूल करत असतो. आपल्याही आयुष्य़ात अशी अनेक माणसे येतात आणि आपल्या गोंधळलेल्या भावनांचा, त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी वापर करून घेत असतात. त्यात आपले नुकसान होणार असते, होत असते. पण फ़िकीर कोणाला असते? असाच एक माणूस आहे जाफ़रभाई सारेशवाला. तो गुजरातचा रहिवासी असून त्याच्या कित्येक पिढ्या गुजरातमध्ये व्यापारी म्हणून जगल्या आहेत. गुजराती मुस्लिम म्हणून इतरांच्या वाट्याला जे कर्मभोग आले; त्यातून जाफ़रभाईची वा त्याच्या कुटुंबियाची सुटका झाली नाही. त्यामुळेच गुजरातच्या दंगलीचे जे कित्येक बळी आहेत, त्यापैकीच जाफ़रभाई सुद्धा एक आहे. म्हणूनच गुजरातचा मुस्लिम व एकूणच मुस्लिम म्हणून जसा नरेंद्र मोदी यांच्यावर राग धरला गेला, तसाच जाफ़रभाई सुद्धा मोदी नावाचाच द्वेष करत होता.

   द्वेष करत होता, असे मी म्हणतो कारण आता तो मोदींचा द्वेष करत नाही असा आहे. आणि असा बदल त्याच्यात कसा झाला, ती सुद्धा मनोरंजक सुरसकथा आहे. २००२ सालात गुजरातमध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसचा डबा मुस्लिम जमावाने पेटवून दिला होता. त्यात ५९ प्रवाशांना जाळण्यात आले, त्यानंतर जी भयंकर दंगल उसळली, तेव्हा जाफ़रभाई गुजरातमध्ये नव्हता. व्यापार उद्योगाच्या निमित्ताने तो गुजरातबाहेर नव्हेतर भारताबाहेर गेलेला होता. तेव्हा त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये होते. तिथे गुजरातच्या बातम्या येऊन थडकल्या, त्यातून त्याला आपल्या कुटुंबिय व नातलगांची चिंता वाटणार यात शंकाच नाही. कारण तो हजारो मैल दूर होता आणि गुजरातमध्ये मुस्लिमांना जीवे मारले जात आहे, सरकार व पोलिसांच्या संरक्षणाखाली हल्लेखोर मुस्लिमांची कत्तल व जाळपोळ करीत आहेत. खुद्द मुख्यमंत्री असलेला नरेंद्र मोदी नावाचा भाजपा नेता त्या दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असेच एकूण बातम्यांचे स्वरूप होते आणि सेक्युलर माध्यमातून त्याची थरारक वर्णने जगभर जाऊन पोहोचत होती. खरेखोटे तपासायला कोणाला सवड होती? अशा बातम्यांचा सपाटा व त्यातून होणारी वर्णने, यामुळे खुद्द भाजपामधील अनेकजण गडबडून गेले होते; तिथे जाफ़रभाई वा अन्य मुस्लिमांची काय कथा? तर अशा बातम्या मनाचा थरकाप उडवणार्‍या होत्या आणि भावनांचा कडेलोट करणार्‍या होत्या. त्याचा परिणाम मोदी म्हणजे कोणी हैवान असाच लावला जाणे स्वाभाविक होते. जाफ़रभाईने तसा त्याचा अर्थ लावला व मोदींवर राग धरला; तर नवल नव्हते. मात्र यातले काय घडते आहे किंवा त्याला जबाबदार नेमका कोण आहे; त्याचा शोध घेऊन मत बनवणे तेव्हा तरी त्याच्या हाती नव्हते. त्याच्याच कशाला दंगलीपासून दूर असलेल्या प्रत्येकाला सेक्युलर माध्यमातून येणार्‍या बातम्यांपलिकडे सत्यापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग नव्हता. आणि सर्वच वाहिन्या, वृत्तपत्रे असेच बोलत व सांगत असतील; तर त्याबद्दल शंका घ्यायलाही जागा उरत नाही. अर्थात म्हणूनच अशा सर्व बातम्या सत्य व वास्तव होत्या असेही नाही. पण तेव्हा तरी त्यांनाच सत्य मानण्य़ापलिकडे बहुतेक लोकांपाशी पर्याय नव्हता. सहाजिकच मुख्यमंत्री मोदी यांचे जे सैतानी रूप सेक्युलर माध्यमे व राजकीय नेत्यांनी रंगवले; त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे इतकाच पर्याय इतरांप्रमाणेच जाफ़रभाई सारेशवाला याच्याही समोर होता.

   पिढ्यानुपिढ्या गुजरातमध्ये वसलेल्या व अपार कष्टातून मोठा व्यापार उभा केलेल्या त्याच्या उद्योगाची राखरांगोळी झाल्याची बातमी व माहिती, प्रक्षोभ माजवणारी होती आणि ज्याचे कोणाचे ते पाप असेल, त्याला धडा शिकवण्याची सूडभावना जन्माला घालणारी होती. त्यासाठी जाफ़रभाईला दोष देता येणार नाही. त्याच्या कुटुंबाची सगळी दुनियाच उध्वस्त झालेली होती. घराणे देशोधडीला लागले होते. त्याच्या नातेवाईकांचीच अशी स्थिती नव्हती, तर गुजराती मुस्लिम मोठ्या प्रमाणात असे देशोधडीला लागल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. म्हणजेच एकूण धर्मबांधवांचीही राखरांगोळी झाल्याच्या बातम्यांनी बिचारा जाफ़रभाई खवळून गेला होता. तिकडे दूर लंडनमध्ये बसून तो काय करू शकत होता? भारतातले कायदे व भारत सरकार या हैवान मोदीला रोखू शकत नसतील, तर आपणच काही करायला हवे असे जाफ़रभाई किंवा तत्सम मुस्लिमांना तेव्हा वाटू लागले असेल; तर चुक मानता येणार नाही. कारण बातम्या व माहितीच अशी काळजाचा थरकाप उडवणारी होती. दंगल, त्यातला हिंसाचार, त्यात मरणारी, मारणारी वा मारली जाणारी माणसे, होणारा विनाश, विध्वंस, या सगळ्या गोष्टी बाजूला पडून बातम्या केवळ मोदी नावाचा कोणी हैवान-सैतान गुजरातमध्ये उभा ठाकला आहे, असेच चित्र रंगवणार्‍या होत्या. आणि मग दंगल हा विषय बाजूला पडून मोदी हाच एक विषय बनून गेला. किंबहूना गुजरातच्या दंगलीला मोदीचा चेहरा, मुखवट्याप्रमाणे चढवण्यात आला. पद्धतशीरपणे हे काम स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍या माध्यमातील पत्रकारांनी हाती घेतले व सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या राजकीय पक्ष संघटनांनी त्यात स्वत:ला झोकून दिले. त्यातूनच मोदी म्हणजे गुजरातची दंगल असे एक समिकरण बनवण्यात आले. जणू मोदी तिथे मुख्यमंत्री नसते तर गुजरातमध्ये दंगलच झाली नसती, अशी एक समजूत तयार करण्यात आली. जणू आजवर गुजरातमध्ये कधी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या नाहीत व मुस्लिमांचे दंगलीत कधी नुकसान झालेच नव्हते, असा भ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयास सुरू झाला. पण वास्तव नेमके उलटे होते व आहे. म्हणूनच सलीम खान यांनी त्याच विषयावर प्रश्नचिन्ह लावले. आजवरच्या शेकडो दंगलीत कधी कुणा मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर खापर फ़ोडण्यात आलेले नाही, मग इथे मोदीच जबाबदार कसा? लोकांना त्या इतर दंगलीच्या वेळी तिथे असलेला मुख्यमंत्री वा त्याचे नाव आठवत नाही. मग गुजरातची दंगल एक मुख्यमंत्री कशी पेटवू शकतो? बिचारा जाफ़रभाई त्याच जाळ्यात फ़सला आणि त्याने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात आरोपी म्हणून उभे करण्याचा बेत आखला. त्यांनी मोदी विरोधात युरोपमध्ये आघाडी उघडली. सेक्युलर माध्यमांनी हाती दिलेल्या वस्तू मोदींच्या अंगावर फ़ेकायला सुरूवात केली. पण आपला राग व सूडभावना कोणी का निर्माण केली, त्याचा विचारही जाफ़रभाईच्या मनाला शिवला नव्हता.    ( क्रमश:)
 भाग   ( १४९ )    २२/४/१३

शनिवार, २० एप्रिल, २०१३

सलमानखानचे पिता सलीमखान यांचे काही सवाल   तीस वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला त्याला, जेव्हा अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली, ती ‘दीवार’ चित्रपटाने. त्याच चित्रपटाने हिंदी चित्रसृष्टीमध्ये दोन नवी नावे ख्यातनाम झाली. त्याच्या आधी हिंदी सिनेमात संगीतकारांची जोडी असायची. पण ‘दीवार’ चित्रपटाने पटकथाकारांची जोडगोळी प्रथमच नावारूपाला आली. शंकर जयकिशन वा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याप्रमाणे या नव्या जोडीला चित्रसृष्टीमध्ये खुप मान मिळू लागला. सलीम-जावेद असे त्या जोडीचे नाव होते. मात्र अधिक काळ ती जोडी एकत्र नांदली नाही. त्यातला जावेद नेहमी आपण वाहिन्यांच्या चर्चेत बघत असतो. आपल्या सामाजिक कार्यासाठी तो अधिक ओळखीचा चेहरा झालेला आहे. शबाना आझमीचा पती म्हणूनही त्याला ओळखले जाते. पण त्या मानाने त्याचा तरूणपणीचा जोडीदार सलीम प्रसिद्धीपासून दूर असतो. त्याचीही काही राजकीय सामाजिक मते व भूमिका आहेत. पण सलीम खान उठसूट क्रांतीचे झेंडे खांद्यावर घेऊन रस्त्यावर येणारा माणूस नाही. त्यामुळेच त्याच्या मतांचा गवगवा सहसा होत नसावा. कदाचित त्याची मते सेक्युलर माध्यमांना सोयीची व हवी तशी नसल्याने, त्याला प्रसिद्धी माध्यमे टाळतही असावीत. कारण तो स्पष्टवक्ता आहे तसाच आपले मत मांडताना कोणाची पर्वा करीत नाही. योगायोगाने तो लोकपिय अभिनेता सलमान खानचा पितासुद्धा आहे. मात्र आपली ठाम मते सांगायला तो कुणा सेक्युलराला किंवा मुल्ला मौलवीलाही घाबरत नाही. अशा सलीम खान यांची एक मुलाखत धक्कादायक आहे आणि अर्थातच ती धक्कादायक असली, तरी सेक्युलर माध्यमांचा खोटेपणा उघडा करणारी असल्याने त्याची ब्रेकींग न्युज होऊ शकत नाही. असो, तर अशा सलीम खान यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण कोणीही सेक्युलर शहाणा त्यांची उत्तरे द्यायला पुढे सरसावलेला नाही. कोणते प्रश्न सलीम खान यांनी उपस्थित केले आहेत?

  १९९२ सालात बाबरी मशीद पाडली गेल्यावर मुंबईत ज्या भीषंण दंगली उसळल्या, त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होता? कोणाला त्याचे नाव आठवते का? त्यानंतर दहा वर्षांनी गुजरातमध्ये झालेल्या दंगली इतकीच मुंबईची दंगल हिंसक होती. मग त्यावेळचा मुख्यमंत्री कोणालाच कशाला आठवत नाही? उत्तर प्रदेशात मलियाणा व मीरत येथे १९८० नंतरच्या काळात भीषण दंगली झाल्या. त्यात काही शेकडा मुस्लिम मारले गेले होते. त्याच कालखंडात बिहारमध्ये भागलपूर व जमशेदपूर येथे दंगलीत मुस्लिमांची हत्याकांडे झाली. त्या दोन्ही राज्यांचे त्या दंगल काळात कोण मुख्यमंत्री होते? कोणाला ती नावे आठवतात काय? तेव्हा त्या त्या राज्यात कोणत्या पक्षाचे राज्य वा सरकार होते? काही आठवते कोणाला? त्याही दंगली गुजरातच्या २००२ इतक्याच भीषण व हिंसक होत्या. मग त्याचे वा त्यावेळच्या तिथल्या मुख्यमंत्र्याचे नाव कोणालाच कसे आठवत नाही? गुजरातची दंगल जर मुख्यमंत्र्याने घडवली असेल आणि मुस्लिमांचे बळी पडले, म्हणून मुख्यमंत्री निकामी असतो, तर त्या प्रत्येक दंगलीतला मुख्यमंत्री निकामी व मुस्लिमांच्या कत्तलीला तेवढाच जबाबदार असला पाहिजे. पण मग एकदाही त्या दंगल काळात वा नंतर त्या त्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख कशाला झालेला नाही? फ़ार कशाला गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षात एकही दंगल झालेली नाही. अन्यथा दोनतीन वर्षात हिंदू-मुस्लिम दंगल हा गुजरातचा परिपाठ होता. आणि प्रत्येक दंगली तेवढ्याच हिंसक होत्या. किंबहूना २००२ पेक्षा १९६९ सालातील गुजरातची दंगल अधिक भीषण होती. कारण त्यात पाच हजाराहून अधिक मुस्लिम मारले गेले होते. पण कोणा सेक्युलराला तेव्हाचा मुख्यमंत्री वा त्याचा पक्ष आठवतो का? कशाला आठवत नाही? कुठल्याही दंगलीत मुस्लिम मारले गेले; म्हणून ती जबाबदारी मुख्यमंत्र्याची असेल तर मग हे सगळे मुख्यमंत्री दोषी असल्याचे कधीच का बोलले गेले नाही? आज जे कोणी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना गुन्हेगार ठरवायला अहोरात्र कष्ट उपसत असतात, त्यांना आधी झालेल्या दंगलीतले मुख्यमंत्री निर्दोष का वाटतात? जणू २००२ च्या दंगलीत प्रत्येक मारला गेलेला मुस्लिम मोदीनेच मारलेला असावा किंवा त्यासाठी मोदीनेच कारस्थान केलेले आहे, असा दावा करणार्‍यांनी पुर्वीच्या दंगलीचे कारस्थान कोणाचे व त्यात मुख्यमंत्र्यांनी किती कर्तव्यदक्षतेने मुस्लिमांचे प्राण वाचवले होते, ते तरी सांगावे.

   हे कुणा संघवाल्याचे वा हिंदूत्ववाद्याचे प्रश्न नाहीत; तर सलीम खान नावाच्या प्रतिष्ठीत मुस्लिम लेखकाचे प्रश्न आहेत व अजून अनुत्तरित राहिलेले आहेत. कारण त्याची उत्तरे नाहीत व ती उत्तरे द्यायला गेल्यास समोर येणारे सत्य मोदी विरोधी सेक्युलर व गोबेल्स तंत्रानुसार केलेल्या खोट्या प्रचाराचे पितळ उघडे पडण्याचे भय आहे. म्हणूनच त्याची उत्तरे द्यायला कोणी पुढे आलेला नाही. बाकीच्या राज्यातले सोडून द्या. गुजरातच्या दंगलीचा इतिहास तपासायला गेल्यास त्यात मोदी वा भाजपा बाजूला पडून; त्यामागे कॉग्रेसच किती मोठा गुन्हेगार आहे, त्याचे पुरावे बाहेर येण्याचा धोका आहे. अगदी २००२ दंगलीत सुद्धा कॉग्रेसवाल्यांचा किती हात आहे, त्याचा तपशील सेक्युलर माध्यमांनी पद्धतशीर लपवलेला आहे. बडोद्याच्या बेस्ट बेकरी खटल्यात दोषी ठरलेल्यात भाजपाचा आमदार असल्याचे ढोल वाजवून सांगितले गेले. पण त्याच प्रकरणात शिक्षा भोगणारा एक आरोपी कॉग्रेसचा नगरसेवक असल्याचे सांगितले जाते काय? भाजपाची सत्ता व बहूमत गुजरातमध्ये येण्यापुर्वी होणार्‍या दंगलीत मुस्लिमांची घरेदारे व दुकान व्यापार जाळणारे लुटणारे कॉग्रेसचे नेते कार्यकर्ते नव्हते काय? त्यांना तेव्हाच्या कॉग्रेस मुख्यमंत्री व सरकारने संरक्षण दिलेले नव्हते काय? तो सगळा तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. १९६९ च्या दंगली इतिहासातील सर्वात भीषण मानल्या जातात. पण त्यात गुंतलेल्या किती लोकांवर खटले भरले गेले? त्यापैकी कोणाला शिक्षा झालेली आहे? त्याच दंगलीच्या चौकशा झाल्या व अहवाल देखील आले. त्यावर कोणती कारवाई तात्कालीन कॉग्रेस सरकार व मुख्यमंत्र्याने केलेली होती? उलट असे दिसून येईल, की स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम विरोधी दंगलीत कॉग्रेसनेच असा पुढाकार घेतला, की त्यातूनच गुजरात हिंदूत्वाकडे झुकत गेला आणि त्यातूनच भाजपाची तिथे ताकद वाढत गेली. तोंडाने सेक्युलर जपजाप करणारा कॉग्रेस इतका मुस्लिम विरोधी दंगली माजवत होता, की तिथले सरकार व प्रशासनच पक्षपाती होत गेले. मुस्लिमांच्या विरोधी प्रशासनाची मानसिकता जोपासण्याचे पाप कॉग्रेसनेच केले. म्हणूनच १९६९ वा अन्य भीषण दंगलीत हजारो मुस्लिम मारले गेले. पण त्यासाठी जवळपास कुणावरही कधी गुन्हा नोंदला गेला नाही, खटला भरला गेला नाही. थोडक्यात भाजपा सत्तेवर आला तेव्हा, किंवा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून गुजरात राज्यात दाखल झाले तेव्हा, त्यांना मिळालेले प्रशासन मुळातच मुस्लिम विरोधात कॉग्रेसने तयार करून ठेवलेले होते आणि त्याची साक्ष गुजरातच्या दंगलीचा इतिहासच देतो.

   आणि सलीम खान यांनी नेमक्या त्याच दुखण्यावर बोट ठेवलेले आहे. जो इतिहास माध्यमांनी फ़ारसा लोकांसमोर कधी आणला नाही, की जाणकार म्हणून चर्चा करणार्‍यांनी त्याचा उल्लेख करायचे पद्धतशीरपणे टाळलेले आहे. मोदींच्या विरोधात सतत बोलले जाते. पण स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये ज्या डझनभर मोठ्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या; त्यात प्रथमच कुणाला शिक्षा होऊ शकली आहे आणि ती मोदी मुख्यमंत्री असताना. अन्यथा कॉग्रेसची सत्ता असताना झालेल्या दहाबारा दंगलीत हजारो मुस्लिम मारले गेले. त्यापैकी कोणाला न्याय मिळू शकला नव्हता, हे ढळढळीत सत्य आहे. असे म्हटले की मोदी सरकारने काय केले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सुप्रिम कोर्टाने अनेक खटल्यात हस्तक्षेप केला म्हणून न्याय झाला, असेही सांगितले जाते. पण सत्य असे आहे, की सुप्रिम कोर्टाने सहा आठ खटल्यातच हस्तक्षेप केलेला आहे. त्याखेरीज साठ सत्तर खटले गुजरात सरकारच्या पुढाकाराने दाखल झाले; म्हणूनच त्यात निकाल होऊ शकला आहे. त्याचे श्रेय सुप्रिम कोर्टाला नव्हेतर मोदी सरकारला द्यावे लागेल. जे काम आजवरच्या कुणा कॉग्रेसी मुख्यमंत्र्याने कधीच केलेले नव्हते. म्हणजेच संपुर्ण देशात हिंदू-मुस्लिम दंगलीच्या संदर्भातला इतिहास तपासला, तर सर्वाधिक दंगलखोरांवर खटले भरण्यापासून त्यांना शिक्षापात्र ठरवण्याच्या बाबतीत, मुख्यमंत्री मोदी यांचाच अग्रक्रम लागू शकेल. महाराष्ट्रामध्ये दंगल झाली तेव्हा व नंतरही कॉग्रेसचेच सरकार आहे. पण १९९२-९३ च्या दंगलीसाठी किती खटले झाले व किती गुन्हेगार शिक्षापात्र ठरवण्यात इथले सेक्युलर सरकार यशस्वी होऊ शकले आहे? तुलनेने गुजरातमध्ये अनेकपटीने गुन्हेगार पकडले गेले, त्यांच्यावर खटले दाखल झाले व अधिक प्रमाणात शिक्षा ठोठावल्या गेल्या आहेत. ही आकडेवारी निघाली तर मोदींवर खोटे आरोप करणार्‍यांचे पितळ उघडे पडण्य़ाची शक्यता आहे, म्हणूनच यातला कोणी भामटा सलीमखान यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पुढे येत नाही किंवा खुलासाही देत नाही. हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा; खोटे सतत बोलत रहा आणि ठासून रेटून बोलत रहा, म्हणजे हळूहळू ते लोकांना खरे वाटू लागते, त्याचे प्रात्यक्षिक आपल्या देशाने व जगाने गेल्या दहा वर्षात गुजरात दंगली व मोदी यांच्या निमित्ताने बघितले आहे. ते खोटे आहे म्हणूनच मोदी्ना तिथली जनता पुन्हा पुन्हा निवडून देते आहे आणि मुस्लिमही मोठ्या प्रमाणात मोदींना मते देऊ लागले आहेत. पण सेक्युलर खोटेपणा संपायची चिन्हे नाहीत.
( क्रमश:)
 भाग   ( १४८ )    २१/४/१३

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

राजकपूरचा ‘जागते रहो’ चित्रपट आठवतो?   दोन माणसांना परस्परांना समजून का घेता येत नाही? एकाच विषयावर दोन माणसे बोलत असतात आणि दोघेही तावातावाने परस्पर विरोधी बाजू मांडत असतात. एकाच्या दृष्टीने अमूक एक गोष्ट साफ़ चुकीची असते आणि दुसर्‍याच्या दृष्टीने तीच बाब शंभर टक्के योग्य असते. जर दोघांना तसेच ठामपणे वाटत असेल; तर त्यांनी परस्परांशी वाद घालण्याचीच गरज नसते. कारण त्यात कोणीही तसूभर पुढे सरकण्याची शक्यता नसते. शिवाय दोघांना जर आपली मते इतकीच प्रिय असतील, तर त्यांनी वाद घालायचाच कशाला? ज्यांना कोणाला ज्याची बाजू पटेल, ते लोक त्याच्या बाजूने उभे रहातील. पटणार नाही ते दुसर्‍या बाजूला जातील. मात्र वाद घालणार्‍या दोघांना एकमेकांची बाजू समजून घ्यायची असेल; तर समान पातळीवर येऊन बोलावे लागेल. पण सहसा आपण बघतो, तेव्हा तसे होताना दिसत नाही. रोजच्या रोज विविध वाहिन्यांवर कुठल्यातरी विषयावर चर्चा असतात. पण त्यात नुसता विवाद चालतो. कुठलेही समाधान निघत नाही. याचे कारण काय असावे? तर ते भांडायलाच आलेले असतात. त्या भांडणालाच चर्चा असे नाव देतात. मग चर्चा कशाला म्हणता येईल? जेव्हा दोन्ही बाजू एका पातळीवर येऊन परस्परांना जमेल तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करतात; तेव्हाच चर्चा होऊ शकते. समजा तुम्ही कुठल्या तरी इमारतीच्या आठव्या मजल्यावर उभे आहात आणि तिथून मला काही सांगत वा समजावत आहात. पण मी तळमजल्यावर उभा असेन तर तुमचा आवाज मला फ़ारसा ऐकू येणार नाही, शब्दही कळणार नाहीत. फ़ारतर हातवारे, हावभाव माझी नजर टिपू शकते. त्यामुळे तुम्ही जे सांगत आहात, त्याचा हवा तसा अर्थ काढायला मी मोकळा असतो. तीच अवस्था तुमचीही असते. तुम्हीही माझे ऐकू शकत नसता आणि माझ्या हावभावांचा तुमच्यासाठी सोयीस्कर निघेल असा अर्थ काढत असता. मग एकूणच संवादाचा विचका होऊन जातो. मग यावर उपाय कोणता असू शकतो? समान पातळीवर यायचे म्हणजे तरी काय असते?  

   तुम्ही तरी आठ मजले उतरून खाली आले पाहिजे किंवा मी तरी आठ मजले चढून वर गेले पाहिजे. तरच आपण समान पातळीवर येऊ शकतो. पण मग कोणी आपली जागा सोडून वर किंवा खाली यायचे; असा वाद सुरू होतो. मी का म्हणून खाली उतरू? तुम्हीच पाहिजे तर आठव्या मजयावर या. असा एकाचा आग्रह असू शकतो. तर दुसर्‍याची नेमकी उलटी मागणी असते. यात दोन्ही बाजू आपल्या जागी ठाम असल्या, मग परिस्थिती वा समस्या जैसे थे रहाते. मग यावर कुठलाच उपाय नसतो का? जरूर असतो. जगात कुठल्याही प्रश्नावर उत्तर असू शकते, तर आपल्या जीवनातील साध्या साध्या विवादांवर उपाय कशाला नसेल? प्रश्न असतो, तो कोणी तरी एकाने वा दोघांनी आपापल्या ठाम भूमिका वा जागा सोडण्याचा. थोडेफ़ार लवचिक होऊन समजूतदारपणा दाखवण्याचा. म्हणजे असे, की समजा मी चार मजले चढून वर आलो आणि तुम्ही चार मजले खाली आलात; तर आपण एका पातळीवर येऊ शकतो आणि एकमेकांना स्पष्ट समजेल असे बोलू शकतो. आपल्यातला संवाद अधिक सुसह्य होऊ शकतो. निदान आपण दोघे काय बोलतो आहोत, ते शब्द परस्परांना नेमके ऐकू येऊ शकतात. अपुरे वा अस्पष्ट शब्द गैरसमज निर्माण करण्याचा धोका संपुष्टात येतो. म्हणून संवाद किंवा एकमेकांना समजून घेणे सोपे होतेच असेही नाही. आपण जे शब्द बोलत असतो व त्यामागचे नेमके हेतू असतात, ते तसेच्या तसे समोरच्याने समजून घेण्यालाही महत्व असते. अर्थात शब्द नुसते ऐकून भागत नाही; तर ज्या हेतूने त्यांचा उच्चार झाला, त्याच हेतूने ते समजून घ्यायला हवे. अन्यथा त्याचाच उफ़राटा अर्थ काढून विसंवाद वाढतो. अर्थाचा अनर्थ होऊन जातो.  

   पुर्वी ‘आवाज’ नावाचा एक लोकप्रिय दिवाळी अंक प्रसिद्ध होत असे. त्यामध्ये अनेक गफ़लत करणारी व्यंगचित्रे प्रसिद्ध केलेली असायची. म्हणजे खरे व्यंगचित्र मागल्या पानावर असायचे आणि वरच्या पानावर एक खिडकी केलेली असायची आणि त्यावर भलतेच चित्र असायचे. दोन्ही एकत्र बघितली मग तुमच्या मनात अश्लिल वा विचित्र कल्पना तयार व्हायची. पण ते खिडकीचे पान उलटले, मग खरे चित्र भलतेच सभ्य असायचे. आजकालच्या कुठल्याही वाहिनीवरल्या चर्चा बघितल्या; मग मला त्या फ़सव्या व्यंगचित्रांची आठवण होते. कारण त्याची रचना व मांडणीच मुळात दिशाभूल व फ़सगत करण्यासाठी असायची. पण वाहिन्यांवरील चर्चा या गैरसमज दूर करण्यासाठी आहेत, असे भासवले जात असते. पण त्या चर्चा ऐकल्या मग जनमानसात त्यातून जास्त गोंधळ उडवून द्यायचाच हेतू स्पष्ट होतो. तिथे संवाद किंवा चर्चेसाठी आमंत्रित केलेले पाहुणे असतात, त्यांच्यात भांडणे कशी लागतील, त्याचीच संयोजक चिंता करतो की काय; असेच वाटत रहाते. म्हणजे असे होते, की आमंत्रित आपली बाजू म्हणून काही मांडत असतो, तर त्यातला संयोजक त्याचे अर्धवट बोलणे तोडून प्रतिपक्षाला त्यावर भाष्य करायचे आमंत्रण देतो. जी बाजू मांडलीच गेलेली नाही, त्याचा विरोध करणारा मग अर्धवट बाजू ऐकूनच आपले मत मांडतो. त्यातून मग पहिला अधिकच चिडून उठतो आणि तावातावाने भांडण सुरू होते. हीच वाहिनीच्या संयोजकांची अपेक्षा असल्याचे लपून रहात नाही. मग त्यांच्या प्रेक्षकाला एक हमरातुमरीचे भांडण बघितल्या, ऐकल्याचे समाधान फ़ार तर मिळू शकते. पण मुद्दा कुठलाच हाती लागत नाही. लोकांमध्ये अधिकच गैरसमज निर्माण करायला त्यातून हातभार लावला जातो. त्याचे कारण एकच असते. की चर्चेत आमंत्रित केलेल्यांना समान पातळीवर संयोजक येऊच देत नाही. उलट त्यांच्यात गैरसमज कसे वाढतील, याची काळजी घेत असतो. परिणाम आपण बघतो, की जितका माध्यमांचा प्रसार व प्रचार वाढला आहे, तितका राजकारणातला विसंवाद वाढत गेला आहे. 

   राजकपूरचा ‘जागते रहो’ नावाचा एक खुप गाजलेला चित्रपट आहे. त्यात त्याच्या तोंडी जवळपास संवादच नाहीत. खेड्यातून शहरात आलेला एक बेघर इसम अशी त्याची व्यक्तीरेखा आहे. रात्रीच्या वेळी कुठल्याशा कारणाने पोलिस हटकतो, म्हणून तो पळतो आणि एका चाळीत शिरतो. मग तिथल्या वस्तीमध्ये तो आडोसा व लपायला इथून तिथे जात रहातो आणि त्याचे अनुभव कॅमेरा टिपत जातो, अशी एकूण एका रात्रीत घडणारी ती घटना आहे. गुण्यागोविंदाने त्या चाळीत वास्तव्य करणार्‍या रहिवाश्यांमध्ये परस्परांविषयीचे समज व पूर्वग्रह; यातून ती कथा उलगडत जाते. प्रत्येकजण संशयाने कसा दुसर्‍याकडे बघत जातो, त्यातून कथा पुढे सरकत रहाते. एका क्षणी राजकपूर एका जोडप्याच्या खोलीत लपतो. तिथे नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू होते. पत्नी रागाच्या भरात बेभान होऊन हाती लागेल ते नवर्‍याच्या अंगावर फ़ेकत असते. तिथे स्वैपाकघरात दडलेला राजकपूरच तिच्या हाती एक एक वस्तू देत असतो. पण हातात त्या वस्तू कुठून येतात; त्याचे भान तिला असतेच कुठे? मग अचानक तिला हे लक्षात येते आणि ती माघारी वळून बघते, तर तिथे अनोळखी मळक्या कपड्यातला गबाळा राजकपूर. त्याला बघून तिला चक्कर येते. कारण चाळीमद्ये चोर घुसला आहे, अशी अफ़वा असतेच. तोच हा चोर म्हणून तिला चक्कर येते. मजेशीर प्रसंग आहे. पण मुद्दा वेगळा आहे. आपण रागाच्या भरात नवर्‍यावर वस्तू फ़ेकून मारतोय, त्या कोण आपल्या हातात देतो आहे, याचे तिला भान नसते, हा त्यातला मुद्दा आहे. आपण वाहिन्यांवरील चर्चा बघतो किंवा आपली ठाम मते बनवतो, तेव्हा आपण कितीसे भानावर असतो? सत्याच्या जाणिवेपेक्षा कोणीतरी डोक्यात भरवून दिलेल्या समजूतीच्या आधारे आपण आपली कृती करत वा भूमिका घेत नसतो काय? समस्या किंवा विषयाचे कितीसे भान आपल्याला असते? वास्तवाची चाड तरी आपल्याला असते काय? 
 
   अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो, कोणीतरी आपल्याला चढवलेले असते आणि आपण त्याच्या आहारी जाऊन वाटेल तसे वागत असतो. सत्याचा शोध घेत नाही, की वास्तवाकडे डोळे उघडून बघत नाही. आणि खरेच जेव्हा सत्य आपल्याला दिसते, तेव्हा आपल्यालाच चक्रावल्यासारखे होऊन जाते. गुजरातमध्ये जाफ़रभाई सारेशवाला नावाचा एक व्यापारी आहे. त्याची नेमकी अशीच अवस्था झालेली आहे. एकेकाळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये न्याय मागायला धावलेला हाच मुस्लिम माणुस; आज मोदींचा मोठा चहाता झालेला आहे. गुजरातमध्ये २००२ सालात दंगली झाल्या तेव्हा जाफ़रभाई इंग्लंडमध्ये होते. तिथे त्यांना दंगलीच्या बातम्या कानावर पडल्या. वृत्तपत्रातून वाचायला मिळाले वा टिव्हीवरून जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचले; तेव्हा त्यांनी त्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागायचे ठरवले होते. त्याच दरम्यान केव्हातरी मोदी इंग्लंडमध्ये यायचे होते, तेव्हा त्यांना तिथे यायला बंदी घालावी किंवा अटक करून त्यांच्यावर मुस्लिम हत्याकांडासाठी खटला भरावा; असे जाफ़रभाईंना मनापासून वाटत होते. त्यासाठी त्यांनी जमवाजमव केली आणि हा सामान्य मुस्लिम गुजराती व्यापारी एका रात्रीत सेक्युलर माध्यमांच्या गळ्यातला ताईत होऊन गेला. सगळ्या माध्यमात त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जाफ़रभाईलाही आपण मुस्लिमांच्या न्यायासाठी खुप मोठा पराक्रम केल्या़चे पुण्य लाभल्यासारखे वाटत होते. पण वर्षभराने त्याला अचानक वास्तव समोर येऊन उभे ठाकले आणि त्याची अवस्था ‘जागते रहो’ चित्रपटातल्या त्या भांडणार्‍या पत्नीसारखी होऊन गेली.   ( क्रमश:)  
 भाग   ( १४७ )    २०/४/१३

गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

‘गुंगी गुडीया’ राजकीय चमत्कार घडवून गेली ना?   आता त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. चीनच्या आक्रमणाने भारताचे स्वप्नाळू पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा भ्रमनिरास झाला होता. चिनी युद्धात भारताचा पराभव झाल्यानंतर नेहरू पुरते खचले होते आणि त्यातच त्यांचा दोन वर्षांनी मृत्यू झाला. त्याआधी नेहरूनंतर कोण, अशी देशात अखंड चर्चा चालायची. म्हणजे नेहरू सोडून अन्य कोणी देशाचा नेताच होऊ शकत नाही वा देश संभाळू शकणार नाही; असे मानले जात होते. पण तशी प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा लालबहादूर शास्त्री ही इवली मुर्ती देशासमोर आली आणि त्यांनी नुसता देशच संभाळला नाही; तर चिनी आक्रमणाचा कलंकही धुवून काढला. १९६४ सालात नेहरूंनंतर पंतप्रधान झालेल्या शास्त्रींनी पाकिस्तानी आक्रमणाला इतक्या हिंमतीने तोंड दिले, की पाकिस्तानला पळता भूई थोडी झाली होती. पाकचा तेव्हाचा लष्करशहा जनरल अयुबखान याला शास्त्रीजींनी असे पाणी पाजले, की अयुबखानला पाकिस्तान सोडून पळ काढावा लागला होता. मात्र त्या नेत्याची साथ देशाला फ़ारशी लाभली नाही. त्या युद्धानंतर दोन देशात सोवियत युनियनच्या मध्यस्थीने वाटाघाटी झाल्या. त्यासाठी ताश्कंद येथे गेलेल्या शास्त्रीजींचे तिथेच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यामुळे अवघ्या दीड वर्षातच भारताला नवा पंतप्रधान शोधायची वेळ आलेली होती. नेहरू वा शास्त्री यांच्या निधनानंतर तात्काळ देशाचे हंगामी पंतप्रधान म्हणून तेव्हाच्या पंजाबचे नेते गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. दोन्ही प्रसंगी मग कॉग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक सवडीने होऊन त्यात सर्वसंमतीने नवा नेता म्हणजे पंतप्रधान निवडला गेला होता. शास्त्रीजींच्या निधनानंतर मात्र कॉग्रेसमध्ये दोन प्रवाह निर्माण झाले होते. त्यात एक नेहरूंच्या बाजूचा समाजवादी गट, तर दुसरा मवाळ किंवा भांडवलशाहीला झुकते माप देणारा गट असे म्हणता येईल. त्यांच्यात चढाओढ होती. या दुसर्‍या गटाचे म्होरकेपण मोरारजी देसाई करीत होते आणि त्यांनीच पंतप्रधान पदावर दावा केला होता. त्यामुळे अखेरीस नेतेपदाची निवडणूक झाली. डाव्या गटाने मोरारजींना शह देण्यासाठी नेहरूंची एकुलती एक कन्या इंदिरा गांधी यांनाच आपला उमेदवार बनवले आणि त्यामुळे मोरारजींचे पारडे हलके झाले. समाजवादी नसलेले, पण नेहरूंना मानणारे इंदिराजींच्या मागे गेले आणि मोरारजींचा त्या निवडणूकीत पराभव झाला. तेव्हा इंदिराजी नवख्या होत्या. त्यांना प्रशासनाचा फ़ारसा अनुभव नव्हता. 

   शास्त्रीजींच्या सरकारमध्ये इंदिराजी प्रथमच मंत्री झाल्या. अन्यथा त्यांनी पक्षातच महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्या कॉग्रेसच्या पक्षाध्यक्ष म्हणून काम करत होत्या आणि त्याच कालखंडात त्यांनी केरळात प्रथमच निवडून आलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला थेट राष्ट्रपती राजवट लादून हटवण्याचा राजकीय जुगारही खेळलेला होता. तेवढेच नाही, तर तिथे पुन्हा कम्युनिस्ट जिंकतील, म्हणून निवडणूका घेण्यापेक्षा प्रजा समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्री बनवुन त्याला बाहेरून कॉग्रेसचा पाठींबा देण्याचे डावपेचही खेळले होते. पुढे त्यांनी १९७९ सालात चरणसिंग यांनाही पंतप्रधान व्हायला बाहेरून पाठींबा दिला हे सर्वश्रूत आहे. पण त्याच्याही पुर्वी दोन दशके त्यांनी तशा डावपेचांना सुरूवात केली होती. पुढे तो प्रयोग कॉग्रेसने अनेकदा विरोधी पक्षांवर केला. गुजराल वा देवेगौडा यांच्या सरकारला पाठींबा देऊन नंतर काढून घेण्याचे डावपेच म्हणूनच नवे नाहीत. तोच प्रयोग अगदी अलिकडल्या काळात सोनियांनी गुजरातमध्ये १९९९ सालात केला होता. शंकरसिंह वाघेला यांना फ़ुटीर भाजपा गटाचे मुख्यमंत्री व्हायला पाठींबा देऊन नंतर पाडायचे डावपेच खेळले होते. तर अशा डावपेचातून राजकारण खेळत इंदिराजी खुप नंतर सत्तेच्या राजकारणात आल्या व थेट पंतप्रधान झाल्या. परंतू त्यांना शासनाचा अनुभव अजिबात नाही, असेच मानले जात होते आणि त्यांची खुलेआम टवाळी केली जात असे. आज सोनियांचे गोडवे गाणार्‍या मुलायम सिंग, लालूप्रसाद किंवा रामविलास पासवान ज्याला आपला राजकीय गुरू मानतात; ते डॉ. राममनोहर लोहिया कडवे नेहरू विरोधक मानले जायचे. इंदिराजी देशाच्या पंतप्रधान झाल्या, तेव्हा लोहिया ऐन भरातले विरोधी नेते होते. त्यांनी नवख्या इंदिराजींची कोणत्या शब्दात हेटाळणी केली असेल? कॉग्रेस अध्यक्ष के. कामराज. अतुल्य घोष, स. का पाटिल. यशवंतराव चव्हाण, चंद्रभानू गुप्ता अशा कॉग्रेसश्रेष्ठींनी मोरारजीला शह देण्यासाठी कठपुतळी पंतप्रधान निवडला, असे लोहियांसह अनेक जाणत्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी इंदिराजींना तेव्हा ‘गुंगी गुडीया’ असे टोपणनाव दिलेले होते.

   कुठलाही नवा नेता उदयास येतो तेव्हा त्याच्याकडे लोकांची व जाणकारांची बघण्याची नजर किती भिन्न असते, त्याचा हा नमूना आहे. त्यामुळेच इंदिराजी पंतप्रधान झाल्या, तेव्हा त्यांचीही अशी हेटाळणी झालेली होती. कारण प्रशासनातला अनुभव त्यांच्या गाठीशी खुपच नगण्य होता. पण पुढल्या अठरा वर्षात त्यांनी नेहरू व कॉग्रेसच्या दिग्गजांना विसरून जाण्याची पा्ळी भारतियांवर आणली. पक्षातील बेबनाव आणि पक्षाची जनमानसातील घसरलेली लोकप्रियता; अशा स्थितीत इंदिराजी देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या आणि त्याचे प्रतिबिंब दोनच वर्षात झालेल्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालात पडले होते. तेव्हा बहुतेक राज्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हायच्या. नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता म्हणजे बहूमत गमावले आणि संसदेतही प्रथमच कॉग्रेसला काठवरचे बहूमत प्राप्त झाले. त्यामुळेच सत्ता टिकवण्याबरोबरच पक्षाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी काही धाडसी हालचाली करणे इंदिरा गांधी यांना भाग झाले होते. त्यांनी बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण, कमाल जमीन धारणा कायदा व संस्थानिकांचे तनखे खालसा करण्याचे निर्णय घेतले. त्यात आडवे येणार्‍या कॉग्रेसच्या मोरारजी देसाई यासारख्या नेत्यांना जुमानले नाही व कॉग्रेस पक्षात फ़ुट पडली. पण त्यांच्या त्या निर्णयाला समाजवाद समजून डाव्यांनी स्वागत केले व अल्पमतात असूनही इंदिराजी सरकार चालवू शकल्या. एकीकडे त्यांच्या पक्षातच त्यांच्या विरोधात वादळ उठलेले होते, तर दुसरीकडे देशात अनेक राज्यात विरोधी आघाड्यांच्या सरकारांनी कारभाराचा बट्ट्याबोळ उडवला होता. राजकीय अस्थिरता सार्वत्रिक विषय बनला होता. निर्नायकी म्हणतात, तशी अवस्था निर्माण झाली होती. लोकांना राजकीय स्थैर्य महत्वाचे वाटते, त्याचाच विसर बिगर कॉग्रेसी पक्षांना पडला होता. त्यामुळे अशा बेतालपणाला कंटाळून गेलेल्या जनतेला कुणीतरी कठोर निर्णय घेऊन राबवणारा हुकूमशहा हवासा वाटू लागला होता. जो अशा लोकशाही नामक बेताल बेछूटपणाला वेसण घालून जनजीवनाला शिस्त लावू शकेल, असा कुणीतरी लोक शोधत होते व जनहितासाठी आपण कठोर निर्णय घेऊन राबवू शकतो, असे चित्र इंदिरा गांधी यांनी मोजक्या निर्णयातून उभे केले. त्यांनी पक्षातल्या मुजोर नेत्यांना धुडकावून लावले आणि दुसरीकडे लोकहितासाठी धाडसी निर्णय अंमलात आणले. बस्स, तेवढ्याने त्यांची व्यक्तीगत प्रतिमा इतकी उंचावली, की लोकांनी इंदिराजी म्हणतील त्याला मत देण्याचा कल दाखवला. 

   लोकशाही हा आवडता विषय असला तरी सामान्य माणसासाठी त्याच्या नित्यजीवनातील स्थैर्य अधिक प्राधान्याचा विषय असतो. ज्या स्थितीत चार दशकांपुर्वी आपला देश व जनजीवन भरकटलेले होते, तशीच आजची स्थिती आलेली आहे. आज देशातली जनता व तमाम राजकीय पक्षांचे नेतृत्व यांच्यात नेमकी तशीच दरी निर्माण झालेली आहे. जनभावना व त्यांच्या समस्या; यापासून नेते इतके दुरावले आहेत, की त्यांच्यावर विसंबून जगण्याची लोकांनाच भिती वाटू लागली आहे. त्यामुळेच यातून आपल्याला कोण सोडवू शकेल, असा नेता किंबहूना हुकूमशहा लोक शोधू लागले आहेत. त्यातूनच मग एकूण देशाचे राजकारण व्यक्तीकेंद्री होत चालले आहे. गुजरातमध्ये मोदी सत्तेमध्ये येण्यापुर्वी कॉग्रेस वा भाजपा यांच्यात नेत्यांमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी लठ्ठालठ्ठी चालू होती. नेते अधिक आणि अधिकारपद एक, असा घोळ होता. आज बारा वर्षात गुजरातमध्ये तसा वाद राहिलेला नाही आणि एकहाती कारभार चालू आहे व स्थीर सरकार लोकांना मिळालेले आहे. नेमके हेच चार दशकांपुर्वी इंदिराजींनी लोकांना देऊ केले व दुबळा कॉग्रेस पक्ष असताना लोकांनी इंदिराजी म्हणतील त्याला लोकांनी मते दिली होती. ती कॉग्रेसला नव्हेतर इंदिराजींना मते दिली होती आणि इंदिराजी म्हणजे त्यांना एकहाती सत्ता राबवता यायला हवी; अशी मते लोकांनी दिली होती. जेव्हा व्यक्तीकेंद्री राजकारण वा लोकभावना निर्माण होते, तेव्हा पक्ष व त्याच्या संघटनात्मक रुपाला किंवा आजवरच्या पुण्याईला अर्थ उरत नाही. म्होरकेपदी कुठली व्यक्ती आहे, त्यानुसार पक्षाला लोक प्रतिसाद देत असतात. विस्कटलेल्या व अराजकाच्या स्थितीत सापडलेल्या जनतेला, त्यापासून मुक्तता देणारा नेता हवा असतो, त्याचा पक्ष दुय्यम असतो. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाला कितीशी मते मिळू शकतात वा त्याची कुठल्या राज्यातली ताकद किती आहे; याला महत्व राहिलेले नाही. तेव्हा इंदिराजींना ‘गुंगी गुडीया’ म्हणणारेही खुप मोठे राजकीय जाणकार होते आणि आज मोदींची हेटाळणी करणारेही तितकेच शहाणे अभ्यासक आहेत. म्हणून परिणाम बदलणार आहेत का?     ( क्रमश:)  
 भाग   ( १४६ )    १९/४/१३