सोमवार, १ एप्रिल, २०१३

पाणीपुरवठय़ाचा साठाच विषारी असेल तर?


१९९६ सालातील गोष्ट आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे अवघे तेरा दिवस टिकलेले सरकार अविश्वासाच्या किंवा विश्वासाच्या प्रस्तावाला सामोरे जात होते. त्यांच्यापाशी लोकसभेतील बहुमत नसले तरी भाजप लोकसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. त्यानंतर बाकीच्या परस्पर विरोधी पक्षांना आपण सेक्युलर पक्ष असल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी एकत्रितपणे भाजपा सरकारच्या विरोधाचा पवित्रा घेतला होता. साहजिकच वाजपेयी सरकार म्हणजे देशातील मुस्लिमांना कशी अन्याय वागणूक मिळणार, याचे ठरावावरील चर्चेत विवेचन चालू होते. त्यात संयुक्त जनता दलाचे (तेव्हाच्या समता पक्षाचे) नेते जॉर्ज फर्नाडीस यांचे भाषण चालू झाल्यावर त्यांच्याच जुन्या सेक्युलर सहकार्‍यांनी त्यात शेकडो अडथळे आणायचा उद्योग केला. कारण या सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षामधले नेते व त्यांची धोरणेच कशी मुस्लिम विरोधातली आहेत, त्याचे दाखले फर्नाडिस देत होत. ते जन्माने ख्रिश्चन असल्याने कोणी त्यांच्यावर हिंदुत्वाचा आरोप करू शकत नव्हता, ही अडचण होती. शिवाय, फर्नाडीस प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशीच बोलत होते.

१९७१ च्या भारत-पाक युद्ध काळात मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या खात्यातून मुस्लिम कामगारांची उचलबांगडी कशी करण्यात आली व त्यासंबंधीचे आदेश कसे थेट दिल्लीतल्या इंदिरा सरकारकडून आलेले होते, त्याचा पाढा फर्नाडिस वाचत होते. मग हे सत्य ज्या सेक्युलर लोकांना पचवता येत नव्हते ते त्या भाषणात गोंधळ घालणारच ना? असो, तोही मुद्दा नाही पण घटना महत्त्वाची आहे. देशावर संकट येते तेव्हा काय धोके असतात आणि कसे संभवतात ते यातून लक्षात येते. जिथे करोडोची लोकसंख्या आहे तिच्याशी थेट जोडलेल्या यंत्रणेवर हल्ला केल्यास विनाविलंब त्यांना बाधा करता येते म्हणून तलावक्षेत्रात विषप्रयोगाचा धोका असतो. तुमच्या घरापर्यंत येणार्‍या पाण्यातच विष मिसळले की तुम्हाला विनासायास सर्वाधिक बाधा करता येत असते. म्हणूनच पाणीपुरवठय़ाच्या कामात खूप सावध रहावे लागते. भेसळ टाळायची असते.

आजच्या धावपळीच्या युगात माहितीच्या क्षेत्राचे असेच आहे. प्रसार व प्रचार माध्यमांनी मानवी जीवन इतके व्यापले आहे की, थेट संपर्कातून लक्षावधी लोकांच्या बुद्धी व विचारशक्तीवर त्यातून चटकन प्रभाव पाडता येत असतो. मुंबईसारख्या शहरातल्या करोडो लोकांच्या आरोग्यावर जसा तलावांच्या नियंत्रणातून प्रभाव पाडता येतो. तसाच प्रसिद्धीच्या व्यापक साधनांवरील नियंत्रणाने नागरिकांच्या भावभावनांशी खेळता येत असते. जिथून तुम्हाला माहिती मिळणार असते तीच भेसळ केलेली, भ्रष्ट असेल तर तुमचा विचारही आपोआपच भ्रष्ट होऊन जातो. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, शिष्टाचार, सभ्यता अशा मूलभूत कल्पनांच्या माध्यमातूनच बोजवारा उडवला मग चांगले काय, वाईट काय याबद्दल जनमानसाचा गोंधळ उडत असतो. आणि म्हणूनच पत्रकारिता वा माध्यमे निर्भेळ व शुद्ध असायला हवीत. आज ती राहिलेली नाहीत.

पत्रकारिता, प्रसारमाध्यमे यातून लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी गोंधळ माजवता यावा म्हणूनच आज त्यात प्रचंड गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्याला छेद देऊन कोणी लोकांपुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न करील तर त्याची दमछाक होईल इतके त्याला दमवले जात असते. त्याकरिता अधिक पानांची, रंगीत छपाईची व कमी किमतीची वृत्तपत्रे बाजारात आणलेली आहेत. किंमत कमी पाने अधिक या मोहात वाचकाला अडकवून खप मिळवण्यात आला आहे. ज्याला सत्य सांगायचे आहे आणि उधळायला पैसा नाही, तो उत्पादनाच्या खर्चानुसार अधिक किंमत मागू लागला म्हणजे वाचक स्वस्त किमतीचे वृत्तपत्र घेणार. आपोआप भांडवली वृत्तपत्रे शिरजोर आणि व्रतस्थ वृत्तपत्रे दुबळी होत जातात. आज तेच झाले आहे. पैसा ओतण्याची उधळण्याची क्षमता असलेल्यांचीच चलती आहे. मात्र, त्यात सत्यकथनाचा बळी पडला आहे.ज्या माध्यमातून स्पेक्ट्रम घोटाळय़ाच्या बातम्या येतात त्यातल्याच तीन दिग्गज पत्रकारांनी हा घोटाळा करणार्‍या ए. राजाला दूरसंचार मंत्रालय मिळवण्यासाठी लुडबूड केलेली होती. शिफारशी, वशिलेबाजी केली होती. राजा तुरुंगात पडला आहे, पण बरखा दत्त, प्रभू चावला व वीर संघवी प्रतिष्ठीत म्हणून उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. त्यांना शब्दाचाही जाब न विचारणार्‍या पत्रकारांकडून जनतेपर्यंत सत्य पोहोचू शकते काय? आणि भेसळयुक्त माहिती व बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतील तर ती जनता योग्य मत बनवू शकेल काय? आज माध्यमे तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवत नाहीत. तर ज्या प्रकारचे तुमचे मत बनवावे, असे त्या माध्यमांच्या आश्रयदात्यांना वाटत असते. त्याला पुरकच तेवढी माहिती तुमच्यापर्यंत आणली जाते. याच्या उलट त्याला बाधक असेल ती माहिती तुमच्यापासून लपवली जाते. म्हणूनच भ्रष्टाचार असा राजरोस शिरजोर झालेला दिसत असतो. आणि त्यातूनही तुम्ही सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू लागतात तर त्यापासून परावृत्त करायला आणखी भेसळयुक्त माहितीचा महापूर निर्माण केला जात असतो.

एका वृत्तपत्राच्या कचेरीत पाचपन्नास लोकांनी घुसून मोडतोड केली तर जणू भारतावर पाकिस्तानने हल्ल्या केल्यासारखा गदारोळ उठवला जातो. त्यातून जनमानसात हल्लेखोरांविषयी चीड निर्माण व्हावी असे चिथावणीखोर लिहिले, बोलले जाते. परंतु कसाबसारखे जिहादी स्फोट करतात, निष्पापांचे मुडदे पाडतात तेव्हा काय होते? सामान्य जनतेमध्ये जी उत्स्फूर्त संतापाची भावना उफाळून येते ती विझवायला सर्व माध्यमे कामाला लागतात. हा काय प्रकार आहे? ज्या हल्ल्यामुळे सर्व समाज जखमी होतो, रक्तबंबाळ होतो तेव्हा प्रक्षोभ कामाचा नाही सांगणारे, त्यांच्यावर नगण्य हल्ला झाल्यावर संयमाचा उपदेश विसरतात कसे? हा दुटप्पीपणा नाही काय?

एका बाजूला असुरक्षित असलो तरी सोशिकता हेच आपले महात्म्य असल्याचे सांगायचे. दुसरीकडे उलटे बोलायचे, ही निव्वळ भोंदूगिरी नाही. ती शुद्ध बदमाशी असते. लोकांना मूर्ख बनवायचा उद्योग असतो. तो बिनबोभाट करायचा म्हणून आधी माध्यमांना भ्रष्ट करण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईत अंगावर येणारी पहिली तुकडी झालेली आहे. शत्रूच्या गोटात गोंधळ माजवल्यास कमी प्रयत्नात त्याचा पाडाव करता येत असतो. माध्यमे तेच काम भ्रष्टाचार्‍यांसाठी आज करत आहेत. त्यामुळेच मग पराचा कावळा व राईचा पर्वत केला जात असतो.

तुमच्यापर्यंत येणारी आणि खरी वाटण्याइतकी खोटी माहिती असेल तर केवढे नुकसान संभवते त्याची अनेक उदाहरणे इतिहासाने नोंदवून ठेवली आहेत. सतत खोटे माथी मारल्यास लोकांना तेच खरे वाटू लागते, असे हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा. आजच्या भ्रष्ट व्यवस्थेने माध्यमांना त्यासाठीच आपल्या नियंत्रणाखाली आणलेले आहे. म्हणूनच ज्यांना भ्रष्टाचार विरोधी लढायचे आहे त्यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांवरच अवलंबून राहता काम नये, तर लोकांपर्यंत पोहोचण्याचे पर्यायी मार्ग शोधायला पाहिजेत. भ्रष्टाचारावर अखंड गदारोळ करणार्‍या प्रसार माध्यमांमधले हे भ्रष्टाचारी वर्चस्व चक्रावून सोडणारे आहे ना? (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा