गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

फ़ुले आंबेडकरांची चळवळ काय शिकवते?




   चळवळ असा एक शब्द आपण अनेकांच्या तोंडून नेहमी ऐकत असतो. कधी ती स्त्रीमुक्तीची वा सामाजिक परिवर्तनाची; तर कधी युवक वा विद्यार्थी चळवळ असते. पण चळवळ म्हणजे तरी नेमके काय असते? प्रस्थापित जी व्यवस्था आहे, त्यात समाधानी नसलेल्या लोकांच्या समुहाने आपल्या असमाधानाबद्दल उठवलेला अवाज म्हणजे चळवळ. आपण जे आपल्या वाट्याला येते आहे वा यायला हवे असूनही येत नाही; त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयास म्हणजे चळवळ असते. सहाजिकच त्यात सहसा अन्यायपिडीत लोकच सहभागी होत असतात वा ज्यांना त्या पिडीतांविषयी कळवळा असतो, त्यांचा त्यात सहभाग असतो. म्हणूनच चळवळीचे प्राधान्य नेहमी ज्याच्या वाट्याला अन्याय, अत्याचार वा असमाधान आले, त्या बाजूला चळवळीचा कल असावा लागतो. त्यात सहभागी झालेल्याकडून कुठल्याही स्वरूपाचा अन्याय अत्याचार होऊ नये याकडे भर असावा लागतो. मग त्या चळवळीत सहभागी झालेल्यांना प्रथम याची काळजी घ्यावी लागते, की त्यांच्यावरच अन्यायाचा आरोप होता कामा नये. दुर्दैवाने चळवळीत वावरणार्‍या व मिरवणार्‍यांना आजकाल त्याचाच विसर पडला आहे. त्यातले नेते वा म्होरके स्वत:च चळवळीला एक प्रस्थापित व्यवस्था असल्याप्रमाणे वागवू लागले आहेत. त्यातूनच मग लक्ष्मण माने यांच्यासारखी संशयास्पद प्रकरणे चव्हाट्यावर येतात. अशा बाबतीतले सगळेच आरोप डोळे झाकून खरे मानायचे कारण नाही. पण असे आरोप खोटे सिद्ध करण्याचा केवळ कायदेशीर मार्ग चोखाळता येत नाही. अगदी त्यामागे कुठले कुभांड वा कारस्थान असले; तरी केवळ कायदेशीर मार्गानेच त्याचा निचरा होऊ शकत नाही. किंबहूना कायदेशीर मार्गाचा आडोसा घेऊन केलेले युक्तीवाद प्रस्थापिताला शोभणारे असतात. कारण साक्षीपुरावे अशा मार्गने कुठलाही गुन्हेगार जातच असतो. त्यातून कोणाचीच सुटका नसते. तुम्ही सामान्य माणूस असा किंवा चळवळीतले नेता वा गुन्हेगार असा. जेव्हा पोलिस वा कायदा तुमच्यावर कारवाई करू लागतो; तेव्हा त्याची सर्वांना समान वागणूक असायचा दंडक आहे. म्हणूनच अन्य सामान्य माणसे वा गुन्हेगार यापेक्षा आपण वेगळे व निर्विवाद आहोत; हे दाखवण्याची खास जबाबदारी चळवळीत सहभागी असलेल्या व्यक्तीवर येत असते. तशी कायद्याची सक्ती नसते. पण चळवळीच्या पावित्र्याची सत्वपरिक्षा म्हणून तो मार्ग चळवळीतल्या लोकांना घ्यावा लागत असतो. कारण तेही चळवळीतले एक महत्वपुर्ण कार्य असते. चळवळीचे सर्वात मोठे भांडवल तिचे पावित्र्य व सच्चेपणा हेच असते. त्यामुळेच आरोप झाले, मग त्याला थेट सामोरे जाऊन आपला सच्चेपणा सिद्ध करायची अपुर्व संधी आरोपांमुळे मिळत असते. त्याला थेट सामोरे जाण्यातून तुमच्या सच्चेपणाची पहिली साक्ष तुम्हीच लोकांना देत असता.

   चळवळीतल्या लोकांचा दावा ते लोककल्याण साधण्यासाठी झटत असल्याचा असतो. त्यामुळेच त्यांच्या वागण्यातून तो साधेपणा व कृती दिसणे अगत्याचे असते. जेव्हा असा कुठलाही गंभीर आरोप होतो, तेव्हा त्याला सामोरे जाऊन तो खोटा पाडणे, हे अग्नीदिव्यच असते. पण अशा दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्याने तुमच्या कार्याची व चळवळीची झळाळी अधिक तेजस्वी होत असते, हे विसरता कामा नये. सतत इतरांवर अन्याय होतो म्हणून अन्यायकर्ता वर्गाच्या विरोधात आवाज उठवणारा कार्यकर्ता तरी काय करत असतो? जे कोणी गरीब, पिडीत अन्याय निमूट अन्याय सहन करत असतात, त्यांना अन्यायाची जाणीव निर्माण करून त्याच्या विरोधात संघर्षाला उभे रहायची चिथावणीच देत असतो ना? तसा कोणी चालना, प्रोत्साहन व प्रेरणा देणारा नसेल; तर असे पिडीत ग्रासलेले लोक कधी अन्यायाच्या विरुद्ध उभे राहू शकतील काय? ते निमूट आपले नशीबच तसे अशी समजूत करून घेतात व बिनतक्रार अन्याय अत्याचार सहन करीत जगतात. त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाहीत, की संघर्ष करीत नाहीत. कर्मभोग व नशीब अशा कालबाह्य समजूतीने वा अनुभवाने त्यांची अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्तीच निश्क्रिय व निष्प्रभ झालेली असते. आणि हे केवळ दलित मागासांपुरतेच सत्य नाही. आजच्या पुढारलेल्या समाजातही अशी हतबलता आपण बघत असतो. लाचखोरी म्हणजे काय असते? काम अडवून पैसे काढणारा वा धमक्या देऊन खंडणी उकळणारा असतो, त्याच्याशी दोन हात करण्याची कुवत नसते; म्हणून लोक निमूट अन्याय सहन करीत नाहीत काय? आपल्याला कोणी मदतीचा हात देणार नाही आणि लढायला गेलो तर जीवावर बेतले तर कोणी वाचवायला धावणार नाही, अशी स्थिती लोकांची नाही काय? मग त्याच्याविरोधात लोकांना संघटीत करून आवाज उठवायला जे पुढे सरसावतात; त्यांना चिथावणीखोर म्हणायचे, की चळवळकर्ते म्हणायचे? दुबळ्यांना लढायची हिंमत देणे व त्यांच्यात तसे धाडस निर्माण करण्यालाच चळवळ म्हणतात, ती हिंमत निर्माण होत नाही व त्यावर पुढे सरसावून दोन हात करायचा निर्धार होत नाही, तोवर कोणी मुळात अन्यायाच्या विरोधात तक्रारच करायला पुढे येत नाही. म्हणूनच अशा पिडीत अन्यायग्रस्तांना संघर्षाला प्रवृत्त करणे व अन्यायाविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण करणे हे कारस्थान नसते, तर तीच चळवळ असते.

   लक्ष्मण माने प्रकरणात त्यांच्यासकट त्यांच्या अन्य जुन्या नव्या सहकार्‍यांची निवेदने बघितली व ऐकली तर त्याचेच आश्चर्य वाटते. बाबा आढाव यांचे सर्व आयुष्य चळवळीत गेलेले आहे आणि त्यांच्यासारखा माणूस चळवळीची हानी होऊ नये, असा पवित्रा घेऊन त्या तक्रारींकडे बघतो, तेव्हा म्हणूनच मोठे नवल वाटते. सर्व हयात चळवळीत घालवल्यावर बाबांना मुळात चळवळ या शब्दाचा हेतू व आशय तरी कळला आहे काय; याचीच शंका येते. आपल्या आरोपीत सहकार्‍याला वाचवण्यासाठी त्यांना पिडीत महिलांचा टाहो शंकास्पद वाटावा आणि अशा आरोपांमागे कारस्थान भासावे, ही चमत्कारिक बाब नाही काय? यात शंकाच नाही, की कोणीतरी ठामपणे पाठीशी उभा राहिल्यावरच त्या महिला इतक्या उशीरा तक्रार द्यायला पुढे आलेल्या आहेत. मग त्यांना अशी हिंमत देणारा बोलविता धनी कोणीही असो, त्याला खरा चळवळकर्ता म्हणायला हवे. कारण त्याने निमूट बिनतक्रार अन्याय सोसणार्‍या महिलांना लढायची प्रेरणा दिलेली आहे. आणि त्याची पाठ थोपटण्याऐवजी जुनेजाणते त्याच कोणा अज्ञात व्यक्तीला कारस्थानी म्हणतात, हे नवल नाही? खरेतर ज्याने कोणी अशा चिथावण्या दिल्या व त्या महिलांना तक्रार देण्यापर्यंत हिंमत दिली; त्यानेही माने यांच्याप्रमाणेच तोंड लपवून बसायचे काय कारण आहे? खरेच कोणी अशी चिथावणी देऊन त्या महिलांना पोलिसांपर्यंत जायला प्रवृत्त केले असेल, तर ते पाप नसून तीच चळवळ आहे, त्याने तोंड लपवून अज्ञात रहायची गरज नाही. छातीठोकपणे समोर येऊन त्याने आपणच हे काम केल्याचे अभिमानाने सांगावे. अशा कुठल्याही व कितीही जुन्या अन्यायाला वाचा फ़ोडण्यातून महात्मा जोतिबा फ़ुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तनाच्या चळवळीचा पाया घातलेला आहे. त्यांच्याकडे लोक आदराने बघतात आणि बघितलेच पाहिजे. कारण अन्यायाची जाणीव समाजात निर्माण करणे व त्याच्या विरोधात संघर्षाला उभे रहाण्याची हिंमत जोपासणे; हे चळवळीतले प्राथमिक पवित्र असे कार्य आहे. दुर्दैव असे, की इथे ज्याने हे काम केले, तोही अज्ञातवासात राहिलेला आहे.

   त्यामुळे खर्‍या परिवर्तनाच्या कार्यावर कारस्थान वा कुभांड अशी चिखलफ़ेक होत आहे. वास्तवात चळवळीच्या मुखवट्यात चाललेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फ़ोडणे हे मोठे कार्य आहे. आणि म्हणूनच लक्ष्मण माने यांच्या समर्थक पाठीराख्यांनी अशा आरोपाचे अग्नीदिव्य करण्यासाठी माने यांना हिंमत दिली पाहिजे. याचे कारण असे, की समजा हे आरोप पुर्णत: खोटेच असतील तर त्यालाही सामोरे जाण्याने माने व चळवळीचे सामर्थ्यच सिद्ध झाले असते. पण ती संधी आढावांपासून माने यांच्यापर्यंत सर्वांनी गमावली आहे. कारण त्यातला प्रत्येकजण महिलांपेक्षा माने व त्याच्यामुळे चळवळीची प्रतिष्ठा धुळीला मिळणार म्हणून दबून गप्प बसला. ज्या कारणास्तव आज हे माने समर्थक वा चळवळीचा नामजप करणारे गप्प आहेत, नेमक्या त्याच कारणाने त्या वा तत्सम महिला अन्याय सोसून गप्प असतात. ते कारण म्हणजे प्रतिष्ठा व इज्जतीचे खोटे थोतांड. ज्यावर आरोप होऊ शकतात, त्या संस्था किंवा चळवळीच्या कुठल्या प्रतिष्ठेला बाबा आढाव वगैरे मंडळी जपू बघत आहेत? परिवर्तनाच्या व सामाजिक न्यायाच्या चळवळीतच अन्याय अत्याचार होण्याची तक्रारच इज्जतीला काळीमा फ़ासून गेली नाही काय? तिची काळजी घेण्यापेक्षा कारस्थानाचे आरोप तथाकथित मनूवादी वृत्तीचेच उदगार नाहीत काय? जेव्हा फ़ुले आंबेडकरांसारख्या महात्म्यांनी सामाजिक विषमता व अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला; तेव्हा त्यांच्यावर धर्म बुडवण्याचे पाप व कारस्थान केल्याचे आरोप तात्कालीन धर्ममार्तंडांनी केलेले नव्हते काय? समाजाला धर्माच्या विरुद्ध चिथावण्या दिल्याचे त्यांच्यावरचे आरोप आणि आज त्या महिलांना चिथावण्या दिल्याचे आरोप, यात नेमका कितीसा गुणात्मक फ़रक आहे? आणि असे करणार्‍या व आक्षेप घेणार्‍यांना चळवळीचे महात्म्य तरी कितीसे कळले आहे? त्याच धर्ममार्तंडांच्या आवेशात हे पुरोगामी व माने समर्थक चळवळीची चिंता करताना दिसत नाहीत काय? मग ही परिवर्तनाची चळवळ आहे की पुराणमतवादी प्रतिगामी चळवळ आहे?     ( क्रमश:)
 भाग   ( १३९ )    १२/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा