सोमवार, २९ एप्रिल, २०१३

पॅलेस्टाईनचा निर्वासित आणि गुजरातच दंगलपिडीत





   मोजके शब्द पण त्याचा विपरित अर्थ निघेल अशी रचना असली; मग किती गोंधळ उडवता येतो, त्याचा नमूना मी कालच्या लेखातून पेश केला. आणि नेमकी हीच गोष्ट गुजरातच्या दंगलीच्या बाबतीत झाली आहे. जे घडले त्याच्या नेमक्या उलट्या बाजूने लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमे यशस्वी होऊन गेली. पण म्हणतात ना? तुम्ही काही लोकांना सर्वकाळ फ़सवू शकता. सर्वांना काही काळ फ़सवू शकता. पण सर्वकाळ सर्वांना फ़सवू शकत नाही. गुजरात दंगली व नरेंद्र मोदींच्या बाबतीत आता तेच घडू लागले आहे. सतत सातत्याने पसरवलेल्या खोट्याचा मुखवटा फ़ाटत चालला आहे. सत्य क्रमाक्रमाने लोकांसमोर येत चालले आहे. आणि सत्य इतके भीषण आहे, की ज्याला सैतान म्हणून लोकांसमोर पेश केला; तोच लोकांना आवडू लागला आहे. त्याचे कारण खोटे बोलणार्‍या व पसरवणार्‍यांनी अतिरेक करायचा नसतो, याचा सेक्युलर मंडळींना विसर पडला होता आणि आता उघडे पडायची वेळ आल्यावर आपणच विणलेल्या जाळ्यातून कसे बाहेर पडावे, त्याचा मार्ग त्यांना सुचेनासा झाला आहे.

   गडबड कशी होते? तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी खोटे बोलत असता आणि खोटे बोलता, तेव्हा ते लक्षात पक्के ठेवावे लागते. उलट सत्य बोलत असता, तेव्हा लक्षात ठेवावे लागत नाही. अगदी झोपेतून उठवले, तरी तुमच्या तोंडून सत्य चटकन अनवधानानेही बाहेर पडते. पण खोट्याचे तसे नसते. अनवधानाने खोटे बोलता येत नाही. त्यामुळेच गुजरातविषयी जो खोटा प्रचार झाला, तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा झाला. त्यात विरोधाभास होते आणि जेव्हा अशा थापा ऐकणारे वेगवेगळे लोक एकमेकांना भेटू लागले; तेव्हा त्यांनी ऐकलेल्या गोष्टी व तपशीलात फ़रक दिसू व जाणवू लागले. त्यातून काही मंडळी सत्याचा शोध घेऊ लागली आणि तसतसा सेक्युलर अपप्रचारातला खोटेपणा उघडा पडत गेला. आरंभीच्या खोटेपणात फ़सलेले अनेक लोक सत्य गवसल्यावर अधिक सत्य शोधून इतरांना समजावण्यात अगत्याने सहभागी होत गेले. त्यामुळे दहा वर्षांनंतर गुजरातच्या दंगलीचे सत्य समोर येऊ लागले आहे. जाफ़रभाई सरेशवाला त्यापैकी एक आहे, पण त्याच्याखेरीज मोदींविषयी सतत जहर ओकणारा चित्रपट निर्माता महेश भट्ट याचीही साक्ष धक्कादायक होऊ शकते. बेस्ट बेकरीची एकमेव साक्षीदार जाहिरा शेख हिने तीस्ताच्या खोटेपणाचा पर्दाफ़ाश केलेलाच आहे. पण त्याही प्रकरणात तीस्ताचा उजवा हात असलेला व अशा शेकडो दंगलपिडीतांना तीस्ताकडे न्यायासाठी घेऊन गेलेला रईसखान पठाणही; सत्याला सामोरा गेलेला आहे. अनेक अंगांनी सत्य समोर येत आहे. पण मी त्यांच्यापेक्षा जाफ़रभाईचा साक्षात्कार मोलाचा मानतो, कारण त्याने या विषयात खोल अभ्यास व तपशील समोर आणलेले आहेत. म्हणूनच मला त्याच्यातला बदल मोलाचा वाटतो.

   गुजरात फ़ेब्रुवारी २००२ मध्ये पेटला तेव्हा जाफ़रभाई दूर इंग्लंडमध्ये होता आणि ज्या बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचल्या; त्याने तो विचलित झाला होता. पण जेव्हा त्याला नुसती तात्विक लढत व त्यात मुस्लिमांचे पिढ्यानुपिढ्या होणारे हाल यांची तुलना करावीशी वाटली; तिथून त्याने नवा विचार सुरू केला. मोदी किंवा जे कोणी अशा दंगलीला जबाबदार असतील, त्यांना कोर्टात खेचणे व शिक्षा देण्यापर्यंत घेऊन जाणे व्हायलाच हवे. पण तोपर्यंत दंगलीत उध्वस्त झालेले जे हजारो मुस्लिमांचे संसार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? मोजक्या बड्या राजकीय नेत्यांना खटल्यात गोवण्याने मुद्दा गाजतो, पण शेकडो लोक त्यात उध्वस्त झालेत, त्यांना न्याय मिळण्याचे काय? खटले लांबवत नेण्यातून काय साधले जाते; असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारताना जाफ़रभाईला एक पर्याय असा दिसला, की प्रत्येक न्याय हा कोर्टातच व्हायला हवा काय? आणि न्याय गुजरातच्या मुस्लिमांना मिळायला हवा असेल, तर तो त्यांनी स्वत: का मागायचा? गुजरात सरकार त्यांचे प्रतिनिधी आहे, तर सरकारने तो न्याय देण्यासाठी काही करायला नको काय? भले मोदीवर आरोप होत असतील. पण मुख्यमंत्री म्हणून आपल्याच मुस्लिम नागरिकांना, दंगलपिडीत असतील तर न्याय देणे ही मोदींची जबाबदारी नाही काय? हजारो दंगलपिडीत मुस्लिमांना कोर्टात जाणे शक्य नाही व स्वयंसेवी संस्था त्या प्रत्येकाचा खटला लढवू शकत नाहीत. मग त्यांच्या न्यायाचे काय? सरकारनेच ती जबाबदारी उचलायला हवी ना? म्हणजे पुन्हा मोदीनीच ते काम करायला हवे. पण ते व्हायचे कसे? मग न्यायासाठी मोदीलाच जाब का नाही विचारायचा? पण कसा विचारणार? जाफ़रभाईची मोदींशी ओळख नव्हती, की संपर्क नव्हता. पण असे करणे कितपत योग्य होते? जाफ़रभाई पक्का धर्मनिष्ठ होता व आहे. म्हणूनच आपला धर्म त्याबाबतीत काय सांगतो, त्याची माहिती घेण्याचा त्याने प्रयास केला. मोदी आपला व मुस्लिमांचा शत्रू असेल, तर त्याच्याशी संवाद करावा काय? तो धर्मद्रोह होईल काय? अशा प्रश्नांनी गडबडून गेलेल्या जाफ़रभाईने मग काही मौलानांशी चर्चा केली. त्याचेही कारण होते.

   त्याच दरम्यान पॅलेस्टाईन व इस्त्रायल यांच्यात अध्यक्ष बुश यांच्या पुढाकाराने वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. पाच दशके ज्यांनी एकमेकांवर रॉकेटने हल्ले केले, घातपात केले, हजारो माणसे मारली गेली आणि लाखो निर्वासित शिबीरात खितपत पडले आहेत, त्यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. त्यांचे निर्वासित छावण्यातील जीवन जाफ़रभाईने बघितले होते. मुंबईच्या कुठल्याही झोपडपट्टीतील बकाल वस्तीपेक्षा नरकवासाचे जीवन पॅलेस्टायनी निर्वासित जगत आहेत. पण त्यांचा लढा जागतिक व्यासपीठावर लढवणारे मात्र मौजमजेचे चैनीचे जीवन युरोपात जगत असतात. वाटाघाटी कितीही लांबल्या किंवा युद्धाचा भडका उडाला; म्हणून त्या नेत्यांच्या जगण्याला झळ पोहोचलेली नाही. मात्र ज्यांच्यासाठी ही ‘न्याय्य लढाई’ चालू आहे, ते प्रत्येक युद्धात उध्वस्त होतात व आणखीनच दुर्दैवी अवस्थेत जातात. मग या वाटाघाटी पाच दशके आधी सुरू झाल्या असत्या व तोडगा निघाला असता; तर आज पॅलेस्टायनी मुस्लिमांना असे भिकार्‍यासारखे जगावे लागले नसते. दोन तीन पिढ्यांमध्ये ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकले असते. युद्धाने वा तात्विक लढयाने त्यांना कुठलाही दिलासा व सुरक्षित जीवन दिलेले नाही. पण तरीही त्यांच्यात बोलणी होऊ शकतात, तर गुजरातचा मुस्लिम व मोदी यांच्यात संवाद का होऊ नये? शिवाय दंगलपिडीतांसाठी मदत गोळा करताना त्याला इंग्लंडमधल्या विविध देश व प्रांताच्या मुस्लिमांचा आलेला अनुभव धक्कादायक होता. दंगलपिडितांसाठी तोंडी सहानुभूती दाखवणारे व भाषणे देणारे आपल्या खिशातून काही मदत द्यायची वेळ आल्यावर तोंड लपवू लागले. गुजरातचा मुस्लिम भिकारी असल्यासारखी ही वागणुक जाफ़रभाईला हेलावून गेली. तिथेच कोर्ट व संघर्षाच्या पलिकडे जाऊन सरकारशी संवाद करण्याचा विचार बळावत गेला. आणि सरकार म्हणजे मोदी. शेवटी मोदी गुजराती मुस्लिमांचाही मुख्यमंत्री आहे. जाफ़रभाई आपल्या शंका घेऊन काही इस्लाम धर्मपंडितांना भेटला. त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनीही प्रोत्साहन दिले. इतकेच नाही तर अशा बोलण्यांसाठी धर्मतत्वांचा आधारही जाफ़रभाईला शोधून दिला.

   काम सोपे नव्हते. मोदीविषयी इतका अपप्रचार झालेला होता, की त्यांच्याशी मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून बोलणे म्हणजेच मुस्लिमांशी गद्दारी; असा आरोप होऊ शकत होता. आणि असा इशारा त्याच मौलवींनी जाफ़रभाईला दिला. मात्र तसे करण्यात गैर काहीच नाही, असा निर्वाळाही दिला. आजही आपण वातावरण पाहिले तर कुठलाही मुस्लिम मोदीविषयी दोन शब्द चांगले बोलला, तर तो लगेच गद्दार ठरवला जातो. तो काय बोलतो किंवा त्यात सत्य-तथ्य किती; याची दखल घेतली जात नाही. मोदी म्हणजे शत्रू आणि सैतान. तो चांगला असूच शकत नाही व तो काही चांगले करूच शकत नाही, अशी एकूणच ठाम मानसिकता निर्माण करून ठेवण्यात आलेली आहे. सहाजिकच सत्य व तथ्य कोणतेही शोधण्याची गरजच नाही. मग ते भाऊ तोरसेकरने सांगितलेले असो किंवा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव असो. तो तपासण्याची गरज नसते. मोदींवर कुठलाही आरोप करा, त्याच्या पुराव्याची गरज नाही आणि मोदीची कुठली सफ़ाई द्या, ती खोटीच असते, तपासण्याचे कारण नाही. अशी एक सेक्युलर दहशत निर्माण करण्यात आली आहे. आणि ती हिंदूंच्याच बाबतीतली नाही तर अगदी मुस्लिमांनाही तेवढीच असते. शाहीद सिद्दीकी व गुलाम वस्तानवी त्याचेच बळी झालेले आहेत. ही स्थिती आज इतक्या वर्षांनी असेल; तर २००३ म्हणजे दंगलीनंतर अवघ्या दिड वर्षांत किती दहशत असेल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. आपण मुस्लिम समाजातून बहिष्कृत होऊ आणि गद्दार ठरवले जाऊ, असा धोका जाफ़रभाईला उमगला होता. तात्काळ सेक्युलर माध्यमातून काहूर माजवले जाणार व आपल्या मुस्लिम असण्यावरच सवाल उभा केला जाणार, याची त्याला खात्री होती. पण त्याने तो धोका पत्करायचा निर्णय घेतला होता. बेकारी, गरीबी व उध्वस्तेतेचे बळी झालेल्या मुस्लिमांच्या यातना व दु:खाचे भांडवल करून व्यापार मांडणार्‍यांना आणि तोंडपाटिलकी करणार्‍याना शह देऊन गुजरातच्या दंगलपिडित मुस्लिमांना नव्याने आयुष्यात उभे करायचा निर्धार जाफ़रभाईने २००३ सालच्या उत्तरार्धात केला. तिथून त्याच्या धक्कादायक अनुभवाला सुरूवात झाली. कारण त्याच दरम्यान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लंडनला यायचे होते. तिथेच जाफ़रभाईने मोदींची भेट घ्यायचे ठरवले. पण त्याला मोदींपर्यंत कोण घेऊन गेला? मोदींना भेटण्याचा जाफ़रभाईचा मार्ग कोणी प्रशस्त केला? ते नाव ऐकून वाचकाला व अनेक मुस्लिमांना धक्काच बसेल.    ( क्रमश:)
 भाग   ( १५७ )    ३०/४/१३

२ टिप्पण्या:

  1. “A lie can travel half way around the world while the truth is putting on its shoes.” — Mark Twain

    Today, thanks to Smart Gadgets and Paid Media, Pseudo-secular community can ensure it travels ten times over !

    Nonetheless, Truth prevails finally.

    उत्तर द्याहटवा
  2. Bhau, te nav vachayachi iccha prabal zali aahe. ekandaritach aase lakhat yete ki , Congress ne Hindutva aani Modi'n viruddha aati prachar kela.. I hope ki Bhartatil muslimanna khare kay te lavkaracha kalave...

    Sameer Kulkarni

    उत्तर द्याहटवा