गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

‘संसार में बस लाज ही नारी का धर्म है’



    या आठवड्याभराच्या गडबडीत कुठल्या तरी वाहिनीवर कार्यक्रमाच्या दरम्यान ब्रेक होता, त्यात एक जाहिरात बघितली. भारतीय चित्रपट सृष्टीच्या शंभरी निमित्ताने एक मालिका करण जोहर प्रस्तुत करणार असल्याची ती जाहिरात होती. त्यात महबुब खानच्या ‘मदर इंडीया’ चित्रपटाचे एक दृष्य़ ओझरते दिसले होते. काही क्षणच असेल. पण त्यात सावकाराच्या मुलीला पळवून नेणारा नर्गिसचा दरोडेखोर मुलगा सुनीलदत्त दिसला व त्यांच्यातला संवादही कानावर पडला. भर विवाहमंडपातून हा फ़रारी डाकू वधूचे अपहरण करून पळत असतो. घोड्यावरून तो निघालेला असतो आणि त्या झटापटीत त्याची बंदूक मात्र आईच्या हाती लागलेली असते. पण तो घाबरत नाही. ती आई म्हणजे नर्गिस वधूला निमूटपणे सोडून द्यायला बजावत असत्ते आणि पुत्र सुनीलदत्त तिला दाद देत नसतो. तो तिला सांगतो. किती झालीस तरी तू माझी जन्मदाती आई आहेस. तू मला मारू शकत नाहीस. त्यावर नर्गिस म्हणते, मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकते, पण इज्जतीचा नाही. वधू कुणा एका घराची नसते तर गावाची इज्जत असते. आणि तो ऐकत नाही म्हणून ती मुलावर गोळ्या झाडते, असा प्रसंग आहे. पंचावन्न वर्षापुर्वीच्या तशा चित्रपटांनी एका पिढीची नितीमत्ता घडवली होती. आज कुणाला ती खुळचट कल्पना वाटेल. पण चित्रपटाचा प्रभाव समाजावर तसा होता. काही आदर्श समाजमनावर बिंबवण्याचा प्रयास दिग्दर्शक कथालेखक करीत असत. आदर्शाची खिल्ली उडवण्याला तेव्हा सुसंस्कृत वा विद्वान म्हटले जात नव्हते, अशा जमान्यातली ही गोष्ट आहे. बालपणीच्या आठवणी त्या काही क्षणांनी जाग्या केल्या. त्यातले प्रसंग, गाणी, अभिनय, कथा यांच्या स्मृती चाळवल्या गेल्या. आणि असा आदर्शवादी मीच एकटा नाही; कित्येक आहेत. 

   काही वर्षापुर्वी आजचा नामवंत अभिनेता नाना पाटेकरची एक मुलाखत वाचलेली आठवते. पंचावन्न वर्षापुर्वी नानाही अभिनेता नव्हता तर बालवयातलाच होता जेव्हा मदर इंडिया प्रदर्शित झाला होता. आजकालच्या चित्रपटातील हिंसा व लैंगिकता अशा बाबतीत त्या मुलाखतीमध्ये नानाचे मत विचारलेले होते. त्यात नानाने ‘मदर इंडीया’तील एका प्रसंगाचे उदाहरण दिले होते. त्या चित्रपटात नवरा राजकुमार परागंदा झालेला, घरात म्हातारी सासू व दोन मुले अशा गांजलेपणात पिचलेली नर्गिस, कन्हैयालाल या सावकाराकडे कर्ज मागायला जाते आणि तो तिला दागिन्यांचे आमिष दाखवतो. असा प्रसंग आहे. त्याची नर्गिसवर पडणारी हावरी नजर बघून प्रेक्षकाला संताप येत असे. तो तिला स्पर्शही करत नाही, तरी त्याच्या नजरेतील वासना मेंदूला झिणझिण्या आणायची. आज मध्यंतरापर्यंत दोनतीन बलात्कार होऊन जातात व दिसतात, तरी प्रेक्षकाच्या मनावर ओरखडाही उठत नाही, अशी नानाची तक्रार होती. इतका आजचा प्रेक्षक म्हणजे समाज बधीर झाला आहे. त्याला इज्जत, अब्रू, बलात्कार, अत्याचार, हिंसा, अनिती याविषयी कसली जाणिवच उरलेली नाही, की राग वाटेनासा झालेला आहे. त्या नित्याच्या बाबी बनून गेल्या आहेत, अशी खंत नानाने व्यक्त केली होती. आणि त्याच आठवणी करण जोहरच्या मालिकेची जाहिरात बघताना चाळवल्या. त्या आठवणी संवेदनशील समाजाच्या होत्या, अन्याय अत्याचाराविषयी चीड असलेल्या समाजमनाच्या आठवणी होत्या. अगदी पडद्यावरच्या दिखावू असेनात का, पण निदान तेवढी तरी संवेदना समाजात होती. त्याचेच प्रतिबिंब चित्रपटातून कथांमधून पडत होते. रस्त्यावर वर्दळ असेल, घोळका असेल; तर कोणी मुलीची छेड काढण्याची हिंमत करू शकत नव्हता. त्या सगळ्या जाणिवा, संवेदना आज आपला समाज कुठे हरवून बसला आहे? किती अंतर कापून आलो आपण? ‘तू चीज बडी है मस्त मस्त’पर्यंत? 

त्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये नर्गिस म्हणजे सामान्य भारतीय स्त्री कशी झुंज देते; त्याची ती हेलावून सोडणारी मेलोड्रामाटीक कथा आहे. अतिरंजित आहे. पण निराश, हताश करणारी नव्हेतर हतबलतेतूनही बाहेर पडायला हात देणारी, उमेद जागवणारी कथा आहे. त्यात हे हलाहल पचवून जगण्याचा संदेश देणारे गीत अजून कानात घुमते आहे. ओसाड नापीक जमीनीशी आपल्या दोन कोवळ्या पोरांना घेऊन झुंजणारी ती तरूण माता म्हणते,

दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन है अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
दुनिया मे..........
गिर गिर के मुसीबत में सम्भलते ही रहेंगे
जल जाएं मगर आग पे चलते ही रहेंगे
ग़म जिसने दिये हैं बही ग़म दूर करेगा
दुनिया मे..........
औरत है वही औरत जिसे दुनिया की शर्म है
संसार में बस लाज ही नारी का धर्म है
ज़िन्दा है जो इज़्ज़त से वही इज़्ज़त से मरेगा
दुनिया मे..........
मालिक है तेरे साथ न डर ग़म से तू ये दिल
मेहनत करे इन्सान तो क्या काम है मुश्किल
जैसा जो करेगा यहाँ वैसा ही भरेगा
दुनिया मे.......... 

   गेल्या आठवड्याभरात आपल्या बुद्धीचे विभिन्न कंगोरे दाखवणार्‍यांपैकी कितीजणांना ही भारतीय स्त्री आठवली? ज्या महिलांनी बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली, त्यांची तक्रार ऐकून कितीजणांना ती ‘मदर इंडिया’तली नर्गिस आठवली? जे कोणी आपल्या बुद्धी व विचारांची प्रतिक्रिया रुपाने पखरण करीत होते, त्यापैकी कोणालाच हे भारतीय नारीचे रूप कशाला आठवत नाही? कारण त्या तक्रारदार स्वयंपाकीण वा अन्य कुठले कष्टाचे काम करायला घराबाहेर पडलेल्या महिला आहेत, त्यांच्यातली नर्गिस सहज दिसू शकते. पंचावन्न वर्षापुर्वी पडद्यावर झळकलेल्या त्या कथेत त्याच तत्सम महिलांचे चित्रण आलेले नाही का? आणि त्यांची मानसिकता तरी त्यापेक्षा वेगळी असते का? ‘जीवन है जहर तो पिनाही पडेगा’ हे ज्यांच्या जीवनाचे सुत्र व तत्वज्ञान आहे अशा त्या महिला नाहीत काय? त्यांच्याबद्दल बोलताना लिहिताना, आपण कधी त्यांना समजून तरी घेतले आहे काय? त्यांना चेहरा नसतो, त्यांना प्रतिष्ठा नसते, त्यांना नाव नसते. त्यांना आजच्या जगात जणू अस्तित्वच नसते. त्या उकिरड्यावर पडलेला कचरा असतात काय? ही आपल्या प्रतिष्ठीत समाजातली महिलेची प्रतिष्ठा वा पत आहे. तिने नुसते बलात्कार झाला म्हणून सांगावे, की आपण नाकाला रुमाल लावूनच श्वास घेऊ लागावे. कुठल्या सुसंस्कृत समाजात जगतो आपण? त्यांनी केलेली तक्रार म्हणजे काय, त्यामागे राजकारण आहे काय, कुणाचे कुभांड आहे काय, असल्या शंका सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या परिवर्तनवादी विदुषींनीही घ्याव्यात, यातच आपण किती न्यायप्रिय आहोत त्याची प्रचिती येते. अशी तक्रार करणे म्हणजेच विषप्राशन होय, अशी स्थिती असलेल्या त्या महिला आहेत. ज्यांच्यासाठीच धर्म, जात काय असते? ‘संसार में बस लाज ही नारी का धर्म है’, अशा या महिला आहेत. त्या सुशिक्षित व म्हणूनच बुद्धीची कसरत करणार्‍या नाहीत. त्या कारस्थान करू शकतील? कारस्थानाचा भाग असू शकतील? ज्यांना दोन वेळ घरात चुल पेटण्याची भ्रांत असते, अशी दुर्दशा असलेल्यांची कुवत ती काय? त्यांच्यावर किती म्हणून आळ घ्यायचे? कुठल्या म्हणून शंका घ्यायच्या? 

   आजही आपण कितीही पुढारलेले असलो, तरी सामान्य भारतीय समाज व त्यातल्या स्त्रीयांची मानसिकता तितकीच जुनीपुराणी आहे, ज्याला इज्जत म्हणतात. आणि इज्जत हाच बहुतांश स्त्रियांना आपला धर्म वाटतो. अशी स्त्री बलात्काराचा आरोप करायला सहसा धजावत नाही. कारण त्यात तिला अधर्म वाटत असतो. आणि म्हणूनच झुकते माप त्या स्त्रीला द्यावे लागते. ती अबला आहे म्हणून नव्हेतर ती अब्रूलाच आपला धर्म मानते म्हणून. बलात्कार हा शहाण्या व बुद्धीमंतांसाठी एक शब्द असेल. इज्जत प्रतिष्ठीतांसाठी एक शब्द असेल. पण सामान्य माणसांसाठी तोच धर्म असतो, तेच तत्वज्ञान व जीवनाचे सुत्र असते. म्हणूनच निकष लावताना सामान्य महिला बलात्काराचा आरोप करते तेव्हा त्यावर विश्वास ठेवताना तिला झुकते माप द्यावे लागते. सामान्यांच्या जगण्याचे हे काही आधार असतात, ज्याच्या उर्जेवर ती माणसे असह्य वेदना व अपार कष्टातूनही जीवन कंठत असतात. जेव्हा कोणी सामान्य महिला बलात्कार झाल्याचा आरोप करायचे धाडस करते; तेव्हा ती आपले जीवनच पणाला लावत असते, याचा विसर पडून चालेल काय? हा पुरूषाच्या आणि महिलेच्या अब्रूतला व प्रतिष्ठेतला मूलभूत फ़रक आहे. एखाद्या महिलेने कुणावर बलात्काराचा आरोप केला तर त्यात प्रतिष्ठा कोणाची पणाला लागलेली असते? याचेही तारतम्य आजचे बुद्धीवादी विसरून गेलेत काय? असा गुन्हा घडला व आरोप झाला, तर त्यात महिलेचे नाव जाहिर न करण्याचे बंधन मग कशासाठी असते? आरोपीची नावे जाहिर होतात. पण त्यातल्या महिलेचे नाव गुप्त राखण्याचे कायदेशीर बंधन कुठल्या बाजूला न्याय झुकतो, त्याचा संकेत आहे. मग आज युक्तीवाद करणार्‍यांना त्याचा विसर कसा पडला आहे? ही सर्व चर्चा व युक्तीवाद ऐकून मला खरेच किळस आली.     ( क्रमश:)  
 भाग   ( १३१ )    ५/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा