बुधवार, १७ एप्रिल, २०१३

एकूण राजकारण व्यक्तीकेंद्री झाल्यावर काय व्हायचे?




   आपण ज्याला शत्रू मानतो, त्याच्याकडे काणाडोळा करता येत नाही, त्याचप्रमाणे त्याला कमी लेखूनही चालत नाही. कारण आपल्याला धोका त्याच्यापासूनच असतो. म्हणूनच आपल्या मित्रांपेक्षा शत्रू वा प्रतिस्पर्ध्याला समजून घेण्याची गरज असते. कारण असे, की तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्धी वा शत्रूबद्दल अपुरी माहिती असेल, तर त्याच्याशी लढणे वा त्याला पराभूत करणे अशक्य असते. उलट त्याच्याविषयीची तुमच्याकडली अपुरी माहिती, हे त्याच्यासाठी तुमच्या विरुद्धचे सर्वात प्रभावी अस्त्र ठरू शकते. गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपाचे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जाणारे नरेंद्र मोदी यांचे विरोधक वा शत्रू नेमकी तीच चुक करताना दिसतात. ते मोदी यांना समजून घ्यायला तयार नाहीत वा त्यांच्यापाशी काही प्रभावी मुद्दे आहेत, हेच मानायला तयार नाहीत. त्यामुळे अर्थातच मोदींचे काडीमात्र नुकसान झालेले नाही. उलट विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोप व अपप्रचाराने मोदींचा फ़ायदाच होत गेलेला आहे. गुजरातच्या दंगलीला आता अकरा वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी त्यांच्या विरोधात राजकीय प्रचार मोहिम सुरू झाली व अव्याहत चालूच आहे. त्यात कुठलाही नवा मुद्दा येऊ शकलेला नाही. पण त्या मोहिम व प्रचाराचा कुठलाच फ़ायदा मोदी विरोधकांना मिळालेला नसेल व उलटा मोदीच त्याचा लाभ उठवू शकले असतील; तर त्यांच्या विरोधकांनी आपण कुठे चुकतोय वा चुकलो, त्याचा विचार तरी करायला हवा ना? पण तसे अजिबात होताना दिसत नाही. मोदींच्या विरोधात गेल्या दहा अकरा वर्षात जो काही खराखोटा अपप्रचार झाला, त्याचा जनमानसावर प्रतिकुल परिणाम का झाला, याकडे बघायचेच नसेल; तर मैदान त्यांच्यासाठी मोकळे होऊन जाते व तसेच होत आलेले आहे.

   एक साधा मुद्दा घ्या. फ़ेब्रूवारी २००२ च्या अखेरीस गुजरातमध्ये गोध्रा जळीतकांडापासून दंगली सुरू झाल्या आणि जवळपास तेव्हापासून ही ‘मोदी हटाव’ मोहिम सुरू झालेली आहे. त्यातून मोदींना हटवणे अजिबात साध्य झाले नाही. उलट तिसर्‍यांदा गुजरातमध्ये प्रचंड बहूमत मिळवून त्यांचे नाव आता थेट देशाचा भावी पंतप्रधान म्हणुन सुचवले जाऊ लागले. हा विरोधाभास नाही काय? जो आपल्याला एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सहन होत नव्हता, त्याचेच नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये का यावे; याचा विचारही मोदी विरोधकांच्या मनाला शिवत नसेल, तर कसे व्हायचे? दहा वर्षात दंगल हा विषय मागे पडून गुजरातचा विकास खरा की खोटा; असा आता मुद्दा अगत्याचे बोलला जात असतो. म्हणजेच दंगलीचा विषय आपल्या विरोधकांच्या तोंडातून काढून घेण्यात व त्यांना विकासाच्या बाबतीत बोलायला मोदींनी भाग पाडलेले नाही काय? ही किमया त्या माणसाने कशी साधली, त्याचा त्याच्या विरोधकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. किंबहूना आपल्या विरोधकांच्या उत्साह व कल्पनाशक्तीचा मोदींनी आपल्या राजकीय लाभासाठी कसा उपयोग करून घेतला; त्याचा तरी विचार व्हायला हवा ना? अजून भाजपानेही मोदींना आपला उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. पण त्याआधीच त्यांच्या उमेदवारीला विरोध बाहेरून सुरू झाला आहे. म्हणजेच भाजपातील मोदी विरोधकांना पक्षाचा माणूस म्हणून मोदींच्या समर्थनाला आणून उभे रहायला; पक्षाबाहेरील विरोधकांनी भाग पाडलेले नाही काय? मोदींना दिल्लीतील व अन्य भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध दिसणारा होता. दोनच वर्षापुर्वी अडवाणी यांनी भ्रष्टाचार विरोधातील रथयात्रा नितीशच्या बिहारमधून सुरू केली. आधी तिची सुरूवात गुजरातमधून व्हायची घोषणा झाली होती. पण नंतर चक्रे फ़िरली व अडवाणींनी मोदींकडे पाठ फ़िरवली. त्यातून अडवाणींचा मोदी विरोध समोर आलेला नव्हता काय? पण आज त्याच अडवाणींना मोदींच्या समर्थनाला उभे रहाण्याची वेळ आलेली आहे. २००७ सालात हेच राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष झाले; तेव्हा त्यांनी मोदींना संसदीय मंडळातून वगळले होते. आज त्यांना नव्याने अध्यक्ष होताच मोदींना पुन्हा संसदीय मंडळात आणावे लागले आहे. हा सगळा पल्ला भाजपा बाहेरील विरोधकांच्या मदतीशिवाय मोदी गाठू शकले नसते. मोदी विरोधात जो अखंड अपप्रचार झाला; त्यातून त्यांच्याकडे गुजरात बाहेरचे लोक कुतूहलाने बघू लागले आणि त्याचा मोदींनी धुर्तपणे लाभ उठवला आहे.

   पण यातून मोदींनी साधले काय? पहिली गोष्ट लक्षात घ्यायची असेल, तर आज देशभर मोदी या नावाची चर्चा आहे. कुठल्याही मतचाचण्या घेतात, त्यात मोदी हे नाव असतेच. मोदी विरुद्ध राहुल, मोदी विरुद्ध मनमोहन, मोदी विरुद्ध सोनिया किंवा मोदी विरुद्ध नितीश अशीच तुलना चालते. त्यात प्रत्येकवेळी समान घटक मोदी असतो. प्रत्येकाची तुलना मोदीशी करताना, आपण मोदीना तुल्यबळ ठरवत आहोत, याचे भान चाचणीकर्त्याला असते का? मोदींना नेमके हेच हवे होते व हवे आहे. कारण त्यातून जनमानसाचे धृवीकरण होत असते. धृवीकरण म्हणजे शक्तीच्या संघर्षात दोन बाजूंमध्ये विभागणी. आज कुठलीही राजकीय चर्चा ऐकली; तर त्यात एक घटक मोदी व दुसरा अन्य कोणी असतो, म्हणजेच सर्व राजकारण मोदी विरुद्ध बाकीचे असा आभास निर्माण होत असतो. त्याला धृवीकरण म्हणतात. ज्यामध्ये मतांची प्रामुख्याने विभागणी दोन गटात होत असते. असे इंदिरा गांधींच्या राजकीय उदयानंतर झालेले होते. कॉग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती आणि विविध राज्यांमध्ये प्रादेशिक व लहानमोठे पक्ष शिरजोर झालेले होते. तेव्हा कॉग्रेसमधल्या ज्येष्ठांना शिंगावर घेऊन इंदिराजींनी अशाच प्रकारे देशातील राजकीय मतांचे धृवीकरण घडवून आणले होते. उजव्यांपासून डाव्यांपर्यंत, राष्ट्रीय पक्षांपासून प्रादेशिक पक्ष संघटनांपर्यंत सर्वांनाच आव्हान उभे करून इंदिराजींनी १९७० च्या दरम्यान एक अशी राजकीय परिस्थिती उभी केली, की लोकांसमोर इंदिराजी हव्यात किंवा इंदिराजी नकोत असे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते. त्यामुळे निवडणुकांच्या राजकारणात पक्षांचे संघटनात्मक महत्व किंवा राजकीय प्रतिमांना किंमत उरली नव्हती. एकूणच राजकारण एका व्यक्तीमत्वाच्या भोवती घुटमळू लागले होते. त्याला धृवीकरण म्हणतात. देशाच्या कानाकोपर्‍यात मतदाराला एकच निवड करायची होती. इंदिराजी पंतप्रधान हव्यात की नकोत. त्यांच्या हाती, देश सुरक्षित राहिल किंवा नाही, अशी निवड करणे, इतकाच राजकीय पर्याय लोकांसमोर होता. त्यामुळेच मतदानात त्याचेच प्रतिबिंब पडले होते, ज्याला त्या काळात इंदिरा लाट असे राजकीय नाव देण्यात आले. पण प्रत्यक्षात ते व्यक्तीकेंद्री राजकारणाचे धृवीकरण होते. अनेक अभ्यासक व जाणकारांना ते व्यक्तीचे स्तोम वाटले होते. पण शेवटी त्यानुसारच मतदान होऊन इंदिराजी १९७१ सालात दोन तृतियांश बहुमताचे देशाच्या निरंकुश सत्ताधारी झाल्या होत्या. आज नेमकी तशीच परिस्थिती निर्माण करण्यात मोदी कमालीचे यशस्वी होताना दिसत आहेत. आणि त्यात त्यांनी त्यांच्या विरोधकांचा पद्धतशीर वापर करून घेतला आहे किंवा त्यांच्या विरोधकांनी तो होऊ दिला आहे.

   जसजसे दिवस चालले आहेत, तसतसे हे धृवीकरण अधिक स्पष्ट होत चालले आहे. म्हणून मोदी पंतप्रधान होऊ शकतात काय? ज्या बळावर पंतप्रधान व्हायचे ते बहूमत भाजपा मिळवू शकतो काय? असा सवा्ल मोठ्या आवेशात विचारला जात असतो आणि त्याच्या जोडीला मग कर्नाटकात भाजपा कसा फ़ुटला आहे किंवा उत्तरप्रदेशात भाजपा कसा दुबळा आहे; असे राज्यवार दाखले दिले जातात. पक्षातील दुफ़ळी व बेबनावाचे मुद्दे विचारले जातात. पण देशात मतांचे जे धृवीकरण होते आहे, ते भाजपाच्या भोवतालचे नसून मोदी या व्यक्तीच्या भोवतीचे आहे, हे विसरले जाते. आज भाजपा जितका भाऊबंदकी, दुफ़ळी व मतभेदांनी बेजार झालेला आहे, त्यापेक्षा १९७० व १९८० सालात कॉग्रेस फ़ाटाफ़ुटीने ग्रासलेला पक्ष होता. त्यात पुन्हा इंदिराजींनी पक्षात फ़ुट घडवून आणली होती. त्यामुळे बहुतेक प्रमुख नेते व ज्येष्ठ कार्यकर्ते इंदिराजींच्या मदतीला नव्हते, की पक्ष संघटनाही मजबूत नव्हती. पण त्याची त्यांना गरज नव्हती. लोकांनाही कॉग्रेसला मत द्यायचेच नव्हते, की सत्तेवर आणायचे नव्हते. लोकांना पक्षापेक्षा व्यक्तीला मते द्यायची होती व सत्ता सोपवायची होती. किंवा दुसर्‍या बाजूला त्याच व्यक्तीला सत्ता द्यायची नव्हती किंवा सत्तेपासून दुर ठेवायचे होते. त्याला म्हणतात धृवीकरण. मग जिथे उजवे किंवा डावे बलवान पक्ष होते, तिथे त्यांच्या विरोधकांनी पर्याय म्हणून कॉग्रेस नव्हे, तर इंदिराजींना कौल दिला होता. त्यामुळे अधिकृत असा कॉग्रेस पक्ष पराभूत व इंदिराजींचा गटच यशस्वी झाला होता आणि त्याने १९६७ सालातील एकत्रित कॉग्रेसपेक्षा अधिक जागा व मते मिळवली होती. निवडणुक निकालात त्याची नोंद कॉग्रेस पक्षाच्या खात्यात झालेली दिसेल. पण प्रत्यक्षात ती मते इंदिराजींना व्यक्तीश: मिळाली होती. त्यांनी ज्याला शेंदूर फ़ासला त्या दगडालाही लोकांनी भरभरून मते दिली होती. आणि त्या इंदिरा लाटेत त्यांच्या विरोधातले अनेक दिग्गज नेतेही वाहून गेले होते. आज नेमकी तशी परिस्थिती निर्माण करण्यात मोदी आपल्या विरोधकांच्याच मदतीने यशस्वी झालेले आहेत. त्यांनी या धृवीकरणाला आरंभ केला आणि ते काम आता माध्यमे व राजकीय विरोधक मोठ्या उत्साहाने पुढे घेऊन जात आहेत. ‘मोदी नको’च्या अतिरेकातून ‘मोदी हवा’चा पडसाद घुमण्यास सुरूवात झालेली नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? मोदी नकोचा आक्रोश बंद झाला तर मोदी हवा या भूमिकेतील हवाही निघून जाऊ शकेल. पण तसे होण्याची शक्यता कमीच आहे.       ( क्रमश:)
 भाग   ( १४५ )    १८/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा