मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

माणसे अशी बेताल बेछूट वागतातच का?


   या आठवड्यात दोन घटना महत्वाच्या घडल्या. योगायोग असा, की दोन्ही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित आहेत. पहिली म्हणजे पंधरा दिवस बेपत्ता असलेले माजी आमदार व लेखक लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याची. दोन्ही प्रकरणांचा तसा दुरान्वयेही संबंध नसताना शरद पवार यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांना मान खाली घालायची पाळी आली. याचे पहिले कारण म्हणजे ज्या लक्ष्मण माने यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप त्यांनीच चालवलेल्या शिक्षण संस्थेतील महिलांनी केले; त्या संस्थेचे कागदोपत्री अध्यक्ष शरद पवार आहेत. आपल्या प्रदिर्घ राजकीय वाटचालीत शरद पवार यांनी अनेक कार्यकर्ते घडवले व पुढे आणले आणि त्यासाठी आपली प्रतिष्ठाही पणाला लावलेली आहे. त्यातच माने यांच्यासारख्यांचा समावेश होतो. म्हणूनच असा पुढल्या पिढीचा कार्यकर्ता काही नवे काम उभे करू पहात असेल; तर त्यात पवारांनी आपल्या नावाचा समावेश होऊ दिला असणार. अन्यथा अशा संस्थेमध्ये कागदोपत्री अध्यक्ष असण्याची पवारांना काहीच गरज नव्हती. महाराष्ट्रातच नव्हेतर देशात अशा शेकडो नामवंत संस्था असतील, की पवारांच्या अनुभवाचा लाभ उठवण्यासाठी त्यांना महत्वाची अधिकारपदे त्यात दिली जाऊ शकतात. पण असे असताना पवारांनी एका नवख्या कार्यकर्त्याच्या कामाला प्रतिष्ठा व पत मिळावी म्हणून त्याच्या संस्थेचे नाममात्र अध्यक्षपद स्विकारावे; हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच होता व आहे. पण तसे करताना आपण ज्याला प्रोत्साहन द्यायला आपली प्रतिष्ठा पणाला लावतोय, त्याची विश्वासार्हता पवारांनी अजिबात तपासली नव्हती काय, असाही प्रश्न पडतो. त्यांच्यासारखा अत्यंत चतूर व धुर्त राजकारणी इतक्या सहजसहजी अशा भानगडीत सापडण्याचे अन्य कोणतेच कारण नाही. पण दुर्दैवाने का होईना तसे घडले आहे. आठदहा दिवस असे आरोप होत राहिले व त्यावर सार्वत्रिक चर्चा होऊ लागली; तरी त्यातले आरोपी माने जगासमोर येईनात. तेव्हा त्यात पवारांना हस्तक्षेप करायची वेळ आली. अशा प्रकरणात आरोप होताच पोलिस ठाण्यात जाण्याची तत्परता माने यांनी दाखवायला हवी होती. कारण हा मामला त्यांच्यापुरता वैयक्तिक नव्हता. ज्या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्यावर आरोप झालेले होते; त्याचे अध्यक्ष म्हणून त्यात पवार यांनी आयुष्यभराची पुण्याई पणास लागली आहे, याचे भान माने यांनी राखले नाही. याला दगाबाजी असेही म्हणता येईल.

   दिड वर्षापुर्वी दिल्लीत एका कार्यक्रमासाठी चालले असताना पवार यांच्या अंगावर धावून जात एका इसमाने त्यांच्या थोबाडीत मारली होती. त्यानंतर बरेच वादळ उठले होते. त्याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमटली होती. अगदी जाळपोळ करण्यापासून अनेक आक्षेपार्ह गोष्टी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या त्या दंगलखोरीचा माध्यमांपासून जाणकारांनी गुंडगिरी व अरेरावी म्हणून निषेधही केला होता. तो अयोग्य होता असेही म्हणता येणार नाही. पण असे दंगेखोरही लक्ष्मण माने यांच्यापेक्षा अधिक चांगले व प्रामाणिक म्हणता येतील. पवारांवर हल्ला झाला व त्याची विटंबना करण्याचा प्रयास झाला; तेव्हा त्यांच्या अशा सामान्य पाठीराख्यांनी आपल्या बौद्धिक कुवतीनुसार प्रतिक्रिया दिल्या व हुल्लड माजवली. त्यासाठी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या किंवा स्वत:वर खटलेही ओढवून घेतले. म्हणजेच त्या पवारनिष्ठांनी स्वत:वर आरोप घेऊन, आपल्या नेत्याची प्रतिष्ठा जपण्याचा पोरकट प्रयास केला म्हणता येईल. पण कितीही पोरकट प्रयास असला, तरी त्यात आपल्यामुळे नेत्यावर बालंट येऊ नये अशी काळजी घेतली होती. त्यांच्याहीपेक्षा माने अधिक बुद्धीमान व सुसंस्कृत म्हणायचे का? कारण इथे नेमकी उलटी स्थिती आहे. आपल्यावर बालंट आले असताना माने यांनी त्याच पवारांची अब्रू पणाला लागायची नामुष्की आणली. त्यांनी तोंड लपवून आरोपबाजी वाढण्यास व संशयाचे वातावरण निर्माण व्हायला हातभार लावला. इतकेच नव्हेतर पवार यांना त्यात हस्तक्षेप करण्याची वेळ आणली. अखेर पवारांना लोक प्रश्न विचारू लागले आणि त्यांनाच ‘पोलिसात हजर व्हा’ असे सांगायची वेळ माने यांनी आणली. म्हणजे त्यांनी पवारांच्या अब्रूचे धिंडवडेच काढले ना? अशी बेअब्रू करून घेण्यासाठी पवारांसारखा माणूस माने यांच्या पाठीशी उभा राहिला होता काय?

   दुसरी घटना तितकीच धक्कादायक आहे. केवळ पवारांचे वारस किंवा पुतणे हीच आजही अजितदादांची राजकारणातली ओळख आहे. त्यापलिकडे दादांना अजून तरी आपला राजकीय प्रभाव निर्माण करून दाखवायचा आहे. दादा राजकारणात येण्याच्या आधीपासून पवारांना अनेक तरूणांनी आदर्श मानून त्यांचे अनुयायीत्व पत्करलेले आहे. असे असतानाही काकांनी पुतण्याला झुकते माप वारंवार दिलेले आहे. त्यामुळेच भुजबळ, आबा, जयंत पाटील वा दत्ता मेघे अशा जुन्या सहकार्‍यांना बाजूला ठेवून पवार दादांना संधी देतात; तेव्हा त्याचे मोल किती अधिक आहे, याचे भान राखले जायला हवे. चारपाच दशके शरद पवारांनी आपली राजकीय पत व प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी खर्ची घातली आहेत, सहाजिकच त्यांनी पुढे केलेला प्रतिनिधी वा वारस, यांच्या डोक्यावर तीच प्रतिष्ठा पदोपदी जपण्याची मोठी जबाबदारी येत असते. हाती येणार्‍या अधिकारापेक्षाही त्या जबाबदारीचे ओझे अधिक असते. पण अजितदादांच्या वागण्यातून त्या जबाबदारीचे भान सहसा दिसत नाही. याचे काय कारण असावे? खुद्द दादांनीच नव्हेतर अशा कुणा नेत्याच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याची उभारणी करणार्‍या प्रत्येकानेच या विषयाकडे गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्या नेत्याने वा पित्याने आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्षे आपली ओळख व प्रतिष्ठा निर्माण करण्यात खर्ची घातली आहेत आणि ती मातीमोल होऊ नयेत, ही पहिली जबाबदारी असते. त्या ओझ्याखालीच बाकीचे अधिकार व सवलती दबलेल्या असतात. आपली एक चुक वा गैरवर्तन, त्या नेत्याचे आयुष्य नासाडी करील ही भावना असायलाच हवी. पण नेमके त्याचेच भान सुटते आणि पुढल्या दुर्घटना घडत असतात. मग त्यावर तुटून पडणारी गिधाडी वृत्ती सगळीकडे सारखीच असते. आज अशी वेळ शरद पवार यांच्यावर आलेली आहे. कधी ती वेळ बाळासाहेब ठाकरे वा अन्य कुणी नेता वा मान्यवराच्या वाट्याला आलेली असेल. मग त्यावरून वादळ उठवले जाते, कल्लोळ चालतो. त्यामध्ये जो कोणी सापडलेला असतो, त्याची पुरती ससेहोलपट केली जाते. पण म्हणून असे प्रकार थांबले आहेत काय? माणसे मुळात अशी वागतातच कशाला, त्याचा शोध कधीच घेतला जात नाही. त्यापेक्षा असे निमित्त साधून मग ठाकरे वा पवार यासारख्या नामवंतांची बेअब्रू करण्यात धन्यता मानली जात असते. किंवा बळीचा बकरा शोधून सारवासारव केली जात असते. जणू माने वा अजितदादा, एवढेच दोन नासके आंबे आहेत व बाकीचे सर्वकाही झकास उत्तमच चाललेले आहे, असा आभास निर्माण केला जातो.

   खरे पाहिले तर यातले माने वा अजितदादा हा दुय्यम विषय आहे. कारण हे असे आजच गैरवर्तन होते, असे नाही आणि त्यांच्यातच काही दोष असल्याने हा प्रकार घडला असेही नाही. ज्या कोणा व्यक्तीला अशा प्रवृत्तीची बाधा होते, त्यांच्याकडून असे प्रमाद घडत असतात. काही दिवस आधी वा कालपरवापर्यंत जी माणसे सभ्य सुसंस्कृत दिसत असतात, ती अचानक अशी खलनायक कशी होतात? का होतात? त्याचा कधीतरी विचार होणार आहे की नाही? अत्यंत मान्यवर प्रतिष्ठीत वर्गातून आलेले लोक, असे का वागतात वा वागले, त्याचा शोध घ्यायला हवा आहे. तरच त्या प्रवृत्तीवर मात करता येईल. तिला पायबंद घालता येईल. एका अजितदादाचा राजिनामा किंवा त्याची मंत्रीमंडळातून उचलबांगडी केल्याने अशा समस्येपासून मुक्ती मिळू शकत नाही. कुणा एका लक्ष्मण मानेला अटक वा शिक्षा होऊन असे प्रकार थांबवले जाणे शक्य नाही. त्यासाठी या विकृतीकरणाच्या बाधेचा शोध घेणे अगत्याचे असते. त्याऐवजी सापडला म्हणून त्याच्या विरोधात झोड उठवून आपला कंडू शमवून घेणे, ही निव्वळ पळवाटच असते. म्हणून तर बापू वा बुवांच्या विरोधात ऊर बडवणारे लोकच आपल्यापैकी माने त्यात फ़सला म्हटल्यावर चिडीचुप झाले. हा भेदभाव त्यामुळेच येत असतो. गुन्हा वा गैरवर्तन आपल्यापैकी कोणाचे असेल तर त्यावर पांघरूण घालण्याची वृत्ती, अशा गुन्ह्यापेक्षाही घातक असते. त्यामुळे ती अन्याय अत्याचार करणारी प्रवृत्ती सुखरूप असते आणि बाधा झालेले बाजूला होतात आणि नवे तितकेच शिरजोर होऊन समाजाला नाडत रहातात. कारण अधिकारासोबत येणार्‍या जबाबदारीचे भान सुटलेले आहे. अधिकाराचा वेग असलेल्या भरधाव गाड्यांना जबाबदारीचा ब्रेकच नसेल, तर असे अपघात अपरिहार्यच नाहीत काय? पण गेल्या आठवड्याभरात कुठे त्या जबाबदारी वा गुन्हेगारी अपप्रवृत्ती याविषयी चर्चा तरी झाली काय? दादा भान सुटल्यासारखे बोलले वा माने बेताल बेफ़ाम वागले, तर कशामुळे, या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयासही झाला नाही. जणू असे हे दोघेच आहेत व बाकी सगळे आलबेल असल्याच देखावाच निर्माण करण्यात आला तो सुद्धा फ़सवाच नाही काय?
( क्रमश:)
 भाग   ( १३७ )    १०/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा