शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

माणसातल्या उपजत रानटी प्रवृत्ती


    एक महिला मुळातच बलात्काराचा आरोप करायला धजावत नाही. त्यामुळे बहुतांश असले गुन्हे पचत असतात. अपवादानेच गुन्हे समोर येतात. त्यासाठी त्या पिडीतेला कोणीतरी हिंमत द्यावी लागते, पाठबळ द्यावे लागते. कारण आपल्यावर बलात्कार झाला, याची मुळात तिलाच किळस वाटत असते. बळी तीच आणि तीच स्वत:ला अपराधी मानत असते. त्यातून तिला बाहेर काढून न्यायाला सामोरे जाण्यासाठी सज्ज करावी लागते. तिचा अपराध नसून अपराधाची ती बळी आहे व न्यायाची हक्कदार आहे; असे पटवूनच तिला गुन्हेगाराशी दोन हात करायला कायद्याच्या मदतीला आणावे लागत असते. म्हणूनच अतिशय कमी प्रमाणात गुन्हे नोंदले जातात, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. शिवाय त्यात अत्यंत जवळचे, विश्वासातील, प्रतिष्ठीत वा सत्तेने प्रबळ लोकच असे गुन्हे करीत असल्याने; त्यांच्या विरोधात न्याय मागायची महिलांना हिंमत होत नसते. पण ही त्याची एक बाजू झाली. दुसरीकडे भारतीय समाजमनाचा प्रभावही थोडका नसतो. इज्जत, अब्रू ह्या गोष्टी कोवळ्या वयापासून मुलींच्या मनावर अशा ठसवल्या जात असतात, की त्यात बलात्कार झाला, लैंगिक अत्याचार झाला, तर त्याच्या विरोधात उभी रहाण्याची इच्छाशक्ती आधीपासूनच खच्ची केलेली असते. त्यात पुन्हा कायद्याचे सव्यापसव्य इतके गुंतागुंतीचे असते, की त्यातून वाट काढताना जगाला तोंड दाखवण्याचीही चोरी होऊन जाते. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा कोणी महिला खोटा बलात्काराचा आरोप करायला सज्ज होते; तेव्हा ती अतिशय बनचुकी व कुशाग्रबुद्धीची धुर्त असायला हवी. सामान्य गरीब गरजू महिला तशा नसतात. त्या अन्याय सहन करूनही गप्पच बसतात. पण जेव्हा अशा गोष्टींचा अतिरेक होऊ लागतो, तेव्हाच त्या प्रतिकाराला उभ्या ठाकतात. संख्येने इथे पाच महिलांनी बलात्काराची तक्रार केली आहे, त्याकडे बघता, कुणाला कुभांड रचायला पाच महिला तयार होतील असे वाटत नाही. कारण हा कुणाचा राजकीय डाव असला तरी त्यात अब्रूची होळी त्या महिलांच्या झाली आहे. कितीही रक्कम मोजली तरी त्या महिला उद्या पैशामुळे आपल्या गोतावळ्यात प्रतिष्ठेने जगू शकणार नाहीत. म्हणूनच त्यांच्या धाडसाला झुकते माप द्यावेच लागते.

   इथे बलात्काराचा आरोप एक सामान्य महिला करते, म्हणजे नेमके काय ते आधी आपण समजून घेतले पाहिजे. समजा हा आरोप खोटा आहे आणि उद्या न्यायालयात खटला चालून सुनावणीमध्ये साक्षीपुराव्यानिशी खोटाच पडला; तर काय होईल? त्यात आरोपी असतो, त्याचे नाव धुतले जाईल. त्याची अशा बदनामीतून सुटका होईल. पण आरोप सिद्ध झाला नाही; तरी त्या महिलेची अब्रू जायची ती गेलीच ना? कारण तिने स्वत:च बलात्कार झाल्याचे तक्रारीत म्हटले असल्याने ‘ही तशीच’ हे बिरूद तिच्यामागे कायमचे चिकटले जाणारच. म्हणजेच बलात्कार झाला म्हणून जी थोडीफ़ार सहानुभूती मिळालेली असेल, तीसुद्धा शिल्लक उरत नाही. पण मुळच्या तक्रारीमुळे जी अब्रू धुळीस मिळालेली असते; त्यातून त्या महिलेची सुटका शक्य नाही. याचा साधासरळ अर्थ इतकाच, की तक्रार करणारी महिला निकाल काहीही लागला तरी तिच्या गोतावळ्यातून उध्वस्तच होणार असते. तितका आरोपी उध्वस्त होत नसतो. मग असा धोका एखादी सामान्य महिला सहजासहजी पत्करू शकते काय? अगदी असे मानू, की कोणीतरी लक्ष्मण माने किंवा तत्सम नावाजलेल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कारस्थान शिजवून असे बालंट आणत असेल, तर त्यात अशा महिलेने स्वत;ची आहुती देऊन तिला नेमके काय मिळणार आहे? ज्या वर्गातील या महिला आहेत व जे काम करत होत्या, त्यांच्या उत्पन्नाची व जीवनमानाची स्थिती पाहिल्यास, त्यांना कोणी काही लाखापेक्षा अधिक पैशाचे आमीष दाखवणार नाही. त्या काही लाखात त्या महिला आपले जीवन नव्याने उभारू शकतात काय? अवघे भावविश्व जुगारात पणाला लावल्याप्रमाणे तक्रार देऊ शकतात काय? याच नव्हेतर अशा कुठल्याही गाजणार्‍या प्रकरणात महिलेची तक्रार तेवढ्यासाठी ग्राह्य मानून चौकशी करावी लागत असते. कारण या तक्रारीला सामाजिक पाश्वभूमी असते. अशी तक्रार कुठली भारतीय महिला सहजासहजी करीत नाही, हेच त्याचे कारण आहे. ती जीवाला कंटाळलेली वा अतिरेकमुळे सुडाने प्रतिहल्ल्याला प्रवृत्त झालेली असू शकते. आणि अशा छोट्याशा जिल्हा पातळीवरील संस्थेमध्ये पाच महिला त्यासाठी लागोपाठ अल्पावधीत पुढे येतात, तेव्हा काहीतरी गंभीर मामलाच असणे स्वाभाविक मानावे लागते.

   यातील एक भाग आणखी लक्षात घ्यावा लागेल. दिर्घकाळ लक्ष्मण माने यांच्या सोबत चळवळीत काम केलेल्या महिला विषयक आंदोलनातल्या खंद्या कार्यकर्त्या वर्षा देशपांडे एका वाहिनीवर काय म्हणाल्या? अनेक दिवसापासून मानेंच्या संस्थेतला असंतोष कानावर होता. पण कुठला व कसला असंतोष त्याचा खुलासा वर्षाताईंनी केलेला नाही. आपण त्यात लक्ष घातले नाही, असेही त्या म्हणाल्या. पण पुढे जाऊन वर्षाताई म्हणतात, त्या महिलांनी इतका अन्याय होत असेल तर आमच्याकडे यायला हवे होते. त्या गप्प कशाला बसल्या? इथे थोडी गफ़लत आहे. अशा पिडीत महिला कोणाकडे जाऊ शकतात? मानेंच्या सोबत काम करणार्‍यांकडे त्या महिला मानेंच्या विरोधात अशा तक्रारी घेऊन कशा जाऊ शकतील? शिवाय असंतोष कानावर असुनही त्यात वर्षाताईंनी लक्ष घातले नाही, तिथेच गडबड आहे. असंतोष कानावर असूनही तिकडे लक्ष घातले नाही; म्हणजे मानेंच्या संस्थेमध्ये असलेल्या असंतोषाला वाचा फ़ोडायची अनिच्छाच वर्षाताईंनी व्यक्त केली आहे. आणि जी अनिच्छा त्या स्वत:च व्यक्त करतात, तेव्हा ती अनिच्छा त्या महिलांच्या कानावरही असू शकते. मग त्यांनी मानेंच्या तक्रारी घेऊन वर्षाताईंकडे येण्याचे धाडस कसे करावे? कदाचित असेही असू शकते ना? त्या संस्थेतील गडबडी व असंतोष वर्षाताई वा तत्सम लोकांच्या ‘कानावर’ जावा आणि त्यांनीच न्यायासाठी पुढाकार घ्यावा, असा प्रयत्न त्या महिलांनी केलेला असू शकतो. महिलांवरील अन्यायाला वाचा फ़ोडायला व त्यांना न्याय मिळवून द्यायला वर्षाताई विविध जिल्हे व अन्य राज्यांपर्यंत जातात, त्या नुसती हवा लागली तरी आपल्या संस्थेतील महिलांवरचा अन्याय दूर करायला धावून येतील; असे त्या महिलांना वाटलेले असू शकते. त्यासाठीच त्यांनी वर्षाताईंच्या कानावर काही गोष्टी जाव्यात व त्यांचे कुतूहल जागे व्हावे, असे प्रयत्न केले असतील. पण त्यांच्या अपेक्षा फ़ोल ठरल्या आणि त्यांना दुसर्‍या कुणाचे पाठबळ मिळण्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागलेली असू शकते ना? ‘कानावर असंतोष होता व लक्ष घातले नाही’, अशी वर्षाताई देशपांडे यांची कबुली गंभीर नाही काय? आणि त्यांची ही कबुली खरी असेल तर त्यांनी त्या महिला आपल्याकडे आल्या नाहीत, अशी तक्रार वा खंत व्यक्त करण्यात काय अर्थ आहे?

   सगळी गडबड तिथेच तर होते. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीकडे वा घटनेकडे आपल्याच ठाशीव भूमिकेतून बघत असतो, तेव्हा आपली नजर काही बाबतीत निकामी होत असते. पक्षपाती होत असते. अन्य कुठल्या संस्था व व्यक्ती यांच्याविषयी कुणकुण कानी आली, मग वर्षाताईंसारखे कार्यकर्ते धावून जातात. त्यांनी स्त्रीभृणहत्येच्या बाबतीत अत्यंत महत्वाच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत. बीडचे डॉ. मुंडे यांच्या पापाचे पितळ उघडे पाडण्यात त्यांचे धाडस खुपच मोठे होते. त्याचे सगळे पुरावे त्यांनी प्रयत्नपुर्वक मिळवलेले आहेत. त्यांना कोणी आयते आणुन दिलेले नव्हते. कानावर आले म्हणुन अनेक स्त्रीभृणहत्येची प्रकरणे त्यांनी उकरून काढलेली आहेत. पण इथे आपल्या गावात असेच काही गंभीर गुन्हे घडत असल्याची कुणकुण त्यांच्या कानावर होती, पण त्यामध्ये हात घालायची त्यांना इच्छा झाली नाही, ही बाब मोलाची आहे. हा त्यांच्यावर आरोप नाही, की संशय सुद्धा नाही. त्याचे मानवी स्वाभाविक कारण समजून घेतले पाहिजे. लक्ष्मण माने आपल्यासारखेच, आपल्याच विचार व भूमिकेतून दलित, पिडीत महिलांच्या न्यायासाठी लढणारे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविषयी संशय वा शंका घेताना अवघड जात असते. कारण आपला त्यांच्यावर नुसता विश्वास नसतो तर श्रद्धाही असते. ती श्रद्धाच अशावेळी दगा देत असते. वर्षाताईंना कानावर गोष्टी आल्या तरी त्या दिशेने काही हालचाल करावीसे वाटले नाही; त्याची ही अशी मिमांसा आहे. जिथे आपली मैत्री वा जवळीक असते, तिथे शंका वा संशय घेताना अडचण येत असते. अगदी साक्षी, पुरावे किंवा वास्तव समोर दिसत असले, तरी डोळे व बुद्धी दगा देऊ लागते. नाते, मैत्री, विश्वास, जवळीक, आपुलकी, बांधिलकी हे अडथळे पार करणे सहजशक्य नसते. मग तिकडे काणाडोळा करणे सोयीचे होते. त्यापासून पळ काढणे उपकारक वाटते. हा प्रकार मजेशीरही असतो. आपल्या पिलाला मायेने चाटणारी वाघिण वा सिंहीण अकस्मात उठते आणि दौडत जाऊन झेब्रा वा हरणाच्या दुधपित्या पिलाची शिकार करते ना? तसाच काहीसा हा प्रकार आहे. मग तेव्हा तिची ममता व माया कुठे गायब होते? किती चमत्कारिक विरोधाभास आहे ना? आपण एका बाजूला मानवी संस्कृती व मानवी प्रगल्भतेच्या गप्पा मारत असतो. पण बारकाईने बघितले तर आपल्यात आजही त्याच रानटी उपजत वृत्ती तेवढ्याच कार्यरत आहेत आणि प्रसंग आला, मग त्या उफ़ाळून येतात, त्याचेच असे प्रत्यंतर येत असते. कसे ते उद्या वाचू.  ( क्रमश:)
 भाग   ( १३२ )    ६/४/१३

1 टिप्पणी: