असे शिर्षक वाचले, मग तुमच्या मनात काय काय कल्पना तयार होतात बघा. पहिली गोष्ट म्हणजे असे ज्याने कोणी केले असेल; त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रचंड घृणा निर्माण होते. त्याचा तुम्हाला भयंकर राग येतो. असा पुत्र त्या माऊलीने कशाला जन्माला घातला, वगैरे वाटू लागते. मग हळूहळू त्याने असे राक्षसी कृत्य कशासाठी केले असेल, त्याच्या कल्पना तुमच्या डोक्यात येऊ लागतात. कारण जेवढे शब्द तुमच्या समोर आलेले वा मांडलेले आहेत, त्यातून एक ठराविक अर्थ तुम्हाला काढता येत असतो. बहुधा तो नशाबाज असेल, कसल्या तरी धुंदीत त्याच्याकडून असे घडले असेल. की त्याने मालमत्ता संपत्ती हडपण्यासाठी कुणाच्या नादाला लागून असे केले असेल? बहुधा त्याच्या लोभी पत्नीनेच त्याला असे करण्यासाठी फ़ुस लावली असेल. किती अगम्य कल्पना तुमच्या डोक्यात येतात ना? कारण समोर आलेल्या शब्दातून नुसतीच अमानुषता पोहोचत असते. शब्दांची ही इतकी भयंकर ताकद असते. शब्द असे मांडलेले व फ़ेकलेले असतात, की आणखी कुठली शक्यता असण्याचा विचारही तुमच्या मनाला शिवत नाही. कुठलाही विचार व तपास न करता; तुम्ही तात्काळ त्या जळलेल्या आईच्या मुलाला गुन्हेगार ठरवून मोकळे होता. इतका शब्दांना वेग व त्यांची ताकद असते. पण आईला मुलाने ‘जाळून टाकावे’ अशा इतरही शक्यता असू शकतात, याकडे आपली तर्कबुद्धी वळूनही बघायला तयार नसते. आता हेच घ्या की हेच शब्द माझ्याविषयी सुद्धा वापरले जाऊ शकतात. आणि असे कोणी वापरले तर तुम्ही म्हणाल, भाऊ तोरसेकर असे करू शकतो? काही क्षण तुम्ही विचारात पडाल. पण आज कोणीही माझ्याबद्दलही असेच म्हणू शकतो, आणि त्यात तसूभरही खोटे नाही, दिड महिन्यापुर्वी मी सुद्धा नेमके असेच कृत्य केलेले आहे. मला माझ्या आईला जाळावीच लागली. पण ते का करावे लागले? त्याखेरीज माझ्यासमोर अन्य पर्यायच नव्हता.
८ मार्च रोजी माझ्या आईचे देहावसान झाले. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार म्हणजेच अग्नीसंस्कार करणे मला भागच होते. पण साध्या शब्दात मी आईला जाळून टाकले, ही वस्तुस्थिती आहे. फ़रक किंचित आहे. मी आईला जाळले वा अग्नी दिला नाही, तर तिच्या पार्थिवाला अग्नीच्या स्वाधीन केले. म्हणूनच ‘भाऊ तोरसेकरने आपल्या जन्मदात्या आईला जाळून टाकले’, असे माझ्याविषयी कोणी विधान केले तर ते शब्दश: खोटे म्हणता येणार नाही. पण त्यातले दोन शब्द किंवा संदर्भ लपवले तर किती भयंकर वेगळा अर्थ निघतो ना? त्याला शब्दांची किमया म्हणतात. सत्य सांगितल्याचा आव आणायचा. पण शब्दांची मांडणी अशी करायची, की नेमका अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आईच्या मृतदेहाला अग्नी दिला आणि आईला जाळले, यात शब्दाने काही फ़रक पडत नसला, तरी जाळले तेव्हा ती मृतदेह होती आणि तो मृतदेह अग्नीच्या स्वाधीन करणे अपरिहार्य होते, हे वास्तव आहे. पण मृत आई असे सांगायचे टाळले तर किती भयंकर अनर्थ करता येतो ना? आजकाल अशा अनेक बातम्या तुम्ही आम्ही ऐकत असतो आणि त्या तिथेच न थांबता त्यावर रसभरीत चर्चा व विश्लेषणेही केली जात असतात. म्हणजे असे की भाऊसारखा इतका बुद्धीमान पत्रकार, त्याने असे करावे? त्यामागे त्याचा काय डाव असेल? त्याला कोणाची फ़ुस असेल? कोण त्याचा साथीदार असेल? त्याविषयी पोलिसांनी अजून दखल का घेतलेली नाही? अजून त्याला अटक कशी होत नाही? पुढले पुढले प्रश्न व त्यांचे मनोरे उभे केले जात असतात. पण त्यात भाऊची आई मरण पावली होती आणि म्हणुनच अग्नीसंस्कार म्हणुन तिला जाळण्यात आले, याचा उच्चारही होऊ दिला जात नाही. थोडक्यात तुमच्या मनात भाऊविषयी शंका व संशय निर्माण करून त्याच्याबद्दल तुमच्या मनात संताप निर्माण करण्याचाच हेतू नसतो काय?
हे कसे चालते, त्याचे शेकडो दाखले देता येतील. गेली दहा वर्षे एक धडधडीत खोटे लोकांच्या गळी मारण्यात आलेले आहे आणि आजही चर्चा होतात, तेव्हा मोठमोठे पत्रकार, अभ्यासक त्याचा दाखला देत असतात. गुजरातची दंगल झाली, तेव्हा देशाचे पंतप्रधान असलेले वाजपेयी यांनी गुजरातला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही.’ आजही तुम्ही हे वाक्य अनेकदा ऐकत असाल. पण हेच वाक्य मुळात धडधडीत खोटे आहे. वाजपेयी असे कधीच कुठेच बोलले नाहीत. त्यावेळी ते पत्रकारांना म्हणाले, ‘राजा असतो त्याने धर्म, पंथ संप्रदाय विसरून सर्वाना एक न्यायाने वागवले पाहिजे. त्याला राजधर्म म्हणतात व मोदींनी त्याचे पालन केले पाहिजे. आणि मला माहित आहे मोदी त्याचेच पालन करीत आहेत.’ वाजपेयी यांचे ते भाषण आजही जसेच्या तसे युट्युबवर उपलब्ध आहे. कोणीही ते ऐकू व बघू शकतो. पण सतत दहा वर्षे वाजपेयी न बोललेल्या वाक्याच्या बातम्या रंगवून मोदींनी राजधर्माचे पालन केले नाही, असे आपल्या कानीकपाळी ओरडून सांगण्यात आलेले आहे. यालाच बनवेगिरी म्हणतात आणि ती सातत्याने चाललेली आहे. आपण सगळेच त्या बनवेगिरीचे बळी असतो. वाजपेयी बोलले नाहीत ते त्यांच्या तोंडी घालून बातम्या द्यायच्या आणि मग त्यावर सातत्याने चर्चा रंगवायच्या. मग ते ऐकणारा प्रत्येक बाबतीत खरे खोटे तपासायला जात नाही. त्यामुळे अफ़वाच सत्य असे आपल्या गळी मारले जात असते. आणि ही एकच बाब नाही. मोदींच्या बाबतीत हे सातत्याने होत आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वरूण गांधी यांनी आवेशात काही वाक्ये बोलले. तर त्यांनी जातीय द्वेष भडकवणारे भाषण केल्याचा माध्यमांनी इतका गदारोळ केला, की मुख्यमंत्री मायावतींनी त्याना अटकच केली होती. अटकेतल्या मुलाला भेटायला मनेका गांधी पोहोचल्या; तर त्यांना भेट नाकारण्यात आली. आणि अखेरीस त्यातून काय निष्पन्न झाले? वरूण गांधी यांच्या त्या भाषणात कुठलाही शब्द वा वाक्य चिथावणी देणारे नव्हते; असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे. मग आधी त्यांना अटक तरी कशामुळे झाली? त्यांचे शब्द चिथावणीखोर असल्याचे कोणी ठरवले? माध्यमांनीच हा तमाशा व बनाव घडवूना आणलानव्हता काय?
अगदी ताजी घटना घ्या गुरूवारी नरेंद्र मोदी हरीद्वार येथे बाबा रामदेव यांच्या पातंजली योगपीठ आश्रमात आचार्यकुलम या शाळेचे उदघाटन करायला गेलेले होते. तिथे भाषण करताना त्यांनी काही सांगितले त्याचाही असाच गैर अर्थ लावून गदारोळ करण्यात आला. मोदी म्हणाले, ‘२००२ची विधानसभा निवडणूक संपल्यावर केलेल्या पहिल्या भाषणात मी म्हणालो, ज्यांनी मला मते दिली वा नाही दिली, त्यांच्यासहीत ज्यांनी मतदानही केले नाही, अशा सर्वांचा आता मी मुख्यमंत्री आहे. कारण माझी परंपरा मला शिकवते, ‘सर्वसुखिना संतू’. यात सर्वे म्हणजे सगळे असा अर्थ आहे. फ़क्त हिंदू अशी शिकवण मला माझ्या परंपरेने दिलेली नाही. मी कधीच हिंदुंपुरता मुख्यमंत्री नव्हतो. आणि २००२ चे ते भाषण त्याचा पुरावा आहे.’ हे मोदींचे परवाचे भाषण आहे. त्यामध्ये त्यांनी आपण हिंदूंपुरते मुख्यमंत्री नाही, असे म्हटलेले नाही, तर दहा वर्षापुर्वीपासून आपली तीच भूमिका असल्याचा पुरावा दिलेला आहे. पण तमाम वाहिन्या व माध्यमांनी नेमके तेच वाक्य मोदी गुरूवारी प्रथम बोलले व आता पंतप्रधान व्हायचे आहे, म्हणून बोलले; असा कल्लोळ सुरू केला. यालाच शुद्ध बनवेगिरी म्हणतात. मोदी आपण हिंदूंचा नेता नाही, असे म्हणालेलेच नाहीत. आपण मुख्यमंत्री म्हणून कुठल्या एका पंथ धर्माचे नसतो, असे दहा वर्षेआधी त्यांनी म्हटलेले आहे. पण आजच ते तसे बोलले आणि पंतप्रधान होण्यासाठी बोलले, हीच मुळात फ़सवेगिरी आहे. आणि मग त्यावर तमाम जाणकार, अभ्यासक व राजकीय विश्लेषक राईचा पर्वत करण्यात रममाण झालेले होते. पण मुळात राई तरी कुठे आहे? निव्वळ फ़सवणूक नाही काय? माध्यमांची आजची स्थिती ही अशी अफ़वाबाज झालेली आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणात इंटरनेट, फ़ेसबुक वा अन्य सोशल मीडिया विकसित झाल्याने वाहिन्यांसहित माध्यमांच्या खोटेपणाचा प्रभाव निरुपयोगी ठरू लागला आहे. मुख्य माध्यमातील सेक्युलर बनवेगिरी व फ़सवणुकीला मोदी यांनी सोशल मीडियाचा कुशलतेने वापर करून चांगलच शह दिला आहे. त्यामुळेच आता माध्यमांचा व त्यांचे बोलविते धनी असलेल्या सेक्युलर भामट्यांचा खोटेपणा चालेनासा झाला आहे. पण किती सहजगत्या शब्दाच्या मांडणीतून लोकांची दिशाभूल करता येते; त्याचा हा नमूना. मात्र दहा वर्षांनी आता त्या खोटेपणा्चा बुरखा फ़ाटत चालला आहे. गुजरात व एकूणच नरेंद्र मोदीविषयक खोटारडेपणा उघड होऊ लागल्याने मोदींना रोखणे सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांना दिवसेदिवस अवघड होऊन बसले आहे. कारण आता लोक अन्य मार्गाने सत्य तपासू लागले आहेत व सत्य झाकून बसणार्या सेक्युलर माध्यमांना शह बसला आहे. त्यातूनच गुजरातचे सत्य लोकांपर्यंत जाऊ शकले आहे. सेक्युलर खोटेपणाचा हिडीस चेहरा लोकांसमोर येत चालला आहे.
( क्रमश:)
भाग ( १५६ ) २९/४/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा