जाफ़रभाई सरेशवाला नावाचा गुजराती मुस्लिम, ज्याने मोदींना थेट आंतराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलले होते; तो रातोरात सेक्युलर मंडळींचा जगभर हिरो झाला होता. पण तितक्याच वेगाने तो रातोरात त्याच सेक्युलर महानाट्यातला खलनायकही होऊन गेला. कारण त्याने गुजरातच्या मुस्लिमांना व दंगलपिडीतांना न्याय मिळावा, म्हणून मुख्यमंत्री मोदींना भेटायचे ठरवले होते. त्यासाठी आधी त्याने आपल्या धर्माची म्हणजे इस्लामची त्याला मान्यता आहे किंवा नाही; याची इंग्लंडाम्ध्येच काही मौलवीकडून चाचपणी केली. तीन वेगवेगळ्या मौलवींना त्याने याबाबतीत विचारले. ज्याच्यावर मुस्लिमांना मारले किंवा छळ केल्याचा आरोप आहे; ज्याला मुस्लिमांचा शत्रू मानले जाते, त्याच्याशी संवाद करावा काय? त्या मौलवींनी जाफ़रभाईला होकारार्थी उत्तर दिले. तेवढेच नाही, तर त्यासाठी इस्लामिक धर्मग्रंथ कुराण व हादीसमधील उतारे व आयता काढून दिल्या. त्यांचे अर्थही सविस्तर समजावले. मात्र हे धर्ममार्तंडही सेक्युलर दहशतीने किती भयभीत झालेले होते, ते बघण्यासारखे आहे. आज जगात सर्वात जिहादी व कडवे कट्टरपंथी म्हणून मुस्लिम मौलवींचा उल्लेख केला जातो. पण कुठल्याही कडव्या मुस्लिम मौलवी वा धर्मांध मुस्लिमापेक्षा सेक्युलर किती कट्टरपंथी ‘जिहादी’ आहेत; त्याचा हा जाफ़रभाईने घेतलेला अनुभव मोठा थरारक आहे. डोळ्यात अंजन घालणारा आहे. कारण शत्रूशीही संवाद करून उपाय मिळत असेल, तर त्याला प्राधान्य दिले पाहिजे व संवादच कुठल्याही विवादाचे उत्तर असते; असे मौलवी जाफ़रभाईला सांगत होते. सेक्युलर मात्र विसंवादच उत्तर असते; असा अट्टाहास धरून बसलेले होते. एका बाजूला संवाद व सहिष्णूतेची प्रवचने सेक्युलर देत असतात. पण संवाद किंवा विचारांनी प्रश्न सोडवण्यात, त्यांचीच कशी आडकाठी असते; त्याचा हा नमूना आहे. पण त्यांच्या विरोधाला जाफ़रभाई जुमानत नव्हता. त्याला हिंदू-मुस्लिम लढवायचे नव्हते; तर त्यांच्यात सलोखा निर्माण करायचा होता आणि त्यासाठी कोणाशीही संवाद करायची त्याने मनोमन तयारी केली होती. पण त्याचा सुगावा लागताच सर्वत्र जाफ़रभाईच्या विरोधात सेक्युलर काहूर माजवण्यात आले. त्यावर तो म्हणतो, ‘मी व्यावसायिक आहे. त्यामुळे कोणी आरोप केले वा संशय घेतला तरी सहन करू शकतो. पण इस्लामसाठी ज्यांनी आपले आयुष्य नि:स्वार्थीपणे खर्ची घातले, त्या तिघा मौलवींच्या विरोधात उठवण्यात आलेले काहूर संतापजनक होते.’
त्याच दरम्यान गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूकीसाठी परदेशी उद्योगपती व कंपन्यांच्या लोकाना भेटायला मोदी इंग्लंडला यायचे होते. तेव्हा दंगली संपुन दीड वर्षाचा कालावधी उलटलेला होता. ही माहिती मिळताच जाफ़रभाईने मोदींना तिथेच भेटायचे ठरवले. कारण मोदींना आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचायचे पाऊल उचलल्याने, त्याला परत गुजरातला यायची भिती वाटत होती. कारण उघड होते. गुजरातमध्ये कोणीही मुस्लिम सुरक्षित नाही, असा जगभर गवगवा करण्यात आला होता. कोर्टात मुस्लिमांना न्याय मिळू शकत नाहीत व गुजरातचे पोलिस मोदींचा इशार्यावर कोणालाही गठडी वळून गजाआड ढकलतात, ही समजूत पक्की तयार झाली होती. अशा पार्श्वभूमीवर मोदींना भेटायला भारतात येण्याची जाफ़रभाईमध्ये हिंमत नव्हती. सहाजिकच इग्लंडला येणार्या मोदींना तिथेच भेटून संवाद साधायचा विचार त्याने केला होता. याची खबर लागताच जगभरच्या तमाम सेक्युलर माध्यमात व टोळ्यांनी जाफ़रभाईवर गद्दार असल्याचा हल्ला चढवला. विकला गेल्यापासून विविध स्वरूपाचे आरोप सुरू झाले. त्याला खलनायक बनवण्याशी जणू स्पर्धाच लागली. पण त्याचा निश्चय पक्का होता आणि त्याने प्रयत्नही सुरू केले होते. मात्र मोदीपर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग त्याला सापडत नव्हता. गुजरातच्या दंगलीनंतर जे सेक्युलर काहूर उठवले गेले होते, त्यातून गुजरात सरकारशी सामान्य मुस्लिमांचा संपुर्ण संपर्कच तोडण्यात आलेला होता. मुस्लिमांच्या विविध संस्था, शाळा, इस्पितळे वा इतर कुठल्याही गोष्टीसाठी सरकार दरबारी जायचे; तर मग सेक्युलर पक्ष वा संघटनांच्या मर्जीवर अवलंबून रहाण्याची वेळ आलेली होती. कारण मुख्यमंत्री मोदी वा अन्य कुणा भाजपावाल्याशी मुस्लिमांचा संपर्कच शिल्लक नव्हता. आणि भाजपाशी संपर्क म्हणजे गद्दारीचा आरोप. मग जाफ़रभाईने मोदींशी भेट घ्यायची तर ती निश्चित कोणी करून द्यायची? मोदींपर्यंत जायचे कसे? त्यात एक छुपा रुस्तुम निघाला. त्याचे नाव महेश भट्ट.
मध्यस्थीला कुठलेच नाव सुचेना, तेव्हा जाफ़रभाईला अचानक चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचे नाव आठवले. त्यांनी गुजरातच्या दंगली झाल्यापासून सतत मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठवलेला होता. कदाचित महेश भट्ट त्यांचा कोणी परिचित आपली मदत करू शकेल, असे जाफ़रभाईला वाटले. त्यांनी महेश भटट यांच्याशी संपर्क साधला. पण तिथून नकारघंटाच ऐकू आली. मात्र काही दिवसांनी भट्ट यांनी स्वत: फ़ोन करून या कामी आपला मित्र इंडीया टीव्हीचा संपादक रजत शर्माचा मोदींशी संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून मोदींपर्यत पोहोचता येईल असे सुचवले. मात्र त्यासाठी जाफ़रभाईने रजत शर्माला तशी इमेल पाठवावी असे सुचवले. त्याप्रमाणे जाफ़रभाईने इमेल पाठवली आणि शर्मा यांनी ती मोदींपर्यंत पोहोचती केली. हा जाफ़रभाईने मोदींशी साधलेला पहिला संपर्क होता. याच माणसाने आपल्याला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचण्याचा उद्योग केला, याची मोदींना माहिती होती. पण त्याच्या अहमदाबाद येथील परिवाराची माहिती घेतल्यावर मोदींनी त्याला भेटायचे मान्य केले. पण अजून जाफ़रभाईच्या मनात अनिश्चितता होती. मोंदींच्या भेटप्रसंगी रजत शर्मा यांनीही हजर राहावे, असा आग्रह त्यांनी धरला. १७ ऑगस्ट २००३ या दिवशी मोदी इग्लंडला यायचे होते आणि जाफ़रभाईने आपल्या सल्लागार मौलवींसह त्यांची भेट घ्यायचे ठरवले होते. मात्र प्रत्यक्ष किती वेळ मिळणार याची काही खात्री नव्हती. आजवरचा जाफ़रभाईचा भारतीय मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा अनुभव असा होता, की फ़ारतर पाचदहा मिनीटांचा अवधी मिळेल आणि तेवढ्या वेळात आपण मुस्लिमांच्या न्यायाबद्दल कितीसे गार्हाणे मांडणार; अशी खंत त्याला होती. पण त्याची फ़िकीर नव्हती. कुठेतरी सरकारशी संवाद चालू व्हावा आणि शासकीय यंत्रणेकडून मुस्लिमांच्या समस्या व न्यायाचे गाडे सुरू व्हावे अशी त्याची अपेक्षा होती. आणि लक्षात घ्या त्यासाठी त्याला मोदींपर्यंतचा रस्ता प्रशस्त करणारा माणूस महेश भट्ट होता.
किती चमत्कारिक गोष्ट आहे ना? हाच माणुस नेहमी मोदींच्या विरोधात वाहिन्यांवर गरळ ओकताना दिसतो आणि कधीही त्याने खुलेपणाने जाफ़रभाई या मुस्लिमाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मोदींकडे पाठवल्याची वाहिन्यांवर बोलताना कबुली दिलेली नाही. जितक्या आवेशात वाहिन्यांवरून खोट्या अफ़वांवर हा माणुस मोदींच्या विरोधात बोलतो, त्यातले दोन सेकंद वापरून मोदींचा हा चेहरा त्याने का दाखवू नये? यालाच सेक्युलर दहशत म्हणतात. सत्य बोलण्याची हिंमत दाखवली; मग सेक्युलर टोळी तुमचा मुडदा पाडायला मागेपुढे बघत नाही. आपण मोदींच्या चांगल्या गोष्टीबद्दल खुलेपणाने बोललो; तर विनाविलंब जातीयवादी व हिंदूत्ववादी ठरवले जाण्याची भिती ज्याच्या मनात पक्की असते, त्याला सेक्युलर म्हणतात. आणि महेश भट्ट हा तसाच सेक्युलर आहे. म्हणूनच खुल्या व्यासपीठावर तो मोदींना शिव्या घालतो, पण खाजगीत मात्र मोदींच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतो. जाफ़रभाई पुरताच मोदींचा असा अनुभव नाही. वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनांच्या बाबतीतला खुद्द महेश भट्ट यांचा अनुभवही तितकाच धक्कादायक आहे. पण ते कधी त्याची जाहिर वाच्यता करणार नाहीत. कारण अर्थात त्यांना आपला सेक्युलर मुखवटा जपायचा असतो. जाफ़रभाई सोडा, महेश भट्ट सुद्धा मोदींचा अनुभव घेऊन बसला आहे. पण कधीतरी त्याने सत्य बोलण्य़ाची हिंमत केली आहे काय? असो, तर अशा मार्गाने प्रथम जाफ़रभाईचा मोदींशी संपर्क झाला आणि त्यांना मोदींना भेटण्याची संधी मिळाली. अर्थात तेव्हा मोदी हा खुप बदनाम माणूस होता. त्याला भेटायला कुठली गर्दी नव्हती. उलट त्याला भेटणे म्हणजेच पाप मानले जात होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. मोदींनी वेळ दिली होती आणि रजत शर्मा यांनी त्या बैठकीला हजर रहाण्याचे मान्य केले होते. अशा भेटीत काय होते, त्याचा जुना अनुभव जाफ़रभाईच्या गाठीशी होता, त्यामुळे कमीतकमी वेळात आपला विषय कसा मांडायचा याची फ़िकीर त्याला पडली होती. साधारणपणे मंत्री पाचदहा मिनीटे भेटतात. हस्तांदोलन, नावे विचारणे आणि मग अर्ज घेऊन निरोप. बाकी काही होत नाही. मोदी किती वेळ देणार, याची काही खात्री नव्हती. पण एकदा पाऊल उचलले तर माघार घेऊन चालणार नव्हते. जाफ़रभाईने आपल्या सोबत भाऊ तल्हा आणि एका वयोवृद्ध मौलवींना घेतले होते. आधी मोदींनी वेम्बली येथील एका हॉलमध्ये त्यांचा कार्यक्रम होता, तिथेच भेटायला बोलावले. पण खाजगीतच बोलायचे आहे असा आग्रह जाफ़रभाईने धरल्यावर, त्यांनी त्यांचा जिथे मुक्काम होता तिथे, म्हणजे जेम्स कोर्ट इथे बोलावले. संध्याकाळी पाच वाजताची वेळ दिलेली होती. अवघी पाचच मिनीटे आधी जाफ़रभाई तिथे जाऊन पोहोचले. पण तिथे त्यांना जो अनुभव आला, तो त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून गेला. यापुर्वी त्यांनी कॉग्रेसने बडे नेते व पंतप्रधान वा मंत्र्यांची भेट घेतली होती. पण त्या भेटी व मोदींची भेट, यातल्या फ़रकाने जाफ़रभाईला आपादमस्तक बदलून टाकले. काय असे घडले त्या भेटीत? ( क्रमश:)
भाग ( १५८ ) १/५/१३
काय घडले त्या भेटीत... जाणन घ्यायला उत्सुक ...
उत्तर द्याहटवा