बुधवार, १० एप्रिल, २०१३

शरद पवार या सहा अक्षरातली किमया




   सरसकट वृत्तपत्रे वाचली वा वाहिन्यांवरच्या चर्चा आपण ऐकल्या तर असे वाटते, की बेताल बोलणारे अजितदादा किंवा बलात्काराचा आरोप झालेले लक्ष्मण माने तेवढेच दोषी आहेत. बाकीचा समाज फ़ारच छानपैकी जीवन जगतो आहे. सर्वत्र सगळे सुरळीत चालू आहे. जणू हे दोघे किंवा त्यांच्यासारखे लोक मुळातच सदोष असतात आणि त्यांच्या हाती सत्ता, अधिकार वा संपत्ती आली नसती; तर असे काही विपरित घडलेच नसते. अशी एकूण समजूत आहे किंवा तशी समजूत विश्लेषणातून, भाषणातून व लिखाण, प्रतिक्रियेतून निर्माण केली जात असते. खरेच तसे असते काय? तसे असते तर अशा लोकांना बाजूला करण्यातून समाज खुपच सुखी होऊ शकला असता. समस्यामुक्त होऊन गेला असता. पण इतिहास तरी त्याची साक्ष देत नाही. जगाचा व मानवी इतिहास तपासला तर सगळी धडपड दुष्प्रवृत्त लोकांना दूर करण्यासाठीच झालेली दिसेल. आधीचे सत्ताधीश वा अधिकारी बाजूला करून नवे आणले जातात. पण सत्ता नसताना व सत्ता हाती घेतल्यावर माणसाच्या वर्तनामध्ये आमुलाग्र फ़रक पडत असतो. सत्ता हाती नसताना अन्यायाच्या विरोधात तावातावाने बोलणारे सत्ता हाती आल्यावर त्याच अन्यायाचे कायदा वा न्याय म्हणून समर्थन करताना दिसू लागतात. हा बदल त्या माणसांमध्ये कसा व कशामुळे घडतो? राहुल गांधी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीपुर्वी भट्टा परसोल या गावातल्या भूमी अधिग्रहणाच्या विरोधात घसा कोरडा करीत होते. पण तसाच विषय हरयाणा राज्यात त्यांचेच सरकार व मेहूण्याच्या विषयात पुढे आल्यावर; राहुलची बोलती बंद झालेली होती. नंदिग्राम व सिंगूर येथील पोलिस कारवाईनंतर तिथेच ठाण माडून उपोषण करणार्‍या ममता बानर्जी; मुख्यमंत्री होताच पोलिसांच्या गोळीबार लाठीमाराचे समर्थन करू लागल्या आहेत ना? पण हाही फ़रक एकवेळ सुसह्य असतो. कारण सत्ता राबवणार्‍यांना कठोर व्हावेच लागते. पण सत्ता, अधिकार व संपत्ती हाती आली म्हणून अकारण सामान्य माणसावर अत्याचार करण्याची वृत्ती भीषण असते. तो मस्तवालपणा असतो. तीच सर्वात भीषण अमानुष नशा असते.

   सत्ता, संपत्ती हाती नसते, तेव्हा न्यायाच्या गप्पा मारून पोट भरता येते. पण जेव्हा त्या गोष्टी हाती येतात, तेव्हा त्या पचवणे खुपच अवघड काम असते. आपण अमुकतमूक आहोत, म्हणजे आपण सामान्य नसून असामान्य आहोत, अशी जी धारणा मनात तयार होते; ती त्या व्यक्तीमत्वावर प्रभाव गाजवू लागते. आपण मुख्यमंत्री, मंत्री, आमदार वा खासदार आहोत, किंवा आणखी कोणी अधिकारी वा विशेष व्यक्ती आहोत; अशी जी अहंगंडाची बाधा माणसाला होते, तिथून सगळी समस्या सुरू होत असते. त्यासाठी तुमच्या हाती किती मोठा वा छोटा अधिकार आहे; त्याच्याशी मतलब नसतो. त्या अधिकाराचा वापर करून तुम्ही इतर कुणावर तरी जी हुकूमत व जरब प्रस्थापित करू लागता, तिथून सगळी गडबड सुरू होते. तीच खरी रोगबाधा असते. कारण हातात अधिकार, पैसा व सत्ता आली असल्याने; सामान्य माणूस तुमच्यापेक्षा दुबळा झालेला असतो. आणि सामान्य माणुस ते गृहित धरूनच वागत असतो. तेवढ्यावर समाधान मानले तरी खुप असते. पण सहसा असे होत नाही. अधिकार व सत्तेचे प्रदर्शन करायची प्रबळ इच्छा सतावू लागते. त्यासाठी मग असा सत्ताधीश वा पैसेवाला इतरांच्या आयुष्यात कुरघोडी करायला धडपडू लागतो. आपले वर्चस्व सिद्ध करायची अतीव इच्छा त्याला शांत बसू देत नाही. मोठेपणा मिरवण्याची व सिद्ध करण्याची लालसा त्याला चिथावण्या देऊ लागते. आपल्या गाववस्तीपासून कुठल्याही मोठ्या शहरातल्या अशा बलवान व्यक्तीकडे बघा, याचीच साक्ष तुम्हाला मिळेल. कुठल्याही काळात, समाजात वा देशात बघा, ज्यांच्या हाती निर्बंध सत्ताधिकार आलेला असेल; त्याच प्रमाणात त्यांनी इतार समाजघटक व लोकांवर अन्याय केल्याचे आढळून येईल. इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन वा लिबीया्चा हुकूमशहा कर्नल गडाफ़ी ह्यांच्यासकट त्यांच्या मुलांनी कोणते प्रताप केले होते? त्यांच्या जीवनात कुठल्या सुखाची कमतरता होती? मग त्यांनी केवळ गंमत किंवा मौज म्हणून सामान्य माणसांच्या आयुष्याशी विकृत खेळ करण्याची काय गरज होती? तसे न करता सामान्य लोकांच्या जीवनात फ़ारसा हस्तक्षेप केला नसता; तर त्यांची तीच अनिर्बंध सत्ता दिर्घकाळ लोकांनी गुण्यागोविंदाने चालू दिली असती. निदान ती सत्ता उलथून पाडण्याला लोकांचा पाठींबा वा समर्थन तरी मिळाले नसते. पण तसे होत नाही. ज्यांच्या हाती अशी अनिर्बंध सत्ता व अधिकार येतात, तेच त्यांना शहाण्यासारखे वागू देत नाहीत.

   सत्तेची मस्ती, अधिकाराची गुर्मी अशा लोकांच्या वागण्यातून, हावभावातून आपण स्पष्टपणे बघू शकतो. माणसात व पशूत एक मूलभूत फ़रक आहे. बळाचा वापर न करता बुद्धीने सहजीवनाची स्थिती माणसाने मान्य केली असली; तरी देहपातळीवर माणूसही प्राणीच आहे व त्याच्यात पशूंच्या उपजत प्रवृत्ती कायम आहेत. सामाजिक व सांस्कृतिक प्रगल्भता येत असताना, त्या उपजत वृत्तींना सुप्तावस्थेमध्ये नेण्याचे संस्कार माणसावर केले जात असतात. पण अजूनतरी अशा उपजत वृत्ती पुर्णपणे निकामी करून टाकणे शक्य झालेले नाही. सहाजिकच जेव्हा अधिकार हाती येतात, तेव्हा जी सत्तेची, शक्तीची झिंग चढते, त्यावेळी त्या उपजत पाशवी प्रवृत्ती उचल खावू लागतात. त्यांना लगाम लावणे व वेसण घालून नियंत्रणात ठेवणे; म्हणजेच माणूस बनणे असते. ज्याला ते साध्य होते, त्याला सत्ता व अधिकार पचवणे सहजशक्य होते. तो सुसंस्कृत व लोकप्रिय नेता सत्ताधारी म्हणून मान्यता पावतो. पण सर्वांनाच तेवढा पल्ला गाठता येतो असे नाही. अधिकार विनाशक शक्तीसारखे असतात. त्यांच्यात विधायक बळ असते; तसेच विध्वंसक ताकदही असते. तुम्ही तिचा कसा वापर करणार त्यावरच तिचे परिणाम अवलंबून असतात. दिर्घकाळ शरद पवार सत्तेच्या राजकारणात आहेत, त्यांनी हाती आलेल्या अधिकाराचा जपून वापर करण्यावर भर दिला म्हणून ते टिकून राहिले आहेत व सत्ते इतक्याच त्यांनी लोकांच्या सदिच्छा जमा केल्या आहेत. आपल्या अधिकार व सत्तेचे प्रदर्शन त्यांना मांडायची कधी गरज भासली नाही. अगदी त्यांच्यावर कडवी टिका करणार्‍यांना सुद्धा पवार यांच्या गुणवत्तेची दखल घ्यावी लागते व त्यांच्या संयमी सुसंस्कृत वृत्तीचे कौतुक करावेच लागते. कारण सत्ता व अधिकारातून येणार्‍या जबाबदारीचे भान त्यांनी कायम ठेवलेले आहे.

   लक्ष्मण माने यांच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नामधारी पद स्विकारताना त्यांनी एक अधिकार माने यांना बहाल केला. ‘पवार’ या नावाचा दबदबा आहे आणि तीच सत्ता होती, हे माने यांनी कधी समजून घेतले होते काय? संस्थेची उभारणी करताना त्यामागची सर्वात मोठी ताकद ‘शरद पवार’ एवढी सहा अक्षरेच होती. याची जाणीव प्रत्येक क्षणी ठेवायला हवी होती. कारण त्याच सहा अक्षरामुळे त्यांनी उभारलेल्या संस्थेला खरे बळ मिळाले होते. पवार अध्यक्ष आहेत, याचा अर्थच कुणाकडेही कामासाठी, मदतीसाठी गेलात तर तीच सहा अक्षरे प्रभाव पाडत होती. काम सोपे करत होती. त्या सहा अक्षरांची आजच्या व्यवहारी जगातील पत निर्माण करण्यासाठी सत्तेचे कडू घोट शरद पवारांनी किती दिर्घकाळ पचवलेले आहेत; याचा माने वा अन्य कोणी विचार केला आहे काय? सत्ता आली वा मिळवली, मग ती मोकाट मनसोक्त भोगायच्या मोहात आपल्या आरंभ काळात शरद पवार सापडले असते; तर त्या सहा अक्षरांभोवती आज जमलेली प्रतिष्ठा उभी तरी राहिली असती काय? सत्ता, अधिकार वा पैसा ह्या सर्वात भीषण नशा असतात. त्या पचवणे सर्वाधिक अवघड काम असते. शरद पवार यांनाही कोवळ्या वयात सत्ता व अधिकार हाती आले होते. त्यांनीही त्यांची झिंग चढू दिली असती; तर त्यांच्या नावातल्या सहा अक्षरांभोवती आजचे वलय निर्माण होऊ शकले असते काय? ज्यांना ज्यांना पवारांनी संधी देण्याचा प्रयास केला; त्यांनी कधीतरी त्याचा विचार केला आहे काय? राजकीय चुका पवार यांच्याकडून अनेक व अगणित झाल्या असतील. पण मस्ती वा बेतालपणाचा आरोप त्यांच्यावर कोणी करू शकणार नाही.

   सत्ता हाती येते वा अधिकार मिळतात, ते खेळवणे हा हातात निखारे खेळवायचा प्रकार असतो. हात न पोळता तुम्ही तो खेळ करून दाखवलात तर वहावा मिळत असते आणि त्याचाच पोरखेळ केलात; तर चटके बसतात आणि निंदाही पदरी पडत असते. राजाच्या डोक्यावर मुकूट ठेवला जातो, त्याची महता काय असते? कोणी त्याला काटेरी मुकूट म्हणतात; कोणी सोनेरी म्हणतात. पण त्या मुकूटाची रचना बघितली तर कळेल, की ती जबाबदारी असते. अहंकाराने मान खुप ताठ केली, तर तोच मुकूट गळून पडतो. पण त्याच्या ओझ्याने मान झुकलेली असेल, तर त्याच मुकूटामुळे तमाम लोक तुमच्यापुढे नतमस्तक होत असतात. म्हणजेच राजमुकूट डोक्यावर टिकवण्यासाठी नम्र असावे लागते आणि तरच लोक तुमच्या पुढे नतमस्तकही होतात. त्याचीच मस्ती दाखवायला गेलात; मग मुकूट घसरून पडतो आणि लोकही तुम्हाला किंमत देत नाहीत. पण त्याची जाणिव फ़ार थोड्यांना असते आणि म्हणूनच अनेकजण औटघटकेचे राजे होतात व कालौघात नष्ट होऊन जातात. म्हणूनच म्हणतात सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता पुरता भ्रष्ट करून सोडते. सत्तेचा पाय जबाबदारीच्या दोरीने जखडला आहे, याचे भान सुटलेले अडखळून पडतातच. मग ते राजकारणातले असोत वा लहानमोठ्या संस्थेतले असोत. कुठल्या संघटना वा चळवळीतले असोत वा कुठल्याही विचारसरणी, तत्वज्ञानाचे असोत. मुद्दा विचार वा संघटनेचा नसतो, त्या त्या व्यक्तीच्या सत्ता पचवण्याच्या कुवतीचा असतो.    ( क्रमश:)
 भाग   ( १३८ )    ११/४/१३

1 टिप्पणी:

  1. भाऊ, तुमच्या या लेखातील मते आणि 'माणसे अशी बेताल बेछूट वागतातच का?' या लेखातील मते सारखीच वाटली. या लेखात नवीन काही वाचल्याचा आनंद मिळाला नाही हे प्रांजळपणे नमुद करतो. धन्यवाद.
    -अवि

    उत्तर द्याहटवा