सातारा येथील लक्ष्मण माने प्रकरणात फ़सलेल्या महिला सामान्य घरातल्या व कष्टकरी आहेत म्हणुन त्यांच्या चारित्र्याबद्दल सहज शंका घेतल्या जात आहेत. यातून आपल्या प्रतिष्ठीत वर्गातील मानसिकता उघड होते. कारण हाच वर्ग महिलादिन व महिलांच्या अधिकार, सबलीकरणाची अहोरात्र पोपटपंची करत असतो. त्याला मी नेहमी पोपटपंची का म्हणतो, त्याचेच उत्तर या घटनाक्रमाने दिले आहे. वर्षा देशपांडे व डॉ. बाबा आढाव अशा तमाम पुरोगाम्यांची नेहमी अशा प्रकारात आघाडी असते. पण त्यात आपलाच एकजण गुंतला आहे म्हटल्यावर त्यांच्यात कमालीच औदासिन्य आलेले आहे. जे काही असेल ते कायद्यानुसार व्हावे, अशी तटस्थ भूमिका त्यांनीपुढे आणलेली आहे. इतर प्रसंगी ‘घरचे कार्य’ असल्याप्रमाणे दौडणारी ही मंडळी एकदम थंड पडली आहेत. पण मुद्दा त्यांच्या औदासिन्याचा नसून एकूण समाजातील महिलाविषयक नजरेचा व दृष्टीकोनाचा आहे. गरीब घरच्या व गरजू म्हणून त्याच महिलांनी माने यांना वासनाकांडात ‘ओढलेले’ असू शकते असाही एक सूर आहे. पण अशा महिला अगदी ‘तशा’ वागल्या तरी कुठल्या अगतिकतेमुळे वागतात, त्याकडेही बघणे आवश्यक नाही का? काही वर्षापुर्वी ‘इंडिया टुडे’ नामक नियतकालिकात ‘अशा’ उच्चभ्रू महिलांवर एक लेख आलेला होता. चैनीच्या आहारी गेलेल्या व नातेसंबंधाचे पावित्र्य झुगारून दिलेल्या काही महिला, कशा बड्या पैसेवाल्यांच्या सखी म्हणून दरमहिना मोठ्या किंमतीवर सोबत करतात व त्यालाच सेवा म्हटले जाते; असा तो तपशील होता. मुंबई दिल्लीसारख्या महानगरामध्ये भव्य फ़्लॅट व ड्रायव्हरसह कार अधिक महिना काही लाख रुपये मोजणारा ‘मालक’ अशा महिलांची सेवा घेत असे. तो अत्यंत प्रतिष्ठीत पेशा समजला जात असल्याचे त्यात म्हटले होते. म्हणजेच त्या महिला कायमस्वरूपी नोकरी म्हणून देहविक्रयच करणार्या होत्या. पण त्यांचा असा उद्योग हा छानछोकी व चैनीसाठी चालू होता व आजही असेल. त्यांच्या पावित्र्याला कोणी कधी प्रश्नचिन्ह लावलेले नाही. अगदी उच्चभ्रू वर्गात अशा महिलांची उठबस असते आणि त्याची पाठीमागे कुजबुजही चालते. त्यांच्याविषयी असे कोणी कुत्सितपणे बोलत नाही. त्याच्या नेमकी उलट या सामान्य अगतिक महिलांची स्थिती असते. त्यांच्यावर अशी परिस्थिती लादली जात असते. जगण्याचा अन्य पर्याय नाही म्हणूनच त्यांना अशा कर्दमात ओढले जात असते.
आता त्यांची अगतिकता म्हणजे तरी काय असते? घरात चार तोंडे असतात आणि त्यांच्या पोटाची आग विझवायची तर घरातली चुल पेटणे अगत्याचे असते. ती चुल पेटवून चार घास कुटुंबाच्या तोंडात पडावे म्हणून कुठलेही काबाडकष्ट करायला त्या महिला तयार असतात. पण ते कष्टाचे काम मिळेलच, अशी खात्री नसते. नुसते काम नको असते तर नोकरीची म्हणजे नियमित उत्पन्नाची शाश्वती हवी असते. ती शाश्वती जो देऊ शकेल तो अशा गरजू महिलांसाठी साक्षात ‘परमेश्वर’ असतो. आणि हे सर्व घरासाठी करायचे आहे. आपल्या चैनीसाठी वा छानछोकीसाठी नाही. मौजेसाठी नव्हे. कष्टातून प्रामाणिकपणे चार पैसे कमावता आले तर हवे असतात. कारण समाज शिष्टाचार मोडणे म्हणजे पाप, अशा भयाने जगणार्या वर्गातून आलेल्या या महिला असतात. म्हणजेच त्या महिला मुले, किंवा घरातल्या अपंग यांच्यासाठीच उंबरठा ओलांडून बाहेर पडलेल्या आहेत; हे विसरता कामा नये. आणि पुन्हा त्यातून त्यांना कुटुंबाची गाडी पुन्हा रुळावर आणायची असते. त्याच अगतिकतेचा कोणी फ़ायदा घेऊ नये, म्हणून चाललेल्या कार्यालाच सामाजिक चळवळ म्हणतात ना? दलित, पिडीत, गांजलेल्यांना त्यातून बाहेर काढण्याच्या प्रयासांनाच चळवळ म्हणतात ना? की अशा गरजू व अगतिकांच्या लाचारीचा फ़ायदा उठवण्याला चळवळ म्हणतात? चळवळीची व्याख्या तरी काय? जे कोणी आज माने प्रकरणातून चळवळीला इजा होईल, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची हानी होईल; म्हणुन अस्वस्थ झालेत व चिंता करीत आहेत, त्यांना सामाजिक चळवळीचा गाभा तरी कळला आहे काय? झालेली हानी लक्षात तरी आलेली आहे काय? ज्यांनी शोषितांना आधार द्यायचा, अशा संस्थेतच या महिलांना भयंकर अनुभव आलेला आहे. तिथेच चळवळीची मोठी हानी झालेली आहे. कारण कुंपणच शेत खाते असा संदेश आधीच अशा तक्रारींनी गेलेला आहे आणि त्याला सर्वात अधिक जबाबदार ‘चळवळ’ म्हणून मिरवणारेच जबाबदार आहेत.
अशा तक्रारी अचानक होणार नाहीत. वर्षा देशपांडे यांच्यासारखी कार्यकर्ती ‘असंतोष कानावर होता’, अशी कबुली देते. तेव्हाच खर्या चळवळवाल्यांनी सावध व्हायला हवे होते ना? कारण ज्या चळवळीत माने कार्यरत होते व मिरवत होते; त्याच चळवळीचे विधायक स्वरूप म्हणून ही संस्था चालविली होती. म्हणून अशा संस्थेत कुठेही खुट्ट वाजले तर त्याचे चळवळीच्या चारित्र्यावर पडसाद उमटणार, हे वेगळे सांगायला हवे काय? साधू वा पुण्यपुरुषाच्या आश्रमात किंचितही शंकेला जागा असून चालत नाही. आणि इथे तर वर्षाताईच असंतोष असल्याची ग्वाही देत आहेत. त्याचे स्वरूप कुठलेही असो, न्यायासाठी काम करणार्या संस्थेमध्ये असंतोष असणेच मुळात खुलाशासाठी, निरसनासाठी पुरेसे कारण असते. त्याची दखल आज चळवळीचा ऊर बडवणार्यांनी वेळीच का घेतली नाही? त्यातच त्यांची सामाजिक परिवर्तन व चळवळीविषयीची आस्था स्पष्ट होत नाही काय? सामाजिक न्यायाच्या लढ्यात वा कार्यात अन्यायाच्या संशयाला व वासालाही स्थान असू शकत नाही. पण इथे तसे झालेले नाही. त्यामुळेच परिस्थिती इथपर्यंत आलेली आहे. माने फ़रारी होऊन त्यांनी एकूणच चळवळीला तोंडघशी पाडले आहे, त्यामुळेच खरे तर चळवळीचे नाव घेणार्या कोणीही त्यांच्याविषयी सहानुभूतीही दाखवण्याचे कारण उरत नाही. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आरोपांना घाबरून चालत नाही. जे व्हायचे ते नुकसान आता होऊन गेलेले आहे. कायद्याने तपास करून व न्यायालयात जाऊन काही सिद्ध होण्याची शक्यता बघणे, ही कार्यकर्त्याची भूमिकाच असू शकत नाही. आणि अशी बेअब्रू केवळ माने यांच्याच संस्थेची झालेली नाही तर अशाच क्षेत्रात काम करणार्या तमाम संस्थांना त्यांनी संशयाच्या भोवर्यात आणून सोडले आहे. पण चळवळीची चिंता करणार्यांना त्या कार्य वा हेतूची झालेली नासाडी दिसत नाही काय? त्यापेक्षा त्यांना आपल्यातल्या एकाचा बुरखा फ़ाटणार काय; याचीच अधिक चिंता लागून राहिलेली दिसते. माने सहीसलामत सुटावे असा एकूण सुर जाणवतो. कारण कुणाला त्या महिलांच्या न्यायाची वा अन्यायाची फ़िकीर कुठे दिसली नाही.
ज्यांना खर्या संरक्षणाची व मदतीची आज गरज असेल तर ती त्या महिलांना आहे. अशा महिला नुसत्या कष्टकरी नसतात, त्या घर संभाळण्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी करायला सज्ज झालेल्या असतात. आणि घर हा त्यांचा व्यक्तीगत मामला मानायचे कारण नाही. अनेक घरे कुटुंबे मिळूनच वस्ती व समाज बनत असतो. त्याच समाजाला असे घर देणारी व घर चालवणारी स्त्री त्या समाजाचा खरा आधार असते, जिला चुल मुल संभाळणारी म्हणून हिणवले आते; तीच खरी समाज नावाच्या अस्थिर कळपाला स्थैर्य देणारे माणूस असते. कुठल्याही सामान्य स्त्री मुळेच समाज उभा असतो. अगदी ती आपल्या घरातले काम संभाळणारी गृहिणी असो किंवा मोलमजुरी करताना अन्य कुणाचे घरकाम करणारी असो. तीच चार भिंतींना घर असा अर्थ प्राप्त करून देत असते. स्वत:चा संसार संभाळून दुसर्या घरी घरकाम करणारी तर आणखी मोठी सामाजिक आधार असते, कारण ती दोन वा तीन कुटुंबांना घरपण बहाल करीत असते. घरात चुल पेटते म्हणून कुटुंब एकत्र जेवते, जगते. म्हणजेच ती मोलकरीण, स्वयंपाकीणच मालकीणीच्या कुटुंबाचेही घरपण टिकवायची किमया करीत असते. तिचे काम कष्टाचे आहे, म्हणून तिला हलके समजणारे व लेखणारे मु्ळात समाज व स्त्रीलाच समजू शकलेले नसतील तर सामाजिक परिवर्तन काय घडवणार? आणि त्याच कष्टाळू कर्तबगार महिलेचे सबलीकरण तरी कसले कप्पाळ करणार? हे प्रकरण चव्हाट्यावर आल्या्पासून म्हणूनच मला चळवळीचे नुकसान व हानी असे बोलणार्यांचा अधिक संताप आलेला आहे. कारण त्यातल्या कुणालाही त्या महिलांच्या प्रतिष्ठा व न्यायापेक्षा आपल्या चळवळ नामक भंपकपणाच्या प्रतिष्ठेची काळजी लागून राहिलेली आहे. ज्या चळवळीचा हेतू व उद्दीष्टच महिलांचे सबलीकरण व परिवर्तन आहे, त्याचाच मुडदा पाडला गेल्याची तक्रार झाली असताना, ही मंडळी तळमळणार्या चळवळीच्या आत्म्याची फ़िकीर करत नाहीत. त्यांना चळवळीच्या आत्म्यापेक्षा संस्था व त्यातल्या मान्यवरांच्या दिखावू प्रतिष्ठेच्या मुडद्याची अधिक चिंता लागलेली आहे. महिलांचे नुकसान व यातना, यापेक्षा चळवळीला इजा होता कामा नये, ही बाबा आढावांची भाषा आश्चर्यकारक म्हणावी की संतापजनक मानायची? त्या महिलांना न्याय देताना चळवळ बळी पडली तरी फ़िकीर नाही, असे खरा हाडाचा कार्यकर्ता म्हणाला असता. परंतू जे कोणी गेल्या दोन आठवड्यात समोर आले व चळवळीचे गोडवे गाताना दिसले; यापैकी कोणी तरी सर्वात अधिक व पहिले प्राधान्य त्या पिडीत महिलांच्या न्यायाला आहे, असी चुकून तरी बोलला आहे काय? नसेल तर अशी चळवळ जगली काय नि मेली काय, असा कुठला परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये फ़रक पडणार आहे? ( क्रमश:)
भाग ( १३५ ) ८/४/१३
सातारकरांची खरी कसोटी आहे यात.
उत्तर द्याहटवा'मानेंनी पोलिसांना शरण यावे - शरद पवार' ही वध्र्याच्या वार्ताहराने दिलेली बातमी वाचली (लोकसत्ता ८ एप्रिल ). पुण्यातही शरद पवार यांनी माने यांना शरण येण्याचे आवाहन केले होते त्याची बातमी इतर वृत्तपत्रात आली आहे (७ एप्रिल). त्या बातमीतील पवार यांची मुक्ताफळे वाचली आणि ते गप्प राहिले होते तेच बरे होते असे वाटून गेले. सर्वात पहिला विनोद त्यांनी केला की 'मला ही बातमी वृत्तपत्रातून समजली'. महाराष्ट्राच्या मातीचे पुसटसे हुंकारही ज्यांना ऐकू येतात, त्यांना आपण अध्यक्ष असलेल्या संस्थेतील व्यक्ती बेपत्ता झाली आहे हे वर्तमानपत्र वाचून समजते यावर कोण विश्वास ठेवील?
उत्तर द्याहटवामुक्ताफळ क्र. २- 'माने यांनी शरण येऊन आपली भूमिका मांडावी'. माने एक संशयित आरोपी आहेत त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांच्या प्रश्नाला उत्तरे देणे अपेक्षित आहे, भूमिका मांडायला ते काय साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आहे काय? विनाकारण भूमिका शब्द वापरून पवार यांनी माने यांना अवास्तव महत्त्व दिले आहे.
मुक्ताफळ क्र. ३ - 'बेपत्ता असले की नेमके सत्य काय याबाबत चर्चा होते -सत्य असत्याच्या संघर्षांत असत्याचा विजय झाल्याचे जाणवते,' हे विधान सरळसरळ तपास यंत्रणेवर दबाव आणणारे आहे. ज्या पाच स्त्रियांनी हे आरोप केले आहेत ते 'असत्य', असाच अर्थ या वाक्याचा होतो.
पवार यांनी खरे म्हणजे हे समजल्यावर ताबडतोब संबंधित संस्थेचे अध्यक्षपद सोडायला हवे होते. असे न करता लक्ष्मण माने यांना वाचवण्याचा प्रयत्न ते करताहेत हेच यावरून सिद्ध होते.
- शुभा परांजपे, पुणे
पुरोगामी चळवळीतील लोकांची दुटप्पी भूमिका गेल्या काही लेखांमधून सातत्त्याने मांडल्याबद्दल आपले आभार. आपले हे लेख महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आपले लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावे आणि ते ही लवकरात लवकर, अशी आपल्याला विनंती.
उत्तर द्याहटवा