शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

सत्य जाणून घेण्याची हिंमत महत्वाची



   गुरूवारी प्रसिद्ध झालेला माझा लेख वाचून अनेक वाचकांचे फ़ोन आले. त्यात सादीकभाई म्हणून एका मराठी वाचक मुस्लिमाचाही फ़ोन होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून ते बोलत होते. माझे लेख वाचून इतरांप्रमाणे त्यांनाही मोदीविषयक नवीच काही माहिती मिळाल्याने धक्का बसणे स्वाभाविक आहे. आजवर माध्यमातून मोदींच्या विरोधी इतका भयंकर प्रतिकुल प्रचार झाला आहे, की हा माणूस मुस्लिमांचा खाटीक अशी एक धारणा तयार झाली; तर नवल नाही. सहाजिकच त्याच्या कुठल्याही गुणांबद्दल वा त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल बोलले, तर विश्वास बसणे अवघडच आहे. थोडक्यात मोदी यांची इतकी मलीन वा खुनशी प्रतिमा बनवण्यात सेक्युलर माध्यमांनी मोठेच यश मिळवले, हे मान्यच करायला हवे. त्यामुळेच ही दुसरी बाजू वा त्यातले अनेक तपशील वाचून कुठलाही मुस्लिम वाचक अस्वस्थ होण्यात चुक नाही. त्या तपशीलावर मुस्लिमांचा विश्वास बसणे अवघड आहे. पण मी इथे जे तपशील व पुरावे देतो आहे व ज्यांची साक्ष काढतो आहे; ती वस्तुस्थिती नाकारणेही अशक्य आहे. कारण जाफ़रभाई सरेशवाला हा मुस्लिम आहे आणि तो नुसताच मोदींचे कौतुक करत नाही, तर त्यांच्या कारकिर्दीपेक्षा कॉग्रेसच्या कारकिर्दीमध्ये मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचतो आहे. तेवढेच नाही तर कॉग्रेसच्याच राज्यात गुजरातचे पोलिस व सरकारी यंत्रणेला मुस्लिमांच्या विरोधात वागण्याचे कसे संस्कार देण्यात आले; त्याचा सगळा इतिहासच जाफ़रभाई सांगतो आहे. तेव्हा कोणीही सामान्य बुद्धीचा मुस्लिम असेल, तर त्याचे त्याबद्दल कुतूहल निर्माण व्हायलाच हवे. शिवाय जी माहिती व तपशील जाफ़रभाई देतो, ती अदभूत वाटावी अशी असते. कारण ती माहिती कधीच सेक्युलर माध्यमांनी समोर आणलेली नाही. पण दुसरीकडे ती माहिती नाकारताही येत नाही. त्यामुळे तिच्याकडे कोणीही शहाणा किंवा समतोल बुद्धीचा माणूस दुर्लक्ष करू शकणार नाही. सादिकभाई मला तसाच माणुस वाटला. कारण त्यांनी मोदींचे कौतुक होते किंवा अशी काहीशी रागाची भाषा वापरली नाही, की तक्रार केली नाही. उलट या विषयावर मोहल्ल्यात येऊन भाषण प्रश्नोत्तरे करायचा आग्रह माझ्याकडे धरला. याला वैचारिक सहिष्णुता म्हणतात. ज्याच्याबद्दल आक्षेप आहेत, त्याचे निरसन करून घेण्याला महत्व असते.

   जसे सादिकभाई आहेत, तसेच अनेक नाराजही आहेत. त्यांना मोदींची बाजू वा त्यामागचा खरा तपशीलही ऐकायची भिती वाटते. मोदींबद्दल त्यांची मते ठाम आहेत आणि हा माणूस सैतान आहे याबद्दल खरेखोटे तपासण्याची त्यांना गरजही वाटत नाही. त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यात अशा नाराजांच्याही काही प्रतिक्रिया मला मिळालेल्या आहेत. पण त्याच्या अनेकपटीने मोदींच्या चहात्यांच्याही प्रतिक्रीया माझ्याकडे आलेल्या आहेत. यात चांगल्या प्रतिक्रीया अधिक व नाराजांच्या नगण्य आहेत, म्हणून मी खुश अजिबात नाही. कारण माझी भूमिका सत्य समोर आणावे एवढ्यापुरती मर्यादित आहे. म्हणूनच मी सत्याचा शोध घेऊन काही मांडतो आहे. विशेष म्हणजे अजून तरी मी कुणा मुस्लिमाची अशी साक्ष सादर केलेली नाही, की जो मोदींचे कौतुक करतो आहे. जाफ़रभाई असो, की आणखी कोणी गुजरातचा मुस्लिम असो, त्याने मोदी विरोधातील बातम्या व माहितीला छेद देणारे जे काही सांगितले, तेवढेच इथे मांडले आहे. किंवा आजवर मोदींच्या विरोधात वा दंगली संदर्भात जी माहिती समोर आली वा लपवली गेली; त्याचीच तुलना मी केलेली आहे. मोदी यांनी मुस्लिमांसाठी गुजरातमध्ये काय चांगले काम केले, त्याची वाच्यता मी अजून केलेली नाही. कारण ती मोदी विरोधकांना उलट्या आणायला भाग पाडणारी माहिती आहे. पण ती नंतर बघता येईल. आधी मोदींच्या विरोधात जे काही दहा वर्षात सांगितले गेले व त्यांच्याविषयी प्रयत्नपुर्वक सेक्युलर गोटातून मत बनवण्याचा प्रयास झाला; त्याचीच सत्यासत्यता तपासण्याची मर्यादा मी संभाळली आहे. कारण ती पार्श्वभूमी जोवर समोर येत नाही, तोपर्यंत गुजरातच्या २००२ च्या दंगलीचा खरा चेहरा आपल्याला ओळखता येणार नाही. तोच ओळखता आला नाही, तर मग त्यातला मोदींचा हिस्सा किंवा जबाबदारी ठरवता येत नाही. मग निर्माण होतात, ते निव्वळ गैरसमज असतात. म्हणूनच कालचा लेख वाचून सादिकभाईंचा फ़ोन आला व त्यांनी उत्सुकता दाखवली; ती मला खास आवडली. शेवटी जीवनात तुम्हाला सत्याकडे व वास्तवाकडे पाठ फ़िरवून जगता येत नसते. विशेषत: जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा वास्तवाचाच आधार घ्यावा लागत असतो. आणि गुजरातच्या दंगलीबद्दल गुजरात बाहेर पसरवलेले गैरसमज दूर होणे अगत्या्चे आहे, असे गैरसमज पसरवण्यामागचे दुष्ट हेतू उघड होणे आवश्यक आहे. तरच त्यापासून धडा घेता येऊ शकतो आणि वास्तविक जीवनातील प्रश्न भारतीय मुस्लिमांनाही सो्डवता येऊ शकतील. त्यांच्याच जीवनातील नव्हेतर एकूणच बिगर मुस्लिमांच्या मनातल्या अढी व गैरसमजांना त्याद्वारे दूर करणे शक्य होईल.

   जाफ़रभाईने तोच मार्ग चोखाळला, म्हणून त्याला दहा वर्षात मुस्लिमांसाठी गुजरातमध्ये काही काम करणे शक्य झाले. पण दुसरीकडे ज्यांनी याच काळात मुस्लिमांच्या न्यायासाठी व कल्याणासाठी मोठ्या आक्रमक पवित्र्याने लढाया केल्या; त्यांनी दंगलपिडीतांना कोणता न्याय दिला? की त्याच न्यायाची लढाई लढणार्‍यांनीच मुस्लिमांची घोर फ़सवणूक व दिशाभूल केली, तेही समजून घेणे अगत्याचे आहे. जाफ़रभाई ते समजून घेऊ शकला; म्हणून त्याला मुठभर का होईना गुजराती मुस्लिमांना न्याय मिळवून देणे शक्य झाले आहे आणि गुजराती मुस्लिम मोठ्या प्रमाणात सत्याला सामोरे जाऊ लागला आहे. तशीच काही उत्सुकता सादिकभाई वा तत्सम गुजरात बाहेरच्या मुस्लिमात निर्माण झाली, तरी या लेखमालेचे सार्थक झाले, असे मी समजेन. मजेची गोष्ट म्हणजे याच दरम्यान फ़ेसबुकवर एका सुशिक्षित बिगर मुस्लिम व्यक्तीने माझ्यावर थापा मारण्याचाही आरोप केला. गणेश पोटे असे त्यांचे नाव आहे. त्याला मी खोटे काय लिहिले ते सिद्ध कर म्हणजे मला माफ़ी मागता येईल; असेही खुले आव्हान दिले. तर त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्यांच्या मते गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीत मुस्लिमांची कत्तल झाली आणि असे असताना मोदींचे कौतुक करणे, हाच खोटेपणा आहे. मी मोदींचे कौतुक केलेले नाही. तर त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात जो खोटेपणा सातत्याने दहा वर्षे चालू आहे, त्यातले सत्य तपासण्याचा प्रयास केलेला आहे. शिवाय त्यातली बदमाशी समोर आणायचा प्रयत्न केला आहे. किंबहूना मुस्लिमांना न्याय देण्याच्या नावाखाली मुस्लिमांचीच कशी फ़सवणूक होत आलेली आहे; त्याला वाचा फ़ोडलेली आहे. पण ज्यांना सत्याची भिती वाटते, त्यांना सत्याला सामोरे जाण्याची हिंमतच होत नाही. आणि सेक्युलर विद्वानांची नेहमी अशी घाबरगुंडी उडालेली असते. असे लोकच मग अन्यायाला खतपाणी घालत असतात. गैरसमजाने मोदींच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टात खटला भरायला धावलेला जाफ़रभाई, त्याच अपप्रचाराचा बळी होता. पण सत्य समोर आल्यावर किंवा सत्य शोधण्याच्या इच्छेने त्याला आमुलाग्र बदलून टाकले. आणि जर त्याच्या इतका कडवा मोदी विरोधक सत्याला सामोरा जाऊन इतका बदलू शकत असेल; तर मग अन्य मुस्लिमांसमोर ते सत्य आणून हजर करणे मला मोलाचे वाटते. सहाजिकच ज्यांना खोटेपणातच रमायचे असते किंवा सत्य समोर आल्यास आपला मुखवटा फ़ाटण्याचे भय असते; त्यांनी बिनबुडाचे आरोप करीत रहाणेही स्वाभाविकच असते.

   गुजरातच्या दंगलीचे खापर संघ परिवार, भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर सातत्याने फ़ोडणरे कित्येक शहाणे आपण गेल्या दहा वर्षात बघितलेले आहेत. पण त्यापैकी कोणी तरी मोदी मुख्यमंत्री होण्या आधीच्या गुजरातमधल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास कधीतरी कथन केला आहे काय? गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री होण्याआधी बत्तीस वर्षे सर्वात भीषण दंगल होऊन पाच हजार मुस्लिम मारले गेले व तेव्हा कॉग्रेसची सत्ता होती; हे सांगितलेले आहे काय? दर दोनतीन वर्षांनी गुजरातमध्ये हिंदू-मुस्लिम दंगली होऊन मुस्लिमांचे संसार नित्यनेमाने उध्वस्त व्हायचे; हे सत्य कथन केले आहे काय? स्वातंत्र्योत्तर काळात २००२ ते २०१३ अशी अकरा वर्षाचा दिर्घकाळ दंगल झाली नाही. सलग दहा वर्षापेक्षा अधिक काळ दंगल न होण्याची अपुर्वाई मोदींच्याच राज्यात झाली, हे सत्य कधी सेक्युलर माध्यमांनी सांगितले आहे काय? सततच्या दंगलीविषयी मौन धारण करणार्‍यांनीच दिर्घकाळ दंगली झाल्या नाहीत, याबद्दल मौन धारण करावे ही बदमाशी नाही काय? आधीच्या दंगलीविषयी मौन धारण केले; मग २००२ च्या दंगली म्हणजे प्रथमच घडलेली दंगल; अशी गैरसमजूत निर्माण करता येते आणि त्याच समजुतीवर मग देशभरच्या मुस्लिमांची मते मिळवता येतात, इतका हा संतापजनक फ़सवणूकीचा डाव आहे. मुस्लिमांना न्याय देण्याची गोष्ट दूरची झाली. पण त्यांना सत्य सांगण्याइतका प्रामाणिकपणा तरी सेक्युलर माध्यमे व राजकारण्यांनी दाखवला आहे काय? नसेल तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी करता येईल काय? सतत खोटे कानावर पडले किंवा कानीकपाळी मारले गेले, मग सत्याची भिती वाटू लागते. सत्याकडे बघायची हिंमतच उरत नाही. आज गुजरात बाहेरच्या मुस्लिमांची व अनेक भारतीयांची नेमकी तशीच अवस्था झालेली आहे. म्हणूनच इथे मी मांडत असलेले सत्य व तपशील धक्कादायक होतात. पण त्यातून सत्यशोधनाला चालना मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि म्हणूनच खेड रत्नागिरी येथून सादिकभाईंनी साधलेला संपर्क मला एक लेख लिहिण्याइतका महत्वाचा वाटला.   ( क्रमश:)
 भाग   ( १५४ )    २७/४/१३

1 टिप्पणी:

  1. "मोदी यांनी मुस्लिमांसाठी गुजरातमध्ये काय चांगले काम केले, त्याची वाच्यता मी अजून केलेली नाही. कारण ती मोदी विरोधकांना उलट्या आणायला भाग पाडणारी माहिती आहे. पण ती नंतर बघता येईल."

    - mag tar ti aikayachich ahe. :D :D

    - Saurabh

    उत्तर द्याहटवा