शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

राजकपूरचा ‘जागते रहो’ चित्रपट आठवतो?



   दोन माणसांना परस्परांना समजून का घेता येत नाही? एकाच विषयावर दोन माणसे बोलत असतात आणि दोघेही तावातावाने परस्पर विरोधी बाजू मांडत असतात. एकाच्या दृष्टीने अमूक एक गोष्ट साफ़ चुकीची असते आणि दुसर्‍याच्या दृष्टीने तीच बाब शंभर टक्के योग्य असते. जर दोघांना तसेच ठामपणे वाटत असेल; तर त्यांनी परस्परांशी वाद घालण्याचीच गरज नसते. कारण त्यात कोणीही तसूभर पुढे सरकण्याची शक्यता नसते. शिवाय दोघांना जर आपली मते इतकीच प्रिय असतील, तर त्यांनी वाद घालायचाच कशाला? ज्यांना कोणाला ज्याची बाजू पटेल, ते लोक त्याच्या बाजूने उभे रहातील. पटणार नाही ते दुसर्‍या बाजूला जातील. मात्र वाद घालणार्‍या दोघांना एकमेकांची बाजू समजून घ्यायची असेल; तर समान पातळीवर येऊन बोलावे लागेल. पण सहसा आपण बघतो, तेव्हा तसे होताना दिसत नाही. रोजच्या रोज विविध वाहिन्यांवर कुठल्यातरी विषयावर चर्चा असतात. पण त्यात नुसता विवाद चालतो. कुठलेही समाधान निघत नाही. याचे कारण काय असावे? तर ते भांडायलाच आलेले असतात. त्या भांडणालाच चर्चा असे नाव देतात. मग चर्चा कशाला म्हणता येईल? जेव्हा दोन्ही बाजू एका पातळीवर येऊन परस्परांना जमेल तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करतात; तेव्हाच चर्चा होऊ शकते. समजा तुम्ही कुठल्या तरी इमारतीच्या आठव्या मजल्यावर उभे आहात आणि तिथून मला काही सांगत वा समजावत आहात. पण मी तळमजल्यावर उभा असेन तर तुमचा आवाज मला फ़ारसा ऐकू येणार नाही, शब्दही कळणार नाहीत. फ़ारतर हातवारे, हावभाव माझी नजर टिपू शकते. त्यामुळे तुम्ही जे सांगत आहात, त्याचा हवा तसा अर्थ काढायला मी मोकळा असतो. तीच अवस्था तुमचीही असते. तुम्हीही माझे ऐकू शकत नसता आणि माझ्या हावभावांचा तुमच्यासाठी सोयीस्कर निघेल असा अर्थ काढत असता. मग एकूणच संवादाचा विचका होऊन जातो. मग यावर उपाय कोणता असू शकतो? समान पातळीवर यायचे म्हणजे तरी काय असते?  

   तुम्ही तरी आठ मजले उतरून खाली आले पाहिजे किंवा मी तरी आठ मजले चढून वर गेले पाहिजे. तरच आपण समान पातळीवर येऊ शकतो. पण मग कोणी आपली जागा सोडून वर किंवा खाली यायचे; असा वाद सुरू होतो. मी का म्हणून खाली उतरू? तुम्हीच पाहिजे तर आठव्या मजयावर या. असा एकाचा आग्रह असू शकतो. तर दुसर्‍याची नेमकी उलटी मागणी असते. यात दोन्ही बाजू आपल्या जागी ठाम असल्या, मग परिस्थिती वा समस्या जैसे थे रहाते. मग यावर कुठलाच उपाय नसतो का? जरूर असतो. जगात कुठल्याही प्रश्नावर उत्तर असू शकते, तर आपल्या जीवनातील साध्या साध्या विवादांवर उपाय कशाला नसेल? प्रश्न असतो, तो कोणी तरी एकाने वा दोघांनी आपापल्या ठाम भूमिका वा जागा सोडण्याचा. थोडेफ़ार लवचिक होऊन समजूतदारपणा दाखवण्याचा. म्हणजे असे, की समजा मी चार मजले चढून वर आलो आणि तुम्ही चार मजले खाली आलात; तर आपण एका पातळीवर येऊ शकतो आणि एकमेकांना स्पष्ट समजेल असे बोलू शकतो. आपल्यातला संवाद अधिक सुसह्य होऊ शकतो. निदान आपण दोघे काय बोलतो आहोत, ते शब्द परस्परांना नेमके ऐकू येऊ शकतात. अपुरे वा अस्पष्ट शब्द गैरसमज निर्माण करण्याचा धोका संपुष्टात येतो. म्हणून संवाद किंवा एकमेकांना समजून घेणे सोपे होतेच असेही नाही. आपण जे शब्द बोलत असतो व त्यामागचे नेमके हेतू असतात, ते तसेच्या तसे समोरच्याने समजून घेण्यालाही महत्व असते. अर्थात शब्द नुसते ऐकून भागत नाही; तर ज्या हेतूने त्यांचा उच्चार झाला, त्याच हेतूने ते समजून घ्यायला हवे. अन्यथा त्याचाच उफ़राटा अर्थ काढून विसंवाद वाढतो. अर्थाचा अनर्थ होऊन जातो.  

   पुर्वी ‘आवाज’ नावाचा एक लोकप्रिय दिवाळी अंक प्रसिद्ध होत असे. त्यामध्ये अनेक गफ़लत करणारी व्यंगचित्रे प्रसिद्ध केलेली असायची. म्हणजे खरे व्यंगचित्र मागल्या पानावर असायचे आणि वरच्या पानावर एक खिडकी केलेली असायची आणि त्यावर भलतेच चित्र असायचे. दोन्ही एकत्र बघितली मग तुमच्या मनात अश्लिल वा विचित्र कल्पना तयार व्हायची. पण ते खिडकीचे पान उलटले, मग खरे चित्र भलतेच सभ्य असायचे. आजकालच्या कुठल्याही वाहिनीवरल्या चर्चा बघितल्या; मग मला त्या फ़सव्या व्यंगचित्रांची आठवण होते. कारण त्याची रचना व मांडणीच मुळात दिशाभूल व फ़सगत करण्यासाठी असायची. पण वाहिन्यांवरील चर्चा या गैरसमज दूर करण्यासाठी आहेत, असे भासवले जात असते. पण त्या चर्चा ऐकल्या मग जनमानसात त्यातून जास्त गोंधळ उडवून द्यायचाच हेतू स्पष्ट होतो. तिथे संवाद किंवा चर्चेसाठी आमंत्रित केलेले पाहुणे असतात, त्यांच्यात भांडणे कशी लागतील, त्याचीच संयोजक चिंता करतो की काय; असेच वाटत रहाते. म्हणजे असे होते, की आमंत्रित आपली बाजू म्हणून काही मांडत असतो, तर त्यातला संयोजक त्याचे अर्धवट बोलणे तोडून प्रतिपक्षाला त्यावर भाष्य करायचे आमंत्रण देतो. जी बाजू मांडलीच गेलेली नाही, त्याचा विरोध करणारा मग अर्धवट बाजू ऐकूनच आपले मत मांडतो. त्यातून मग पहिला अधिकच चिडून उठतो आणि तावातावाने भांडण सुरू होते. हीच वाहिनीच्या संयोजकांची अपेक्षा असल्याचे लपून रहात नाही. मग त्यांच्या प्रेक्षकाला एक हमरातुमरीचे भांडण बघितल्या, ऐकल्याचे समाधान फ़ार तर मिळू शकते. पण मुद्दा कुठलाच हाती लागत नाही. लोकांमध्ये अधिकच गैरसमज निर्माण करायला त्यातून हातभार लावला जातो. त्याचे कारण एकच असते. की चर्चेत आमंत्रित केलेल्यांना समान पातळीवर संयोजक येऊच देत नाही. उलट त्यांच्यात गैरसमज कसे वाढतील, याची काळजी घेत असतो. परिणाम आपण बघतो, की जितका माध्यमांचा प्रसार व प्रचार वाढला आहे, तितका राजकारणातला विसंवाद वाढत गेला आहे. 

   राजकपूरचा ‘जागते रहो’ नावाचा एक खुप गाजलेला चित्रपट आहे. त्यात त्याच्या तोंडी जवळपास संवादच नाहीत. खेड्यातून शहरात आलेला एक बेघर इसम अशी त्याची व्यक्तीरेखा आहे. रात्रीच्या वेळी कुठल्याशा कारणाने पोलिस हटकतो, म्हणून तो पळतो आणि एका चाळीत शिरतो. मग तिथल्या वस्तीमध्ये तो आडोसा व लपायला इथून तिथे जात रहातो आणि त्याचे अनुभव कॅमेरा टिपत जातो, अशी एकूण एका रात्रीत घडणारी ती घटना आहे. गुण्यागोविंदाने त्या चाळीत वास्तव्य करणार्‍या रहिवाश्यांमध्ये परस्परांविषयीचे समज व पूर्वग्रह; यातून ती कथा उलगडत जाते. प्रत्येकजण संशयाने कसा दुसर्‍याकडे बघत जातो, त्यातून कथा पुढे सरकत रहाते. एका क्षणी राजकपूर एका जोडप्याच्या खोलीत लपतो. तिथे नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण सुरू होते. पत्नी रागाच्या भरात बेभान होऊन हाती लागेल ते नवर्‍याच्या अंगावर फ़ेकत असते. तिथे स्वैपाकघरात दडलेला राजकपूरच तिच्या हाती एक एक वस्तू देत असतो. पण हातात त्या वस्तू कुठून येतात; त्याचे भान तिला असतेच कुठे? मग अचानक तिला हे लक्षात येते आणि ती माघारी वळून बघते, तर तिथे अनोळखी मळक्या कपड्यातला गबाळा राजकपूर. त्याला बघून तिला चक्कर येते. कारण चाळीमद्ये चोर घुसला आहे, अशी अफ़वा असतेच. तोच हा चोर म्हणून तिला चक्कर येते. मजेशीर प्रसंग आहे. पण मुद्दा वेगळा आहे. आपण रागाच्या भरात नवर्‍यावर वस्तू फ़ेकून मारतोय, त्या कोण आपल्या हातात देतो आहे, याचे तिला भान नसते, हा त्यातला मुद्दा आहे. आपण वाहिन्यांवरील चर्चा बघतो किंवा आपली ठाम मते बनवतो, तेव्हा आपण कितीसे भानावर असतो? सत्याच्या जाणिवेपेक्षा कोणीतरी डोक्यात भरवून दिलेल्या समजूतीच्या आधारे आपण आपली कृती करत वा भूमिका घेत नसतो काय? समस्या किंवा विषयाचे कितीसे भान आपल्याला असते? वास्तवाची चाड तरी आपल्याला असते काय? 
 
   अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो, कोणीतरी आपल्याला चढवलेले असते आणि आपण त्याच्या आहारी जाऊन वाटेल तसे वागत असतो. सत्याचा शोध घेत नाही, की वास्तवाकडे डोळे उघडून बघत नाही. आणि खरेच जेव्हा सत्य आपल्याला दिसते, तेव्हा आपल्यालाच चक्रावल्यासारखे होऊन जाते. गुजरातमध्ये जाफ़रभाई सारेशवाला नावाचा एक व्यापारी आहे. त्याची नेमकी अशीच अवस्था झालेली आहे. एकेकाळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये न्याय मागायला धावलेला हाच मुस्लिम माणुस; आज मोदींचा मोठा चहाता झालेला आहे. गुजरातमध्ये २००२ सालात दंगली झाल्या तेव्हा जाफ़रभाई इंग्लंडमध्ये होते. तिथे त्यांना दंगलीच्या बातम्या कानावर पडल्या. वृत्तपत्रातून वाचायला मिळाले वा टिव्हीवरून जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचले; तेव्हा त्यांनी त्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागायचे ठरवले होते. त्याच दरम्यान केव्हातरी मोदी इंग्लंडमध्ये यायचे होते, तेव्हा त्यांना तिथे यायला बंदी घालावी किंवा अटक करून त्यांच्यावर मुस्लिम हत्याकांडासाठी खटला भरावा; असे जाफ़रभाईंना मनापासून वाटत होते. त्यासाठी त्यांनी जमवाजमव केली आणि हा सामान्य मुस्लिम गुजराती व्यापारी एका रात्रीत सेक्युलर माध्यमांच्या गळ्यातला ताईत होऊन गेला. सगळ्या माध्यमात त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जाफ़रभाईलाही आपण मुस्लिमांच्या न्यायासाठी खुप मोठा पराक्रम केल्या़चे पुण्य लाभल्यासारखे वाटत होते. पण वर्षभराने त्याला अचानक वास्तव समोर येऊन उभे ठाकले आणि त्याची अवस्था ‘जागते रहो’ चित्रपटातल्या त्या भांडणार्‍या पत्नीसारखी होऊन गेली.   ( क्रमश:)  
 भाग   ( १४७ )    २०/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा