गेले काही महिने देशाचा भावी पंतप्रधान कोण यावरून माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलेले आहे. प्रामुख्याने गुजरातच्या विधानसभा निवडणूकात नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा मोठे यश संपादन केल्यावर आणि पाठोपाठ महिन्याभरात जयपूर येथे कॉग्रेसने राहूल गांधी यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी सोपवल्यावर; या चर्चेचा झंझावातच होऊन गेला आहे. कुठलेही निमित्त साधून वाहिन्या मोदी-राहुल पुराण सुरू करतात. खरे तर दोन्ही पक्षांनी आपल्या अशा कुठल्या उमेदवाराचे सूतोवाचही केलेले नाही. पण दोन्ही पक्षांत याच दोन नावांना सर्वाधिक लोकप्रिय मानले जात असल्याची बाबही लपून रहात नाही. शिवाय अजून वेळापत्रकानुसार लोकसभा निवडणूका वर्षभर लांब आहेत. मग त्यावर आतापासुन काथ्याकुट करण्याची काय गरज आहे? पण ते चालू आहे. त्याचे कारणही आता लपून राहिलेले नाही. नरेंद्र मोदी या नेत्याविषयी देशाच्या कानाकोपर्यात कमालीचे औत्सुक्य आहे आणि त्याचाच लाभ उठवण्यासाठी माध्यमांची ही केविलवाणी धडपड चालू आहे. प्रत्येकवेळी मोदी पंतप्रधान होण्यात कोणकोणत्या अडचणी व कोणाचे आक्षेप आहेत; याची अगत्याने चर्चा होते. ती चर्चा प्रामाणिक असेल, तर मग अशा चर्चेची गरजच उरत नाही. कारण जे होणेच शक्य नाही, त्याबद्दलची चर्चा वांझोटी असते ना? मग ती करायचीच कशाला? पण बाकी शहाणपण शिकवणार्या माध्यमांना तेवढेच शहाणपण सुचत नाही. मोदींना आपल्या वाहिन्यांवर झळकवण्याची अहोरात्र स्पर्धा अखंड चालू आहे. आणि त्यात बिचार्या राहुल गांधींनाही फ़रफ़टवले जात असते. पण मोदी पंतप्रधान होऊच शकत नाही; याची या माध्यमांना म्हणजे त्यावर पोपटपंची करणार्य़ा जाणकारांना खरोखरच खात्री आहे काय? ती असती तर त्यांनी आनंदोत्सव साजरा करून मोदी हा विषय बासनात गुंडाळला असता. त्याच माणसाला येनेकेण प्रकारेण चमकवण्याचा उद्योग कशाला केला असता? काही मुद्देच त्याची साक्ष देतात.
पहिला मुद्दा मोदी यांची भाजपाच्या संसदीय मंडळावर झालेली निवड. भाजपाचे अनेक राज्यात मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी कोणाला पक्षाच्या सर्वोच्च मानल्या जाणार्या संसदीय मंडळात प्रवेश मिळालेला नाही. मग मोदींनाच त्याचे सदस्य का करून घेण्यात आले? बाकीचे मुख्यमंत्री त्यापेक्षा कमी लोकपिय आहेत काय? कमी गुणवान व कमी कर्तृत्ववान आहेत काय? असे सवाल भाजपाच्या प्रवक्ता व नेत्यांना मुद्दाम विचारले जातात. त्याचे उत्तर असे प्रश्न विचारणार्यांनी स्वत:च्या कृतीमध्ये शोधावे, तरी सापडू शकेल. ज्या वाहिन्यांवर असे प्रश्न विचारले जातात, त्याच वाहिन्या आपल्या बातम्यांमध्ये मोदी सोडून अन्य भाजपा मुख्यमंत्र्यांना किती स्थान देतात? नगण्य स्थान का देतात? मोदी इतकेच अन्य भाजपा मुख्यमंत्री लोकप्रिय व गुणवान आहेत; तर त्यांच्या कर्तबगारीचे गोडवे याच वाहिन्या नित्यनेमाने गावून मोदींकडे काणाडोळा का करीत नाहीत? जितके माध्यमे मोदींना महत्व देतात, त्यापेक्षा पक्षाने त्यांना दिलेले स्थान मोठे नाही. म्हणजेच मोदींचे महात्म्य असेल, तर ते माध्यमांनीच वाढवलेले आहे. कारण मोदीच भाजपाचा कर्तबगार मुख्यमंत्री व नेता असल्याचे चित्र मुळात माध्यमांनीच बनवले आहे. मग त्यानुसार चालणार्या भाजपाला शंका म्हणून तोच प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे? पण ज्यांच्या मनात मोदीच होणार ही पाल चुकचुकते आहे; त्यांना रहावत नाही. खायी त्याला खवखवे म्हणतात, त्यातलाच हा प्रकार आहे. म्हणूनच मोदी या माध्यमांकडे ढुंकून पहात नाहीत, तरी त्यांना मोदींचे प्रक्षेपण करून टिआरपी मिळवण्याची लाचारी आलेली आहे. मोदीच कशाला असा प्रश्न भाजपा नेत्यांना विचारणार्या माध्यमांनी व वाहिन्यांनी एका प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. ही मंडळी अजीर्ण होईपर्यंत मोदी का दाखवत आहेत?
मागल्या शुक्रवारी दिल्लीत उद्योगपतींच्या एका राष्ट्रीय संस्थेच्या वार्षिक परिषदेत राहुल गांधी यांचे भाषण झाले. त्याच्याही खुप आधी मोदींचे दिल्लीत ‘इंडिया टुडे’ आयोजित समारंभात भाषण झालेले होते. त्या दोन्ही भाषणांची तुलना करण्याच्या निमित्ताने पुन्हा दिवसभर मोदींना दाखवायचे काय कारण होते? खरे तर तो दिवस राहुल गांधींचा होता. त्यांच्या भाषणाची तुलना मोदींशी करण्यापेक्षा नुसत्या राहुलच्या भाषणाचे विवेचन करायला काय हरकत होती? राहुलला त्या संस्थेने बोलावले होते आणि त्यांनी मोदी-राहुल अशी जुगलबंदी योजलेली नव्हती. राहुल यांनीही मोदींच्या कुठल्या भूमिका वा मुद्दे यांचे संदर्भ घेऊन आपल्या भाषणाची मांडणी केलेली नव्हती. मग अशा तुलनेची काय गरज होती? आणि करायची तर तशीच तुलना राहुल व मध्यप्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी का केली नाही? याचे कारण त्यापैकी कोणी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नाही, हे पत्रकारांनाही ठाऊक आहे. भाजपापाशी पंतप्रधान होऊ शकेल; असा एकमेव नेता आज उपलब्ध आहे आणि तो नरेंद्र मोदी हाच आहे. याची पत्रकारांना आता खात्री पटलेली आहे. पण मोदी पंतप्रधान झालेच तर तो एकट्या कॉग्रेस व युपीएचा पराभव असू शकणार नाही. तो सेक्युलर माध्यमांचा खरा पराभव असेल. कारण गेल्या दहा वर्षामध्ये अखंड मोदी विरोधी प्रचार मोहिम सेक्युलर माध्यमांनीच चालविली आहे आणि त्याच दिसू लागलेल्या पराभवाची चिंता माध्यमातील सेक्युलर मुखंडांना भेडसावते आहे. त्यामुळे आपण मोदी विरोधी केलेल्या अपप्रचाराची लपवाछपव आता सुरू झालेली आहे. मात्र धुर्त राजकारणी असलेले नरेंद्र मोदी तेवढीही पळवाट माध्यमातील सेक्युलरांना द्यायला राजी नाहीत; ही मोठी अडचण होऊन बसली आहे. सहाजिकच मोदी तर माध्यमांशी बोलत नाहीत आणि त्यांना दाखवल्याशिवाय टिआरपी नाही, असे अवघड जागीचे दुखणे होऊन बसले आहे.
सोमवारचीच गोष्ट घ्या. नरेंद्र मोदी दिल्लीत फ़िकी या राष्ट्रीय उद्योग व्यापार संस्थेच्या महिला शाखेसमोर भाषण करायला आलेले होते. त्यांचे तेही भाषण थेट प्रक्षेपणातून दाखवण्यात आले व त्याचीही विनाविलंब चार दिवस अगोदर झालेल्या राहुलच्या भाषणाशी तुलना करण्यात आली. मजेची गोष्ट अशी की त्याच संध्याकाळी नेटवर्क १८ या अनेक वाहिन्यांचे जाळे असलेल्या संस्थेने एका परिसंवादाचे मुख्य उदघाटनाचे भाषण त्याच दिवशी संध्याकाळी ठेवलेले होते आणि आपल्या सर्वच वाहिन्यांवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले. प्रतिस्पर्धी वाहिन्यांचे आयोजन असल्याने बाकीच्यांना त्याचे थेट प्रक्षेपण शक्य नव्हते. मग त्याच नेटवर्कला मोदींच्या लोकप्रियतेचा सगळा लाभ उठवता येऊ नये; म्हणुन बाकीच्या वाहिन्यांनी सकाळी महिलांसमोर झालेले मोदींचे भाषण पुन्हा प्रक्षेपित करण्याची संधी साधली. म्हणजे आयबीएन वाहिन्यांवर मोदींचे ताजे भाषण चालू होते आणि अन्य वाहिन्या सकाळच्या शिळ्या कढीला ऊत आणत होत्या. पण मोदी अहोरात्र चालूच होता. जणू दोनतीन दिवस सगळ्या वाहिन्यांचे ‘मोदी चोविस तास नेटवर्क’ तयार झालेले होते. तो अतिरेक कंटाळवाणा होता. अगदी मोदींचे चहाते असतील, त्यांनाही त्याचा कंटाळाच आलेला असेल. माध्यमांची लाचारी दुसरे काय? पण ही लाचारी मुख्यप्रवाहातील माध्यमांवर आज का आलेली आहे? त्याचे प्रमुख कारण सोशल मीडिया म्हणतात; ती दुय्यम माध्यमे आहेत. ज्याला आपण फ़ेसबुक, इंटरनेट वा मोबाईल म्हणतो, त्या माध्यमांनी हा चमत्कार घडवला आहे.
गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर जी दंगल पेटली; त्याचा मुख्यप्रवाहातील माध्यमांनी मोदी विरोधी प्रचार मोहीमेत इतका टोकाचा वापर केला, की गुजरातविषयी सत्य जाणून घेण्याची बाहेरच्या लोकांना सोयच शिल्लक उरली नव्हती. त्यामुळेच अन्य माध्यमातून येणार्या बातम्या व माहिती लोकांना वास्तवाची वाटू लागली. देशात गुजरातपुर्वी शेकडो दंगली झाल्या आहेत. पण गुजरातची दंगल पहिलीच व ती मोदींनीच घडवली; असे सेक्युलर माध्यमांनी उभे केलेले चित्र पुसण्याचा अन्य कुठलाच मार्ग मोदींसमोर नव्हता. पण त्याच अपप्रचाराच्या कालखंडात अन्य सोशल मीडियाचा उदय झालेला होता. त्या माध्यमातून मग मोदी यांनी आपल्याविषयी व गुजरातविषयी सत्य लोकांपुढे आणायचे प्रयास सुरू केले आणि त्याचा प्रसार जसजसा वाढत गेला; तसतशी सेक्युलर माध्यमे व त्यांच्या प्रचारातील असत्ये जगासमोर येत गेली. त्याची विश्वासार्हता इतकी वाढली; की आता मोदी यांना मुख्यप्रवाहातील माध्यमांची गरज उरलेली नाही. पण अन्य माध्यमातून लोकांपर्यत गेलेल्या माहिती व बातम्यांनी मोदी या व्यक्तीविषयी जे औत्सुक्य गुजरात बाहेरच्या जनमानसात निर्माण केले आहे; त्याची जाणिव झाल्यावर मुख्यप्रवाहातील माध्यमांची झोप उडाली आहे. जे अपप्रचारातून गमावले ते आता अकारण मोदी प्रचारातून मिळवण्याची केविलवाणी धडपड माध्यमांना करावी लागत आहे. त्यामुळेच मग वेळीअवेळी मोदींची बातमी, त्यावर चर्चा योजून मोदी दाखवत रहाणे वाहिन्यांना अपरिहार्य झाले आहे. मोदी लोकांना आवडतात, याची खात्रीच त्याला कारण झाली आहे. मोदींच्या लोकप्रियतेची लाट माध्यमांनाही जाणवली आहे. मात्र त्याचे रहस्य या जाणकारांना उमगलेले नाही. आपण कोंबडे झाकून ठेवले मग हा सूर्य उगवलाच कसा, हे कोडे माध्यमांना सुटेनासे झाले आहे. त्यात फ़ारसे कुठले रहस्य नाही. समजून घ्यायचे असेल तर अतिशय सोपे आहे आणि समजून घ्यायचे नसेल तर अशक्य आहे. दहा वर्षे सेक्युलर माध्यमांनी मोदी विरोधात इतका अपप्रचार करूनही त्यांची गुजरात बाहेर लोकप्रियता का वाढली? कशी वाढली? कोणी वाढवली? हे त्यांचे प्रचारक कोण आहेत? बारकाईने पाहिल्यास अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येतात. ( क्रमश:)
भाग ( १४० ) १३/४/१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा