सोमवार, २२ एप्रिल, २०१३

सेक्युलरांकडून गुजराती मुस्लिमाची मुस्कटदाबी


   आता हा जाफ़रभाई सरेशवाला कोण आणि मला हा माणूस अचानक कुठे सापडला, असे वाचकांच्या मनात येऊ शकते आणि त्यात गैर काहीच नाही. कारण आपण हे नाव मुस्लिमांच्या संदर्भात वा गुजरात दंगलीच्या संदर्भात कधी वाचलेले ऐकलेले आपल्याला आठवणार सुद्धा नाही. कसे आठवेल? कोणी जर ते नाव वा ती व्यक्ती आपल्यासमोर कधी आणून उभीच केली नाही वा त्याच्याबद्दल कधी सांगितलेच नाही; तर आपल्याला तो आठवणार तरी कसा? आणि आठवायचा असेल तर आपल्याला त्याची ओळख पत्रकार वा माध्यमांनीच करून दिली पाहिजे ना? कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर किंव वृत्तपत्रात त्याची माहिती वा बातमी झळकली; तरच आपल्याला अशा नावाचा कुणी गुजरातमध्ये मुस्लिम व्यापारी आहे व त्याचेही कारखाने व दुकाने दंगलीत जाळून भस्मसात करण्यात आली, हे आपल्याला समजू शकेल. तेवढ्यासाठी आपण उठून गुजरातला जाणार नाही, की शोधाशोध करणार नाही. ते काम आपल्यासाठी माध्यमे व पत्रकार डोळ्यात तेल घालून करीत असतात; अशी आपली ठाम समजूत आहे. त्यामुळेच माध्यमात जाफ़रभाई सरेशवाला असे नाव कधी झळकले नसेल, तर असा कोणी मुस्लिम गुजरात वा जगाच्या पाठीवर असतो; हे आपल्याला कळूच शकत नाही. आपल्याला गुजरातचे जे मुस्लिम माहिती असतात, ते केवळ माध्यमांनी आपल्यासमोर आणलेले असतात. आणि माध्यमेही त्यासाठी फ़ारसे कष्ट घेत नाहीत, की कुठली शोधाशोध करीत नाहीत. त्यांना त्यांनी देखिल गुजरातचे मुस्लिम त्यांच्यासमोर आणायचे काम दोनतीन स्वयंसेवी संस्थांवर सोपवलेले आहे. तीस्ता सेटलवाड किंवा मुकूल रॉय असे त्या स्वयंसेवी संस्थांचे संचालक आहेत. त्यांच्याकडून ज्या मुस्लिमांची नावे किंवा बातम्या-माहिती माध्यमांकडे येते; तेवढीच मग पत्रकार जगाला सांगत असतात. या दोन वा तत्सम स्वयंसेवी संस्थांची मान्यता असल्याखेरीज गुजरातमध्ये कोणी मुस्लिम असूच शकत नाही, अशी एकूण सेक्युलर वास्तविकता आहे. त्यामुळेच माध्यमांकडून आपल्याला सलीमखान, जाफ़रभाई सरेशवाला. रईसखान पठाण, गुलाम वस्तानवी, अशी नावे आपल्यापर्यंत येऊच शकत नाहीत. जी तुमची स्थिती आहे, तीच काहीशी माझी सुद्धा आहे. त्यामुळेच काही महिन्यांपुर्वी जाफ़रभाई सरेशवाला मला ऐकूनही माहित नव्हता. मग त्याने केलेल्या गोष्टी वा त्याच्याशी संबंधित घटना तरी कशा माहिती असतील?

   चार महिन्यांपुर्वी गुजरातची विधानसभा निवडणुक झाली. तेव्हाही पुन्हा गुजरात दंगलीचा जुनाच कोळसा उगाळला गेला. पण त्यात काही नवे नव्हते म्हणून मी त्यासंबंधी बातम्यांकडे फ़ारसे लक्ष दिलेले नव्हते. पण विधानसभेचे मतदान होऊन निकाल लागले, त्याचे विश्लेषण ऐकत होतो. तेव्हा राजदीप सरदेसाई ज्याचा संपादक आहे, त्या आयबीएन वाहिनीवरील निवडणूक निकाल व त्यावरील चर्चा ऐकताना मला प्रथम धक्कादायक चित्र बघायला मिळाले. त्यातच हा जाफ़रभाई सरेशवाला सहभागी होता. तेवढेच नाही तर गुजराती जाफ़रभाई नावाचा एक मुस्लिम मोदींचे समर्थन करतो, हीच खरी धक्कादायक बातमी होती. शिवाय हा कोणी ऐरागैरा इसम नव्हता, तर खुद्द गुजरातमधला मुस्लिम होता. म्हणूनच तो काय बोलतो, ते मी कान देऊन ऐकू लागलो. अर्थातच त्याला राजदीप फ़ारसा बोलूच देत नव्हता हे वेगळे. त्यालाच हल्ली सेक्युलर पत्रकारिता म्हणतात. म्हणजे जो कोणी मोदींचे कौतुक करील वा भाजपाबद्दल चांगले बोलू लागेल; त्याच्या बोलण्यात संयोजकाने अडथळे आणण्याला व त्यांच्या विरोधात बोलणार्‍याला मुक्तपणे चिखलफ़ेक करण्याला सवड देण्य़ाला वाहिन्यांवरील पत्रकारिता म्हणतात. त्याला अनुसरून राजदीप या जाफ़रभाईला बोलू देत नव्हता. पण त्याने काही बिघडत नव्हते, मुस्लिमांनीही मोदींना मते दिली; हा एका मुस्लिमाचा दावा मला नवल वाटणारा होता. शिवाय राजदीपने आपल्या नेहमीच्या शैलीत जाफ़रभाईची खिल्ली उडवली, त्यामुळेच हा माणूस काहीतरी खरे बोलतोय, याची मला खात्री पटली. कारण राजदीपला झोपेतही सत्य सहन होत नाही, इतका तो भ्रमात व असत्यामध्ये आकंठ बुडालेला असतो. त्याने सतत जाफ़रभाईच्या बोलण्यात व्यत्यय आणला, त्याचा अर्थच हा माणुस काही गंभीर सत्य सांगतोय, याची मला खात्री वाटली होती.

   मुद्दे नसतात, तेव्हा माणुस उफ़राटे आरोप करीत असतो. राजदीपची देहबोली नेमकी त्याची सदोदीत साक्ष देणारी असते. कुठलेही सत्य समोर येऊ लागले; मग राजदीप चर्चेत हस्तक्षेप करून सत्याची सातत्याने मुस्कटदाबी करीत असतो. जाफ़रभाईच्या बाबतीतही त्याचे तेच चालले होते. मुस्लिमांनी मोदींना मते दिली काय, असा राजदीपचा सवाल होता आणि त्याला होकारार्थी उत्तर देताना जाफ़रभाई काही तपशील सांगत होता. तो तपशील श्रोते व प्रेक्षकांपर्यंत सत्य घेऊन जाईल, अशी भिती राजदीपला वाटणे स्वाबाविकच होते. म्हणून त्याने टोमणा मारत जाफ़रभाईला गप्प करण्याचा प्रयास केला. तुमच्यासारख्या श्रीमंत व्यापार्‍याला मोठ्या कंपन्यांच्या एजन्सी मिळाल्या; म्हणजे गुजरातच्या मुस्लिमांच्या समस्या संपत नाहीत, असा टोमणा राजदीपने हाणला. पण जाफ़रभाई वेगळेच काही सांगत होता. एकूण गुजरातच्या विकासाचे सारखेच लाभ मुस्लिमांनाही मिळत आहेत, आणि त्याचे श्रेय मोदीनाच आहे, असे जाफ़रभाईला सांगायचे होते. तेवढ्य़ा त्याच्या विधानाने माझे कुतूहल जागे केले. त्यामुळे पुढल्या काही दिवस इंटरनेट वा अन्य माध्यमातूम मी जाफ़रभाई व गुजरातच्या मुस्लिमांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयास केला. त्यासाठी दोन मार्ग जाणीवपुर्वक टाळले. पहिला सेक्युलर माध्यमांतून समोर आणली जाणारी माहिती व भाजपा वा मोदी यांच्या गोटातून येणारी माहिती टाळून; गुजरातच्या मुस्लिमांची दंगलीनंतरची माहिती मिळवायचा मी प्रयास केला. त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आले. ते म्हणजे सेक्युलर माध्यमे व संस्था संघटनांनी गुजरात बाहेरच्या मुस्लिम व बिगर मुस्लिमांची दिशाभूल केलेली आहेच. पण त्याचवेळी खुद्द गुजरातच्या मुस्लिम दंगलपिडीतांचीही मोठीच मुस्कटदाबी केलेली आहे.



   गेल्या दहा अकरा वर्षात गुजरातची दंगल व त्यात झालेली मुस्लिमांची ससेहोलपट, या संबंधात जितकी माहिती जगासमोर आणली गेली, त्यात तिथले मुस्लिम नेते, कार्यकर्ते, व दंगलपिडीत किती आहेत? तीस्ता सेटलवाड किंवा मुकुल रॉय अशा लोकांनी माध्यमांना पुरवलेल्या माहितीच्याच आधारे बातम्या मांडल्या वा रंगवल्या गेलेल्या दिसतील. त्या माहिती वा बातम्यांना छेद देणारी वा खोटे पाडणारी माहिती कोणी समोर आणायचा प्रयास जरी केला, तरीही तात्काळ त्याची माध्यमातून मुस्कटदाबी झालेली दिसेल. आणि त्या मुस्कटदाबीतून मुस्लिमही सुटलेले नाहीत. सेक्युलर माध्यमांनी जे खोटे व असत्य आजवर पसरवले आहे, त्याचा खोटेपणा दाखवायचा कुणा दंगलपिडीत मुस्लिमाने जरी प्रयास केला; तरी त्याला लगेच वाळीत टाकले जाते किंवा त्याच्याच विरुद्ध मोहिम उघडली जाते. त्याला खोट्यानाट्या आरोपात गुंतवून त्याचे जगणे हराम करून टाकले जाते. याची उलट बाजू अशी, की मोदी विरोधात वाटेल ते खोटे बोलायला सज्ज असेल, त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळत जाते. जाफ़रभाई त्याचाच एक बळी आहे आणि बेस्ट बेकरी खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जाहिरा शेख त्यापैकीच एक बळी आहे. आजवर जगात दंगलपिडीत असलेल्या व्यक्तीलाच शिक्षा व कैद भोगायला कुठे लागली असेल काय? गुजरातची दंगल त्याही दृष्टीने अजब नमूना आहे. त्यात बेस्ट बेकरी जळीत कांडात जिचे अवघे कुटुंब व संसार उध्वस्त झाला; त्या जाहिरा शेखला खोटी साक्ष दिली वा सतत साक्ष बदलली म्हणून कैदेची शिक्षा भोगावी लागली आहे. तिचा गुन्हा कोणता असेल? तर प्रथम तिची जबानी पोलिसांनी लिहून घेतली व तिने पहिली साक्ष कोर्टात देताना तो कबुलीजबाब नाकारला होता. मग तिला पुन्हा तोच कबुलीजबाब द्यायला स्वयंसेवी संस्थांनी भाग पाडले आणि तोच खटला गुजरात बाहेर मुंबईत चालवला गेला. तिथेही तेच झाले. जाहिराने पुन्हा साक्ष देताना कबुलीजबाब नाकारला. म्हणून तिलाच कोर्टाची दिशाभूल केल्या प्रकरणी शिक्षा भोगावी लागली.

   एक अशिक्षित मुलगी इंग्रजीत लिहीलेल्या प्रतिज्ञापत्रावर विश्वासाने सही करते; तर तिला त्यासाठी गुन्हेगार मानून शिक्षा झाली. ती काय म्हणते याची दखल तरी माध्यमांनी घेतली काय? आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार असे आमिष दाखवून सह्या घेण्यात आल्या व पैसे देण्याची लालूच दाखवून पत्रकार परिषदेत वदवून घेतले, असे जाहिरा सांगत होती. पण कोणी तिच्यावर विश्वास दाखवला काय? दंगलपिडीत असून तिच्यावर कोणाचा विश्वास नाही. पण त्याच दंगलीबद्दल तीस्ता सांगेल, तेच माध्यमांसाठी एकमेव सत्य आहे. ही गुजरातच्या दंगलीबद्दल आपल्यासमोर आलेली स्थिती आहे. मग जाफ़रभाई आपल्याला कसा माहिती असणार? कारण तो त्यापेक्षा वेगळे काही सांगू पहातो आहे. व्यापारी व पैसेवाला म्हणून राजदीप त्याला खोटा म्हणणार. पण बेस्ट बेकरीची जाहिरा शेख तर पैसेवाली नाही आणि गरीब होती ना? मग तिच्यावर तरी कोणी विश्वास दाखवला काय? या दंगलीबद्दल सेक्युलर माध्यमांचा एकमेव निकष ठरून गेलेला आहे. मोदी विरोधी असेल तेच सत्य आणि मोदींच्या बाजूने कोणी साक्ष देत असेल, पुरावे समोर आणणार असेल, तर तो खोटा, हाच निकष असेल तर आपल्याला सत्यापर्यंत वास्तवापर्यंत, जाहिरा शेख, जाफ़रभाई, रईसखान, सलीमखान, इत्यादींपर्यंत पोहोचता येणारच कसे? आपल्याला माध्यमांनी निर्माण केलेया सेक्युलर भ्रमातच चाचपडत रहावे लागणार ना? म्हणूनच जाफ़रभाई सापडण्याला इतका उशीर लागला आणि त्याने उजेडात आणलेले सत्य डोळे दिपवून टाकणारे असेच आहे.    ( क्रमश:)
 भाग   ( १५० )    २३/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा