रविवार, २१ एप्रिल, २०१३

झोपी गेलेला जागा झाला; अर्थात जाफ़रभाई


   परवाच्या लेखामध्ये मी राजकपूरच्या ‘जागते रहो’ चित्रपटातील एक प्रसंग मुद्दाम कथन केला होता. त्यात ती चिडलेली व संतापलेली पत्नी रागाच्या भरात हाती लागेल ते आपल्या नवर्‍याच्या अंगावर फ़ेकत असते. तसे पाहिले तर चित्रपट बघताना तो विनोदी प्रसंग वाटतो. कारण घरातले भांडण आहे आणि राजकपूर तिच्या हाती एक एक वस्तू देत असतो. ती बेभान होऊन नवर्‍यावर त्या वस्तूने हल्ला चढवत असते. म्हणून आलल्याला तिचे हसू येते. पण वास्तव जीवनात त्यापेक्षा किती वेगळी परिस्थिती असते? ज्या वर्तनाला आपण असे मनापासून हसत असतो, नेमके तसेच त्या प्रसंगी आपण अनेकदा वागत असतो. आपल्याला तरी कोण कुठली वस्तू वा हत्यार आपल्या हाती हल्ला करण्यासाठी देते आहे किंवा कशासाठी देते आहे; याचे कितीसे भान असते? हातात काय आहे व त्याने हल्ला केल्यास त्याचे परिणाम काय संभवतात; याचे आपल्याला तरी कितीसे भान असते? कारण कोण काय हाती देते, याची आपल्याला अजिबात फ़िकीर नसते. त्या चित्रपटातील पत्नीला तरी कुठे फ़िकीर होती? ती आपल्या नवर्‍यावर संतापलेली होती आणि त्याच संतापाच्या भरात मिळेल ते नव्हेतर हाती मुद्दाम दिलेले फ़ेकत होती. ते देणारा कोण आहे व अशा वस्तू हाती देण्यामागचा त्याचा हेतूही तिला ठाऊक नसतो. तसेच आपलेही नसते का? आपणही अनेकदा कुणावर तरी रागावलेले असतो आणि त्यात कोणी आगीत तेल ओतल्याप्रमाणे चिथावणी देत असेल; तर त्याला बळी पडत नसतो का? त्याचे दुरगामी परिणाम अनुभवायला मिळतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे का होते? बहुतेकदा प्रत्येक माणसाचा असाच अनुभव असतो.

   माणसे अशी का वागतात? तर माणसे दोन प्रकारे प्रवृत्त होत असतात. एक म्हणजे काही आवडले वा प्रेम वाटले मग माणूस प्रवृत्त होतो आणि जे आवडले आहे, त्याच्यासाठी वाटेल ते करायला सज्ज होतो. त्यात तो आपल्या फ़ायद्यातोट्याचा विचारही करत नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की कोणावर आपण खुप रागावलेले असू किंवा काही नावडलेले असेल, तरी आपण नफ़्यातोट्याच्या पलिकडे जाऊन त्याच्या विरोधात उभे ठाकतो. खरे तर आपल्याला तितके त्यात पडायचीही गरज नसते आणि तेवढी ती रागावण्याची बाबसुद्धा नसते. पण आपल्या रागाचा कोणीतरी व्यवस्थित लाभ उठवून आपल्याला चिथावण्या देतो आणि आपण त्याला बळी पडत असतो. त्या चित्रपट प्रसंगात नवर्‍या बरोबरचे पत्नीचे भांडण खरे असेल. पण घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्ती वा चोरापेक्षा शेवटी तिचा नवराच तिच्या जवळचा असतो ना? मग कोणा अनोळखी व्यक्तीने वाटेल त्या वस्तू नवर्‍याला मारायला दिल्या तरी पत्नीने त्या फ़ेकून मारणे म्हणजे स्वत:चेच नुकसान करून घेणे असते. तिथे त्या नवर्‍याचे नुकसान अनोळखी राजकपूरलाही करायचे नसते. त्याला केवळ तो लपलाय तिकडे पत्नीचे वा तिच्या नवर्‍याचे लक्ष जाऊ नये; एवढाच हेतू साधायचा असतो. पण तेवढ्य़ासाठी तो त्या रागावलेल्या पत्नीची दिशाभूल करत असतो. आपल्याही आयुष्य़ात अशी अनेक माणसे येतात आणि आपल्या गोंधळलेल्या भावनांचा, त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी वापर करून घेत असतात. त्यात आपले नुकसान होणार असते, होत असते. पण फ़िकीर कोणाला असते? असाच एक माणूस आहे जाफ़रभाई सारेशवाला. तो गुजरातचा रहिवासी असून त्याच्या कित्येक पिढ्या गुजरातमध्ये व्यापारी म्हणून जगल्या आहेत. गुजराती मुस्लिम म्हणून इतरांच्या वाट्याला जे कर्मभोग आले; त्यातून जाफ़रभाईची वा त्याच्या कुटुंबियाची सुटका झाली नाही. त्यामुळेच गुजरातच्या दंगलीचे जे कित्येक बळी आहेत, त्यापैकीच जाफ़रभाई सुद्धा एक आहे. म्हणूनच गुजरातचा मुस्लिम व एकूणच मुस्लिम म्हणून जसा नरेंद्र मोदी यांच्यावर राग धरला गेला, तसाच जाफ़रभाई सुद्धा मोदी नावाचाच द्वेष करत होता.

   द्वेष करत होता, असे मी म्हणतो कारण आता तो मोदींचा द्वेष करत नाही असा आहे. आणि असा बदल त्याच्यात कसा झाला, ती सुद्धा मनोरंजक सुरसकथा आहे. २००२ सालात गुजरातमध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसचा डबा मुस्लिम जमावाने पेटवून दिला होता. त्यात ५९ प्रवाशांना जाळण्यात आले, त्यानंतर जी भयंकर दंगल उसळली, तेव्हा जाफ़रभाई गुजरातमध्ये नव्हता. व्यापार उद्योगाच्या निमित्ताने तो गुजरातबाहेर नव्हेतर भारताबाहेर गेलेला होता. तेव्हा त्याचे वास्तव्य इंग्लंडमध्ये होते. तिथे गुजरातच्या बातम्या येऊन थडकल्या, त्यातून त्याला आपल्या कुटुंबिय व नातलगांची चिंता वाटणार यात शंकाच नाही. कारण तो हजारो मैल दूर होता आणि गुजरातमध्ये मुस्लिमांना जीवे मारले जात आहे, सरकार व पोलिसांच्या संरक्षणाखाली हल्लेखोर मुस्लिमांची कत्तल व जाळपोळ करीत आहेत. खुद्द मुख्यमंत्री असलेला नरेंद्र मोदी नावाचा भाजपा नेता त्या दंगलीला प्रोत्साहन देत आहे, असेच एकूण बातम्यांचे स्वरूप होते आणि सेक्युलर माध्यमातून त्याची थरारक वर्णने जगभर जाऊन पोहोचत होती. खरेखोटे तपासायला कोणाला सवड होती? अशा बातम्यांचा सपाटा व त्यातून होणारी वर्णने, यामुळे खुद्द भाजपामधील अनेकजण गडबडून गेले होते; तिथे जाफ़रभाई वा अन्य मुस्लिमांची काय कथा? तर अशा बातम्या मनाचा थरकाप उडवणार्‍या होत्या आणि भावनांचा कडेलोट करणार्‍या होत्या. त्याचा परिणाम मोदी म्हणजे कोणी हैवान असाच लावला जाणे स्वाभाविक होते. जाफ़रभाईने तसा त्याचा अर्थ लावला व मोदींवर राग धरला; तर नवल नव्हते. मात्र यातले काय घडते आहे किंवा त्याला जबाबदार नेमका कोण आहे; त्याचा शोध घेऊन मत बनवणे तेव्हा तरी त्याच्या हाती नव्हते. त्याच्याच कशाला दंगलीपासून दूर असलेल्या प्रत्येकाला सेक्युलर माध्यमातून येणार्‍या बातम्यांपलिकडे सत्यापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग नव्हता. आणि सर्वच वाहिन्या, वृत्तपत्रे असेच बोलत व सांगत असतील; तर त्याबद्दल शंका घ्यायलाही जागा उरत नाही. अर्थात म्हणूनच अशा सर्व बातम्या सत्य व वास्तव होत्या असेही नाही. पण तेव्हा तरी त्यांनाच सत्य मानण्य़ापलिकडे बहुतेक लोकांपाशी पर्याय नव्हता. सहाजिकच मुख्यमंत्री मोदी यांचे जे सैतानी रूप सेक्युलर माध्यमे व राजकीय नेत्यांनी रंगवले; त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे इतकाच पर्याय इतरांप्रमाणेच जाफ़रभाई सारेशवाला याच्याही समोर होता.

   पिढ्यानुपिढ्या गुजरातमध्ये वसलेल्या व अपार कष्टातून मोठा व्यापार उभा केलेल्या त्याच्या उद्योगाची राखरांगोळी झाल्याची बातमी व माहिती, प्रक्षोभ माजवणारी होती आणि ज्याचे कोणाचे ते पाप असेल, त्याला धडा शिकवण्याची सूडभावना जन्माला घालणारी होती. त्यासाठी जाफ़रभाईला दोष देता येणार नाही. त्याच्या कुटुंबाची सगळी दुनियाच उध्वस्त झालेली होती. घराणे देशोधडीला लागले होते. त्याच्या नातेवाईकांचीच अशी स्थिती नव्हती, तर गुजराती मुस्लिम मोठ्या प्रमाणात असे देशोधडीला लागल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. म्हणजेच एकूण धर्मबांधवांचीही राखरांगोळी झाल्याच्या बातम्यांनी बिचारा जाफ़रभाई खवळून गेला होता. तिकडे दूर लंडनमध्ये बसून तो काय करू शकत होता? भारतातले कायदे व भारत सरकार या हैवान मोदीला रोखू शकत नसतील, तर आपणच काही करायला हवे असे जाफ़रभाई किंवा तत्सम मुस्लिमांना तेव्हा वाटू लागले असेल; तर चुक मानता येणार नाही. कारण बातम्या व माहितीच अशी काळजाचा थरकाप उडवणारी होती. दंगल, त्यातला हिंसाचार, त्यात मरणारी, मारणारी वा मारली जाणारी माणसे, होणारा विनाश, विध्वंस, या सगळ्या गोष्टी बाजूला पडून बातम्या केवळ मोदी नावाचा कोणी हैवान-सैतान गुजरातमध्ये उभा ठाकला आहे, असेच चित्र रंगवणार्‍या होत्या. आणि मग दंगल हा विषय बाजूला पडून मोदी हाच एक विषय बनून गेला. किंबहूना गुजरातच्या दंगलीला मोदीचा चेहरा, मुखवट्याप्रमाणे चढवण्यात आला. पद्धतशीरपणे हे काम स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍या माध्यमातील पत्रकारांनी हाती घेतले व सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या राजकीय पक्ष संघटनांनी त्यात स्वत:ला झोकून दिले. त्यातूनच मोदी म्हणजे गुजरातची दंगल असे एक समिकरण बनवण्यात आले. जणू मोदी तिथे मुख्यमंत्री नसते तर गुजरातमध्ये दंगलच झाली नसती, अशी एक समजूत तयार करण्यात आली. जणू आजवर गुजरातमध्ये कधी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या नाहीत व मुस्लिमांचे दंगलीत कधी नुकसान झालेच नव्हते, असा भ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयास सुरू झाला. पण वास्तव नेमके उलटे होते व आहे. म्हणूनच सलीम खान यांनी त्याच विषयावर प्रश्नचिन्ह लावले. आजवरच्या शेकडो दंगलीत कधी कुणा मुख्यमंत्र्याच्या डोक्यावर खापर फ़ोडण्यात आलेले नाही, मग इथे मोदीच जबाबदार कसा? लोकांना त्या इतर दंगलीच्या वेळी तिथे असलेला मुख्यमंत्री वा त्याचे नाव आठवत नाही. मग गुजरातची दंगल एक मुख्यमंत्री कशी पेटवू शकतो? बिचारा जाफ़रभाई त्याच जाळ्यात फ़सला आणि त्याने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय कोर्टात आरोपी म्हणून उभे करण्याचा बेत आखला. त्यांनी मोदी विरोधात युरोपमध्ये आघाडी उघडली. सेक्युलर माध्यमांनी हाती दिलेल्या वस्तू मोदींच्या अंगावर फ़ेकायला सुरूवात केली. पण आपला राग व सूडभावना कोणी का निर्माण केली, त्याचा विचारही जाफ़रभाईच्या मनाला शिवला नव्हता.    ( क्रमश:)
 भाग   ( १४९ )    २२/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा