रविवार, १४ एप्रिल, २०१३

मोदी विरोधी अपप्रचारातून परदेशी पैसा मिळतो.




   नरेंद्र मोदी खरेच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात काय? लोक त्यांना देशाचा नेता म्हणून स्विकारतील काय? भले त्यांनी गुजरातमध्ये लागोपाठ निवडणुका जिंकल्या असतील, पण त्यांना गुजरात बाहेरचे भारतीय मतदार किती स्विकारतील? अन्य राजकीय पक्षात त्यांना किती मान्यता मिळू शकेल? असे अनेक प्रश्न मुख्य माध्यमातून भाजपाच्या नेत्यांना व प्रवक्त्यांना सतत विचारले जात आहेत. आणि अशा प्रश्नांची उत्तरे देताना भाजपावालेच गडबडून जाताना दिसतात. त्यावरून त्यांनाही मोदी म्हणजे नेमके काय रसायन आहे; त्याचा अंदाज आलेला नसावा, असेच काहीवेळा वाटते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला रविवारी आला. रविवारच्या ‘पुण्यनगरी’मध्ये माझा उलटतपासणीचा लेख प्रसिद्ध झाला. त्याचे शिर्षक होते, ‘गुजरातचा विकास झाला असे कोण म्हणतो?’ अर्थात हे उपरोधिक शिर्षक आहे. असे प्रश्न मुख्य प्रवाहातील माध्यमे व पत्रकार उपस्थित करतात, पण त्यांनाच लोकांच्या भावना कशा कळलेल्या नाहीत; ते स्पष्ट करण्यासाठी तो लेख मी लिहिलेला आहे. अशा माध्यमे व पत्रकारांनी मोदींनी केलेला विकास लपवला व झाकून ठेवला; तरी अन्य मार्गाने सामान्य माणसे तो विकास व त्याच्या कहाण्या देशाच्या कानाकोपर्‍यात कशा घेऊन जात आहेत, त्याचाच तपशील मी कालच्या लेखातून दिलेला होता. पण तो लेख पुर्ण वाचून व समजून न घेताच, नुसत्या शिर्षकाने अस्वस्थ झालेल्या अनेकांचे मला भल्या सकाळी फ़ोन येऊ लागले. तासाभरात या मोदी चहात्यांचे पंचवीसहून अधिक फ़ोन घेतल्यावर, मी नाईलाजाने फ़ोनच बंद ठेवला. कारण त्यांना त्या शिर्षकातला उपरोध कळलेला नव्हता किंवा त्यांनी लेख संपुर्ण वाचलेला नव्हता. पण माझ्यासाठी तरी ती एकप्रकारे मतचाचणी होती. मोदींची मराठी वाचकांमध्ये किती लोकप्रियता आहे, त्याचाच तो दाखला होता. आणि तो माझ्यापुरता नाही. कायबीईन लोकमतच्या सवालमध्येही तेच धडताना दिसते. त्यांची चर्चा मोदी विरोधात चाललेली असते आणि बघणारे त्यांचेच श्रोते-प्रेक्षक मात्र मोदीच्या बाजूने कौल देत असतात. लोकमताची लाट म्हणजे काय, त्याचे हे प्रत्यंतर आहे. हे लोक कुठे लेख लिहिणारे वा वाहिनीवर येऊन मुद्देसुद बोलणारे नसतात. पण ते अगत्याने मतदान करणारे असतात. म्हणूनच त्यांच्या मताला विद्वानांच्या चर्चेपेक्षा अधिक महत्व असते. कारण असेच लोक मतदानातून राजकीय परिवर्तन घडवून आणत असतात.

   अपेक्षेप्रमाणे त्यातले काही व्यापारी व गुजरातमध्ये येजा करणारे होते आणि काहीजण नक्कीच भाजपाचे कार्यकर्ते असणार यात शंकाच नाही. पण बहुतांश सामान्य लोक होते, हेसुद्धा नाकारता येत नाही. माझ्या त्या शिर्षकात काय आहे; त्यापेक्षा लेखात काय तपशील आहे, एवढाही फ़रक त्यांना करावासा वाटला नाही. त्यांची मोदीवरील भक्ती थक्क करून सोडणारी आहे. कारण त्यांनी मला जे प्रश्न विचारले, तेही नेमके होते. तुम्ही गुजरातला जाऊन आला का? तिकडे काय विकास झाला तो बघितलाय का? आपल्या महाराष्ट्रातले रस्ते आणि गुजरातचे रस्ते जरा बघून या. अशा अनेक तपशीलात ही मंडळी जात होती. त्याच्याही पुढे जाऊन दुसरा कोण इतका प्रामाणिक भ्रष्टाचार थोपवू शकणारा नेता आहे सांगा; असाही सवाल केला जात होता. ही इतकी एका नेत्याकडून अपेक्षा लोक का करू लागतात? ज्या नेत्याच्या विरोधात माध्यमांनी गेली दहा वर्षे अपप्रचाराची जणू मोहिमच चालविली आहे; त्यानंतर लोकांना मोदीबद्दल इतके आकर्षण का असावे? त्याचे उत्तर मोदी विरोधातील एनडीए आघाडीतील प्रमुख नेता नितीशकुमार यांच्याच एका सहकार्‍याने दिलेले आहे. गेले दोनचार दिवस नितीशकुमार (मोदी विरोधात) भाजपाला पेचात पकडणार अशा बातम्या रंगवल्या जात होत्या. निवडणुकीपुर्वीच भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहिर करावा, म्हणून शनिवारच्या जनता दल बैठकीत दबाव आणला जाणार अशाही बातम्या होत्या. पण प्रत्यक्षात संयुक्त जनता दलाची बैठकच बोंबलली. कारण त्याच पक्षाचे राष्ट्रीय सचिव असलेल्या शिवराज सिंह या नेत्याने ऐन बैठकीच्या मुहूर्तावर नितीशकुमारलाच आव्हान दिले. मोदी विरोधात बोलायचे बंद करा आणि हिंमत असेल तर पक्षातच सेक्युलॅरिझमची चर्चा घडवून आणा; असे पत्रच त्याने स्वपक्षाच्या अध्यक्षाला लिहिले. ते अडचणीचे असल्याने मग त्याचीच नितीशच्या पक्षातून हाकालपट्टी झालेली आहे. पण शिवराज सिंह यांनी उपस्थित केलेले व विचारलेले प्रश्न अनुत्तरित रहाता कामा नयेत. मोदी विरोधी अपप्रचाराच्या आघाड्या व मोहिमा चालवण्यासाठी परदेशातून जनता दलाच्या नेत्यांना किती पैसा मिळाला; त्याचाही हिशोब द्यायची मागणी या शिवराज सिंहने केलेली आहे. गेल्या दहा वर्षातल्या मोदी विरोधी प्रचार मोहिमेतील हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मोदी विरोधात माध्यमांपासून अनेक स्वयंसेवी संस्थांनी उघडलेली प्रचाराची आघाडी, खरोखरच गुजरातच्या दंगलीतील पिडीतांना न्याय देण्याची लढाई होती, की तो एक परदेशी लोकांकडून पैसा मिळवण्याचा धंदा आहे?

   कारण इतक्या खुलेपणाने असा आरोप करून हिशोब मागणारा शिवराज सिंह पहिलाच नेता असला तरी दबल्या आवाजात हे गुपित अनेकांनी आजवर उघड केलेले आहे. मोदी यांच्यावरचे दंगलीचे आरोप व त्यांना त्यासाठी बदनाम करण्याचे राबवण्यात आलेले कारस्थान केवळ राजकीय आहे, की त्यामागे कुणा परदेशी शक्तीचा हात आहे? आज नितीशकुमारच्या पक्षाचा राष्ट्रीय सचिव हे बोलतो आहे. पण काही आठवड्यापुर्वी गुजरात दंगलीचा व्यापार करणार्‍या तीस्ता सेटलवाड यांच्या एका जुन्या सहकार्‍यानेही कायबीइन लोकमत वाहिनीवरील चर्चेत त्याचाच ओझरता उल्लेख केलेला होता. सतत त्या वाहिनीवर दिसणारे व चर्चेत असणारे गुजराती पत्रकार जतीन देसाई यांनीही तीस्ता वगैरे लोक परदेशी निधी मिळावा म्हणून केवळ जातीय दंगलीचाच विषय लावून धरतात. पण मुस्लिम वा अन्य गुजराती जनतेच्या समस्यांवर तोंड उघडत नाहीत; असे स्पष्टपणे नमूद केले होते. तीस्ताचा आव असा असतो, की आपण मानवी न्यायासाठीच लढतो. पण त्यांना न्यायापेक्षा ज्या लढ्यातून परदेशी निधी मिळणे शक्य असते, त्यातच रस असल्याचे सतत दिसून आलेले आहे. त्याचा तपशील मी नंतर देणार आहे. पण याच संदर्भातील आणखी एक ताजा तपशील इथे सांगितलाच पाहिजे. दिड महिन्यापुर्वी गुजरात दंगलीला अकरा वर्षे झाली. त्या निमित्त त्यातील बळींसाठी प्रार्थना योजण्यात आल्या होत्या. त्याच कार्यक्रमासाठी अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीमध्ये तीस्ता पोहोचली तेव्हा तिथल्या रहिवाश्यांनी तिला हाकलून लावली होती. आजकाल ज्या अहसान जाफ़री यांच्या हत्येचे भांडवल तीस्ता सातत्याने करीत असते, त्या जाफ़री यांचे हत्याकांड त्याच गुलमर्ग सोसायटीमध्ये झालेले होते. आणि त्याचे भांडवल करून तीस्ताने सत्तर-ऐशी लाख रुपये कमावले, पण छदामही त्या रहिवाश्यांना मिळू दिला नाही, असा त्यांचा आरोप आहे. आधी आमच्या नावाने पळवलेले पैसे आणा, मग सोसायटीमध्ये या; असे ठणकावून सांगत तीस्ताला त्या रहिवाश्यांनी तिथून हाकून लावले.

   तीस्ता किंवा तिच्यासारखी मंडळी कायम मोदी विरोधात दंगलीची गरळ ओकत असतात. पण त्यांना मुस्लिम वा दंगलपिडीतांना न्याय द्यायचा असतो, की त्यांच्या यातना वेदनांचे भांडवल करून समाजसेवेचा धंदा करायचा असतो? त्यासाठी जगातून कोणकोण कशासाठी पैसे देतात, या विषयाचा छडा लागलाच पाहिजे. कारण आता हे आरोप सतत होऊ लागले आहेत. पण त्याच्या बातम्या कधी सेक्युलर मुख्यप्रवाहातील माध्यमातून येत नाहीत. अशा फ़सवणुकीला माध्यमे प्रसिद्धी देत नाहीत. पण शिवराज सिंह यांनी तो मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मोदी विरोधात दंगलीच्या निमित्ताने खोट्यानाट्या गोष्टी पसरवणे व दिशाभूल करणे; असे एक कारस्थान गेली दहा वर्षे कसे सातत्याने राबवण्यात आले व त्याला सेक्युलर म्हणून माध्यमे व पत्रकारांनी किती साथ दिली, त्याचे तपशील चक्रावून सोडणारे आहेत. मोदी विरोधातील या खोट्या माहिती व बिनबुडाच्या बातम्यांचा खरा चेहरा जसजसा लोकांसमोर येतो आहे, तसतसा लोकांमध्ये मोदी विरोधकांविषयीचा संताप वाढत चालला आहे. त्यातूनच मग मोदींच्या बाबतीत सहानुभूतीची एक सुप्त लाट निर्मा्ण होत चालली आहे. यात मोदी हा विषय दुय्यम आहे आणि लोकांची प्रसार माध्यमातून किती बेमालूम दिशाभूल केली जाऊ शकते, तो विषय अधिक चिंताजनक आहे. गिधाडे वा रक्तशोषक विषाणू म्हणावे; अशा सेक्युलर स्वयंसेवी संस्था कशा देशाच्या सुरक्षेला पोखरत आहेत, त्याचा तो तपशील अंगावर शहारे आणणारा आहे. आणि अशा देशद्रोही म्हणावे त्या लोकांमुळेच मोदी बदनाम झाले असून; त्या फ़सगतीमधून बाहेर पडणारे गुजरातचे मुस्लिमही मोदींकडे आकर्षित होऊ लागले आहेत. या मोदी विरोधाचे व बदनामीचे कारस्थान म्हणूनच उलगडणे अगत्याचे होऊन बसले आहे. ते पुर्ण तपशीलाने बाहेर आलेच, तर मोदींचे चहाते व हिंदू लोक सोडाच; मुस्लिमही तीस्ता वा तिच्यासारख्या सेक्युलर भामट्यांना अक्षरश: रस्त्यावर येऊन चोपल्या शिवाय रहाणार नाहीत. तोच सगळा तपशील ‘पुण्यनगरी’च्या वाचकासमोर संगतवार मांडायचा प्रयास मी करणार आहे. कारण देशात येऊ घातलेल्या मोदी लाटेचे रहस्य त्याच सेक्युलर कारस्थानामध्ये दडलेले आहे.     ( क्रमश:)
 भाग   ( १४२ )    १५/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा