गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

गुजरातची दंगल हा तर टाईमपासचा विषय




  जाफ़रभाई सरेशवाला हा कोणी मोदीचा हस्तक वा विकला गेलेला आहे, असेच त्याचे कथन वाचणार्‍याला वाटेल. पण प्रत्यक्षात जाफ़रभाई व त्याचे संपुर्ण कुटुंब जसे गुजरातच्या दंगलीचा बळी आहे, त्यापेक्षा अधिक तो सेक्युलर प्रयोगशाळेचा बळी आहे. त्यातूनच त्याला अनेक साक्षात्कार घडले आहेत. म्हणूनच अधिक तपशीलात जाण्यापुर्वी २००२ मध्ये गोध्रानंतर गुजरात पेटला, तेव्हा जाफ़रभाई कुठे होता, काय करत होता; तेही जाणून घेणे अगत्याचे असेल. गुजरात पेटला, तेव्हा जाफ़रभाई इंग्लंडमध्ये ड्युजबरी येथे रहात होता. तिथेच स्थायिक झालेले तीन गुजराती मुस्लिम कामानिमित्त गुजरातमध्ये आलेले असताना हिंमतनगर येथे जीवानिशी दंगलीत मारले गेले. हे अर्थातच जाफ़रभाईला इंग्लंडमध्येच कळले. त्या तीनपैकी एकाचे नाव असवाल असे होते आणि तो जाफ़रचा इंग्लंडमधला शेजारी होता. तिथे वसलेले गुजराती मुस्लिम गडबडून गेले. आपल्यासाठी व गुजराती मुस्लिमांसाठी कोणीच वाली राहिला नाही, अशा धारणेने हे मुस्लिम रडकुंडीला आलेले होते. दुसरा कोणी आपल्या मदतीला येत नसेल, तर हे सर्व थांबवायला आपणच हातपाय हलवले पाहिजेत असे जाफ़रभाईला वाटू लागले. पण करायचे तरी काय? त्याने गुजरात सरकारलाच कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. आपल्याला गुजरात सोडा भारतात न्याय मिळू शकत नाही, अशीच त्याची धारणा झाली होती. एकतर त्याचा अनेक वर्षांचा गुजरातच्या दंगलीचा अनुभव गाठीशी होता आणि आता तर तिथे मोदी नावाचा कोणी मुस्लिमांचा खाटीकच सत्तेवर बसलाय, अशी बातम्या वाचून त्याची खात्री पटलेली होती. म्हणूनच त्याने थेट आंतरराष्ट्रीय कोर्टातच दाद मागायचा निर्णय घेतला. योगायोग असा, की त्याच वेळी भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी युरोपच्या दौर्‍यावर होते आणि स्पेनमधून पुढे ब्रिटनमध्ये येण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. तातडीने जाफ़रभाईने तिथल्या एका कोर्टामध्ये अडवाणी हे जातियवादी असल्याने जातिय धार्मिक सलोखा बिघडवणारे आहेत, म्हणून त्यांच्या ब्रिटन येण्यावर बंदी घालण्याची मागणी स्थानिक कोर्टात केली. भारतासाठी व अडवाणी यांच्यासाठी त्यातून विचित्र स्थिती निर्माण झाली.

   त्याच कालखंडात लुईस फ़राखान यांना तिथल्या कोर्टाने कडव्या इस्लामिक संघटनेचे म्हणून ब्रिटनमध्ये येण्यास प्रतिबंध केला होता. धार्मिक भावनांना चिथावण्या देण्यामुळे त्यांना प्रतिबंध करण्यात आला होता. त्याच पद्धतीने अडवाणी यांना रोखण्याचा मार्ग जाफ़रभाईने चोखाळला. पण तशी वेळच आली नाही. अडवाणी तिकडे फ़िरकले नाहीत. पुढे जाफ़रभाईची ती याचिका कोर्टाने फ़ेटाळून लावली. पण तेवढ्या एका कृतीने रातोरात जगभरच्या सेक्युलर लोकांत जाफ़रभाई हिरो होऊन गेला. गुजरातच्या मुस्लिमांना न्याय देण्याच्या लढाईतला तो बिनीचा शिलेदार ठरला. त्याच्यावर जगभरच्या व भारतातल्या तमाम सेक्युलर माध्यमातून स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली. त्याच्याही अंगावर मुठभर मास चढले. त्याने मग तोच पवित्रा मुख्यमंत्री मोदीच्या विरोधात घेतला. त्यासाठी ब्रिटनमधल्या अत्यंत यशस्वी व नामवंत कायदा संस्थेची मदत घेतली. मोदी विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली. मग काय तमाम माध्यमे व सेक्युलर जाफ़रभाईला डोक्यावर घेऊनच नाचू लागले. पण यातून खरोखरच गुजरातच्या मुस्लिमांना न्याय मिळणार आहे का? असे खटले किती काळ चालणार? त्याचा निकाल लागून गुजरातच्या मुस्लिमांची स्थिती कधी सुधारणार? आपण हिरो ठरवले जाऊ, योद्धा व लढवय्या म्हणून गौरवले जाऊ, पण न्यायाचे काय? मोदीना अटक वा त्यांच्याविरुद्ध निकाल निवाडे होण्यातून राजकीय हेतू साध्य होईल. पण गुजरातच्या मुस्लिमांचे भवितव्य काय? असे प्रश्न जाफ़रभाईला सतावू लागले. मोदीला धडा शिकवलाच पाहिजे. पण त्यासाठी गुजरातच्या मुस्लिमाला किती काळ नरकवासात पडून रहावे लागणार आहे? मोदीना शिक्षा झाली म्हणजे मुस्लिमांना न्याय मिळेल व त्यांच्या जीवनात समाधान येईल का? हे प्रश्न त्याचा पाठलाग करू लागले. योगायोग असा, की त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या पुढाकाराने पॅलेस्टाईन व इस्त्रायल यांच्यातल्या वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. त्याच्याही बातम्या इंग्लंडमध्ये बीबीसीवर जाफ़र बघत होता. सहा दशके म्हणजे तीन पिढ्या निर्वासित छावण्यांमध्ये खितपत पडलेल्या पॅलेस्टाईनी मुस्लिमांची अत्यंत दुरावस्था त्यात दाखवली जात होती. त्याचा संबंध गुजरातशी जोडून विचार करू लागल्यावर जाफ़रभाई सर्द झाला. आपण जे करतो आहोत ते मुस्लिमांच्या भल्यासाठी, की त्यांना दिर्घकाळ नरकवासात ढकळण्यासाठी; असा एक विचार त्याच्या मनात आला आणि चक्रे उलटी फ़िरू लागली.

   गेली सहा दशकांहून अधिक काळ पॅलेस्टाईन हा जगभरच्या मुस्लिम नेत्यांनी व राजकारण्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवून ठेवला आहे. त्यावर राष्ट्रसंघापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळीकडे मोठमोठे लढे चालू आहेत. परिषदा व मेळावे, निदर्शने व संघर्ष चालूच आहेत. पण त्या तत्वांच्या लढाईत पॅलेस्टाईनचा मुस्लिम मात्र पिढ्यानुपिढ्यांचा भरडला गेला आहे. हे तात्विक लढे व संघर्ष सुखरूप स्थानी बसून सुखवस्तू जीवन कंठणारे लढवत आहेत. पण ज्यांच्या न्यायाची ही लढाई आहे, ते मात्र नरकवासात खितपत पडलेले आहेत. त्यांचे मत कोणी विचारलेले नाही किंवा त्यांच्या अवस्थेची कोणाला फ़िकीर नाही. जणू या तात्विक प्रयोगशाळेतले ते मूक प्राणी असावेत, तसा त्यांच्यावर जीवघेणा प्रयोग चालू आहे. त्यांच्या जीवाला वा त्यांच्या जगण्याला कुठेच स्थान नाही. लेबानॉन वा अन्य अरब देशात मूळ निर्वासित म्हणून आलेले मरून गेलेत अणि त्यांच्या दुसर्‍या तिसर्‍या पिढीतले पॅलेस्टाईनी जनावरासारखे जगत आहेत. अगदी अरबी व मुस्लिम देशातही त्यांना कचरा असावा तशीच वागणूक मिळते आहे. आपण गुजराती मुस्लिमांची तीच अवस्था करायची काय? आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊन आपण हिरो होणार. पण आपले भाईबंद असलेल्या गुजरातमधल्या मुस्लिमांचे काय? त्यांनी सतत भितीच्या छायेखाली व निर्वासित छावण्यात जगावे काय? तत्वांची भाषा करणारे व त्यासाठी लढावू भाषा व भाषणे बोलणारे; कधी निर्वासित छावणीत जगत नाहीत. उलट लढवय्याचा आव आणून पाश्चात्य देशात सुखवतू चैनीचे जीवन कंठतात, ह्याची जाणिव जाफ़रभाईला चकीत करून गेली. त्याचेही कारण होते. तावातावाने गुजरात दंगली किंवा मुस्लिमांच्या अन्यायावर बोलणारे जेव्हा त्याच पिडीतांना मदत द्यायची वेळ येते; तेव्हा पाठ फ़िरवतात, हा अनुभव त्याचे खरे कारण झाला. गुजरातकडे कधी न फ़िरकणारे व लाखो डॉलर्स कमावणारे फ़क्त तोंडाची वाफ़ दवडतात व कृतीची वेळ आल्यावर पळ काढतात, हा अनुभव धक्कादायक व डोळ्यात अंजन घालणारा होता.

   इस्लाम म्हणजे जगभरचे मुस्लिम बांधव, अशी एक समजूत जाफ़रभाईला प्रेरीत करून होती. तिलाच तडा गेला. कारण युरोप वा ब्रिटनमध्ये वसलेले मुस्लिम अरब वा पाकिस्तानी असतील तर गुजरातला मदत करताना पाठ फ़िरवायचे. तोंडाने खुप बोलणारे मदत मागायला गेले, मग टाळाटाळ करायचे. त्यातून जाफ़रभाईचा भ्रमनिरास झाला. हेच पॅलेस्टाईनसाठी झाले व हेच गुजरातच्या दंगलीनंतर त्याच्याही अनुभवास आले. इतक्या दूरचे सोडा भारतातले मुस्लिमही कितपत गुजरातच्या मुस्लिमांच्या मदतीला आले? त्याचेही उत्तर नकारार्थीच होते. इंग्लंडच्या विविध मशीदी व मुस्लिम वस्त्यांमधून जाफ़रभाई दंगलपिडीत मुस्लिमांसाठी निधी गोळा करायला फ़िरत होता. संस्थांकडे थेट पैसे पाठवा असे आवाहन तिथल्या मुस्लिमांना करत होता. पण त्याला मिळणारा प्रतिसाद त्याचा भ्रम दूर करत गेला. गप्पा मारताना वा पार्टीमध्ये कबाब खाताना, विरंगुळ्याचा विषय म्हणून गुजरातची दंगल बोलली जाते. पण त्या गुजराती मुस्लिमाला मदत करायची इच्छा, त्यापैकी कोणा सुखवस्तू मुस्लिमांनाही नाही, ही जाणिव त्याचे डोळे उघडून गेली. त्यामुळेच अड्वाणी किंवा मोदी यांना कोर्टात खेचायला निघालेल्या जाफ़रभाईच्या डोक्यात वेगळे विचार घोंगावू लागले. आपल्याला लढवय्या म्हणून हिरो व्हायचे आहे, की खरोखरच गुजराती मुस्लिमांना न्याय द्यायचा आहे? त्यांना सुरक्षित जीवन मिळावे ही आपली इच्छा आहे, की आपल्याला निव्वळ लढायचे व नाव कमवायचे आहे? हे विचार त्याला बदलत गेले. वेगळ्या दिशेने जाफ़रभाई विचार करू लागला. मग कोणाही सच्चा मुस्लिमाप्रमाणे त्याने आपल्या प्रश्नांची व शंकांची उत्तरे कुराण व धर्माच्या शिकवणीमध्ये शोधायचा प्रयास सुरू केला. जगात पहिला इस्लामिक गुंतवणूक फ़ंड व त्याची कंपनी सुरू करणार्‍या जाफ़रभाईची मोठ्या श्रीमंत मुस्लिमात उठबस होती. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक मदतीने गुजरातच्य दंगल पिडीतांना न्याय व सुखरूप जीवन देण्याची कल्पना त्याच्या डोक्यात होती. पण अनुभव त्याला चक्रावून गेला. त्यापैकी कोणालाच मुस्लिमांच्या दु:ख दैन्याची फ़िकीर नव्हती. त्यापेक्षा आपला धंदा व सुखवस्तू जीवन प्यार होते. त्यांच्याप्रमाणेच न्यायाच्या लढ्याचे देखावे उभे करून मुस्लिमांची दिशाभूल करणे किंवा त्या गरीब मुस्लिमाच्या जीवनाला स्थैर्य आणणे, यापैकी कोणता मार्ग स्विकारायचा, अशी जाफ़रभाईच्या जीवाची घालमेल चालू झाली होती. मात्र मोदींबद्दलचा राग त्याच्या मनात कायम होता.      ( क्रमश:)
 भाग   ( १५३ )    २६/४/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा