गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

संघासमोरचे ऐतिहासिक आव्हान

 

कुठलीही संस्था संघटना काही माणसे एकत्र येऊन स्थापन करतात, तेव्हा त्यामागे त्यांचे काही हेतू असतात. ते हेतू त्यांना कितीही उदात्त वाटत असले तरी इतर काहीजणांना तेच हेतू शंकास्पद वाटतात. सहाजिकच कुठलेही कार्य वा ते करणारी संस्था संघटना टिकेचे लक्ष्य होते असते. म्हणूनच नव्वद वर्षापुर्वी स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज वा पुर्वी टिकेचे लक्ष्य झाला असल्यास नवल नाही. पण त्याचे काही लाभ ज्यांना मिळतात वा त्याविषयी आत्मियता असते, त्यांना त्याचे काम उदात्त व उपकारक वाटणे स्वाभाविक असते. संघ खुप साधी संघटना आहे. आजकाल जगात अनेक विध्वंसक हिंसक संस्था संघटना उदयास आलेल्या आहेत की त्यांची जाहिर भूमिकाच जगाला भेडसावते आहे. पण त्यात कार्यरत असलेल्यांना ते फ़ार मोठे पवित्र कार्य वाटत असतेच. मग संघासारख्या सेवाभावी व काही सांस्कृतिक उद्दीष्ट बाळगणार्‍या संस्थेच्या अनुयायांना आपल्या संघटनेकडे संशयाने बघितले गेल्यास राग येणेही स्वाभाविक आहे. अर्थात अशा संघटना काय काम करतात आणि त्यांच्यावर टिका कोणती होते, यापेक्षा त्याचे एकूणच मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात, याला अधिक महत्व असते. खेरीज त्यांच्या संघटनेतून जी शक्ती निर्माण झालेली असते, त्यात अनेकांना आपले हितसंबंध साधण्याची प्रबळ इच्छाही होत असते. म्हणून मग अशा संस्था संघटनांवर होणारी टिका किंवा व्यक्त होणारी मते, विभिन्न स्वरूपाची असतात. म्हणजे कोणी त्यावर बंदी घालण्याची मागणी करतो तर कोणी त्यांच्या हेतूविषयी शंका घेत उद्दीष्टे बदलण्याचाही आग्रह धरतो. कोणी त्यांना अमूकतमूक करा असे सल्ले देतो, तर कोणी अन्य काही करायचे सोडून देण्याचाही आग्रह धरत असतो. मग त्यांनी नेमके काय करायला हवे? कोणाचे ऐकावे? कसे वागावे?

उद्या तोयबांना कोणी पुरग्रस्तांना मदत करायचा आग्रह धरला, तर कसे चालेल? विविध चर्च संघटनांना त्यांनी धर्मप्रसार बंद करण्याचा सल्ला दिल्यास चालेल काय? एका ठराविक उद्देशाने स्थापन झालेल्या संघटना त्याच हेतूपुर्तीसाठी काम करत असतात आणि मग तो हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक असेल अशा मार्गाने काम करीत जातात. ते ज्यांना अमान्य असेल, अशा लोकांनी आपली संघटना बनवावी आणि त्या संस्थेतर्फ़े नकोशा संस्थेच्या कामाला बरकत येणार नाही, असे वातावरण निर्माण करावे. त्यांना कोणी रोखलेले नाही. पण आपल्या हेतूसाठी दुसर्‍यांनी त्याचे हेतू सोडून देण्याचा आग्रह संपुर्णपणे मुर्खपणाचा व गैरलागू असतो. त्याला नकारात्मक भूमिका असे म्हणता येईल. डॉ. केशवराव हेडगेवार यांनी नव्वद वर्षापुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि काही विश्वासू सहकार्‍यांच्या मदतीने तरुणांना ठराविक उद्दीष्टासाठी संघटीत करण्याचा मनसुबा रचला होता. त्याचे कारण काय होते? डॉक्टरही मुळातच स्वातंत्र्य चळवळीत होते आणि तिथे काम करताना त्यांना कॉग्रेस नावाची संघटना मुस्लिमांना झुकते माप देते किंवा हिंदूंच्या बाबतीत अन्याय्य पक्षपात वागते असे वाटते. त्यामुळे त्यांनी कॉग्रेसमध्ये राहून त्यात बदल करायचा प्रयत्न केला. कॉग्रेसच्या भूमिका बदलू शकल्या नाहीत, तेव्हा डॉक्टरांनी कॉग्रेसच्या अशा हिंदूविरोधी धर्मनिरपेक्षतेला शह देण्याचा निर्धार केला. संघ त्यातूनच उदयास आलेला आहे. त्याचा जन्मच मुळात तोतया पक्षपाती धर्मनिरपेक्षतेला शह देण्यासाठी झालेला आहे. मग आज त्याच्या पाठीशी भक्कम पाठबळ उभे राहिल्यावर त्याने कॉग्रेस वा तथाकथित तोतया धर्मनिरपेक्षतेची कास धरावी काय? तसा संघाकडे आग्रह धरणेच मुर्खपणा नव्हे काय? पक्षपाती सेक्युलर विचार देशाला धोकादायक आहेत, अशा भूमिकेतून संघ जन्मला ही वस्तुस्थिती नाकारून त्याच्याकडे बघता येणार नाही.

अर्थात हा तात्विक विषय आहे आणि त्याच उहापोह सामाजिक वा राजकीय अभ्यासकांनी करावा. पण पत्रकार म्हणून जर नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या व शंभरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या संघाचा विचार करायचा असेल, तर वर्तमानाचा विचार योग्य ठरेल. म्हणून आज इतिहासाने या संस्थेवर कोणती जबाबदारी टाकलेली आहे, त्याचा उहापोह करणे मला अगत्याचे वाटते. कारण नव्वद वर्षानंतर परिस्थिती खुप बदलली आहे. जग आणि देशच नव्हेतर जागतिक गुंतागुंतही आमुलाग्र बदलली आहे. त्या चक्रव्युहात जगातल्या प्रत्येक संस्था संघटनेला आपली अशी एक भूमिका घेणे भाग ठरणार आहे. कारण जग आता खुप जवळ आले आहे. म्हणूनच संघ जरी भारतापुरता विचार करत असला वा भूमिका घेत असला, तरी जागतिक संदर्भ बाजूला ठेवून त्याला वाटचाल करता येणार नाही. स्थापनेच्या वेळी भारतीय उपखंड वा कॉग्रेसची स्वातंत्र्य चळवळ अशी सीमा होती. पुढल्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात देशांतर्गत राजकारण व त्याचे इथल्या बहुसंख्यांक हिंदूंना भोगावे लागणारे परिणाम, अशा चाकोरीत संघाला काम करावेच लागणार होते. पण एकविसाव्या शतकाने हे राष्ट्रीय व भौगोलिक संदर्भ विस्कटून टाकले आहेत. मध्य आशियात मुस्लिमच आपल्या धर्मबांधवांच्या जीवावर उठलेत आणि त्यामुळे पाश्चात्य देशांना निर्वासितांचा लोंढा भेडसावतो आहे. भारताच्या पश्चिमेला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभे केले आहे. जगाची विभागणी धर्म व वांशिक गटांमध्ये होत चालली आहे. अशावेळी हिंदूंचे संघटन म्हणवणार्‍या संघाला नव्या जबाबदार्‍या ओळखता आल्या पाहिजेत आणि मूळच्या उद्देशाला पुरक अशा नव्या जबाबदार्‍यांना सामोरे जाणेही भाग आहे. पण त्याचा कितीसा विचार संघात चालू आहे वा त्याची जाणिव कितीशी झाली आहे, याची शंका येते. हिंदू आणि राष्ट्रीय अशा गुंत्यात कुठेतरी संघ घुटमळतो आहे काय, त्याचाही खुलासा होत नाही.

सध्या जगाअमोर काय स्थिती आहे आणि त्यात भारताचे उत्तरदायित्व काय आहे? संघ किंवा भाजपा यांना त्याचाही विचार करणे भाग आहे. नव्वद वर्षापूर्वी संघाची स्थापना झाली, तेव्हा या उपखंडाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट हेडगेवार यांनी मनाशी बाळगले असेल तर ते चुक म्हणता येत नाही. कारण त्याच्याही कित्येक शतके आधीपासून या उपखंडाला इस्लामिक भूमी बनवणे या हेतूने आक्रमणे झाली व तसे प्रयत्न आजही चालू आहेत. पण तेव्हा समोरचे आव्हान मुस्लिम लीग वा मुस्लिम संघटनांपुरते मर्यादित होते. अधिक सेक्युलर वा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा परिधान केलेल्या राजकारण्यांचे आव्हान समोर होते. त्यांच्याशी संघाला एकाकी लढणे भाग होते. आज ते आव्हान जागतिक झालेले आहे. जगभर पसरलेल्या जिहादी संघटना व त्यांचे आश्रयदाते असलेले अनेक इस्लामी देशाचे सत्ताधारी, यांनी एकविसाव्या शतकातले सर्वात मोठे राजकीय आव्हान जगासमोर ठेवलेले आहे. त्याच्याशी देशांतर्गत भारत सरकार लढते आहे. आजवरच्या सेक्युलर राजकारणाने भारत सरकारला हतबल करून ठेवल्याने, इथे इस्लामिक दहशतवाद बोकाळला आहे. पण त्याच काळात जगभर इस्लामिक जिहादी हिंसाचाराने थैमान घातले आहे. म्हणजेच संघाच्या सामाजिक राजकीय भूमिकेच्या जवळ अवघ्या जगाला यावे लागते आहे. नव्वद वर्षापुर्वी जी समस्या संघाने वा हेडगेवार यांनी ओळखली होती, ती आता जागतिक प्रश्न बनली आहे. अवघे जगच त्याच विषयावर उत्तर शोधते आहे. कारण इस्लामिक आव्हानाने अवघ्या जगाला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभे केलेले आहे. म्हणूनच भले आज संघाचा एक प्रचारक व स्वयंसेवक पंतप्रधानपदी विराजमान झालेला असला, तरी त्याला देश वा उपखंडापुरता मर्यादित विचार करण्याची मोकळीक राहिलेली नाही. त्याला जगाचा विचार करणे भाग आहे. कारण जग आणि संघाची भूमिका भिन्न उरलेली नाही.

सांगायचा मुद्दा इतकाच, की रशियाचे पुतीन वा फ़्रान्स जी लढाई लढत आहेत त्यापेक्षा संघाचे उद्दीष्ट किंचितही वेगळे राहिलेले नाही. भले आज भारत इसिसच्या जिहादी युद्धात सापडलेला नाही. पण ते संकट भारताचे दार ठोठावत उभे आहे. अफ़गाण व पाकिस्तानमार्गे ते संकट भारताच्या सीमेवर येऊन कधीही उभे राहू शकते. जगाला आज जिहादी हिंसाचार भेडसावतो म्हणजे तरी काय? तर जिहादी इस्लाम या चौदाशे वर्षे जुन्या मानसिकतेलाच उत्तम जीवनशैली ठरवून ती जगावर लादण्याचा संघर्ष छेडला गेलेला आहे. त्यामुळे कुठल्याही देशाला जिहादी इस्लामशी लढायचे असो किंवा नसो, त्याला त्यापासून पळण्याची मुभा उरलेली नाही. अमेरिकेपासून युरोपातील देशांनी त्यापासून पळ काढण्याचा खुप प्रयत्न करून बघितला. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि त्यांना अघोषित युद्ध खेळावेच लागते आहे. जिहाद मोडीत काढणे म्हणजेच इस्लामिक आक्रमण मोडीत काढणे होय. कारण जिहाद हा इस्लामिक धर्माची जीवनशैली उर्वरीत जगावर लादण्याचा संघर्ष आहे. त्याचाच दुसरा अर्थ तुमची जी कुठली बिगर इस्लामिक जीवनशैली असेल, ती समूळ नष्ट करण्याचा हा संघर्ष आहे. त्याला शरण जाणे किंवा त्याच्याशी दोन हात करून आपापली जीवनशैली सुरक्षित राखणे, इतकाच पर्याय बिगर इस्लामिक लोकसंख्येपुढे शिल्लक आहे. मग तो उद्देश घेऊन उदयास आलेल्या संघाची भूमिका व रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन वा फ़्रान्सचे अध्यक्ष ओलेंदे यांच्या भूमिकेत कितीसा फ़रक उरतो. अर्धवट बुद्धीचे पुरोगामी त्याला इस्लामोफ़ोबिया असे खुळचट नाव देतात. पण हा वास्तविक मुस्लिमद्वेष नव्हे. तर भेडसावणार्‍या संकटाविषयी फ़ोडला जाणारा टाहो आहे. त्यातून आपापली जीवनशैली वाचवण्यासाठी एकेकटे लढायचे, की सामुहिक आव्हान ओळखून संयुक्तपणे त्याला सामोरे जायचे, हे सर्वच देशांना ठरवावे लागणार आहे.

यात मग भारताची भूमिका काय असणार आहे? असा प्रश्न विचारला, मग ती भूमिका भारत सरकार ठरवू शकते, संघाचे ते काम नाही, असे बोलणे गैरलागू आहे. कारण हा लढा कुणा एका देशाशी दुसर्‍या देशाची लढाई नाही. तर बिगर इस्लामिक जीवनशैली विरुद्ध असंहिष्णू इस्लामिक जीवनशैलीचे आक्रमण, असा आहे. त्यात अवघा समाज ओढला जाणे अपरिहार्य आहे. त्या परिस्थितीत भारताचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. इस्लामिक आव्हान उभे आहे ते आशिया व त्याच्याशी संलग्न अशा युरोपिय व आफ़्रिकन भूमीत उभे आहे. त्यामुळे़च येऊ घातलेले महायुद्ध हे आशियात उफ़ाळत चालले आहे. त्यात चीन, रशिया व भारत यांना निर्णायक भूमिका पार पाडावी लागणार आहे. इस्लामिक देशांचे शेजारी असलेले हेच तीन मोठे देश आहेत आणि त्यांना आपापल्या जीवनशैलीचा बचाव करणे भाग आहे. याखेरीज अन्यत्र असलेल्या देशांच्याही जीवनशैलीला आक्रमक इस्लामचा धोका आहे. पण त्यांच्या भूमीवर युद्ध होण्यापर्यंत मजल जाणार नाही. युद्धाचा भडका आशिया, आफ़्रिका व पुर्व युरोप असाच होणे अपरिहार्य आहे. त्यासाठी पुतीन यांनी रशियाच्या वतीने पुढाकार घेतला आहे आणि आक्रमक इस्लामच्या विरोधात शियापंथीय मुस्लिमांना वेगळे काढण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे सौदी अरेबियानेही ३४ इस्लामिक देशांची आघाडी उभी करण्याची जमवाजमव केलेली आहे. त्यात अजून अमेरिका व युरोपियन महासंघाची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. पण त्यांनाही क्रमाक्रमाने पुतीन यांच्यासोबत जाणेच भाग पडणार आहे. मग यात भारत कोणती भूमिका घेऊ शकतो? भारताला अलिप्त राहून पळ काढता येईल काय? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला यापासून पळणे शक्य नाही. म्हणूनच सरकारला काही ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि अशा वेळी संघाला त्यात पुढाकार घ्यावाच लागणार आहे.कारण संघ ही हिंदूंची वा भारतीय जीवनशैली जपण्यासाठी उदयास आलेली संघटना आहे. दुसर्‍या महायुद्धाने अवघा युरोप बेचिराख केला होता. हिटलर वा त्याच्या कडव्या समर्थकांनी त्यातून काय मिळवले? त्यांनी जे मिळवले त्यापेक्षा जिहादी मानसिकतेला अन्य काहीही जास्त मिळवायचे नाही. कारण जिहादसाठी भारावलेले जे योद्धे लढवय्ये आहेत, त्यांना कुठला देश, भूमी वा साधनसंपत्ती याच्याशी काडीचे कर्तव्य नाही. त्यांना अल्लाहने मृत्यूनंतर देवू केलेल्या जन्नत म्हणजे नंदनवनात जायचे आहे. त्यामुळे इथे किती व कोणती नासधुस होते, याची त्यांना फ़िकीर नाही. ही लढाई दोन विभिन्न मानसिकतेची आहे. जगण्यासाठी लढणारे विरुद्ध मरण्यासाठीच उतावळे झालेले, अशी चमत्कारिक लढाई होऊ घातली आहे. त्यापासून भारताला पळ काढता येत नाही. म्हणूनच संघालाही त्याचे उत्तरदायित्व पार पाडणे भाग पडणार आहे. ते उत्तरदायित्व त्यांचा प्रचारक असलेल्या एकट्या पंतप्रधानाचे नाही, तर बिगर इस्लामिक जीवनशैली जपण्यासाठी कटीबद्ध असलेल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे. त्याचा अर्थ असा, की भारताला आता हिंदूराष्ट्र बनवण्याची गरज नसून मुळात अवघ्या जगालाच इस्लामी जीवनशैलीच्या कचाट्यात जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी संघाला पार पाडावी लागणार आहे. म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी युद्धभूमीवर जाऊन वा घातपाताच्या प्रसंगी लढायला धावून जाणे, असा अर्थ होत नाही. तर येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जी भारतीय मानसिकता इथल्या कोट्यवधी जनतेमध्ये सज्ज असायला हवी, ती तयार करण्याची कामगिरी मोलाची आहे. पंतप्रधान वा सरकार हे काम करू शकत नाही. तर सामान्य जनतेमध्ये मिसळून असलेल्या स्वयंसेवक वा कार्यकर्त्याने ही जबाबदारी उचलायची असते. त्यासाठी अधिकाधिक समाजघटक व बिगरजिहादी मानसिकतेच्या लोकांची एकजुट बांधण्याला प्राधान्य असायला हवे आहे.  

ज्याप्रकारे नरेंद्र मोदी यांनी मागल्या दिडवर्षात जगभर फ़िरण्याचा सपाटा लावला आणि त्यातून देशाची समर्थ प्रतिमा जागतिक नेत्यांसमोर उभी केली, त्यामागचे हेतू अनेक भाजपा नेत्यांनाही उमजलेले दिसत नाहीत. कॉग्रेसची दिर्घकालीन सत्ता संपवून आपल्या हातात सत्तासुत्रे आलीत, म्हणजे आता आपण सत्ता उपभोगायला मोकळे झालो, अशा काहीशा समजुतीत भाजपाचे विविध पातळीवरचे नेते मोकाट बोलत असतात वा बेताल वागत असतात. त्यांना कानपिचक्या देवून व्यापक राजकीय व ऐतिहासिक उद्देशाच्या दिशेने वळवण्याची कामगिरी संघाने पितृत्वाच्या नात्याने पार पाडायला पुढे आले पाहिजे. आपला भाजपाच्या राजकारणाशी संबंध नाही, असे म्हणून भागणार नाही. कारण त्यात तथ्य असो किंवा नसो, मोदी वा भाजपाच्या यशापयशाचे खापर नेहमी संघाच्याच डोक्यावर फ़ोडले जाते. तेव्हा त्यापासून पळण्यात अर्थ नाही. त्याला सामोरे जाणे हीच आज संघाची ऐतिहासिक जबाबदारी आहे. कारण येऊ घातलेले महायुद्ध भारताला टाळता येणार नाही की भारतीयांची त्यापासून सुटका नाही. इसिस वा विविध जिहादी संघटनांनी तशी व्युहरचना दिर्घकाळात केलेली आहे. ती नाकारणे वा तशी समस्या नसल्याचे समजून बसणे ही इतरांची चुक आहे. म्हणून तो धोका टळलेला नाही, तर अधिकच सोकावला आहे. त्यात भारतातूनही अनेक मुस्लिम तरूण आयुष्य झोकून द्यायला सरसावलेले आहेत. म्हणूनच तो धोका नाकारून वा त्याकदे पाठ फ़िरवून भारत नावाच्या देशाला वाचवता येणार नाही. अशावेळी ज्यांना भारतीय राष्ट्र, त्याची संस्कृती वा जीवनशैली जगवण्याची इच्छा आहे त्यांनीच मार्ग शोधायला हवेत आणि उपाय योजायला हवेत. ते उपाय कोणते आणि कोणकोण त्यात सहभागी होऊ शकतो, त्याची चाचपणी करून तशी जमवाजमव करणे भाग आहे. म्हणूनच ते काम आजच्या संघाचे उद्दीष्ट असू शकते.    

जिहादी इस्लाम म्हणजे तमाम मुस्लिम, त्याचे पुरस्कर्ते असतात असे नाही. तर कट्टर इस्लामिक कालबाह्य जीवनशैली जगावर लादू बघणारे आणि त्यांच्याशी सहमत नसलेले मुस्लिम अशी मुस्लिमातही विभागणी आहे. त्या भिन्न मुस्लिमांना सोबत घेवून त्यांच्यावरही असे संकट आले असल्याचे, त्यांना समजावणे भाग आहे. कारण जिहादी मानसिकता ही कडव्या इस्लामची पुरस्कर्ती आहे. त्यात किंचीतही तडजोड त्यांना मान्य नाही. म्हणजेच बहुतांश मुस्लिमही जिहादचे विरोधक असू शकतात. दुसरीकडे जिहादी हिंसेविषयी उदास असलेल्या, राजकारणाच्या आहारी गेलेल्या लोकसंख्येला त्याविषयी जागरूक करणे, ही जटील कामगिरी आहे. अवघा युरोप आज त्यात फ़सलेला आहे. तिथे ज्यांनी पुरोगामी नशेतून बाहेर पडायचा प्रयास व संघर्ष चालविला आहे, त्यांनाही हाताशी धरणे या लढाईचा भाग आहे. कारण तुर्कस्थान, पाकिस्तान वा सौदी अरेबियासारख्या देशांनी दुटप्पी भूमिका घेऊन हा भस्मासूर उभा केलेला आहे. त्यापासून जगाला वाचवणे, जशी अन्य देशांची जबाबदारी आहे तशीच त्यांच्यासह या लढाईत भारतीय समाजाने पुर्ण शक्तीनिशी उतरण्याची गरज आहे. जितक्या एकदिलाने अ एकजुटीने रशिया पुतीन यांच्यामागे एकवटला आहे, तितके नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची जबाबदारी संघाची नसेल तर कोणाची असेल? ती जबाबदारी विसरून पुरोगामी पोरकटपणाला उत्तरे देत बसणे, किंवा हिंदूराष्ट्र किंवा हिंदूत्ववाद म्हणून खेळत बसणे, संघाला उपकारक ठरणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे येऊ घातलेल्या जिहादी महायुद्धात चहूकडून इस्लामिक देशांनी घेरलेली मोठी बिगरमुस्लिम लोकसंख्या भारतात हिंदूंची आहे आणि त्याचे नेतृत्व संघाला करणे भाग आहे. त्याचे भान सुटलेल्या भाजपातील सत्तालोलूप नेत्यांचे कान उपटण्याचे काम संघ नाही, तर कोण करू शकेल? याचा अर्थ भारतात हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करणे असा होत नाही.

महापूर, भूकंप वा कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी संघाचे स्वयंसेवक धावून जातात किंवा संस्कृती वा धार्मिक हक्कांसाठी हिंदूंच्या बाजूने उभे रहातात. त्यात गैर काहीच नाही. पण इतकी मोठी संघटना एकूण देश व समाजाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटीबद्ध असायला हवी. कुठल्याही ऐतिहासिक जबाबदारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असायला हवी. किंबहूना कुठल्याही संघटनेचा हेतू असाच दिर्घकालीन असतो. आपल्याविषयी लोक काय म्हणतात वा लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, त्याची चिंता संघटनेने करून चालत नाही. तर आपले मुळचे उद्देश व हेतू; यांच्याशी प्रामाणिक राहून कालपरत्वे त्यात आवश्यक बदल करून इतिहास आपल्यावर टाकेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठीच संघटना आवश्यक असते. जिहाद ही रानटी आक्रमक मानसिकता आहे. जेव्हा ती उग्र रुप धारण करून समोर येईल, त्यावेळी तिच्याशी दोन हात करण्य़ाच्या तयारीत भारतीय समाज असणे अगत्याचे आहे. त्यात हिंदू लोकसंख्या उतरण्याला पर्याय नसेल. पण ज्यांना रानटी जिहादी मनोवृत्ती मान्य नाही, अशाही बिगरहिंदू वा बिगरवहाबी मुस्लिमांना सामावून घ्यावे लागणार आहे. त्याचा पाया सरकार घालू शकत नाही, तर संघासारख्यांना त्यात पुढाकार घेणे भाग आहे. वास्तविक तेच काम धर्मनिरपेक्ष वा पुरोगामी संघटनांनी करायला हवे. पण तेच जिहादी मानसिकतेला शरण गेलेले असल्याने संघासारख्या संस्थांची जबाबदारी वाढलेली आहे. जिहादी इस्लाम व त्यातून जगभरच्या नागरी समाजाच्या अस्तित्वाला येऊ घातलेला धोका, लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम संघाकडून व्हायला हवे आहे. पण त्याचा कुठेही मागमूस दिसत नाही. म्हणून मग आपल्या ऐतिहासिक कर्तव्याचे भान संघाला आहे किंवा नाही, याची शंका येते. नागरी समाज या पृथ्वीतलावर शाबुत राहिला, तर त्याला हिंदू वा ख्रिश्चन वा आपापल्या जीवनशैलीत जगणे शक्य होणार आहे.

मुस्लिमांविषयी संशय वा इस्लामविषयी आक्षेप, हा संघावर कायम होणारा आरोप आहे. पण संघातील कितीजणांना खरोखरच इस्लामचे आव्हान ठाऊक आहे? किंबहूना इस्लामविषयी संघातील बहुतेकांचे अज्ञान हा चिंतेचा विषय आहे. कारण जिहादी इस्लाम आणि बाकीचे इस्लामिक पंथ यात मोठा फ़रक आहे. जिहादी इस्लाम हे हिंदूच नव्हेतर कुठल्याही नागर समाजासाठी मोठे संकट असते आणि आहे. पण त्यावर मात करण्यासाठी त्याची माहितीही पुरेशी असायला हवी. त्यात फ़सलेल्यांना बाहेर काढून संकटाची शक्ती कमी करता येते. तरच त्यावर मात करण्याची लढाई सोपी होत असते. एकविसाव्या शतकात संघाने भारतीय जीवनशैली सुरक्षित राखण्यासाठी तेच काम प्राधान्याने हाती घ्यायला हवे आहे. इस्लामविषयी सार्वत्रिक अज्ञान, हे जिहादी व त्यांच्या पुरस्कर्त्यांचे सर्वात विध्वंसक हत्यार झालेले आहे. त्याचा भयानक चेहरा व वस्तुस्थिती सामान्य माणसासमोर आणून अधिकाधिक लोकांना जिहादविषयी सजग व सतर्क करणे, ही मोठी लढाई आहे. हिंसाचारापेक्षा वा घातपातातील विध्वंसापेक्षा त्यामागची भयंकर मनोवृत्ती लोक समजून घेतील, तितकी ही लढाई सोपी होत जाईल. ते काम सरकार नव्हेतर संघाने हाती घ्यायला हवे आहे. अशा सजग लोकसंख्या व समाजाची सतर्कताच जिहादींसाठी दहशत बनू शकते. पर्यायाने त्यांची दहशत निकालात निघण्याला हातभार लावला जाऊ शकतो. तेच काम संघाने युद्धपातळीवर हाती घ्यायला हवे आहे. कारण जिहादी अमानुषतेने लादलेले महायुद्ध दार ठोठावते आहे आणि त्याच्याशी सामना करताना भारतीयांचे सामाजिक व सांकृतिक नेतृत्व करणारी देशव्यापी निष्ठावान संघटना आवश्यक आहे. सध्या तरी रा. स्व. संघ वगळता तशी कुठलीच संघटना दृष्टीपथात नाही. म्हणून इतिहासाने घातलेली हाक संघ जितक्या लौकर ऐकू शकेल, तितके शंभरी गाठताना त्याला उद्दीष्टाप्रत पोहोचण्याचे समाधान मिळवणे शक्य होईल.

(रा. स्व. संघाच्या नव्वदी निमीत्त लिहीलेला प्रदिर्घ लेख)
दुवा- http://manthan.evivek.com/Encyc/2015/12/23/historic-challenge-rss-torsekar.aspx

१० टिप्पण्या:

 1. श्री गगनगिरी महाराज, सनातन संस्था, प्रजापिता ब्रम्हकुमारी यांनी हि परिस्थिती फार आधीच सांगितली होती, पण सर्वांनी त्याची टिंगल करण्यातच धन्यता मानली. भाऊसाहेब त्या भविष्यलेखात चीनी फौजा उत्तर भारतात अगदी दक्षिण उत्तर प्रदेशापर्यंत घुसतील व तिथून त्यांचा पराभव सुरु होईल असे म्हंटले आहे. सेवेन सिस्टर्स चा पूर्ण भाग नष्ट होईल, बंगाल, आसाम खूप हानी वगैरे वगैरे. ते सर्व सत्यात उतरताना दिसत आहे. चीनला जिहाद वगैरेशी घेणेदेणे नाही. तो संधी साधून भारतावर आक्रमण करेल. मंदी नष्ट करण्यास युद्ध हा शेवटचा उपाय आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. मा•भाउु;अापले चिन्तन छान अाहे• पन एक स्वयम्सेवक म्हनुन मला अापनास पु.मोहनजिन्च्या बेोद्धिकातिल वाक्य सान्गावस वाटत"सन्घ कुछ नहीं हो करेगा स्वयम्सेवक कुछ नहीं छोडेगा" व्यक्ति निर्माण हेच सन्घाचे काम अाहे. तो तेच करेल राहिला प्रश्न अापन व्यक्त केलेल्या अपेक्षा तर स्वयम्सेवक ते काम करतच अाहेत.

  उत्तर द्याहटवा
 3. भाउ, या सम्पुर्ण विवेचनानंतर,
  हिंदु महासभेचा विचार व त्यांचा थांबलेला प्रवाह या वर भाष्य करताल काय?

  उत्तर द्याहटवा
 4. भाऊ,
  जिहादी असलेले आणि नसलेले असे वर्गीकरण करणे शक्य आहे का? ज्या कुराण आणि हादिस वर जिहादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे, ते कुराण आणि हादीस सर्वच मुस्लिमांन पवित्र आणि अनुल्यंघ आहे. त्या बद्दल काही बोलल्यास इस्लाम खतरेमे अश्या आरोळ्या दिल्या जातील. व्यापक मुस्लीम विरोध पत्करल्याशिवाय जिहादी वृत्तींची माहीती जगास करून देणे अशक्य आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. भाउंच्या लेखातील एखद्या वाक्याचा संदर्भ घेउन त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा संपूर्ण लेखाचा आशय,गाभा समजुन घेणे महत्वाचे आहे.
  मी सुद्धा स्वयंसेवकच आहे.रोज शाखेत सुद्धा जातो.पण कधी कधी आपण रोज देवळात गेल्याप्रमाणे शाखेत जातो. म्हणजे रोज देवळात जाणारा देवासमोर नतमस्तक होणारा व्यक्ती एकाग्रचित्ताने देवाच्या पाया पडतच असेल असे नाही.कालांतराने तो एक सोपस्कार
  म्हणुन शरीराला पडलेली सवय म्हणुन जायला लागतो. म्हणजे देवळात जातो देवासमोर हात जोडतो पण लक्ष मात्र भलतीचकडे.
  आपले असे होत नाही आहे ना.....संघ म्हणजे जगातली सर्वात मोठी संघटना, सर्वश्रेष्ठ संघटन अलाणा फालाणा......अशा अभिनिवेशात वावरत असताना आपण मुळ उद्देशापासुन विचलीत तर होत नाही आहोत ना हे पहाणे गरजेचे आहे.
  सर्वात महत्वाचे म्हणजे संघ स्वयंसेवकांची ताकद आणि वेळ त्यांनी भुरट्या वाह्यात पुरोगामी आणि सेक्युलरवाद्यांना प्रत्युत्तर करण्यात घालवुच नये.आता जनतेकडुनच चपला खाण्याची त्यांची वेळ जवळ येत आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. उत्तम लेख भाऊ. सर्व स्वयंसेवकांनी वाचावा, जाणावा असा.

  उत्तर द्याहटवा
 7. Aapala ha lekh mi patrane Shri. Bhagavat ji naa pathavat aahe. Asha aahe aapali harakat nasavi.

  Dhanyavaad.

  उत्तर द्याहटवा
 8. भाउ,आपण उल्लेख केलेल्या जबाबदारीची जाणीव संघाला(वरीष्ठ अधिकारी) आहे.जागतिक संदर्भात काय हलचाली चालु आहेत ते अनेक संबंधित व्यक्ति ना माहिती आहे त्याची चर्चा करण्याची ही जागा नव्हे. सर्वच गोष्टींची जाहीर चर्चा करता येत नाही.भारता मधील मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांमधील राष्ट्रभक्त नागरीकांना बरोबर घेण्याचे प्रयत्न खुप वर्ष चालु आहेत. पु.सुदर्शनजी सरसंघचालक असताना सुमारे३००० मुल्ला मौलानांचे एकत्रीकरण घेतले होते. केरळ आणि गोव्यात राष्ट्रीय चर्च अशी संकल्पना राबवली होती ह्या सगळ्याची आता काही प्रमाणात फळेही दिसु लागली आहेत.त्याला व्यापक स्वरुप यायला वेळ लागेल कारण तोच राजकिय आधार असणारे आणि परकीय शक्ति ह्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करतातच.पण हे होणारच.मी पण एक कार्यकर्ता असल्यामुळे असलेली माहिती आपल्या आणि आपल्या वाचकां पर्यंत पेहोचवण्याचा प्रयत्न केला.अधिक आणि अधिकृत माहिती संघाचे अधिकारी प्रत्यक्ष भेटीत देउ शकतात.

  उत्तर द्याहटवा
 9. भारताची कींवा हिंदूत्वाची विजयी घौडदौड चालू आहे. ..तुमच्या भावना यशस्वी होऊन भारतमाता जगाचे नेतृत्व करणारच आहे. .या विषयी स्वयंसेवक म्हणून मी निशंक आहे. माझे प्रयत्न त्यासाठीच आहे. एक स्वयंसेवक म्हणून माझी भूमिका.

  उत्तर द्याहटवा
 10. जगातील भारतीयां बद्दल स्वयंसेवक जेव्हा विचार करावयास लागतील तेव्हाच संघ भाव वाढीस लागेल.

  उत्तर द्याहटवा