बुधवार, २ डिसेंबर, २०१५

पुरोगामी पत्रकारितेची दोन तोंडे

दोन्ही लेख लोकमत’मधले आणि विजय दर्डा यांचेच आहेत. फ़रक आहे संदर्भाचा आणि त्यात गुंतलेल्या लोकांचा!
http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=9788429

आमीर, आम्हीही तुझ्याप्रमाणे चिंतित आहोत
First Published :30-November-2015 : 03:36:31

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

आमीर खान हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो एक विचार करणाराही अभिनेता असून, त्याचे सर्वच चित्रपट नायक-नायिकेने गाणी म्हणत झाडाभोवती गिरक्या घालण्याच्या घिश्यापिट्या चाकोरीहून वेगळे आहेत. कयामत से कयामत तक या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या पहिल्या चित्रपटापासून तर सरफरोश, गुलाम, लगान, मंगल पांडे, रंग दे बसंती, तारे जमीं पे, थ्री इडियट््स आणि पीके इत्यादि आजवरच्या चित्रपटांतून व सत्यमेव जयते या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमातून त्याने सर्वसामान्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आमीरने रुपेरी पडद्यावर साकार केलेली पात्रे पाहताना आणि त्याच्या कलेचा आनंद घेताना तो एक मुस्लीम आहे असा कोणी विचार केला असेल, असे मला वाटत नाही. रोजच्या व्यवहारात आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती अमुक एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारी आहे, असा विचार करण्याची आपणा भारतीयांना सवय नाही. खरे तर असा प्रश्नच निर्माण होत नाही.

गेल्या आठवड्यात दिल्लीत रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या सडेतोड मतांबद्दल आमीरच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जाणे व एकूणच त्याच्याविरुद्ध ओरड होणे क्लेषदायी होते. त्यावेळी आमिरने काय म्हटले होते ते जसेच्या तसे उद््धृत करणे येथे अधिक श्रेयस्कर ठरेल: ‘सध्या आधीपेक्षा जास्त भीतीची भावना आहे, हे माझे उत्तर मी पूर्ण करू इच्छितो. मला असे नक्की वाटते की, देशवासीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. मी घरी किरणशी (पत्नी) बोलतो तेव्हाही हे जाणवते. मी आणि किरण संपूर्ण आयुष्य भारतात राहिलेलो आहोत. आपण भारत सोडून जाऊ या का, असे किरणने प्रथमच विचारले. किरणने मला असे विचारणे हे खूप मोठे व धोक्याचे होते. तिला तिच्या मुलाविषयी भीती वाटते. रोज वर्तमानपत्र उघडताना ती घाबरते. यावरून वाढती असमाधानाची, वाढत्या निराशेची भावना असल्याचे दिसते. तुम्हाला नैराश्य आल्यासारखे वाटते... असे का बरं होत आहे?’

अनंत गोएंका यांनी विचारलेल्या प्रश्नाला आमीरने दिलेल्या प्रदीर्घ उत्तराचा हा भाग होता. त्यात पुरस्कार वापसी, साहित्यिकांचे निषेध व वाढती असहिष्णुता याचीही चर्चा झाली. पण आपण किंवा आपली पत्नी देश सोडून जात असल्याचे किंवा तसा विचार असल्याचे आमीरने कुठेही म्हटले नव्हते. या विधानावरून राजकीय वादळ उठल्यानंतर आमीरने आणखी एक निवेदन प्रसिद्ध करून आपल्या आधीच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला व आपण भारत सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, आणि आपल्याला आपल्या देशातून कुणीही काढू शकत नाही, असेही त्याने ठामपणे सांगितले. आमीरच्या या विधानाची चिकित्सा करायची झाले तर त्यास एका भारतीय मातेला आपल्या मुलाविषयी वाटणारी चिंता असे म्हणता येईल. पण हल्लीचे वातावरणच असे आहे की या विधानावरूनही ज्याने त्याने आपला फुटपाडू अजेंडा पुढे रेटला. वास्तवात स्वत:ला भाजपा आणि संघाचे कथित हितचिंतक म्हणवून घेणाऱ्यांनीच आमीरविरुद्ध मोहीम चालविली. या टीकेचा रोख आणि भाषा पाहिली असता ती धाकदपटशा करण्याच्या उद्देशाने केलेली होती याविषयी काही शंका राहत नाही. ही भीती व्यापारी बहिष्काराची होती व एका हिंदू देशाने तु्म्हाला ‘किंग खान’ केले आहे याची बॉलिवूडमधील तीन खानांना आठवण करून देण्यासाठी होती. हे केवळ मौखिक पातळीपुरते मर्यादित राहिले नाही, ही आणखी एक चिंतेची बाब आहे. याचे कारण असे की जो कोणी आमीरच्या श्रीमुखात भडकवेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे आव्हानही पंजाबमधील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने दिले. अर्थात, ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा शिवसेनेने केला. तरीही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने असे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे विधान करावे का, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

मला असे वाटते की, आमीरच्या वक्तव्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया आपणा सर्वांनाच चिंता वाटावी अशा आहेत. सरकारच्या बाजूने असलेल्या लोकांनी आमीरसारख्या संवेदनशील अभिनेत्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासही आक्षेप घ्यावा आणि लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारे धमक्या दिल्या जाव्या अशा भारताची आम्हाला चिंता वाटते. आमीरसारख्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्यांची काय अवस्था होईल, याची सहज कल्पना येऊ शकते. देश आणि एखाद्या वेळी सत्तेवर असलेले सरकार यातील फरक आपण ओळखायला हवा. माझ्या देशभक्तीविषयी शंका घेतली न जाता मी सरकारवर केव्हाही टीका करू शकतो. तो माझा मूलभूत अधिकार आहे. हा जसा आमीरचा मूलभूत हक्क आहे तसा तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे. राज्यघटना हाच देशाचा एकमेव धर्मग्रंथ असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली असताना, राज्यघटनेने दिलेला हा मूलभूत हक्क बजावल्याबद्दल कोणालाही टीकेचे लक्ष्य केले जाऊ शकत नाही किंवा त्यास त्रास दिला जाऊ शकत नाही.

भारतासारख्या विविधांगी संस्कृतींच्या, धर्मांच्या व भाषांच्या देशाच्या मूलगामी स्वरूपास धक्का लावण्याचा काही असामाजिक घटकांचा डाव आहे. साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची, गिरिराज सिंह यांच्यासारखे लोक अशी प्रक्षोभक विधाने करू शकतात, याची लोकांना खरी चिंता वाटते आहे. यापूर्वीही अनेकांनी वैयक्तिक पातळीवर अशी बेजबाबदार विधाने नेहमीच केली आहेत व समाजानेही फारशा गांभीर्याने न घेता ती पचविली आहेत. पण यावेळी फरक असा आहे की, यावेळी सरकार भाजपाचे आहे व पंतप्रधान मोदी आहेत. अशी वाह्यात बडबड करणाऱ्या स्वपक्षीय खासदारांना आणि मंत्र्यांना पंतप्रधानांनी रोखले पाहिजे जेणेकरून लोकांना विश्वास होईल की, ‘सबका साथ, सबका विकास’ हाच त्यांचा अजेंडा आहे आणि तो मागे पडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ राज्यघटनेशी देशाची प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी लोकसभेत झालेल्या दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी सर्व आवश्यक अशी आश्वासने दिली. पण या ‘असहिष्णुतेच्या दूतां’ना मोंदींनी जाहीरपणे खडसावले पाहिजे आणि काही ठोस कारवाई केली पाहिजे जेणेकरून यादिशेने भविष्यात गुन्हे घडणार नाहीत. एक पक्ष या नात्याने भाजपाने असहिष्णुता निर्माण करणाऱ्यांचा बचाव करता कामा नये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे. लोकसभेत दिलेल्या आश्वासनांचे पालन करून त्यांच्या पक्षाचे लोक भविष्यात असे प्रमाद पुन्हा करायला धजावणार नाहीत, यासाठी पंतप्रधान कठोर पावले कधी उचलतात आणि देशाला मजबूत करण्यासाठी सर्व धर्मांत भयमुक्त वातावरण कधी निर्माण करतात याची भारतवासीयांना प्रतीक्षा आहे.

हे लिखाण संपविण्यापूर्वी...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नागपूरला एक आगळे वेगळे स्थान आहे. या शहरात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर निर्णायक विजय मिळवून भारताने मालिका २-० अशी जिंकल्याने नागपूरच्या क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. भारताच्या या विजयाने दक्षिण आफ्रिकेची नऊ वर्षांची विजयाची अखंड परंपरा खंडित झाली. पाहुण्यांनी याआधी पदेशातील १५ मालिका सतत जिंकल्या होत्या. ही परंपरा भारतीय संघाने खंडित केली. याचे श्रेय रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा व अमित मिश्रा या भारतीय फिरकी गोलंदाजांना द्यायला हवे.

==============   आणि आता तीन वर्षापुर्वीचे तत्वज्ञान वाचा   ==============
गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास
तेव्हा विजय दर्डांनी लिहीलेला लोकमतमधला लेख आहे. मूळ लिन्क सापडली नाही.

https://www.facebook.com/krantikari.rashtrasant.tarunsagarji/posts/439840326060881

Tarunsagarji Maharaj
August 10, 2012 ·
मोदी, माध्यमे आणि मी..
विजय दर्डा
मी मोदींना राष्ट्रीय संत म्हणालो नाही आणि तसे कधी म्हणणारही नाही. त्यांनी केलेले विकासाचे दावे मला तेव्हाही खोटे वाटले आणि आजही मी माझ्या त्या मतावर कायम आहे. ली अनेक वर्षे मी सक्रिय राजकारणात व प्रभावी वृत्तकारणात आघाडीवर राहिलेला कार्यकर्ता आहे. संसदेच्या कामकाजाची १४ तर वृत्तपत्रीय नेतृत्वाची ४0 वर्षे माझ्या उपलब्धीत जमा आहेत. यातल्या प्रत्येकच क्षेत्रातील अनवधानाने घडलेल्या लहानशाही चुकीसाठी, मग ती प्रामाणिक का असेना, फारशी दयामाया कोणी दाखवीत नाही आणि तिचा जेवढा म्हणून राजकीय वापर करता येईल तेवढा केल्यावाचून कोणी थांबत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्या भक्ष्यावर क्रूरपणे तुटून पडणे हा राजकारण आणि वृत्तकारण या दोहोंचाही आताचा व्यवसायधर्म आहे.
या पार्श्‍वभूमीवर विचार करताना दि. २९ जुलैला अहमदाबादेत तरुण अवॉर्ड कौन्सिलने दिलेला 'तरुण क्रांती पुरस्कार-२0१२' हा स्वीकारणे मी टाळायला हवे होते, असे आता माझ्या मनात येते. हा पुरस्कार मला योगगुरू बाबा रामदेव आणि जैन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटना (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) या दोहोंसोबत दिला गेला. मला दिलेला पुरस्कार मी माध्यमांद्वारे केलेल्या समाज व देशाच्या सेवेसाठी मला व्यक्तिश: दिला गेला होता. हा काळ माझ्या प्रिय मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडण्याचा होता. ते दु:ख विसरण्याच्या माझ्या प्रयत्नात राष्ट्रसंत श्री तरुणसागरजी महाराज यांनी मला साथ दिली. त्यांच्यासारख्या संतश्रेष्ठाला नकार देणे मला जमणारेही नव्हते. त्यांच्याच आग्रहावरून त्याही अवस्थेत हा पुरस्कार घ्यायला मी होकार दिला. तरुणसागरजींच्या मते हा पुरस्कार व त्याच्या वितरणाचा सोहळा या दोहोंचे स्वरूप अराजकीय व धार्मिक स्वरूपाचे होते. या सोहळ्याला हजर राहून व तेथे जमणार्‍या संतपुरुषांचे आशीर्वाद प्राप्त करून मी माझे दु:ख काहीसे हलके करू शकेन, असेही तेव्हा माझ्या मनात आले.
अशा अराजकीय सोहळ्यात तो आयोजित करणार्‍यांविषयी व त्यात सहभागी होणार्‍यांविषयी प्रशंसोद्गार काढणे हा एक शिष्टाचार आहे. ते उद्गार शाब्दिक अर्थाने घ्यायचे नसतात. एक प्रासंगिक उपचार म्हणूनच त्याकडे पाहायचे असते. माझ्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले आचार्य तरुणसागरजी, रामदेवबाबा, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वत: मी या सार्‍यांनाच उद्देशून मी संत म्हणालो. त्याचे स्पष्टीकरणही मी त्याच वेळी दिले. तरुणसागरजींना मी धार्मिक संत म्हणालो. रामदेवबाबांना योगाचे संत तर नरेंद्र मोदींना राजकीय (राष्ट्रीय नव्हे) संत म्हटले. ही सारी प्रशंसा प्रासंगिक व एका धार्मिक सोहळ्याला साजेशी आहे व तशीच ती सारे घेतील, असे मला प्रामाणिकपणे वाटले. नरेंद्र मोदी यांचे राजकारण, त्यांची राजकीय निष्ठा व पक्ष या सार्‍यांविषयी माझ्या धारणा स्पष्ट आहेत. मोदींचे राजकारण नुसते धर्मश्रद्धेचेच नाही तर धर्मांध स्वरूपाचे आहे. मी लहानपणापासून एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या संस्कारात वाढलेला कार्यकर्ता आहे. गुजरातेत झालेल्या २00२ च्या धार्मिक दंगलीत मोदींनी घेतलेली भूमिका व पुढाकार या दोहोंवरही मी संसदेत पंतप्रधान वाजपेयी यांच्या देखत कठोर टीका केली आहे. त्यांनी गुजरातच्या प्रगतीविषयी केलेले दावेही मला नेहमीच फसवे वाटत आले असून त्याविषयी मी वेळोवेळी जाहीररीत्या बोललो व लिहिलेही आहे. हा सारा इतिहास एका क्षणात विसरून माझ्या साध्या शब्दांचा माध्यमांनी केलेला विपर्यास एक वाचक, नागरिक, राजकीय कार्यकर्ता आणि वृत्तसमूहाचा प्रमुख म्हणूनही मला कमालीचा व्यथित करून गेला आहे. मी मोदींना तेथे वाघ म्हणालो. गुजरात हे गीरच्या सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. एखाद्या वाघाची धास्ती वाटावी तशी स्वत:विषयीची भीती मोदींनी भाजपा व एकूणच संघ परिवारात निर्माण केली आहे. माझ्या विधानाचा अर्थ उघड होता व तो मोदींसकट सार्‍यांना समजणाराही होता. हे बोलत असताना आपण एका अराजकीय व काहीशा धार्मिक व्यासपीठावरून बोलत आहोत याचे भान मला होते. हे भान इतरही राखतील, अशीच माझी साधी अपेक्षाही होती.
राजकारणातल्या माणसाने अशा अपेक्षा बाळगू नयेत हे माझ्या उद्गारांच्या उमटलेल्या प्रतिक्रियांनी लागलीच माझ्या लक्षात आणून दिले. वृत्तपत्रीय माध्यमांना सामाजिक प्रश्नांची जेवढी ओढ असावी त्याहून मोठी ओढ सनसनाटीपणाची व अधिकात अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची असते हे त्या क्षेत्रातील एक म्हणून मला कळते. मात्र, त्यासाठी सरळसाध्या गोष्टी एवढय़ा ताणून व रंग देऊन मांडल्या जाऊ शकतात हा अनुभव दु:खद होता. २४ तास आणि सातही दिवस बातम्यांचा रतीब पुरवायचा तर प्रसारमाध्यमांना ज्या व्यवहाराचा अवलंब करावा लागतो तो मी या निमित्ताने अनुभवला. - विजय दर्डा

1 टिप्पणी: