शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

जनतेपासून नाळ तुटलेले राजकारण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले
  (लेखांक  चौथा)


 पुरोगामी र्‍हासामागची मूळ संकल्पना लक्षात घ्यायला हवी. १९८० नंतरच्या काळात कॉग्रेस विरोधी राजकारणाला जनता पक्षातील काही मुठभर समाजवाद्यांनी संघविरोधाचा नवा कंगोरा निर्माण करून दिला. मात्र त्यापासून डावे पक्ष व कॉग्रेस अलिप्त होती. पण समाजवाद्यांच्या या विघातक राजकीय दिवाळखोरीचा कॉग्रेसला लाभ होणार असल्याने कॉग्रेसी नेते राजकारणी त्याला खतपाणी घालत राहिले. १९७७ च्या निवडणूकीत सेन्सॉरशीप उठल्याने माध्यमे मोकाट झाली होती. त्याचा मोठा लाभ जनता पक्ष मिळवू शकला. पण त्याचवेळी माध्यम हे राजकारणातले मोठे प्रभावी हत्यार असल्याचा शोध चौथा खांब म्हणून मिरवणार्‍यांना लागला होता. तिथून मग राजकारणात थेट ढवळाढवळ करण्याची पत्रकारांनी सुरूवात केली. काही पत्रकार उघड राजकारणात हस्तक्षेप करू लागले, तर काहीजण नेत्यांची वा पक्षांची सुपारीबाजी करू लागले होते. याखेरीज काही प्रमाणात तटस्थ पत्रकारितेला शह देवून संपादक व पत्रकार खुलेआम आपला राजकीय अजेंडा म्हणून माध्यमांनाच राजकीय हत्यार म्हणून वापरू लागले होते. अशावेळी पुन्हा सत्तेत आलेल्या कॉग्रेसने पत्रकारांना आपल्या राजकारणाचे दलाल व भागिदार बनवण्याचे पाऊल टाकले. सभा संमेलने वा मोर्चे-धरणे यातून जी मजल मारता येत नाही, त्याहून अधिक मोठी झेप प्रभावी माध्यम हाती असेल तर नुसत्या निवेदन वा लक्ष्यवेधी वाक्याने मारता येते, असे लक्षात येऊ लागले होते. सहाजिकच नामवंत संपादक व पत्रकारांचे स्तंभ राजकारणाची हत्यारे होऊ लागली. जनता पक्षाच्या सत्ताकाळात बिहारच्या बेलची गावात दलितांची वस्ती जाळली गेली. तर तिथे भेट देण्याच्या निमीत्ताने इंदिराजींनी वापरलेले माध्यम कुठल्याही भेदक हत्यारापेक्षा परिणामकारक होते. इंदिराजी तिथे गेल्या व नदीला पुर आल्याने पलिकडे जाणे शक्य नव्हते. तर त्यांनी हत्ती मागवला आणि इतक्या भीषण पुरातही दलित उध्वस्त गावाला भेट दिली. तेव्हा कॅमेरे नव्हते की थेट प्रक्षेपणाची सुविधाही नव्हती. तर निव्वळ तिथल्या स्थानिक बातमीदाराकडून आरंभीच्या बातम्या आल्या. मग तिकडे प्रमुख वर्तमानपत्रे व साप्ताहिकाच्या प्रतिनिधींनी धाव घेतली. परिणामी बेलची गावचा प्रचंड गाजावाजा सुरू झाला. मोरारजी सरकार व बिहार सरकारची तारांबळ उडाली. पण त्या एक घटनेचा इतका चतुराईने इंदिराजींनी वापर केला, की तिथून त्यांच्या पुनरागमनाला चालना मिळाली. 

इंदिराजींचा दौरा म्हणजे सनसनाटी बातमी हे गृहीत होऊन पत्रकार बातमीदार त्यांच्या मागे धावू लागले. त्याही अशा जागा व प्रसंग शोधायच्या, की त्याची सनसनाटी व्हायला हवी आणि प्रत्येक बाबतीत मोरारजींच्या जनता पक्षाला खुलासे देत बसायला लागावे. माजी पंतप्रधान व नेहरूंची कन्या इतक्या कुठल्याही खबदाडीत पोहोचते, ही बातमी होऊ लागली. पर्यायाने आणिबाणीच्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या शिळ्या होऊन जनता सरकारच्या व पक्षाच्या चुकांकडे लक्ष वेधले जाऊ लागले. सतत आणिबाणीवर केंद्रित झालेला माध्यमाचा रोख मग जनता पक्षाकडे वळला आणि माध्यमातल्या जुन्या इंदिरा नेहरूनिष्ठांनी त्यात पुढाकार घेतला. त्याला अर्थातच शह देणारे इंदिरा विरोधकही माध्यमात होते. पण दरम्यान इंदिरा विरोधक व जनता समर्थकात जनसंघीय व समाजवादी असा बेबनाव माध्यमातही सुरू झाला होता त्याचाही लाभ इंदिरानिष्ठांनी उठवला. जनता पक्षात फ़ुट पडून पुन्हा इंदिराजी सत्तेत आल्या, त्या थेट घराणेशाही घेऊनच! आपल्या सोबत त्यांनी संजय गांधींना निवडून आणलेच. पण त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवूनही मोठे अधिकार दिलेले होते. दुर्दैवाने संजयचे अपघाती निधन झाले आणि त्यांची जागा राजीव गांधींनी घेतली. पुढे इंदिरा हत्या झाली आणि तिच्या सहानुभूतीच्या लाटेत सर्वच पुरोगामी प्रतिगामी वाहून गेले. म्हणजेच १९७० ची स्थिती पुन्हा आली. कारण राजीवना इतके अफ़ाट बहुमत मिळाले होते, की आता पुरोगामी डावपेच खेळायची कॉग्रेसला गरज उरली नव्हती. मग त्यातून सावरण्यासाठी पुन्हा तथाकथित पुरोगाम्यांना त्याच भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव गांधी यांना रोखण्याची कुवत पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांमध्ये उरली नव्हती. सहाजिकच प्रतिगामी भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव यांचा उजवा हात असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफ़ोर्सची तोफ़ डागली असतानाही पुरोगाम्यांना स्वबळावर उभे रहाण्याचे धाडस नव्हते. म्हणून भाजपाशी आघाडी नाही तरी जागावाटपाचा सौदा करावा लागला. आज जे कोणी मोदींना रोखायला कॉग्रेसच्या गळ्यात गळे घालत पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवत असतात, त्यांनाच तेव्हा २५ वर्षापुर्वी कॉग्रेसला रोखण्यासाठी प्रतिगामी भाजपाची साथ हवी होती. ही पुरोगामी म्हणवणार्‍यांची शोकांतिका आहे. ज्या प्रतिगामी भाजपाला वा संघनिष्ठांना संपवण्यासाठी त्यांनी दहा वर्षे आधी कॉग्रेसला नवे जीवदान दिले, त्यांनीच नंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच प्रतिगाम्यांची कुबडी घेतली. 


या सर्व काळात पुरोगाम्यांना कॉग्रेस पुरोगामी असल्याचा थांगपत्ता लागला नव्हता. म्हणुन ते कॉग्रेसचा पाडाव करण्यासाठी प्रतिगाम्यांना सोबत घ्यायचे आणि कॉग्रेस पराभूत झाली, मग पुन्हा कॉग्रेसला नवे जीवदान द्यायचे. मात्र अशा प्रदिर्घ पाच दशकात कॉग्रेसला पर्याय व्हायचा कुठलाही प्रयास या लोकांनी केला नाही. मतदाराला प्रतिगामी-पुरोगामी यात स्वारस्य नव्हते. त्याला कॉग्रेससाठी पर्याय हवा होता आणि त्याचा झेंडा कुठला वा धर्म कुठला, याच्याशी लोकांना कर्तव्य नव्हते. पुरोगामी वा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी त्या लोकभावनेशी नेहमीच खेळ केला. पण तीच लोकभावना ओळखून भाजपाने पावले उचलली होती. त्यांनी १९८९ सालात जनता दलाशी जागावाटप केले आणि पुढे सत्तेतही जनता दलाला बाहेरून पाठींबा दिला. म्हणजेच आपण कॉग्रेस विरोधातले असल्याची लोकभावना जोपासण्य़ाची रणनिती भाजपाने राबवली होती. तिला हळुहळू यश मिळत होते. म्हणून १९९८ सालात एनडीए सरकार होऊ शकले आणि त्यात बिगर कॉग्रेस पक्ष सहभागी झाले. तेव्हा मग कॉग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवण्याची शाश्वती वाटेनाशी झाली होती. तिथून मग कॉग्रेसने माध्यमातील स्वयंसेवी पुरोगामी सिद्धांत स्विकारला. भाजपा विरोधी डावपेच घेऊन सोनियांनी तमाम बिगरभाजपा पक्षांची मोट बांधण्याचा खेळ केला. त्याची परिणती महाराष्ट्रात झाली तशीच दिल्लीत झाली. पारंपारिक बिगर कॉग्रेसी मतांवर पोसलेले पुरोगामी पक्ष आपली उरलीसुरली विश्वासार्हता गमावून बसले. कॉग्रेसची मस्ती व भ्रष्टाचार यांना कंटाळलेला मतदार पर्याय बघत असताना, त्याच्यापुढे पुन्हा कॉग्रेसच पेश करण्याचा पुरोगामी पर्याय पुस्तकी होता. त्यात फ़सून लालू, मुलायम, मायवती, जनता दलाचे बहुतेक गट व डावी आघाडी आपले वेगळेपण हरवून बसले आहेत. या पक्षांना आपली अशी काही ओळखच उरलेली नाही. पुरोगामी शकती वा सेक्युलर फ़ोर्सेस असे एक सरसकट नावाने त्यांचा उल्लेख होत असतो. सुदैवाने त्यापासून बाजूला राहिले, त्यांना आपले अस्तित्व टिकवता आले किंवा त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला शिरकाव करता आलेला नाही. याचे उदाहरण म्हणून आपण ओडिशाकडे बघू शकतो. भाजपाशी पटले नाहीतर बाजूला झालेल्या नविन पटनाईक यांनी आपले वेगळेपण जपताना कॉग्रेसच्या दावणीला बांधून घ्यायचे नाकारले, तर मोदी लाटेचा त्यांना कुठला फ़टका बसला नाही. त्यापासून अलिप्त राहून ममतांनी आपली ओळख जपली, तर बंगालमध्ये त्यांना भाजपा दणका देऊ शकला नाही. उलट बंगालच्या भूमीत मार्क्सवाद्यांची जागा भाजपा घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात वा अन्य प्रांतात जिथे भाजपा विस्तारला तिथे तिथे पुरोगामी पक्षांनी कॉग्रेस सोबत जाऊन आपणच आत्महत्या केल्याचे लक्षात येऊ शकेल. त्यासाठी भाजपाला गुन्हेगार कशाला मानता येईल? 


पुरोगामी चळवळ किंवा राजकारणाच्या या र्‍हासाला हेच भ्रामक राजकारण बाधले आहे. माध्यमातील उपटसुंभ पुरोगामी, राजकारणबाह्य पुरोगामी विचारवंत, स्वयंसेवी नावाचा कार्यकर्ता नष्ट करणारा भस्मासूर; यांनी क्रमाक्रमाने पुरोगामी राजकारणाचा पाया उखडून टाकला आहे. चळवळ व जनआंदोलन हा पुरोगामीत्वाचा पाया होता व असलाही पाहिजे. ज्याची प्रेरणा लोकांमधून येते आणि लोकांच्या संख्याशक्तीतून ज्याचा राजकीय प्रभाव पडतो, त्यापासूनच पुरोगामी संस्था संघटनांना तोडण्याचे डाव ज्यांनी यशस्वी केले, त्यांनी पुरोगामी चळवळ मारली आहे. चळवळीचा देखावा व बातम्या बनवून जनतेला अन्यत्र जायला भाग पाडणारे हेच लोक, खर्‍या पुरोगामीत्वाचे मारेकरी आहेत. कारण त्यांनी विचार, तत्वज्ञान व भूमिकेला तिलांजली देऊन पुरोगामी राजकारणाचा पुरता खेळखंडोबा करून टाकला. कारण त्यांचा खर्‍या चळवळीशी वा पुरोगामीत्वाशी कुठलाही संबंध नव्हता व नाही. त्यांच्यासाठी पुस्तकी पांडित्य खरे असते आणि वास्तवातील चळवळ त्यानुसार चालायला हवी. नसेल तर चळवळ मेली तरी बेहत्तर! दुर्दैव असे, की आता पुरोगामी पक्ष व संघटनाही इतक्या पांगळ्या झाल्या आहेत. त्या स्वत: विचार करून उपाय शोधू शकत नाहीत. त्यांचे दुखणे वा समस्या माध्यमे ठरवतात आणि तिथे शोधले जाणारे उपाय योजताना पुरोगामी चळवळ आणखी खच्ची होत गेली आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र वा अनेक राज्यातून पुरोगामी पक्ष नामशेष झालेत. मात्र त्याचा अर्थ पुरोगामीत्व संपलेले नाही. ज्या संस्था संघटना वा पक्ष देखाव्यापुरते पुरोगामी आहेत, वास्तवात त्यांच्यामध्ये कुठलेही पुरोगामीत्व उरलेले नाही, त्यांना मतदाराने झिडकारले आहे. विचार तत्वज्ञान लोक नाकारत नसतात. पण कोणी त्याचे थोतांड करून दिशाभूल करणार असेल, तर लोक त्याच्याकडे पाठ फ़िरवतात. इथेही वेगळे काही झालेले नाही. पुरोगामी लेबल लावून जो बोगस माल मतदाराच्या गळी मारण्याच्या अट्टाहास झाला, त्याला लोकांनी झिडकारले आहे. त्यातून सामान्य जनता व मतदार एक संदेश देतो आहे, तो प्रामाणिकपणे समजून घेतला तर पुन्हा पुरोगामी राजकारणाचे उत्थान व्हायला अडचण असणार नाही. भाजपा किंवा संघाचा कोणत्याही बाबतीत मुर्खासारखा विरोध म्हणजे पुरोगामीत्व नाही, की सेक्युलॅरीझम नाही. पुरोगामी किंवा समाजवादी म्हणून एक विचार आहे, तत्वज्ञान आहे, त्याला अनुसरून भूमिका घेणाला पुरोगामीत्व म्हणतात. ती कॉग्रेस घेत नाही किंवा अन्य कोणी पुरोगामी म्हणून मिरवणारा पक्ष घेत नाही. त्याला लोक कंटाळले आहेत. त्यावरचा पर्याय म्हणून सुटसुटीत कारभार करणारा वा निदान लोकमताचा आदर करून सरकार चालवणारा पक्ष ही भाजपाची पुंजी आहे. त्याला हिंदूत्व किंवा जातियवादाचा विजय ठरवून मतदाराला अपमानित करण्याने लोक आणखी दुखावतात, दुरावतात. 


यातूनही नव्याने पुरोगामीत्व किंवा वैचारिक सेक्युलर चळवळ उभी रहाणे शक्य आहे. पण त्यासाठी त्यातली तोतयेगिरी निपटून बाजूला करावी लागेल. निभेळ विचारांवर आधारीत राजकारण व भूमिका घ्याव्या लागतील. कुठल्या तरी निधीसाठी आंदोलने करणार्‍यांना हाताशी धरून पुरोगामीत्व पुढे जाऊ शकणार नाही. तर खर्‍याखुर्‍या लोकांच्या समस्या वा प्रश्नांना हात घालावा लागेल. लोकांमध्ये जावे लागेल. तिथे जाऊन समस्या समजून घ्याव्या लागतील. सर्व्हे घेऊन वा कुठल्या तरी अभ्यासातून समस्या शोधायची आणि मग ती लोकांच्या गळी उतरवायची, हा पुरोगामी बाणा नव्हे. जोगेश्वरी ते दहिसर हा परिसर मुंबई महापालिका क्षेत्रात आणला गेला, तेव्हा तिथे प्रथमच निवडणूक लढवणार्‍या मृणालताईंसाठी डॉ. राममनोहर लोहिया प्रचाराला आलेले होते. सभा रात्री उशिरा उरकून ते निघाले असताना इतक्या अवेळी एका भागात हंड्यांची लांबच लांब रांग व जागत बसलेल्या महिलांचा जमाव त्यांना दिसला. त्याबद्दल चौकशी केल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे लक्षात आले. लोहियांनी मृणालताईंना गोरेगावमध्ये पाण्याचे आंदोलन आरंभण्याचा सल्ला दिला होता. तोच मग तिथला पक्षाचा कार्यक्रम झाला आणि दोन दशकांनंतर मृणालताई यांना पाणीवाली बाई म्हणून जग ओळखू लागले. अशी पुरोगामी चळवळ गोरेगाव मालाड परिसरात उभी राहिली. कारण पाण्याची समस्या कुणाच्या प्रबंधातून शोधलेली नव्हती. खरी वास्तविक समस्या होती. तिची तीव्रता लोकांना भेडसावत होती आणि तिला हात घातला तर लोक आपोआप चळवळीचा भाग होतील ही दृष्टी डॉ. लोहियांकडे होती. आजच्या कुठल्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या नेते कार्यकर्त्यांमध्ये हा द्रष्टेपणा दिसतो काय? तिथेच लक्षात येते, की आज ज्यांना पुरोगामी म्हणतात ते लोक वास्तवात तोतया सेक्युलर वा बोगस पुरोगामी आहेत. त्यांनी पुरोगामीत्व बदनाम करून टाकले आहे. त्यात खर्‍याखुर्‍या पुरोगामीत्वाचा लवलेश उरलेला नाही. म्हणूनच मोदींनी पुरोगामी सेक्युलर राजकारणाला पराभूत केलेले नाही, की देशातली जनता प्रतिगामी वगैरे झालेली नाही. पुरोगामीत्वाचा नावावर जो पोरकटपणा चालतो, त्याला लोकांनी झिडकारले आहे. 


नेताजींच्या निमीत्ताने पुरोगामीत्वाची निरर्थकता नुकतीच समोर आलेली आहे. पुरोगामीत्व म्हणजे आता नेहरूंच्या चुका वा गफ़लतीचेही समर्थन करण्यापर्यंत घसरगुंडी झालेली आहे. राहुल गांधींचा पोरकटपणा वा सोनिया गांधींच्या मनमानीचे समर्थन इतके पुरोगामीत्व संकुचित होऊन गेले आहे. हिंदूंच्या विरोधात बोलणे वा त्यांच्या धर्मभावना दुखावणे, म्हणजे पुरोगामीत्व इतका थिल्ल्ररपणा आणला गेल्यावर लोकांनी पुरोगामीत्वाकडे पाठ फ़िरवली आहे. तो तोतयेगिरीचा पराभव आहे. माध्यमातल्या अर्धवटांनी त्याला चालना दिली आणि त्यातून पुरोगामी म्हणवणारे पक्ष रसातळाला गेले. त्यांचा पाया उखडला गेला. आता त्यांच्या संगतीने कॉग्रेसलाही त्याचीच बाधा झालेली आहे. आजकाल राहुल गांधींची भाषा तशीच असते. आपण कुठे वा कशाला पराभूत झालो, त्याचे आत्मपरिक्षण करण्याची इच्छाही कोणाला उरलेली नाही. कारण संघटना व त्यासाठी लोकांमध्ये जाऊन मेहनत घेण्याची इच्छाच (तोतयेगिरीला सवकलेले) पुरोगामी गमावून बसले आहेत. मग आपल्या नाकर्तेपणाचे वा अपयशाचे खापर अन्य कोणाच्या डोक्यावर फ़ोडून पळवाटा शोधल्या जातात. खर्‍याखुर्‍या कार्यकर्त्यांनी अपार कष्टातून जी पुरोगामी चळवळ भारतीय समाजात रुजवली व विस्तारली, तिलाच स्वयंसेवी भडभुंजे व माध्यमातील उपटसुंभांनी सुरूंग लावला. पुरोगामी विचारवंत म्हणून जे तोतये दिर्घकाळ मिरवले आहेत, हेच खरे पुरोगामी चळवळीचे खरे मारेकरी झाले आहेत. कुठल्या तरी काळ्यापैशाच्या बळावर चालणारी माध्यमे पुरोगामी अजेंडा रंगवण्यासाठी वापरली आहेत आणि किंवा अशाच पैशाच्या देणग्यांवर स्वयंसेवी तमाशे नाचवले आहेत. हे बुद्धीमंतांना कबुल करणे अवघड असले तरी सामान्य माणसाला ते दिसते, बघता येते आणि अति झाल्यावर झिडकारण्याचे धाडस त्याच सामान्य माणसात असते. मोदींना त्याचाच लाभ मिळाला. तो तोतया पुरोगाम्यांनी खर्‍या पुरोगामीत्वाचा केलेला दारूण पराभव आहे.   


१९५० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या जनसंघ (ज्याला आज भाजपा म्हणून ओळखले जाते) त्याचा मतांच्या टक्केवारीतला हिस्सा तेव्हा एक दिड टक्का होता. तिथून २०१४ मध्ये तो ३१ टक्क्यापर्यंत गेला. त्याच आरंभ काळात आज पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचा एकत्रित मतांचा हिस्सा दहा टक्क्यांच्या आसपास होता. तो आज सहा दशकानंतर त्याच्याही खाली घसरला आहे. याचे एकमेव कारण कॉग्रेसची घसरण होत जाईल तो अवकाश व्यापण्याचे १९८० पर्यंतचे पुरोगाम्यांचे प्रयास त्यात घुसलेल्या तोतया पुरोगाम्यांनी हाणुन पाडले व चळवळ कागदी व दिखावू बनवत नेली. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवायचे आणि कामाच्या नावाने शून्य, अशी स्थिती आणली. पुरोगामीत्वाचे पोवाडे सतत गाण्यामध्ये पुर्वाश्रमीचे राष्ट्र सेवा दलीय आघाडीवर असतात. त्याच सेवा दलाच्या एका सुंदर गीताच्या शब्दात त्याचे वर्णन करता येईल. कारण त्यातच आजच्या पुरोगामी र्‍हासाचे सार सामावले आहे.


ध्येय आमचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले!

(समाप्त)


२ टिप्पण्या:

  1. समर्पक वर्णन यथायोग्य समिक्षा.. प्रबंधाच्या आधारावर समाजाच्या समस्या समजू शकत नाही हे पटत नाही. अभ्यास , समस्याचे सर्वेक्षण आवश्यक आहेच.

    उत्तर द्याहटवा