शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

पुरोगामी चळवळीचे मारेकरी

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

(लेखांक पहिला)

लोकसभा निवडणूका संपून आता दिड वर्षाचा कालावधी उलटला आहे आणि त्यात नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेतृत्व करताना कॉग्रेसचा ऐतिहासिक पराभव घडवून आणला. नुसता त्या पक्षाचा तो पराभव नव्हता तर स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय क्षितीजावर तळपत असलेल्या नेहरू-गांधी प्रणित तथाकथित सेक्युलर वा पुरोगामी विचारसरणीचा तो दारूण पराभव होता. मात्र इतके होऊनही अजून कोणी त्याचा गंभीरपणे अभ्यास केलेला नाही. किंबहूना त्या निकालांची गंभीर दखल सुद्धा घेतली गेलेली नाही. उलट जुनेपाने संदर्भ देवून अशा पराभवातून कॉग्रेस अनेकदा कशी सावरली आहे, त्याचे दाखले देण्याची पळवाट शोधण्यात जाणत्यांनी धन्यता मानलेली आहे. इथे जाणते म्हणजे फ़क्त कॉग्रेस पक्षातले जाणते व अभ्यासू नेते असेच म्हणायचे नाही. तर स्वत:ला राजकीय विश्लेषक वा पुरोगामी विचारांचे समर्थक मानल्या जाणार्‍या पत्रकार-संपादक व लेखकांचाही त्यामध्ये समावेश आहेच. पण त्याच्याही पलिकडे जे अन्य पुरोगामी पक्ष वा संघटनेशी संबंधित आहेत, त्यांचाही याच जाणत्यांमध्ये समावेश होतो. अशा तथाकथित तमाम पुरोगाम्यांनी मोदींचा विजय केवळ निवडणूकीतला विजय मानून त्याकडे केलेला काणाडोळा त्यांच्या बेफ़िकीरीचे लक्षण नाही, तर बौद्धिक दिवाळखोरीची साक्ष आहे. याचे पहिले कारण म्हणजे लौकिकार्थाने वा निवडणूकीच्या मैदानात मोदींनी कॉग्रेस व अन्य पुरोगाम्यांचा पराभव केला आहेच. पण त्याच्यापलिकडे तो पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या प्रत्येकाचा पराभव आहे. मात्र त्याचे सर्वच श्रेय मोदींना देता येणार नाही. कारण पुरोगाम्यांच्या सहकार्याशिवाय कोणीही त्यांचा इतका दारूण पराभव घडवू शकला नसता. मग त्यातून सावरायचे असेल आणि नव्याने पुन्हा पुरोगामी विचारसरणीला उभारी आणायची असेल, तर मुळात कुठे व काय चुका झाल्या, त्याचा आढावा घ्यावा लागेल. झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल आणि मोदींना आपल्या कुठल्या वागण्याचा सर्वाधिक लाभ झाला, त्याची अत्यंत डोळसपणे कारणमिमांसा करावी लागेल. पण दिड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसलेले नाही. उलट ज्या चुका झाल्या व मोदींना लाभदायक ठरल्या, त्याच अधिक आक्रमकरित्या करण्याकडेच पुरोगाम्यांचा आजही कल आहे. म्हणून पुरोगाम्यांचा पराभव किंवा दिवाळखोरी हा तपशीलवार अभ्यास करून मांडणे अगत्याचे झाले आहे. 

लोकसभा निवडणूका ऐन रंगात आल्या असताना नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे लोकांचे आकर्षण इतके शिगेला पोहोचले होते, की देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात मोदींची सभा असेल तर त्याचे थेट प्रक्षेपण वाहिन्या करू लागल्या होत्या. आणि त्याचा खरोखरच अतिरेक झालेला होता. कुठल्याही वाहिनीवर गेलात, तर मोदीच दिसत असायचे. त्याच काळात विविध मतचाचण्या घेऊन त्याचे विश्लेषणही चालू होते. अशाच एका विश्लेषणाच्या कार्यक्रमात व्यासंगी संपादक कुमार केतकर यांनी केलेली एक टिप्पणी लक्षात राहिली. ते म्हणाले होते, की प्रचाराचा अतिरेक मोदींना बहुधा त्रासदायक होईल. इंग्रजीमध्ये त्यांनी ‘ओव्हर किल’ असा शब्दप्रयोग केला होता. मराठीत आपण अति तिथे माती असे शब्द वापरतो. त्यात तथ्य होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, मग लोकांना तिचा वीट येतो आणि लोक त्याकडे पाठ फ़िरवतात. मोदींना आपल्या वाहिनीवर दाखवून त्यांच्या लोकप्रिय छबीचा वापर अधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी वाहिन्या करीत होत्या. आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणे अपरिहार्य होते. पण आपली छबी दाखवण्याची मोदींनी कुठल्या वाहिनीवर सक्ती केलेली नव्हती. ते लोकांनाही कळत होते. म्हणूनच लोकांनी त्या वाहिन्यांकडे पाठ फ़िरवून अन्य वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघणे पसंत केले. म्हणून लोक मोदींकडे पाठ फ़िरवतील असा निष्कर्ष काढणे ही चुक होती. पण त्यानिमीत्ताने केतकरांनी मांडलेला निष्कर्ष वा निकष चुकीचा म्हणता येणार नाही. मोदी हा विषय किंबहूना ‘ओव्हर किल’ याच निकषावर समजून घेण्याची गरज आहे. कारण कुठल्या तरी अतिरेकानेच मोदींना इतके देशव्यापी नेतृत्व म्हणून पुढे आणले. माध्यमांनी व पुरोगामी अतिरेकाने देशाला मोदी नावाचा पर्याय दिला. म्हणूनच केतकरांचा ओव्हर किल सिद्धांत मोदींच्या संदर्भात समजून घेतला, तर पुरोगामी विचारांचा ऐतिहासिक पराभवाचे विश्लेषण करणे सोपे होऊ शकेल. 

मोदी हे २००१ नंतर निवडणूकीच्या राजकारणात आले. संघाचा प्रचारक म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात करणार्‍या या कार्यकर्त्याने संघटनात्मक कामात स्वत:ला इतके मग्न करून ठेवले होते, की कधी कुठल्या सत्तापदाची अभिलाषा धरली नव्हती. म्हणून भाजपातही दोन दशके कार्यरत असताना त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, की सत्तापद उपभोगले नाही. पण अकस्मात गुजरातच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीने त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागले आणि थेट मुख्यमंत्री पदावर आरुढ व्हावे लागले. तसा आपल्याही राज्यात लोकप्रिय वा जनमत जिंकण्याची प्रतिमा नसलेला हा नेता एका दशकात थेट देशाचा लोकप्रिय नेता म्हणून पुढे येऊ शकला, हाच चमत्कार आहे. मात्र त्यासाठी त्याने प्रयत्न केले, असेही म्हणता येणार नाही. पण आलेल्या संधी सोडण्याचा मुर्खपणाही केला नाही. मोदी हे देशातल्या अतिरेकी पुरोगामी षडयंत्राची अशी शिकार झाले, की त्यातून सुटण्याच्या धडपडीने त्यांना थेट देशाचा अपुर्व नेता म्हणून राजकीय क्षितीजावर आणुन उभे केले. तेव्हा देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार होते आणि त्यांना आव्हान निर्माण करण्यात कॉग्रेस अपेशी झाली होती. अन्य पुरोगामी पक्षही विस्कटलेले होते. अशा वेळी गुजरातमध्ये भाजपा पक्षांतर्गत वादाने आपली भूमी गमावत होता. त्यातून पक्ष संघटना सावरण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून मोदींना मुख्यमंत्रीपदी आणले गेले. पण योगायोगाने त्याच दरम्यान गोध्रा येथे कारसेवकांचा रेल्वेडबा मुस्लिम जमावाने जाळला आणि गुजरातमध्ये आगडोंब उसळला. अशावेळी नवखा मुख्यमंत्री कितीही प्रामाणिक असला तरी परिस्थिती आवरू शकणार नव्हता. मोदींना तर सत्तेत येऊन सहा महिनेही मिळाले नव्हते आणि त्यांच्यापाशी प्रशासन राबवण्याचा अनुभवही जवळपास नव्हता. सहाजिकच दंगल हाताबाहेर गेली आणि त्याचे खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडण्याची जणू पुरोगामी स्पर्धाच सुरू झाली. आजवर देशात शंभरावर मोठ्या हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत आणि प्रत्येकवेळी अधिक मुस्लिमच त्याचे बळी झाले आहेत. पण त्याचे भानही न ठेवता मुख्यमंत्र्यालाच या दंगलीचा सुत्रधार ठरवण्यापर्यंत अतिरेक झाला आणि तो मागली लोकसभा संपेपर्यंत बिलकुल थांबला नाही. कुमार केतकर ज्याला अतिरेक वा ओव्हर किल म्हणतात, तो हाच प्रकार होता. 

महाराष्ट्रात व मुंबईत १९९२ व ९३ अशा दोन मोठ्या दंगली पेटल्या आणि त्यातही शेकडो लोकांचा बळी गेला. पण तेव्हाचे मुखयमंत्री सुधाकरराव नाईक यांना कोणी दंगलीचा सुत्रधार मानले नाही. खुद्द गुजरातमध्ये दर दीडदोन वर्षांनी हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास आहे. पण तेव्हाच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यावर दंगलीचा सुत्रधार म्हणायची कोणी हिंमत केली नाही. नाकर्तेपणाचा आरोप झाला असेल, पण दंगलीचा सुत्रधार आणि सरकारच मुस्लिमांचे मारेकरी, इतक्या टोकाची भाषा कधीच कुठेही झालेली नव्हती. तिथून या पुरोगामी अतिरेकाला सुरूवात झाली. भाजपाचे कोणी श्रेष्ठी वा दिल्लीतील बडे नेते त्याला समर्थपणे उत्तर देवू शकले नाहीत. तर आपल्या उदात्त प्रतिमेच्या चिंतेत असलेले वाजपेयी सुद्धा आपल्या या दुय्यम नेत्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले नाहीत. म्हणजेच मोदींना आपला बचाव स्वत:च उभा करावा लागला. पण त्यांचे कोण ऐकून घेत होता? इंग्रजी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी जो मोदी विरोधाचा सपाटा लावला, त्याची अन्य भाषात नुसती पुनरावृत्ती होत राहिली. सोनिया गांधी नव्याने राजकारणात आलेल्या होत्या आणि त्यांना वाजपेयींशी टक्कर देणे शक्य नव्हते. सहाजिकच वाजपेयी विरोधात छडी प्रमाणे गुजरात दंगल व मोदी विरोधाचा वापर सरसकट होऊ लागला. आरंभी मोदींनी त्याला उत्तरे दिली व खुलासेही करून बघितले. पण त्याचा उपयोग नव्हता. त्यांच्या प्रत्येक बोलणे विधानाचा विपर्यास करून बातम्या झळकत होत्या. मात्र त्यातून गुजरातच्या बहुसंख्य अशा हिंदू समाजालाही दुखावले जाते आहे, याचे भान यापैकी कोणाही पुरोगाम्याला राहिलेले नव्हते. दुखावणारा प्रत्येक हिंदू आपोआप मोदी समर्थक होत चालला होता. कारण गोध्रा जळित कांडानंतर जी संतप्त प्रतिक्रिया उमटली, ती तर्काला धरून होती. म्हणूनच त्यात हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, म्हणजे त्याला मोदी समर्थक बनवणे होते. देशभरातील पुरोगामी नेते, पक्ष, संघटना, त्यांचे समाजसेवक अधिक माध्यमे तीच कामगिरी बजावत होत्या. त्याचा गुजराती जनमानसावर होणारा परिणाम मोदींसारखा लोकांमध्ये अखंड वावरलेला माणूस सहज ओळखू शकत होता. मग त्यांनी माध्यमात आपली जितकी हिंदूत्ववादी कडवी प्रतिमा उभी केली जाईल, त्याला सहकार्य देण्याचाच पवित्रा घेतला. एका बाजूला हिंदू व दुसर्‍या बाजूला गुजराती, अशा दोन अस्मिता मोदींनी हाताशी धरून आपली नवी प्रतिमा गुजरातमध्ये उभी करणे त्यातून सोपे होऊन गेले. २००२ पासून २०१२ पर्यंतच्या दहा वर्षात गुजरातचा एकमेव अनभिषिक्त नेता अशी मोदींची प्रतिमा पुरोगाम्यांनी उभी केली आणि त्याला लागणारे साहित्य व माल मोदी मोठ्या अगत्याने पुरवत गेले.  
मोदींना कोपर्‍यात घेण्याची ही पुरोगामी चाल त्या कार्यकर्त्याला झुंजायला उर्जा देणारी ठरली. कारण उभा गुजरात किंवा तिथला बहुसंख्य हिंदू आपल्या पाठिशी एकदिलाने उभा असल्याची खात्री मोदींना झालेली होती. हिंदु-मुस्लिम असे धृवीकरण एकतर्फ़ी अपप्रचाराने पुरोगाम्यांनी घडवून आणले होते आणि त्याचा राजकीय लाभ उठवणे इतकेच काम मोदींना करायचे होते. किंबहूना त्याचा भरपूर लाभ होणार याची मोदींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी राजिनामा देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे मांडला आणि तो फ़ेटाळला जाईल अशीही चाल खेळली. मग विधानसभा बरखास्त करून पुरोगाम्यांना अधिकाधिक खेळवण्यात मोदी गर्क झाले. माध्यमातले पुरोगामी शहाणे व राजकारणातले अर्धवट पुरोगामी मोदींच्या खेळीत स्वेच्छेने सहभागी होत गेले. त्याचाच परिपाक मग पुढल्या दहा वर्षांनी समोर आला. मोदींना थेट पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्यापर्यंत हा मुर्खपणा अविरत चालू राहिला. अर्थात मोदी व गुजरात दंगलीचा लाभ पुरोगामी वा कॉग्रेसला मिळाला हे नाकारता येत नाही. दोनच वर्षात लोकसभेच्या निवडणूका आल्या आणि त्यात दंगलीचा देशव्यापी वापर झाला. भाजपाला त्याचा फ़टका बसला. शिवाय पक्षाचा मोठेपणा गुंडाळून सोनियांनी अन्य पुरोगामी पक्षांना सोबत घेण्याची चलाखी केली आणि सत्ताही मिळवली. पण तिथेच गुजरात व मोदी विषय निकालात काढून पुरोगाम्यांनी आपापले सकारात्मक कामकाज सुरू केले असते, तर मोदी हे पुरोगाम्यांसाठी देशव्यापी आव्हान होऊ शकले नसते. पण सत्तालोलूप कॉग्रेसने पुरोगामी खुळेपणाचा धुर्तपणे वापर करून घेताना सर्वच पुरोगाम्यांची पत धुळीस मिळवली. गुजरात, मोदी व हिंदूत्व यांचे भय घालून जो सावळागोंधळ पुढल्या दहा वर्षात चालू राहिला, त्याने कॉग्रेस आणि पुरोगामीत्व यांच्यातला भेद पुसट होत गेला. किंबहूना मोदी वा भाजपा सोडून सर्वकाही पुरोगामी अशी एक व्याख्या तयार होत गेली. मात्र त्याला आव्हान देण्याची कुवत दिल्लीच्या कुणा भाजपा नेत्यामध्ये नव्हती. म्हणूनच २००९ च्या निवडणूकात भाजपाची अवस्था आणखी दारूण झाली. पण त्याचवेळी कॉग्रेस़चे पुनरुज्जीवन होताना आजवरच्या प्रस्थापित पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्‍या पक्षाचे पावित्र्य संपुष्टात आले होते. बंगालमध्ये डावे, उत्तर प्रदेशात मुलायम, बिहारमध्ये लालू यांना स्वत:ची ओळखही वेगळी ठेवता आलेली नव्हती. 

एकूण मागल्या दहा वर्षात अशी स्थिती आलेली होती, की देशात पुरोगामी सरकार व राजकारण हवे असेल, तर कॉग्रेस वा तत्सम लोकांचा भ्रष्टाचार अनागोंदी निमूट सहन करावी लागेल. दुर्दैव असे, की हे पुरोगामीत्व नव्हे आणि भ्रष्टाचाराला पुरोगामी राजकारणात स्थान नाही, हे सांगायला तेव्हा विचारवंत वा पत्रकार संपादकांनी पुढे यायला हवे होते. निदान जे स्वत:ला पुरोगामी मानतात वा बांधिल मानतात, त्यांनी कॉग्रेस वा त्यांच्या मित्रपक्षांना जाब विचारण्यात पुढाकार घ्यायला हवा होता. पण मजेची गोष्ट अशी, की समाजातील पुरोगामी विचारवंत व संपादक पत्रकारांनी तसा जाब विचारू बघणार्‍या भाजपा वा इतरांची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानली. पर्यायाने माध्यमातील पुरोगामी लोकांची विश्वासार्हता जनमानसात घसरत गेली. नेमक्या त्याच काळात भाजपामध्ये मोदींची उंची वाढत होती आणि नव्याने वापरात आलेल्या सोशल माध्यमांचा मोदींनी अतिशय धुर्तपणे वापर सुरू केला होता. त्यातून मग भाजपापेक्षा देशभर नरेंद्र मोदी यांचे चहाते तयार होऊ लागले आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांना या नव्या माध्यमातून आव्हान उभे रहात गेले. मोदींची नकारात्मक प्रतिमा सातत्याने रंगवलेल्या माध्यमांना एका दिवसात माघार घेऊन मोदींचा नवा चेहरा उभा करणे अशक्य होते. पण सोशल माध्यमातून मोदींची जी फ़ौज त्यांच्याविषयी नवनवी माहिती जगभर पाठवू लागली होती, तिच्याशी सामना करण्यात भारतातील पुरोगामी माध्यमे लंगडी पडू लागली. किंबहूना माध्यमातील नामवंत सेक्युलर वा पुरोगामी म्हणून बदनाम होत गेले. ते सत्य सांगणार नाहीत आणि मोदी विषयक असत्यच सांगतील, असे चित्र उभे करण्यात मोदी यशस्वी झाले. त्यातून मग माध्यमातील मोडकळीस आलेल्या पुरोगामी नामवंतांना संपवण्याची अखेरची निर्णायक लढाई मोदींनी खेळणे तेवढे बाकी होते. आपल्याच कर्तबगारीने आपली आपलीच विश्वासार्हता धुळीस मिळवलेल्यांना शेवटचा धक्का देण्यापेक्षा मोदींना कुठलेच मोठे काम उरलेले नव्हते. तो धक्का त्यांनी लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीतून दिला. मतदानाचा अखेरचा महिना येऊन ठेपला, तरी हा देशातला सर्वाधिक लोकप्रिय माणूस कुठल्याही वाहिनीला मुलाखतही देत नव्हता. पण त्याच्या सभांचे थेट प्रक्षेपण करून त्यावर चर्चा करण्याची अगतिक भूमिका माध्यमांना पार पाडावी लागत होती. त्या अखेरच्या दिवसात मोदींनी एका एका नगण्य वाहिन्यांना प्राधान्याने मुलाखती देवून नावाजलेल्या वाहिन्या व पत्रकार संपादकांना खड्यासारखे बाजूला ठेवले. शेवटी दिवस संपत आले आता तरी ‘मोठ्या जाणत्या पत्रकारांना मुलाखती द्याना’, अशी केविलवाणी विनंती सागरिका घोष नामक पत्रकार विदूषीला करावी लागली. राजदीप सरदेसाईची ही पत्नी असल्याचे लक्षात घेतले, तर एकूण माध्यमातील पुरोगाम्यांना मोदींनी कसे नामोहरम करून टाकले त्याचा अंदाज येईल. पुढे निकाल लागले त्यात कॉग्रेससह तमाम पुरोगामी पक्षही धाराशाही झाले. त्याला मोदींचे कर्तृत्व उपयुक्त ठरण्यापेक्षा आधीच्या बारा वर्षातल्या ‘ओव्हर किल’ म्हणजे मोदी विरोधी अपप्रचाराच्या अतिरेकाचा तो परिपाक होता. मात्र इतक्याने देशातील पुरोगामी राजकारण वा चळवळी उध्वस्त झाल्या वा मोडकळीस आल्या असे म्हणता येणार नाही. त्याची सुरूवात खुप आधी म्हणजे साडेतीन दशकापुर्वी झालेली होती.   (अपुर्ण)

२ टिप्पण्या:

  1. हे मुद्दे सोशल साईटवर शेपुट चिरडण्यासारखे ठरतात! :-D

    उत्तर द्याहटवा
  2. आमच्या सारख्या सामान्यांना हे राजकारण कळणे खरच कठीण पण आभार भाऊ तुम्ही मस्त समजावलेत.

    उत्तर द्याहटवा