शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

पुरोगामी चळवळीचा र्‍हासारंभ

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 (लेखांक दुसरा)

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात बहुतेक राजकीय प्रवाह कॉग्रेस या छत्राखाली काम करत होते. पण पुढल्या काळात म्हणजे जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येत गेले, तसतसे हे प्रवाह बाजूला स्वतंत्र राजकीय संघटना वा पक्ष म्हणून समोर येत गेले. त्यातला हिंदूसभा हाच एक वेगळा मतप्रवाह होता. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारणापासून अलिप्त असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मग जनसंघ नावाची आपली राजकीय आघाडी उभी केली. पण हा पक्ष कोणाच्या खिजगणतीत नव्हता. सहाजिकच कॉग्रेस म्हणून उरलेली संघटना हाच देशातला प्रमुख मध्यवर्ति पक्ष ठरला आणि बाजूला झालेल्या विविध राजकीय गटांना आपले बस्तान बसवताना वेळ लागत गेला. पण ती संधीही कॉग्रेसच्या नेतृत्वाने दिली नाही. वेळोवेळी अन्य पक्षातले पुरोगामीत्व मानणारे नेते फ़ोडून वा त्यातले हुशार गुणी नेते आपल्याकडे ओढून कॉग्रेस आपले अस्तित्व टिकवीत राहिली. हिंदूसभा संपत होती आणि तिची जागा जनसंघ घेत होता. कारण त्याच्या पाठीशी संघाचे संघटित पाठबळ होते. त्याच्याही पलिकडे माजी संस्थानिक व उद्योगपतींचा मानला जाणारा एक पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेला होता. स्वतंत्र पक्ष असे त्याचे नाव होते आणि तो उजवा पक्ष मानला जात असे. कारण तो समाजवाद वा साम्यवादाचा कडवा विरोधक होता. मात्र १९६७ पर्यंत त्याचे लोकसभेतील स्थान लक्षणिय होते. कारण माजी संस्थानिकांना आपापल्या जुन्या संस्थानातील रयतेची मते मिळवणे सहजशक्य होते. पुढे इंदिरा गांधी यांनी घटनादुरूस्ती करून प्रत्येक राजकीय पक्षाला सेक्युलर व समाजवादी असण्याची सक्ती केली, तेव्हा स्वतंत्र पक्षाने आपला गाशा गुंडाळला. त्याचे बरेचसे नेते व पाठीराखे नंतर जनसंघाच्या गोटात येत गेले. पण या सर्व काळात भारतीय विरोधी राजकारण पुरोगामी व सेक्युलर पक्षांच्या भोवती घोटाळत राहिले होते. कम्युनिस्ट, सोशलिस्ट वा तत्सम राजकीय विचारसरणीच्या पक्षांचा बोलबाला होता. लोकसभेतही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसायचे. देशातील राजकारण उजवा कॉग्रेस पक्ष व डावे राजकीय गट अशी झुंज होती. आज जसे विविध पक्ष भाजपाला वा मोदींना संपवायला एकत्र येतात, तसेच तेव्हा कॉग्रेस विरोधात एकत्र यायचे राजकारण चालू होते. सेक्युलर विरुद्ध जातियवादी वा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असे त्याचे स्वरूप नव्हते. कारण तेव्हा भाजपा किंवा जनसंघ यांची राजकीय शक्ती तितकी मोठी नव्हती. हळुहळू आपले बस्तान बसवण्यातच जनसंघाची दमछाक व्हायची. 

१९५७ सालात देशात पहिली निवडणूक व्यापक आघाडी करून लढवली गेली, ती महाराष्ट्रात! मराठी राज्याच्या मागणीसाठी कॉग्रेसला धडा शिकवायला तेव्हा जनसंघच नव्हेतर हिंदू महासभेलाही सोबत घेऊन समाजवादी व कम्युनिस्टांनी एकदिलाने लढत दिली होती. त्यात कुठे पुरोगामी वा प्रतिगामी असा संघर्ष उदभवला नव्हता. ज्यांचा आज देशाला वा राष्ट्रीय एकात्मतेला धोका असल्याचे सांगत प्रत्येक पुरोगामी घसा कोरडा करीत असतो, तेच समाजवादी कम्युनिस्ट संघप्रणित जनसंघाच्या मांडीला मांडी लावून बसत उठत होते. मजेची गोष्ट म्हणजे आज जे लोक पुरोगामी म्हणून एकत्र एकाच भाषेत बोलतात, त्यांचे तेच राजकीय गट तेव्हा एकमेकांवर खुनाचे हिंसेचे आरोप सर्रास करीत होते. संयुक्त महाराष्ट्र समितीत पहिला वाद उफ़ाळला तो कम्युनिस्ट व सोशलिस्ट यांच्यात! त्याचे कारण इथले नव्हते तर दूरच्या युरोपातील होते. तिथे सोवियत गटात असलेल्या हंगेरीचा पंतप्रधान इंम्रे नाझ याने लोकशाही आणायची ठरवली तर वार्सा करारानुसार सोवियत कम्युनिस्ट सेनांनी त्या देशात घुसून नाझ याला नुसते सत्ताभ्रष्ट केले नाही तर ठार मारले. त्याच्या निषेधाचा प्रस्ताव सोशलिस्ट पक्षाने मुद्दाम मुंबई महापालिकेत आणला आणि कम्युनिस्ट पक्षाला डिवचण्याचा उद्योग केला होता. त्यातून समितीमध्ये वादंग उसळून आला. त्यावेळी समाजवाद्यांचे सौम्य स्वभावाचे नेते बॅ. नाथ पै म्हणालेले वाक्य किती बोचरे असावे? ‘आम्ही यशवंतरावांचा केरेन्स्की होऊ देणार नाही’ असे नाथ पै म्हणाले. त्याचा अर्थ असा, की सोवियत कम्युनिस्ट पक्षाचाच हा नेता स्टालिनच्या विरोधात गेल्यावर त्याला संपवण्यासाठी प्राणघातक कारवाया झालेल्या होत्या. थोडक्यात आज जितक्या आवेशात आपण दाभोळकर पानसरे यांच्या हत्येसंबंधी हिंदूत्व मानणार्‍यांवर आरोप होताना ऐकतो, तशीच भाषा तेव्हाचे समाजवादी इथल्या कम्युनिस्टांच्या बाबतीत वापरत होते. आज मात्र दोघेही एकाच सुरात तीच भाषा हिंदूत्ववाद्यांच्या बाबतीत वापरतात. विचारांची लढाई विचारांनीच होते बंदूकीच्या गोळीने नाही, ही भाषा कम्युनिस्टांना कधी उमजली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे काय? असो, पण त्याचेही भान वा ज्ञान नसलेले डॉ. कुमार सप्तर्षी लेख लिहून विचारतात, कुठल्या पुरोगाम्याने कधी कुठल्या प्रतिगाम्याची हत्या केली आहे? प्रतिगाम्याची नसेल, पण पुरोगाम्यानेच पुरोगाम्याची हत्या विचार संपवण्यासाठी केल्याचा पुरोगामी इतिहास जागतिक आहे ना? त्याचे काय करायचे? त्याचे तीळमात्र ज्ञान नसलेले विचारवंत आजकाल पुरोगामी जाणते म्हणून उदयास आलेले आहेत आणि त्याचा आरंभ १९७० च्या दशकात झाला. 

आज ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून आपण ओळखतो, त्याचा जन्म जनता पक्ष फ़ुटण्यातून झाला. तो जनता पक्ष कुठल्या एका विचारसरणीचा पक्ष नव्हता. तर इंदिरा गांधींनी तमाम विरोधकांना आपल्या विरोधात एकत्र आल्यामुळे आणिबाणी लादून गजाआड फ़ेकले, त्याच्या परिणामी एक राजकीय आघा्डी अशा स्वरुपात ज्याचा जन्म झाला, त्याला जनता पक्ष म्हणून ओळखले गेले. त्यात मुळचे समाजवादी होते तसेच इंदिरालाटेने बाजूला फ़ेकले गेलेल्या जुन्या कॉग्रेसजनांची संघटना कॉग्रेस होती. अधिक आणिबाणी उठल्यावर त्यातले भागिदार असलेल्या जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले्ल्या काही कॉग्रेसजनांचा सीएफ़डी नामक गटही होता. त्याखेरीज खुप आधीच कॉग्रेस सोडून शेतकरी जाटांचा पक्ष चालवलेले व पुढे समाजवादी राजनारायण यांना सोबत घेऊन भालोद नावाचा पक्ष चालविलेले चौधरी चरणसिंग होते. कमीअधिक प्रमाणात त्यांच्यात वैचारिक साम्य साधर्म्य तरी होते. त्यात विचित्र वाटणारा एकच गट होता तो संघाशी संबंधित अशा जनसंघाचा! जनता पक्ष एकजीव असावा यासाठी सर्वांनी एकदिलाने जयप्रकाशांचा शब्द मानून आपापले पक्ष विसर्जित केले आणि जनता पक्ष ऐन निवडणूकीच्या तोंडावर स्थापन केला. त्याची रितसर पक्ष म्हणून नोंदणीही होऊ शकलेली नव्हती. मग तात्कालीन व्यवस्था म्हणून सर्व उमेदवार भालोदच्या चिन्हावर लढले आणि जनता पक्ष सत्तेवर आला. त्यात मार्क्सवादी सहभागी झाले नाहीत तरी त्यांनी जनता पक्षाशी दोस्ती केली व जागावाटपही केलेले होते. तर दुसरा कम्युनिस्ट पक्ष तेव्हा कॉग्रेसचा समर्थक म्हणून अगदी आणिबाणीतही इंदिरा गांधींच्या पाठीशी उभा राहिला होता. अशा जनता पक्षाला सत्ता मिळाली व खुद्द इंदिराजीही रायबरेलीत पराभूत झाल्याने कॉग्रेसचा विषय बाजूला पडला आणि जनता पक्षातच बेबनाव सुरू झाला. कॉग्रेसमध्येही दुफ़ळी माजली होतीच. संजय गांधी व इंदिराजींच्या विरोधातल्या चौकशीचे बालंट पक्षावर नको म्हणून यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिराजींचा बाजुला काढले होते. मग इंदिरानिष्ठांनी वेगळी चुल मांडली होती. थोडक्यात कॉग्रेस नामोहरम झाली अशा समजूतीमध्ये जनता पक्षातील मुळचा समाजवादी गट पुन्हा गोंधळ घालू लागला. त्यातले मुळचे समाजवादी राजनारायण यांनी चौधरी चरणसिंग यांना घोड्यावर बसवले आणि संघविरोधी कारवाया सुरू केल्या. म्हणजे असे, की जनता पक्षात असलेल्यांनी कुठल्याही प्रकारचे संबंध संघाशी ठेवू नयेत असा आग्रह सुरू केला. सघाशी संबंध म्हणजे दुहेरी निष्ठा असा सिद्धांत राजनारायण यांनी मांडला आणि पक्षात कुरबुरी सुरू केल्या. 

दिल्लीत हे नाटक चालू असताना इथे मुंबईत रावसाहेब कसबे या दलित विचारवंताने लिहीलेले ‘झोत’ नावाचे छोटे पुस्तक राष्ट्र सेवा दल विरुद्ध रा. स्व, संघ यांच्या जनता पक्षीय विवादाचे एक मोठे कारण झाले. त्या पुस्तिकेच्या प्रकाशन व परिसंवादाचे कारण होऊन गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये धुमश्चक्री उडालेली होती. तिथून मग दिवसेदिवस इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजवादी व जनसंघियात हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. जनता पक्ष म्हणुन त्यांचे नेते एकत्र वावरत होते आणि कार्यकर्ते परस्परांना पाण्यात बघू लागले होते. दिल्लीचे सरकार त्यातून लयाला गेले. औपचारिकता म्हणून विरोधी नेते यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता, त्याचे निमीत्त करून जनता पक्षातले दोन गट हमरातुमरीवर आले. त्यातले जुने संसोपा व प्रसोपाचे गटही परस्परांशी पटवून घेत नव्हते. जुने संसोपावाले राजनारायण सोबत चरणसिंगाच्या गोटात गेले, तर प्रसोपावाले मोरारजींच्या गटात राहिले. पण तो ठराव संमत व्हायची पाळी आली आणि मोरारजींनी राजिनामा टाकला. मग कोणापाशी बहुमत नव्हते म्हणून राष्ट्रपतींचीच चाचपणी केली आणि चरणसिंग यांचे नवे संयुक्त सरकार सत्तेत आले. त्याला इंदिराजींनी बाहेरून पाठींबा दिलेला होता. यशवंतराव चव्हाण त्यात उपपंतप्रधान झाले. कसे छानपैकी पुरोगामी सरकार स्थापन झाले होते. जुने जनसंघिय व जुने प्रसोपावाले जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षात बसले होते. मात्र त्या सरकारला सहा महिन्यात विश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची वेळ आली आणि इंदिराजींनी अजब पवित्रा घेतला. आपण सरकार बनवायला पाठींबा दिला होता, पण चालवायला पाठींबा दिलेला नाही, असे वक्तव्य इंदिराजींनी केले आणि चरणसिंग यांना राजिनामा देण्याखेरीज पर्याय उरला नाही. मग अन्य पर्याय नसल्याने लोकसभा बरखास्त झाली आणि मध्यावधी निवडणूका घेतल्या गेल्या. त्यात जनता पक्षाचा धुव्वा उडवित इंदिराजी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि आणिबाणी लादणार्‍या इंदिराजींना देशाने पुन्हा स्विकारले. त्याचे श्रेय खरे म्हणजे नसलेला प्रतिगामी-पुरोगामी वाद उकरून काढणार्‍या व जनभावनेची पायमल्ली करणार्‍या राजनारायण व तत्सम समाजवाद्यांनाच द्यावे लागेल. पण तिथून मग संघ हा पुरोगामी राजकारणातला एक महत्वाचा शब्द बनत गेला. पुर्वाश्रमीचे समाजवादी व संघनिष्ठ जनसंघवाले यांच्यात संघ हा वितुष्टाचा विषय होऊन गेला. एकवेळ आणिबाणी लादून गजाआड फ़ेकणार्‍या इंदिराजी चालतील, पण संघाशी संबंधित कोणाशी सलगी नाही, हे तत्व पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी आपली विचारसरणी बनवली म्हणायला हरकत नाही. त्याचे परिणाम मग लौकरच दिसून आले. 

समाजवाद्यांचा एक गट जनता पक्षातून बाजुला झालाच होता. तरी १९८० च्या लोकसभेत उर्वरीत जनता पक्ष एकदिलाने लढला आणि पराभूत झाला. पण त्यात कायम रहाण्याने काहीही साधणार नव्हते, म्हणुन पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी वेगळी चुल मांडण्याचा पवित्रा घेतला. डिसेंबर १९८० मध्ये त्यांनी मुंबईतच अधिवेशन भरवून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यालाच आज आपण भाजपा म्हणून ओळखतो. उरलेला जनता पक्ष क्रमाक्रमाने विस्मृतीत गेला, त्याचे पुन्हा विश्वनाथ प्रताप सिंग याच्या नेतृत्वाखाली जनता दलात रुपांतर झाले व आणखी तुकडे पडत गेले. पण नंतरच्या साडेतीन दशकात प्रयत्नपुर्वक पुर्वीच्या जनसंघीय वा नंतरच्या भाजपावाल्या नेत्या कार्यकर्त्यांनी १९७७ सालचा बिगर कॉग्रसी राजकारणाचा ‘जनता’ वारसा बळाकावण्याचा प्रयास केला. त्यांच्या पाठीशी अर्थातच संघाची भक्कम संघटना उभी असल्याने त्यात यश मिळत गेले. पण दरम्यान ज्या पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी राजकारणाचा आरंभ १९७८ सालात झाला, त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांखेरीज अन्य पक्ष सहभागी होत गेले. त्यांना आज आपण पुरोगामी म्हणून ओळखतो. या पुरोगाम्यांची नेमकी ओळख काय? अर्थात विविध विचारवंत नवनव्या व्याख्या देत असतात. पण अत्यंत सोपी व्याख्या कुठली असेल, तर जो कोणी हिदूत्व किंवा संघाच्या विरोधात कडाडून बोलेल, त्याला आज पुरोगामी म्हणून ओळखले जाते. त्यांचा कार्यक्रम कोणता? याही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येणार नाही. जे काही संघ वा त्याच्याशी संबंधित ठरवतील, त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहाणे, हा आता पुरोगाम्यांसाठी एक कलमी कार्यक्रम होऊन गेला आहे. त्याचा पाठपुरावा करताना हे पक्ष व विविध पुरोगामी गट क्रमाक्रमाने लयास गेलेले आपल्याला दिसतील. आपली विचारसरणी, आपला अजेंडा याच्याशी त्यापैकी कोणाला कसले कर्तव्य नाही. आपल्या विचारांची संघटना असावी, त्याची शक्ती व प्रभाव जनमानसावर पडावा, यासाठी पुरोगामी म्हणवणार्‍या नेते गटांनी मागल्या दोनतीन दशकात नेमके काय केले, ते भिंग घेऊन शोधले तरी सापडणार नाही. त्यापेक्षा भाजपा किंवा संघाने काहीही करायचे म्हटले, की त्याला अपशकून करण्याला सतत प्राधान्य देण्यात आलेले दिसेल. नेमके त्याच्या उलट त्याच दोनतीन दशकात संघाने व भाजपाच्या नेत्यांनी कॉग्रेसी राजकारणाला पर्याय म्हणून जनमानसात आपली प्रतिमा उभी करण्याचा पद्धतशीर प्रयास केलेला दिसेल.

संघ वा भाजपाच्या आजच्या यशाला जसे त्यांचे दिर्घकालीन प्रयास कारणीभूत आहेत, तसेच पुरोगाम्यांच्या आजच्या केविलवाण्या अपयशाला त्यांचा नाकर्तेपणा कारण झाला आहे. खरे तर वेगळा झालेल्या भाजपालाही आपला खरा संघीय चेहरा घेऊन पुढे येण्याची हिंमत नव्हती. वेगळा झालेल्या भाजपाचाही अजेंडा गांधीवाद आणि समाजवाद असाच होता. त्यात कुठे हिंदूत्वाचा लवलेश नव्हता. कारण आपला पुरोगामी चेहरा दाखवूनच आपण कॉग्रेसी राजकारणाला पर्याय होऊ शकतो, अशी भाजपा नेत्यांचीही धारणा होती. बर्‍याच प्रमाणात संघापेक्षा वेगळा अजेंडा घेऊन भाजपा चालतही होता. १९८७ सालात मुंबईच्या उपनगरात पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. त्यात शिवसेना खुले हिंदूत्वाचे आवाहन करीत उतरली होती. तर तेव्हा भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन जनता पक्षीय प्राणलाल व्होरा या उमेदवाराचे समर्थन व सेनेच्या हिंदूत्वाला विरोध केला होता. पण गंमत म्हणजे त्याच निवडणुकीत संघाने मात्र सेनेच्या बाजूने उतरून भाजपाची भूमिका फ़ेटाळली होती. पण याचा अर्थ असा होतो की भाजपा वा पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात न्युनगंड जोपासून त्यांना पुरोगामी बनवण्यात पुरोगामी मंडळी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली होती. किंबहूना संघापासून भाजपाला वेगळे काढण्यात पुरोगामी यशस्वी झाले, अशी १९८७ पर्यंतची अवस्था होती. त्याचेही कारण होते, १९८४ च्या निवडणूकीत भाजपाचा उडालेला धुव्वा होय. इंदिराजींची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केली आणि त्यातून उठलेल्या सहानुभूतीच्या अगडबंब लाटेत सर्वच पक्ष वाहून गेले. भाजपाला पहिली निवडणूक स्वबळावर लढताना अवघ्या दोन जागा लो्कसभेत जिंकता आलेल्या होत्या. त्याचे वैफ़ल्य मोठे होते. कारण वाजपेयी यांच्यासारखे दिग्गजही पराभूत झाले होते. बालेकिल्ले म्हणावे अशाही जागा गमावल्या होत्या. फ़क्त भाजपाच संपला नव्हता, तर अन्य पक्षही विस्कटून गेले होते. पण मग तिथून नव्याने पक्षाची व नेतृत्वाची उभारणी भाजपाने वा संघाने सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगाम्यांची दिवाळखोरी आणि संघ व भाजपातील नव्या उभारणीचा काळ एकच असावा याला निव्वळ योगायोग म्हणता येईल. आज दिसतात ते त्याचेच परिणाम होत. कारण याच कालखंडात भाजपाने नवे समाज घटक आपल्यात आणायचा व नवनेतृत्व उभे करण्याचा चंग बांधला होता, तर पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षात, चळवळीत व संघटनात खरे हाडाचे कार्यकर्ते बाजूला पडत चालले होते आणि त्यांची जागा बोलघेवडे, कागदी घोडे घेऊ लागले होते. संघटनात्मक काम लयास जाऊन माध्यमे व प्रसिद्धीच्या बळावर पुरोगामी चळवळ चालवण्याचे नवे तंत्र विकसित होऊ लागले होते. त्याचा एकत्रित परिणाम आज आपल्याला दिसतो आहे. (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा