बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

ब्रिटिशांची दोनशे वर्षे जुनी बीओटी कार्यपद्धती


   दिडशे वर्षे ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले, असे बालपणापासून ऐकत आलो. तसेच तागडी घेऊन व्यापार करायला आलेल्या बिटीशांनी संधी मिळताच हाती तलवार घेऊन इथली सत्ता बळकावली असेही ऐकत आलो. जुन्या गोष्टी बोलायच्या नसतील तर अवघ्या दोन दशकांपुर्वीची गोष्ट घेऊ. आजचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री झाले होते आणि त्यांनी नेहरू इंदीरा गांधी यांचा कालबाह्य समाजवाद गाडू्न टाकायचे धोरण राबवायला सुरूवात केली होती. त्या मुक्त अर्थव्यवस्थे्चा आरंभ गॅट करारापासून होणार होता. त्या करारावर भारताने सही करू नये म्हणून उजवे-डावे असे सर्वच विरोधक कडाडून विरोध करत होते. तेव्हाही पुन्हा इस्ट इंडीया कंपनीचे नव्याने राज्य येणार अशी भाषा वापरली जात होती. इस्ट इंडीया कंपनी्चे राज्य म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने इथे येणार्‍या परदेशी कंपन्याच देश ताब्यात घेतील; असाच आरोप होता. मात्र तसे काही झाले नाही. उलट जगाच्या पाठिवर अनेक देशात आपलेच उद्योगपती पोहोचले आणि त्यांनीच तिथल्या कंपन्या काबीज केल्या. असो. तो मुद्दा नाही. गेल्या दोन दशकात जी मुक्त अर्थव्यवस्था आली आणि बाजारू नितीमत्ता आली; तिने आपल्या सामाजिक सांस्कृतिक स्वभावामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यातून आपण एकदम शंभर वर्षे किंवा पन्नास वर्षे पुढल्या युगात आलो म्हणायला हरकत नसावी. म्हणजे पंधरा वर्षापुर्वीपर्यंत कोणीतरी परदेशी जाऊन येताना काही आयात माल घेउन येत असे. मग त्याने आणलेल्या भेटीचे इथे खुप कौतुक असायचे, ते आता राहिले नाही. सुविधा व साधने यात आपण थेट अमेरिकेच्या पंक्तीला येऊन बसलो आहोत. पण मनाने व वृत्तीने अजून आपण विसाव्या शतकातचा घोटाळतो आहोत. त्याच्याही पलिकडे सामुहिक मानसिकता तर दिडदोनशे वर्षे मागे गेली आहे. म्हणजे जेव्हा ब्रिटीश युरोपीयन इथे आपले बस्तान बसवत होते, त्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण आज पोहोचलो आहोत.

   देहाने, साधनांनी व अनुभवाने आपण एकविसाव्या शतकात जगत असतो. पण आपल्या सामाजिक व सामुहिक जाणिवा मात्र उलट दिशेने प्रवास करत एकोणिसाव्या शतकात मागे जाऊन पोहोचल्या आहेत आणि समुह पातळीवर आपण नेमके तसेच वागत आहोत. ज्याला राजकीय परिभाषेमध्ये अराजक म्हणतात आणि सामान्य भाषेमध्ये यादवी म्हणतात. याच परिस्थितीमुळे मुठभर इंग्रजांना आपल्यावर राज्य करणे व त्यांचे गुलाम बनवण्यासाठी आपली मदत मिळणे शक्य झाले होते. पुढला इतिहास सर्वश्रुत आहे. ती परिस्थिती काय होती? दिल्लीच्या बादशाहीचे साम्राज्य खिळखिळे झाले होते. दुसरीकडे मराठ्यांची सत्ताही गडबडली होती. या खंडप्राय देशामध्ये कोठेच एक केंद्रिय सता नव्हती. सुभेदार, सरंजामदार, जमीनदार, नबाब. सुलतान यांचे आपापले मर्यादित राज्य होते. त्यांच्यात सता व हुकूमत गाजवण्याची क्षमता उरलेली नव्हती, की टिकवण्याची इच्छाशक्ती नव्हती. शिवाय कोणाला सत्ता राबवण्यापेक्षा त्या सत्तेचे लाभ घेण्याच्याच लोभाने पछाडलेले होते. त्यामुळे रयत वा जनता मेटकुटीस आली होती. ज्याच्या कोणाच्या मनगटात ताकद असेल वा सशस्त्र झुंड जमवून लोकसंख्येला ओलिस ठेवण्याची हिंमत असेल; तो भोवतालच्या परिसराचा राजा बनू शकत होता. हुकूमत गाजवू शकत होता वा लूटमार करत होता. राजकीय सता म्हणजे बजबजपुरी झाली होती. परिणामी व्यापार उदीम धोक्यात आले होते. कष्टाने संपत्ती निर्माण करणार्‍याला वेठीस धरून नुकसान करण्याची ज्याची क्षमता, तो हुकूमत गाजवत होता. सुरक्षा कोणालाच नव्हती. अराजक माजलेले होते. थोडक्यात गुंडगिरीची क्षमता असणे म्हणजे राजा अशी स्थिती होती. आणि जे कोणी राजे, नबाब होते, त्यांना अशा अराजक वा अशांतता माजवणार्‍यांचा बंदोबस्त करण्याची गरज वाटत नव्हती किंवा त्याच्यात तेवढी कुवत उरली नव्हती. परिणामी समस्त कष्टकरी जनता किंवा व्यापारी वर्ग गांजलेला होता. त्याला अशा ऐदी सत्ताधीश व लुटारू मुजोरांपासून मुक्ती हवी होती. त्याचाच धोरणी युरोपियनांनी लाभ ऊठवला. त्यांनी बेशिस्त झालेल्या राजकीय अराजकामध्ये शांतता देण्याची शक्यता आपल्या मर्यादित शिस्तबद्ध योजनेतून उभी करून दाखवली. तशी ती जनता व व्यापारी वर्ग त्यांच्याकडे झुकत गेला.

   लक्षात घ्या, ब्रिटिशांनी किंवा युरोपियनांनी इथे राज्य स्थापनेचा विचारच केला नव्हता किंवा तसे त्यांनी कोणाला आश्वासनही दिलेले नव्हते. प्रथमत: त्यांनी आपल्या व्यापाराला आवश्यक म्हणुन आपल्याच सुरक्षिततेची व्यवस्था उभारण्याचा पर्याय शोधला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नागरी सत्ता राबवण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. सत्ताधीशांच्या परवानगीने घेतले. त्यातून निदान त्यांच्या परिसरात त्यांनी लोकांना शांततामय जीवन जगण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी आधी नुसते महसुलाचे आधिकार मिळवले, ज्याला आज आपण बीओटी असे म्हणतो. ‘बांधा, वापरा हस्तांतरित करा’ असे आज एक नवे धोरण मुक्त अर्थव्यवस्थेने आणले आहे. त्याच मार्गाने इथे युरोपियनांचे राज्य आले. म्हणजे आज देशाच्या अनेक भागात मोठमोठे रुंद रस्ते बांधले जातात, त्यावरून जायचे तर आपल्याला टोल म्हणजे रस्ताकर द्यावा लागतो. त्या रस्त्याच्या उभारणीमध्ये ज्या कंपनीने पैसे ओतले, त्यांची परतफ़ेड रस्ता वापरणार्‍याला करावी लागत असते. त्याला टोल म्हणतात आणि जोवर ती गुंतवणूक त्यातील व्याजासह वसूल होत नाही, तोवर त्या रस्त्याची मालकी त्याच कंपनीकडे असते. थोडक्यात त्या रस्त्यावर मालकी त्या कंपनीची असते आणि सताही त्याच कंपनीची असते. तिथे सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. मग त्यातून किती पैसे वसुल केले जातात, किती वसूल झाले, त्याबद्दल सरकार प्रश्न विचारत नाही. ब्रिटीशांची सत्ता इथे प्रस्थापित होताना ज्या राजे नबाबांनी त्यांना विविध सनदी व अधिकार बहाल केले, त्यांनी तरी त्यानुसार होणार्‍या वसुल वा महसुलाच्या कामात कधी हस्तक्षेप केला होता काय? तेवढ्यापुरते त्यांचे म्हणजे ब्रिटिश व इस्ट इंडीया कंपनीचे राज्य होते, त्यांची मनमानी चालू असे. तेव्हा त्याला महसुलाचे अधिकार म्हटले जायचे. आज त्यालाच बीओटी असे म्हणतात. नेहमीच्या वृत्तपत्रिय भाषेमध्ये त्यालाच खाजगीकरण म्हटले जात असते. जिथे सरकार सार्वजनिक जबाबदारी सोडुन खाजगी कंपनी वा ठेकेदाराकडे आपले सत्तेचे अधिकार सोपवते, त्याला आज खाजगीकरण म्हणतात. तर दोनशे वर्षापुर्वी कंपनीला अधिकाराची सनद देणे म्हटले जायचे.

   ही पाळी तेव्हाच्या राजे नबाबांवर का आली होती? तर त्यांना राज्य चालवण्यापेक्षा त्या अधिकारामुळे जी जबाबदारी येते ती पार पाडण्यापेक्षा, त्यामुळे चैन व मजा करण्याचे अधिकार प्राप्त होतात, तेवढेच उपभोगायचे होते. सत्ता बापजाद्यांनी मि्ळवली होती. पुर्वजांनी लढाया मारल्या होत्या. सता मिळवून जनतेला सुरक्षिततेची हमी दिली होती. रयतेचा विश्वास संपादन केला होता. त्याच विश्वासावर जनता त्यांना राजा मानून त्यांच्या आश्रयाने सुखी सुरक्षित जीवन जगण्याची अपेक्षा बाळगत होती. पण त्यासाठी जागृतपणे सत्ता राबवावी लागते. जनहिताचे डोळ्यात तेल घालून रक्षण करावे लागते, याचे भान पुढल्या पिढीतल्या वारसांना राहिले नाही. त्यामुळेच त्यांच्या ढिलाईचा फ़ायदा घेऊन समाजातील गुंड गुन्हेगार सोकावत गेले. पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हाती असलेल्या सत्तेचे हत्यार घेऊन मैदानात उतरण्याची इच्छाच राजे नबाब गमावून बसले होते. आपल्या ऐषोआरामात, चैनीत व्यत्यय येऊ न देता कारभाराची जबाबदारी उचलणारे ठेकेदार मिळाल्यास त्यांना हवे होते आणि तीच जबाबदारी उचलायला युरोपियन व्यापारी पुढे आले. आपल्या पगारी फ़ौजा उभ्या करून व शिस्तबद्ध सेना उभ्या करून, त्या व्यापार्‍यांनी तात्कालिन भारतीय सताधीशांच्या सत्तेला राबवण्याचे कंत्राट मिळवले. त्याची व्याप्ती वाढवत नेली. आपल्या नबाब राजांपेक्षा हा नवा ठेकेदार उत्तम सुरक्षा व व्यवस्था देतो; यावर इथली जनता सुखावली आणि क्रमाक्रमाने इथला राज्यकारभार बीओटी पद्धतीने ब्रिटीशांच्या हाती गेला. मग काही काळाने अशी स्थिती आली, की ठेका मिळवण्याचीच गरज उरली नाही. ठेकेदारच ठरवू लागले, की राजाने, नबाबाने काय कंत्राट द्यायचे आहे आणि कोणत्या अटीवर द्यायचे आहे. बिचार्‍या निकामी व निरुपयोगी संस्थानिकांना त्या ठेकेदारांच्या इच्छेपुढे मान तुकवण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. कारण ते जनतेचा विश्वासच गमावून बसले होते. असे हळूहळू अवघ्या देशाचे राज्य ब्रिटिशांच्या हाती गेले. ते व्यापारी म्हणुन इथे आले, व्यापारच करत होते. पण हळुहळू त्यांच्या लक्षात आले, की विश्वास हे या देशातले सर्वात मोठे भांडवल आहे आणि आपण आपल्या कृतीमधून तो विश्वास या रयतेमध्ये निर्माण केला, तर एक पैशाचे भांडवल गाठीशी नसले तरी या देशाची सत्ता आपण मिळवू शकतो. आणि तसेच झाले, त्यांनी संपुर्ण देशच बीओटी पद्धतीने काबीज केला. आज किती वेगळी परिस्थिती आहे?      ( क्रमश:)
भाग   ( ७ )    १/११/१२

मीठाला जागणार्‍यांचा सत्या-ग्रह किती खरा?


   समाजातला बुद्धीवादी समजला जाणारा पत्रकार वर्ग असा वागत असेल, तर आपल्या देशात अराजक आले असे समजायला हरकत नसावी. पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, अशी एक समजूत आहे. पण त्यात काडीचेही तथ्य नाही. कारण अशी कोणी खोटी बातमी देत असेल तर त्याला कायद्याने कोर्टात खेचता येते. पण वर्षानुवर्षे खटल्याचे कामकाज चालतच नाही. नुसत्या तारखेवर तारखा पडत असतात. सहाजिकच जो कोणी खटला भरणारा आहे त्यालाही आरोपीच्या सोबत कोर्टात खेटे घालावे लागतात. दरम्यान तोच आरोपी म्हणजे तोच पत्रकार आणखी इतर लोकांच्या अब्रूशी खेळ करायला मोकळाच असतो. मग त्याला मोकाट बघून पुढल्या लोकांना कोर्टात जाण्याची हिंमत कशी होणार? त्यापेक्षा असे प्रतिष्ठीत त्याच्याशी सौदेबाजी करतात. चिरीमिरी देऊन आपली बातमी दाबून घेतात. परवा माझा ब्लॉग वाचून एका वाचकाने दिलेली फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया त्याचीच साक्ष देते. त्याचा मित्र एका मराठी वाहिनीवर ‘ठाम’ बातम्या देतो आणि तो पत्रकार या मित्राला सांगतो; बातम्या देण्यापेक्षा न दाखवण्याची कमाई अधिक असते. हे आजच्या अविष्कार स्वातंत्र्याचे रूप आहे. अर्थात त्यासाठी मी एकट्याच पत्रकारांना दोष देत नाही. अवघा समाजच बिघडला व भरकटला आहे, तर त्यातलेच कोणी पत्रकार होत असतात. त्यांनाही भ्रष्टाचाराच्या रोगाची बाधा होणारच, असे मान्य करायलाच हवे. पण फ़रक इतकाच, की आम्ही पत्रकार इतरांप्रमाणे परिणाम सोसून गप्प रहात नाही. उलट ज्या पापाचे आम्हीही भागिदार आहोत, त्यावर बेशरमपणे आम्ही बोंबाबोंब करीत असतो. त्यावर माझा आक्षेप आहे. आणि पेशाचे कौतुक कोणाला असेल, तर मग पत्रकारांना भ्रष्ट व्हायची सवलतच मि्ळू शकत नाही. कुठल्याही मान्यवर नेता किंवा मंत्र्याला विचारा की पत्रकार किती सोज्वळ वा पवित्र आहेत ते? मंत्रालयातला सर्वात भ्रष्ट कोनाडा पत्रकार कक्ष आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

   प्रेस कौन्सील ही तशी पत्रकारांच्या विरोधातील तक्रारी करण्याची जागा आहे. पण तिला दातच नाहीत. म्हणजे त्या संस्थेला तक्रारी घेता येतात, त्याची शहानिशा करता येते. पण ती कुठल्या पत्रकार व वृत्तपत्रावर कुठलीच कारवाई करू शकत नाही. हल्ली नव्याने त्या संस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी त्याबाबतीत वारंवार आवाज उठवला आहे. पण त्यांच्याच विरोधात पत्रकारांची बोंब आहे. पत्रकार व माध्यमांची मुस्कटदाबी करायला काटजू उतावळे झालेत, अशी त्यांच्यावर उफ़राटी टिका होते. त्यांनी कुठल्याही नियंत्रणाची मागणी केलेली नाही. पण अविष्कार स्वातंत्र्य म्हणून जो बेतालपणा पत्रकार करतात, त्याला पायबंद घालण्यासाठी नियमनाची मागणी केली आहे. नियमन व नियंत्रण यात फ़रक असतो. वाहतुकीचे नियमन होते, त्यामुळेच अपुरे रस्तेही वर्दळीच्या वेळी पुरेसे होत असतात. पण पत्रकार व माध्यमे नेहमीच स्वयंनियमनाची भाषा बोलत असतात. मात्र ते कधीच होत नाही. कारण पत्रकार वा माध्यमांच्या संघटनांकडे कुठलाही शिक्षेचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांचा कोणाला धाकच नाही. त्यामुळे पत्रकार अधिकच बोकाळले व बेताल झाले आहेत. स्वयंनियंत्रण म्हणजे काय?

   वैद्यक वा कायदेविषयक क्षेत्रामध्ये असेच व्यावसायिक नियंत्रण आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. वैद्यक शिक्षण असेल किंवा व्यवसाय असेल, तर त्याबद्दल त्यांची मेडीकल कौन्सील त्यावरची अंतिम सत्ता आहे. एखादा डॉक्टर वा वैद्यक संस्था मर्यादांचे उल्लंघन करीत असेल, तर त्यांचा परवाना काढून घेण्याचे अधिकार त्या संस्थेला आहेत. वकीलक्षेत्रातही तेच आहे. जो कोणी सदस्य नसेल त्याला वकीली करता येत नाही आणि वकील म्हणुन त्याने मर्यादांचे उल्लंघन केले, तर संस्थाच त्याच्यावर कारवाई करते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तसे कोणते स्वयंनियंत्रण वा नियमन पत्रकारीता वा माध्यमांच्या क्षेत्रात आहे? आणि आज माध्यमांवर हुकूमत गाजवणार्‍यांपैकी कितीजण प्रत्यक्षात खरे पत्रकार आहेत? त्यांच्याकडे गुंतवायला किंवा खर्चायला पैसा आहे; म्हणून ते पत्रकार आहेत. त्यांचे नाव कायदेशीर रित्या छापले जात असते. म्हणूनच भांडवलदारांनी माध्यमे काबीज केली आहेत आणि मुठभर लाचार बुद्धीमंतांना हाताशी धरून मिरवण्य़ाच्या बदल्यात माध्यमांवर पैशाची हुकूमत प्रस्थापित केली आहे. सहाजिकच आज अविष्कार स्वातंत्र्य म्हणून जे कोणी ओरडा करत असतात, त्यांना खरेच स्वत: अनुभवता येणारे स्वातंत्र्य किती आहे? आणि असे मीच म्हणतो असे मानायचे कारण नाही. कायबीइन लोकमतवर नियमित दिसणारे ‘लोकमत’चे संपादक अनंत दिक्षित यांचेही तसेच मत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक खपाचा दावा करणार्‍या दैनिकाचा संपादक हे बोलतो, तेव्हा त्याचा स्वानुभव त्याला असे बोलायला भाग पाडतो, असे मानावेच लागते. ही जर मोठ्या मान्यवर संपादकाची अवस्था असेल, तर त्याला ‘दिक्षित सर’ संबोधणार्‍या निखिलच्या स्वातंत्र्याचा पट्टा कोणाच्या हाती आहे ते आपल्या लक्षात येऊ शकते. मग ज्यांना खरेच कुठले स्वातंत्र्य नाही आहे, किंवा ज्यांचे अविष्कार स्वातंत्र्य मालकाच्या पडवीमध्ये कुत्र्यासारखे गहाण पडले आहे, त्यांनी स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे?

   आता विचार करा मित्रांनो, ज्यांना स्वत:विषयी खरे बोलता येत नाही किंवा स्वत:च्या स्वातंत्र्याविषयी जे खोटे बोलतात, तेच पत्रकार व संपादक तुमच्या आमच्या सवालावर किती खरा आवाज उठवू शकणार आहेत? मीठाला जागणारी पत्रकारीता स्वतंत्र नसते. स्वयंभू नसते. अशी जर पत्रकारितेची दुर्दशा झालेली असेल, तर त्यांच्याकडुन खर्‍या बातम्या कशा दिल्या जाणार? त्यांच्या वागण्याची व लढण्याची दिशा मालकाच्या इशार्‍याप्रमाणे बदलू शकते. बाजारू अर्थव्यवस्था आपण स्विकारली आहे, त्याचे हे परिणाम आहेत. गरीब गृहिणीला अनुदान विरहित गॅसचा सिलिंडर कसा परवडणार; विचारणर्‍या संपादकाला त्याच्या वर्तमान पत्राच्या दहा वीस पानांची विक्री दोन रुपयात कशी जुळवली जाते, हे सांगता येईल काय? माध्यमाच्या उद्योगातून मोठमोठ्या उद्योगात गुंतवणूक करायला आजच्या माध्यम मालकांकडे इतके पैसे आले कुठून; त्याचा शोध कुठल्याच पत्रकारांना का घ्यावा असे वाटत नाही? ज्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने वर्षभर धमाल उडवली आहे, त्याची सौदेबाजी करण्याच्या भानगडीत पाचसहा मोठ मोठे पत्रकार गुंतल्याचे राडीया टेपमुळे चव्हाट्यावर आले होते ना? त्यांच्यावर कोणती कारवाई झाली? एक ‘आजतक’ वाहिनीचे प्रभू चावला बाजूला काढण्यात आले. पण हिंदुस्तान टाईम्सचा वीर संघवी किंवा एनडीटीव्ही या वाहिनीची बरखा दत्त बेशरमपणे गडकरींचा राजिनामा घेणार काय; म्हणून प्रश्न विचारते आहेच ना? ज्या व्यवसायात इतका निर्लज्जपण प्रतिष्ठीत झाला आहे, त्याच्याकडून कुठला भ्रष्टाचार मोडून काढायचे काम होऊ शकेल? आजची माध्यमे व त्यांच्यावर अवलंबून असलेले पत्रकार त्याच भ्रष्ट व्यवस्थेचे भागिदार झालेले आहेत. हे आता लपून राहिलेले नाही.

   आपण एकप्रकारच्या अराजकामध्ये जगत आहोत. त्यात अन्न व औषधे जेवढी भेसळ केलेली मिळतात किंवा इंधन व दूध जेवढे भेसळ केलेले आहे, तेवढाच बुद्धीवाद व पत्रकारिताही भेसळयुक्त झालेली आहे. खरे सांगायचे तर आजची माध्यमे चोरांना सोडणार्‍या वा पाठीशी घालणार्‍या पोलिसांसारखी झाली आहेत. पोलिस जसे चोर्‍या होतांना काणाडोळा करतात आणि चोर पकडला जाऊन लोकांकडून धोपटला जातो, तेव्हा त्याला वाचवायला पुढे सरसावतात, तसेच आजच्या माध्यमांचे काम चालते. मग कोणी कॉग्रेसच्या पापावर पांघरूण घालताना दिसेल किंवा कोणी भाजपाच्या भ्रष्टाचाराची झाकपाक करताना दिसेल. कोणी राहूलचे कौतुक करील कोणी सोनियांच्या महान त्यागाचे वर्णन करण्यात घसा कोरडा करताना दिसेल. मीठ कोणाचे यानुसार आजच्या माध्यमांचा सत्याचा आग्रह असतो व दिसतो. आणि त्यामुळेच भ्रष्टाचार इतका चौफ़ेर व चौखुर बोकाळला आहे. कारण आपल्याविरुद्ध राखण करणारा पत्रकारच शिल्लक नाही; याची चोरांना खात्री पटली आहे. आपण आज अराजकाच्या अवस्थेत जगतो आहोत. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी एकूण देशाची व समाजाची अवस्था आहे. ज्याच्यापाशी जेवढी सत्ता वा ताकद आहे, त्याने तेवढ्या प्रमाणात सभोवताली असलेल्यांना ओलिस ठेवावे, अशी स्थिती आहे. अगदी अशीच अवस्था दोनशे वर्षापुर्वी आपल्या देशात होती. मग पुढे काय झाले?     ( क्रमश:)
भाग   ( ६ )    ३१/१०/१२

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

अविष्कार स्वातंत्र्य, की बदमाशांचे राज्य?


   झी न्युजच्या संपादक व मालकांवर जिंदाल या उद्योगपतीने खटला भरल्यावर माध्यमांच्या क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे. कारण जिंदाल यांनी खटल्यावर न थांबता त्यांना भेटायला आलेल्या सुधीर चौधरी व समीर अहलुवालिया अशा दोन पत्रकारांशी झालेली बातचित व चित्रण; सीडी बनवून माध्यमांनाच सादर केले. त्यात काटछाट असल्याचा खुलासा झी न्युजने केला आहे. अगदी समजा जिंदालने दिलेली सीडी अर्धसत्य आहे. पण त्यात हे दोन्ही पत्रकार दिसतात ते तर खरे आहे ना? त्या दोघांनी नंतर खुलासा करताना झालेला संवाद नाकारलेला नाही. शंभर कोटी रुपये मागायला गेलेलो नव्हतो, तर जिंदाल कंपनीच बातम्या दडपण्यासाठी शंभर कोटी रुपयांची जाहिरात द्यायला निघाली होती; असा दोघा पत्रकारांचा दावा आहे. सवाल असा, की त्यांनी हा उद्योग कशाला करावा? त्यांच्या हाती पुरावे लागले होते; तर त्यांना जिंदाल यांच्या दलालांना भेटण्याचे कारणच काय होते? खोटे जाहिरात कंत्राट करून जिंदाल बातम्या दाबायला सांगतात, असे दाखवण्याची हौस कशाला होती? तसे असेल तर जिंदाल यांच्याकडे रितसर जाहिरात विभागाचा प्रतिनिधी पाठवता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. उलट आपल्याकडे जिंदाल कंपनीच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, त्याची चर्चा करायला हे दोघे तिकडे गेले होते. त्याची काय गरज होती? जिंदाल बातम्या दाबू बघतात, ही त्यांना बातमी करायची होती, की कोळसा घोटाळा उघड करायचा होता? बातमी आहे तशी द्यायची होती, की बातमी घडवायला हे दोघे तिकडे गेले होते? सरळ सांगायचे तर जाहिरातीचा विषय हा व्यवहाराचा भाग झाला. तो करणार्‍याला पत्रकार म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच हे दोघे पत्रकार बदमाशच म्हणायला हवेत. त्यांना पत्रकार म्हणून मुखवटा लावायची गरज नाही.

   पुर्वीच्या काळात सवयीचे गुन्हेगार असा एक प्रकार होता. म्हणजे काही जमातींना ब्रिटीश राजवटीने सवयीचे गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय किंवा पेशाच गुन्हेगारी मानला जायचा. आजकाल तसे राहिलेले नाही. पण नव्या परिस्थितीत काहीजण सवयीचे गुन्हेगार असल्यासारखे वागतात. त्यांना दाखलेबाज म्हणतात. झी न्युज- जिंदाल प्रकरणात संपादक सुधीर चौधरी हा तसा सवयीचा गुन्हेगार मानता येईल. काही वर्षापुर्वी हा इसम बहुधा लाईव्ह २४ नावाच्या वाहिनीचा संपादक होता. तेव्हाही त्या वाहिनीने दिल्लीतील एका नामवंत शाळेसंबंधाने छुप्या चित्रणाची बातमी प्रक्षेपित केली होती. त्या शाळेच्या प्राचार्या मुलींना गैरमार्गाला लावतात व वेश्या व्यवसायाला जुंपतात; अशी ती बातमी होती. त्यात बाकीचा काहीही तपशील नव्हता. त्यात एका मुलीची चेहरा झाकून मुलाखत दाखवण्यात आली होती आणि ती मुलगी तसे होत असल्याचे सांगते, असे दाखवले होते. तर दुसरीकडे त्या प्राचार्या महिलेची छुप्या कॅमेराने मुलाखत घेऊन त्यांना काही प्रश्न विचारलेले दाखवले होते. त्याचे प्रक्षेपण होताच खळबळ उडाली. ती बातमी बघून शेकडो पालक त्या शाळेत धावून गेले आणि त्यांनी दंगल केली. प्राचार्यांना वाचवण्यासाठी तिथे पोलिस बंदोबस्त उभा करावा लागला. पुढे त्या बातमीत किती तथ्य आहे; याची इतर वाहिन्यांवर चर्चा झाली, त्यात हाच इसम छातीठोकपणे बातमी खरी असल्याचा दावा करत होता. पण लौकरच त्याचे पितळ उघडे पडले. कारण ज्या मुलीने असे प्राचार्यांवर आरोप केले होते, ती चेहरा झाकलेली मुलगी, त्या शाळेची विद्यार्थिती नव्हती तर त्याच चॅनेलमध्ये बातमीदार असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थच सुधीर चौधरी हा इसम विश्वासार्ह नाही. अशा रितीने खोटे चित्रण, खोटे पुरावे व खोट्या वावड्या उडवून खळबळ माजवण्याची त्याची विकृत प्रवृत्ती जुनीच आहे. किंबहुना त्याला सवयीचा गुन्हेगार म्हणता येईल.

   हे ताजे प्रकरण चव्हाट्यावर आले आणि जिंदाल याने झी न्युजवर आरोप केलेला दिसला. सोबत सीडी दिल्याचे दाखवण्यात आले; तेव्हाच मला चौधरीच्या खोटेपणाची खात्री पटली होती. कारण आधी त्याचे हे जुने प्रकरण माझ्या लक्षात होते. पण कुठल्याही वाहिनीने ही जिंदालची सीडी दाखवताना किंवा त्यावर भाष्य करताना; सुधीर चौधरी याची गुन्हेगारी वृत्ती किंवा जुनी पार्श्वभूमी अजिबात सांगितली नाही. याचा अर्थ आपल्यातल्या एका बदमाशाला वाचवण्याचाच तमाम वाहिन्यांनी प्रयास केला. जो माणुस धडधडीत खोटे बोलून व दाखवून, एका सभ्य सुशिक्षित प्राचार्य महिलेच्या प्रतिष्ठेशी खेळू शकतो; तो किती बनेल गुन्हेगार असेल त्याची नुसती कल्पना केली तरी पुरे आहे. पण असा माणूस अजून त्याच क्षेत्रात आहे आणि एका वाहिनीचा संपादक म्हणुन काम करतो. त्याला उघडा पाडायलाही अन्य वाहिन्या तयार नसतील, तर त्या क्षेत्रात सगळेच तसे आहेत मानायला हरकत नसावी. बातम्या देण्यापेक्षा बदनामीच्या धमक्या देऊन लाभ उकळणे, ही पत्रकारिता आहे काय? नसेल तर चौधरी हा माणूस वाहिन्यांच्या संपादक संघटनेचा पदाधिकारी कसा होऊ शकला? आता त्याच्यावर आरोप झाल्यानंतर त्या संघटनेने त्याला हाकलून लावले आहे. इतक्या घाईगर्दीने त्याच्यावर संघटनेने कारवाई केली म्हणजेच त्याची पार्श्वभूमी त्यांना ठाऊक होती. मग मुळात त्याला सदस्यत्वच का देण्यात आले? आणि इतके झाल्यावरही उर्वरित वृत्तवाहिन्या त्याची अशी संशयास्पद पार्श्वभूमी का सांगत नाहीत? शुक्रवारी बहुतेक वाहिन्यांनी पत्रकारितेची विश्वासार्हता संपत चालली आहे काय, या विषयावर चर्चा घडवून आणल्या. पण त्यातही कोणी चौधरीने काही वर्षापुर्वी केलेल्या शाळाविषयक बदमाशीचा उल्लेखही केला नाही. जे लोक गडकरी यांच्या दहा पंधरा वर्षापुर्वीच्या व्यवहाराची कागदपत्रे शोधून काढतात व त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांचे पत्ते शोधून काढतात. रॉबर्ट वाड्रा यांच्या जुन्या नव्या व्यवहाराचे धागेदोरे शोधून काढू शकतात, त्यांना सुधीर चौधरी याच्या पापकर्माचा थांगपत्ता नसतो, यावर कोणी विश्वास ठेवायचा? ज्याअर्थी त्याला वाचवायचा वाहिन्यांनी आपल्या बातम्या व चर्चेतून प्रयत्न केला; त्याअर्थी असेच सर्वांचे व्यवहार चालतात असे मानायला वाव आहे.

   ह्याला कोणी आविष्कार स्वातंत्र्य म्हणत असेल तर त्याला रस्त्यात धरून लोकांनी बडवला तर तोही लोकांचा अविष्कारच म्हणायला हवा. कारण अविष्कार स्वातंत्र्य म्हणजे लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचे किंवा व्यत्यय आणण्याचे स्वातंत्र्य नाही. इतरांच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार कोणाला स्वातंत्र्य म्हणून मिळत असेल, तर अजमल कसाबलाही फ़ाशी देण्याचे काय कारण आहे? त्याने तरी कय वेगळे केले आहे? अधिकार हा जबाबदारी घेऊनच येत असतो. आपण प्रसिद्धी क्षेत्रात आहोत, तेव्हा कोणाविषयी काहीही छापताना त्यात सत्यता आहे, याचीही काळजी घ्यायला हवी. मनमानी करून चालणार नाही. बदनामी होत असेल तर त्याने कोर्टात जावे, असे पत्रकारांचे दावे ही शुद्ध दिशाभूल आहे. कारण त्यात बेजबाबदारपणा आहे. तुम्ही खोडी काढणार आणि तुमचा बंदोबस्त करण्यासाठी त्या पिडीताने आपला कामधंदा सोडुन तुमच्यासोबत कोर्टात फ़ेर्‍या मारायच्या काय? कशासाठी? तुमचे अविष्कार स्वातंत्र्य जपण्यासाठी त्याला शिक्षा कशाला? आणि अनेकदा त्यात पंधरावीस वर्षे खर्ची पडतात. मग कंटाळून खटला भरणारा चार ओळींच्या माफ़ीनाम्यावर तडजो्ड करतो. कारण खटल्यातून कित्येक वर्षे, अनेक दिवस वाया जातात, पण निष्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे पत्रकारिता ही बदनामीचा धंदा झालेला आहे. मग अनेक लोक कायदेशीर मार्ग पत्करण्यापेक्षा त्या सतावणा‍र्‍या समंधाला शांत करण्याकडे वळतात. त्यातूनच मग ब्लॅकमेलचे प्रकार वाढले आहेत. अनेक वर्षे राबून वा मेहनत करून कोणी समाजात प्रतिष्ठीत झालेला असतो. एका फ़सव्या बातमीने त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली जात असते. तेव्हा आपण बातमी देत नसून एका व्यक्तीच्या प्रतिष्ठा व आयुष्याशी खेळत आहोत, याचे भान पत्रकारांनी ठेवायचेच नाही काय?

   आठ महिन्यांपुर्वी शिवसेनेचे खासदार आनंद अडसुळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाणार असल्याची धडधडीत खोटी अफ़वा, महाराष्ट्र टाईम्सने प्रकाशित केली. मग त्यामुळे चिडलेल्या अडसुळ समर्थकांनी त्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. तर आपल्या चुकीची माफ़ी मागणे बाजूला राहिले. त्या पत्राच्या संपादकांपासुन पत्रकार संघटनांपर्यंत सर्वांनी हल्लेखोराचा निषेधच केला. याला बेशरमपणा नाहीतर काय म्हणायचे? त्यापेकी एकानेही महाराष्ट्र टाईम्सचा निषेध केला नव्हता. यालाच चोरावर शिरजोर असे म्हणतात ना? हे अशा मान्यवर वृत्तपत्रातून होत असेल तर गल्लीबोळातील किरकोळ वृत्तपत्रात काय चालले असेल, त्याचा नुसता अंदाज करावा. विश्वासार्हता त्यातूनच संपली आहे. म्हणुनच वृत्तपत्राच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही कोणी किंमत वाढवू शकत नाही. कारण त्यात वाचण्यासारखे काहीच उरलेले नाही. नुसत्या उखाळ्यापाखाळ्य़ा असेच वृत्तपत्रांचे व वाहिन्यांवरील बातम्यांचे स्वरूप झाले आहे. ज्याला अराजक म्हणतात अशी आजच्या पत्रकारिता व माध्यमांची अवस्था आहे. आणि हेच अर्धवटराव अण्णांची विश्वासार्हता संपली काय अशी चर्चा करतात.   ( क्रमश:)
भाग  ( ५ )  ३०/१०/१२

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

माध्यमांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे.
   सार्वजनिक जीवनातील पावित्र्य किंवा सच्चाई याचे आम्हीच काय ते रखवालदार आहोत, असा आव पत्रकार नेहमी आणत असतात. तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी वाहिनी बघत असाल तर, देश जानना चाहता है, अशी भाषा तिथे बोलणार्‍या पत्रकारांची असते. यांना कोणी देशाच्या वतीने जाब विचारायचा ठेका दिलेला आहे काय? अवघा महाराष्ट्र बघतो-ऐकतो आहे, अशी भाषा आपल्या मराठी‘ वाहिनीवरचे दिवटेही बोलत असतात. त्यांना देश किंवा महाराष्ट्राचा भूगोल तरी माहिती आहे काय, याचीच शंका येते. कारण अवघा देश वा महाराष्ट्र यांचे ऐकत असता किंवा यांना बघत असता, तर राजकीय नेते तशा पत्रकांरांना बघून भयभित झाले असते. पण हा सगळा देखावा व बनवाबनवी असते, हे सर्वांनाच ठाऊक झाले आहे. म्हणूनच कोणी त्या चर्चा किंवा भाषा गंभीरपणे घेत नाही. कारण असे दिवटे आपण पुर्वी काय बोललो वा आज काय बडबड करतोय, ते विसरले असले तरी सामान्य जानतेची स्मृती त्यांना वाटते तेवढी दुबळी अजिबात नसते. त्यामुळेच त्यांना नेते विचारत नाहीत, की जनता भीक घाललत नाही. आता हेच बघा ना, टाईम्स ऑफ़ इंडीयाने गडकरी यांच्या भानगडीचे घबाड शोधून काढले, हे चांगले काम केले. पण त्यावर मल्लीनाथी करण्याचे काही कारण होते का? जणू काही आपण महान स्वच्छ चारित्र्याचे संतमहंत आहोत; असा आव आणत टाईम्स वाहिनीचे नवे तरूण संपादक अर्णव गोस्वामी बकवास करीत असतात. आपण टाईम्समध्ये आलो, तेव्हाच ती संस्था सुरू झाली असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे. अन्यथा त्यांनी सदोदित कागद वा कागदपत्रांच्या झेरॉक्स फ़डकावत बकवास केली नसती. आपण कुठल्या उकिरड्याच्या ढिगावर बसलो आहोत त्याचा त्यांनाच थांगपत्ता नसावा.

   ज्या संस्थेकडून म्हणजे कंपनीकडून ती वाहिनी चालवली जाते, त्याच टाईम्स गटाच्या इंग्रजी वृत्तपत्राने गडकरी यांच्या कंपनीच्या भानगडी शोधल्या. त्यानंतर आता त्याच आधारावर सरकारच्या अंमलबजावणी खात्याने गडकरी यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार तपासण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा अर्थच सर्वकाही सिद्ध झाले आहे, अशा थाटात टाईम्सचे पत्रकार वावरत असतात. जणू अंमलबजावणी खात्याने तपास आरंभला म्हणजेच गुन्हा सिद्ध झाला, असा त्यांचा आवेश असतो. पण गडकरी आज जेवढे तक्रार करीत नाहीत तेवढे चौदा वर्षापुर्वी टाईम्सच त्याच खात्याच्या नावाने रडण्याची पत्रकारिता करत होता, हे टाईम्सचे लढवय्ये विसरलेले दिसतात. तेव्हा त्यांच्या आठवणी जागवणे अगत्याचे होऊन जाते. १९९७ सालात त्यांच्या कंपनीचे अध्यक्ष अशोककुमार जैन यांच्या विरोधात परकीय चलनाचे हवाला व्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्याच अंमलबजावणी खात्याने चौकशी सुरू केली होती. ते व्यवहार गडकरी यांच्यापेक्षा भयंकर होते. तेव्हा टाईम्सचे पत्रकार काय अश्रू ढाळत होते? नुसते जैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार म्हटल्यावर, अवघी टाईम्स वृत्तपत्रे त्याच खात्याला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत होती. फ़ेरा कायद्याखाली आपल्या मालकावर गुन्हा नोंदला गेला, तर न्यायालयात लढाई लढतानाच सगळे टाईम्स गटाचे पत्रकार बातम्यांमधूनही झुंजत होते. मालकाच्या पापकर्मासाठी पत्रकारांना लढाईत जुंपले, म्हणून दिल्लीच्या पत्रकार संघटनेने तक्रार केली होती. तेवढेच नाही न्यायालयातून तपासकामाची माहिती माध्यमांना देण्यास बंदी घालण्याची मागणी जैन यांच्या वतीने करण्यात आली होती. पण त्याचवेळी त्यांची वृत्तपत्रे मात्र त्याच अंमलबजावणी खात्याच्या विरोधात आरोपांची झोड उठवत होती. नुसते आरोपच नव्हे तर जैन यांना अटक करणार, म्हणजे मानवाधिकाराची पायमल्ली होत असल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता. तपासकामाच्या नावाखाली अंमलबजावणी खाते दहशत माजवते व अमानुष वागणूक देते, असेही बेछूट आरोप चालविले होते.

   जैन यांना ताब्यात घेण्यासाठी त्या खात्याला जंगजंग पछाडावे लागले होते. अगदी सुप्रिम कोर्टात जाऊनच अटकेची मागणी पुर्ण करण्याची वेळ आली होती. मात्र त्यावेळी तेच खाते महान भयंकर अत्याचारी असल्याचे रकनेच्या रकाने लिहून टाईम्सच्या प्रकाशनांमध्ये छापले जात होते. शेवटी काही वृत्तपत्रे व पत्रकारांच्या संघटनांसह मानवाधिकार संघटनांनाही टाईम्सच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली होती. नेहमी पोलिस व सरकारी अत्याचाराच्या विरुद्ध न्यायालयात संघर्ष करणार्‍या शांतीभूषण या ख्यातनाम वकीलांनी टाईम्सच्या बातम्या व लिखाणाविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला होता. कदाचित सरकारी खात्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे कोणी पहिल्यांदाच गेला असेल. ही टाईम्सची पत्रकारिता आहे. असो. त्यावर तरी त्यांनी ठाम रहायला हवे ना? त्यावेळी जशी तपास कारवाई त्या खात्याने हाती घेतली, तशीच आता गडकरी यांच्या विरोधात सुरू आहे. पण त्यावर निदान गडकरी यांनी अत्याचार झाल्याचा कांगावा तरी केलेला नाही. होईल त्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. आणि आपल्याच धन्यावर त्या खात्याने कारवाई केली तेव्हा गळा काढणारी टाईम्सची पत्रकारिता आज मात्र त्याच अंमलबजावणी खात्याने चालविलेल्या कारवाईच्या आधारे मल्लीनाथी करते आहे. केवढा विरोधाभास आहे ना? किती ढोंगबाजी आहे ना?

   भ्रष्टाचाराने समाजच पोखरलेला असेल तर कुठल्याही समाज घटकाने वा क्षेत्राने आपल्या पावित्र्याचा टेभा मिरवण्याचे कारण नसते. इथे सुद्धा तेच चालू आहे. ज्या भ्रष्ट व्यवहाराच्या क्षेत्रात माध्यमे व राजकारण गुंतले आहे, तिथेही भ्रष्टाचार केल्याशिवाय पान हलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यात गुंतलेलेच एकमेकांवर आरोप करत असतात; तेव्हा सामान्य माणूस त्याकडे करमणूक म्हणून बघत असतो. मजेची गोष्ट म्हणजे आजकाल माध्यमे ज्याचे भांडवल त्याच्या दारात बांधली गेलेली आहेत. ज्यांना बुद्धीवाद किंवा समाजप्रबोधन याच्याशी काडीमात्र कर्तव्य नसते, त्यांना सरकार व राजकारणावर दबाव टाकण्यासाठी अवजार म्हणुन माध्यमांचा वापर करायचा असतो. त्यानुसारच माध्यमे वागत असतात. मालकाच्या इशार्‍यावर भुंकत असतात आणि त्याच्या हितसंबंधांना जपण्याला बुद्धीवाद समजले जाते. म्हणून तर कोळसा घोटाळ्यात विजय दर्डा यांचे नाव समोर आले असताना त्यांना एकही सवाल करण्याची हिंमत नसलेला निखिल वागळे, पुर्ती प्रकरणत मात्र गडकरी यांना शंभर प्रश्न विचारत असतो. जग कोळसा घोटाळा शोधत असताना कायबीइन लोकमत सिंचन घोटाळ्याचे मुरणारे पाणी शोधायला जात असते. भुजबळ यांचा मुलगा, पुतण्या यांनी कुठे अश्वशाळा सुरू केली; त्यातले घोडे मोजायला कायबीइन लोकामतचे स्पेशल करस्पॉन्डन्ट जातात. पण कोळसा खाण वाटेत दिसली तरी तिकडे पाठ फ़िरवतात. अशी आजच्या माध्यमांची अवस्था आहे. आपल्या बुद्धीने व आपल्या मनाने त्यांना भुंकताही येत नाही. आणि तरीही अविष्कार स्वातंत्र्याचे ढोंग मात्र चालू असते.  

   जेव्हा पत्रकारितेचे चारित्र्य व पावित्र्य तेवढे शुद्ध होते तेव्हा कोणाची पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत होत नव्हती. पण आज सर्वात अधिक भ्रष्ट कुठला व्यवसाय झाला असेल, तर तो माध्यमांचा आहे. पत्रकार व्हायचे आणि खंडणीखोरी करायची असा उद्योग चालतो. मध्यंतरी पुण्यातल्या एका प्रमुख वृत्तपत्राच्या पत्रकाराला बिल्डरने आपल्या ऑफ़िसमध्येच मारहाण केल्याचे वृत्त आले होते. हा पत्रकार त्या ऑफ़िसमध्ये कशाला गेला होता? तर खुलासा घ्यायला गेला होता. ही पत्रकारिता कुठून आली? विरुद्ध बातमी दिली म्हणून मारहाण होते, हा काय प्रकार आहे? बातमी कोणाच्या विरुद्ध कशाला असते? बातमी बाजूने वा विरुद्ध असायचे कारणच काय? बातमी सत्य असेल तर ती कोणाच्या विरुद्ध असू शकत नाही. पण जेव्हा विरुद्ध बातमी दिली, असे म्हटले जाते तेव्हाच ती जाणिवपुर्वक हितांना बाधा आणणारी असते आणि तसे असेल तर मग ती बातमी नसते. बातमी सार्वजनिक हिताची असली पाहिजे. त्यात कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. सार्वजनिक हित आणि व्यक्तीगत हित यामध्ये संघर्ष येत असेल तरच ती बातमी वादग्रस्त असते. पण तसे नसेल तर कोणाच्या तरी हिताला बाधा आणणार्‍या माहितीचा बोभाटा करणे, ही मुळात पत्रकारिता नसतेच. त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. आणि नविन जिंदाल या कॉग्रेस खासदार व उद्योगपतीने तोच आरोप झी न्युज या वाहिनीवर केला आहे. तो गंभीर आहे आणि म्हणूनच वाहिनी संपादक संघटनेने झी न्युजचा संपादक सुधीर चौधरी याचे सदस्यत्व काढून घेतले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारिता व माध्यमे यांची विश्वासार्हता किती शिल्लक उरली आहे? ( क्रमश:)
 भाग ( ४ )  २९/१०/१२

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१२

भ्रष्टाचार जीवनावश्यक वस्तू बनला आहे


 आज जे आरोप भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होत आहेत, त्यापेक्षा किती कंपन्या किंवा नेत्यांचे व्यवहार भिन्न असतील. सवाल एकच आहे, की गडकरी किंवा रॉबर्ट वड्रा त्यात पकडले गेले आहेत. आणखी शेकडो नव्हे तर हजारो असे असतील, ज्यांची कागदपत्रे कोणी तपासायचे कष्ट घेतलेले नसतील. ज्या टाईम्स ओफ़ इंडीयाने आज अगदी खोलात जाऊन तपासणी केली आणि गडकरी यांचे बिंग फ़ोडले आहे, त्याच वृत्तपत्र वा माध्यम कंपनीचे सगळे व्यवहार तेवढेच चिखला्त रुतलेले नाहीत काय? काही वर्षापुर्वी त्याच कंपनीचे प्रमुख असलेले अशोककुमार जैन यांच्यावर असेच बालंट आलेले होते. फ़ेरा नावाच्या परकीय चलन विषयक कायद्यात त्यांचे शेपूट अडकले होते, तेव्हा त्याच कंपनीची वृत्तपत्रे किंवा टाईम्स कोणत्या भाषेत बोलत होता? सतत हातात भिंग घेऊन डोळे बारीक करून संघाच्या कुणा पदाधिकार्‍याच्या धोतराच्या निर्‍या मोजणारे (तेव्हाचे महाराष्ट्र टाईम्सचे संपादक आणि) आजचे ‘दिव्य मराठी’चे संपादक कुमार केतकर तेव्हा काय अश्रू ढाळत होते? आज कॉग्रेस वा भारतीय जनता पक्षाचे नेते जशा दाताच्या कण्य़ा करीत आहेत, तशाच भाषेत व शब्दात टाईम्सचे पत्रकार आपल्या मालकासाठी टाहो फ़ोडत होते. कायद्याच्या पलिकडे जाऊन अशोककुमार जैन यांच्या वयाचा हवाला देऊनही त्यांना अटक करणे कसे अमानुष आहे, त्यावर केतकरांनी मानवाधिकाराचे हवाले दिले होते. म्हणूनच आपण काही महान भ्रष्टाचार बाहेर काढला, असा आव कुणा वृत्तपत्र वा माध्यमातील लोकांनी आणायचे कारण नाही. अगदी त्याच् पठडीत भ्रष्टाचार मुक्तीचे निशाण खांद्यावर घेतलेल्या लोकांनी सुद्धा टेंभा मिरवण्याचे काही कारण नाही.

   गेल्या वर्षी अण्णांचे रामलिला मैदानावर जे दिर्घकालीन उपोषण झाले, त्यावेळी करोडो रुपयांच्य देणग्या गोळा केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर तो सगळा तपशील वेबसाईटवर टाकलेला आहे, कुठली लपवाछपवी नाही, असा दावा केजरिवाल यांनी केला होता. नंतर अण्णा व त्यांचे जमले नाही, तेव्हा त्यांनी अण्णांना दिडदोन कोटी रुपयांचा चेक दिल्याचे व अण्णांनी तो नाकारल्याचेही प्रसिद्ध झाले होते. त्याचे काय? इतके पैसे जमले कुठून? कोणाकडून? त्या रामलिला मैदानावर लाखभर लोक आले असे मान्य करू. तरी दोनतीन कोटी रुपयांच्या देणग्या जमल्या असतील, तर सरासरी प्रत्येकाने दोनतीनशे रुपये देणगी दिली म्हणायचे काय? त्यातला प्रत्येकजण इतके पैसे देणार नाही म्हटले तर किमान एक हजारापासून दोनचार लाख रुपयांपर्यंत देणग्या देणारे तिथे गोळा झाले असाच अर्थ निघतो. त्या देणग्या कुठल्या अधिकारात घेण्यात आल्या आणि कोणत्या खात्यात जमा करण्यात आल्या? त्यामध्ये कुठली अनियमितता झाली, असे अनेक प्रश्न तेव्हाही विचारले गेले होते. आंदोलनासाठी लोक जमतात, पण देणग्या इतक्या मोठ्या प्रमाणात जमतात, हे प्रथमच उजेडात आले होते. सवाल आहे तो त्या पैशाचा प्रवास कुठून कुठे व किती कायदेशीर होता? अर्थात त्याचे उत्तर साफ़ आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद आहे, ज्यांना हवी त्यांनी त्याची तपासणी करावी व चौकशी करावी. पण इथे एका प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. हे देणगीदार कोण होते? त्यांचा नावपत्ता काय? त्यांचे लागेबांधे कोणापर्यंत जाऊन पोहोचतात? कॉग्रेसचे कानफ़ाटे नेते दिग्विजय सिंग यांनी तेव्हाच हे प्रश्न विचारले होते. पण त्यांचे नावच इतके बदनाम आहे; की त्याकडे कोणी लक्षच द्यायला तयार नव्हते. पण आज गडकरी यांना जे प्रश्न विचारले जात आहेत, तेसुद्धा तसेच नाहीत का?

   गडकरी यांच्या पुर्ती कंपनीमध्ये अन्य काही संशयास्पद कंपन्यांनी पैसे गुंतवले आहेत आणि त्यांचा पता लागत नाहीत. त्यांची नोंदणी आहे, त्यांच्या संचालकांची नावेही उपलब्ध आहेत. पण ती माणसे जागेवर सापडत नाहीत किंवा सापडली तर त्यांना आपण अशा कुठल्या कंपनीशी संबंधित आहोत; याचाही थांगपत्ता नसतो. नेमकी अशीच परिस्थिती अनेक संस्थांच्या देणगीदारांची असते. गडकरी यांना अनामिकांनी पैसे गुंतवणूक म्हणून दिले आहेत आणि केजरिवाल यांच्या संस्थेच्या खात्यात जमा झालेले रामलिलाच्या काळातील पैसेही असेच अनामिक देणगीदारांचे आहेत. एकाने अनामिक देणगीदारांचे पैसे पावती देऊन घेतले, तर दुसर्‍याने शेअर देऊन त्यांचे पैसे गुंतवणूक म्हणुन घेतले. सर्वकाही कायद्याच्या व नियमांच्या मर्यादेत राहून केलेले आहे. आणि यांनीच कशाला? अनेक व्यवहार आजकाल असेच चालतात. सर्वांना सर्वकाही ठाऊक आहे, पण बोलायचे कोणी? मग होते कसे, की आपली सहानुभुती ज्याच्या बाजूने असते, त्याच्या बाजूने आपण युक्तीवाद करू लागतो. थोडक्यात आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा कारटा, अशी आपलीही वृत्ती असते. अगदी भ्रष्टाचार मुक्तीचा वसा घेतलेल्या व पारदर्शकतेचा ढोल वाजवणार्‍या केजरिवाल मंडळीचीही त्यातून सुतका नसते. म्हणुनच त्यांनीही आपल्या सहकार्‍यांना कागदपत्रे घेऊन पत्रकारांसमोर ‘पारदर्शक’ व्हा, असा आदेश दिला नाही. तर चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमण्याची पळवाट शोधली. कारण भ्रष्टाचार ज्याला म्हणतात, तो आता भारतीय समाजाच्या हाडीमाशी खिळला आहे. दुसर्‍याने केला तर तो भ्रष्टाचार असतो आणि आपण केला तर तो व्यवहार असतो. नुसता व्यवहार नसतो तर नियमानुसार केलेला सदाचार असतो.

   आणि आपण असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यातून माझी म्हणजे भाऊ तोरसेकरचीही सुटका होत नाही. कारण ज्या प्रकारचे नियम व कायदे आज अस्तित्वात आहेत, त्यातून जगणे म्हणजे निव्वळ घुसमट होऊन जाते, नियम मोडून वा धाब्यावर बसवल्याखेरीज तुम्हाला जगणेच अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही जगतो आहोत व जीवंत आहोत, हाच आपण भ्रष्टाचारी असल्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. कारण नियमानुसार जगणे आजच्या स्थितीत अशक्य करून टाकलेले आहे. भ्रष्टाचार ही अशी गोष्ट झालेली आहे, की त्यालाच आजची सर्वात मोठी जिवनावश्यक वस्तू म्हणायची वेळ आलेली आहे. मग एकेदिवशी बाबा आमटेंचे पुत्र प्रकाश आमटे यांना पुण्याचा एक उद्योगपती करोडो रुपये चेकने देतो आणि तेही घेतात. करणार काय? त्यांनी समाजसेवेचा संसार थाटला आहे. त्यासाठी पैसे लागतात. मग ते कुठून आले, त्याच्याशी त्यांना कर्तव्य दाखवून चालत नाही. ज्या उद्योगपतीबद्दल पुण्यात व राजकीय वर्तुळात अनेक वदंता आहेत, त्याच्याकडून सत्कार्य करण्यासाठी पैसे घ्यायची वेळ या देशात आली असेल, तर इतर व्यवहारी व संसारी लोकांची काय कथा?

   आमटे यांच्या आश्रमात शेकडो गरजू लोक आहेत. पण त्यांना एकच कुटुंब ठरवून गॅ्सचा पुरवठा होतो. दिवसात त्यांना दोनतीन सिलिंडर लागत असतील. मग नियमानुसार त्यांनी काय करायचे? सहा सिलिंडरचा कोटा दोनच दिवसात संपला, मग पुढल्या सिलिंडरसाठी लागणारे अधिकचे पैसे कुठून आणायचे? नियम खुप महान व पवित्र असते तर प्रकाश आमटे यांच्यावर ही पाळी आली असती का? ज्यांना केवळ रुग्णसेवा करायची आहे, त्यांची अशी अवस्था असेल तर ज्यांना स्वार्थ नाही तरी आपले हित करून घ्यायचे आहे. त्यांना नियमानुसार जगणे शक्य आहे काय? नियम आणि कायद्यानी महत्ता कितीही असली तरी त्यांच्या व्याख्येत सगळ्याच गोष्टी बसवता येत नाहीत. म्हणूनच नियम तोडला वा त्याला बगल दिली, म्हणजे गुन्हा झाला किंवा भ्रष्टाचार झाला; असे मानणे हाच मुर्खपणा आहे. त्यामुळे मग कायदे खुप आहेत आणि त्यातल्या एकाही कायद्यानुसार जीवन सुखकर सोडा, सुकर होत नाही अशी पाळी आलेली आहे. त्यातुन मग कायदे मोडणे व भ्रष्टाचार अपरिहार्य होत गेला आहे. किंबहूना कायद्याचे राज्य म्हणजे एक कर्मकांड होऊन बसले आहे. मग कायद्याला बगल देण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी कुशल माणूस हाताशी धरावा लागतो. आपोआपच भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊन गेला आहे. मग भ्रष्टाचाराने माखलेले लोकच आपल्याला शिष्टाचाराचे धडे देत असतात. राजरोस हा बेशरमपणा चालू असतो.

   गडकरी किंवा वड्रा यांना कुठून इतके पैसे किंवा भांडवल मिळाले, कोणी त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, यावर मोठ्य़ाच चर्चा चालू आहेत. वाहिन्यांवर त्या चर्चा रोजच रंगत असतात. त्या वाहिन्यांचे जाळे उभे करायला लागणारी गुंतवणूक म्हणजे भांडवल कुठून आले, त्याची चर्चा कोणी कधी केली आहे काय? अवघ्या दहा पंधरा वर्षात हजारो वहिन्यांचे जाळे भारतभर पसरले. त्यामध्ये जी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, त्यातही वड्रा वा गडकरी यांच्याच कंपन्यामध्ये आले, तसेच पैसे आलेले आहेत. ज्याला आज एफ़डीआय म्हणजे परकीय थेट गुंतवणूक असे म्हटले जाते, ती करणार्‍या बहुतांश कंपन्या मॉरिशस या इवल्या देशातल्या आहेत. त्या बोटभर देशामध्ये इतका पैसा आला कुठून? तो सगळा पैसा त्या कंपन्या भारतातच का गुंतवत आहेत? त्याचे धागेदोरे शोधावे असे कोणालाच का वाटले नाही? असे शेकडो प्रश्न आहेत. पण विचारायचे कोणी आणि उत्तरे तरी कोण देणार? आरोप करणारे गडकरी आणि उत्तर देणरेही गडकरीच असल्यावर तुमचीआमची फ़सगतच व्हायचीच ना? सगळा चोर शिपायाचा खेळ आहे.     ( क्रमश:)

भाग   ( ३ )      २८/१०/१२


शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

बड़े नासमझ हो, ये क्या चाहते हो


  यश चोप्राच्या आकस्मिक निधनामुळे वाहिन्यांवर सुतक सुरू झाले आणि त्यांच्या जुन्या नव्या चित्रपटांचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे मला प्रथमच कळले, की माझ्या शाळकरी जीवनात भिंतीवर जी पोस्टर्स बघितली होती, त्यातल्या ‘धुल का फ़ुल’ चित्रपटाचा दिग्दर्शक यश चोप्रा होते. तोच त्यांचा पहिला चित्रपट होता. अर्थात तो जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मला बघता आलेला नव्हता. कारण तेव्हा माझे वय अवघे दहा वर्षाचे होते आणि कुठल्याही कुटुंबात हिंदी चित्रपट आजच्यासारखे बघितले जात नव्हते. आमच्या वयातल्या छोट्या पोरांना तर चित्रपट सोडा सिनेमाघर हीच मोठी अजब गोष्ट वाटायची. म्हणजे आमच्यातल्या कोणाला तशी संधी मिळाली, तर काळोखात बघितल्या जाणार्‍या चित्रपटाबद्दल गॉसिप चालायचे. त्यामुळे बहुतेकांची भूक भिंतिवरच्या पोस्टर्सवर भागवली जायची; नाहीतर कुठे रेडिओवर चित्रपट गीते वाजायची त्यावर भागायची. रेडिओ तरी कुठे प्रत्येक घरात होते? सहाजिकच कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाऊड स्पिकर आसपास वाजवला गेला, मग आम्हा पोरांसाठी पर्वणी असायची. शिवाय तेवढे हिंदी कळत नव्हते, मग त्या चित्रपटगीतात आलेल्या उर्दू-फ़ारसी शब्दांचे अर्थही कळत नव्हते. पण तरूणांच्या वा मोठ्यांच्या गप्पातून जेवढे कळायचे, त्यावर आम्ही समाधानी असायचो. पुढे कॉलेजला गेल्यावर आठ वर्षांनी मॅटीनी शो म्हणून तो चित्रपट बघितला होता. राजेंद्रकुमार आणि माला सिन्हाचा. निर्माता दिग्दर्शक कळण्याची अक्कल तेव्हा आलेली नव्हती. पण त्यातले एक गाणे खुप आवडले होते. ‘तेरे प्यारका आसरा चाहता हू’. त्यातले काव्य खुप नंतर कळले. आणि पुढे ते माझ्या आवडत्या चित्रगीतामध्ये जाऊन बसले. परवा यश चोप्राच्या निधनापर्यंत त्यांच्या चित्रपटातले गीत आहे, याचा मात्र थांगपत्ता नव्हता.

   नेहमीच्या दगदगीत आपण आपल्या अनेक आवडत्या गोष्टी विसरून गेलेले असतो. मग अचानक त्यापैकी काही आठवले तर जुना मित्र किंवा बालमित्र भेटल्याचा आनंद अनुभवायला मिळतो तसे माझे झाले. वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये यश चोप्राचे सुतक सुरू झाले आणि त्यात हे माझे आवडते गाणे वाजले. चोप्रांचे सुतक म्हणून जी गाणी वाजवली जात होती, त्याच्या एकदोन ओळी वाजवून बदलत होती. पण ‘तेरे प्यारका’ वाजल्याने मी कमालीचा विचलित होऊन गेलो आणि त्यातले शब्द आठवत राहिलो. सगळे शब्द आठवेनात तसा अधिकच बेचैन झालो. पण आता मी शाळकरी पोर नव्हतो की १९६० च्या दशकात नव्हतो. त्यामुळेच चटकन इंटरनेट लावले आणि शोधाशोध सुरू केली आणि युट्यूबवर सगळे गाणेच बघायला आणि ऐकायला मिळाले. दोनतीन वेळा सलग ऐकून चैन केली. पण जेवढा वेळ ते वाजवले तेवढ्यावेळी त्यातले अनेक धागेदोरे उलगडत गेले. त्यातले शब्द आणि शब्दरचना यातल्या अर्थाने समोरची चित्रेच पुसून टाकली. तिसर्‍यांदा ऐकताना मी चक्क डोळे मिटले होते आणि फ़क्त शब्दसुर ऐकत होतो. आणि मनातल्या मनात भलतेच चित्र दिसू लागले. गाणे, सुर आणि कथा बाजूला पडली आणि आजचे वास्तव समोर उभे राहिले. साहिरने त्या गाण्यातून केवढे मोठे सामाजिक व मानवी संबंधांचे वास्तव मांडले आहे, त्याचे रहस्य सोपेसरळ होऊन उलगडत गेले.  प्रामुख्याने हे शब्द बघा-

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ
   हसीनो से अहद-ए-वफ़ा चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
   कि तुम हुस्न को पूजना चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
   उन्हीं से मुझे माँगना चाहते हो
  बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
   रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

   माझ्या डोळ्यासमोरून नायक नायिका अदृष्य़ झाले आणि आजचे सामाजिक राजकीय वास्तव उभे राहिले. गेले वर्षभर जे आंदोलन आपल्या देशात चालू आहे त्याचे वास्तव. अण्णा हजारे, केजरिवाल आणि अन्य जे कोणी इथे भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती करायला कटीबद्ध झाले आहेत, त्यात मला प्रेमाची आर्जवे करणारा नायक दिसत होता आणि त्याला लाजत समजावणारी प्रेयसीच्या रुपातली भारतीय जनता दिसत होती. बस्स प्रेमात पडलेला प्रेमवीर असतो त्याच्यासाठी जग जिंकणे सोपे असते. पण त्यासाठी त्याला त्याच्या प्रेयसीच्या मदतीची, सहकार्याची गरज असते. आणि म्हणूनच तो तिची आर्जवे करत असतो, ती त्याला सावध करू इच्छित असते. धोके दाखवत असते. पण त्याला कशाचीच पर्वा नसते. एका जागी तो नायक तिला म्हणतो सुद्धा ‘कि  मै मौतसे खेलना चाहता हू’. पण त्याच्या प्रेमात पडूनही प्रेयसी किती सावध असते? अगदी जशी भारतीय जनता आहे तशीच ना? वर दिलेल्या एक एक शब्दाची रचना व त्यातून सुचित होणारा गर्भित अर्थ बघा.

   प्रेमात पडण्यापुर्वी विचार कर, इथे मिळण्याच्या आधी गमवावे लागते. आणि प्रेमाची पुजा करायची तर समाजाची परवानगीही घ्यावी लागते. प्रेमाच्या जागी सत्याचा आग्रह आणि सत्याचरण असा बदल करून बघा. किती अर्थ बदलतो ना? सत्य ही बोलाची कढी असते. सत्याचे आचरण सुळावरची पोळी असते. सत्याच्या आहारी जाऊन व्यवहार होत नाहीत. प्रेमही सोपे असते. पण त्यानंतरचा संसार अवघड असतो. मोहब्बतच्या जागी पुन्हा सत्य वा सदाचरण टाकून बघा. बोलायला सगळे सोपे आहे; पण कोणाला सदाचार परवडतो व्यवहारात? अवघे जगच त्याचा शत्रु असते. त्या सदाचाराच्या नशीबी कायम वनवासच असतो. आणि ज्याना त्या आपल्या सदाचारी अंतरात्म्याचा आवाजच ऐकू येत नाही, त्यांच्याकडून त्याची अपेक्षा बाळगता येईल का? बोलायला सगळी वचने आणि आश्वासने सोपी आहेत, पण अंमलात आणायला अशक्य आहेत, म्हणूनच चुकीची आहेत. कारण इथे सर्वकाही नियमानुसार, रुढी-परंपरेनुसारच चालते. नियम तोडायला पुढे जायचे काय? कायदे झुगारायचे काय? कोण खपवून घेईन नियमभंग?

   ‘यहॉ जिंदगी है रिवाजो के बसमे’ आपण ज्या जगात आणि समाजात जगतो त्याचे रिवाज असतात. त्यांना झुगारून पुढे जाता येत नाहीत आणि गेलात तर त्याचे परिणाम भोगायची तयारी असावी लागते. कायदे असतात, नियम असतात, आणि त्यांना वळवणारे, वाकावणारे, गुंडाळून ठेवणारे रिवाज सुद्धा असतात. तिथेच सगळ्या गोष्टी येऊन फ़सतात. तिथेच येऊन सगळे घोडे अडतात. कायदे आणि नियम तुम्हाआम्हा सामान्य माणसासाठी असतात. त्यांचा अंमल समाजावर हुकूमत गाजवणार्‍यांवर चालत नाही. सर्व नियम व कायदे त्या रिवाजापुढे शरणागत होतात. कधी त्याचे नाव रॉबर्ट वड्रा असते तर कधी त्याचे नाव शरद पवार असू शकते. कधी त्याचे नाव गडकरी असू शकेल तर कधी त्या रिवाजाचे नाव आदर्श सोसायटी असू शकते. त्या रिवाजापुढे कितीही समर्थ सत्ता व कायदे शरणागत होतात आणि तेच रिवाज सामान्य माणुस समोर आला, मग अत्यंत उर्मट व मुजोर असतात. त्यांना भेदण्याची वा झुगारण्याची कल्पनाच भयंकर असते. कारण जो त्यासाठी फ़ुस लावत असतो तो नामानिराळा झाला तर आपले काय, अशी चिंता त्या प्रेयसीला सतावत असते. त्या चित्रपटातही एका मोहाच्या क्षणी ती प्रेयसी वहावत जाते आणि तो प्रियकर नामानिराळा होऊन तिला संकटात सोडून जातो. आज भ्रष्टाचार मुक्तीच्या प्रेमात पडलेली सामान्य जनता रस्त्यावर का येत नाही? अन्याय अत्याचाराने गांजलेला सामान्य माणूस आपली सदिच्छा अण्णांच्या मागे असल्याचे सांगतो, पण तो घराबाहेर पडून त्या आंदोलनात सहाभागी का होत नाही? पुढल्या अनाकलनिय व अनिश्चित भवितव्याने त्याला भयभीत केलेले असते. तो साहिर, तो यश चोप्रा, यांनी केवढे सत्य सांगून ठेवले आहे मोजक्या शब्दात. आपण कधी डोळसपणे त्याकडे बघू तरी शकलो आहोत का?    ( क्रमश:)
भाग ( २ ) २७/१०/१२

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

निधनाची बातमी कधी सुखद नसते, पण....


  कुठलाही मृत्यू ही चांगली बातमी म्हणता येत नाही. पण या आठवड्याच्या आरंभीच चित्रपट निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनाची बातमी अनेकांना दिलासा देणारी वाटली असेल. कारण तत्पुर्वी सातत्याने इतक्या घोटाळ्याच्या बातम्यांचे काहूर माजले होते आणि उलटसुलट बातम्यांचा गदारोळ चालला होता; की काय खरे आणि कशावर विश्वास ठेवायचा अशी लोकांची सैरभैर अवस्था होऊन गेली होती. आधी सोनिया गांधींचा जावई रॉबर्ट वड्रा याच्या लफ़ड्याचा पाढा वाचला गेला आणि त्याचे तपशील लोकांच्या पचनी पडत नाहीत; इतक्यात कायदामंत्री सलमान खुर्शिद यांच्या पत्नीने सरकारी अनुदानात अफ़रातफ़र केल्याचे प्रकरण गाजू लागले. त्याचा तपशील समजून घेतला जात नाही, इतक्यात अण्णांचे विभक्त सहकारी केजरिवाल यांनी भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर नवे आरोप करून धमाल उडवून दिली. थोडक्यात भ्रष्टाचाराच्या बातम्यांचे अजीर्ण व्हायची पाळी वाचणार्‍यावर व वाहिन्या बघणार्‍यांवर आली. दुसरीकडे बातम्या देणारे व त्यावर भाष्य करणारे, यांचीही तारांबळ उडाली होती. कारण गडकरी यांच्यावर खळबळजनक आरोप करणार्‍या केजरिवाल यांच्या आरोपच नव्हे; तर पुराव्यांची गडकरी यांनी समोर येऊन भंबेरी उडवून दिली. कारण गडकरी यांच्या खुलाश्याने केजरिवाल यांच्या लढवय्या सहकारी अंजली दमाणियांना तोंड लपवायची पाळी आणली. त्यांचे आरोप सिद्ध झालेच नाहीत. पण त्यांचा एकूणच लढाऊ आवेश शंकास्पद ठरला. सहाजिकच त्य फ़ुसक्या आरोपांनी एकूणच केजरिवाल यांच्या लढाईबद्दल शंका निर्माण केल्या. त्याचे कारण आरोपाचा इन्कार झाला इतकेच नव्हते.

   गडकरी यांच्यावर आरोप झाल्यावर भाजपाचे सगळे नेते त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले होते. जसे वड्रा यांच्याबाबतीत कॉग्रेसचे सगळे दिग्गज पुढे आले, तसेच गडकरी समर्थनासाठी भाजपावाल्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले. अर्थात त्यांना फ़ारशी मेहनत घ्यावी लागली नाही. कारण केजरिवाल व दमाणियांचे आरोपच फ़ुसके होते. किंबहुना दमाणियांचे सगळे व्यवहार व वागणेच संशयास्पद असल्याने भाजपाला आपल्या चारित्र्याचे दाखले देण्यात कुठली अडचण आली नाही. तेवढेच नव्हते. केजरिवाल यांच्यावर त्यांच्याच जुन्या सहकार्‍यांकडून आरोप झाले, मुंबईतला आदर्श घोटाळा बाहेर काढणारे व सिंचन घोटाळ्याची लढाई लढणारे माजी पोलिस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी गडकरींवरील आरोपांचे समर्थन न करता, केजरिवाल लोकांची फ़सवणूक करीत असल्याचा आरोप करून धमाल उडवून दिली. सहाजिकच भाजपाचे काम खुपच सोपे होऊन गेले. फ़ार कशाला ज्यांनी गडकरी यांच्यावरील आरोपांचा राजकीय लाभ घ्यायला पुढे यावे; त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानेही गडकरी यांची पालखी उचलून धरली. सहाजिकच शिकारीला निघालेले केजरिवालच शिकार होऊन गेले. पण दुसरीकडे त्यांचे आधीचे आरोपही निकामी होऊन गेले. सोपे करून सांगायचे तर केजरिवाल यांचा गेल्या आठवड्याअखेर खैरनार होऊन गेला. आणि दुसरीकडे लोकांचा एकूणच आरोपबाजीवरचा विश्वास डळमळित होऊन गेला. मागल्या रविवारी ‘पुण्यनगरी’च्या प्रवाह पुरवणीत लेख लिहिताना मी म्हटलेच होते, ‘दमाणिया दमानी घ्या’.

   गडकरी यांच्यावर आरोप करायला हरकत नव्हती. पण राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षावर आरोप करताना, आपले आरोप खोटे पडू नयेत याची पुरेशी काळजी घ्यायला हवी होती. गडकरी हे सेना-भाजपा युतीची सत्ता असताना महत्वाचे मंत्री होते. त्यानंतरच त्यांचे वैभव वाढलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कपाटात अनेक भानगडी लपलेल्या असू शकतात. त्याचा कसून शोध घेतला तर नक्कीच एखादे घबाड मिळू शकले असते. पण तसे न करता केजरिवाल यांनी अविश्वसनिय अशा दमाणियाबाईंच्या कागदपत्रांना अनाठायी महत्व दिले. त्यांची सर्व कागदपत्रे केजरिवाल यांनी वा़चली सुद्धा नसावित. अन्यथा त्यात गडकरी अडकण्यापेक्षा आपणच तोंडघशी पडू; हे त्यांच्याही लक्षात आलेच असते. पण त्यांनी उतावळेपणा केला. मात्र त्यांच्याइतका उतावळेपणा टाईम्स ऑफ़ इंडीया नावाच्या इंग्रजी दैनिकाने केला नाही. म्हणूनच आज गडकरी यांना तोंड लपवण्याची पाळी आली आहे. म्हणजेच माझा केजरिवाल यांच्यावरचा गडकरी प्रकरणातला आक्षेप ‘टाईम्स’ने खरा ठरवला. गडकरीनी छातीठोकपणे ज्या कंपनी व्यवहाराचे माध्यमांसमोर येऊन गुणगान केले होते, त्याचा पाठपुरावा करून गडकरी यांचे पितळ उघडे पाडले आहे. मात्र त्याच वेळी केजरिवाल व दमाणियांचे आरोपही निराधार ठरले आहेत. मग सवाल असा उरतो, की केजरिवाल यांची विश्वासार्हता किती? त्यांच्या सहकार्‍यांची विश्वासार्हता काय? त्यांना खरोखरच भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी करून समाजजीवन स्वच्छ करायचे आहे, की नुसतीच सनसनाटी माजवून प्रसिद्धीच्या झोतात रहायचे आहे?

   इथे एक मुद्दा विसरता कामा नये. गडकरी यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यावर केजरिवाल यांना त्याचे पुरावे देता आलेले नव्हते. उलट भाजपा आणि गडकरी यांच्याकडून खुलासे झाल्यावर केजरिवाल यांनाच आपल्या सहकार्‍यांवर उलट झालेल्या आरोपांची चौकशी करतो; असे घोषित करावे लागले होते. टाईम्सने गडकरी प्रकरणाचा पाठपुरावा योग्य दिशेने केला नसता, तर गडकरींना स्वच्छ ठरवण्य़ास केजरिवाल यांचे आरोप कारणीभूत झाले असते. आणि म्हणूनच अण्णांपासून दुर होऊन राजकीय आखड्यात उतरलेल्या केजरिवाल यांच्या टोळीची उलट तपासणी अगत्याची झाली आहे. त्यांचे हेतू, उद्दीष्ट, मार्ग व साधने यांच्या संबंधाने शंकासमाधान होण्याची गरज आहे. विभक्त होण्यापुर्वी अण्णा हजारे यांनी केजरिवाल यांना काही प्रश्न केले होते, असे नंतर अण्णांनीच सांगितले आहे व त्याची उत्तरे केजरिवाल देऊ शकले नाहीत असा अण्णांचाच दावा आहे. त्यातला एक प्रश्न असा होता, की तुमच्या राजकीय पक्ष वा संघटनेत कोणी भ्रष्ट वा गैरमार्गाने कृत्ये करणारा नसेलच, याची हमी काय? त्याचे उत्तर केजरिवाल देऊ शकले नव्हते. आणि दमाणियांना सोबत घेऊन केजरिवाल यांनी अण्णांची शंका खरी केली आहे. सोबत येतील त्यांना घेऊन संघटना व पक्षाची उभारणी होऊ शकेल. पण ज्या पावित्र्य व चारित्र्याचे दावे केले जात आहेत आणि अन्य राजकारण्यांकडे तशी मागणी केली जात आहे; त्याची हमी खुद्द केजरिवाल यांच्याच गोतावळ्याला देता आलेली नाही. त्यातून चौकशी व्हावी ही पळवाट योग्य नाही. कारण दमाणिया वा प्रशांत भुषण व मयांक गांधी यांची चौकशीला तयारी आहे, असे केजरिवाल सांगतात. पण तशी तयारी बाकीच्या राजकीय नेत्यांनी कधी दाखवलेली नाही? मग केजरिवाल यांनी आरोप केलेले नेते आणि खुद्द केजरिवाल यांचे सहकारी, यांच्यात फ़रक तो काय उरला?

   गेल्या आठवड्याने केजरिवाल यांच्या एकूण कार्यपद्धती व वाटचालीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. केजरिवाल आणि अण्णा हजारे, आपले मार्ग भिन्न असले तरी मंझिल एकच असल्याचे सांगतात. पण ज्याप्रकारे दमाणिया प्रकरण समोर आले आहे, त्यानंतर केजरिवाल यांची दिशा शंकास्पद झाली आहे. कारण गडकरी यांच्यावर त्यांनी अत्यंत बिनबुडाचे आरोप केले आणि प्रत्यक्षात दमाणीयांचेच व्यवहार संशयास्पद निघाले आहेत. त्या आरोपाच्या पलिकडे जाऊन टाईम्सने भानगड उकरून काढली नसती तर? की केजरिवाल राजकीय सुडबुद्धीच्या लोकांना हाताशी धरुन हा उद्योग करीत आहेत? त्यांच्या सहकार्‍यांपैकी दोघांनी मुंबईत पत्रकारांशी बातचित करतांना स्वत:च्या व्यवहाराची कागदपत्रे समोर न मांडण्याचा अट्टाहास का धरावा? आपल्याला मीडिया ट्रायल नको असा त्यांचा दावा होता. मग ते स्वत: काय करत असतात? दुसर्‍यांची कागदपत्रे दाखवून माध्यमात खटले चालवायचे आणि आपल्याला तो जाच नको म्हणायचे; ही शुद्ध लफ़ंगेगिरी नाही काय? आणि हा सगळा सावळागोंधळ चालू असताना, यश चोप्रा यांचे निधन झाले. त्यांच्याकडे वाहिन्यांचा फ़ोकस वळला आणि माझ्या खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माझे एक अत्यंत आवडते गाणे यश चोप्रांच्या चित्रपटातले आहे, हे मला प्रथमच कळले. किंबहुना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातले ते गीत असल्याचा शोध लागला. त्याचा जेवढा आनंद होता, त्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीचे नेमके विश्लेषण त्याच काव्यात असावे याचाही आनंद अधिक होता. त्या दुहेरी आनंदाने माझा यशजींबद्दलचा आदर द्विगुणित केला. गेले काही महिने ज्यावर इतका उहापोह चालू आहे व गदारोळ माजला आहे आणि एकाहुन एक महान अभ्यासक विवेचन करीत आहेत; त्याच परिस्थितीचे मोजक्या शब्दात एका मनस्वी कविने केलेले विश्लेषण, त्या गाण्यामधुन झालेले आहे? कुठला तो चित्रपट आणि कुठले ते गीत?    ( क्रमश:)
भाग  ( १ ) २६/१०/१२

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

धर्माच्या नावाने वितंडवाद मला नकोत


   ‘तुमच्यासारख्या अनेक ब्राम्हणवादी लेखकांचा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे भाषा होय. सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात वाईट लोक असतांना त्यांचे खंडन, निषेध हे त्या त्या सर्वच समाजातील लोक करत असतात. फरक एवढाच कि उत्तर भारतीय मुस्लीम हे उर्दू भाषेत निषेध करत असतात, तर इतर ब्राम्हणवादी लेखक हे प्रादेशिक भाषेत निषेध नोंदवत असतात. उत्तर भारतीय मुस्लिमांनी प्रादेशिक भाषा न स्वीकारण्याचा हा परिणाम असू शकतो. म्हणून उर्दू भाषिक मुस्लीम समाज धुरिणांना मराठीत समजाऊन सांगण्याचा लेखकांचा प्रयत्न कुचकामी ठरतो. लेखकांनी उर्दू भाषेत भाषांतर करून उलट तपासणी केली तर आम्ही आभारी राहू. कारण चार- दोन उदारवादी मराठी मुस्लीम लेखकांना फार जास्त समजाऊन सांगण्याची गरजच नाही. म्हणून नुसत्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उलट तपासणी मराठीत करत असल्याचा आरोप करण्यासाठी उगीच लोकांना जागा देऊ नका. आझाद मैदानाबाहेर अनेक मुस्लीम लोक हे दंगलखोर 'राजकीय भाडोत्री गुंडांना' रोखण्याचे प्रयत्न करत असतांनाच्या चित्रफिती फेसबुकवर उपलब्ध आहेत. कोंबड्या झुंजावणर्‍या मिडीयाने ते जाणीवपूर्वक लपवले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्राम्हणवादी (ब्राम्हण नव्हे) समाजात नगण्य अतिरेकी आहेत, हा गैरसमज कृपया दूर करावा. संसदेत चक्क गृहमंत्रालयाने सादर केलेल्या भारतात सक्रीय अतिरेकी टोळ्यांच्या यादीतील १७५ पैकी ११२ टोळ्या मुस्लिमेतर असल्याचे निष्पन्न झाले आहे. विस्तारभयास्तव त्यांची यादी इथे देणे शक्य नाही. जागतिक पातळीवर देखील सर्वात जास्त अतिरेकी टोळ्या मुस्लीमेतारांच्याच आहेत, पण 'अतिरेकी' या शब्दाचा अर्थ अनेक देशात बदलत जातो. आपल्या देशातल्या स्वतःला 'राष्ट्रीय स्वयंसेवक' म्हणवून घेणार्‍या अनेक टोळ्या या विदेशात अतिरेकी ठरत असतात. त्याच टोळ्या त्या देशात सत्तेवर आल्यावर क्रांतिकारी ठरवल्या जातात. नेपालमधील माओवादी, पेलेस्टीनच्या अल फतेह, हमास, इजिप्तची मुस्लीम ब्रदरहूड यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल आता अमेरिकादेखील अभिनंदन करत असते. रशियाविरुद्ध लढणार्‍यांचा ''मुजाहिदीन (धर्मयोद्धे/ क्रांतिकारी) असा उल्लेख करणारा बीबीसी आता त्याच लोकांना अतिरेकी संबोधतो. म्हणून जागतिक पातळीवर दहशतवादावर चर्चा करणे अवघड होऊन बसते. पण गुन्हेगार कोणत्या जातीतले, धर्माचे किती आहेत आहेत, अशी शिरगणती करण्यापेक्षा गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी धर्मग्रंथांचीच खरी शिकवण त्यांना देण्याची आणि ईशभय दाखवण्याची गरज आहे. हे काम मीडियापासून दूर ठेवलेले अनेक लोक करत आहेत, त्याना तुमचा सारख्या लेखकांच्या सहकार्याची गरज आहे, उलट तपासणीची नव्हे!’  (आता तरी पूर्ण पत्र प्रसिद्ध कराल या आशेने हा पत्र प्रपंच करतोय. पूर्ण पत्र प्रसिद्ध करत असाल तर नाव घेऊन प्रतिवाद केला तरी चालेल.) -नौशाद उस्मान  

   नौशाद यांचा हट्ट असल्याने त्यांचे पत्र आहे तसेच प्रसिद्ध केले आहे. त्याचा प्रतिवाद करण्याची मला गरज वाटत नाही. कारण आजवर त्यांनी अनेक पत्रे पाठवली, तरी माझे मुद्दे व मी उपस्थित केलेले प्रश्न; यांना उत्तर देण्याचे टाळले आहे. मुस्लिमांच्या वर्तन या विषयाचा मी उहापोह करीत असतांना त्याना हिंदू वा अन्य धर्माचे वा त्यातील कर्मकांडाचे दोष दाखवण्यात आनंद मिळत असेल तर माझी त्याला हरकत नाही. मला त्यात पडायचे नाही. हे पत्र छापल्याने त्यांचे समाधान होईल; अशी अपेक्षा आहे. मुद्दे वा प्रश्नांना बगल देऊन आपले मत पुढे दामटण्य़ाच्या त्यांच्या अशा शैलीमुळेच अन्य माध्यमे कदाचित त्यांची दखल घेत नसतील, तर त्यांनी आपल्या वर्तनात बदल करण्याची गरज आहे. त्या माध्यमांवर ब्राह्मणवादी असा शिक्का मारून काहीही साध्य होणार नाही. उदाहरणार्थ ‘चित्रकार हुसेन यांना भारत सरकारने देशातून हाकलून लावले’ असा बिनबुडाचा दावा त्यांनी केला होता. त्यातला तार्किक व कायदेशीर पोकळपणा मी दाखवून दिला, त्याचा प्रतिवाद त्यांनी इतकी पत्रे लिहूनही केलेला नाही. तेव्हा ते कशाला प्रतिवाद म्हणतात, ते त्यांनाच ठाऊक. उलट माझ्या लिखाणात त्यांच्या पत्रातला एक शब्द गाळला गेला, त्याबद्दल लेखातूनच माफ़ी मी मागितली होती. त्याला माझा मोठेपणा ठरवताना खुद्द नौशाद यांनी मात्र आपल्या युक्तीवादातील चुकीबद्दल मौन पाळण्यातला, त्यांचा ‘मोठेपणा’ मला अजून कळलेला नाही. पण त्यात मला पडायचे नाही. कारण ही लेखमाला असो, किंवा अन्य लिखाण करताना असो; माझी भूमिका सार्वजनिक हिताची असते. निदान सार्वजनिक हिताला बाधा येऊ नये अशी असते. नौशाद किंवा तत्सम मंडळींना आपापले धर्म वा विचारसरणीचे मोठेपण सांगण्याची, हुज्जत करण्यात स्वारस्य असावे. त्यांना इस्लामचे अभ्यासक समजून मी त्यांचा उल्लेख माझ्या मुळ लिखाणात केला, ही माझी गंभीर चुक मी खुल्या दिलाने मान्य करतो. आणि त्यांचा विषय इथेच संपवतो.

पण मला उत्सुकता आहे ती इफ़्तिकार अहमद सय्यद यांच्या प्रतिक्रियेची. त्यांनीही त्यांचे मत कळवले आहे. पण यांत्रिक अडचणीमुळे मला ते वाचणे शक्य झालेले नाही. त्यांच्याकडून कागदी स्वरूपात त्यांची प्रतिक्रिया लौकरच मिळेल व एका मुस्लिम विचारवंताचे परखड अभ्यासू मत वाचकासमोर येईल अशी अपेक्षा आहे. मला कुठला धर्म श्रेष्ठ वा दुय्यम; अशा चर्चेत अजिबात रस नाही. किंबहूना धर्म हा माझा विषयच नाही. मुस्लिमांचे जसे वर्तन अन्य मुस्लिमेतरांच्या वाट्याला येते; त्यासंबंधाने उहापोह एवढीच माझी मर्यादा होती. त्यात कुठल्या संघटना वा संस्था यांच्यावर दोषारोप करणे, कुणाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, असा माझा अजिबात हेतू नव्हता. खरे तर जे धर्मनिष्ठ वा धर्माभिमानी असतात, त्यांनी माझ्या असल्या लिखाणाकडे साफ़ दुर्लक्ष करणे योग्य असते. कारण मी श्रद्धाळू नाही, की श्रद्धावंतांचा विरोधक नाही. कुठलाही धर्मसमुह जेव्हा त्याच्या धर्मनिष्ठेच्या आहारी जाऊन इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करू बघतो तेवढ्यापुरता माझा संबंध होता. तेवढीच माझी लेखन मर्यादा होती. तेवढ्यापुरते संदर्भ मी सोबत घेतले होते. त्याला पुरक ठरणारे अन्य संदर्भ कोणी समोर आणले तर बिघडत नव्हते. धर्मविषयक वर्तनाचा एकूण समाजजीवनावर होणारा परिणाम, इतकाच विषय होता. माझी ती मर्यादा मी जाणिवपुर्वक पाळली. ज्यांना त्यातही धर्मनिंदा दिसत असेल, तर त्यांनी आपल्या निष्ठा व विश्वास तपासून घ्यावा. कारण कोणाच्या निष्टा अन्य कुणाच्या बोलण्याने वा वागण्याने कधी कमकुवत होतात असे अला वाटत नाही. धर्मश्रद्धेपासून मी समज आल्यापासून अलिप्त आहे, तर अन्य कुणाच्या धर्मनिष्ठेचा मी कधी त्रास करून घेतला नाही किंवा माझ्या नास्तिकतेला कोणी शिव्याशाप दिल्यानेही मी विचलित होत नाही.

   सर्वसामान्य माणूस तेवढा बारकाईने धर्म किंवा श्रद्धांची चिकित्सेने तपासणी करतोच असे नाही. त्यामुळेच जाहिरपणे धर्मश्रद्धा व धर्माचे तत्वज्ञान यांची चिकित्सा करणे मला योग्य वाटत नाही. श्रद्धा व निष्ठांना कसोटीला लावता येत नसते. त्या व्यक्तीगत असतात आणि कुणासमोर सिद्ध करायची गरज नसते. हे मी आधीच मान्य केलेले आहे. एखाद्याची गणपतीवर किंवा नवसाच्या देवावर जशी श्रद्धा असते, तशीच कुणाची नसतेही. सवाल त्यांनी आपल्या श्रद्धा किंवा निष्ठेला दुसर्‍यावर लादण्याचा येतो. तिथून समस्या सुरू होते. तेवढ्यापुरता माझा लेखनप्रपंच होता. कारण अशा प्रवृत्तीचा अतिरेक झाला, मग अनावस्था प्रसंग ओढवत असतो. त्याचे गांभिर्य लक्षात आणून देण्याचा प्रयास समजून घेण्यापेक्षा; अमुक त्या धर्माचे किंवा तमूक त्या धर्माचे वा संप्रदायाचे असा युक्तीवाद फ़सवा असतो. कारण मग विषय दोन्हीकडल्या संख्येशी आणि बळाशी निगडीत होतो आणि संख्या जिथली अधिक त्यांच्या बळाचा प्रयोग यशस्वी होतो. त्यातून सत्य प्रतित होत नाही तर बळाची किमया सिद्ध होते. म्हणूनच संयम व विवेक महत्वाचा असतो. ज्यांना ते समजून घ्यायचे असेल त्यांनी समजून घ्यावे किंवा इतरांनी न घ्यावे. त्यासाठी पुन्हा कोणावर मी सक्ती करू शकत नाही. शद्बांची भाषा समजून घेणार्‍यांसाठी असते आणि नसेल त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषा व माध्यमे असतातच. तो प्रांत माझा नाही. त्यामुळे त्यात मी कशाला पडणार?

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिमांनीच आत्मचिंतनातून वाटचाल करावी


   एका मुस्लिम लेखकाने मला जे खुलासेवजा पत्र पाठवले होते, त्यात त्याने वर्णवादी ज्युधर्मिय असा उल्लेख केला होता, त्याचप्रमाणे ब्राह्मणवादाचाही उल्लेख केला होता. अशी भाषा का वापरली जाते? त्यातून एकूणच ज्य़ुधर्मियांवर वर्णवादाचा आरोप केला जात असतो. ज्या इस्त्रायलशी अन्य कित्येक मुस्लिम देशांचा काडीमात्र संबंध येत नाही, तरी जगभरचे मुस्लिम ज्युंचे राष्ट्र म्हणुन इस्त्रायलचा द्वेष का करतात? जगातले सर्वच ज्यूधर्मियांनी मुस्लिमांच्या विरोधात कुठला गुन्हा केलेला नसतो, तरी मुठभर ज्यु तसे वागले, म्हणुन तमाम ज्युधर्मियांना त्यासाठी गुन्हेगार संबोधले जाते ना? नेमकी तीच गोष्ट मग मुस्लिमांच्या बाबतीतही होत असते. घातपात, दहशतवाद करणारे मुठभरच असतील, पण जास्तीतजास्त घटनांमध्ये मुस्लिमच दिसून येतात, तेव्हा मग सरसकट मुस्लिमांकडे दहशतवादी म्हणुन बोट दाखवले जात असते. आणि असे अन्य कोणी म्हटले तर राग येऊ शकतो. पण जेव्हा मुस्लिम जगातला एक नामवंतच तसे उद्गार काढतो तेव्हा काय करायचे? फ़ेसबुक किंवा मोबाईलच्या एसएमएस द्वारा असा एक संदेश कित्येक वर्षे फ़िरत असतो. ‘सर्वच मुस्लिम दहशतवादी नसतील, पण सगळे दहशतवादी तर मुस्लिमच आहेत ना?’ तब्बल सहा वर्षापुर्वी अशा एसएमएस संबंधी लोकसत्ता दैनिकाच्या लेखामध्ये संजय नहार नावाच्या लेखकाने उल्लेख केला होता व त्याची खिल्ली उडवली होती. अर्थात त्याचे कारणही स्पष्टच होते. असे संदेश मुस्लिमांबद्दल गैरसमज वाढवण्यासाठी हिंदूत्ववादीच पसरवतात, हे गृहित आहे. पण असा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा माणूस अरब मुस्लिम आहे याचा किती लोकांना पत्ता आहे?

   अब्दुल रहमान अल रशीद हे अनेक वर्षे सौदी अरेबियाच्या ‘अल अरेबिया’ उपग्रह वाहिनीचे कार्यकारी संचालक होते. त्यांनी २००४ रोजी ब्रिटनमधून प्रकाशित होणार्‍या ‘अल शिर्क अल आस्वत’ नावाचा अरबी नियतकालिकात लिहिलेल्या लेखाचे ते शिर्षक होते. ’जागे व्हा: सर्वच्या सर्वच दहशतवादी मुस्लिम आहेत’ ( A Wake-up Call : Almost all terrorists are Muslims.. ) अशा शिर्षकाचा तो लेख होता. २००६ साली मी तो लेख ‘अरब न्युज’ या वेबसाईटवर वाचला. खुद्द मुस्लिम व अरब समाजातही त्या लेखाने खळबळ माजवली होती. त्याचे वैशिष्ट्य असे, की त्यातून मुस्लिमांना आत्मचिंतनाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न लेखकाने केला होता. मलाही तीच अपेक्षा आहे. मी लिहिलेले मुद्दे किंवा त्यातले आक्षेप मुस्लिमांना आवडणारे नसले, तरी त्यातून पुढे आलेल्या समस्या सोडवण्याची गरज आहे. सहसा कोणी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे किंवा नियतकालिके त्यावर चर्चाही करत नाहीत. उगाच मुस्लिमांना दुखावणे नको, अशी त्यांची भूमिका असते. पण त्यामुळे असे प्रश्न अनुत्तरित रहातात आणि मग जे बिगर मुस्लिम आहेत, त्यांच्या शंका कायम राहून त्यांचा शंकासूर होत असतो. आपल्याच देशात जेवढे घातपाताचे प्रकार झाले आहेत, त्यांची संख्यात्मक तुलना केली तर त्यातल्या हिंदू घातपातांची संख्या नगण्य दिसेल. मग त्या नगण्य घटनांशी मुस्लिम घातपात्यांची तुलना करून वेळ मारून नेता येईल. पण म्हणुन समस्या संपत नाही. युक्तिवादात समोरच्याला गप्प करता येईल. पण म्हणून समस्या सुटत नसते. आणि त्याकडेच अब्दुल रहमान यांनी त्या लेखातून लक्ष वेधलेले होते. त्यासाठी त्यांनी जगभरच्या हिंसक जिहादी घातपातांची प्रचंड यादीच सादर केली होती. आणि मुस्लिमांनी ‘जागे व्हावे’ असे आवाहन त्यातून केले होते.

   दुर्दैव असे आहे, की आपल्या देशात त्याकडे हिंदू मुस्लिम यांच्यातला संघर्ष म्हणून बघितले जाते. पण प्रत्यक्षात जगभरच मुस्लिम समाजात प्रचंड घुसळण चालू आहे. जिथे मुस्लिमेतरांची संख्याच नगण्य आहे अशाही देशात आज भीषण हिंसाचार उसळलेला आहे. तिथे पंथ व वंशाच्या अस्मितांनी हिंसाचार बोकाळलेला आहे. कालपरवाच लेबॅनॉन या देशामध्ये एका भीषण स्फ़ोटामध्ये एका मंत्र्याची हत्या झाल्यावर लष्कराला पाचारण करावे लागले आहे. लोकशाही असो किंवा लोकशाही वा लष्करशाही असो, कुठेही मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने नांदताना का दिसत नाही? त्याचा विचार व चिंतन त्याच समाजात होण्याची गरज आहे. कारण शेवटी त्यात मारले जाणारी बहुतांश लोकसंख्या मुस्लिमच आहे आणि होणारे मालमत्तेचे नुकसानही मुस्लिम समाजाचेच आहे. प्रत्येक ठिकाणी शत्रू म्हणून वेगवेगळ्या संस्था, संघटना किंवा भिन्न समाज घटकाकडे बोट दाखवले जात असेल. पण जो कोणी मारला जातो आहे, तो मुस्लिमच आहे ना? मग गुजरातच्या दंगलीतले दिड-दोन हजार बळी विसरू न शकणार्‍या मुस्लिमांना आज रोजच मारल्या जाणार्‍यांविषयी इतकी अनास्था का असावी?

   दुसर्‍या कोणी शंका विचारली वा धर्माचा उल्लेख केला, मग लगेच धर्मग्रंथाचा हवाला देणार्‍यांनी जे कोणी मुस्लिम त्याच धर्म शिकवणीनुसार वागत नाहीत त्यांचा बंदोबस्त का करू नये? हा माझा एकट्याचाच प्रश्न नाही. शेकडो, हजारो नव्हेतर करोडो मुस्लिमेतरांना सतावणारा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर धर्मग्रंथ देऊ शकणार नाहीत. तर मुस्लिम समाजाला आपल्या वागणुकीतून द्यावे लागणार आहे. कारण शेवटी छापलेल्या अक्षरे व शब्दांपेक्षा त्याचा प्रत्यक्ष जीवनात येणारा अनुभव माणसाला पटत असतो. आणि असे प्रश्न आता मुस्लिमेतरच नव्हेतर मलाला किंवा अब्दुल रहमान यांच्यासारखे मुस्लिमही विचारू लागले आहेत. त्यामुळे असे प्रश्न अधिकाधिक प्रखर होऊन समोरही येऊ लागले आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणुन विचारमंथन सुरू व्हावे, एवढाच माझा या लेखमालेमागील हेतू आहे. शंभरातला एखादाच माणूस गैरवर्तन करतो. पण त्यामुळे सगळे शंभर बदनाम होतात. याचे कारण त्यातले ९९ गप्प बसतात आणि त्यांचे मौन हेच समर्थन मानले जात असते. स्वपक्षातल्या दोनतीन टक्के आक्रमकांना हाताशी धरून हिटलरने पक्षात आपले वर्चस्व निर्माण केले आणि मग त्याच पक्षाच्या बळावर सत्ता काबीज करून जगाला ओलीस ठेवले होते. त्या एका माणसामुळे अवघ्या जर्मनीला दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामध्ये कित्येक सामान्य जर्मन नागरिक आदेशाचे पालन करणारे होते किंवा ऐनवेळी मौन धारण करून बसले म्हणून गुन्हेगार ठरले होते.

   ज्या मुंबईतील रझा अकादमीच्या मोर्चातील हिंसाचारामुळे ही लेखमाला मी सुरू केली, त्यातला मुख्य आरोपी सोमवारी पकडला गेला. म्यानमारचा नागरिक असलेल्या युसूफ़ खानने मुंबईतील मोर्चासाठी चिथावणीखोर एसएमएस पाठवल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, खटला भरला जाईल. पण त्याच्या कारवायांना जवळपासच्या लोकांनी वेळीच पायबंद घातला असता, तर अवघ्या मुस्लिम समाजाला आझाद मैदानच्या हिंसेसाठी बदनाम व्हावे लागले नसते ना? हाच माणुस त्या मोर्चाचा एक आयोजक होता. म्हणजेच तो काय करतो आहे त्याचा जवळपास वावरणार्‍यांना थोडाफ़ार सुगावा असणारच. पण त्यांनी त्याचा आगावूपणा रोखला नाही. आपल्यातले आगावू माथेफ़िरू असतात, त्यांना रोखण्याची जबाबदारी त्या त्या समाजाची असते. त्यातल्या धुरीणांची असते. त्यात कसूर झाली मग अवघ्या समाजावर त्याचे खापर फ़ोडले जात असते. गुजरातच्या दंगलीचे परिणाम सामान्य मुस्लिमांना भोगावे लागले आहेत. पाकिस्तानच्या वजिरीस्तानच्या टेकड्यांमध्ये दडी मारून उचापती करणार्‍या तालिबानांच्या पापाची फ़ळे क्षेपणास्त्र हल्ल्यात सामान्य गावकर्‍यांना भोगावी लागत असतात. अगदी आझाद मैदानच्या मोर्च्यातील हुल्लडबाजांना अटक झाली, त्यातले किती खरेच गुंड आहेत? जमावात सहभागी झाले आणि भरकटत गेले, त्यांच्या हातून चुका घडून गेल्या. आज त्यांना आरोपी व्हायची पाळी आली आहे.

   जेव्हा बेभान व बेताल वागणार्‍यांच्या हाती समाजाची वा समुहाची सुत्रे जातात, तेव्हा ती माणसे अवघ्या समाज समुहाला विनाशाकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. कारण समुह म्हणून जी मानसिकता तयार होते, तिला सारासार विचार करता येत नाही. तिला चिथावण्या दिल्या मग स्फ़ोटासारखे वापरता येते. ठिणगीने पेटणारा व फ़ुटणारा बॉम्ब स्वत:चाच विनाश ओढवून आणत असतो. आणि म्हणूनच अशी स्फ़ोटक साधने जपून वागवणार्‍याकडेच ठेवायची असतात. भरकटणार्‍या बेभान लोकांच्या हाती जाऊ द्यायची नसतात. धर्मश्रद्धा, लोकभावना व समुहभावना नेमकी तशीच स्फ़ोटक असते. त्यामुळेच तिचे नियंत्रण वा सुत्रे चुकीच्या हाती जाऊ नयेत याची सतत काळजी घ्यायची असते. आज जगभर मुस्लिम समाजाची, लोकसंख्येची सुत्रे व नेतृत्व अशा सावध व विवेकी लोकांच्या हाती आहे काय; याचा मुस्लिमांनीच विचार करावा. कारण जे काही भलेबुरे होईल त्याचे परिणाम शेवटी कोणाला भोगावे लागतात? मुस्लिम नेत्यांनी, पक्षांनी, संघटनांनी, धुरीणांनी, विचारवंतांनी, समाजचिंतकांनी व सामान्य मुस्लिमांनीही आत्मचिंतन करावे अशी त्यांना म्हणूनच विनंती व शुभेच्छा. ( संपुर्ण )
भाग  ( ६९ )   २४/१०/१२

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

सैफ़-करिनाच्या बेकायदा लग्नाबद्दल उदासिनता का?
   गेल्याच आठवड्यात एक घटना घडली. तसे त्यात नाविन्य कुठलेच नव्हते. कारण आज उद्या तसे काही घडणार हे जगजाहिर होते. ती घटना होती सैफ़ अली खान व करिना कपूर यांच्या विवाहाची. सैफ़ हा माजी क्रिकेट कर्णधार पतौडी मन्सुर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा पुत्र. त्यामुळे नावाने व वर्तनाने तो मुस्लिम धर्मिय मानला जातो. बाकी तो कितपत धर्माचे पालन करतो हा वेगळ विषय आहे. त्याचे फ़ार पुर्वी लग्न झालेले होते. अमृता सिंग ही त्याची घटस्फ़ोटीत पहिली पत्नी. तिच्यापासून झालेली दोन मुलेही आहेत. मध्यंतरी त्यांचा तलाक झाला आणि करिना कपुर व सैफ़ यांचे प्रेम प्रकरण गाजू लागले. दोनतीन वर्षे तरी त्यांचे प्रणयराधन चालू होते. आता त्यावर शिक्कमोर्तब झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे बातम्यांवरून कळते. कारण त्या विवाहानंतर तसे नोंदणी करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांनीच वाहिनीच्या कॅमेरासमोर कथन केले. मग पुढे धार्मिक सोहळा म्हणुन दोघांनी मुस्लिम पद्धतीने निकाह लावल्याचीही बातमी आली. त्यामुळे मग त्यांचा कुठला विवाह खरा मानायचा असा प्रश्न काही लोकांना भेडसावू लागला. यापुर्वी आमिर खान यानेही आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फ़ोट देऊन किरण राव नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला होता. त्याबद्दल एवढी चर्चा झाली नव्हती. पण त्याने दोन्ही धर्मांचे सोपस्कार केल्याचे कानावर आले होते. पण सैफ़च्या बाबतीत एक बातमी मुद्दाम दखल घेण्यासारखी आहे. त्याने मुस्लिम पद्धतीने केलेला विवाह ग्राह्य नसल्याचे मौलवींनी नंतर जाहिर केले. फ़ेसबुकसारख्या माध्यमात त्यावरून कल्लोळ चालू होता. मिया बिबी राजी तो क्या करेग काझी, अशा उक्तीही त्यासाठी वापरल्या जात होत्या.

   खरेच विवाहाचे सोपस्कार कायदेशीर असायला हवेत का? कारण हल्ली अनेक जोडपी कुठलाही सोपस्कार वा कायदेशीर विवाह न करताच एकत्र नांदत असतात. त्याला काहीशी कायदेशीर मान्यता न्यायालयांनीही दिली आहेच. असे सगळे प्रश्न व समस्या जोवर दोघात भांडणे होत नाहीत व कायदेशीर समस्या उभी रहात नाही, तोवर काणाडोळा करण्यासारख्या असतात. पण जेव्हा वाद सुरू होतात, तेव्हा मग कायद्याला त्यात पडावे लागते. कारण आजही आपल्या देशात विवाहविषयक किंवा वारसाविषयक अनेक कायदे धार्मिक कर्मकांडावर विसंबून आहेत. त्यामुळेच ज्यांनी कोणी सैफ़चा विवाह किंवा निकाह बेकायदा आहे असे सांगितले; त्यांच्या मताला महत्व आहे. कारण आज प्रेमात असलेले उद्या जेव्हा प्रेमाच्या नशेतून बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे अधिकार कुठले, त्याची सोडवणूक समाजाला करावी लागत असते. आणि समाज म्हणजे फ़क्त कायद्याचे सरकारी अंमलदारच नसतात तर समाजातील धुरिणांचाही त्यात समावेश होत असतो. आणि मौलवी हे मुस्लिम समाजातले धुरीण असतात. कारण मुस्लिम समाज आजही मोठ्या प्रमाणात धर्मनिष्ठ असून जितके म्हणुन धर्माचे कायदे व रिवाज आहेत; त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी सज्ज असतो. त्यामुळेच ज्या प्रकारे सैफ़ करिनाचा निकाह झाला तो इस्लामी कायद्यानुसार गैरलागू असल्याचे मौलवींचे मतप्रदर्शन वाजवी ठरते. पण त्या एकूण विवाह समारंभात एक मोठी पळवाट शोधण्यात आलेली आहे; याकडे फ़ारसे कोणाचे लक्ष गेलेले नसावे. त्या दोघांनी आधी रितसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. आणि तोच त्यांचा कायदेशीर विवाह आहे. ज्याला स्पेशल इंडीयन मॅरेज अक्ट असे म्हणतात. ज्यामध्ये प्रौढ सज्ञान भारतीय मुलगा व मुलीला विवाह करता येतो. आणि त्यानुसार नोंदणी विवाह केला तर त्याला दोघांच्या धार्मिक निष्ठेची बाधा येत नाही. त्यांच्या विवाह संबंधात कुठलीही समस्या उभी राहिली तर त्यात धार्मिक व्यक्तीगत कायदा लागू होत नाही. आणि म्हणुनच निकाह योग्य आहे; की नाही हा विषयच त्यांच्या बाबतीत विचारला जाऊ शकत नाही.

   इथे त्या विवाहाबद्दल मौलवींनी आक्षेप घेतलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विवाह नव्हेतर निकाह गैरलागू आहे असे म्हटले होते. कारण मुस्लिम धार्मिक कायद्यानुसार मुलगा व मुलगी दोघेही मुस्लिमच असायला हवेत. अन्यथा त्यांच्यात विवाह म्हणजे निकाह होऊ शकत नाही, निकाह हा एकप्रकारे त्या नवरानवरी यांच्यातला करार असतो. आणि पुढे त्यांच्यात पटत नसेल वा विवाह सुखाचा होत नसेल, तर वेगळे होण्याची कायदेशीर प्रक्रिया त्या निकाह म्हणजे करारानुसार होत असते. त्यामुळेच निकाहला कायदेशीर महत्व आहे. प्रश्न असा आहे, की या दोघांचा विवाह कोणत्या कायद्यानुसार ग्राह्य मानला जाणार? त्याचे उत्तर साफ़ आहे, की त्या दोघांचा विवाह इस्लामी पद्धतीनुसार झालेला नाही, म्हणुनच त्या स्पेशल अक्टनुसारच पुढले प्रश्न सोडवले जातील. त्याचाच दुसरा अर्थ असा, की करिना हिने आपला धर्म बदललेला नाही, की सैफ़शी विवाहबद्ध होण्यासाठी तिने इस्लामचा स्विकार केलेला नाही. दोन धर्मातल्या भारतीयांना विवाह करायचा असेल; तर त्यात कोणा एकाने धर्म बदलण्याची वा धर्मांतर करण्याची गरज नसते. त्या दोघांना आपापला धर्म कायम ठेवून विवाह करता येतो. स्पेशल मॅरेज अक्टने तशी सुविधा ठेवलेली आहे. सैफ़ व करिना यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. म्हणूनच त्यांचा विवाह हा धार्मिक सोहळा नव्हता, तर कायदेशीर सोहळा होता. नंतर जो निकाह सोहळा उरकण्यात आला, त्याला कुठलेही कायदेशीर अधिष्ठान नाही, असेच त्या मौलवींनी सांगितले आहे. पण किती लोकांनी त्यातले गांभिर्य समजून घेतले आहे? मौलवींच्या खुलाशाचा अर्थ इतकाच, की त्या दोघांच्या विवाहाला इस्लामची मान्यता नाही. म्हणजेच उद्या तीनदा तलाक श्ब्दाचा उच्चार करून सैफ़ हा करिना कपूरला घटस्फ़ोट देऊ शकत नाही. तसा त्याने तलाक दिला तरी तो कायदेशीर असू शकणार नाही, इतकाचा त्याचा अर्थ आहे.

   असे अनेक विवाह आजकाल होत असतात. पण त्याचा अकारण गाजावाजा होत असतो. पण माझा प्रश्न वेगळाच आहे. देशातले मोठे मान्यवर मौलवी किंवा मुस्लिम धर्ममार्तंड जर त्या दोघांचा निकाह गैरलागू ठरवत असतील, तर तो निकाह विधी पार पाडणार्‍याचे काय? त्याने केलेले कृत्य धर्मबाह्य किंवा धर्माला काळीमा फ़ासणारे नाही काय? त्यातून धर्माची अवहेलना झालेली नाही काय? त्याबद्दल मुस्लिम धर्मनिष्ठ काय करणार आहेत? इस्लामचे पावित्र्य व शुद्धता जपण्याचा आवेश नेहमी दाखवणार्‍यांचे काय? ते सैफ़-करिना यांचा निकाह लावणार्‍यांवर कोणती कारवाई करणार आहेत? अजून का केलेली नाही? कारण असे हे पहिलेच प्रकरण नाही. दोनतीन वर्षापुर्वी असेच एक प्रकरण उत्तरेत गाजले होते. हरयाणाचे एक मंत्री व तिथल्या सरकारी वकील यांनी दुसर्‍या विवाहाची पळवाट शोधण्यासाठी इस्लामचा स्विकार केला होता आणि नवी मुस्लिम नावे धारण करून निकाह लावला होता. चॉद महंमद व फ़िझा अशा नावाने त्यांचे नाटक अनेक वाहिन्यांवरून गाजले होते. पुढे लौकरच त्यांचे प्रेम वितळले व चॉद महंमद हा विष्णोई होऊन आपल्या पहिल्या पत्नीकडे परतला होता. हल्लीच दिल्लीमध्ये त्याच्याशी निकाह लावलेल्या फ़िझाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रहात्या घरात सापडल्याचेही वाहिन्यावरून दाखवले होते. सवाल आहे तो अशा रितीने धर्माची अवहेलना चालते, त्याच्या विरुद्ध मुस्लिम किती संघटितपणे उभे राहिले आहेत? धर्माच्या नावाने चाललेला हा भ्रष्टाचार थांबवण्याचे काम को्णाचे आहे?

   आपले धार्मिक ग्रंथ व धार्मिक कायदे इश्वरदत्त म्हणुन अपरिवर्तनिय आहेत असा दावा मुस्लिमांकडून नित्यनेमाने केला जात असेल आणि त्या बाबतीत आग्रही भूमिका घेतली जात असेल; तर त्यात आपल्या मनमानीने वाटेल तसे बदल करणार्‍या अशा मौलवी किंवा धर्मपंडीतांवर कोणी कारवाई करायची? सैफ़ असेल किंवा चॉद महंमद असेल, त्यांचे गैरलागू निकाह करणार्‍यांचा बंदोबस्त कोणी करायचा? ते निकाह गैरलागू असतील तर मग त्यानुसार जी धर्माची विटंबना चालते त्याचे काय? की धर्माचे ग्रंथ व धर्मादेश अपरिवर्तनिय आहेत ते फ़क्त पुस्तकापुरते आहेत आणि ज्याच्या हाती त्यानुसार धर्माची सुत्रे येतात, त्याने त्याचा मनाला येईल तसा अर्थ लावून वाटेल ते करावे, अशी मुभा आहे? मग विषय वजिरीस्तानातील मलालाच्या शाळेचा वा आधुनिक शिक्षणाचा असो, की सैफ़ वा फ़िझाच्या लग्नासाठी काढलेल्या पळवाटेचा असो. भारताची राज्यघटना किंवा विविध कायदेही अंमलात आहेत. पण त्याचा गैरवापर झाला तर त्यासाठी दाद मागायची सोय सुप्रिम कोर्टाच्या रुपाने केलेली आहे. इस्लामचे जे कायदे आहेत त्यांचे पावित्र्य विटाळणार्‍या त्याच धर्मातील पंडीतांचा बंदोबस्त कोणी करायचा? त्यविषयी एवढी अनास्था मुस्लिमात कशाला असावी?  ( क्रमश:)
भाग  ( ६८ )   २३/१०/१२

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिमेतरांनी कोणाचे धर्ममत ग्राह्य मानावे?


   मी कुठलाही धर्म मानत नाही किंवा पाळत नाही, तर मग मी मुस्लिमांच्या वर्तनाचे विवेचन का करावे त्याची अनेक कारणे आहेत. कारण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या वर्तनाचा माझ्या जगण्याशी संबंध येतोच येतो. आणि असा मी एकटाच नाही तर जे कोणी मुस्लिम नाहीत त्यांचीही माझ्यासारखीच अवस्था आहे. म्हणूनच मुस्लिम काय करतात, कसे वागतात वा त्याचे इतरांच्या सामुहिक जीवनावर कोणते परिणाम होतात, याची दखल मुस्लिमेतरांना घ्यावीच लागते. अर्थात त्यांच्या वर्तनाचा कुठलाही विपरित परिणाम होणार नसेल तर त्याकडे काणाडोळा करण्याची मोकळीक असते. पण मुकादम यांनी जे सत्य इतक्या उघडपणे कथन केले आहे, त्यानंतर त्याकडे काणाडोळा करणे हा शुद्ध मुर्खपणा ठरेल. हे नुसते हवेतले विधान नाही. हेमंत करकरे किंवा चार वर्षापुर्वी जे अनेक लोक मुंबईत अकारण मारले गेले, त्यांच्याकडे बघा म्हणजे माझे नेमके काय म्हणणे आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. कोण हे हेमंत करकरे?

   ज्यांची राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी कसाब किंवा त्याच्यासोबत आलेल्यांचे काय घोडे मारले होते? २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जे प्रवासी जमलेले होते, त्यांनी कसाब किंवा त्याच्या सोबत आलेल्या दहा जिहादी फ़िदायिनांचा कोणता अपराध केला होता? नरिमन हाऊस येथे ज्यांची निर्घृण हत्या झाली; त्यापैकी कोणी पाकिस्तानातल्या कोणाचे काय पाप केले होते? अशा शेकडो निरपराधांचे आजपर्यंत बळी पडले आहेत, त्यांना मारणार्‍यांचे यापैकी कोणी नेमके काय गुन्हे केले होते? उलट जवळपास यातला प्रत्येकजण असाच दिसेल, की त्याने मुस्लिमांच्या वर्तनाकडे साफ़ काणाडोळा केला होता. मुस्लिम आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात, त्याचीही त्यातल्या प्रत्येकाने कधीच फ़िकीर केली नव्हती (कसाब किंवा तत्सम हिंसाचार करणारे, असे कृत्य धर्माच्या नावाने करत असतात). आपोआपच यापैकी कोणीही मुस्लिम काय करु शकतील याबद्दल साफ़ गाफ़ील होते ना? आपण मुस्लिम नाही आहोत म्हणून आपल्याबद्दल काही किल्मिष मुस्लिमांच्या मनात असू शकते, याबद्दल त्यातला प्रत्येकजण गाफ़ील नव्हता का? आणि तेवढेच नाही. हे जे अकारण बळी पडले आहेत, ते सगळेच मुस्लिमेतर नाहीत. त्यात अनेक मुस्लिमांचाही समवेश आहे. ज्यांना असेच विनाकारण बळी व्हावे लागले आहे. त्यांचा दोष को्णता होता?

   जे मुस्लिम नव्हते त्यांच्यावरच जिहादी किंवा फ़िदायिन यांनी प्राणघातक हल्ले केले, हा विषय जरा बाजूला ठेवा. अशा हल्ल्यात जे मुस्लिम मारले गेलेत त्यांचे काय? ते चुकीच्या समुहात होते, चुकीच्या देशात होते किंवा चुकीच्या जागी चुकीच्या वेळी उपस्थित होते; असा त्यांचा गुन्हा मानायचा काय? समस्या आहे तरी काय? समस्या नुसती मुस्लिम नसण्याची सुद्धा नाही. तर आम्हाला समजलेला वा उमजलेला धर्मच योग्य आणि त्याचे पालन होत नसेल तर त्याला गुन्हा ठरवून स्वत:च शिक्षा देण्याची मानसिकता; ही खरी समस्या आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून अशी कृत्ये होतात, ते केवळ भारतातले कायदे जुमानत नाहीत किंवा पाकिस्तान वा अमेरिकेतले कायदे जुमानत नाहीत, असाही त्याचा अर्थ होत नाही. त्यांना इस्लामचे सर्वमान्य कायदे व नियमही मान्य नाहीत, असाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांची समस्या मुस्लिमेतर लोकांपुरतीच मर्यादित नाही. तर अशा काही आक्रमक वृत्तीच्या मुस्लिमांना अवगत झालेला जो धर्म आहे, त्यानुसार सर्वांनी वागण्याचा व जगण्याचा अट्टाहास ही समस्या आहे. आणि ती एकट्या मला, माझ्या देशाला नव्हेतर अवघ्या जगालाच आज भेडसावते आहे. तीच मग बहुसंख्य मुस्लिम असूनही काश्मिरी लोकसंख्येला भेडसावते आहे, पाकिस्तानला सतावते आहे आणि मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या अन्य देशांनाही भंडावून सोडते आहे.

  म्हणजेच आज ही समस्या केवळ मुस्लिम व मुस्लिमेतर अशी उरलेली नाही तर ती मुस्लिम समाज घटकांच्या अंतर्गतही भीषण समस्या बनलेली आहे. पाकिस्तानच्या कुठल्या प्रांतातील मुलींनी आधुनिक शाळेत शिकावे किंवा नाही; हे तिथले सरकार ठरवू शकत नाही. ते तालिबान म्हणुन ज्यांनी धर्माच्या रक्षणाचा ठेका घेतला आहे, तेच ठरवू बघत आहेत. म्हणजे समस्या मुस्लिम-मुस्लिमेतर अशी नाही, तर तालिबान व तालिबानेतर मुस्लिम अशी सुद्धा आहे. जिथे शिया पंथियांचे वर्चस्व आहे, तिथे सुन्नी मुस्लिमांची मुस्कटदाबी वा अत्याचार होत असतात, तर कुठे अहमदियांना संपवण्याचे प्रकार सुन्नी मुस्लिम करताना दिसतील. गेल्या दोन दशकातील जगभरची आकडेवारी तपासली तर मुस्लिमांकडूनच मुस्लिम जितके मारले गेलेत; तेवढे मुस्लिम अन्य कुणाकडून मारले गेलेले नाहीत. मग ही समस्या सुटायची कशी? आणि म्हणूनच अब्दुल कादर मुकादम ज्या समस्येकडे बोट दाखवतात व प्रश्न विचारतात, तो मुस्लिमेतर जगापुरता खरा असला तरी संपुर्ण जगासाठी वा जगातल्या तमाम लोकसंख्येसाठी परिपुर्ण प्रश्न नाही. मुकादम फ़क्त त्या प्रश्नाची एक बाजू सांगत आहेत. त्यातून मुस्लिमेतरांना बाजूला काढले म्हणून उरवरित जी मुस्लिम लोकसंख्या आहे; ती तरी गुण्यागोविंदाने नांदणार आहे काय? बाकीचे वाद चालू राहतील, पण धर्माच्या बाबतीतले रक्त सांडणे थांबेल काय? तसे असेल तर मग मुस्लिमांच्या विविध पंथातला रक्तपात संपणार आहे काय? इस्लाममधल्या विविध पंथामध्ये तरी एकवाक्यता होऊन सहजीवनाला आरंभ होऊ शकेल काय?

   सद्दामने कर्डीश मुस्लिमांवर रासायनिक अस्त्रे सोडून त्यांचे हत्याकांड का केले? दहा वर्षे इराक इराण युद्ध का चालु होते? आजही जागतिक खनिज तेलाच्या बाजारपेठेत सौदी व इराण यांच्यातली जीवघेणी स्पर्धा कशासाठी चालते? ज्या इस्त्रायल विरोधात अवघे मुस्लिम जगत एकसुरात बोलते, त्याच्याशी सौदी अरेबियाचे छूपे संगनमत कोणत्या कारणास्तव असते? सुन्नी सौदी विरुद्ध शिया इराण असे भांडण कशासाठी आहे? तर जगातल्या मुस्लिमेतरांशी वादविवाद करताना सर्व मुस्लिम एक होतात. पण जेव्हा केवळ मुस्लिमांचाच विषय असतो; तेव्हा संघर्ष उफ़ाळून येतोच. माझा इस्लाम तेवढा खरा यातून ही समस्या अधिक फ़ैलावली आहे. आणि म्हणूनच मग मुकादम म्हणतात, तसा हा मर्यादित प्रश्न नाही. तो माझ्यासारख्या मुस्लिमेतरासाठी खरा असेल. पण जगासाठी परिपुर्ण प्रश्न नाही. मग जे मुस्लिम मला इस्लामचा अभ्यास करायला सांगतात किंवा कुराण वा प्रेषिताची शिकवण समजून घ्यायला आग्रहाने सांगतात; ती कुठली शिकवण असा प्रश्न पडतो. कारण ज्या धर्मशिकवणीबद्दल विविध मुस्लिम पंथ व गटातच एकमत नाही, त्याचे ज्ञान मला कसे अवगत व्हावे? हे काम इतके सोपे असते तर आज मलाला युसूफ़जाईला मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली असती का? कारण तिला समजलेला धर्म आणि तालिबानांना अवगत झालेला धर्म; यात अशी तफ़ावत राहिली नसती. एकाने दुसर्‍यावर शाळेत शिकण्याच्या विषयावरून जीवघेणा हल्ला नक्कीच केला नसता. पण तसे झाले आहे. म्हणजेच आपल्याला अवगत झालेला धर्मच खरा आणि त्याच्याशी सम्य नसलेला धर्म किंवा धर्मपालन गुन्हा; अशी मानसिकता हीच खरी समस्या आहे. त्यातून आधी मुस्लिमांनाच स्वत:चा मार्ग शोधणे अगत्याचे आहे. त्यानंतरच एकवाक्यता झालेल्या धर्माबद्दल त्यांनी इतरांना समजून घ्यायला सांगणे इष्ट नाही काय?

   मुस्लिमात एकवाक्यता असावी असे मी सांगण्याचे कारण काय? तर त्याचे परिणाम शेवटी संपुर्ण जगाला भोगावे लागत असतात. अगदी मुस्लिमांनाही भोगावे लागतच आहेत की. डारफ़ोरची समस्या काय आहे? वजिरीस्तानची समस्या काय आहे? कुवेतच्या बचावासाठी सौदी सम्राटांनी अमेरिकन सेनेला आमंत्रित केले, कुवेतच्या शेख अमिरांनी त्याला मान्यता दिली. पण ओसामा बिन लादेनला ते धर्मबाह्य वाटले आणि त्याची फ़ळे अलकायदाच्या कारवायांमुळे अवघ्या जगाला भोगावी लागत आहेत. इथे मग कोणाचे धर्मविषयक मत ग्राह्य मानायचे? कार्ण सौदी सम्राट, कुवेतचा अमिर व ओसामा सारखेच मुस्लिम आहेत ना? मग एकाचे मानले तर दुसरा दुष्मनी जाहिर करतो. दुसर्‍याचे ऐकले तर पहिला शत्रुत्व घेणार. मग इतरांनी करायचे काय? ओसामाचा धर्मोपदेश खरा मानून वागावे की सौदी-कुवेती सत्ताधार्‍यांचा निर्णय मान्य करायचा? तेव्हा अब्दुल कादर मुकादम म्हणतात तो त्यांच्याही अपेक्षेपेक्षा अधिक गुंतागुंतीचा विषय आहे. मुस्लिमेतरांचे मुस्लिम नसणे मुस्लिमांनी मान्य-अमान्य करणे इतके सोपे नाही. कारण ते मुस्लिम नसणे एकाला मान्य असले आणि दुसर्‍याला मान्य नसले मग काय होणार? कारण तमाम मुस्लिमांची एकवाक्यता होण्याची शक्यता अजिबात नाही. मग मुस्लिमेतरांनी त्यापैकी कोणाचे धर्ममत ग्राह्य मानायचे?       ( क्रमश:)
भाग  ( ६७ )   २२/१०/१२

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

मुस्लिम आणि मुस्लिमेतरांचा संबंध कसा असतो?


    ‘पण (इतर कुणी) मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही. कारण बिगर मुसलमान असणे व त्यांचा मुसलमान नसण्याचा अधिकार मुसलमानांनी मान्य करणे यात महत्वाचा असा गुणात्मक फ़रक आहे.’

  अब्दुल कादर मुकादम यांनी तीन वर्षापुर्वी लिहिलेल्या या वाक्याने मुस्लिम नसण्य़ाच्या माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह लावले आहे, त्यामुळेच मी मुस्लिम नसलो तरी मुस्लिम असणार्‍यांच्या बाबतीत व त्यांच्या वागण्याबाबतीत मला चिंता व विचार करणे भाग झाले आहे. कारण त्यांच्या मुस्लिम असण्याकडे मला दुर्लक्ष करून भागत नाही. त्यांचे मुस्लिम असणे माझ्या मुस्लिम नसण्याशीही संबंधित आहे. कोणी हिंदू असेल वा कोणी ख्रिश्चन वा बौद्ध असेल, तर मला त्यांची फ़िकीर करण्याचे काही कारण नाही. कारण माझ्या हिंदू, ख्रिश्चन वा बौद्ध नसण्याला त्यांची मान्यता असण्याचा संबंधच येत नाही. मी कुठल्या धर्माचा आहे किंवा त्यांचा धर्म पाळत नाही, याबद्दल त्यांना फ़िकिर नसेल तर मलाही त्यांच्या धर्माबद्दल किंवा धार्मिक वर्तनाबद्दल उहापोह करण्याचे कारण उरत नाही. आणि मी त्यात पडत सुद्धा नाही. पण मला मुस्लिमांकडे किंवा मुस्लिम म्हणून होणार्‍या त्यांच्या वर्तनाकडे तशी डोळेझाक करता येत नाही. कारण त्यांचे मुस्लिम असणे माझ्या मुस्लिम नसण्याशी संबंधित आहे ना? आणि असे कोणी ओसामा बिन लादेन किंवा आयमान अल जवाहिरी बोललेला नाही. तर मान्यवर मराठी वृत्तपत्रातून ज्याला मुस्लिम विचारवंत म्हणुन एवढी मान्यता आहे, त्या अब्दुल कादर मुकादम या इस्लामच्या अभ्यासकाने उपस्थित केलेला हा गंभीर प्रश्न आहे.

   आता या वाक्याच्या संदर्भाने किंवा तुलनेत अनेक घटना तपासून पाहिल्या; मग मुस्लिमांचा जमाव चिडून रस्त्यावर का येतो त्याचा अंदाज थोडाफ़ार येऊ शकतो. जेव्हा मुस्लिमांना त्याच्या धर्माचे पालन करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो, तेव्हा आपोआपच इतरांनी कुठला धर्म पाळावा किंवा पाळू नये; ते ठरवण्य़ाचा अधिकार मुस्लिमांना प्राप्त होतो, असेच मुकादम यांना सुचवायचे नाही काय? अन्यथा त्यांनी असा प्रश्न मुळात विचारलाच कशाला असता? इस्लाम धर्माचे पालन करणारे मुस्लिम म्हणजे कोणी सरकार वा घटनात्मक सत्ताधारी आहेत काय, की ज्यांच्याकडुन अन्य नागरिकांनी आपापल्या धर्मविषयक मान्यता मिळवायला हव्यात? आपल्या भारत देशामध्ये राज्यघटना आहे, संसद आहे, कायदेमंडळे आहेत. त्यांनी बनवलेल्या कायद्यांचे राज्य आहे. त्यानुसारच अन्य धर्मियांप्रमाणे इस्लामचे पालन करू इच्छिणार्‍या लोकांना मुस्लिम असण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यांच्या मुस्लिम असण्याला हिंदूंची किंवा कुणा ख्रिश्चन नागरिकांची मान्यता आहे काय, असा प्रश्न कधी, कुठे विचारला गेला आहे काय? जिथे जिथे लोकशाही व घटनात्मक सरकारे आहेत, तिथे असा प्रश्न कधीच मुस्लिमांनाही विचारला गेलेला नाही. अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात पहिल्यापासून ख्रिश्चन बहुसंख्या आहे व लोकशाही सरकार आहे. तिथे नंतर आलेल्या वा धर्मांतरित झालेल्या मुस्लिम स्थानिक नागरिकांना, तिथल्या ख्रिश्चनांची मान्यता आहे काय, असा प्रश्न कधी विचारला गेलेला नाही. मग इथे भारतातला एक इस्लामिक पंडीत असा प्रश्न का विचारतो आहे? की मुस्लिमांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य मिळाले, मग आपोआप अन्य धर्मांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार मुस्लिमांनाच प्राप्त होतो, असे मुकादम यांना सुचवायचे आहे?

   हा सगळा नेमका काय प्रकार आहे? की अत्यंत सावधपणे मुकादम असे सुचवत आहेत, की मुस्लिमांना धर्म पालनाचा अधिकार मिळतो, तेव्हा आपोआपच अन्य बिगर मुस्लिमांचे धर्मस्वातंत्र्य संपुष्टात येते? जिथे म्हणून इस्लाम असेल, तिथे आपोआपच अन्य धर्म दुय्यम होतात. किंवा मुस्लिमांना धर्मस्वातंत्र्य मिळाले म्हणजे इतर कुठल्याही विचारसरणी किंवा धर्मश्रद्धेचे स्वातंत्र्य संपुष्टात येते; असे त्यांना सांगायचे आहे काय? कारण बहूतेक ठिकाणी मुस्लिम एकत्र येऊन आपल्या धर्मश्रद्धेचा उदघोष करतात, तेव्हा त्यांचा रोख अन्य मुस्लिमेतरांच्या विरोधात असतो. मग अशी लोकसंख्या दुसर्‍या कुठल्याही धर्मसमुदायाची असते वा मुस्लिमेतर असते. आणि म्हणुनच मुस्लिम असे का वागतात, हा विषय मुस्लिमांपेक्षा मुस्लिमेतरांसाठी जिव्हाळ्याचा बनून जातो. जे मुस्लिम नाहीत, त्यांचे मुस्लिम नसणे इस्लामचे पालन करणार्‍यांना खुपत असते आणि त्यातून अशा प्रतिक्रिया मुस्लिम समाजाकडून दिल्या जातात काय? त्याविषयी चर्चा सुरू झाली, मग त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन खरा प्रश्न टाळला जात असतो. शंका काढल्या मग प्रश्न विचारणार्‍यावरच उलटे आरोप करून टाळाटाळ केली जात असते. म्हणुनच मी मुस्लिमांवर आरोप करणार्‍यांची मते बाजूला ठेवून, शक्य तो मुस्लिम विचारवंत व अभ्यासकांच्या विवेचन व विश्लेषणाचाच बारकाईने अभ्यास केला. त्या विवेचनातून व मतप्रदर्शनातून जे अनेक मूळ आक्षेप आहेत, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयास केला. आणि माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी, की जितके मुस्लिम खर्‍या प्रश्नाबद्दल टाळाटाळ करतात, तेवढेच जगभरचे उदारमतवादीही त्या विषयावर सत्य शोधायची टाळाटाळ करतात. मग अब्दुल कादर मुकादम यांच्यासारख्या वास्तव मुस्लिम अभ्यासकाकडून थोडीफ़ार उत्तरे सापडू शकतात. पण ती अत्यंत बारकाईने शोधली तरच सापडतात. त्यांचाही काळजीपुर्वक अभ्यास करावा लागतो; तेव्हा थोडेफ़ार आकलन होऊ शकते. इथे मुकादम यांनी जो कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर लोकप्रबोधनासाठी वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी उहापोह का करू नये, याचेही आश्चर्य वाटते. की मुस्लिम विचारवंत व अभ्यासकांनी मुकादम यांचा तो दावा बिनतक्रार मान्य केला आहे?

   दोन महिन्यापासून मी ह्या विषयावर लिखाण करतो आहे; तेव्हा अनेक मुस्लिमांनी मला मी मुस्लिमांबद्दल का लिहितो असा सवाल फ़ोनवरून विचारला, त्याचे उत्तर इथे अब्दुल कादर मुकादम यांनी दिले आहे. मी ह्या विषयाचा उहापोह करतो आहे, कारण माझा इस्लाम धर्माशी काहीही थेट संबंध नसला तरी माझ्या मुस्लिम नसण्याला मुस्लिमांची मान्यता असावी लागते, असा एका मुस्लिम विचारवंताचाच दावा आहे. आणि असे असेल तर मला मुस्लिमांच्या अशा वागण्याकडे व अपेक्षांकडे गंभीरपणे बघणे अगत्याचे होऊन जाते. मुस्लिमांचा धर्म किंवा त्यांचे धर्मपालन; हा केवळ त्यांचा व्यक्तीगत वा समाजाच्या अंतर्गत विषय उरत नाही. तो मुस्लिम नसलेल्या बाकीच्या कोट्यवधी मुस्लिमेतरांसाठी अत्यंत गंभीर विषय होऊन जातो. त्याचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नसून त्या मुस्लिमेतरांच्या आसपास वास्तव्य करणार्‍या मुस्लिमांच्या वर्तनाशी जवळचा संबंध येतो. कारण हे जे कोणी माझ्यासारखे मुस्लिम नसतात, त्याच्या तशा मुस्लिम नसण्यात मुस्लिम हस्तक्षेप करू शकतात; असेच मुकादम उघडपणे प्रतिपादन करत आहेत. किंवहूना या जगात मुस्लिम नसण्यासाठी मुस्लिमांकडून मान्यता मिळवणे आवश्यक आहे, असे मुकादम प्रतिपादन करत आहेत. तशी कुठल्या कायद्यात तरतूद नाही. पण तशी मुस्लिमांची मुस्लिमेतरांकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेचा भंग झाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतील, असा अर्थ काढायला जागा आहे. अमर जवान स्मारक किंवा महावीराच्या मुर्तीच्या अवहेलनेचे ताजे उदाहरण त्यासाठी देता येईल. आणि ज्याचा बरावाईट परिणाम मुस्लिमेतरांवर अपरिहार्यपणे होणार आहे, त्यांनी त्याबद्दल बोलूच नये अशी अपेक्षा कशी करता येईल?

   अब्दुल कादर मुकादम हे मुस्लिम समाज व इस्लामचे गाढे अभ्यासक मानले जातात, तेव्हा त्यांच्या अशा लिखाणाकडे कोणीतरी मुर्ख लिहितो, म्हणून दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही. कारण त्यांच्या लिखाणातील ही भाषा व सुचक अर्थ स्पष्ट आहे. मुस्लिमांना त्यांच्या धर्मविषयक कल्पना इतक्या प्रिय आहेत, की त्यापुढे अन्य धर्म किंवा इस्लाम सोडून अन्य कशाविषयीची श्रद्धा मुस्लिमांना अमान्य आहेत. त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही. पण म्हणुन दुसर्‍यांच्या धार्मिक वा अन्य श्रद्धांचे स्वातंत्र्य त्यातून संपुष्टात येते काय? मुस्लिमांच्या मान्यतेशिवाय मुस्लिमेतरांना तसा अधिकारच असु शकत नाही, असा मुकादमांच्या लिखाणातला गर्भितार्थ आहे. आणि मग म्हणुनच त्याच्या वास्तविकतेची तपासणी करणे भाग आहे. आपल्याच धर्मश्रद्धा मानायची किंवा सक्तीने दुसर्‍यावर लादायची प्रवृत्ती त्यातून स्पष्ट होत नाही काय? जर कोणी सुखासुखी ते मान्य करणार नसेल व आपल्या श्रद्धा गुंडाळुन मुस्लिमांना शरण येणार नसेल; तर त्याच्यावर सक्ती करण्याची धमकीच या शब्दातून समोर येत नाही काय? पण मुकादम त्याबद्दल खुलासा न करता विषय व प्रश्न अर्धवट सोडुन देतात. म्हणुन बिघडत नाही. आपल्याला त्याचे उत्तर शोधावेच लागेल. कारण आपण मुस्लिम नसू आणि आपल्याला मुस्लिमेतर रहायचे असेल, तर अशा प्रशाचे उत्तर शोधणे भागच आहे. त्यापासून आपली सुटका होत नाही.( क्रमश:)
भाग  ( ६६ )   २१/१०/१२

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

एका मुस्लिम विचारवंताचे नेमके विश्लेषण


   अब्दुल कादर मुकादम यांना इस्लामचे गाढे अभ्यासक म्हणून मराठी भाषेच्या प्रांतात ओळखले जाते. अधूनमधून ते अनेक मराठी वृत्तपत्रातून मुस्लिम व इस्लामविषय लिखाणही करत असतात. अनेक मराठी वाहिन्यांवर त्यांना असे मुस्लिमसंबंधी विषय असले, मग अगत्याने चर्चेत भाग घ्यायला आमंत्रित केले जात असते. तेव्हा त्यांच्या मुस्लिम विषयक अभ्यासावर विश्वास ठेवायला कोणाची हरकत नसावी. तीन वर्षापुर्वी अब्दुल कादर मुकादम हे दैनिक ‘सकाळ’मध्ये एक साप्ताहिक सदर लिहित होते. त्यावेळी त्यांनी एका लेखामध्ये मुस्लिमांच्या संयमी वृत्तीचे वर्णन केले होते. ते त्यांच्याच शब्दात वाचा.

 ‘जगात मुस्लिम नसणार्‍यांची संख्या मुसलमानांपेक्षा अधिक आहे हे मुसलमानांना माहित आहे व मान्यही आहे. पण मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही. कारण बिगर मुसलमान असणे व त्यांचा मुसलमान नसण्याचा अधिकार मुसलमानांनी मान्य करणे यात महत्वाचा असा गुणात्मक फ़रक आहे. बिगर मुसामानांचा हा अधिकार मान्य करणे म्हणजे मुसलमानांना श्रद्धेय व पूजनिय वाटणार्‍या सर्वच गोष्टींकडे पहाण्याचा दृ्ष्टीकोन मुसलमानांइतका श्रद्धेय असू शकत नाही. त्यांचा दृष्टीकोन चिकित्सक अभ्यासकाचाच असेल हेही मान्य करणे अपरिहार्य ठरते’ 
-अब्दुल कादर मुकादम  (अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धर्मसत्तेचे आव्हान, सकाळ      ८/१२/२००९)

   हा उतारा काळजीपुर्वक वाचण्याची गरज आहे. शक्यतो वाचकांनी दोनतीनदा शांतपणे तो वाचून त्याचे मनन करावे. कारण त्यातली वाक्ये गुंतागुंतीची आहेत. मुस्लिम असणे आणि मुस्लिम नसणे यांच्यातल्या परस्पर संबंधांवर मुकादम यांनी नेमके बोट ठेवलेले आहे. नुसते भाष्य़ केलेले नाही तर मुकादम यांनी खुलेआम एक प्रश्न विचारला आहे आणि प्रश्नाचा रोख बघता, तो प्रश्न जगातल्या तमाम दोनशे कोटी मुस्लिमांना विचारलेला प्रश्न आहे. गुजरातच्या दंगलीचा विषय चर्चेत असला मग मोदींवर किंवा संघावर टिका करायला मुकादम यांना अगत्याने वाहिन्यांवर आमंत्रण दिले जाते. तेव्हा निदान त्यांच्यावर कोणी हिंदूत्वाचा किंवा ब्राह्मणवादाचा आरोप करू शकणार नाही, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी त्यांच्या या उतार्‍याचा उल्लेख इथे केला. नितीन प्रधान यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यात आहे का? मुस्लिम असे का वागतात, या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यात आहे का? मुकादमांचे पहिलेच वाक्य, म्हणजे त्यातला प्रश्न काय आहे? ‘(तुमच्या आमच्या) मुसलमान नसण्याचा (आपला) अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.’ असे मुकादम म्हणतात आणि ते इस्लामचे अभ्यासक आहेत; तेव्हा त्यांनी अत्यंत विचारपुर्वकच असे लिहिले असणार ना? पण त्या वाक्याचा अर्थ काय होतो?

   मुस्लिमांसाठी त्यांचा धर्म आहे आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यासाठी त्यांचा जो कुठला धर्म असेल किंवा नसेल, असे म्हणुन भागत नाही. सवाल आपल्या आपल्या धर्मश्रद्धा किंवा नास्तिकतेचा नाहीच. आपण मुस्लिम असणे किंवा नसणे हा तुमचा-आमचा प्रश्न नसून तो मुस्लिमांचा प्रश्न आहे. कारण तुमच्या मुस्लिम नसण्यालाही मुस्लिमांची परवानगी आवश्यक असते, असेच मुकादम सूचित करत आहेत. त्यामुळेच वरवर कोणी मुस्लिम सांगत असेल, की धर्माचा बाऊ करण्याचे कारण नाही. तुमचा धर्म तुम्हाला आमचा धर्म आम्हाला; तर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो का? ठेवायचा तर मग मुकादम यांच्या वरील विधानाचा अर्थ कसा लावायचा? कारण मुकादम यांचे खरे मानायचे तर मुस्लिमांच्या परवानगी किंवा मान्यतेशिवाय तुम्हाला बिगर मुस्लिम रहाणे शक्य नाही. तो लाखमोलाचा म्हणजेच कळीचा मुद्दा आहे. जेव्हा देशाची राज्यघटना किंवा कायदे मुस्लिमांना त्यांचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य देतात, तेव्हा जे मुस्लिम आहेत त्यांना इस्लामचे पालन करण्याचा अधिकार मिळत असतो. आणि तो अधिकार मिळाला मग इतरांचे मुस्लिम नसणे मान्य करणे किंवा अमान्य करणे हा सुद्धा आपोआपच मुस्लिमांचा अधिकार बनत असतो. असेच मुकादम सुचवित नाहीत काय? आणि तुमचे मुस्लिम नसणे जर मुस्लिमांना मान्य नसेल तर काय? तर त्यांनी काय करावे? असे अनेक प्रश्न आपोआप निर्माण होतात. आणि म्हणूनच मुकादम म्हणतात, ‘हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही’. याचा एक अर्थ असाही निघू शकतो, की तुमचे मुस्लिम नसणे हीसुद्धा इस्लामची अवज्ञा असू शकते आणि म्हणुन तुमचे मुस्लिम नसणे, हे कुणा मुस्लिमाला त्याचा धर्मभावना दुखावणे वाटू शकते. त्याच्या श्रद्धेला धक्का लावणे वाटू शकते. कारण तुमचे मुस्लिम नसणे, हा दिसतो तितका साधा व सरळ प्रश्न नाही. आपण कधी हा प्रश्न किंवा हा मुद्दा समजूनच घेतला नसेल; तर त्यासाठी मुस्लिमांना दोषी ठरवता येणार नाही. अडाणीपणे मुस्लिमांकडे बघणे किंवा आपल्या गैरसमजाबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही.

    ‘सकाळ’ दैनिकात तीन वर्षापुर्वी हा अभ्यासपुर्ण लेख छापून आला आहे. पण त्या दैनिकाच्या संपादकांनी किंवा कुठल्या वाहिनीच्या जाणकार संपादक विश्लेषकांनी त्यावर कधी चर्चा केली आहे काय? का करू नये? त्यातून मुस्लिम समाज, त्याच्या अधिकार व धर्मस्वातंत्र्याबद्दल अशा चर्चेतुन बिगर मुस्लिमांचे प्रबोधन होऊ शकले असते ना? ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठी दैनिक आहे. त्यातून अनेक गहन विषयांचा सातत्याने उहापोह होत असतो. त्यातून अब्दुल कादर मुकादम यांनी एक अत्यंत गंभीर विषयाला तोंड फ़ोडले होते. पण मराठी पत्रकारिता किती भरकटली व दिशाहीन झाली आहे; तेच यातून आपल्या लक्षात येऊ शकते. तिथे मुकादम यांचा लेख ज्या संपादकांनी छापला, त्यांनीही तो गंभीरपणे वाचलेला नसेल. मग त्यातले गांभिर्य किंवा महत्व त्यांना उमगून त्यांनी त्यावर सर्वांगिण चर्चा कशी घडवावी? आणि यामुळेच मुस्लिमांविषयी अकारण गैरसमज जनमानसात निर्माण होत असतात. मुस्लिम समाज स्वातंत्र्योत्तर काळात सतत दुर्लक्षित राहिला असा आरोप काही मुस्लिम नेते व विचारवंत करत असतात. ‘सकाळ’ दैनिकाच्या संपादकीय विभागाचे हे दुर्लक्ष त्याचाच पुरावा मानायला हवा. कारण ज्या लेखाने एक गंभीर मुस्लिम विषयक मुद्दा मांडला होता व त्यातून निदान मरा्ठी वाचकाचे प्रबोधन शक्य झाले असते, त्याकडे पद्धतशीर काणाडोळा करण्यात आला. जर माध्यमातून मुस्लिमांच्या विषयी असलेल्या गैरसमजांना दूर करण्यात अशी टाळाटाळ होत असेल, तर राजकीय मतलबाचाच विचार करणार्‍या पक्षांकडून किती दुर्लक्ष होत असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. असो, मुद्दा मुकादम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा आहे.

   आजवर अनेकदा, मुस्लिम अन्य बिगर मुस्लिमांशी असे का वागतात, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्याची विविध उत्तरे देण्यापासून, उत्तरे टाळण्यापर्यंत अनेक प्रयास झालेले आहेत. पण इथे मुकादम यांनी अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मात्र त्याचे उत्तर त्यांनीही दिलेले नाही. मुंबईत अमर जवान स्मारकाची मोडतोड किंवा मुस्लिमांविषयी जे अनेक आक्षेप आहेत, त्याचे उत्तर या प्रश्नात लपलेले आहे काय? जे मुस्लिम नाहीत त्यांच्या मुस्लिम नसण्याचा मुस्लिमांना त्रास  होतो काय? आणि त्यातून मग हिंसक वा प्रक्षोभक प्रतिक्रिया मुस्लिमांकडून उमटते काय? आपल्याकडून मुस्लिम नसण्याची मान्यता न घेताच जे लोक परस्पर बिगर मुस्लिम रहातात, त्यांना धडा शिकवण्यासाठी मुस्लिम असे वागतात काय? जे काही अश्रद्धेय व इस्लामबाह्य वाटते त्याची मोडतोड मुस्लिम त्यामुळेच करतात काय? पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या. हा मुद्दा मी उपस्थित केलेला नाही, तर एका मुस्लिम विचारवंताने व इस्लामच्या अभ्यासकानेच उपस्थित केलेला आहे. आणि त्याचे उत्तर मुस्लिमांनी देण्याची गरज आहे. ते उत्तर का द्यावे? ते उत्तर मी का मागावे? तर मी मुस्लिम नाही आणि माझ्या मुस्लिम नसण्याचे परिणाम मला आता दिसू लागले आहेत. ते परिणाम वेगवेगळ्या घटनांमधून माझ्या समिप येऊ लागले आहेत. म्हणुनच मला त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे अगत्याचे भासू लागले आहे. आणि मलाच नव्हेतर जगा्तील अब्जावधी मुस्लिम नसलेल्या प्रत्येकाला त्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक होत चालली आहेत.  ( क्रमश:)
भाग  ( ६५ )   २०/१०/१२

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२

सशस्त्र तालिबान इवल्याशा मुलीला का घाबरतात?
   सत्याग्रह म्हणजे शांतता किंवा अहिंसा, असेच अनेकांना ठामपणे वाटते. पण तसे नाही. सत्याग्रह सुद्धा हिंसक असू शकतो आणि जेव्हा असे हिंसक वळण सत्याग्रहाने घेतले; तेव्हा महात्मा गांधींनी आपली चळवळ लगेच गुंडाळली होती. चौरीचौरा येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावाने सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला चढवला; तेव्हा गांधीजींनी सत्याग्रह थांबवला होता. अनेकदा गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहासाठी हे उदाहरण अगत्याने दिले जात असते. पण तेवढेच एक उदाहरण नाही. हिंसक आंदोलनाची चर्चा व विचारविनिमय कॉग्रेसच्या बैठकीतही झालेला होता. स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचा सहभाग या विषयावर डॉ. य. दि. फ़डके यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. अखेरच्या टप्प्यात स्वातंत्र्य चळवळ आली होती. तेव्हा हिंदू व मुस्लिमांचे ऐक्य साधण्याचे प्रयास गांधीजी करत होते. एकाच वेळी आणि एकाच शहरात कॉग्रेस व मुस्लिम लीगची अधिवेशने भरवली जात होती. तेव्हा १९२१ च्या अहमदाबाद अधिवेशनात सत्याग्रहींनी घ्यायच्या प्रतिज्ञेबद्दल खुपच वादळ उठले होते. त्या प्रतिज्ञेचा मसूदा चर्चेत होता. त्यात म्हटले होते की विचाराने, उक्तीने व कृतीने आपण अहिंसक राहू, अशी प्रतिज्ञा स्वयंसेवकाने घ्यायची होती. केवळ अहिंसेने खिलाफ़तचा व पंजाबचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल आणि परिणामत: देशाचे ऐक्य मजबूत होईल व स्वराज्य मिळेल; असा विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला होता. पण त्याला मुस्लिम नेत्यांनी विरोध केला. केवळ अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यास त्यांचा विरोध होता. त्यात मुस्लिम लीगचे तेव्हाचे अध्यक्ष हसरत मोहानी यांचा समावेश होता. आपला धर्म हिंसेचा अवलंब करण्यास मुभा देत असल्याने ‘केवळ अहिंसक’ अशा शब्दप्रयोगाला मोहानी यांनी विरोध केला होता. म्हणजेच सत्याग्रह अहिंसकच असू शकतो, असे तेव्हाही सर्वमान्य नव्हते.

   ही खुप जुनी गोष्ट झाली. अलिकडल्या कालखंडात अल कायदा व ओसामा बिन लादेन ही नावे जगप्रसिद्ध झाली आहेत. पण त्यांचा गाजावाजा कुठून सुरू झाला? १९९१ साली अफ़गाण युद्धात मुजाहिदीन म्हणुन काम केलेल्या लादेनला सौदी अरेबियामध्ये मोठेच वलय प्राप्त झाले होते. अफ़गाण युद्ध संपवून मायदेशी सौदीमध्ये परतलेल्या ओसामाचे राजघराण्यातही वजन वाढले होते. त्या काळात सद्दामने कुवेतवर आक्रमण केल्यावर सौदी सम्राट भयभीत झाले होते. कारण ते आक्रमण पचवले, तर सद्दाम सौदीवरही हल्ला करण्याची शक्यता होती. म्हणून सौदी सम्राटांनी अमेरिकेची मदत घेतली. त्याला लादेनचा आक्षेप होता. सौदी अरेबिया ही इस्लामची पवित्र भूमी आहे आणि तिथे मुस्लिम नसलेल्या अमेरिकन सेनेला पाय ठेवू देता कामा नये; असा त्याचा आग्रह होता. सद्दामचे आक्रमण परतून लावण्य़ासाठी अफ़गाण पद्धतीचे जिहादी युद्ध पुकारण्याची ऑफ़र त्याने सौदी सम्राटांना दिली होती. त्यासाठी आपल्या मुजाहिदीन मित्रांना जमवण्याचेही त्याने सुचवले होते. पण सम्राटांना ती ऑफ़र मान्य झाली नाही आणि त्यांनी विनाविलंब अमेरिकन सेनेला पाचारण केले. त्यातून चिडलेल्या ओसामाने मग आपल्या देशाशीही बंड पुकारले. त्याला त्यासाठी सौदी सोडून परागंदा व्हावे लागले होते. तिथून मग अल कायदाच्या घातपाती कारावाया सुरू झाल्या. आपण म्हणू तेच खरे आणि दुसर्‍याला ते मान्य नसेल, तर तेच मत त्याच्यावर लादण्याची ही मानसिकता दोन्हीकडे सारखी दिसेल. मग समोर अमेरिका असो, सौदी सम्राट असो किंवा कोवळ्या वयातली मुलगी मलाला युसूफ़जाई असो.

   जर्मन तत्ववेत्ता हेनरिक हायने म्हणतो, तसे हे सत्याचे पाठीराखे असतात, त्यांना स्वत:चे सत्य उर्वरितांनी निमू्ट मान्य करावे, असेच वाटत असते आणि त्यात तडजोड  करण्याची त्यांनी तयारी नसते. कधी त्यांची जबरदस्ती आसपासच्या लोकांवर असते; कधी ती सत्तेच्याही विरोधात उभी ठाकते. तिला कायद्याचा धाक नसतो, की इतर कुठल्या बंधनांची पर्वा नसते. ते कायद्याच्या भाषेत गुंड गुन्हेगार असतील. पण त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तर ते सत्याच्या विजयासाठी लढणारे योद्धे असतात, असेच लक्षात येईल. मात्र जे काही त्यांना सत्य वाटत असते, ते सत्य असण्याची गरज नसते, तर तशी त्यांची गाढ श्रद्धा असली, मग पुरे असते. त्यासाठी आयुष्य पणाला लावायला ते सज्ज होतात. त्यातला एक ओसामा बिन लादेन आपल्याला दिसतो. पण युसूफ़जाई हिच्यावर गोळ्या झाडणारा बिनचेहर्‍याचा रहातो. पण दोन्हीकडली मानसिकता सारखीच असते. पण अशी माणसे हिंसा का करतात? तर सत्याचा विजय व्हावा आणि सत्य म्हणजेच पवित्र; अशी त्यांची पक्की धारणा असते. आपल्याला मुल व्हावे किंवा गुप्तसंपत्ती मिळावी, म्हणुन काही लोक नरबळी देण्यापर्यंत मजल मारतात ना? आपण चांगल्या हेतूने व पवित्र कार्य करीत आहोत, अशी समजूत त्यांना अशा मार्गाने घेऊन जात असते. ज्याला तुम्हीआम्ही पाप समजत असतो, त्यालाच ते पवित्र कार्य समजत असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मी ही लेखमाला सुरू केली तेव्हा अमर जवान स्मारकाची मोडतोड करणर्‍या दोन मुस्लिम तरूणांची छायाचित्रे छापुन त्यातला आवेश ओळखायला वाचकांना सुचवले होते. आजच्या लेखात गुजरात दंगलीतला हा दंगेखोर बघा. त्याचा आवेश तरी काय वेगळे सांगतो आहे? आपण काही महान पराक्रमी कृत्य करतोय, असेच त्याचा चेहरा सांगत नाही काय? त्याच्याच सोबत पुन्हा स्मारक तोडणार्‍याकडेही बघा. दोघांमध्ये कितीसा फ़रक आहे?    

   आपल्यालालाच सत्य गवसले आहे आणि आपण महान पवित्र कार्य करतो आहोत; अशी जेव्हा माणसाची धारणा होते, तेव्हा त्या आवेशाची एक वेगळीच नशा चढते. मग त्या नशेत माणुस कुठलेही भयंकर विधीनिषेधशून्य काम सहज करून जातो. त्याच्या त्य कृत्याची तुलना त्याच्या नेहमीच्या वर्तनाशी करता येत नाही. जसा एखादा माणूस दारू किंवा अन्य कुठल्या नशेत काही भलतेसलते करून जातो, तसाच विचारांनी संमोहित झालेला माणुसही वाटेल त्या थराला जाऊन कोणतेही अमानुष कृत्य करू शकतो. मुंबईत पकडला गेलेला कसाब असो, की त्याचे मारले गेलेले नऊ सहकारी असोत. कुठे मानवीबॉम्ब म्हणुन स्वत:लाच उध्वस्त करून घेणारे फ़िदायिन असोत, त्यांना विवेक नसतो, कारण ते विचारांच्या संमोहनाने भारावलेले असतात. ते स्वत:विषयी व्यवहारी विचार करण्याच्या पलिकडे गेलेले असतात, त्यांच्याकडुन दुसर्‍यांच्या भल्याबुर्‍याचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा करता येईल का? म्हणून तर सुखीसमाधानी चैनीचे जीवन सोडुन ओसामा कष्टप्रद जिहादी जीवन कंठत दोन दशके खडतर जीवन जगला. किडामुंगीप्रमाने मरणे त्याने पसंत केले. इतरांना तसेच मारणेही त्याला चुकीचे वाटले नाही. ज्यांची अशी समजूत पक्की झालेली असते, त्यांच्याकडुन विवेकी वर्तनाची वा सहजीवनातील सहिष्णू वर्तनाचीही अपेक्षा कधी बाळगता येत नाही. मलाला किंवा तिच्यासारख्यांना त्या विक्षिप्त वाटणार्‍या समजूतीचे बळी व्हावे लागत असते. एक म्हणजे अशा समजूतीमध्ये वावरणार्‍यांचा नेहमीच्या कायद्यापलिकडे जाऊन बंदोबस्त करणे किंवा त्यांचे बळी होणे, इतकाच मलालासमोर पर्याय असतो. आपल्यासमोर सुद्धा तोच पर्याय असतो.

   ‘सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो’, असे बर्ट्रांड रसेल हा विचारवंत सांगतो. त्यात मलाला हिच्यावर हल्ला करणार्‍याच्या मनोवृत्तीचे उत्तर सापडते. ज्यांना आपल्यालाच सत्य गवसले आहे व जीवनातले पावित्र्य उमगले आहे अशी पक्की समजूत तयार होते, त्यांना मग त्याप्रमाणे जो कोणी वागत-जगत नाही, त्याच्यामुळे त्या पवित्र सत्याला धोका आहे; असेच सतत वाटू लागते. मग त्या सत्याच्या संरक्षणार्थ त्याला मैदानात उतरण्याची अतीव इच्छा प्रवृत्त करत असते. मग जे आपल्यासारखे नाहीत, आपले मानत नाहीत, आपल्यासारखे दिसत वा वागत नाहीत, त्यांच्यापासुन धोका आहे असा भयगंड निर्माण होतो आणि क्रियेपुर्वीच प्रतिक्रिया देण्याची उर्मी उसळून येते. म्हणूनच मलाला हिच्यासारखी इवली शाळकरी नि:शस्त्र मुलगी त्या हल्लेखोर तालिबानांना स्वत: सशस्त्र असूनही भितीदायक वाटू लागते. तिचे वा अन्य कुणाचे आपल्यासारखे नसणे, हीच त्यांची समस्या बनते, भिती बनते. त्यातून असे अमानुष हल्ले व कृती घडत असतात.      ( क्रमश:)
भाग  ( ६४ )   १९/१०/१२