मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

मलाला युसूफ़जाईचा अनुभव काय सांगतो?




   दोन महिने ही लेखमाला लिहितांना मी मुस्लिमांच्या वर्तनातले अनेक दोष दाखवतो आहे. पण तसे करताना जेवढ्य़ा मुस्लिम वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या, त्यापेक्षा कमी का होईना नाराज मुस्लिमांच्या प्रतिक्रियाही आल्या. त्यापैकी काहींचा मी इथे उल्लेखसुद्धा केला आहे. पण दु्सरीकडे अनेक हिंदूंच्याही संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांचाही दावा लक्षात घ्यायला हवा. जर मुस्लिमांच्या इतक्या चुका वा दोष मी दाखवतो; तर त्यावरच हिंदूंकडून उमटणार्‍या प्रतिक्रियांचे समर्थन व्हायला हवे, असा या नाराज हिंदूंचा दावा असतो. चटकन युक्तीवादासाठी ही पटणारी बाब आहे. एकाने चुक केली तर प्रतिक्रिया म्हणून येते, तिला चुक म्हणता येत नाही. असा हा पटणारा तरीही फ़सवा युक्तीवाद आहे. कारण मग त्या चुकीच्या प्रतिक्रियेवर पुन्हा प्रतिक्रिया येणारच आणि तिचे समर्थन पुन्हा आधीच्या चुकीकडे बोट दाखवून केले जाणार. थोडक्यात चुकांची एक अखंडीत मालिकाच सुरू होते. तिला थांबवण्याचा मार्गच शिल्लक उरत नाही. किंबहुना तीच तर माझी चिंता आहे. मुस्लिमांचे जे दोष आहेत, त्यावरच्या प्रतिक्रिया म्हणुन हिंदूंमध्ये जी नकारात्मक मानसिकता निर्माण होते आहे, त्याच चिंतेने मला अधिक अस्वस्थ केले आहे. मग मी तिचे समर्थन कसे करणार? कारण त्यातून आज मुठभर हिंदूंना आपल्या कडवेपणाचा अहंकार सुखावण्यासाठी चोख उत्तर दिल्याचे तात्पुरते समाधान मिळू शकेल. पण त्यातून हिंदू समाजातील आजवर जोपासलेल्या सहिष्णू वृत्तीला त्यातून ग्रहण लागत जाईल त्याचे काय? हिंदूमध्ये जो कडवेपणा वाढत जाईल, तो आज मुस्लिमांच्या आक्रमकतेला लगाम लावण्यासाठी उपयुक्त वाटेल. पण तोच धार्मिक कडवेपणा उद्या हिंदूंच्या उदारमतवादालाही वेसण घालायची वेळ आणल्याशिवाय रहाणार नाही. त्याचेच उदाहरण आज पाकिस्तानात दिसते आहे. मलाला युसुफ़जाई या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो कशातून उदभवला आहे? ज्या एका हल्ल्याने पाकिस्तान खडबडून जागा झाला आहे, ती परिस्थिती कशातून उदभवली आहे?

   धर्माचे अवडंबर माजवणार्‍यांच्या माथेफ़िरूपणावर पांघरूण घालण्यात ज्या पाकिस्तानी सुशिक्षित वर्गाने आपली बुद्धी खर्ची घातली; त्याच पापाची फ़ळे भोगण्याची पाळी आज त्यांच्यावर आली आहे. जेव्हा मुजाहिदीन, जिहादी किंवा तालिबानी प्रवृत्ती धर्माच्या नावाखाली पाकिस्तानात डोके वर काढत होती; तेव्हा तिथल्या बुद्धीवादी वर्गाने अमेरिकन धोरणांच्या विरोधातल्या आपल्या रागासाठी अशा हिंसक दहशतवादी प्रवृत्तीला पाठीशी घालणरे युक्तीवाद केले होते.  त्यातूनच त्या घातपाती वृत्तीला सर्वसामान्य जनतेकडून पाठबळ मिळत गेले. अमेरिकेच्या चुका असतील. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्याही चुका झाल्या असतील. पण त्यांच्या चुकांवर बोट ठेवताना घातपाती प्रवृत्तीला ताकद मिळणार नाही, याचे भान पाकिस्तानी बुद्धीवादी वर्गाने फ़ारसे ठेवले नाही. दोन धोके समोर असतात, त्यातला छोटा धोका पत्करून मोठ्या संभाव्य धोक्याच्या विरोधात उभे रहाणे हा शहाणपणा असतो. कारण कोण शिरजोर झाला तर आपल्याला दुरगामी विपरित परिणाम भोगावे लागतील, याचा विचार करूनच भूमिका घ्याव्या लागत असतात. एकदा बाहेरच्या वाटणार्‍या शत्रूचे निर्दालन केल्यावर आतल्या शत्रूकडे वळता येत असते. पण आतला शत्रूच संभाव्य काळातील मोठा धोका होण्याची शक्यता असेल, तर बाहेरच्या शत्रूशी हात मिळवणी करून आतल्या शत्रूचा बिमोड करावा लागतो. पाकिस्तानातील बुद्धीवादी वर्गाला त्याचे भान राहिले नाही आणि अमेरिकन विरोधाच्या नादात, त्यांनी तिथल्या धर्मांध वृत्तीला शिरजोर होण्यास हातभार लावला. मग त्यात पाकिस्तानी शासन यंत्रणा व राजकीय समिकरणेच परिणामशुन्य होऊन गेली आहेत. शासकिय कायद्यांना झुगारण्यापर्यंत तिथले अराजक जाऊन पोहोचले आहे. मलाला युसुफ़जाई त्याचाच बळी ठरली आहे.

   आपल्याकडे होणारे घातपात, दहशतवाद किंवा मुस्लिमातील अलिप्तता यांचे दोष दाखवताना हिंदूंच्या कडवेपणाचे समर्थन म्हणूनच करत येत नाही. कारण आज अशा प्रवृत्ती मुस्लिमांच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी खुप सोयीच्या वाटतील. पण उद्या त्यांची शिरजोरी तालिबानी मानसिकतेप्रमाणे कायदेबाह्य मनमानीपर्यंत जाण्याचा धोका असतो. म्हणूनच आपण काय करतो त्याचे भान राखावे लागते. आज पाकिस्तानची स्थिती काय आहे? दहा वर्षापुर्वी न्युयॉर्क येथील जुळ्या मनोर्‍यांवर विमाने आदळून जो घातपात करण्यात आला, त्याचा निषेध करतानाच पाकिस्तानी पत्रकार व बुद्धीवादी पळवाट काढून सुडचक्राचे समर्थन करत होते. आधी लादेनला अमेरिकेनेच मोठा केला, असे युक्तीवाद करताना त्या बुद्धीवाद्यांचा अमेरिकाविरोध सुखावत होता. पण त्यातून जी दहशतवादी मानसिकता पाकिस्तानात शिरजोर झाली, त्यांनी आता तालिबान हे नाव धारण करून पाक माध्यमे व बुद्धीवादी वर्गासमोरच आव्हान उभे केले आहे. मलाला या मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्या वर्गाचे डोळे उघडले आहेत. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. आजवर त्याच दहशतवादाला बौद्धिक बळ देण्याचे पाप त्याच पाकिस्तानी मध्यमे व बुद्धीवाद्यांनी केलेले होते. एकदा अमेरिका बाजूला झाल्यावर आता तोच दहशतवाद त्याच बुद्धीवाद्यांच्या मूळावर आला आहे. आणि म्हणूनच कशाला विरोध करतो आणि तो करताना आपण कोणाला चुकीचे समर्थन देत नाही ना, याचेही भान ठेवावे लागत असते. म्हणूनच मुस्लिमांचे दोष दाखवणे म्हणजे त्यावरला उपाय म्हणून हिंदूंमधल्या कडवेपणाचे समर्थन करणे, असा होऊ शकत नाही. दुर्दैवाने तीच परिस्थिती हळुहळू आपल्याकडे येत आहे आणि त्याचीच मला मोठी चिंता वाटते आहे.

   नरेंद्र मोदी यांच्यावर शेकडो आरोप कायम होत असतात. पण दुसरीकडे त्या आरोपांच्या अतिरेकामुळे मुस्लिमांच्या चुकांवर मोदी हाच पर्याय असल्याची एक राजकीय भूमिका हिंदूमध्ये डोके वर काढते आहे. आणि जेव्हा ‘मोदी’ असे म्हटले जाते; तेव्हा कडव्या हिंदूत्वाचा किंवा मुस्लिम विरोधाचा संदर्भ त्या भूमिकेला आपोआपाच जोडलेला असतो. मोदी यांनी किती विकास केला, गुजरातची किती प्रगती केली, यासाठी त्यांचे समर्थन होत असेल तर हरकत नाही. त्याकरिता त्यांची लोकप्रियता वाढणार असेल तर बिघडत नाही. पण मुस्लिमांच्या विरोधातला खंबीर नेता; अशी त्यांची प्रतिमा लोकप्रिय होणे मला अत्यंत घातक वाटते. कारण त्यातून हिंदूंमध्ये धर्मांधतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे, जाते आहे. कालपरवा नांदेडच्या महापालिकेचे निकाल लागले, त्यात मुस्लिमांच्या इत्तेहाद पक्षाने मिळवलेले यश मुस्लिम मतांच्या धृविकरणाचा पुरावा आहे. आणि त्याचा परिणाम आज दिसणार नाही. केवळ एकगठ्ठा मतांच्या बळावर फ़क्त मुस्लिम वस्त्यांमध्येच उमेदवार उभे करून त्या पक्षाने मिळवलेले यश लक्षणिय आहे. पण त्याची प्रतिक्रिया दुसरीकडे सेना-भाजप यांच्याकडे हिंदू मतांचे धृविकरणाने होऊ शकते. अबू आझमी यांनी रिकाम्या केलेल्या भिवंडी मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, तेव्हा सेनेच्या एकमेव हिंदू उमेदवाराला उभा करून तशा धृविकरणाचा प्रयोग दिड वर्षापुर्वी यशस्वी करण्यात आला आहे. आज नांदेडच्या मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये इत्तेहादने कॉग्रेसला पराभूत केले आहे. पण तसाच मग हिंदूवस्त्यांमधले धृविकरण कॉग्रेसचा पराभव करू शकणार आहे. तो पक्षांचा जयपराजय नसेल तर हिंदू वा मुस्लिम आक्रमकतेचा जयपराजय असेल. ते या देशाला मानवणारे आहे काय?

   आणि म्हणूनच या लेखमालेत मुस्लिमांचे दोष दाखवताना त्यावर उपाय शोधले जावेत, त्यावर चर्चा व्हावी ही माझी अपेक्षा आहे. पण त्याचा अर्थ हिंदूंच्या दोषावर पांघरूण घातले जावे असा अजिबात होत नाही. मुस्लिमांमध्ये दोष आहेत म्हणून हिंदूंचे दोष समर्थनिय ठरत नाहीत. त्याबद्दलची चर्चा अनेक माध्यमातुन सतत होत असते. अगदी पुण्यनगरीमध्येच श्याम मानव किंवा अन्य सेक्युलर लेखक हिंदूंच्या गुणदोषांबद्दल नियमितपणे लिहित असतात. संभाजी ब्रिगेड वा अन्य संघटनांकडून त्या दोषांवर कडाडून बरीवाईट टिका होतच असते. पण मुस्लिमांच्या दोषावर वा चुकांवर सहसा चर्चा करण्याचे टाळले जाते. संघ किंव शिवसेनेच्या माध्यमातून मुस्लिमांवर होणारी टिका किंवा दाखवले जाणारे गुणदोष सवंग असतात. त्यामुळे त्यातून दोष दुर होण्याची शक्यताच नसते. परिणामी एखादी भयंकर घटना घडली; मग मुस्लिमेतरांच्या मनातल्या शंका संशयाला खतपाणी घालण्यापलिकडे त्या टिकेचा काहीही उपयोग नसतो. सुधारणा व बदल होण्याचा सवाल आहे. पण मुस्लिमांच्या दोषामुळे हिंदूंमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे मानायचे कारण नाही. मी त्या गुणदोषांचे समर्थन करतो, असेही समजण्याचे कारण नाही. आणि मुस्लिमांचे दोष दाखवले म्हणून मी हिंदूंच्या समर्थनाला उभा ठाकलो अशीही समजूत करून घेण्याचे कारण नाही. पत्रकाराने मुद्दे उपस्थित करावे, चर्चेला चालना द्यावी आणि स्वत:चे मत व भावना बाजूला ठेवून अलिप्तपणे विषय हाताळावा, असेच माझे मत आहे. मलालाच्या निमित्ताने जे आत्मचिंतन पाकिस्तानात सुरू झाले, तेच इथे व्हावे हीच माझी अपेक्षा आहे.    ( क्रमश:)
भाग  ( ६२ )   १७/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा