सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

अविष्कार स्वातंत्र्य, की बदमाशांचे राज्य?


   झी न्युजच्या संपादक व मालकांवर जिंदाल या उद्योगपतीने खटला भरल्यावर माध्यमांच्या क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे. कारण जिंदाल यांनी खटल्यावर न थांबता त्यांना भेटायला आलेल्या सुधीर चौधरी व समीर अहलुवालिया अशा दोन पत्रकारांशी झालेली बातचित व चित्रण; सीडी बनवून माध्यमांनाच सादर केले. त्यात काटछाट असल्याचा खुलासा झी न्युजने केला आहे. अगदी समजा जिंदालने दिलेली सीडी अर्धसत्य आहे. पण त्यात हे दोन्ही पत्रकार दिसतात ते तर खरे आहे ना? त्या दोघांनी नंतर खुलासा करताना झालेला संवाद नाकारलेला नाही. शंभर कोटी रुपये मागायला गेलेलो नव्हतो, तर जिंदाल कंपनीच बातम्या दडपण्यासाठी शंभर कोटी रुपयांची जाहिरात द्यायला निघाली होती; असा दोघा पत्रकारांचा दावा आहे. सवाल असा, की त्यांनी हा उद्योग कशाला करावा? त्यांच्या हाती पुरावे लागले होते; तर त्यांना जिंदाल यांच्या दलालांना भेटण्याचे कारणच काय होते? खोटे जाहिरात कंत्राट करून जिंदाल बातम्या दाबायला सांगतात, असे दाखवण्याची हौस कशाला होती? तसे असेल तर जिंदाल यांच्याकडे रितसर जाहिरात विभागाचा प्रतिनिधी पाठवता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. उलट आपल्याकडे जिंदाल कंपनीच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, त्याची चर्चा करायला हे दोघे तिकडे गेले होते. त्याची काय गरज होती? जिंदाल बातम्या दाबू बघतात, ही त्यांना बातमी करायची होती, की कोळसा घोटाळा उघड करायचा होता? बातमी आहे तशी द्यायची होती, की बातमी घडवायला हे दोघे तिकडे गेले होते? सरळ सांगायचे तर जाहिरातीचा विषय हा व्यवहाराचा भाग झाला. तो करणार्‍याला पत्रकार म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच हे दोघे पत्रकार बदमाशच म्हणायला हवेत. त्यांना पत्रकार म्हणून मुखवटा लावायची गरज नाही.

   पुर्वीच्या काळात सवयीचे गुन्हेगार असा एक प्रकार होता. म्हणजे काही जमातींना ब्रिटीश राजवटीने सवयीचे गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. म्हणजे त्यांचा व्यवसाय किंवा पेशाच गुन्हेगारी मानला जायचा. आजकाल तसे राहिलेले नाही. पण नव्या परिस्थितीत काहीजण सवयीचे गुन्हेगार असल्यासारखे वागतात. त्यांना दाखलेबाज म्हणतात. झी न्युज- जिंदाल प्रकरणात संपादक सुधीर चौधरी हा तसा सवयीचा गुन्हेगार मानता येईल. काही वर्षापुर्वी हा इसम बहुधा लाईव्ह २४ नावाच्या वाहिनीचा संपादक होता. तेव्हाही त्या वाहिनीने दिल्लीतील एका नामवंत शाळेसंबंधाने छुप्या चित्रणाची बातमी प्रक्षेपित केली होती. त्या शाळेच्या प्राचार्या मुलींना गैरमार्गाला लावतात व वेश्या व्यवसायाला जुंपतात; अशी ती बातमी होती. त्यात बाकीचा काहीही तपशील नव्हता. त्यात एका मुलीची चेहरा झाकून मुलाखत दाखवण्यात आली होती आणि ती मुलगी तसे होत असल्याचे सांगते, असे दाखवले होते. तर दुसरीकडे त्या प्राचार्या महिलेची छुप्या कॅमेराने मुलाखत घेऊन त्यांना काही प्रश्न विचारलेले दाखवले होते. त्याचे प्रक्षेपण होताच खळबळ उडाली. ती बातमी बघून शेकडो पालक त्या शाळेत धावून गेले आणि त्यांनी दंगल केली. प्राचार्यांना वाचवण्यासाठी तिथे पोलिस बंदोबस्त उभा करावा लागला. पुढे त्या बातमीत किती तथ्य आहे; याची इतर वाहिन्यांवर चर्चा झाली, त्यात हाच इसम छातीठोकपणे बातमी खरी असल्याचा दावा करत होता. पण लौकरच त्याचे पितळ उघडे पडले. कारण ज्या मुलीने असे प्राचार्यांवर आरोप केले होते, ती चेहरा झाकलेली मुलगी, त्या शाळेची विद्यार्थिती नव्हती तर त्याच चॅनेलमध्ये बातमीदार असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थच सुधीर चौधरी हा इसम विश्वासार्ह नाही. अशा रितीने खोटे चित्रण, खोटे पुरावे व खोट्या वावड्या उडवून खळबळ माजवण्याची त्याची विकृत प्रवृत्ती जुनीच आहे. किंबहुना त्याला सवयीचा गुन्हेगार म्हणता येईल.

   हे ताजे प्रकरण चव्हाट्यावर आले आणि जिंदाल याने झी न्युजवर आरोप केलेला दिसला. सोबत सीडी दिल्याचे दाखवण्यात आले; तेव्हाच मला चौधरीच्या खोटेपणाची खात्री पटली होती. कारण आधी त्याचे हे जुने प्रकरण माझ्या लक्षात होते. पण कुठल्याही वाहिनीने ही जिंदालची सीडी दाखवताना किंवा त्यावर भाष्य करताना; सुधीर चौधरी याची गुन्हेगारी वृत्ती किंवा जुनी पार्श्वभूमी अजिबात सांगितली नाही. याचा अर्थ आपल्यातल्या एका बदमाशाला वाचवण्याचाच तमाम वाहिन्यांनी प्रयास केला. जो माणुस धडधडीत खोटे बोलून व दाखवून, एका सभ्य सुशिक्षित प्राचार्य महिलेच्या प्रतिष्ठेशी खेळू शकतो; तो किती बनेल गुन्हेगार असेल त्याची नुसती कल्पना केली तरी पुरे आहे. पण असा माणूस अजून त्याच क्षेत्रात आहे आणि एका वाहिनीचा संपादक म्हणुन काम करतो. त्याला उघडा पाडायलाही अन्य वाहिन्या तयार नसतील, तर त्या क्षेत्रात सगळेच तसे आहेत मानायला हरकत नसावी. बातम्या देण्यापेक्षा बदनामीच्या धमक्या देऊन लाभ उकळणे, ही पत्रकारिता आहे काय? नसेल तर चौधरी हा माणूस वाहिन्यांच्या संपादक संघटनेचा पदाधिकारी कसा होऊ शकला? आता त्याच्यावर आरोप झाल्यानंतर त्या संघटनेने त्याला हाकलून लावले आहे. इतक्या घाईगर्दीने त्याच्यावर संघटनेने कारवाई केली म्हणजेच त्याची पार्श्वभूमी त्यांना ठाऊक होती. मग मुळात त्याला सदस्यत्वच का देण्यात आले? आणि इतके झाल्यावरही उर्वरित वृत्तवाहिन्या त्याची अशी संशयास्पद पार्श्वभूमी का सांगत नाहीत? शुक्रवारी बहुतेक वाहिन्यांनी पत्रकारितेची विश्वासार्हता संपत चालली आहे काय, या विषयावर चर्चा घडवून आणल्या. पण त्यातही कोणी चौधरीने काही वर्षापुर्वी केलेल्या शाळाविषयक बदमाशीचा उल्लेखही केला नाही. जे लोक गडकरी यांच्या दहा पंधरा वर्षापुर्वीच्या व्यवहाराची कागदपत्रे शोधून काढतात व त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांचे पत्ते शोधून काढतात. रॉबर्ट वाड्रा यांच्या जुन्या नव्या व्यवहाराचे धागेदोरे शोधून काढू शकतात, त्यांना सुधीर चौधरी याच्या पापकर्माचा थांगपत्ता नसतो, यावर कोणी विश्वास ठेवायचा? ज्याअर्थी त्याला वाचवायचा वाहिन्यांनी आपल्या बातम्या व चर्चेतून प्रयत्न केला; त्याअर्थी असेच सर्वांचे व्यवहार चालतात असे मानायला वाव आहे.

   ह्याला कोणी आविष्कार स्वातंत्र्य म्हणत असेल तर त्याला रस्त्यात धरून लोकांनी बडवला तर तोही लोकांचा अविष्कारच म्हणायला हवा. कारण अविष्कार स्वातंत्र्य म्हणजे लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचे किंवा व्यत्यय आणण्याचे स्वातंत्र्य नाही. इतरांच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार कोणाला स्वातंत्र्य म्हणून मिळत असेल, तर अजमल कसाबलाही फ़ाशी देण्याचे काय कारण आहे? त्याने तरी कय वेगळे केले आहे? अधिकार हा जबाबदारी घेऊनच येत असतो. आपण प्रसिद्धी क्षेत्रात आहोत, तेव्हा कोणाविषयी काहीही छापताना त्यात सत्यता आहे, याचीही काळजी घ्यायला हवी. मनमानी करून चालणार नाही. बदनामी होत असेल तर त्याने कोर्टात जावे, असे पत्रकारांचे दावे ही शुद्ध दिशाभूल आहे. कारण त्यात बेजबाबदारपणा आहे. तुम्ही खोडी काढणार आणि तुमचा बंदोबस्त करण्यासाठी त्या पिडीताने आपला कामधंदा सोडुन तुमच्यासोबत कोर्टात फ़ेर्‍या मारायच्या काय? कशासाठी? तुमचे अविष्कार स्वातंत्र्य जपण्यासाठी त्याला शिक्षा कशाला? आणि अनेकदा त्यात पंधरावीस वर्षे खर्ची पडतात. मग कंटाळून खटला भरणारा चार ओळींच्या माफ़ीनाम्यावर तडजो्ड करतो. कारण खटल्यातून कित्येक वर्षे, अनेक दिवस वाया जातात, पण निष्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे पत्रकारिता ही बदनामीचा धंदा झालेला आहे. मग अनेक लोक कायदेशीर मार्ग पत्करण्यापेक्षा त्या सतावणा‍र्‍या समंधाला शांत करण्याकडे वळतात. त्यातूनच मग ब्लॅकमेलचे प्रकार वाढले आहेत. अनेक वर्षे राबून वा मेहनत करून कोणी समाजात प्रतिष्ठीत झालेला असतो. एका फ़सव्या बातमीने त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली जात असते. तेव्हा आपण बातमी देत नसून एका व्यक्तीच्या प्रतिष्ठा व आयुष्याशी खेळत आहोत, याचे भान पत्रकारांनी ठेवायचेच नाही काय?

   आठ महिन्यांपुर्वी शिवसेनेचे खासदार आनंद अडसुळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाणार असल्याची धडधडीत खोटी अफ़वा, महाराष्ट्र टाईम्सने प्रकाशित केली. मग त्यामुळे चिडलेल्या अडसुळ समर्थकांनी त्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. तर आपल्या चुकीची माफ़ी मागणे बाजूला राहिले. त्या पत्राच्या संपादकांपासुन पत्रकार संघटनांपर्यंत सर्वांनी हल्लेखोराचा निषेधच केला. याला बेशरमपणा नाहीतर काय म्हणायचे? त्यापेकी एकानेही महाराष्ट्र टाईम्सचा निषेध केला नव्हता. यालाच चोरावर शिरजोर असे म्हणतात ना? हे अशा मान्यवर वृत्तपत्रातून होत असेल तर गल्लीबोळातील किरकोळ वृत्तपत्रात काय चालले असेल, त्याचा नुसता अंदाज करावा. विश्वासार्हता त्यातूनच संपली आहे. म्हणुनच वृत्तपत्राच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही कोणी किंमत वाढवू शकत नाही. कारण त्यात वाचण्यासारखे काहीच उरलेले नाही. नुसत्या उखाळ्यापाखाळ्य़ा असेच वृत्तपत्रांचे व वाहिन्यांवरील बातम्यांचे स्वरूप झाले आहे. ज्याला अराजक म्हणतात अशी आजच्या पत्रकारिता व माध्यमांची अवस्था आहे. आणि हेच अर्धवटराव अण्णांची विश्वासार्हता संपली काय अशी चर्चा करतात.   ( क्रमश:)
भाग  ( ५ )  ३०/१०/१२

२ टिप्पण्या: