मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिम समाजात ‘प्रबोधनकार’ का नकोत?


    ‘डॉ. नाईक यांनी गणपतीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा तोरसेकरांनी नक्कीच प्रतिवाद करावा. पण त्या प्रतिउत्तरादाखल "हिंदू पुराण, वेद किंवा ख्रिश्चन बायबल जेवढे अनाकलनिय आहे, तेवढ्याच अनाकलनिय गोष्टी व कथा इस्लामी ग्रंथामध्ये शोधून दाखवता येतील" हा तोरसेकरांनी केलेला खोटा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. इस्लामी साहित्य म्हणुन काही वर्णवादी ज्यू लोकांनी नक्कीच काही खोट्या गोष्टी इस्लामच्या नावाने पुस्तके छापून घुसडल्या आहेत. पण त्या गोष्टी खर्‍या की खोट्या, याची चाचपणी करण्यासाठी कुराण हा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडतो. कुराण हे जगातले एकमेव अपरिवर्तित इश्वरी ग्रंथ असल्यामुळे इस्लामची मूळ शिकवण अबाधित राहिली आहे. म्हणून मूळ इस्लामी विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते आणि त्या चिकित्सेत मूळ इस्लामी साहित्य (कुराण व हदिस) हे पुर्णपणे खरे उतरतात. लेखकांनी त्यात अवैज्ञानिक असे काही पाहिले असेल, तर त्यांनी बिनधास्त त्याचा उल्लेख करावा. आम्ही त्याचा प्रतिवाद करू. धर्माचा असा बाऊ बनवू नये. तर त्यावर दिलखुलास चर्चा व्हावी.’

   नौशाद उस्मान यांनी मला पाठवलेल्या व पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्रातील हा एक परिच्छेद आहे. चटकन वाचून हातावेगळा केल्यास त्यातल्या खाचाखोचा लक्षात येणार्‍या नाहीत. पण एकएक शब्द जपून वाचला व समजून घेतला तर त्यातली गफ़लत लक्षात येऊ शकेल. इस्लामी धर्मग्रंथ व साहित्य यातील अनाकलनिय गोष्टीही दाखवता येतील, असे मी एका लेखात म्हटले होते यात शंका नाही. त्याबाबतीत मला खोटे पाडताना व चिकित्सेचे आव्हान देताना नौशादभाईंनी केलेला युक्तीवाद जपून वाचला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जे काही माझे आक्षेप असतील ते वर्णवादी ज्यूंनी इस्लामी साहित्य म्हणुन प्रकाशित केलेत, त्यातूनच मी उचलले आहेत असे त्यांचे गृहित आहे. त्यासाठी मी नेमके काय आक्षेप घेतो ते तपासण्याची त्यांना गरजही वाटलेली नाही. मी काही म्हणण्यापुर्वीच त्यांनी माझ्या आक्षेपावर खो्टेपणाचा शिक्का मारून टाकलेला आहे. ज्याला चिकित्सा करायची आहे वा मान्य आहे, त्याने निदान ती चिकित्सा होण्यापर्यंत तरी संयम राखला पाहिजे. त्याआधीच खोटेपणाचा आरोप करणे बौद्धीक कसोटीला उतरू शकते का? ‘धर्माचा बाऊ करू नये, तर त्यावर दिलखुलास चर्चा व्हावी’ असे सांगणारे नौशादभाई आधीच मी वर्णवादी ज्युंचे दावे मान्य करून बोलतोय असे का गृहित धरतात? आणि दुसरीकडे तेच नौशादभाई प्रबोधनकारांच्या पुस्तकाचा दाखला देताना त्यातले दावे शंभर टक्के खरेच मानत असतात.

   प्रबोधनकार हिंदूच नव्हे, तर कुठल्याही धर्माच्या अवडंबराच्या विरोधात होते आणि म्हणूनच त्यांनी हिंदू धर्मग्रंथाविषयी जी खिल्ली उडवली आहे, ती नास्तिकतेच्या भूमिकेतून केलेली आहे. जसे वर्णवादी ज्य़ुधर्मिय इस्लामला धर्म मानायला तयार नाहीत, म्हणूनच त्यातले मुद्दे व तत्वे खोडून काढत असतात, तसेच प्रबोधनकार ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या हिंदू धर्माला झुगारण्य़ासाठीच लिहित होते. ज्या आधारावर नौशादभाईंना इस्लामची चिकित्सा व्हावी असे वाटते, त्याच तत्वानुसार प्रबोधनकारांनी देऊळ व धर्माची चिकित्सा केली असती तर? नौशादभाईंचा चिकित्सेचा नियम काय आहे?

   ‘कुराण हे जगातले एकमेव अपरिवर्तित इश्वरी ग्रंथ असल्यामुळे इस्लामची मूळ शिकवण अबाधित राहिली आहे. म्हणून मूळ इस्लामी विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते आणि त्या चिकित्सेत मूळ इस्लामी साहित्य (कुराण व हदिस) हे पुर्णपणे खरे उतरतात.’ 

   हा निकष वा नियम काय आहे? कुराण अपरिवर्तनिय इश्वरी शब्द आहे आणि म्हणुनच ते सत्य मानून त्याच तर्कानुसार चिकित्सा होऊ शकते. प्रबोधनकार ठाकरे यांनी हाच नियम वापरला असता तर त्यांनाही मूळ हिंदू धर्मग्रंथ, त्यातल्या कथा व तर्क निमूट मानावे लागले असते. आपली विवेकबुद्धी वापरून चिकित्सा करताच आली नसती. पण तसे झालेले नाही. आपल्या मानवी व विवेकी बुद्धीनुसारच प्रबोधनकारांनी हिंदू धर्मग्रंथ किंवा त्यातले दावे तपासले आहेत. त्यानुसारच भाष्य़ केले आहे. त्या ग्रंथ किंवा त्यातल्या दाव्यांना त्यांनी ईश्वरी अपरिवर्तनिय शब्द मानलेले नाही. तर त्यातल्या त्रुटी शोधण्याचा प्रयास केला आहे. म्हणुनच मग ते गणपती किंवा अन्य हिंदू धर्म संकल्पनांवर बेधडक हल्ला चढवू शकले आहेत. त्यांना जे स्वातंत्र्य त्यांच्या हिंदू समाजात मिळाले, तेच स्वातंत्र्य इस्लाम पाळणार्‍या कुणाला उपलब्ध आहे काय? नौशादभाई मला काय सांगत आहेत? कुठल्या आधारावर चिकित्सा होऊ शकते म्हणत आहेत? आज जे आधुनिक तर्कशास्त्र व विज्ञान विकसित झाले आहे, त्याच्या आधारे इस्लामची चिकित्सा नौशादभाई म्हणत नाहीत, तर ‘मूळ इस्लामी विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते’ असे बंधन घालत आहेत. त्याचा अर्थ इतकाच, की मुळात इस्लाम किंवा कुराण आदि धर्मग्रंथ हे अपरिवर्तनिय मानायचे. त्यालाच विज्ञान समजायचे. मग विवेकबुद्धीने चिकित्सेला जागाच कुठे उरते? नौशादभाईंच्या या वाक्याचा अर्थ काय आहे? इस्लामी विज्ञान व तर्काच्या बाहेर जाऊन चिकित्सा होऊ शकत नाही. परंतू तेच नौशादभाई हिंदू तर्क व विज्ञानाच्या बाहेर जाऊन प्रचलित विज्ञान व तर्कावर प्रबोधनकार हिंदू धर्माची चिकित्सा करतात, त्याचा आधार मात्र हिंदूचिकित्सेसाठी प्रमाण मानणार. आहे ना गफ़लत?

   जिथे हिंदूंना खिजवण्याची संधी आहे तिथे नौशादभाईंना विवेकबुद्धीची महत्ता वाटते आणि जिथे मुस्लिमांच्या भावना व श्रद्धा दुखावतात, तिथे विवेकबुद्धीला इस्लामी विज्ञान व तर्काचा लगाम असण्याचा ते आग्रह धरतात. हा विरोधाभास त्यांच्या लक्षात आलेला नाही असे अजिबात नाही. त्यांनी साळसुदपणे त्याच वापर केला आहे. जेवढ्य़ा उत्साहात ते प्रबोधनकारांचा उल्लेख करतात, तेवढ्याच उत्साहामध्ये मी हमिदभाई दलवाई यांचे उल्लेख करू शकतो. हमिदभाई दलवाईसुद्धा विवेकबुद्धी व आधुनिक तर्कशास्त्रानुसार इस्लामची चिकित्सा करत होते. नौशादभाईंसह किती मुस्लिमांना हमीदची टिका सहन होऊ शकली? आणि नौशादभाईंना खुप जुन्या प्रबोधनकारांच्या पुस्तकापर्यंत जाण्याचेही कारण नाही. आजकाल संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ अशा संघटनाही मोठ्या हिरीरीने हिंदूधर्मावर सडकून टिका करत असतात, भल्याबुर्‍या शब्दात बोलत, लिहित असतात. त्यातून कुठला रक्तपात झालेला नाही. त्यांना शाब्दिक उत्तरे दिली जात असतात. हमीद दलवाई किंवा रश्दी यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्काराचे हत्यार उपसले गेले; तसे याबाबतीत कुठे झालेले नाही. गणपतीला लाथ मारतो, असे म्हणणार्‍या पुरूषोत्तम खेडेकरांना ठार मारण्याचा फ़तवा कोणी काढलेला नाही. किंवा त्यांना पोलिसी संरक्षणात जगायची वेळ आलेली नाही. त्याचे कारण एकच आहे. जे प्रचलित विज्ञान व तर्कशास्त्र आहे त्यानुसार आपल्या धर्मश्रद्धांचा उहापोह करण्याची मुभा असण्यापर्यंत हिंदू समाज आज पुढारला आहे. त्याला वेद, पुराण वा धर्मग्रंथ इश्वरप्रणित म्हणून अपरिवर्तनिय असल्याचा तर्क स्विकारण्याचे बंधन उरलेले नाही. शेकडो वर्षात कालानुसार तो समाज बदलत आला त्याचाच हा परिणाम आहे.  

   थोडक्यात नौशादभाईंच्या नियमानुसार हिंदू विज्ञान व तर्कानुसार कुठल्याही हिंदू धर्मग्रंथाची वा वेदपुराणाची चिकित्सा केली तर त्यात दोष सापडणार कसे? तेही त्याच तर्कानुसार पुर्णपणे खरेच ठरतील. सवाल आहे तो आजच्या शास्त्र, विज्ञान, तर्कशास्त्र यानुसार धर्माची चिकित्सा करण्याचा. अन्य सर्व धर्मात ती प्रक्रिया कधीच सुरू झाली आहे. पण तसे कोणी मुस्लिम जर इस्लामच्या बाबतीत करू गेला, मग मुस्लिम त्याला जगुच देत नाहीत ना? प्रबोधनकारांच्या बाबतीत बोलायचे आव्हान मला देणार्‍या नौशादभाईंना मी एखादा कोणी मुस्लिम प्रबोधनकार उदयास आणायचे आवाहन करतो. ते करायचे तर धर्माचा बाऊ करणे विसरून मुस्लिमांना विवेकबुद्धीची मदत घ्यावी लागेल. आणि ते काम साधेसोपे नाही, याची मलाही पुर्ण जाणीव आहे. कारण ज्याचे गृहितकच अपरिवर्तनिय आहे, त्यांनी चिकित्सेचे आवाहन करणेच गैरलागू आहे. तरीही मला या विषयात पडावे लागले, कारण मी श्रद्धेने हिंदू वगैरे नसलो तरीही जन्माने हिंदू आहे आणि आज कुठल्याही धर्माचे पालन करत नसलो, तरी माझ्यापर्यंत इस्लामचे स्वरूप येऊन भिडू लागले आहे. तेवढ्यापुरता मला इस्लाम व मुस्लिमांच्या वर्तनाचा विचार करण अपरिहार्य झाले आहे. मी कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठला धर्माचे पालन करत नाही, म्हणुन अपेक्षित परिणामांपासून माझी सुटका होत नसेल; तर मला इस्लाम व मुस्लिमांच्या वर्तनाकडे डोळसपणे बघणे भाग झाले आहे. सवाल हिंदू, ख्र्रिश्चन किंवा अन्य कोणाच्या धर्माचा नसून आमच्या मुस्लिम नसण्याचा आहे. आमच्या मुस्लिम नसण्यातून मुस्लिमांना कोणती अडचण आहे किंवा त्रास होतो त्याचा आहे. आणि म्हणुनच या विषयाचा इतका उहापोह करायची वेळ आली आहे. पुन्हा असे कुणा वर्णवादी ज्य़ुने माझ्या मनात भरवलेले नाही, एका इस्लामिक अभ्यासकानेच तसे म्हटले आहे.  ( क्रमश:)
भाग  ( ५५ )   १०/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा