रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

माध्यमांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे.




   सार्वजनिक जीवनातील पावित्र्य किंवा सच्चाई याचे आम्हीच काय ते रखवालदार आहोत, असा आव पत्रकार नेहमी आणत असतात. तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी वाहिनी बघत असाल तर, देश जानना चाहता है, अशी भाषा तिथे बोलणार्‍या पत्रकारांची असते. यांना कोणी देशाच्या वतीने जाब विचारायचा ठेका दिलेला आहे काय? अवघा महाराष्ट्र बघतो-ऐकतो आहे, अशी भाषा आपल्या मराठी‘ वाहिनीवरचे दिवटेही बोलत असतात. त्यांना देश किंवा महाराष्ट्राचा भूगोल तरी माहिती आहे काय, याचीच शंका येते. कारण अवघा देश वा महाराष्ट्र यांचे ऐकत असता किंवा यांना बघत असता, तर राजकीय नेते तशा पत्रकांरांना बघून भयभित झाले असते. पण हा सगळा देखावा व बनवाबनवी असते, हे सर्वांनाच ठाऊक झाले आहे. म्हणूनच कोणी त्या चर्चा किंवा भाषा गंभीरपणे घेत नाही. कारण असे दिवटे आपण पुर्वी काय बोललो वा आज काय बडबड करतोय, ते विसरले असले तरी सामान्य जानतेची स्मृती त्यांना वाटते तेवढी दुबळी अजिबात नसते. त्यामुळेच त्यांना नेते विचारत नाहीत, की जनता भीक घाललत नाही. आता हेच बघा ना, टाईम्स ऑफ़ इंडीयाने गडकरी यांच्या भानगडीचे घबाड शोधून काढले, हे चांगले काम केले. पण त्यावर मल्लीनाथी करण्याचे काही कारण होते का? जणू काही आपण महान स्वच्छ चारित्र्याचे संतमहंत आहोत; असा आव आणत टाईम्स वाहिनीचे नवे तरूण संपादक अर्णव गोस्वामी बकवास करीत असतात. आपण टाईम्समध्ये आलो, तेव्हाच ती संस्था सुरू झाली असा काहीतरी त्यांचा गैरसमज आहे. अन्यथा त्यांनी सदोदित कागद वा कागदपत्रांच्या झेरॉक्स फ़डकावत बकवास केली नसती. आपण कुठल्या उकिरड्याच्या ढिगावर बसलो आहोत त्याचा त्यांनाच थांगपत्ता नसावा.

   ज्या संस्थेकडून म्हणजे कंपनीकडून ती वाहिनी चालवली जाते, त्याच टाईम्स गटाच्या इंग्रजी वृत्तपत्राने गडकरी यांच्या कंपनीच्या भानगडी शोधल्या. त्यानंतर आता त्याच आधारावर सरकारच्या अंमलबजावणी खात्याने गडकरी यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार तपासण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा अर्थच सर्वकाही सिद्ध झाले आहे, अशा थाटात टाईम्सचे पत्रकार वावरत असतात. जणू अंमलबजावणी खात्याने तपास आरंभला म्हणजेच गुन्हा सिद्ध झाला, असा त्यांचा आवेश असतो. पण गडकरी आज जेवढे तक्रार करीत नाहीत तेवढे चौदा वर्षापुर्वी टाईम्सच त्याच खात्याच्या नावाने रडण्याची पत्रकारिता करत होता, हे टाईम्सचे लढवय्ये विसरलेले दिसतात. तेव्हा त्यांच्या आठवणी जागवणे अगत्याचे होऊन जाते. १९९७ सालात त्यांच्या कंपनीचे अध्यक्ष अशोककुमार जैन यांच्या विरोधात परकीय चलनाचे हवाला व्यवहार केल्याचा आरोप ठेवून त्याच अंमलबजावणी खात्याने चौकशी सुरू केली होती. ते व्यवहार गडकरी यांच्यापेक्षा भयंकर होते. तेव्हा टाईम्सचे पत्रकार काय अश्रू ढाळत होते? नुसते जैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार म्हटल्यावर, अवघी टाईम्स वृत्तपत्रे त्याच खात्याला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावत होती. फ़ेरा कायद्याखाली आपल्या मालकावर गुन्हा नोंदला गेला, तर न्यायालयात लढाई लढतानाच सगळे टाईम्स गटाचे पत्रकार बातम्यांमधूनही झुंजत होते. मालकाच्या पापकर्मासाठी पत्रकारांना लढाईत जुंपले, म्हणून दिल्लीच्या पत्रकार संघटनेने तक्रार केली होती. तेवढेच नाही न्यायालयातून तपासकामाची माहिती माध्यमांना देण्यास बंदी घालण्याची मागणी जैन यांच्या वतीने करण्यात आली होती. पण त्याचवेळी त्यांची वृत्तपत्रे मात्र त्याच अंमलबजावणी खात्याच्या विरोधात आरोपांची झोड उठवत होती. नुसते आरोपच नव्हे तर जैन यांना अटक करणार, म्हणजे मानवाधिकाराची पायमल्ली होत असल्याचा आक्षेपही घेण्यात आला होता. तपासकामाच्या नावाखाली अंमलबजावणी खाते दहशत माजवते व अमानुष वागणूक देते, असेही बेछूट आरोप चालविले होते.

   जैन यांना ताब्यात घेण्यासाठी त्या खात्याला जंगजंग पछाडावे लागले होते. अगदी सुप्रिम कोर्टात जाऊनच अटकेची मागणी पुर्ण करण्याची वेळ आली होती. मात्र त्यावेळी तेच खाते महान भयंकर अत्याचारी असल्याचे रकनेच्या रकाने लिहून टाईम्सच्या प्रकाशनांमध्ये छापले जात होते. शेवटी काही वृत्तपत्रे व पत्रकारांच्या संघटनांसह मानवाधिकार संघटनांनाही टाईम्सच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली होती. नेहमी पोलिस व सरकारी अत्याचाराच्या विरुद्ध न्यायालयात संघर्ष करणार्‍या शांतीभूषण या ख्यातनाम वकीलांनी टाईम्सच्या बातम्या व लिखाणाविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला होता. कदाचित सरकारी खात्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे कोणी पहिल्यांदाच गेला असेल. ही टाईम्सची पत्रकारिता आहे. असो. त्यावर तरी त्यांनी ठाम रहायला हवे ना? त्यावेळी जशी तपास कारवाई त्या खात्याने हाती घेतली, तशीच आता गडकरी यांच्या विरोधात सुरू आहे. पण त्यावर निदान गडकरी यांनी अत्याचार झाल्याचा कांगावा तरी केलेला नाही. होईल त्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. आणि आपल्याच धन्यावर त्या खात्याने कारवाई केली तेव्हा गळा काढणारी टाईम्सची पत्रकारिता आज मात्र त्याच अंमलबजावणी खात्याने चालविलेल्या कारवाईच्या आधारे मल्लीनाथी करते आहे. केवढा विरोधाभास आहे ना? किती ढोंगबाजी आहे ना?

   भ्रष्टाचाराने समाजच पोखरलेला असेल तर कुठल्याही समाज घटकाने वा क्षेत्राने आपल्या पावित्र्याचा टेभा मिरवण्याचे कारण नसते. इथे सुद्धा तेच चालू आहे. ज्या भ्रष्ट व्यवहाराच्या क्षेत्रात माध्यमे व राजकारण गुंतले आहे, तिथेही भ्रष्टाचार केल्याशिवाय पान हलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यात गुंतलेलेच एकमेकांवर आरोप करत असतात; तेव्हा सामान्य माणूस त्याकडे करमणूक म्हणून बघत असतो. मजेची गोष्ट म्हणजे आजकाल माध्यमे ज्याचे भांडवल त्याच्या दारात बांधली गेलेली आहेत. ज्यांना बुद्धीवाद किंवा समाजप्रबोधन याच्याशी काडीमात्र कर्तव्य नसते, त्यांना सरकार व राजकारणावर दबाव टाकण्यासाठी अवजार म्हणुन माध्यमांचा वापर करायचा असतो. त्यानुसारच माध्यमे वागत असतात. मालकाच्या इशार्‍यावर भुंकत असतात आणि त्याच्या हितसंबंधांना जपण्याला बुद्धीवाद समजले जाते. म्हणून तर कोळसा घोटाळ्यात विजय दर्डा यांचे नाव समोर आले असताना त्यांना एकही सवाल करण्याची हिंमत नसलेला निखिल वागळे, पुर्ती प्रकरणत मात्र गडकरी यांना शंभर प्रश्न विचारत असतो. जग कोळसा घोटाळा शोधत असताना कायबीइन लोकमत सिंचन घोटाळ्याचे मुरणारे पाणी शोधायला जात असते. भुजबळ यांचा मुलगा, पुतण्या यांनी कुठे अश्वशाळा सुरू केली; त्यातले घोडे मोजायला कायबीइन लोकामतचे स्पेशल करस्पॉन्डन्ट जातात. पण कोळसा खाण वाटेत दिसली तरी तिकडे पाठ फ़िरवतात. अशी आजच्या माध्यमांची अवस्था आहे. आपल्या बुद्धीने व आपल्या मनाने त्यांना भुंकताही येत नाही. आणि तरीही अविष्कार स्वातंत्र्याचे ढोंग मात्र चालू असते.  

   जेव्हा पत्रकारितेचे चारित्र्य व पावित्र्य तेवढे शुद्ध होते तेव्हा कोणाची पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत होत नव्हती. पण आज सर्वात अधिक भ्रष्ट कुठला व्यवसाय झाला असेल, तर तो माध्यमांचा आहे. पत्रकार व्हायचे आणि खंडणीखोरी करायची असा उद्योग चालतो. मध्यंतरी पुण्यातल्या एका प्रमुख वृत्तपत्राच्या पत्रकाराला बिल्डरने आपल्या ऑफ़िसमध्येच मारहाण केल्याचे वृत्त आले होते. हा पत्रकार त्या ऑफ़िसमध्ये कशाला गेला होता? तर खुलासा घ्यायला गेला होता. ही पत्रकारिता कुठून आली? विरुद्ध बातमी दिली म्हणून मारहाण होते, हा काय प्रकार आहे? बातमी कोणाच्या विरुद्ध कशाला असते? बातमी बाजूने वा विरुद्ध असायचे कारणच काय? बातमी सत्य असेल तर ती कोणाच्या विरुद्ध असू शकत नाही. पण जेव्हा विरुद्ध बातमी दिली, असे म्हटले जाते तेव्हाच ती जाणिवपुर्वक हितांना बाधा आणणारी असते आणि तसे असेल तर मग ती बातमी नसते. बातमी सार्वजनिक हिताची असली पाहिजे. त्यात कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. सार्वजनिक हित आणि व्यक्तीगत हित यामध्ये संघर्ष येत असेल तरच ती बातमी वादग्रस्त असते. पण तसे नसेल तर कोणाच्या तरी हिताला बाधा आणणार्‍या माहितीचा बोभाटा करणे, ही मुळात पत्रकारिता नसतेच. त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. आणि नविन जिंदाल या कॉग्रेस खासदार व उद्योगपतीने तोच आरोप झी न्युज या वाहिनीवर केला आहे. तो गंभीर आहे आणि म्हणूनच वाहिनी संपादक संघटनेने झी न्युजचा संपादक सुधीर चौधरी याचे सदस्यत्व काढून घेतले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारिता व माध्यमे यांची विश्वासार्हता किती शिल्लक उरली आहे? ( क्रमश:)
 भाग ( ४ )  २९/१०/१२

1 टिप्पणी:

  1. mala watate mulat ya wahinya 24 taas batami detati ti mulat band karavi...24 taas kai sangnar ha! melelya mansancha urlelyana vicharnar tumchi yavar pratikriya kai...he matra naki..jya veli batmi sangitali jate tyaveli ti 100 % kharicha aahe ase bhasawale jate...roj ek navin ghotala...to yeto toch tyawarech charcha satra...tyathi tharawik chehare....tich uttar tech prashna...tyatun te ekmekanchi kadhnar...mag aamche kharokharch prashna kuthle aahet tech amhi visrat chale aahot...gas nahi...sakhar mahag....bazaratil mandi..pan yana kai tyachi toshish aahe

    उत्तर द्याहटवा