सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

सैफ़-करिनाच्या बेकायदा लग्नाबद्दल उदासिनता का?




   गेल्याच आठवड्यात एक घटना घडली. तसे त्यात नाविन्य कुठलेच नव्हते. कारण आज उद्या तसे काही घडणार हे जगजाहिर होते. ती घटना होती सैफ़ अली खान व करिना कपूर यांच्या विवाहाची. सैफ़ हा माजी क्रिकेट कर्णधार पतौडी मन्सुर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा पुत्र. त्यामुळे नावाने व वर्तनाने तो मुस्लिम धर्मिय मानला जातो. बाकी तो कितपत धर्माचे पालन करतो हा वेगळ विषय आहे. त्याचे फ़ार पुर्वी लग्न झालेले होते. अमृता सिंग ही त्याची घटस्फ़ोटीत पहिली पत्नी. तिच्यापासून झालेली दोन मुलेही आहेत. मध्यंतरी त्यांचा तलाक झाला आणि करिना कपुर व सैफ़ यांचे प्रेम प्रकरण गाजू लागले. दोनतीन वर्षे तरी त्यांचे प्रणयराधन चालू होते. आता त्यावर शिक्कमोर्तब झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे बातम्यांवरून कळते. कारण त्या विवाहानंतर तसे नोंदणी करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांनीच वाहिनीच्या कॅमेरासमोर कथन केले. मग पुढे धार्मिक सोहळा म्हणुन दोघांनी मुस्लिम पद्धतीने निकाह लावल्याचीही बातमी आली. त्यामुळे मग त्यांचा कुठला विवाह खरा मानायचा असा प्रश्न काही लोकांना भेडसावू लागला. यापुर्वी आमिर खान यानेही आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फ़ोट देऊन किरण राव नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला होता. त्याबद्दल एवढी चर्चा झाली नव्हती. पण त्याने दोन्ही धर्मांचे सोपस्कार केल्याचे कानावर आले होते. पण सैफ़च्या बाबतीत एक बातमी मुद्दाम दखल घेण्यासारखी आहे. त्याने मुस्लिम पद्धतीने केलेला विवाह ग्राह्य नसल्याचे मौलवींनी नंतर जाहिर केले. फ़ेसबुकसारख्या माध्यमात त्यावरून कल्लोळ चालू होता. मिया बिबी राजी तो क्या करेग काझी, अशा उक्तीही त्यासाठी वापरल्या जात होत्या.

   खरेच विवाहाचे सोपस्कार कायदेशीर असायला हवेत का? कारण हल्ली अनेक जोडपी कुठलाही सोपस्कार वा कायदेशीर विवाह न करताच एकत्र नांदत असतात. त्याला काहीशी कायदेशीर मान्यता न्यायालयांनीही दिली आहेच. असे सगळे प्रश्न व समस्या जोवर दोघात भांडणे होत नाहीत व कायदेशीर समस्या उभी रहात नाही, तोवर काणाडोळा करण्यासारख्या असतात. पण जेव्हा वाद सुरू होतात, तेव्हा मग कायद्याला त्यात पडावे लागते. कारण आजही आपल्या देशात विवाहविषयक किंवा वारसाविषयक अनेक कायदे धार्मिक कर्मकांडावर विसंबून आहेत. त्यामुळेच ज्यांनी कोणी सैफ़चा विवाह किंवा निकाह बेकायदा आहे असे सांगितले; त्यांच्या मताला महत्व आहे. कारण आज प्रेमात असलेले उद्या जेव्हा प्रेमाच्या नशेतून बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे अधिकार कुठले, त्याची सोडवणूक समाजाला करावी लागत असते. आणि समाज म्हणजे फ़क्त कायद्याचे सरकारी अंमलदारच नसतात तर समाजातील धुरिणांचाही त्यात समावेश होत असतो. आणि मौलवी हे मुस्लिम समाजातले धुरीण असतात. कारण मुस्लिम समाज आजही मोठ्या प्रमाणात धर्मनिष्ठ असून जितके म्हणुन धर्माचे कायदे व रिवाज आहेत; त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी सज्ज असतो. त्यामुळेच ज्या प्रकारे सैफ़ करिनाचा निकाह झाला तो इस्लामी कायद्यानुसार गैरलागू असल्याचे मौलवींचे मतप्रदर्शन वाजवी ठरते. पण त्या एकूण विवाह समारंभात एक मोठी पळवाट शोधण्यात आलेली आहे; याकडे फ़ारसे कोणाचे लक्ष गेलेले नसावे. त्या दोघांनी आधी रितसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. आणि तोच त्यांचा कायदेशीर विवाह आहे. ज्याला स्पेशल इंडीयन मॅरेज अक्ट असे म्हणतात. ज्यामध्ये प्रौढ सज्ञान भारतीय मुलगा व मुलीला विवाह करता येतो. आणि त्यानुसार नोंदणी विवाह केला तर त्याला दोघांच्या धार्मिक निष्ठेची बाधा येत नाही. त्यांच्या विवाह संबंधात कुठलीही समस्या उभी राहिली तर त्यात धार्मिक व्यक्तीगत कायदा लागू होत नाही. आणि म्हणुनच निकाह योग्य आहे; की नाही हा विषयच त्यांच्या बाबतीत विचारला जाऊ शकत नाही.

   इथे त्या विवाहाबद्दल मौलवींनी आक्षेप घेतलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विवाह नव्हेतर निकाह गैरलागू आहे असे म्हटले होते. कारण मुस्लिम धार्मिक कायद्यानुसार मुलगा व मुलगी दोघेही मुस्लिमच असायला हवेत. अन्यथा त्यांच्यात विवाह म्हणजे निकाह होऊ शकत नाही, निकाह हा एकप्रकारे त्या नवरानवरी यांच्यातला करार असतो. आणि पुढे त्यांच्यात पटत नसेल वा विवाह सुखाचा होत नसेल, तर वेगळे होण्याची कायदेशीर प्रक्रिया त्या निकाह म्हणजे करारानुसार होत असते. त्यामुळेच निकाहला कायदेशीर महत्व आहे. प्रश्न असा आहे, की या दोघांचा विवाह कोणत्या कायद्यानुसार ग्राह्य मानला जाणार? त्याचे उत्तर साफ़ आहे, की त्या दोघांचा विवाह इस्लामी पद्धतीनुसार झालेला नाही, म्हणुनच त्या स्पेशल अक्टनुसारच पुढले प्रश्न सोडवले जातील. त्याचाच दुसरा अर्थ असा, की करिना हिने आपला धर्म बदललेला नाही, की सैफ़शी विवाहबद्ध होण्यासाठी तिने इस्लामचा स्विकार केलेला नाही. दोन धर्मातल्या भारतीयांना विवाह करायचा असेल; तर त्यात कोणा एकाने धर्म बदलण्याची वा धर्मांतर करण्याची गरज नसते. त्या दोघांना आपापला धर्म कायम ठेवून विवाह करता येतो. स्पेशल मॅरेज अक्टने तशी सुविधा ठेवलेली आहे. सैफ़ व करिना यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. म्हणूनच त्यांचा विवाह हा धार्मिक सोहळा नव्हता, तर कायदेशीर सोहळा होता. नंतर जो निकाह सोहळा उरकण्यात आला, त्याला कुठलेही कायदेशीर अधिष्ठान नाही, असेच त्या मौलवींनी सांगितले आहे. पण किती लोकांनी त्यातले गांभिर्य समजून घेतले आहे? मौलवींच्या खुलाशाचा अर्थ इतकाच, की त्या दोघांच्या विवाहाला इस्लामची मान्यता नाही. म्हणजेच उद्या तीनदा तलाक श्ब्दाचा उच्चार करून सैफ़ हा करिना कपूरला घटस्फ़ोट देऊ शकत नाही. तसा त्याने तलाक दिला तरी तो कायदेशीर असू शकणार नाही, इतकाचा त्याचा अर्थ आहे.

   असे अनेक विवाह आजकाल होत असतात. पण त्याचा अकारण गाजावाजा होत असतो. पण माझा प्रश्न वेगळाच आहे. देशातले मोठे मान्यवर मौलवी किंवा मुस्लिम धर्ममार्तंड जर त्या दोघांचा निकाह गैरलागू ठरवत असतील, तर तो निकाह विधी पार पाडणार्‍याचे काय? त्याने केलेले कृत्य धर्मबाह्य किंवा धर्माला काळीमा फ़ासणारे नाही काय? त्यातून धर्माची अवहेलना झालेली नाही काय? त्याबद्दल मुस्लिम धर्मनिष्ठ काय करणार आहेत? इस्लामचे पावित्र्य व शुद्धता जपण्याचा आवेश नेहमी दाखवणार्‍यांचे काय? ते सैफ़-करिना यांचा निकाह लावणार्‍यांवर कोणती कारवाई करणार आहेत? अजून का केलेली नाही? कारण असे हे पहिलेच प्रकरण नाही. दोनतीन वर्षापुर्वी असेच एक प्रकरण उत्तरेत गाजले होते. हरयाणाचे एक मंत्री व तिथल्या सरकारी वकील यांनी दुसर्‍या विवाहाची पळवाट शोधण्यासाठी इस्लामचा स्विकार केला होता आणि नवी मुस्लिम नावे धारण करून निकाह लावला होता. चॉद महंमद व फ़िझा अशा नावाने त्यांचे नाटक अनेक वाहिन्यांवरून गाजले होते. पुढे लौकरच त्यांचे प्रेम वितळले व चॉद महंमद हा विष्णोई होऊन आपल्या पहिल्या पत्नीकडे परतला होता. हल्लीच दिल्लीमध्ये त्याच्याशी निकाह लावलेल्या फ़िझाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रहात्या घरात सापडल्याचेही वाहिन्यावरून दाखवले होते. सवाल आहे तो अशा रितीने धर्माची अवहेलना चालते, त्याच्या विरुद्ध मुस्लिम किती संघटितपणे उभे राहिले आहेत? धर्माच्या नावाने चाललेला हा भ्रष्टाचार थांबवण्याचे काम को्णाचे आहे?

   आपले धार्मिक ग्रंथ व धार्मिक कायदे इश्वरदत्त म्हणुन अपरिवर्तनिय आहेत असा दावा मुस्लिमांकडून नित्यनेमाने केला जात असेल आणि त्या बाबतीत आग्रही भूमिका घेतली जात असेल; तर त्यात आपल्या मनमानीने वाटेल तसे बदल करणार्‍या अशा मौलवी किंवा धर्मपंडीतांवर कोणी कारवाई करायची? सैफ़ असेल किंवा चॉद महंमद असेल, त्यांचे गैरलागू निकाह करणार्‍यांचा बंदोबस्त कोणी करायचा? ते निकाह गैरलागू असतील तर मग त्यानुसार जी धर्माची विटंबना चालते त्याचे काय? की धर्माचे ग्रंथ व धर्मादेश अपरिवर्तनिय आहेत ते फ़क्त पुस्तकापुरते आहेत आणि ज्याच्या हाती त्यानुसार धर्माची सुत्रे येतात, त्याने त्याचा मनाला येईल तसा अर्थ लावून वाटेल ते करावे, अशी मुभा आहे? मग विषय वजिरीस्तानातील मलालाच्या शाळेचा वा आधुनिक शिक्षणाचा असो, की सैफ़ वा फ़िझाच्या लग्नासाठी काढलेल्या पळवाटेचा असो. भारताची राज्यघटना किंवा विविध कायदेही अंमलात आहेत. पण त्याचा गैरवापर झाला तर त्यासाठी दाद मागायची सोय सुप्रिम कोर्टाच्या रुपाने केलेली आहे. इस्लामचे जे कायदे आहेत त्यांचे पावित्र्य विटाळणार्‍या त्याच धर्मातील पंडीतांचा बंदोबस्त कोणी करायचा? त्यविषयी एवढी अनास्था मुस्लिमात कशाला असावी?  ( क्रमश:)
भाग  ( ६८ )   २३/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा