शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१२

भ्रष्टाचार जीवनावश्यक वस्तू बनला आहे


 आज जे आरोप भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होत आहेत, त्यापेक्षा किती कंपन्या किंवा नेत्यांचे व्यवहार भिन्न असतील. सवाल एकच आहे, की गडकरी किंवा रॉबर्ट वड्रा त्यात पकडले गेले आहेत. आणखी शेकडो नव्हे तर हजारो असे असतील, ज्यांची कागदपत्रे कोणी तपासायचे कष्ट घेतलेले नसतील. ज्या टाईम्स ओफ़ इंडीयाने आज अगदी खोलात जाऊन तपासणी केली आणि गडकरी यांचे बिंग फ़ोडले आहे, त्याच वृत्तपत्र वा माध्यम कंपनीचे सगळे व्यवहार तेवढेच चिखला्त रुतलेले नाहीत काय? काही वर्षापुर्वी त्याच कंपनीचे प्रमुख असलेले अशोककुमार जैन यांच्यावर असेच बालंट आलेले होते. फ़ेरा नावाच्या परकीय चलन विषयक कायद्यात त्यांचे शेपूट अडकले होते, तेव्हा त्याच कंपनीची वृत्तपत्रे किंवा टाईम्स कोणत्या भाषेत बोलत होता? सतत हातात भिंग घेऊन डोळे बारीक करून संघाच्या कुणा पदाधिकार्‍याच्या धोतराच्या निर्‍या मोजणारे (तेव्हाचे महाराष्ट्र टाईम्सचे संपादक आणि) आजचे ‘दिव्य मराठी’चे संपादक कुमार केतकर तेव्हा काय अश्रू ढाळत होते? आज कॉग्रेस वा भारतीय जनता पक्षाचे नेते जशा दाताच्या कण्य़ा करीत आहेत, तशाच भाषेत व शब्दात टाईम्सचे पत्रकार आपल्या मालकासाठी टाहो फ़ोडत होते. कायद्याच्या पलिकडे जाऊन अशोककुमार जैन यांच्या वयाचा हवाला देऊनही त्यांना अटक करणे कसे अमानुष आहे, त्यावर केतकरांनी मानवाधिकाराचे हवाले दिले होते. म्हणूनच आपण काही महान भ्रष्टाचार बाहेर काढला, असा आव कुणा वृत्तपत्र वा माध्यमातील लोकांनी आणायचे कारण नाही. अगदी त्याच् पठडीत भ्रष्टाचार मुक्तीचे निशाण खांद्यावर घेतलेल्या लोकांनी सुद्धा टेंभा मिरवण्याचे काही कारण नाही.

   गेल्या वर्षी अण्णांचे रामलिला मैदानावर जे दिर्घकालीन उपोषण झाले, त्यावेळी करोडो रुपयांच्य देणग्या गोळा केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर तो सगळा तपशील वेबसाईटवर टाकलेला आहे, कुठली लपवाछपवी नाही, असा दावा केजरिवाल यांनी केला होता. नंतर अण्णा व त्यांचे जमले नाही, तेव्हा त्यांनी अण्णांना दिडदोन कोटी रुपयांचा चेक दिल्याचे व अण्णांनी तो नाकारल्याचेही प्रसिद्ध झाले होते. त्याचे काय? इतके पैसे जमले कुठून? कोणाकडून? त्या रामलिला मैदानावर लाखभर लोक आले असे मान्य करू. तरी दोनतीन कोटी रुपयांच्या देणग्या जमल्या असतील, तर सरासरी प्रत्येकाने दोनतीनशे रुपये देणगी दिली म्हणायचे काय? त्यातला प्रत्येकजण इतके पैसे देणार नाही म्हटले तर किमान एक हजारापासून दोनचार लाख रुपयांपर्यंत देणग्या देणारे तिथे गोळा झाले असाच अर्थ निघतो. त्या देणग्या कुठल्या अधिकारात घेण्यात आल्या आणि कोणत्या खात्यात जमा करण्यात आल्या? त्यामध्ये कुठली अनियमितता झाली, असे अनेक प्रश्न तेव्हाही विचारले गेले होते. आंदोलनासाठी लोक जमतात, पण देणग्या इतक्या मोठ्या प्रमाणात जमतात, हे प्रथमच उजेडात आले होते. सवाल आहे तो त्या पैशाचा प्रवास कुठून कुठे व किती कायदेशीर होता? अर्थात त्याचे उत्तर साफ़ आहे. प्रत्येक गोष्टीची नोंद आहे, ज्यांना हवी त्यांनी त्याची तपासणी करावी व चौकशी करावी. पण इथे एका प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. हे देणगीदार कोण होते? त्यांचा नावपत्ता काय? त्यांचे लागेबांधे कोणापर्यंत जाऊन पोहोचतात? कॉग्रेसचे कानफ़ाटे नेते दिग्विजय सिंग यांनी तेव्हाच हे प्रश्न विचारले होते. पण त्यांचे नावच इतके बदनाम आहे; की त्याकडे कोणी लक्षच द्यायला तयार नव्हते. पण आज गडकरी यांना जे प्रश्न विचारले जात आहेत, तेसुद्धा तसेच नाहीत का?

   गडकरी यांच्या पुर्ती कंपनीमध्ये अन्य काही संशयास्पद कंपन्यांनी पैसे गुंतवले आहेत आणि त्यांचा पता लागत नाहीत. त्यांची नोंदणी आहे, त्यांच्या संचालकांची नावेही उपलब्ध आहेत. पण ती माणसे जागेवर सापडत नाहीत किंवा सापडली तर त्यांना आपण अशा कुठल्या कंपनीशी संबंधित आहोत; याचाही थांगपत्ता नसतो. नेमकी अशीच परिस्थिती अनेक संस्थांच्या देणगीदारांची असते. गडकरी यांना अनामिकांनी पैसे गुंतवणूक म्हणून दिले आहेत आणि केजरिवाल यांच्या संस्थेच्या खात्यात जमा झालेले रामलिलाच्या काळातील पैसेही असेच अनामिक देणगीदारांचे आहेत. एकाने अनामिक देणगीदारांचे पैसे पावती देऊन घेतले, तर दुसर्‍याने शेअर देऊन त्यांचे पैसे गुंतवणूक म्हणुन घेतले. सर्वकाही कायद्याच्या व नियमांच्या मर्यादेत राहून केलेले आहे. आणि यांनीच कशाला? अनेक व्यवहार आजकाल असेच चालतात. सर्वांना सर्वकाही ठाऊक आहे, पण बोलायचे कोणी? मग होते कसे, की आपली सहानुभुती ज्याच्या बाजूने असते, त्याच्या बाजूने आपण युक्तीवाद करू लागतो. थोडक्यात आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा कारटा, अशी आपलीही वृत्ती असते. अगदी भ्रष्टाचार मुक्तीचा वसा घेतलेल्या व पारदर्शकतेचा ढोल वाजवणार्‍या केजरिवाल मंडळीचीही त्यातून सुतका नसते. म्हणुनच त्यांनीही आपल्या सहकार्‍यांना कागदपत्रे घेऊन पत्रकारांसमोर ‘पारदर्शक’ व्हा, असा आदेश दिला नाही. तर चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमण्याची पळवाट शोधली. कारण भ्रष्टाचार ज्याला म्हणतात, तो आता भारतीय समाजाच्या हाडीमाशी खिळला आहे. दुसर्‍याने केला तर तो भ्रष्टाचार असतो आणि आपण केला तर तो व्यवहार असतो. नुसता व्यवहार नसतो तर नियमानुसार केलेला सदाचार असतो.

   आणि आपण असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यातून माझी म्हणजे भाऊ तोरसेकरचीही सुटका होत नाही. कारण ज्या प्रकारचे नियम व कायदे आज अस्तित्वात आहेत, त्यातून जगणे म्हणजे निव्वळ घुसमट होऊन जाते, नियम मोडून वा धाब्यावर बसवल्याखेरीज तुम्हाला जगणेच अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही जगतो आहोत व जीवंत आहोत, हाच आपण भ्रष्टाचारी असल्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. कारण नियमानुसार जगणे आजच्या स्थितीत अशक्य करून टाकलेले आहे. भ्रष्टाचार ही अशी गोष्ट झालेली आहे, की त्यालाच आजची सर्वात मोठी जिवनावश्यक वस्तू म्हणायची वेळ आलेली आहे. मग एकेदिवशी बाबा आमटेंचे पुत्र प्रकाश आमटे यांना पुण्याचा एक उद्योगपती करोडो रुपये चेकने देतो आणि तेही घेतात. करणार काय? त्यांनी समाजसेवेचा संसार थाटला आहे. त्यासाठी पैसे लागतात. मग ते कुठून आले, त्याच्याशी त्यांना कर्तव्य दाखवून चालत नाही. ज्या उद्योगपतीबद्दल पुण्यात व राजकीय वर्तुळात अनेक वदंता आहेत, त्याच्याकडून सत्कार्य करण्यासाठी पैसे घ्यायची वेळ या देशात आली असेल, तर इतर व्यवहारी व संसारी लोकांची काय कथा?

   आमटे यांच्या आश्रमात शेकडो गरजू लोक आहेत. पण त्यांना एकच कुटुंब ठरवून गॅ्सचा पुरवठा होतो. दिवसात त्यांना दोनतीन सिलिंडर लागत असतील. मग नियमानुसार त्यांनी काय करायचे? सहा सिलिंडरचा कोटा दोनच दिवसात संपला, मग पुढल्या सिलिंडरसाठी लागणारे अधिकचे पैसे कुठून आणायचे? नियम खुप महान व पवित्र असते तर प्रकाश आमटे यांच्यावर ही पाळी आली असती का? ज्यांना केवळ रुग्णसेवा करायची आहे, त्यांची अशी अवस्था असेल तर ज्यांना स्वार्थ नाही तरी आपले हित करून घ्यायचे आहे. त्यांना नियमानुसार जगणे शक्य आहे काय? नियम आणि कायद्यानी महत्ता कितीही असली तरी त्यांच्या व्याख्येत सगळ्याच गोष्टी बसवता येत नाहीत. म्हणूनच नियम तोडला वा त्याला बगल दिली, म्हणजे गुन्हा झाला किंवा भ्रष्टाचार झाला; असे मानणे हाच मुर्खपणा आहे. त्यामुळे मग कायदे खुप आहेत आणि त्यातल्या एकाही कायद्यानुसार जीवन सुखकर सोडा, सुकर होत नाही अशी पाळी आलेली आहे. त्यातुन मग कायदे मोडणे व भ्रष्टाचार अपरिहार्य होत गेला आहे. किंबहूना कायद्याचे राज्य म्हणजे एक कर्मकांड होऊन बसले आहे. मग कायद्याला बगल देण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी कुशल माणूस हाताशी धरावा लागतो. आपोआपच भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊन गेला आहे. मग भ्रष्टाचाराने माखलेले लोकच आपल्याला शिष्टाचाराचे धडे देत असतात. राजरोस हा बेशरमपणा चालू असतो.

   गडकरी किंवा वड्रा यांना कुठून इतके पैसे किंवा भांडवल मिळाले, कोणी त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, यावर मोठ्य़ाच चर्चा चालू आहेत. वाहिन्यांवर त्या चर्चा रोजच रंगत असतात. त्या वाहिन्यांचे जाळे उभे करायला लागणारी गुंतवणूक म्हणजे भांडवल कुठून आले, त्याची चर्चा कोणी कधी केली आहे काय? अवघ्या दहा पंधरा वर्षात हजारो वहिन्यांचे जाळे भारतभर पसरले. त्यामध्ये जी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, त्यातही वड्रा वा गडकरी यांच्याच कंपन्यामध्ये आले, तसेच पैसे आलेले आहेत. ज्याला आज एफ़डीआय म्हणजे परकीय थेट गुंतवणूक असे म्हटले जाते, ती करणार्‍या बहुतांश कंपन्या मॉरिशस या इवल्या देशातल्या आहेत. त्या बोटभर देशामध्ये इतका पैसा आला कुठून? तो सगळा पैसा त्या कंपन्या भारतातच का गुंतवत आहेत? त्याचे धागेदोरे शोधावे असे कोणालाच का वाटले नाही? असे शेकडो प्रश्न आहेत. पण विचारायचे कोणी आणि उत्तरे तरी कोण देणार? आरोप करणारे गडकरी आणि उत्तर देणरेही गडकरीच असल्यावर तुमचीआमची फ़सगतच व्हायचीच ना? सगळा चोर शिपायाचा खेळ आहे.     ( क्रमश:)

भाग   ( ३ )      २८/१०/१२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा