एका मुस्लिम लेखकाने मला जे खुलासेवजा पत्र पाठवले होते, त्यात त्याने वर्णवादी ज्युधर्मिय असा उल्लेख केला होता, त्याचप्रमाणे ब्राह्मणवादाचाही उल्लेख केला होता. अशी भाषा का वापरली जाते? त्यातून एकूणच ज्य़ुधर्मियांवर वर्णवादाचा आरोप केला जात असतो. ज्या इस्त्रायलशी अन्य कित्येक मुस्लिम देशांचा काडीमात्र संबंध येत नाही, तरी जगभरचे मुस्लिम ज्युंचे राष्ट्र म्हणुन इस्त्रायलचा द्वेष का करतात? जगातले सर्वच ज्यूधर्मियांनी मुस्लिमांच्या विरोधात कुठला गुन्हा केलेला नसतो, तरी मुठभर ज्यु तसे वागले, म्हणुन तमाम ज्युधर्मियांना त्यासाठी गुन्हेगार संबोधले जाते ना? नेमकी तीच गोष्ट मग मुस्लिमांच्या बाबतीतही होत असते. घातपात, दहशतवाद करणारे मुठभरच असतील, पण जास्तीतजास्त घटनांमध्ये मुस्लिमच दिसून येतात, तेव्हा मग सरसकट मुस्लिमांकडे दहशतवादी म्हणुन बोट दाखवले जात असते. आणि असे अन्य कोणी म्हटले तर राग येऊ शकतो. पण जेव्हा मुस्लिम जगातला एक नामवंतच तसे उद्गार काढतो तेव्हा काय करायचे? फ़ेसबुक किंवा मोबाईलच्या एसएमएस द्वारा असा एक संदेश कित्येक वर्षे फ़िरत असतो. ‘सर्वच मुस्लिम दहशतवादी नसतील, पण सगळे दहशतवादी तर मुस्लिमच आहेत ना?’ तब्बल सहा वर्षापुर्वी अशा एसएमएस संबंधी लोकसत्ता दैनिकाच्या लेखामध्ये संजय नहार नावाच्या लेखकाने उल्लेख केला होता व त्याची खिल्ली उडवली होती. अर्थात त्याचे कारणही स्पष्टच होते. असे संदेश मुस्लिमांबद्दल गैरसमज वाढवण्यासाठी हिंदूत्ववादीच पसरवतात, हे गृहित आहे. पण असा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा माणूस अरब मुस्लिम आहे याचा किती लोकांना पत्ता आहे?
अब्दुल रहमान अल रशीद हे अनेक वर्षे सौदी अरेबियाच्या ‘अल अरेबिया’ उपग्रह वाहिनीचे कार्यकारी संचालक होते. त्यांनी २००४ रोजी ब्रिटनमधून प्रकाशित होणार्या ‘अल शिर्क अल आस्वत’ नावाचा अरबी नियतकालिकात लिहिलेल्या लेखाचे ते शिर्षक होते. ’जागे व्हा: सर्वच्या सर्वच दहशतवादी मुस्लिम आहेत’ ( A Wake-up Call : Almost all terrorists are Muslims.. ) अशा शिर्षकाचा तो लेख होता. २००६ साली मी तो लेख ‘अरब न्युज’ या वेबसाईटवर वाचला. खुद्द मुस्लिम व अरब समाजातही त्या लेखाने खळबळ माजवली होती. त्याचे वैशिष्ट्य असे, की त्यातून मुस्लिमांना आत्मचिंतनाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न लेखकाने केला होता. मलाही तीच अपेक्षा आहे. मी लिहिलेले मुद्दे किंवा त्यातले आक्षेप मुस्लिमांना आवडणारे नसले, तरी त्यातून पुढे आलेल्या समस्या सोडवण्याची गरज आहे. सहसा कोणी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे किंवा नियतकालिके त्यावर चर्चाही करत नाहीत. उगाच मुस्लिमांना दुखावणे नको, अशी त्यांची भूमिका असते. पण त्यामुळे असे प्रश्न अनुत्तरित रहातात आणि मग जे बिगर मुस्लिम आहेत, त्यांच्या शंका कायम राहून त्यांचा शंकासूर होत असतो. आपल्याच देशात जेवढे घातपाताचे प्रकार झाले आहेत, त्यांची संख्यात्मक तुलना केली तर त्यातल्या हिंदू घातपातांची संख्या नगण्य दिसेल. मग त्या नगण्य घटनांशी मुस्लिम घातपात्यांची तुलना करून वेळ मारून नेता येईल. पण म्हणुन समस्या संपत नाही. युक्तिवादात समोरच्याला गप्प करता येईल. पण म्हणून समस्या सुटत नसते. आणि त्याकडेच अब्दुल रहमान यांनी त्या लेखातून लक्ष वेधलेले होते. त्यासाठी त्यांनी जगभरच्या हिंसक जिहादी घातपातांची प्रचंड यादीच सादर केली होती. आणि मुस्लिमांनी ‘जागे व्हावे’ असे आवाहन त्यातून केले होते.
दुर्दैव असे आहे, की आपल्या देशात त्याकडे हिंदू मुस्लिम यांच्यातला संघर्ष म्हणून बघितले जाते. पण प्रत्यक्षात जगभरच मुस्लिम समाजात प्रचंड घुसळण चालू आहे. जिथे मुस्लिमेतरांची संख्याच नगण्य आहे अशाही देशात आज भीषण हिंसाचार उसळलेला आहे. तिथे पंथ व वंशाच्या अस्मितांनी हिंसाचार बोकाळलेला आहे. कालपरवाच लेबॅनॉन या देशामध्ये एका भीषण स्फ़ोटामध्ये एका मंत्र्याची हत्या झाल्यावर लष्कराला पाचारण करावे लागले आहे. लोकशाही असो किंवा लोकशाही वा लष्करशाही असो, कुठेही मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने नांदताना का दिसत नाही? त्याचा विचार व चिंतन त्याच समाजात होण्याची गरज आहे. कारण शेवटी त्यात मारले जाणारी बहुतांश लोकसंख्या मुस्लिमच आहे आणि होणारे मालमत्तेचे नुकसानही मुस्लिम समाजाचेच आहे. प्रत्येक ठिकाणी शत्रू म्हणून वेगवेगळ्या संस्था, संघटना किंवा भिन्न समाज घटकाकडे बोट दाखवले जात असेल. पण जो कोणी मारला जातो आहे, तो मुस्लिमच आहे ना? मग गुजरातच्या दंगलीतले दिड-दोन हजार बळी विसरू न शकणार्या मुस्लिमांना आज रोजच मारल्या जाणार्यांविषयी इतकी अनास्था का असावी?
दुसर्या कोणी शंका विचारली वा धर्माचा उल्लेख केला, मग लगेच धर्मग्रंथाचा हवाला देणार्यांनी जे कोणी मुस्लिम त्याच धर्म शिकवणीनुसार वागत नाहीत त्यांचा बंदोबस्त का करू नये? हा माझा एकट्याचाच प्रश्न नाही. शेकडो, हजारो नव्हेतर करोडो मुस्लिमेतरांना सतावणारा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर धर्मग्रंथ देऊ शकणार नाहीत. तर मुस्लिम समाजाला आपल्या वागणुकीतून द्यावे लागणार आहे. कारण शेवटी छापलेल्या अक्षरे व शब्दांपेक्षा त्याचा प्रत्यक्ष जीवनात येणारा अनुभव माणसाला पटत असतो. आणि असे प्रश्न आता मुस्लिमेतरच नव्हेतर मलाला किंवा अब्दुल रहमान यांच्यासारखे मुस्लिमही विचारू लागले आहेत. त्यामुळे असे प्रश्न अधिकाधिक प्रखर होऊन समोरही येऊ लागले आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणुन विचारमंथन सुरू व्हावे, एवढाच माझा या लेखमालेमागील हेतू आहे. शंभरातला एखादाच माणूस गैरवर्तन करतो. पण त्यामुळे सगळे शंभर बदनाम होतात. याचे कारण त्यातले ९९ गप्प बसतात आणि त्यांचे मौन हेच समर्थन मानले जात असते. स्वपक्षातल्या दोनतीन टक्के आक्रमकांना हाताशी धरून हिटलरने पक्षात आपले वर्चस्व निर्माण केले आणि मग त्याच पक्षाच्या बळावर सत्ता काबीज करून जगाला ओलीस ठेवले होते. त्या एका माणसामुळे अवघ्या जर्मनीला दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामध्ये कित्येक सामान्य जर्मन नागरिक आदेशाचे पालन करणारे होते किंवा ऐनवेळी मौन धारण करून बसले म्हणून गुन्हेगार ठरले होते.
ज्या मुंबईतील रझा अकादमीच्या मोर्चातील हिंसाचारामुळे ही लेखमाला मी सुरू केली, त्यातला मुख्य आरोपी सोमवारी पकडला गेला. म्यानमारचा नागरिक असलेल्या युसूफ़ खानने मुंबईतील मोर्चासाठी चिथावणीखोर एसएमएस पाठवल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, खटला भरला जाईल. पण त्याच्या कारवायांना जवळपासच्या लोकांनी वेळीच पायबंद घातला असता, तर अवघ्या मुस्लिम समाजाला आझाद मैदानच्या हिंसेसाठी बदनाम व्हावे लागले नसते ना? हाच माणुस त्या मोर्चाचा एक आयोजक होता. म्हणजेच तो काय करतो आहे त्याचा जवळपास वावरणार्यांना थोडाफ़ार सुगावा असणारच. पण त्यांनी त्याचा आगावूपणा रोखला नाही. आपल्यातले आगावू माथेफ़िरू असतात, त्यांना रोखण्याची जबाबदारी त्या त्या समाजाची असते. त्यातल्या धुरीणांची असते. त्यात कसूर झाली मग अवघ्या समाजावर त्याचे खापर फ़ोडले जात असते. गुजरातच्या दंगलीचे परिणाम सामान्य मुस्लिमांना भोगावे लागले आहेत. पाकिस्तानच्या वजिरीस्तानच्या टेकड्यांमध्ये दडी मारून उचापती करणार्या तालिबानांच्या पापाची फ़ळे क्षेपणास्त्र हल्ल्यात सामान्य गावकर्यांना भोगावी लागत असतात. अगदी आझाद मैदानच्या मोर्च्यातील हुल्लडबाजांना अटक झाली, त्यातले किती खरेच गुंड आहेत? जमावात सहभागी झाले आणि भरकटत गेले, त्यांच्या हातून चुका घडून गेल्या. आज त्यांना आरोपी व्हायची पाळी आली आहे.
जेव्हा बेभान व बेताल वागणार्यांच्या हाती समाजाची वा समुहाची सुत्रे जातात, तेव्हा ती माणसे अवघ्या समाज समुहाला विनाशाकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. कारण समुह म्हणून जी मानसिकता तयार होते, तिला सारासार विचार करता येत नाही. तिला चिथावण्या दिल्या मग स्फ़ोटासारखे वापरता येते. ठिणगीने पेटणारा व फ़ुटणारा बॉम्ब स्वत:चाच विनाश ओढवून आणत असतो. आणि म्हणूनच अशी स्फ़ोटक साधने जपून वागवणार्याकडेच ठेवायची असतात. भरकटणार्या बेभान लोकांच्या हाती जाऊ द्यायची नसतात. धर्मश्रद्धा, लोकभावना व समुहभावना नेमकी तशीच स्फ़ोटक असते. त्यामुळेच तिचे नियंत्रण वा सुत्रे चुकीच्या हाती जाऊ नयेत याची सतत काळजी घ्यायची असते. आज जगभर मुस्लिम समाजाची, लोकसंख्येची सुत्रे व नेतृत्व अशा सावध व विवेकी लोकांच्या हाती आहे काय; याचा मुस्लिमांनीच विचार करावा. कारण जे काही भलेबुरे होईल त्याचे परिणाम शेवटी कोणाला भोगावे लागतात? मुस्लिम नेत्यांनी, पक्षांनी, संघटनांनी, धुरीणांनी, विचारवंतांनी, समाजचिंतकांनी व सामान्य मुस्लिमांनीही आत्मचिंतन करावे अशी त्यांना म्हणूनच विनंती व शुभेच्छा. ( संपुर्ण )
भाग ( ६९ ) २४/१०/१२
Ha hay barobar ahe pan hay sarwa lekh..samnay muslima paraynt pohchat nahit..
उत्तर द्याहटवा