गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१२

सशस्त्र तालिबान इवल्याशा मुलीला का घाबरतात?




   सत्याग्रह म्हणजे शांतता किंवा अहिंसा, असेच अनेकांना ठामपणे वाटते. पण तसे नाही. सत्याग्रह सुद्धा हिंसक असू शकतो आणि जेव्हा असे हिंसक वळण सत्याग्रहाने घेतले; तेव्हा महात्मा गांधींनी आपली चळवळ लगेच गुंडाळली होती. चौरीचौरा येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जमावाने सरकारी कर्मचार्‍यांवर हल्ला चढवला; तेव्हा गांधीजींनी सत्याग्रह थांबवला होता. अनेकदा गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहासाठी हे उदाहरण अगत्याने दिले जात असते. पण तेवढेच एक उदाहरण नाही. हिंसक आंदोलनाची चर्चा व विचारविनिमय कॉग्रेसच्या बैठकीतही झालेला होता. स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचा सहभाग या विषयावर डॉ. य. दि. फ़डके यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. अखेरच्या टप्प्यात स्वातंत्र्य चळवळ आली होती. तेव्हा हिंदू व मुस्लिमांचे ऐक्य साधण्याचे प्रयास गांधीजी करत होते. एकाच वेळी आणि एकाच शहरात कॉग्रेस व मुस्लिम लीगची अधिवेशने भरवली जात होती. तेव्हा १९२१ च्या अहमदाबाद अधिवेशनात सत्याग्रहींनी घ्यायच्या प्रतिज्ञेबद्दल खुपच वादळ उठले होते. त्या प्रतिज्ञेचा मसूदा चर्चेत होता. त्यात म्हटले होते की विचाराने, उक्तीने व कृतीने आपण अहिंसक राहू, अशी प्रतिज्ञा स्वयंसेवकाने घ्यायची होती. केवळ अहिंसेने खिलाफ़तचा व पंजाबचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल आणि परिणामत: देशाचे ऐक्य मजबूत होईल व स्वराज्य मिळेल; असा विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला होता. पण त्याला मुस्लिम नेत्यांनी विरोध केला. केवळ अहिंसक मार्गाचा अवलंब करण्यास त्यांचा विरोध होता. त्यात मुस्लिम लीगचे तेव्हाचे अध्यक्ष हसरत मोहानी यांचा समावेश होता. आपला धर्म हिंसेचा अवलंब करण्यास मुभा देत असल्याने ‘केवळ अहिंसक’ अशा शब्दप्रयोगाला मोहानी यांनी विरोध केला होता. म्हणजेच सत्याग्रह अहिंसकच असू शकतो, असे तेव्हाही सर्वमान्य नव्हते.

   ही खुप जुनी गोष्ट झाली. अलिकडल्या कालखंडात अल कायदा व ओसामा बिन लादेन ही नावे जगप्रसिद्ध झाली आहेत. पण त्यांचा गाजावाजा कुठून सुरू झाला? १९९१ साली अफ़गाण युद्धात मुजाहिदीन म्हणुन काम केलेल्या लादेनला सौदी अरेबियामध्ये मोठेच वलय प्राप्त झाले होते. अफ़गाण युद्ध संपवून मायदेशी सौदीमध्ये परतलेल्या ओसामाचे राजघराण्यातही वजन वाढले होते. त्या काळात सद्दामने कुवेतवर आक्रमण केल्यावर सौदी सम्राट भयभीत झाले होते. कारण ते आक्रमण पचवले, तर सद्दाम सौदीवरही हल्ला करण्याची शक्यता होती. म्हणून सौदी सम्राटांनी अमेरिकेची मदत घेतली. त्याला लादेनचा आक्षेप होता. सौदी अरेबिया ही इस्लामची पवित्र भूमी आहे आणि तिथे मुस्लिम नसलेल्या अमेरिकन सेनेला पाय ठेवू देता कामा नये; असा त्याचा आग्रह होता. सद्दामचे आक्रमण परतून लावण्य़ासाठी अफ़गाण पद्धतीचे जिहादी युद्ध पुकारण्याची ऑफ़र त्याने सौदी सम्राटांना दिली होती. त्यासाठी आपल्या मुजाहिदीन मित्रांना जमवण्याचेही त्याने सुचवले होते. पण सम्राटांना ती ऑफ़र मान्य झाली नाही आणि त्यांनी विनाविलंब अमेरिकन सेनेला पाचारण केले. त्यातून चिडलेल्या ओसामाने मग आपल्या देशाशीही बंड पुकारले. त्याला त्यासाठी सौदी सोडून परागंदा व्हावे लागले होते. तिथून मग अल कायदाच्या घातपाती कारावाया सुरू झाल्या. आपण म्हणू तेच खरे आणि दुसर्‍याला ते मान्य नसेल, तर तेच मत त्याच्यावर लादण्याची ही मानसिकता दोन्हीकडे सारखी दिसेल. मग समोर अमेरिका असो, सौदी सम्राट असो किंवा कोवळ्या वयातली मुलगी मलाला युसूफ़जाई असो.

   जर्मन तत्ववेत्ता हेनरिक हायने म्हणतो, तसे हे सत्याचे पाठीराखे असतात, त्यांना स्वत:चे सत्य उर्वरितांनी निमू्ट मान्य करावे, असेच वाटत असते आणि त्यात तडजोड  करण्याची त्यांनी तयारी नसते. कधी त्यांची जबरदस्ती आसपासच्या लोकांवर असते; कधी ती सत्तेच्याही विरोधात उभी ठाकते. तिला कायद्याचा धाक नसतो, की इतर कुठल्या बंधनांची पर्वा नसते. ते कायद्याच्या भाषेत गुंड गुन्हेगार असतील. पण त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तर ते सत्याच्या विजयासाठी लढणारे योद्धे असतात, असेच लक्षात येईल. मात्र जे काही त्यांना सत्य वाटत असते, ते सत्य असण्याची गरज नसते, तर तशी त्यांची गाढ श्रद्धा असली, मग पुरे असते. त्यासाठी आयुष्य पणाला लावायला ते सज्ज होतात. त्यातला एक ओसामा बिन लादेन आपल्याला दिसतो. पण युसूफ़जाई हिच्यावर गोळ्या झाडणारा बिनचेहर्‍याचा रहातो. पण दोन्हीकडली मानसिकता सारखीच असते. पण अशी माणसे हिंसा का करतात? तर सत्याचा विजय व्हावा आणि सत्य म्हणजेच पवित्र; अशी त्यांची पक्की धारणा असते. आपल्याला मुल व्हावे किंवा गुप्तसंपत्ती मिळावी, म्हणुन काही लोक नरबळी देण्यापर्यंत मजल मारतात ना? आपण चांगल्या हेतूने व पवित्र कार्य करीत आहोत, अशी समजूत त्यांना अशा मार्गाने घेऊन जात असते. ज्याला तुम्हीआम्ही पाप समजत असतो, त्यालाच ते पवित्र कार्य समजत असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मी ही लेखमाला सुरू केली तेव्हा अमर जवान स्मारकाची मोडतोड करणर्‍या दोन मुस्लिम तरूणांची छायाचित्रे छापुन त्यातला आवेश ओळखायला वाचकांना सुचवले होते. आजच्या लेखात गुजरात दंगलीतला हा दंगेखोर बघा. त्याचा आवेश तरी काय वेगळे सांगतो आहे? आपण काही महान पराक्रमी कृत्य करतोय, असेच त्याचा चेहरा सांगत नाही काय? त्याच्याच सोबत पुन्हा स्मारक तोडणार्‍याकडेही बघा. दोघांमध्ये कितीसा फ़रक आहे?    

   आपल्यालालाच सत्य गवसले आहे आणि आपण महान पवित्र कार्य करतो आहोत; अशी जेव्हा माणसाची धारणा होते, तेव्हा त्या आवेशाची एक वेगळीच नशा चढते. मग त्या नशेत माणुस कुठलेही भयंकर विधीनिषेधशून्य काम सहज करून जातो. त्याच्या त्य कृत्याची तुलना त्याच्या नेहमीच्या वर्तनाशी करता येत नाही. जसा एखादा माणूस दारू किंवा अन्य कुठल्या नशेत काही भलतेसलते करून जातो, तसाच विचारांनी संमोहित झालेला माणुसही वाटेल त्या थराला जाऊन कोणतेही अमानुष कृत्य करू शकतो. मुंबईत पकडला गेलेला कसाब असो, की त्याचे मारले गेलेले नऊ सहकारी असोत. कुठे मानवीबॉम्ब म्हणुन स्वत:लाच उध्वस्त करून घेणारे फ़िदायिन असोत, त्यांना विवेक नसतो, कारण ते विचारांच्या संमोहनाने भारावलेले असतात. ते स्वत:विषयी व्यवहारी विचार करण्याच्या पलिकडे गेलेले असतात, त्यांच्याकडुन दुसर्‍यांच्या भल्याबुर्‍याचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा करता येईल का? म्हणून तर सुखीसमाधानी चैनीचे जीवन सोडुन ओसामा कष्टप्रद जिहादी जीवन कंठत दोन दशके खडतर जीवन जगला. किडामुंगीप्रमाने मरणे त्याने पसंत केले. इतरांना तसेच मारणेही त्याला चुकीचे वाटले नाही. ज्यांची अशी समजूत पक्की झालेली असते, त्यांच्याकडुन विवेकी वर्तनाची वा सहजीवनातील सहिष्णू वर्तनाचीही अपेक्षा कधी बाळगता येत नाही. मलाला किंवा तिच्यासारख्यांना त्या विक्षिप्त वाटणार्‍या समजूतीचे बळी व्हावे लागत असते. एक म्हणजे अशा समजूतीमध्ये वावरणार्‍यांचा नेहमीच्या कायद्यापलिकडे जाऊन बंदोबस्त करणे किंवा त्यांचे बळी होणे, इतकाच मलालासमोर पर्याय असतो. आपल्यासमोर सुद्धा तोच पर्याय असतो.

   ‘सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत समुह मनोवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो आणि मग त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत असे वाटते, त्यांच्या विरोधा्त भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो’, असे बर्ट्रांड रसेल हा विचारवंत सांगतो. त्यात मलाला हिच्यावर हल्ला करणार्‍याच्या मनोवृत्तीचे उत्तर सापडते. ज्यांना आपल्यालाच सत्य गवसले आहे व जीवनातले पावित्र्य उमगले आहे अशी पक्की समजूत तयार होते, त्यांना मग त्याप्रमाणे जो कोणी वागत-जगत नाही, त्याच्यामुळे त्या पवित्र सत्याला धोका आहे; असेच सतत वाटू लागते. मग त्या सत्याच्या संरक्षणार्थ त्याला मैदानात उतरण्याची अतीव इच्छा प्रवृत्त करत असते. मग जे आपल्यासारखे नाहीत, आपले मानत नाहीत, आपल्यासारखे दिसत वा वागत नाहीत, त्यांच्यापासुन धोका आहे असा भयगंड निर्माण होतो आणि क्रियेपुर्वीच प्रतिक्रिया देण्याची उर्मी उसळून येते. म्हणूनच मलाला हिच्यासारखी इवली शाळकरी नि:शस्त्र मुलगी त्या हल्लेखोर तालिबानांना स्वत: सशस्त्र असूनही भितीदायक वाटू लागते. तिचे वा अन्य कुणाचे आपल्यासारखे नसणे, हीच त्यांची समस्या बनते, भिती बनते. त्यातून असे अमानुष हल्ले व कृती घडत असतात.      ( क्रमश:)
भाग  ( ६४ )   १९/१०/१२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा