‘पण (इतर कुणी) मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही. कारण बिगर मुसलमान असणे व त्यांचा मुसलमान नसण्याचा अधिकार मुसलमानांनी मान्य करणे यात महत्वाचा असा गुणात्मक फ़रक आहे.’
अब्दुल कादर मुकादम यांनी तीन वर्षापुर्वी लिहिलेल्या या वाक्याने मुस्लिम नसण्य़ाच्या माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह लावले आहे, त्यामुळेच मी मुस्लिम नसलो तरी मुस्लिम असणार्यांच्या बाबतीत व त्यांच्या वागण्याबाबतीत मला चिंता व विचार करणे भाग झाले आहे. कारण त्यांच्या मुस्लिम असण्याकडे मला दुर्लक्ष करून भागत नाही. त्यांचे मुस्लिम असणे माझ्या मुस्लिम नसण्याशीही संबंधित आहे. कोणी हिंदू असेल वा कोणी ख्रिश्चन वा बौद्ध असेल, तर मला त्यांची फ़िकीर करण्याचे काही कारण नाही. कारण माझ्या हिंदू, ख्रिश्चन वा बौद्ध नसण्याला त्यांची मान्यता असण्याचा संबंधच येत नाही. मी कुठल्या धर्माचा आहे किंवा त्यांचा धर्म पाळत नाही, याबद्दल त्यांना फ़िकिर नसेल तर मलाही त्यांच्या धर्माबद्दल किंवा धार्मिक वर्तनाबद्दल उहापोह करण्याचे कारण उरत नाही. आणि मी त्यात पडत सुद्धा नाही. पण मला मुस्लिमांकडे किंवा मुस्लिम म्हणून होणार्या त्यांच्या वर्तनाकडे तशी डोळेझाक करता येत नाही. कारण त्यांचे मुस्लिम असणे माझ्या मुस्लिम नसण्याशी संबंधित आहे ना? आणि असे कोणी ओसामा बिन लादेन किंवा आयमान अल जवाहिरी बोललेला नाही. तर मान्यवर मराठी वृत्तपत्रातून ज्याला मुस्लिम विचारवंत म्हणुन एवढी मान्यता आहे, त्या अब्दुल कादर मुकादम या इस्लामच्या अभ्यासकाने उपस्थित केलेला हा गंभीर प्रश्न आहे.
आता या वाक्याच्या संदर्भाने किंवा तुलनेत अनेक घटना तपासून पाहिल्या; मग मुस्लिमांचा जमाव चिडून रस्त्यावर का येतो त्याचा अंदाज थोडाफ़ार येऊ शकतो. जेव्हा मुस्लिमांना त्याच्या धर्माचे पालन करण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो, तेव्हा आपोआपच इतरांनी कुठला धर्म पाळावा किंवा पाळू नये; ते ठरवण्य़ाचा अधिकार मुस्लिमांना प्राप्त होतो, असेच मुकादम यांना सुचवायचे नाही काय? अन्यथा त्यांनी असा प्रश्न मुळात विचारलाच कशाला असता? इस्लाम धर्माचे पालन करणारे मुस्लिम म्हणजे कोणी सरकार वा घटनात्मक सत्ताधारी आहेत काय, की ज्यांच्याकडुन अन्य नागरिकांनी आपापल्या धर्मविषयक मान्यता मिळवायला हव्यात? आपल्या भारत देशामध्ये राज्यघटना आहे, संसद आहे, कायदेमंडळे आहेत. त्यांनी बनवलेल्या कायद्यांचे राज्य आहे. त्यानुसारच अन्य धर्मियांप्रमाणे इस्लामचे पालन करू इच्छिणार्या लोकांना मुस्लिम असण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यांच्या मुस्लिम असण्याला हिंदूंची किंवा कुणा ख्रिश्चन नागरिकांची मान्यता आहे काय, असा प्रश्न कधी, कुठे विचारला गेला आहे काय? जिथे जिथे लोकशाही व घटनात्मक सरकारे आहेत, तिथे असा प्रश्न कधीच मुस्लिमांनाही विचारला गेलेला नाही. अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात पहिल्यापासून ख्रिश्चन बहुसंख्या आहे व लोकशाही सरकार आहे. तिथे नंतर आलेल्या वा धर्मांतरित झालेल्या मुस्लिम स्थानिक नागरिकांना, तिथल्या ख्रिश्चनांची मान्यता आहे काय, असा प्रश्न कधी विचारला गेलेला नाही. मग इथे भारतातला एक इस्लामिक पंडीत असा प्रश्न का विचारतो आहे? की मुस्लिमांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य मिळाले, मग आपोआप अन्य धर्मांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार मुस्लिमांनाच प्राप्त होतो, असे मुकादम यांना सुचवायचे आहे?
हा सगळा नेमका काय प्रकार आहे? की अत्यंत सावधपणे मुकादम असे सुचवत आहेत, की मुस्लिमांना धर्म पालनाचा अधिकार मिळतो, तेव्हा आपोआपच अन्य बिगर मुस्लिमांचे धर्मस्वातंत्र्य संपुष्टात येते? जिथे म्हणून इस्लाम असेल, तिथे आपोआपच अन्य धर्म दुय्यम होतात. किंवा मुस्लिमांना धर्मस्वातंत्र्य मिळाले म्हणजे इतर कुठल्याही विचारसरणी किंवा धर्मश्रद्धेचे स्वातंत्र्य संपुष्टात येते; असे त्यांना सांगायचे आहे काय? कारण बहूतेक ठिकाणी मुस्लिम एकत्र येऊन आपल्या धर्मश्रद्धेचा उदघोष करतात, तेव्हा त्यांचा रोख अन्य मुस्लिमेतरांच्या विरोधात असतो. मग अशी लोकसंख्या दुसर्या कुठल्याही धर्मसमुदायाची असते वा मुस्लिमेतर असते. आणि म्हणुनच मुस्लिम असे का वागतात, हा विषय मुस्लिमांपेक्षा मुस्लिमेतरांसाठी जिव्हाळ्याचा बनून जातो. जे मुस्लिम नाहीत, त्यांचे मुस्लिम नसणे इस्लामचे पालन करणार्यांना खुपत असते आणि त्यातून अशा प्रतिक्रिया मुस्लिम समाजाकडून दिल्या जातात काय? त्याविषयी चर्चा सुरू झाली, मग त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन खरा प्रश्न टाळला जात असतो. शंका काढल्या मग प्रश्न विचारणार्यावरच उलटे आरोप करून टाळाटाळ केली जात असते. म्हणुनच मी मुस्लिमांवर आरोप करणार्यांची मते बाजूला ठेवून, शक्य तो मुस्लिम विचारवंत व अभ्यासकांच्या विवेचन व विश्लेषणाचाच बारकाईने अभ्यास केला. त्या विवेचनातून व मतप्रदर्शनातून जे अनेक मूळ आक्षेप आहेत, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयास केला. आणि माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी, की जितके मुस्लिम खर्या प्रश्नाबद्दल टाळाटाळ करतात, तेवढेच जगभरचे उदारमतवादीही त्या विषयावर सत्य शोधायची टाळाटाळ करतात. मग अब्दुल कादर मुकादम यांच्यासारख्या वास्तव मुस्लिम अभ्यासकाकडून थोडीफ़ार उत्तरे सापडू शकतात. पण ती अत्यंत बारकाईने शोधली तरच सापडतात. त्यांचाही काळजीपुर्वक अभ्यास करावा लागतो; तेव्हा थोडेफ़ार आकलन होऊ शकते. इथे मुकादम यांनी जो कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर लोकप्रबोधनासाठी वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी उहापोह का करू नये, याचेही आश्चर्य वाटते. की मुस्लिम विचारवंत व अभ्यासकांनी मुकादम यांचा तो दावा बिनतक्रार मान्य केला आहे?
दोन महिन्यापासून मी ह्या विषयावर लिखाण करतो आहे; तेव्हा अनेक मुस्लिमांनी मला मी मुस्लिमांबद्दल का लिहितो असा सवाल फ़ोनवरून विचारला, त्याचे उत्तर इथे अब्दुल कादर मुकादम यांनी दिले आहे. मी ह्या विषयाचा उहापोह करतो आहे, कारण माझा इस्लाम धर्माशी काहीही थेट संबंध नसला तरी माझ्या मुस्लिम नसण्याला मुस्लिमांची मान्यता असावी लागते, असा एका मुस्लिम विचारवंताचाच दावा आहे. आणि असे असेल तर मला मुस्लिमांच्या अशा वागण्याकडे व अपेक्षांकडे गंभीरपणे बघणे अगत्याचे होऊन जाते. मुस्लिमांचा धर्म किंवा त्यांचे धर्मपालन; हा केवळ त्यांचा व्यक्तीगत वा समाजाच्या अंतर्गत विषय उरत नाही. तो मुस्लिम नसलेल्या बाकीच्या कोट्यवधी मुस्लिमेतरांसाठी अत्यंत गंभीर विषय होऊन जातो. त्याचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नसून त्या मुस्लिमेतरांच्या आसपास वास्तव्य करणार्या मुस्लिमांच्या वर्तनाशी जवळचा संबंध येतो. कारण हे जे कोणी माझ्यासारखे मुस्लिम नसतात, त्याच्या तशा मुस्लिम नसण्यात मुस्लिम हस्तक्षेप करू शकतात; असेच मुकादम उघडपणे प्रतिपादन करत आहेत. किंवहूना या जगात मुस्लिम नसण्यासाठी मुस्लिमांकडून मान्यता मिळवणे आवश्यक आहे, असे मुकादम प्रतिपादन करत आहेत. तशी कुठल्या कायद्यात तरतूद नाही. पण तशी मुस्लिमांची मुस्लिमेतरांकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेचा भंग झाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतील, असा अर्थ काढायला जागा आहे. अमर जवान स्मारक किंवा महावीराच्या मुर्तीच्या अवहेलनेचे ताजे उदाहरण त्यासाठी देता येईल. आणि ज्याचा बरावाईट परिणाम मुस्लिमेतरांवर अपरिहार्यपणे होणार आहे, त्यांनी त्याबद्दल बोलूच नये अशी अपेक्षा कशी करता येईल?
अब्दुल कादर मुकादम हे मुस्लिम समाज व इस्लामचे गाढे अभ्यासक मानले जातात, तेव्हा त्यांच्या अशा लिखाणाकडे कोणीतरी मुर्ख लिहितो, म्हणून दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही. कारण त्यांच्या लिखाणातील ही भाषा व सुचक अर्थ स्पष्ट आहे. मुस्लिमांना त्यांच्या धर्मविषयक कल्पना इतक्या प्रिय आहेत, की त्यापुढे अन्य धर्म किंवा इस्लाम सोडून अन्य कशाविषयीची श्रद्धा मुस्लिमांना अमान्य आहेत. त्याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही. पण म्हणुन दुसर्यांच्या धार्मिक वा अन्य श्रद्धांचे स्वातंत्र्य त्यातून संपुष्टात येते काय? मुस्लिमांच्या मान्यतेशिवाय मुस्लिमेतरांना तसा अधिकारच असु शकत नाही, असा मुकादमांच्या लिखाणातला गर्भितार्थ आहे. आणि मग म्हणुनच त्याच्या वास्तविकतेची तपासणी करणे भाग आहे. आपल्याच धर्मश्रद्धा मानायची किंवा सक्तीने दुसर्यावर लादायची प्रवृत्ती त्यातून स्पष्ट होत नाही काय? जर कोणी सुखासुखी ते मान्य करणार नसेल व आपल्या श्रद्धा गुंडाळुन मुस्लिमांना शरण येणार नसेल; तर त्याच्यावर सक्ती करण्याची धमकीच या शब्दातून समोर येत नाही काय? पण मुकादम त्याबद्दल खुलासा न करता विषय व प्रश्न अर्धवट सोडुन देतात. म्हणुन बिघडत नाही. आपल्याला त्याचे उत्तर शोधावेच लागेल. कारण आपण मुस्लिम नसू आणि आपल्याला मुस्लिमेतर रहायचे असेल, तर अशा प्रशाचे उत्तर शोधणे भागच आहे. त्यापासून आपली सुटका होत नाही.( क्रमश:)
भाग ( ६६ ) २१/१०/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा