गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

निधनाची बातमी कधी सुखद नसते, पण....


  कुठलाही मृत्यू ही चांगली बातमी म्हणता येत नाही. पण या आठवड्याच्या आरंभीच चित्रपट निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या निधनाची बातमी अनेकांना दिलासा देणारी वाटली असेल. कारण तत्पुर्वी सातत्याने इतक्या घोटाळ्याच्या बातम्यांचे काहूर माजले होते आणि उलटसुलट बातम्यांचा गदारोळ चालला होता; की काय खरे आणि कशावर विश्वास ठेवायचा अशी लोकांची सैरभैर अवस्था होऊन गेली होती. आधी सोनिया गांधींचा जावई रॉबर्ट वड्रा याच्या लफ़ड्याचा पाढा वाचला गेला आणि त्याचे तपशील लोकांच्या पचनी पडत नाहीत; इतक्यात कायदामंत्री सलमान खुर्शिद यांच्या पत्नीने सरकारी अनुदानात अफ़रातफ़र केल्याचे प्रकरण गाजू लागले. त्याचा तपशील समजून घेतला जात नाही, इतक्यात अण्णांचे विभक्त सहकारी केजरिवाल यांनी भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर नवे आरोप करून धमाल उडवून दिली. थोडक्यात भ्रष्टाचाराच्या बातम्यांचे अजीर्ण व्हायची पाळी वाचणार्‍यावर व वाहिन्या बघणार्‍यांवर आली. दुसरीकडे बातम्या देणारे व त्यावर भाष्य करणारे, यांचीही तारांबळ उडाली होती. कारण गडकरी यांच्यावर खळबळजनक आरोप करणार्‍या केजरिवाल यांच्या आरोपच नव्हे; तर पुराव्यांची गडकरी यांनी समोर येऊन भंबेरी उडवून दिली. कारण गडकरी यांच्या खुलाश्याने केजरिवाल यांच्या लढवय्या सहकारी अंजली दमाणियांना तोंड लपवायची पाळी आणली. त्यांचे आरोप सिद्ध झालेच नाहीत. पण त्यांचा एकूणच लढाऊ आवेश शंकास्पद ठरला. सहाजिकच त्य फ़ुसक्या आरोपांनी एकूणच केजरिवाल यांच्या लढाईबद्दल शंका निर्माण केल्या. त्याचे कारण आरोपाचा इन्कार झाला इतकेच नव्हते.

   गडकरी यांच्यावर आरोप झाल्यावर भाजपाचे सगळे नेते त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले होते. जसे वड्रा यांच्याबाबतीत कॉग्रेसचे सगळे दिग्गज पुढे आले, तसेच गडकरी समर्थनासाठी भाजपावाल्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले. अर्थात त्यांना फ़ारशी मेहनत घ्यावी लागली नाही. कारण केजरिवाल व दमाणियांचे आरोपच फ़ुसके होते. किंबहुना दमाणियांचे सगळे व्यवहार व वागणेच संशयास्पद असल्याने भाजपाला आपल्या चारित्र्याचे दाखले देण्यात कुठली अडचण आली नाही. तेवढेच नव्हते. केजरिवाल यांच्यावर त्यांच्याच जुन्या सहकार्‍यांकडून आरोप झाले, मुंबईतला आदर्श घोटाळा बाहेर काढणारे व सिंचन घोटाळ्याची लढाई लढणारे माजी पोलिस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी गडकरींवरील आरोपांचे समर्थन न करता, केजरिवाल लोकांची फ़सवणूक करीत असल्याचा आरोप करून धमाल उडवून दिली. सहाजिकच भाजपाचे काम खुपच सोपे होऊन गेले. फ़ार कशाला ज्यांनी गडकरी यांच्यावरील आरोपांचा राजकीय लाभ घ्यायला पुढे यावे; त्यापैकी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानेही गडकरी यांची पालखी उचलून धरली. सहाजिकच शिकारीला निघालेले केजरिवालच शिकार होऊन गेले. पण दुसरीकडे त्यांचे आधीचे आरोपही निकामी होऊन गेले. सोपे करून सांगायचे तर केजरिवाल यांचा गेल्या आठवड्याअखेर खैरनार होऊन गेला. आणि दुसरीकडे लोकांचा एकूणच आरोपबाजीवरचा विश्वास डळमळित होऊन गेला. मागल्या रविवारी ‘पुण्यनगरी’च्या प्रवाह पुरवणीत लेख लिहिताना मी म्हटलेच होते, ‘दमाणिया दमानी घ्या’.

   गडकरी यांच्यावर आरोप करायला हरकत नव्हती. पण राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षावर आरोप करताना, आपले आरोप खोटे पडू नयेत याची पुरेशी काळजी घ्यायला हवी होती. गडकरी हे सेना-भाजपा युतीची सत्ता असताना महत्वाचे मंत्री होते. त्यानंतरच त्यांचे वैभव वाढलेले आहे. त्यामुळे त्यांच्या कपाटात अनेक भानगडी लपलेल्या असू शकतात. त्याचा कसून शोध घेतला तर नक्कीच एखादे घबाड मिळू शकले असते. पण तसे न करता केजरिवाल यांनी अविश्वसनिय अशा दमाणियाबाईंच्या कागदपत्रांना अनाठायी महत्व दिले. त्यांची सर्व कागदपत्रे केजरिवाल यांनी वा़चली सुद्धा नसावित. अन्यथा त्यात गडकरी अडकण्यापेक्षा आपणच तोंडघशी पडू; हे त्यांच्याही लक्षात आलेच असते. पण त्यांनी उतावळेपणा केला. मात्र त्यांच्याइतका उतावळेपणा टाईम्स ऑफ़ इंडीया नावाच्या इंग्रजी दैनिकाने केला नाही. म्हणूनच आज गडकरी यांना तोंड लपवण्याची पाळी आली आहे. म्हणजेच माझा केजरिवाल यांच्यावरचा गडकरी प्रकरणातला आक्षेप ‘टाईम्स’ने खरा ठरवला. गडकरीनी छातीठोकपणे ज्या कंपनी व्यवहाराचे माध्यमांसमोर येऊन गुणगान केले होते, त्याचा पाठपुरावा करून गडकरी यांचे पितळ उघडे पाडले आहे. मात्र त्याच वेळी केजरिवाल व दमाणियांचे आरोपही निराधार ठरले आहेत. मग सवाल असा उरतो, की केजरिवाल यांची विश्वासार्हता किती? त्यांच्या सहकार्‍यांची विश्वासार्हता काय? त्यांना खरोखरच भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी करून समाजजीवन स्वच्छ करायचे आहे, की नुसतीच सनसनाटी माजवून प्रसिद्धीच्या झोतात रहायचे आहे?

   इथे एक मुद्दा विसरता कामा नये. गडकरी यांच्यावर खळबळजनक आरोप केल्यावर केजरिवाल यांना त्याचे पुरावे देता आलेले नव्हते. उलट भाजपा आणि गडकरी यांच्याकडून खुलासे झाल्यावर केजरिवाल यांनाच आपल्या सहकार्‍यांवर उलट झालेल्या आरोपांची चौकशी करतो; असे घोषित करावे लागले होते. टाईम्सने गडकरी प्रकरणाचा पाठपुरावा योग्य दिशेने केला नसता, तर गडकरींना स्वच्छ ठरवण्य़ास केजरिवाल यांचे आरोप कारणीभूत झाले असते. आणि म्हणूनच अण्णांपासून दुर होऊन राजकीय आखड्यात उतरलेल्या केजरिवाल यांच्या टोळीची उलट तपासणी अगत्याची झाली आहे. त्यांचे हेतू, उद्दीष्ट, मार्ग व साधने यांच्या संबंधाने शंकासमाधान होण्याची गरज आहे. विभक्त होण्यापुर्वी अण्णा हजारे यांनी केजरिवाल यांना काही प्रश्न केले होते, असे नंतर अण्णांनीच सांगितले आहे व त्याची उत्तरे केजरिवाल देऊ शकले नाहीत असा अण्णांचाच दावा आहे. त्यातला एक प्रश्न असा होता, की तुमच्या राजकीय पक्ष वा संघटनेत कोणी भ्रष्ट वा गैरमार्गाने कृत्ये करणारा नसेलच, याची हमी काय? त्याचे उत्तर केजरिवाल देऊ शकले नव्हते. आणि दमाणियांना सोबत घेऊन केजरिवाल यांनी अण्णांची शंका खरी केली आहे. सोबत येतील त्यांना घेऊन संघटना व पक्षाची उभारणी होऊ शकेल. पण ज्या पावित्र्य व चारित्र्याचे दावे केले जात आहेत आणि अन्य राजकारण्यांकडे तशी मागणी केली जात आहे; त्याची हमी खुद्द केजरिवाल यांच्याच गोतावळ्याला देता आलेली नाही. त्यातून चौकशी व्हावी ही पळवाट योग्य नाही. कारण दमाणिया वा प्रशांत भुषण व मयांक गांधी यांची चौकशीला तयारी आहे, असे केजरिवाल सांगतात. पण तशी तयारी बाकीच्या राजकीय नेत्यांनी कधी दाखवलेली नाही? मग केजरिवाल यांनी आरोप केलेले नेते आणि खुद्द केजरिवाल यांचे सहकारी, यांच्यात फ़रक तो काय उरला?

   गेल्या आठवड्याने केजरिवाल यांच्या एकूण कार्यपद्धती व वाटचालीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. केजरिवाल आणि अण्णा हजारे, आपले मार्ग भिन्न असले तरी मंझिल एकच असल्याचे सांगतात. पण ज्याप्रकारे दमाणिया प्रकरण समोर आले आहे, त्यानंतर केजरिवाल यांची दिशा शंकास्पद झाली आहे. कारण गडकरी यांच्यावर त्यांनी अत्यंत बिनबुडाचे आरोप केले आणि प्रत्यक्षात दमाणीयांचेच व्यवहार संशयास्पद निघाले आहेत. त्या आरोपाच्या पलिकडे जाऊन टाईम्सने भानगड उकरून काढली नसती तर? की केजरिवाल राजकीय सुडबुद्धीच्या लोकांना हाताशी धरुन हा उद्योग करीत आहेत? त्यांच्या सहकार्‍यांपैकी दोघांनी मुंबईत पत्रकारांशी बातचित करतांना स्वत:च्या व्यवहाराची कागदपत्रे समोर न मांडण्याचा अट्टाहास का धरावा? आपल्याला मीडिया ट्रायल नको असा त्यांचा दावा होता. मग ते स्वत: काय करत असतात? दुसर्‍यांची कागदपत्रे दाखवून माध्यमात खटले चालवायचे आणि आपल्याला तो जाच नको म्हणायचे; ही शुद्ध लफ़ंगेगिरी नाही काय? आणि हा सगळा सावळागोंधळ चालू असताना, यश चोप्रा यांचे निधन झाले. त्यांच्याकडे वाहिन्यांचा फ़ोकस वळला आणि माझ्या खुप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माझे एक अत्यंत आवडते गाणे यश चोप्रांच्या चित्रपटातले आहे, हे मला प्रथमच कळले. किंबहुना त्यांच्या पहिल्याच चित्रपटातले ते गीत असल्याचा शोध लागला. त्याचा जेवढा आनंद होता, त्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीचे नेमके विश्लेषण त्याच काव्यात असावे याचाही आनंद अधिक होता. त्या दुहेरी आनंदाने माझा यशजींबद्दलचा आदर द्विगुणित केला. गेले काही महिने ज्यावर इतका उहापोह चालू आहे व गदारोळ माजला आहे आणि एकाहुन एक महान अभ्यासक विवेचन करीत आहेत; त्याच परिस्थितीचे मोजक्या शब्दात एका मनस्वी कविने केलेले विश्लेषण, त्या गाण्यामधुन झालेले आहे? कुठला तो चित्रपट आणि कुठले ते गीत?    ( क्रमश:)
भाग  ( १ ) २६/१०/१२

1 टिप्पणी:

  1. रोज संध्याकाळी आम्ही फिरायला जातो . ४--५ दिवस्पुर्वी असेच सगळे जन वैतागले आणि ठरवले कि आता भ्रष्टाचार , देश असल्या विषयावर फुकाची चर्चा करायची नाही . गाणी , सिनेमा , शेअर असले टोपीक काढायचे . भाऊ आज तुम्ही हा लेख लिहला -- तुम्हाला समाजमन समजले आहे असेच वाटते .

    उत्तर द्याहटवा