बुधवारी गुजरात विधानसभेच्या पुढल्या निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले. त्याच दिवशी दुपारी सौराष्ट्र विभागातल्या राजकोट या शहरामध्ये कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पहिली प्रचारसभा झाली. भाजपातर्फ़े नरेंद्र मोदी यांनी दोन आठवडे आधीच महिनाभर चालणार्या प्रचारमोहिमेचा आरंभ केला होता. तेव्हा प्रत्येकजण म्हणत होता, की मोदींनी हिंदूत्वाकडे पाठ फ़िरवून विकासाचा मुद्दा उचलला आहे. मात्र वास्तविकता अशी आहे, की मागल्या निवडणुकीतही पाच वर्षापुर्वी मोदी यांनी विकासाचाच मुद्दा घेतला होता. पण त्यांच्या विरोधकांनी सतत दंगलीच्या खपल्या काढून मोदींनाही दंगलीच्या विषयावर यायला भाग पाडले होते. आणि अशा विषयाचा आपल्याला लाभ मिळणार हे ठाऊक असल्याने मोदींनी अगत्याने त्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र त्यावेळी भाजपा किंवा मोदी यांच्यावर दंगल किंवा मुस्लिम विरोधी हिंसेचे आरोप करण्यात सोनिया गांधी खुपच आघाडीवर होत्या. इतक्या जोशात होत्या, की मोदींवर त्यांनी ‘मौतका सौदागर’ अशी तिखट टिका केली होती. पण मतदान होऊन निकाल पाहिल्यावर सर्वांच्याच लक्षात आले, की हिंदूत्वाचा आरोप करुन मोदींना हरवणे अशक्य आहे. उलट ते मोदींच्या पथ्यावर पडते. म्हणूनच असेल यावेळी सोनिया गांधी कमालीच्या सावध होत्या. त्यांनी राजकोटच्या काही मिनिटांच्या भाषणात गुजरातचा विकास, राज्यकारभार, भ्रष्टाचार किंवा शेतकर्यांच्या आत्महत्या अशाच विषयावर बोलणे पसंत केले. त्यांच्या संपुर्ण भाषणात कुठेही गुजरातच्या दंगलीचा साधा उल्लेखसुद्धा झाला नाही. मुस्लिमांवर मोदी अन्याय करतात, असे शब्दही आले नाहीत. खरे म्हणजे कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्षाचा तो कायम आवडता विषय राहिला आहे. भाजपाच्या हिंदूत्ववादी चेहर्याला झोडताना मोदी व गुजरातच्या दंगली हे सेक्युलर मंडळींचे गेल्या दहा वर्षातले एकमेव हत्यार झाले होते. पण यावेळी खुद्द सोनिया गांधींनाही त्या हत्याराला हात लावायची हिंमत झालेली नाही. त्याचे कारण काय असावे?
सतत हिंदूत्वाला शिव्या घालून व गुजरातच्या दंगलीचे राजकीय भांडवल करून; आता ते हत्यार कमालीचे बोथट झाले आहे आणि अगदी मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवता येणे शक्य असले, तरी त्या गठ्ठ्याची परिणामकारकता गुजरातमध्ये संपलेली आहे. ज्या प्रमाणात गुजरातमध्ये मुस्लिम मते गठ्ठा म्हणुन मिळवता येतात, त्यापेक्षा अधिक प्रमाणात हिंदू मते विरोधात एकवटतात, असा अनुभव आलेला आहे. लागोपाठच्या दोन निवडणूका जिंकून मोदी यांनी त्याचे पुरावेच दिले आहेत. मात्र या गडबडीत मोदी यांनी स्वत:ची प्रतिमा अशी भव्यदिव्य करून घेतली, की त्यांच्या विरोधात बोलणार्या व प्रचार करणार्या प्रसार माध्यमांचाही मोदींनी मोठ्या धुर्तपणे आपली प्रतिमा भव्य करण्यासाठी छानपैकी वापर करून घेतला आहे. मोदींच्या कारकिर्दीतील दंगली व त्यात झालेली मुस्लिमांची होरपळ कोणी नाकारू शकत नाही. पण त्याचे मतांसाठी भांडवल करताना सामान्य हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार झाला नाही, त्याचाच फ़ायदा मोदी अत्यंत साळसूदपणे उठवत गेले आहेत. त्यापुर्वी १९६९ व १९८५ मध्येही गुजरातमध्ये भीषण दंगली झाल्या. त्यातही सर्वाधिक मुस्लिमांचीच हानी झाली होती. अगदी बळींची संख्या बघितली तरी १९६९ व २००२ चे आकडे जवळपास सारखेच आहेत. हे गुजरात बाहेरून बघणार्यांना समजत नसतील किंवा समजून घ्यायचे नसतील. पण सत्य इतकेच आहे, की मोदी राजकारणात नव्हते आणि भाजपाचे चारही आमदार गुजरातमध्ये निवडून येत नव्हते; तेव्हा १९६९ सालात गुजरातच्या दंगलीने ११०० लोकांचा बळी घेतला होता. हे सत्य गुजराती माणुस जाणतो. त्यामुळेच जेवढे २००२ दंगलीचे ढोल वाजवले जातात, तेवढे १९६९ च्या दंगलीचे विस्मरण सामान्य माणसाला झालेले नसते. आणि म्हणूनच जेवढे गुजरात बाहेरचे लोक मोदींना गुन्हेगार मानतात, तसे गुजरातमध्ये होत नाही. सरकार कुणाचेही असो, दंगल होते तेव्हा अल्पसंख्यांकांचीच अधिक हानी होते हे सत्य आहे.
त्याचे भान आता दोन पराभव पचवल्यानंतर कॉग्रेस पक्षाला आलेले दिसते. दंगलीचे अधिक भांडवल केल्याने मुस्लिम गठ्ठा मते मिळू शकली तरी दुसरीकडे मोदींना हवा तसा हिंदू मतांचा गठ्ठा तयार करण्यास आपण हातभार लावतो, याचा साक्षात्कार कॉग्रेसला झाला असेल तर ती चांगली बाब आहे. मतदाराला भयभीत करून मते मिळवण्यापेक्षा आपल्या गुणवत्ता व कर्तृत्वावर मते मिळवणे लोकशाहीला पोषक असते. जे गुजरातमध्ये दोन निवडणूका आधीच शक्य होते. मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातमध्ये भाजपाची लोकप्रियता घटत चालली होती. दंगली होण्याच्या थोडा काळ अगोदर तिथे अनेक स्थानिक संस्थांच्या निवडणूका पार पडल्या होत्या आणि त्यात कॉग्रेसने बाजी मारली होती. बहुतेक महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने सपाटून मार खाल्ला होता. म्हणजेच गुजरातचा मतदार भाजपाबाबत निराश होत चालला होता. म्हणुनच केशुभाई पटेल यांना बाजूला करून मोदी यांना मुख्यमंत्रीपदी आणले गेले होते. दंगलीनंतर अगोदर माध्यमांनी दंगलीला जे स्वरूप दिले, त्यात सेक्युलर म्हणून कॉग्रेस ओढली गेली आणि भाजपावर नाराज असलेल्या बहुसंख्य मतदाराला कारण नसताना हिंदूत्वाच्या पारड्यात ढकलले गेले. दंगल घडवण्यात भाजपा किंवा संघाचा पुढाकार असेलही. परंतू त्यात सहभागी झालेल्या लाखो सामान्य माणसांचे काय? ते सगळे भाजपा किंवा संघवाले नव्हते. पण जेव्हा भाजपा, संघ किंवा मोदी यांच्यावरच सगळे खापर फ़ोडले गेले, तेव्हा आपोआपच सामान्य हिंदू माणूस त्याच बाजूला ओढ्ला गेला आणि ते अगदी स्वाभाविक असते. माणूस जेव्हा भावनेच्या आहारी जातो तेव्हा व्यवहारी हिशोब बाजूला पडत असतात, मग तो हिंदू असो की मुस्लिम असो.
मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाले त्यात पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिमचे नाव आले. पण त्यासोबतच त्याच्या इथल्या साथीदार व सोबत्यांची ना्वेही गोवली गेली. त्यांचे सगेसोयरे व परिचित आपोआपच सहानुभूती म्हणून आरोपींच्या मागे उभे राहिले ना? मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज व मतदार आरोपींच्या मागे उभा राहिला हे कोणी नाकारू शकत नाही. त्या प्रकरणात आरोपी असलेल्या अबू आझमी यांना मुलायमनी आपल्या समाजवादी पक्षाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष करून इथली मुस्लिम मते मिळवली हे विसरून चालेल काय? १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे तीन मुस्लिम आमदार निवडून आले, ते मुस्लिमांची स्फ़ोटातीला आरोपींना सहानुभूती होती म्हणूनच ना? बशीर पटेल यांच्यासारखे अनेक मुस्लिम लीगचे नेते तात्काळ समाजवादी पक्षात सहभागी झाले. मध्य मुंबईच्या दोन तर भिवंडीच्या एका मतदारसंघातून त्यांचे आमदार निवडूनही आले. ती सहानूभुती आरोपींसाठीच होती ना? त्याचेच प्रतिबिंब २००२ पासून गुजरातच्या निवडणूकांमध्ये पडलेले दिसेल. सेक्युलर अपप्रचारामध्ये जेवढे मोदी यांना गुजरातच्या दंगलीत मुस्लिमांचे खुनी म्हणुन रंगवण्यात आले; तेवढे त्यांच्या पथ्यावर पडत गेले. त्यासाठी कुठला पुरावा नव्हता. पण बदनामी होत असूनही मोदी खुश होते. कारण त्यातून त्यांचा हिंदू मतांचा गठ्ठा तयार होऊ लागला होता. २००२ मध्ये त्यांनी त्याच बळावर मध्यावधी निवडणूका घेऊन सत्तेची मुदत वाढवून घेतली. मग हुकूमी बहुमत पाठीशी आल्यावर त्यांनी काही प्रमाणात विकासाची धोरणे राबवून आपली प्रतिमा उजळून घेतली. पण कधीच त्यांनी दंगलीचे त्यांच्यावर होत असलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही. जेवढी दंगलीसाठी बदनामी तेवढी आपली कणखर आक्रमक हिंदू नेता ही प्रतिमा उंचावणार, याची त्यांना खात्री होती. तोंडाने एकही हिंदूत्ववादी शब्द न उच्चारता हिंदूंचा कडवा नेता होण्याची संधी मोदींना त्यातूनच मिळाली आणि भाजपाचे अडवाणी वा अन्य नेते जेवढे सेक्युलर व्हायला धडपडत होते, त्याचा मोदींना अधिकच लाभ मिळत गेला.
त्यातून बाहेर पडून झालेल्या राजकीय चुकांचा फ़ेरविचार करण्यापेक्षा सोनिया गांधींनी मागल्या निवडणूकीत ‘मौतका सौदागर’ अशी भाषा वापरून मोदींचे काम आणखी सोपे केले. आता सोनियांना व तत्सम सेक्युलर मंडळींना जाग आली आहे. कारण तोच मोदी आता त्यांच्यासाठी देशव्यापी आव्हान बनला आहे. कारण त्याच्या कड्व्या हिंदूत्ववादी प्रतिमेभोवती हिंदूमतांचा एक गठ्ठा हळूहळू जमला आहे. त्यामुळेच आता सोनियांनी मोदी यांचे नावही आपल्या भाषणात घेतले नाही, की दंगलीचा साधा उल्लेखही त्यांच्या भाषणात आला नाही. त्याचा अर्थ इतकाच, की आता त्यांना मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यापेक्षा हिंदू मते मोलाची वाटू लागली आहेत. मोदींच्या हिंदूत्वाला शिव्या देऊन हिंदू मते गमावण्याचे भय त्यांना सतावते आहे. हिंदू मतासाठी सोनियांचे मुस्लिम प्रेम आटले आहे. हे सेक्युलर मुस्लिमप्रेम किती दिखावू असते ते उद्या बघू. ( क्रमश:)
भाग ( ५० ) ५/१०/१२
एकदम बरोबर आहे . मुळात मोदींना चोख असे प्रत्युत्तर देण्यासाठी कॉंग्रेस कडे कोणता डोम्बल्याचा मुद्दा आहे ? सिलिंडर व इतर सबसिडीचे मुद्दे काढून सोनियाने स्वतःचे हसूच करून घेतले. जातीयवादी मोदीबद्दल काहीच लिहायचे नाही असे सांगितल्या वर भाषण लिहून देण्याराचे डोकेच चालले नसेल..
उत्तर द्याहटवागुजरात दंगल गुजरात दंगल, सगळे गुजरात दंगली बद्दल तोंड पूर्ण उघडुन पोटभर ओकतात पण गोधरा ह्त्याकांड जे ह्या सर्वाच मुळ आहे त्या बद्दल चकार शब्द काढायलाहि का धजावत नाहित? का ? "Every action has its reaction" is universal law. Godhara was an action and Gujrat Riots was its Reaction
उत्तर द्याहटवाraghav