खलील जिब्रान या विचारवंताचे दोन सुविचार मला आठवतात १) श्रद्धा हे हृदयातले ज्ञान आहे, जे पुराव्याच्या आवाक्यातले नाही. आणि २) श्रद्धा हे हृदयातील असे मृगजळ आहे, की जिथपर्यंत विचारांचा कारवान घेऊन पोहोचता येत नाही.
ज्यांचा धर्मावर, देवावर विश्वास असतो त्याला आस्तिक म्हणजे श्रद्धाळू म्हटले जाते. ती माणसाची श्रद्धा असते. ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्यानी त्या श्रद्धेची सत्यता कोणाला पटवून देण्याचे कारण नसते. श्रद्धेसाठी कुठलाही तर्क किवा पुरावा पुरेसा नसतो. आणि हे जेवढे धर्मनिष्ठ व्यक्तीसाठी सत्य आहे; तेवढेच नास्तिक म्हणवून घेणार्या विज्ञाननिष्ठासाठीही खरे आहे. त्यामुळेच जेवढ्या आवेशात डॉ. झाकीर नाईक गणपती हा देव असल्याचा पुरावा मागतात, तसाच त्यांच्याही इश्वराबद्दल पुरावा मागता येतो. पण देव आहे अशी ज्यांची श्रद्धा असते. त्यांच्यासाठी कुठला वैज्ञानिक पुरावा असण्याची गरज नसते, तर तसा त्यांचा विश्वास पुरेसा असतो. नेमकी हीच गोष्ट सगळे धर्मनिष्ठ किंवा विज्ञाननिष्ठ विसरून जातात. मग नास्तिक विज्ञाननिष्ठ इश्वर नसल्याचे विज्ञानाने सिद्ध करायला धडपडू लागतात, तर धर्मनिष्ठ आपापला धर्मच कसा खरा व वास्तविक आहे; त्याच्या सिद्धतेसाठी तळमळू लागतात. मजेची गोष्ट म्हणजे अलौकिक इश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वा धर्मश्रेष्ठतेसाठी त्यांना लौकिक जगातील क्षुल्लक अशा मानवी साधनांची मदत घ्यावी लागते, याचे त्यांना भान उरत नाही.
दोनतीन वर्षापुर्वी हॉलिवूडची सुपरस्टार असलेली अमेरिकन अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट हिंदू झाल्याची बातमी आलेली होती. अनेक हिंदूत्ववादी ती घटना मोठ्य़ा अभिमानाने जगाला ओरडून सांगायला धडपडत होते. वास्तवात ज्युलिया आपले जीवन पुर्वीप्रमाणे तसेच कंठते आहे. आणि जे कोणी तिच्या हिंदू होण्याने सुखावले; त्यांच्याही परिस्थितीमध्ये कुठलाच फ़रक पडलेला नाही. मग इतका आटापिटा कशाला? दुसरीकडे मुस्लिम धर्मनिष्ठही जगातल्या कोणी कोणी नावाजलेल्या व्यक्तींनी इस्लाम स्विकारला, त्याचा डंका पिटत असतात. सवाल त्यातून धर्माची थोरवी कशी सिद्ध होते इतकाच आहे. नावाजलेल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर कुठल्या धर्माची महत्ता ठरवायची असेल, तर मग त्या व्यक्तीसमोर धर्म छोटा बनवला जातो त्याचे काय? आपल्या धर्माला वा त्याच्या इश्वराला जे लोक मानतात, तो जर मानवापेक्षा सर्वश्रेष्ठ असेल, तर त्याला कोणा नावाजलेल्या व्यक्तीने दुजोरा देण्याची गरज काय? उत्साहाच्या भरात असे धर्मनिष्ठ लोक स्वत:च आपला धर्म व इश्वर छोटा करीत नाहीत काय? पण धर्म असो, की आपली श्रद्धा असो, तिच्याविषयी ज्यांच्या मनात अजिबात शंका नसते, त्याला कुणासमोर आपल्या श्रद्धेचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची गरज भासत नाही. प्रेषित पैगंबरांना अल्लाहने दृष्टांत दिला, ही त्यांची अढळ श्रद्धा होती आणि त्यासाठी त्यांना कोणाला पुरावे देण्याची कधी गरज भासली नव्हती. जगातले अन्य संत, महंत व प्रेषित आहेत, त्यांच्याही श्रद्धांचे पुरावे त्यांनी कधी दिले नाहीत व त्यासा्ठी कुठली धावपळ केलेली नाही. कारण तशी गरजच नसते. कुराण असो, की बायबल इत्यादी एकेश्वरी धर्मग्रंथ असोत, त्यात इश्वरवाणी काय सांगते? ‘हे श्रद्धावंतानो’ असेच आवाहन आहे ना? ज्यांची श्रद्धा आहे व जे श्रद्धा ठेवतात, त्यांच्यासाठीच ते दृष्टांत सादर केलेले असतात. ज्यांची श्रद्धाच नाही, त्यांच्याशी त्या आवाहनाचा संबंधच नसतो. मग त्याविषयी वैज्ञानिक भौतिक पुरावे त्याच अश्रद्धांना देण्याचा आटापिटा हवाच कशाला?
याचे भान खर्या श्रद्धावंताने ठेवले पाहिजे. आणि तसे असेल तर त्या श्रद्धावंताला आपला इश्वर किंवा त्यावरची श्रद्धा खरी ठरवण्य़ाचे कारणच उरत नाही. म्हणूनच मला गणपतीचे विडंबन झाकीर नाईक करीत असतील वा प्रबोधनकार हिंदू धर्मग्रंथांची टवाळी करत असतील, तर त्याचे काहीच वाटत नाही. पण ज्यांच्या भावना अशा श्रद्धेविषयी नाजूक असतात, त्यांनी त्याबाबतीत सावध भूमिका घेणे अगत्याचे आहे. कारण आधी श्रद्धा ठेवायची आणि मगच धर्माचा प्रवास सुरू होत असतो. ती श्रद्धा डोळसपणे ठेवता येत नाही. आणि डोळसपणे श्रद्धा ठेवली तर ती कडवी असूच शकत नाही. कारण तुम्ही मग वेळोवेळी त्या श्रद्धेची चाचणी घेऊ लागता. परिणामावर श्रद्धेला अवलंबून रहायची पाळी येते. इथे नौशादभाईंचीच गोष्ट घ्या. त्यांची आपल्या धर्म व त्यातील ग्रंथावर इतकी अढळ श्रद्धा आहे, की त्यातला प्रत्येक शब्द त्यांनी प्रमाण मानला आहे. पण तेवढ्य़ाच निष्ठेने त्यांनी भारतीय राज्यघटना व त्यानुसार चाललेल्या कारभारावर विश्वास दाखवला आहे काय? कायद्यावरची त्यांची श्रद्धा डोळस आहे. त्यामुळेच जिथे त्यांना कायदा व नियम, व्यवस्था सोयीच्या वाटतात, तिथे ते त्याचे समर्थक आहेत. पण जिथे त्या पचनी पडत नाहीत; तिथे त्याच व्यवस्थेविषयी ते बेधडक संशय व्यक्त करायला मागेपुढे बघत नाहीत. पण तशी कुठलीही शंका त्यांच्या धर्मश्रद्धेबद्दल दुसर्या कोणी घेतली, तरी त्यांना सहन होत नाही. डोळस निष्ठा आणि निष्ठावान श्रद्धा यातला हा असा जमिन अस्मानाचा फ़रक असतो. तेव्हा मुळातच अशा गोष्टींची वैज्ञानिक, तार्किक चर्चा करण्यातच अर्थ नसतो. खलिल जिब्रान तेच सांगतो. श्रद्धा व विज्ञान यांचे तर्कशास्त्रच वेगवेगळे आहे.
मी जेव्हा झाकीर नाईक यांच्या गणपती विषयक व्हिडीओबद्दल लिहिले, तेव्हा माझा आक्षेप गणपतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावण्याला अजिबात नव्हता. पण श्रद्धा हा विज्ञानाने सिद्ध करायचा विषय नाही, असेच मला सुचवायचे होते. कारण श्रद्धा ही डोळस असून चालत नाही. ती नितांत निरपेक्ष निर्विवाद असावी लागते. उदाहरणार्थ इस्लाम धर्माचे स्विकार व पालन करायचे असेल तर पाच मूलभूत गोष्टी आहेत. एक; अल्लाह हा एकमेव इश्वर आहे आणि त्याला सोडून अन्य कोणीच इश्वर नाही. दोन; जिब्राईल हा त्याचा देवदूत आहे, ज्याने इश्वराचे संदेश प्रेषितापर्यंत आणलेले आहेत. तीन; मुहंमद हे अल्लाहचे प्रेषित आहेत व इश्वराने त्यांची त्या कामासाठी स्वत:च निवड केली आहे. चार; इशसंदेश असलेला ग्रंथ पवित्र कुराण जो प्रेषितांवर अवतरला आहे. आणि पाच; अंतिम दिवस म्हणजे ज्या दिवशी या जगाचा अंत होणार आहे, त्या कयामतच्या दिवशी इश्वर सर्वांसाठी स्वत;च न्यायनिवाडा करणार आहे. इस्लाम पाळायचा तर या पाच गोष्टींवर निर्विवाद श्रद्धा ठेवावी लागते. ती श्रद्धा ठेवणे म्हणजे त्यांचा नि:शंक मनाने स्विकार करणे होय. त्याबद्दल शंका घेऊन त्यांची तपासणी कोणी करू शकणार नाही. आणि तसे करायचे असेल तर त्याला इस्लाम मान्य नाही असेच होते. तेव्हा या पाच अढळ श्रद्धा आहेत. यातले खरे काय व त्याचे पुरावे काय, हे विचारणारा श्रद्धावंत होऊच शकत नाही. आणि त्यात काही चुकीचे नाही. ज्याला इस्लाम धर्माचा स्विकार व पालन करायचे आहे, त्याने या पाच तत्वांवर नितांत श्रद्धा ठेवलीच पाहिजे. त्याबद्दल चोखंदळ असून चालणार नाही. श्रद्धा अशी असते. तिला साक्षी पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही. करायचा प्रयत्नही मुर्खपणाच असतो. कारण श्रद्धा ही तर्कापलिकडची गोष्ट आहे.
मग जशी झाकीर नाईक यांची आपल्या इश्वरावर एकमेव म्हणून श्रद्धा आहे, तशीच कुणाची गणपतीवर किंवा कोणाची भगवान येशूवर श्रद्धा असू शकते. त्यांनी दुसर्या कुणाच्या श्रद्धांची चिकित्सा करू नये, इतकाच माझा मुद्दा होता. आणि करायचीच असेल तर मग अन्य श्रद्धावंत असतील तर तेही त्याच तर्काने वा निकषावर तुमच्याही श्रद्धांचे पुरावे मागू लागतील. त्यातून नको ते विवाद उत्पन्न होऊ शकतात. अगदी विज्ञानही आज अपुरेच आहे, कारण त्यातही अजून खुप संशोधन सुरू आहे. त्यामुळे आजच्या विज्ञानानुसार परिपुर्ण असे काहीच नाही. म्हणूनच मी देवाचे अस्तित्व मान्य करीत नसलो, तरी इश्वर नाहीच असे ठामपणे सांगायला धावणार्यांच्या पंक्तिमध्ये मी बसत नाही. कारण अन्य धर्मिय श्रद्धावंताप्रमाणेच हे विज्ञाननिष्ठही जेवढे हाती आले आहे, तेवढेच विज्ञान परिपुर्ण असल्याच्या आवेशात असतात. त्यांच्या श्रद्धाही एखाद्या धर्मनिष्ठा इतक्याच हटवादी असतात. हा माझा अनुभव आहे. नौशादभाई माझ्यावर रागावले, त्याचे काही कारण नव्हते. मी त्यांच्या धर्मश्रद्धेबद्दल बोलत नाही, आणि बोलणारही नाही. त्याचे कारण तिचे पुरावे मागणे वा ते तपासणे ही तर्कशास्त्रापलिकडची गोष्ट आहे. ते त्या त्या श्रद्धावंताच्या हृदयातले मृगजळ आहे. माझ्या किंवा कुणाच्या विचार वा तर्कबुद्धीच्या उंटांचा तांडा चर्चेचे कितीही वाळवंट तुडवत गेला; म्हणून आम्हाला त्या मृगजळापर्यंत पोहोचताच येणार नाही. तेव्हा सवाल श्रद्धेच्या खरेखोटेपणाचा नसून, आपल्या श्रद्धेची दुसर्या कुणावर आग्रहाने सक्ती करण्याचा आहे. किंवा आपल्या श्रद्धेपेक्षा दुसर्या कुणाच्या श्रद्धेला हिणवण्याची समस्या आहे. माझ्या लेखमालेचा हेतूच तो असल्याने कुराण वा अन्य कुठलाही धर्मग्रंथ चौकस वृत्तीने मी वाचलेला वा अभ्यासलेला असला, तरी मी त्यातल्या श्रद्धेच्या जागांना हात लावायचे कटाक्षाने टाळलेले आहे. दुसर्या कुणाच्याही श्रद्धा बाळगण्याच्या अधिकार स्वातंत्र्याचा मी आदर करतो. पण त्यांचे चांगलेवाईट परिणाम माझ्यापर्यंत येतात, तेवढ्यापुरती मला त्या श्रद्धा विषयक घडामोडींची दखल घेणे भाग आहे. त्यामुळेच ही लेखमाला मला लिहावी लागत आहे. ( क्रमश:)
भाग ( ५९ ) १४/१०/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा