१० आक्टोबरच्या पुण्यनगरीतील उलटतपासणी या सदरात ‘महान’ स्तंभकार भाऊ तोरसेकर यांनी वाचकांच्या डोळ्यात धूळफ़ेक करून त्यांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भाऊंनी हे उद्योग ताबडतोब थांबवावे, नाहीतर आमचे काही बिघडणार नाही, त्यांचेच हसे होण्याची जास्त शक्यता आहे. आम्ही त्यांच्या लेखाचा केलेल्या प्रतिवादातील शब्दाचा विपर्यास करून ते गरळ ओकत आहेत. वांगणीदाखल म्हणुन १० आक्टोबरच्या अंकातले एक उदाहरण देतो. "मूळ इस्लामी साहित्याची विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते" या वाक्यातला ‘साहित्याची’ हा शब्द गहाळ करून "मूळ इस्लामी विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते" असे माझ्या नावावर साफ़ खोटे छापून त्यांनी माझ्या विरोधात गरळ ओकली आहे. विश्वास नसेल तर भाऊंनी त्यांना त्यावेळी मेल केलेला माझा लेख इनबॉक्समध्ये जाऊन पुन्हा वाचून घ्यावा. शोधनमध्येही हा लेख आलाय. भाऊंनी, असा यापुढे ‘ध’ चा ‘मा’ करून आपली ‘ब्राह्मणवादी पेशवाई’ मानसिकतेचे प्रदर्शन करू नये. यावरून भाऊंची एकंदर मानसिक स्थिती लक्षात आल्यामुळे वाचकांनी त्यांच्या विचारांना किती महत्व द्यायचे हे सांगायला नको. यापुढे आमच्यावर किती वैयक्तिक चिखलफ़ेक करायची असेल ती करावी, आम्ही त्याची पर्वा करत नाही. कारण कोण काय लिहिले? का लिहिले? कसे लिहिले हे सूज्ञ वाचकांना समजत असते. मात्र ‘इस्लाममध्ये काही अनाकलनिय आहे....’ वगैरे अशी वाचकांची दिशाभूल करू नये, ही नम्र विनंती. -नौशाद उस्मान
‘शोधन’ या इस्लाम विषयक विचारांना वाहिलेल्या मराठी साप्ताहिकाचे पत्रकार नौशादभाई उस्मान यांचा माझ्या या लेखमालेत अनेकदा उल्लेख आलेला आहे आणि एकदा त्यांनी पाठवलेले पत्र मी शब्दश: प्रसिद्धही केले आहे. त्यात एक शब्द गहाळ करून मी त्यांच्यावर चिखलफ़ेक केली, हा त्यांचा आरोप धादांत खोटा आहे. कारण माझा तसा अजिबात हेतू नव्हता. पण तसे माझ्याकडून नजरचुकीने झाले आहे. म्हणूनच विपर्यास झाला हा त्यांचा आरोप मात्र शंभर टक्के खरा आहे. आणि त्यासाठी त्यांची माफ़ी मागणे मला भागच आहे. पण त्यासाठी त्यांनी जी चिखलफ़ेक किंवा तत्सम अतिशयोक्त शेरेबाजी केली आहे ती त्यांनाच शोभणारी असेल. बुद्धीवाद व युक्तीवादामध्ये गळचेपी वा दुसर्याचा आवाज दडपणे, हा त्यांच्या तर्कशास्त्रातला भाग असेल. माझ्या अजिबात नाही. म्हणुनचा त्यांची उपहासात्मक व उपरोधिक भाषा त्यांनाच लखलाभ होवो. अर्थात त्यांच्या अशा भाषेमुळे माझ्याकडुन झालेल्या चुकीचे समर्थन होत नाही. कारण माझे विवेचन व युक्तीवाद विवेकबुद्धीला धरून असतात. त्यात अन्याय होऊ नये याची मी काळजी घेतो. तेवढ्यासाठी त्यांनी पाठवलेले पत्र मी स्वत: टाईप करून शब्दश: छापण्याचे कष्ट घेतले. तेवढेच नाही. त्यांनी मुळात पाठवलेली ईमेल दिसत नसल्याने, त्यांना छायांकित करून पाठवण्यासही सांगितले होते. आता सुद्धा उपरोक्त त्यांचे पत्र तसेच टाईप करावे लागले आहे. मात्र त्यातील भरताड अतिशयोक्ती गाळुन सारांश प्रसिद्ध केला आहे. हे पत्र मिळण्यापुर्वी नौशादभाईंचे आणखी एक पत्र (ईमेल) मला मिळाले. तेही प्रचंड मोठे अतिशयोक्तीने भरलेले आहे. मी त्याबद्दल ‘पुण्यनगरी’मधून लिहिण्यापुर्वीच नौशादभाईंनी तीच टिप्पणी माझ्या ब्लॉगवरून केली, त्या टिप्पणीमध्ये त्यांच्या त्या पत्राचा सारांश आहेच.
या दुसर्या पत्रात नौशाद यांनी मी गडबडीत कुराण वाचले असेल असे म्हणत मला बारकाईने वाचायची व चिकित्सा करायची सूचना केली आहे. पण मला वाटते, की त्यांनी जेवढ्य़ा बारकाईने कुराण वाचले असा त्यांचा दावा आहे; तेवढ्याच बारकाईने मला पाठवलेल्या स्वत:च्या पत्रातील युक्तीवादही वाचले तर बरे झाले असते. कारण त्यांचा जो माझ्यावर गंभीर आक्षेप आहे व त्यासाठी मी ‘उलटतपासणी’ सदर लिहायचे बंद करावे; अशी प्रेमळ सुचना ते देत्तात, तो आक्षेप मी विपर्यास केल्याचा आहे. पण नजरचुकीमुळे माझ्याकडुन नौशादभाईंवर जो आरोप झाला, तोच त्यांनी या दुसर्या पत्रातून चक्क खरा करून दाखवला आहे. त्याचा गोषवारा (असलेली त्यांनी माझ्या फ़ेसबूकवर केलेली टिप्पणी) बघा.
‘विषयावर प्रतिवाद करता आला नाही तर वैयक्तिक चिखलफेक करून बामनवादी कशी दिशाभूल करतात याचे उदाहरण म्हणजे भाऊ तोरसेकर यांचा हा लेख आहे. नंगाट एम.एफ. हुसैनच्या आम्हीही विरोधात आहोत. 'सरकार' म्हणजे फक्त केंद्र सरकार नव्हे तर न्यायपालीका, कार्यपालिका, पोलीस आणि राजकारणी अशी एकंदर संपूर्ण व्यवस्था या अर्थाने मी ''सरकार'' हा शब्द वापरला होता. अगदी शासकीय फर्मान काढून हुसैनला हाकलले नसले तरी त्याला पुरेशी सुरक्षा न देता जगणे हराम करून या व्यवस्थेने त्याला एकप्रकारे हाकाललेच आहे. त्यामुळे मी दिशाभूल केलेली नसून भाऊच धुळफ़ेक करत आहेत. आजच्या लेखात तर त्यांनी ''ध' चा ''मा'' करुन माझ्या एका वाक्याचा विपर्यास्त करून आपली पेशवाई मानसिकता सिद्ध केली आहे. अशा माणसाच्या विचारांना (?) किती गांभीर्याने घ्यायचे ते वाचकांनीच ठरवायचे आहे. -नौशाद उस्मान (फ़ेसबुक)
सरकार म्हणजेच पोलिस इथपर्यंत ठिक आहे. पण न्यायपालिका म्हणजे न्यायालयालाही नौशादभाई यांनी सरकारमध्ये घुसवायचे आणि त्यांनी त्या अर्थाने लिहिले असे वाचणार्याने ‘समजुन’ घ्यावे असा त्यांचा हट्ट आहे. न्यायालयात हुसेन यांच्यावर खटला भरण्यात आला आणि वारंवार नोटिसा पाठवूनही ते हजर रहात नाहीत, म्हणुन न्यायालयाने त्यांच्यावर वॉरंट बजावले, तर चित्रकार हुसेन यांचे आयुष्य सरकारने हराम करून टाकले; असा नौशाद यांचा दावा आहे. कारण त्यांच्या लेखी राजकारणी, न्यायपालिका व पोलिस वगैरे सगळेच सरकार असते. सरकार याचा असा अर्थ होतो हे कुठल्या तर्कबुद्धी व विवेकबुद्धीने नौशादभाई ठरवतात, ते त्यांनाच माहित. आणि त्यांचे हे तर्कटशास्त्र मान्य करायचे तर असा जीवन हराम केल्यामुळे देशातून परागंदा व्हायची पाळी आलेला हुसेन हा एकच बिचारा नाही. छोटा राजन, दाऊद इब्राहीम, (गुलशनकुमार याच्या खुचाचा आरोप असलेला) नदीम सैफ़ी असे सगळेच बिचारे सरकारने जगणे हराम केल्याने देशाबाहेर पळून गेलेले असावेत. यालाच नौशादभाई त्यांचे तर्कशास्त्र वैज्ञानिक व विवेकबुद्धी समजत असतील, तर मग त्या तर्कात शिरणेच आम्हाला शक्य नाही. कारण चार दशकाची जी काही पत्रकारिता आम्ही केली व वाचन मनन केले; त्यानुसार भारतात सरकार, राजकारणी व न्यायपालिका यांच्यात खुप मोठी तफ़ावत असते. ते एकमेकाच्या विरुद्ध निर्णय घेऊ शकत असतात आणि एक दुसर्याच्या अधिकारात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असेच आम्हाला ठाऊक असलेल्या संविधानातल्या तरतुदी आहेत. त्यामुळेच मोदी असो की मनमोहन असोत, त्यांच्या सरकारने घेतलेले निर्णय किंवा दिलेले आदेश असोत, ते रद्दबातल करण्याचे अधिकार न्यायालयाला संविधानाने दिलेले आहेत.
नौशादभाईंच्या इस्लामिक न्यायशास्त्र व राज्यशास्त्रानुसार असे नसेल, पण भारतीय राज्यघटनेनुसार सरकार व न्यायपालिका स्वतंत्र व स्वयंभू, स्वायत्त आहेत. सवाल आहे तो त्या वस्तुस्थितीकडे डोळे उघडून बघण्याचा. पण जे आपल्याला पटत नाही ते अस्तित्वातच नाही किंवा अन्याय्य; अशीच मानसिकता असेल तर सरकार व न्यायपालिकेलाही पेशवाई किंवा ब्राह्मणवाद ठरवायला नौशादभाई मोकळे आहेत. तेवढे विचार वा अविचार स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने त्यांनाही दिलेले आहे. पण म्हणून त्यांचा तर्कशून्य विपर्यास इतरांनीही निमूटपणे मान्य करावा, अशी सक्ती करण्याचा अधिकार त्यांना या देशाच्या घटनेने दिलेला नाही. ते कुठलाही शब्द कुठल्याही अर्थाने लिहिणार, आणि त्याला आम्ही इतरांनी ‘अर्थपुर्ण’ मानले पाहिजे हा त्यांचा जो आग्रह असतो, तीच खरी समस्या आहे. आम्ही सभ्य शब्दात बोलतो किंवा लिहितो त्याला ते चिखलफ़ेक म्हणतात, आणि मला सदर लेखन बंद करा म्हणून फ़तवा काढल्याच्या भाषेत लिहितात, ती कुठली सभ्यता असते? माझ्यासारख्या वडीलधार्या लेखकाला नवोदित लेखक नौशादच्या लिखाणात आवेश जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे असेही दुसर्या पत्राच्या अखेरीस नौशाद यांनी म्हटले आहे. हे सुद्धा अजब आहे. लेखक नवोदित वा वडीलधारा याला काडीमात्र अर्थ नाही. त्याच्या वयापेक्षा त्याने लिहिलेले शब्द व मुद्दे आणि त्यातून प्रतित होणारा बोध, याला महत्व असते. म्हणूनच मी त्यांच्या लिखाण वा पत्राकडे दुर्लक्ष केले नाही. उलट त्यातील उथळपणा्कडे दुर्लक्ष केले, मला कुराण गडबडीत वाचले असेल तर पुन्हा वाचून घ्यायचा सल्ला नौशादभाईंनी दिला आहे. पण मी सल्ला न देता एवढेच सांगेन, नौशादभाई यांनी युक्तिवाद व बुद्धीवाद करताना त्यांच्याच पुर्बी ‘शोधन’चे संपादन केलेल्या सय्यद इफ़्तिकार अहमद यांचे लिखाण सवड काढून बारकाईने वाचावे. शेषराव मोरे यांच्या पुस्तकात अभिप्राय म्हणून अहमद यांनी लिहिलेला प्रदिर्घ प्रबंध संयमी, आर्जवी, मुद्देसुद व विवेकी भाषेतला अपुर्व नमुना आहे. तो वाचणार्याला पटो न पटो, पण वाचकाला भारावून टाकण्याची क्षमता त्या शब्द व लिखाणात आहे. माझा ‘ध’ चा ‘मा’ शोधतांना स्वत:च्या विपर्यासावर पांघरुण घालून बुद्धिवाद व प्रतिवाद साधला जाणार नाही. ( क्रमश:)
भाग ( ५८ ) १३/१०/१२
अत्र्यांची आर्थिक
उत्तर द्याहटवापरिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात
त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच
कामासाठी निघाले.
तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक
भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें
विचारले “काय बाबूराव, आज पायीच?
गाडी विकली की काय?”
पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?
अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच?
वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर
पळून-बिळून गेल्या की काय?”
विरोधक खजिल होऊन निघून गेला
Torsekarsaheb, hya asalya valvanti shodhanavar prtivad karun tyanche mahatva vadhavu naka, yethe 'gire to bhi tang upar' asa hishob asato, tevha jasta mathefod karun kahi farak honar nahi. he asech chalayache aaplya 'secular mahabhartat' yala sadhya tari kahi ilaj nahi.
उत्तर द्याहटवाvinod
सर, नौशाद उस्मान हे एक जिहादी वृत्तीचे आणि सतत शब्द पालटनारे व्यक्तिमत्व आहे. फेसबुकवर त्यांनी धर्म मराठी नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. जिथे आमच्यासारखे काहीजणानी इस्लामची वैज्ञानिक पातळीवर चिकित्सा केली असता आम्हा सर्वाना ग्रुपबाहेर काढले गेले. अखिल जग ते कुराणात कोंबू पाहतात हा त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.
उत्तर द्याहटवा