सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

वर्तनाची कारणमिमांसा आवश्यक आहे

   धर्मग्रंथ किंवा धर्मशास्त्र यांच्या आधारे धर्मसत्ता चालत असतात आणि त्या तशाच चालविल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. पण खरोखरच त्या सत्तेचा व अधिकाराचा प्रामाणिकपणे वापर होतो काय? कालपरवापर्यंत आपल्या देशात लोकपाल कायद्यासाठी एक मोठे आंदोलन चालू होते. त्यातल्या मागण्या काय होत्या? त्याचे कारण काय होते? देशातला भ्रष्टाचार संपवा याच मागणीतून लोकपाल कायद्याची मागणी पुढे आलेली आहे ना? तो भ्रष्टाचार म्हणजे काय असतो? जे कायदे बनवलेले आहेत व अंमलात आहेत, त्याचा वापर करून सर्वसामान्य जनतेची जी अडवणूक चालते, त्यातून त्याच कायद्याने जी आचरणाची बंधने घातलेली आहेत, त्याचेच उल्लंघन होते; त्याला लगाम लावण्यासाठी व आचरणाच्या तपासासाठीचा नवा कायदा किंवा अधिकारी म्हणजेच लोकपाल ना? कायद्यात जे म्हटले आहे वा अंमलात आणले जात आहे, ते खरेच कायद्याच्या हेतूशी प्रामाणिक असेल, तर लोकपालाची गरजच काय? पण देशातल्या बहुतांश लोकांचा अनुभव असा आहे, की कायद्याचे शब्द पुस्तकातच रहातात आणि त्या कायद्याने ज्यांच्या हाती अधिकार मिळालेला आहे, तेच त्या कायद्याच्या मदतीने मनमानी करतात. म्हणजेच अधिकार श्रेष्ठ होतो आणि त्याच्यासमोर तोच कायदा दुबळा होऊन जातो. ज्या कायद्याने सर्व जनतेला समान वागणूक व न्याय द्यावा हाच त्याचा हेतू आहे, त्याच कायद्याने मिळालेल्या अधिकारातून अन्याय केला जातो आणि पुन्हा त्याच कायद्याचा वापर करून त्या अन्यायावर पांघरूण घातले जाते. मग त्या कायद्याचे पिडीताने करायचे काय? त्यावर उपाय म्हणूनच लोकपालाची मागणी पुढे आली आहे. थोड्क्यात मुद्दा इतकाच, की कायद्याच्या पुस्तकामध्ये कोणते शब्द आहेत व त्याचा अर्थ काय होतो, त्यापेक्षा त्याच कायद्याच्या अंमलाचे अधिकार ज्यांना मिळालेले आहेत, ते काय अर्थ लावतात, यावर गाडे येऊन अडकते. आणि जे आजच्या काळात कायद्याचे आहे तेच खुप जुन्या धर्मशास्त्र वा धमग्रंथाचे झालेले आहे. जेव्हा आधुनिक कायदे व त्यानुसार चालणारे शासन, प्रशासन अस्तित्वात आलेले नव्हते, तेव्हा धर्मशास्त्र हीच सामाजिक प्रशासनाची व्यवस्था होती. त्यामुळेच धर्माला सामान्य माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व होते.

   भारतवर अनेक आक्रमणे झाली. त्यात जे आधीचे प्रस्थापित धर्म होते किंवा सामाजिक व्यवस्था होती, त्यातले धर्मकारणच प्रशासन संभाळत होते आणि न्यायनिवाडा सुद्धा करत होते. जे नवे सत्ताधीश आले त्यांनी त्यात आपापल्या पद्धतीने बदल केले. अशावेळी आधीच्या प्रशासकांच्या दडपणाखाली राहिलेले वर्ग नव्या व्यवस्थेकडे आपली दाद मागू लागले आणि जुनी व्यव्वस्था हळुहळू खिळीखिळी होत गेली. जुन्यानव्याची सरमिसळ त्यातही आढळते. म्हणुनच मुंबईत पहिल्यावहिल्या ब्रिटीश शासनाला सुरूवात झाली व पोलिस यंत्रणा उभी राहिली; त्यात प्रारंभीच्या पोलिस व्यवस्थेमध्ये मुस्लिमांसाठी काझी, हिंदूंसाठी शेणवी पंडित अशा नेमणूका आढळतात. पोलिस यंत्रणेत ह्या धर्मशास्त्र्यांची काय गरज होती? तर अजून नवी आधूनिक कायद्याची संपुर्ण संकल्पना विकसित झालेली नव्हती. आणि ती व्यवस्था उभी रहात गेली, तेव्हाही त्यात जुन्या काळातले दोष आपोआप समाविष्ट होत गेलेले दिसतात. अगदी मुंबईचा पहिला पोलिसप्रमुख लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित झाला होता. म्हणजेच कायदा असो, की धर्मशास्त्र असो, त्यातले शब्द कितीही प्रामाणिक व उद्धारक असले; तरी त्याचा आचरणात तेवढाच प्रामाणिक वापर झाला नाही, तर समस्या निर्माण होतात. म्हणूनच कुठल्याही विषयावर गंभीर परिणामांची चर्चा करताना कायद्याच्या पुस्तकात काय आहे किंवा धर्मग्रंथामध्ये काय आहे; त्याचे हवाले देण्यात काही अर्थ नसतो. तर त्यांची अंमलबजवाणी करणारे किंवा त्यानुसार आचरण करणारे, याच्या वर्तनाचे इतरांवर काय परिणाम होत असतात, त्यालाच महत्व असते.

   मिसा, टाडा किंवा पोटा अशा कायद्यांचा हेतू खुपच चांगला होता. पण त्यांचा कसा वापर झाला? त्या कयद्याचे शब्द व तरतुदी यांचा अयोग्य वापर कित्येक लोकांना आयुष्यातून उठवणारा ठरला ना? म्हणूनच ते कायदे रद्दबातल करावे लागले. त्या कायद्यांचा गैरवापर सगळ्याच पोलिस खात्याने वा अधिकार्‍यांनी केलेला नव्हता. काही ठिकाणी त्यांचा योग्य वापरही झाला. पण त्याचे एकत्रित व सर्वसमवेशक परिणाम घातक असल्याचे दिसू लागले, तेव्हा एकूणच पोलिस खात्यावर त्याचे खापर फ़ोडले गेले; हे कोणी नाकारू शकणार नाही. जी गोष्ट आजच्या कायद्याची तीच भारतीय सामाजिक इतिहासाची आहे. मला पाठवलेल्या पत्रात नौशादभाई अगत्याने ब्राह्मणी वर्तनाचा उल्लेख करतात, तेव्हा शंभर टक्के ब्राह्मणांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापरच केला असे सिद्ध करता येणार नाही. पण तरीही त्याच जातीमध्ये जन्मलेल्यांवर आजही दोषारोप होत असतात ना? कारण त्यांच्यातल्या काहीजणांच्या पुर्वजांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. धर्मशास्त्रातील शब्दांचा विपर्यास करणारे त्यांचे वर्तन राहिले आहे. आणि ब्राह्मणांचीच गोष्ट कशाला? जगातल्या सर्वच पुरोहित वर्गामध्ये तो दोष आढळतो. अर्थात जोपर्यंत धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे साटेलोटे असते वा होते तोपर्यंतच असे धर्मपंडीत समाजाला ओलिस ठेवता्ना दिसतात. जिथे धर्मसत्ता व राजसत्ता यांची फ़ारकत झालेली असेल तिथे राजसत्तेने मनमानी केलेली दिसेल. आणि धर्मसत्ता असेल तर त्यांनी धर्माच्या आधारे मनमानी केलेली दिसेल तर राजसत्तेने कायद्याच्या नावाने अन्याय केलेला दिसेल.

   म्हणूनच धर्मग्रंथ किंवा त्यातले दाखले नित्यजीवनातील सामुहिक अनुभवाच्या समस्येसाठी उपयोगी नसतात. तर त्या नियम, कायदे किंवा धार्मिक शिकवणीच्या नावाखाली कोण कसा वागतो, याला महत्व असते. ते वर्तन इतरांच्या अनुभवास कसे येते, याला महत्व असते. जर अशा वर्तनाने सरसकट ब्राह्मण गुन्हेगार ठरवला जात असेल, तर अन्य कुठल्याही जनसमुदायाला त्याच्या तशाच त्रासदायक वर्तनासाठी सरसकट दोषी धरला जाणार. ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणुन आरोप करणार्‍यांना त्याचा सोयीस्कर विसर पडतो. आज जगाच्या सर्वच प्रदेशात आधूनिक कायदे व प्रशासन व्यवस्था आलेली आहे. पण त्यात धर्मसत्ता व राजसत्ता यांच्यातला संघर्ष पुर्णपणे व निर्णायक रितीने संपलेला नाही. त्या दोन्ही सत्ता एकमेकांशी झुंज देत आहेत. त्यापैकी धर्मसत्ता हाती शस्त्र न घेता जनमानसातील आपल्या प्रभावाचा वापर करून झुंज देत आहे; तर दुसरीकडे राजसत्ता कायदेशीर सत्ता व हत्यारे हाती असूनही लोकांच्या धार्मिक भावनात्मक गुंतवणुकीसमोर दुबळी ठरताना दिसत आहे. त्यातूनच राजसत्तेसमोरचे धर्मसत्तेचे आव्हान गंभीर बनत चालले आहे. त्याचे परिणाम जगाच्या पाठीवर दंगली, हिंसाचार, दहशतवाद अशा विविध स्वरुपात समोर येत आहेत. जिथे अनेक धर्मांचे समाजघटक आहेत, तिथे असे प्रकार अधिक तीव्रतेने  समोर येत आहेत. त्यातून मार्ग शोधताना राजसत्तेला मोठेच अवघड काम करावे लागत आहे. आणि अशा जागतिक पार्श्वभूमीवर जेव्हा मुस्लिम धर्मियांचे अनेक देशातील उठाव नजरेत भरतात, तेव्हा त्याच्याशी आपल्या देशातील मुस्लिमांच्या वर्तनाची तुलना करणे अपरिहार्य होऊन जाते.

   ज्यांच्याकडून असे धर्माच्या नावाने गैरवर्तन होते, त्यांचा मुस्लिमांना अधिक राग यायला हवा. कारण असेच धर्मबांधव त्यांच्या धर्मश्रद्धेची गैरलागू प्रतिमा निर्माण करता असतात. गुजरातच्या दंगलीनंतर अशीच हिंदूंची प्रतिमा विकृत झाली, तर त्याबद्दल होणार्‍या तक्रारी रास्तच होत्या. पण पेशवाई किंवा ब्राह्मणी असे शब्द वापरून त्यावर पांघरूण घातले जाणे चुकीचे आहे. मलाही अशा शब्दांना तालिबानी, जिहादी किंवा दहशतवाद अशा शब्दांनी हिणवता येईल. पण त्यात तथ्य नाही, हे मला कळते. कारण दुसर्‍याची चुक सांगून माझ्या चुकीचे समर्थन होत नाही. म्हणूनच नौशादभाईंनी माझी चुक दाखवली तर ती मी सहजपणे मान्य केली. तो माझा मोठेपणा आहे असे त्यांनी मला पत्र लिहून कळवले आहे. पण त्यात कुठलाच मोठेपणा नाही. चुक स्विकारून चुक सुधारण्याला सुरूवात होत असते, असे मी मानतो. चुक लपवण्याने ती संपत नाही उलट तिची पुनरावृत्ती होते. चित्रकार हुसेन प्रकरणी नौशाद यांनी स्वत:च्या विपर्यस्त विधानाचा कुठालाही खुलासा करू नये याचा खेद होतो. कुठल्याही समाजाने वा व्यक्तीने चुक मान्य करण्यात त्याचे कल्याण असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. मग मोठेपणा कसला त्यात? नितीन प्रधान किंवा माझ्यासारख्या बिगरमुस्लिमांना सतावणार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळावित एवढीच अपेक्षा आहे. आणि ज्यांची उत्तरे हवीत ते प्रश्न मांडावेच लागतात. आणि जिथे धर्माच्या नावाने चाललेल्या वर्तनातून समस्या निर्माण होतात, त्याचे उत्तर धर्मात नसते तर वर्तनाच्या कारणमिमांसेत असते.    ( क्रमश:)
भाग  ( ६१ )   १६/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा