शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

बड़े नासमझ हो, ये क्या चाहते हो


  यश चोप्राच्या आकस्मिक निधनामुळे वाहिन्यांवर सुतक सुरू झाले आणि त्यांच्या जुन्या नव्या चित्रपटांचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे मला प्रथमच कळले, की माझ्या शाळकरी जीवनात भिंतीवर जी पोस्टर्स बघितली होती, त्यातल्या ‘धुल का फ़ुल’ चित्रपटाचा दिग्दर्शक यश चोप्रा होते. तोच त्यांचा पहिला चित्रपट होता. अर्थात तो जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मला बघता आलेला नव्हता. कारण तेव्हा माझे वय अवघे दहा वर्षाचे होते आणि कुठल्याही कुटुंबात हिंदी चित्रपट आजच्यासारखे बघितले जात नव्हते. आमच्या वयातल्या छोट्या पोरांना तर चित्रपट सोडा सिनेमाघर हीच मोठी अजब गोष्ट वाटायची. म्हणजे आमच्यातल्या कोणाला तशी संधी मिळाली, तर काळोखात बघितल्या जाणार्‍या चित्रपटाबद्दल गॉसिप चालायचे. त्यामुळे बहुतेकांची भूक भिंतिवरच्या पोस्टर्सवर भागवली जायची; नाहीतर कुठे रेडिओवर चित्रपट गीते वाजायची त्यावर भागायची. रेडिओ तरी कुठे प्रत्येक घरात होते? सहाजिकच कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाऊड स्पिकर आसपास वाजवला गेला, मग आम्हा पोरांसाठी पर्वणी असायची. शिवाय तेवढे हिंदी कळत नव्हते, मग त्या चित्रपटगीतात आलेल्या उर्दू-फ़ारसी शब्दांचे अर्थही कळत नव्हते. पण तरूणांच्या वा मोठ्यांच्या गप्पातून जेवढे कळायचे, त्यावर आम्ही समाधानी असायचो. पुढे कॉलेजला गेल्यावर आठ वर्षांनी मॅटीनी शो म्हणून तो चित्रपट बघितला होता. राजेंद्रकुमार आणि माला सिन्हाचा. निर्माता दिग्दर्शक कळण्याची अक्कल तेव्हा आलेली नव्हती. पण त्यातले एक गाणे खुप आवडले होते. ‘तेरे प्यारका आसरा चाहता हू’. त्यातले काव्य खुप नंतर कळले. आणि पुढे ते माझ्या आवडत्या चित्रगीतामध्ये जाऊन बसले. परवा यश चोप्राच्या निधनापर्यंत त्यांच्या चित्रपटातले गीत आहे, याचा मात्र थांगपत्ता नव्हता.

   नेहमीच्या दगदगीत आपण आपल्या अनेक आवडत्या गोष्टी विसरून गेलेले असतो. मग अचानक त्यापैकी काही आठवले तर जुना मित्र किंवा बालमित्र भेटल्याचा आनंद अनुभवायला मिळतो तसे माझे झाले. वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये यश चोप्राचे सुतक सुरू झाले आणि त्यात हे माझे आवडते गाणे वाजले. चोप्रांचे सुतक म्हणून जी गाणी वाजवली जात होती, त्याच्या एकदोन ओळी वाजवून बदलत होती. पण ‘तेरे प्यारका’ वाजल्याने मी कमालीचा विचलित होऊन गेलो आणि त्यातले शब्द आठवत राहिलो. सगळे शब्द आठवेनात तसा अधिकच बेचैन झालो. पण आता मी शाळकरी पोर नव्हतो की १९६० च्या दशकात नव्हतो. त्यामुळेच चटकन इंटरनेट लावले आणि शोधाशोध सुरू केली आणि युट्यूबवर सगळे गाणेच बघायला आणि ऐकायला मिळाले. दोनतीन वेळा सलग ऐकून चैन केली. पण जेवढा वेळ ते वाजवले तेवढ्यावेळी त्यातले अनेक धागेदोरे उलगडत गेले. त्यातले शब्द आणि शब्दरचना यातल्या अर्थाने समोरची चित्रेच पुसून टाकली. तिसर्‍यांदा ऐकताना मी चक्क डोळे मिटले होते आणि फ़क्त शब्दसुर ऐकत होतो. आणि मनातल्या मनात भलतेच चित्र दिसू लागले. गाणे, सुर आणि कथा बाजूला पडली आणि आजचे वास्तव समोर उभे राहिले. साहिरने त्या गाण्यातून केवढे मोठे सामाजिक व मानवी संबंधांचे वास्तव मांडले आहे, त्याचे रहस्य सोपेसरळ होऊन उलगडत गेले.  प्रामुख्याने हे शब्द बघा-

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ
   हसीनो से अहद-ए-वफ़ा चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
   कि तुम हुस्न को पूजना चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
   उन्हीं से मुझे माँगना चाहते हो
  बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो
गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
   रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो
   बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

   माझ्या डोळ्यासमोरून नायक नायिका अदृष्य़ झाले आणि आजचे सामाजिक राजकीय वास्तव उभे राहिले. गेले वर्षभर जे आंदोलन आपल्या देशात चालू आहे त्याचे वास्तव. अण्णा हजारे, केजरिवाल आणि अन्य जे कोणी इथे भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती करायला कटीबद्ध झाले आहेत, त्यात मला प्रेमाची आर्जवे करणारा नायक दिसत होता आणि त्याला लाजत समजावणारी प्रेयसीच्या रुपातली भारतीय जनता दिसत होती. बस्स प्रेमात पडलेला प्रेमवीर असतो त्याच्यासाठी जग जिंकणे सोपे असते. पण त्यासाठी त्याला त्याच्या प्रेयसीच्या मदतीची, सहकार्याची गरज असते. आणि म्हणूनच तो तिची आर्जवे करत असतो, ती त्याला सावध करू इच्छित असते. धोके दाखवत असते. पण त्याला कशाचीच पर्वा नसते. एका जागी तो नायक तिला म्हणतो सुद्धा ‘कि  मै मौतसे खेलना चाहता हू’. पण त्याच्या प्रेमात पडूनही प्रेयसी किती सावध असते? अगदी जशी भारतीय जनता आहे तशीच ना? वर दिलेल्या एक एक शब्दाची रचना व त्यातून सुचित होणारा गर्भित अर्थ बघा.

   प्रेमात पडण्यापुर्वी विचार कर, इथे मिळण्याच्या आधी गमवावे लागते. आणि प्रेमाची पुजा करायची तर समाजाची परवानगीही घ्यावी लागते. प्रेमाच्या जागी सत्याचा आग्रह आणि सत्याचरण असा बदल करून बघा. किती अर्थ बदलतो ना? सत्य ही बोलाची कढी असते. सत्याचे आचरण सुळावरची पोळी असते. सत्याच्या आहारी जाऊन व्यवहार होत नाहीत. प्रेमही सोपे असते. पण त्यानंतरचा संसार अवघड असतो. मोहब्बतच्या जागी पुन्हा सत्य वा सदाचरण टाकून बघा. बोलायला सगळे सोपे आहे; पण कोणाला सदाचार परवडतो व्यवहारात? अवघे जगच त्याचा शत्रु असते. त्या सदाचाराच्या नशीबी कायम वनवासच असतो. आणि ज्याना त्या आपल्या सदाचारी अंतरात्म्याचा आवाजच ऐकू येत नाही, त्यांच्याकडून त्याची अपेक्षा बाळगता येईल का? बोलायला सगळी वचने आणि आश्वासने सोपी आहेत, पण अंमलात आणायला अशक्य आहेत, म्हणूनच चुकीची आहेत. कारण इथे सर्वकाही नियमानुसार, रुढी-परंपरेनुसारच चालते. नियम तोडायला पुढे जायचे काय? कायदे झुगारायचे काय? कोण खपवून घेईन नियमभंग?

   ‘यहॉ जिंदगी है रिवाजो के बसमे’ आपण ज्या जगात आणि समाजात जगतो त्याचे रिवाज असतात. त्यांना झुगारून पुढे जाता येत नाहीत आणि गेलात तर त्याचे परिणाम भोगायची तयारी असावी लागते. कायदे असतात, नियम असतात, आणि त्यांना वळवणारे, वाकावणारे, गुंडाळून ठेवणारे रिवाज सुद्धा असतात. तिथेच सगळ्या गोष्टी येऊन फ़सतात. तिथेच येऊन सगळे घोडे अडतात. कायदे आणि नियम तुम्हाआम्हा सामान्य माणसासाठी असतात. त्यांचा अंमल समाजावर हुकूमत गाजवणार्‍यांवर चालत नाही. सर्व नियम व कायदे त्या रिवाजापुढे शरणागत होतात. कधी त्याचे नाव रॉबर्ट वड्रा असते तर कधी त्याचे नाव शरद पवार असू शकते. कधी त्याचे नाव गडकरी असू शकेल तर कधी त्या रिवाजाचे नाव आदर्श सोसायटी असू शकते. त्या रिवाजापुढे कितीही समर्थ सत्ता व कायदे शरणागत होतात आणि तेच रिवाज सामान्य माणुस समोर आला, मग अत्यंत उर्मट व मुजोर असतात. त्यांना भेदण्याची वा झुगारण्याची कल्पनाच भयंकर असते. कारण जो त्यासाठी फ़ुस लावत असतो तो नामानिराळा झाला तर आपले काय, अशी चिंता त्या प्रेयसीला सतावत असते. त्या चित्रपटातही एका मोहाच्या क्षणी ती प्रेयसी वहावत जाते आणि तो प्रियकर नामानिराळा होऊन तिला संकटात सोडून जातो. आज भ्रष्टाचार मुक्तीच्या प्रेमात पडलेली सामान्य जनता रस्त्यावर का येत नाही? अन्याय अत्याचाराने गांजलेला सामान्य माणूस आपली सदिच्छा अण्णांच्या मागे असल्याचे सांगतो, पण तो घराबाहेर पडून त्या आंदोलनात सहाभागी का होत नाही? पुढल्या अनाकलनिय व अनिश्चित भवितव्याने त्याला भयभीत केलेले असते. तो साहिर, तो यश चोप्रा, यांनी केवढे सत्य सांगून ठेवले आहे मोजक्या शब्दात. आपण कधी डोळसपणे त्याकडे बघू तरी शकलो आहोत का?    ( क्रमश:)
भाग ( २ ) २७/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा