बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

नितीन प्रधानसारखा वकील असा विचलित का होतो?


   या लेखमालेच्या निमित्ताने ज्या मुस्लिमांचे नाराज होऊन फ़ोन आले, त्यातल्या काहीजणांनी अगत्याने मला एक प्रश्न विचारला. मी जर कुठलाच धर्म पाळत नसेन, तर मला मुस्लिमाच्या बाबतीत वा अन्य हिंदूंच्या दुखण्याबद्दल लिहिण्याचे कारणच काय? त्यांचा प्रश्न मी चुकीचा मानत नाही. ज्याला धर्माशी देणेघेणे नाही, त्याने जे कोणी धर्मश्रद्धावान असतील, त्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करण्याचे कारण नाही. पण असे तेव्हाच शक्य असते; जेव्हा अन्य कोणी धर्मश्रद्धा मानणारा माझ्या जीवनात ढवळाढवळ करत नसेल तर. त्याच्या धर्मश्रद्धा किंवा अगदी ज्या कुठल्या विज्ञाननिष्ठा वा नास्तिकता असतील, त्या माझ्या खाजगी जीवनाला त्रासदायक होता कामा नये. तोपर्यंतच त्याचे व माझे स्वातंत्र्य अबाधित असू शकते. आम्ही एकमेकांच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही तोपर्यंतच हे शक्य असते. पण जर माझी धर्मश्रद्धा किंवा जी नास्तिकता असेल, ती कुणा हिंदू वा मुस्लिमाच्या खाजगी जीवनावर गदा आणू लागेल, तिथे त्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होत असतो. माझी नास्तिकता किंवा धर्मविषयक अलिप्तता तशीच मर्यादित आहे. माझ्या घरकुटुंबाने त्यांच्या धर्मश्रद्धा माझ्यावर लादू नयेत, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा असते. पण त्याचवेळी त्यांच्या ज्या काही श्रद्धा आहेत, चालीरिती असतील त्या त्यांनी माझ्या बाबतीत सक्तीच्या केलेल्या मला चालत नाहीत. आणि हे जेवढे माझ्या कुटुंब किंवा नात्यागोत्यातल्या हिंदू संप्रदायाबद्दल खरे आहे; तेवढेच कुणा मुस्लिम वा अन्य धर्मियाच्याही बाबतीत खरे आहे. म्हणुनच डॉ. झाकीर नाईक किंवा प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदू ग्रंथ वा धर्माची टवाळी केल्याने, मी अजिबात विचलित होत नाही. व्हायचे कारणही नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, की त्यांनी त्यांचे आग्रह त्यांच्या विश्वास व निष्ठापुरते मर्यादित ठेवावेत. माझ्यावर लादू नयेत. आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या धार्मिक श्रद्धा वा नास्तिकता आपल्या कुटुंबावरही लादल्याचे दिसत नाही. अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांना कोणी हिंदूहृदयसम्राट म्हणू शकला नसता किंवा त्यांनी असे संबोधन सहनही केले नसते.

   मग मी मुस्लिमांच्या बाबतीत हे सर्व लिहिण्याचे कारण काय? ११ ऑगस्ट २०१२ रोजी जे काही मुंबईत घडले, ते धर्माच्या नावावर तिथे एकवटलेल्या मुस्लिमांच्या जमावाने केले होते आणि त्या मेळावा वा मोर्चाचे नेतृत्व किंवा नियोजन मुस्लिम धर्माच्या म्होरक्यांनी धर्माच्या नावानेच केलेले होते. आणि तिथे मग जे घडले; त्याचा त्रास अन्यधर्मिय वा धर्म न मानणार्‍या मुंबईकरांना झाला. याचा अर्थच मुस्लिमांच्या धर्मभावनांचा गैरलागू प्रभाव इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करणारा ठरला. त्याची दखल म्हणुनच घेणे भाग पडते. म्हणूनच मुस्लिम लोक जमावाने असे का वागतात, असा प्रश्न विचारणे भागच होऊन जाते (तसाच प्रश्न गुजरात दंगलीनंतर मोदी व त्यांच्याशी संबंधित हिंदु संघटनांच्या बाबतीत विचारला जात असतो).  कारण त्यांचे वागणे त्यांच्यापुरते, किंवा मुस्लिम समाजापुरते उरलेले नव्हते. त्याचे चटके अन्य मुस्लिमेतरांना भोगावे लागले होते व लागत असतात. आपल्या धर्मश्रद्धांचे प्रदर्शन करताना काही मुस्लिमांनी तिथे भारतीयांच्या राष्ट्रीय भावनेशी खेळ केला होता. राष्ट्रीय स्मारकाच्या विटंबनेचा इस्लामनिष्ठेशी वा मुस्लिमांच्या धर्मनिष्ठेशी संबंध काय, असा प्रश्न म्हणूनच विचारण्याची पाळी आली. कारण हे असे एकदाच घडलेले नाही. तर असे अनेकदा घडते, वारंवार घडते आहे. हा मुद्दा मुंबईतल्या अमर जवान स्मारकापुरताच नाही. लखनौमध्ये बुद्धपार्कमध्ये अशीच नासधुस करण्यात आली. जैनधर्मियांच्या धर्मश्रद्धेशी निगडीत अशा महाविराच्या प्रतिमेची विटंबना इस्लाम निष्ठेशी कुठे संबंधित आहे? नसेल तर त्यावेळी म्यानमारच्या निषेधार्थ निघालेल्या मुस्लिमांच्या मोर्चाने महावीराच्या मुर्तीची विटंबना का करावी? ज्याअर्थी ती केली त्याअर्थी इस्लाम व अन्य धर्माच्या श्रद्धेची विटंबना; यांचा काहीतरी संबंध असणे शक्य असणार आणि त्याचा शोध घेणे अगत्याचे होऊन जाते. नुसताच अन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धेशी नव्हेतर आमच्या मुस्लिम नसण्याशी याचा काय संबंध आहे, ते शोधावे लागणारच ना? त्यातूनच मला या लेखमालेचा प्रपंच करावा लागला आहे.

   आणि असा मलाच एकट्याला, आजच पडलेला हा प्रश्न नाही. नितीन प्रधान नावाचे मुंबईतील एक प्रसिद्ध वकील आहेत. ज्यांनी १९९३ सालात मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फ़ोटातील आरोपींचे वकीलपत्र घेतले होते. तब्बल बारा वर्षे त्यांनी त्या मुस्लिम आरोपींची बाजू न्यायालयात मांडताना शिवसेनेसारख्या हिदूत्ववादी संघटनेचा रोषही पत्करला होता. त्यांच्यावर तरी कोणी धर्मांध किंवा हिंदूत्ववादी वा मुस्लिमद्वेष्टा असा आरोप करू शकणार नाही. कारण त्यांनी कडव्या स्वधर्मियांचा रोष पत्करून गंभीर गुन्ह्यातील मुस्लिम आरोपींना मदत केली होती. पंण २००६ साली पुन्हा मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये बॉम्बस्फ़ोटाची मालिका घडल्यावर नितीन प्रधान यांचे मन बदलले. त्यांनी शेवटच्या टप्प्यात आलेल्या त्या खटल्यात त्या मुस्लिम आरोपींचे वकीलपत्र तडकाफ़डकी सोडून दिले. मुस्लिम समाजाचा एक चांगला मित्र त्या समाजाने का गमावला; याचा विचार नको का व्हायला? आपण असे तडकाफ़डकी वकीलपत्र का सोडले त्याचा खुलासा प्रधान यांनी नंतर अनेक मुलाखतींमधून केला आहे आणि त्यात त्यांनी मुस्लिमांवर थेट काही गंभीर आरोप केलेले आहेत. ते नुसते रागाने केलेले आरोप नाहीत, तर त्यांनी त्या दुसर्‍या स्फ़ोटमालिकेसाठी समस्त मुस्लिम धर्माला जबाबदार धरण्यापर्यंत मजल मारली. असे का व्हावे, याचा विचार, मला सवाल करणरे मुस्लिम करणारच नाहीत काय? मुंबईतील १९९२-९३ च्या दंगलीनंतर मुंबईत स्फ़ोट झाले होते. तेव्हा दंगलीमुळे चिडलेल्या मुस्लिम समाजाची प्रक्षोभक प्रतिक्रिया म्हणुन पहिल्या स्फ़ोटाकडे बघत नितीन प्रधान १९९३ च्या घातपाताचे समर्थन करत होते. पण तोच माणूस २००६ च्या स्फ़ोटानंतर आमुलाग्र बदलून गेला. शिवसेना किंवा कोणा हिंदूत्ववादी संघटनेकडून होतील, इतके गंभीर आरोप नितीन प्रधान यांनी मुस्लिम समाजावर धर्माचे नाव घेऊन केले आहेत.

   इथे माझा एकच मुद्दा आहे. एक मुस्लिमांचा हितचिंतक का बदलतो? ज्याने आधी (हिंदूत्ववाद्यांच्या) ज्या आरोपांची खिल्ली उडवली होती, तोच नितीन प्रधान एकदम दुसर्‍या टोकाला का जातो? तो स्वत:च हिंदूत्ववाद्यांच्या भाषेत का बोलू लागतो? याचा विचारही नाही करायचा का? नितीन प्रधान बॉम्बस्फ़ोटातील आरोपीचे वकील कसे झाले; तेही मूलात समजून घेण्यासारखे आहे. त्या खटल्यात काय घडले ते तपासावे लागेल. जवळपास पन्नासहून अधिक आरोपी असलेल्या त्या खटल्यातील आरोपींच्या वकिलांनी तेव्हा खुद्द न्यायाधीशावरचा अविश्वास दाखवला होता. पण वकिलांचे मत झुगारून आरोपींनी हाच न्यायाधीश हवा असा आग्रह धरला. मग कोर्टाला मदत करण्यासाठी न्यायाधीशांनी दोन ज्येष्ठ वकिलांची नेमणूक केली, त्यात एक होते महेश जेठमलानी व दुसरे होते नितीन प्रधान. त्यांचा मोबदला सरकारतर्फ़े दिला जाणार होता. पण तीन मुस्लिम संघटना प्रधान यांना येऊन भेटल्या व त्यांनी सरकारी मोबदला न घेता प्रधान यांनी आरोपींचे वकिल म्हणून काम करावे, असा आग्रह धरला. त्यांना जेठमलानी नको होते कारण महेशचे वडील राम जेठमलानी भाजपाशी संबंधित होते. पण तरीही सरकारी मोबदला का नको, असा सवाल प्रधान यांनी त्या मुस्लिम संघटनांच्या नेत्यांना विचारलाच. त्या नेत्यांनी दिलेले उत्तर प्रधान यांना संयुक्तीक वाटले आणि त्यांनी तशी बाजू न्यायालयातही मांडली.

या खटल्यात आरोपींवर देशद्रोहाचा व गद्दारीचा आरोप (दंडविधान कलम १२१) लावण्यात आला होता आणि त्यातून मुस्लिम समाजच देशद्रोही ठरवला जातो म्हणून आम्ही समाजातर्फ़े या खटल्याचा खर्च उचलू असे, त्या संघटनांचे मत होते. देशद्रोहाचा कलंक आपल्यावर नको म्हणून मुस्लिम समाजाने त्यात पुढाकार घेण्याची भूमिका प्रधान यांना पटली होती. त्यांनी तशीच भूमिका न्यायालयातही मांडली, त्याला सीबीआयचे तेव्हाचे वकील नटराजन यांनीही मान्यता दिली होती. भारतातल्या हिंदू किंवा ख्रिश्चन, शिख वा बौद्ध वा अन्य समाजाइतकेच मुस्लिमही देशप्रेमी आहेत आणि त्यावर शंका घेतली जाऊ नये; असेच प्रधान यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी कोर्टात तसे स्पष्ट करून या मुस्लिम आरोपीचे वकीलपत्र स्विकारले होते. त्याला न्यायाधीशांनीही मान्यता दिली होती. मात्र शिवसेना आदि हिंदूत्ववादी संघटनांचा प्रधान यांच्यावर रोष झाला होता. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. पुढली बारा वर्षे त्यांनी हिरीरीने त्या खटल्यात १८ मुस्लिम आरोपींची बाजू लढवली होती. बाबरी मशिद उध्वस्त होणे व नंतरच्या दंगली; यातून मुस्लिम मन विचलित झाले, त्यातून बॉम्बस्फ़ोट घडवले गेले असतील, तर त्याला दहशतवाद किंवा देशद्रोह ठरवण्याच्या विरोधात व मुस्लिमांवर आरोप करण्याच्या विरोधात प्रधान उभे ठाकले होते. मग त्यांचे मतपरिवर्तन कसे व का व्हावे?    ( क्रमश:)
भाग  ( ५६ )   ११/१०/१२

३ टिप्पण्या:

  1. भाऊ, प्रत्येक वेळी मुस्लिमांचे अपराध, अगदी देशद्रोहापर्यंतचे अपराधही प्रेमाने पोटात घालणारी, जिथे इतरांचा द्वेष करायला शिकविले जाते त्या मदरशांना इतर धर्मियांकडून वसूल केलेल्या करातून सरकारी अनुदान देणारी, कोन्ग्रेस ही संघटना देशातील ९०% प्रश्नाचे खरे कारण आहे. प्रत्येक मुस्लीम माणूस देशद्रोही नाही, अनेक अगदी खरे देशभक्त ही आहेत तरीही सगळ्या अपराधात केवळ १५% टक्के असलेला हा समाज ८०% वेळा कसा काय सापडतो ? पुन्हा कोन्ग्रेस सत्तेवर आली तर जिल्ह्या जिल्ह्यात इसीसची रिक्रूट मेंट सेन्टर्स काढून त्यांना सरकारी जागा सुद्धा हा पक्ष देईल एवढे जरी लक्षात घेतले तरी ५/१० वर्षांनी देशातील प्रश्न सुटू लागतील. अन्यथा नाही...

    उत्तर द्याहटवा