शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

एका मुस्लिम विचारवंताचे नेमके विश्लेषण


   अब्दुल कादर मुकादम यांना इस्लामचे गाढे अभ्यासक म्हणून मराठी भाषेच्या प्रांतात ओळखले जाते. अधूनमधून ते अनेक मराठी वृत्तपत्रातून मुस्लिम व इस्लामविषय लिखाणही करत असतात. अनेक मराठी वाहिन्यांवर त्यांना असे मुस्लिमसंबंधी विषय असले, मग अगत्याने चर्चेत भाग घ्यायला आमंत्रित केले जात असते. तेव्हा त्यांच्या मुस्लिम विषयक अभ्यासावर विश्वास ठेवायला कोणाची हरकत नसावी. तीन वर्षापुर्वी अब्दुल कादर मुकादम हे दैनिक ‘सकाळ’मध्ये एक साप्ताहिक सदर लिहित होते. त्यावेळी त्यांनी एका लेखामध्ये मुस्लिमांच्या संयमी वृत्तीचे वर्णन केले होते. ते त्यांच्याच शब्दात वाचा.

 ‘जगात मुस्लिम नसणार्‍यांची संख्या मुसलमानांपेक्षा अधिक आहे हे मुसलमानांना माहित आहे व मान्यही आहे. पण मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही. कारण बिगर मुसलमान असणे व त्यांचा मुसलमान नसण्याचा अधिकार मुसलमानांनी मान्य करणे यात महत्वाचा असा गुणात्मक फ़रक आहे. बिगर मुसामानांचा हा अधिकार मान्य करणे म्हणजे मुसलमानांना श्रद्धेय व पूजनिय वाटणार्‍या सर्वच गोष्टींकडे पहाण्याचा दृ्ष्टीकोन मुसलमानांइतका श्रद्धेय असू शकत नाही. त्यांचा दृष्टीकोन चिकित्सक अभ्यासकाचाच असेल हेही मान्य करणे अपरिहार्य ठरते’ 
-अब्दुल कादर मुकादम  (अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धर्मसत्तेचे आव्हान, सकाळ      ८/१२/२००९)

   हा उतारा काळजीपुर्वक वाचण्याची गरज आहे. शक्यतो वाचकांनी दोनतीनदा शांतपणे तो वाचून त्याचे मनन करावे. कारण त्यातली वाक्ये गुंतागुंतीची आहेत. मुस्लिम असणे आणि मुस्लिम नसणे यांच्यातल्या परस्पर संबंधांवर मुकादम यांनी नेमके बोट ठेवलेले आहे. नुसते भाष्य़ केलेले नाही तर मुकादम यांनी खुलेआम एक प्रश्न विचारला आहे आणि प्रश्नाचा रोख बघता, तो प्रश्न जगातल्या तमाम दोनशे कोटी मुस्लिमांना विचारलेला प्रश्न आहे. गुजरातच्या दंगलीचा विषय चर्चेत असला मग मोदींवर किंवा संघावर टिका करायला मुकादम यांना अगत्याने वाहिन्यांवर आमंत्रण दिले जाते. तेव्हा निदान त्यांच्यावर कोणी हिंदूत्वाचा किंवा ब्राह्मणवादाचा आरोप करू शकणार नाही, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी त्यांच्या या उतार्‍याचा उल्लेख इथे केला. नितीन प्रधान यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यात आहे का? मुस्लिम असे का वागतात, या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यात आहे का? मुकादमांचे पहिलेच वाक्य, म्हणजे त्यातला प्रश्न काय आहे? ‘(तुमच्या आमच्या) मुसलमान नसण्याचा (आपला) अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.’ असे मुकादम म्हणतात आणि ते इस्लामचे अभ्यासक आहेत; तेव्हा त्यांनी अत्यंत विचारपुर्वकच असे लिहिले असणार ना? पण त्या वाक्याचा अर्थ काय होतो?

   मुस्लिमांसाठी त्यांचा धर्म आहे आणि जे मुस्लिम नाहीत त्यांच्यासाठी त्यांचा जो कुठला धर्म असेल किंवा नसेल, असे म्हणुन भागत नाही. सवाल आपल्या आपल्या धर्मश्रद्धा किंवा नास्तिकतेचा नाहीच. आपण मुस्लिम असणे किंवा नसणे हा तुमचा-आमचा प्रश्न नसून तो मुस्लिमांचा प्रश्न आहे. कारण तुमच्या मुस्लिम नसण्यालाही मुस्लिमांची परवानगी आवश्यक असते, असेच मुकादम सूचित करत आहेत. त्यामुळेच वरवर कोणी मुस्लिम सांगत असेल, की धर्माचा बाऊ करण्याचे कारण नाही. तुमचा धर्म तुम्हाला आमचा धर्म आम्हाला; तर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो का? ठेवायचा तर मग मुकादम यांच्या वरील विधानाचा अर्थ कसा लावायचा? कारण मुकादम यांचे खरे मानायचे तर मुस्लिमांच्या परवानगी किंवा मान्यतेशिवाय तुम्हाला बिगर मुस्लिम रहाणे शक्य नाही. तो लाखमोलाचा म्हणजेच कळीचा मुद्दा आहे. जेव्हा देशाची राज्यघटना किंवा कायदे मुस्लिमांना त्यांचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य देतात, तेव्हा जे मुस्लिम आहेत त्यांना इस्लामचे पालन करण्याचा अधिकार मिळत असतो. आणि तो अधिकार मिळाला मग इतरांचे मुस्लिम नसणे मान्य करणे किंवा अमान्य करणे हा सुद्धा आपोआपच मुस्लिमांचा अधिकार बनत असतो. असेच मुकादम सुचवित नाहीत काय? आणि तुमचे मुस्लिम नसणे जर मुस्लिमांना मान्य नसेल तर काय? तर त्यांनी काय करावे? असे अनेक प्रश्न आपोआप निर्माण होतात. आणि म्हणूनच मुकादम म्हणतात, ‘हा लाखमोलाचा प्रश्न आहे. वरवर दिसतो तितका हा प्रश्न साधा व सरळ नाही’. याचा एक अर्थ असाही निघू शकतो, की तुमचे मुस्लिम नसणे हीसुद्धा इस्लामची अवज्ञा असू शकते आणि म्हणुन तुमचे मुस्लिम नसणे, हे कुणा मुस्लिमाला त्याचा धर्मभावना दुखावणे वाटू शकते. त्याच्या श्रद्धेला धक्का लावणे वाटू शकते. कारण तुमचे मुस्लिम नसणे, हा दिसतो तितका साधा व सरळ प्रश्न नाही. आपण कधी हा प्रश्न किंवा हा मुद्दा समजूनच घेतला नसेल; तर त्यासाठी मुस्लिमांना दोषी ठरवता येणार नाही. अडाणीपणे मुस्लिमांकडे बघणे किंवा आपल्या गैरसमजाबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही.

    ‘सकाळ’ दैनिकात तीन वर्षापुर्वी हा अभ्यासपुर्ण लेख छापून आला आहे. पण त्या दैनिकाच्या संपादकांनी किंवा कुठल्या वाहिनीच्या जाणकार संपादक विश्लेषकांनी त्यावर कधी चर्चा केली आहे काय? का करू नये? त्यातून मुस्लिम समाज, त्याच्या अधिकार व धर्मस्वातंत्र्याबद्दल अशा चर्चेतुन बिगर मुस्लिमांचे प्रबोधन होऊ शकले असते ना? ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठी दैनिक आहे. त्यातून अनेक गहन विषयांचा सातत्याने उहापोह होत असतो. त्यातून अब्दुल कादर मुकादम यांनी एक अत्यंत गंभीर विषयाला तोंड फ़ोडले होते. पण मराठी पत्रकारिता किती भरकटली व दिशाहीन झाली आहे; तेच यातून आपल्या लक्षात येऊ शकते. तिथे मुकादम यांचा लेख ज्या संपादकांनी छापला, त्यांनीही तो गंभीरपणे वाचलेला नसेल. मग त्यातले गांभिर्य किंवा महत्व त्यांना उमगून त्यांनी त्यावर सर्वांगिण चर्चा कशी घडवावी? आणि यामुळेच मुस्लिमांविषयी अकारण गैरसमज जनमानसात निर्माण होत असतात. मुस्लिम समाज स्वातंत्र्योत्तर काळात सतत दुर्लक्षित राहिला असा आरोप काही मुस्लिम नेते व विचारवंत करत असतात. ‘सकाळ’ दैनिकाच्या संपादकीय विभागाचे हे दुर्लक्ष त्याचाच पुरावा मानायला हवा. कारण ज्या लेखाने एक गंभीर मुस्लिम विषयक मुद्दा मांडला होता व त्यातून निदान मरा्ठी वाचकाचे प्रबोधन शक्य झाले असते, त्याकडे पद्धतशीर काणाडोळा करण्यात आला. जर माध्यमातून मुस्लिमांच्या विषयी असलेल्या गैरसमजांना दूर करण्यात अशी टाळाटाळ होत असेल, तर राजकीय मतलबाचाच विचार करणार्‍या पक्षांकडून किती दुर्लक्ष होत असेल, त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. असो, मुद्दा मुकादम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा आहे.

   आजवर अनेकदा, मुस्लिम अन्य बिगर मुस्लिमांशी असे का वागतात, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि त्याची विविध उत्तरे देण्यापासून, उत्तरे टाळण्यापर्यंत अनेक प्रयास झालेले आहेत. पण इथे मुकादम यांनी अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. मात्र त्याचे उत्तर त्यांनीही दिलेले नाही. मुंबईत अमर जवान स्मारकाची मोडतोड किंवा मुस्लिमांविषयी जे अनेक आक्षेप आहेत, त्याचे उत्तर या प्रश्नात लपलेले आहे काय? जे मुस्लिम नाहीत त्यांच्या मुस्लिम नसण्याचा मुस्लिमांना त्रास  होतो काय? आणि त्यातून मग हिंसक वा प्रक्षोभक प्रतिक्रिया मुस्लिमांकडून उमटते काय? आपल्याकडून मुस्लिम नसण्याची मान्यता न घेताच जे लोक परस्पर बिगर मुस्लिम रहातात, त्यांना धडा शिकवण्यासाठी मुस्लिम असे वागतात काय? जे काही अश्रद्धेय व इस्लामबाह्य वाटते त्याची मोडतोड मुस्लिम त्यामुळेच करतात काय? पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या. हा मुद्दा मी उपस्थित केलेला नाही, तर एका मुस्लिम विचारवंताने व इस्लामच्या अभ्यासकानेच उपस्थित केलेला आहे. आणि त्याचे उत्तर मुस्लिमांनी देण्याची गरज आहे. ते उत्तर का द्यावे? ते उत्तर मी का मागावे? तर मी मुस्लिम नाही आणि माझ्या मुस्लिम नसण्याचे परिणाम मला आता दिसू लागले आहेत. ते परिणाम वेगवेगळ्या घटनांमधून माझ्या समिप येऊ लागले आहेत. म्हणुनच मला त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे अगत्याचे भासू लागले आहे. आणि मलाच नव्हेतर जगा्तील अब्जावधी मुस्लिम नसलेल्या प्रत्येकाला त्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक होत चालली आहेत.  ( क्रमश:)
भाग  ( ६५ )   २०/१०/१२

१२ टिप्पण्या:

 1. Hats off to you, Bhau Torsekar, for raising a fundamental question. Every non-muslim in this world must understand this question and try to find a tru answer to it. Even educated muslims must try to answer this question truthfully.
  This question and its answer will help all communities in a long way.

  उत्तर द्याहटवा
 2. माझा अनुभव असा आहे कि मुस्लीम पंडीत चर्चेत प्रत्येक मुद्दा कुराण व हदीस च्या आधारे बोलतात आणि कुराणात सांगितले आहे ते चुकीचे असा आक्षेप घेणे त्यांना मान्य नसते . फक्त चालू चर्चेतील मुद्दा हा कुराण किंवा हदीस यांच्या दृष्टीनी चूक का बरोबर अशी चर्चा करा असा त्यांचा उघड आग्रह असतो , अशा दृष्टिकोनामुळे त्यांच्याशी चर्चा होवूच शकत नाही . आणि बिगर मुस्लिमांच्या बाजूने जे लोक चर्चा करतात ते कुरण व हदीस च्याच चौकटीत चर्चा कशी करू शकतील ? भाऊ अतिशय उत्कृष्ठ लेखमाला लिहलीत आपण . आपले लेखन वाचल्याने या घटनांकडे पाहण्याचा उत्कृष्ठ दृष्टीकोन मोकळे मन असलेल्या कोणालाही मिळेल यात शंकाच नाही .

  उत्तर द्याहटवा
 3. >>जगात मुस्लिम नसणार्‍यांची संख्या मुसलमानांपेक्षा अधिक आहे हे मुसलमानांना माहित आहे व मान्यही आहे. पण मुसलमान नसण्याचा त्यांचा अधिकार मुसलमानांना मान्य आहे काय? >> भाऊ या प्रश्नातून त्यांनी इस्लामच्या मूळ तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. इस्लाम मधे असेच म्हंटले जाते की जे मुसलमान नाहीत किंवा ज्यांची इस्लाम स्विकारण्याची तयारी नाही त्यांना जगण्याचा अधिकार नाही. या मूळ तत्त्वज्ञानामुळेच जगभरात इस्लाम भराभर पसरला. मुस्लीम कायम ज्यांच्यावर आक्रमण केले त्यांच्यापुढे दोनच पर्याय ठेवले. एक इस्लामचा स्विकार किंवा मृत्यू. त्यात बिचार्‍या मुस्लीम बांधवांचा काय दोष? असहिष्णुता ही त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीतच आहे त्याला ते तरी काय करणार ना!

  उत्तर द्याहटवा
 4. जे स्वातन्त्र्य मुसलामानाला हवे आहे तेच इतरान्नाही दिलेच पाहिजे म्हणजे त्यांच्या मुसलमान असण्यावर इतरान्नहि आक्षेप घेता येइल

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. निदान हिंदू धर्मात तरी इतर कुठल्याही धर्मावर आक्षेप घेण्याची शिकवण नाही. बाकीच्यांचे मला माहित नाही.

   हटवा
 5. माझ्या मुसलमान नसण्याला कोणाच्या संमतीची मला गरज नाही.

  उत्तर द्याहटवा
 6. मला जगात चोर आहेत, असतात, हे मान्य (माहिती) आहे. पण त्यांच्या चोर असण्याला, राहण्याला माझी मान्यता नाही!

  असा काहीतरी हा युक्तिवाद दिसतो. की तुम्हाला इस्लाम मान्य नाही, म्हणजेच तुम्ही गुन्हेगार आहात. आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा देण्याचा नैतिक अधिकार, तसेच शिक्षा करण्याचे धार्मिक कर्तव्य, हे इस्लाम मान्य असलेल्यांना प्राप्त झालेले असते.

  उत्तर द्याहटवा
 7. भाऊ हाच प्रश्न नरहर कुरुंदकरांनी जमाते इस्लामच्या व्यासपीठावरून 7० च्या दशकात विचारला होता. तो म्हणजे माझा धर्म कोणताही असो मी तुमचा मुस्लिम असण्याचा अधिकार मान्य करतो आणि तो सर्वच मुस्लीमेत्तारानी मान्य केलेला आहे. मुख्य प्रश्न हा आहे कि माझा मुस्लिम नसण्याचा अधिकार तुम्हाला मान्य आहे का? हा प्रश्न मुस्लिम बहुल वा मुस्लिम अल्पसंख्यांक दोनही भागात सारखाच निर्माण होतो आणि तिथेच सर्व मुस्लिम केंद्रित समस्यांची सुरुवात होते. आजही हाच प्रश्न या सर्व समस्यांच्या केंद्रस्थानी आहे आणि ती मनोवृत्ती बदलल्याशिवाय सर्व उपाय हे निरुपयोगी ठरतील.

  उत्तर द्याहटवा
 8. हा प्रश्न नरहर कुरुंदकरांनी विचारला होता ह्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कुरुंदकर असोत वा अ. भि. शहा वा हमीद दलवाई, इस्लामची समीक्षा करताना त्यांनी गृहित धरलेली बाब म्हणजे इस्लाममध्ये विविधता नाही. अशी स्थिती कोणत्याही धर्माबाबत नसते. कारण प्रेषित वा अन्य कोणी अवतारी पुरूष वा स्त्री वा साक्षात्कारी व्यक्ती वा धर्मगुरू आणि धर्मग्रंथ ह्यांनी जे काही सांगितलं आहे त्यानुसार कोणत्याही मानवी समूहाचा कारभार चालत नसतो. ह्या सर्व अभ्यासकांसाठी युरोपमधील रिफर्मेशनची चळवळ आणि त्यानुषंगाने चर्चच्या सत्तेला देण्यात आलेलं आव्हान व त्यामुळे मोकळी झालेली आधुनिकता, हा संदर्भ आदर्शवत होता. भारतामध्ये इस्लामचं वा हिंदू धर्माचं असं दगडी बांधकामासारखं रुप नाही. हमीद दलवाईंच्या कथांमध्ये आणि स्फुट लेखनामध्ये ही समज दिसून येते. उदा. हमीद दलवाईंच्या गावी मुस्लीम लीगची स्थापना करायला एक मुसलमान उत्तर प्रदेशातून येतो. सभा वगैरे होते आणि तो जाहीर करतो की मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यावर गावातले मुसलमान म्हणतात आमच्याकडची पद्धत अशी की कोणतीही नवी गोष्ट करायची तर ब्राह्मणाच्या हातून नारळ फोडावा लागतो. गावातून एका ब्राह्मणाला बोलावण्यात आलं त्याने नारळ फोडल्यावर मुस्लिम लीगची रितसर स्थापना झाली. धिस कॅन हॅपन ओन्ली इन इंडिया.

  उत्तर द्याहटवा
 9. भाऊराव,

  मुस्लिमेतरांचा मुस्लिम नसण्याचा अधिकार मुस्लिम लोकं मान्य करणार का, हा हिंदूंसाठी कळीचा प्रश्न आहेच. त्याबद्दल वादच नाही. मात्र हाच प्रश्न जगभरातल्या मुस्लिमांसाठीही तितका किंबहुना जास्तच महत्त्वाचा आहे. कारण सांगतो.

  जे मुस्लिम असा अधिकार अमान्य करतात ते मुळातून हिंसक असतात. आता दोन हिंसक मुस्लिम समूहांची गाठ पडली की एकमेकांना खोटं ठरवायची शर्यत लागते. ज्या कुणाचा जीव घ्यायचा आहे, त्याला काफीर ठरवलं म्हणजे झालं. अशी मनोवृत्ती बोकाळते. पाकिस्तानात शियांना आणि अहमदियांना असंच टिपून काढण्यात आलं.

  आडमुठेपणापायी आपापसांत भांडणं करून मुस्लिम एकमेकांना नष्ट करताहेत. म्हणून उपरोक्त प्रश्न मुस्लिमांसाठीही तेव्हढाच महत्त्वाचा आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  उत्तर द्याहटवा
 10. आपण उधृत केलेला पेरेग्राफ मुळात अब्दुल कादर मुकादम यांचा नाहीच . तो नरहर कुरुंदकरांचा आहे . कदाचित मुकादमांनि सुद्धा तो उधृत केला असेल . मुकादम हे इस्लाम चेच बंदे आहेत ।

  उत्तर द्याहटवा