सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिम समाजाची अत्यंत जागरूक प्रतिक्रिया


गेल्या दिड महिन्यापासून ही नवी लेखमाला मी लिहितो आहे. त्याचा आरंभच मुळात मुंबईतल्या रझा अकादमीच्या मेळाव्याच्या दंगलीमुळे झाला. कधीतरी हा विषय सविस्तर लिहावा असे माझ्या मनात अनेक वर्षे आहे. पण योगायोग असा, की अण्णा हजारे यांचे आंदोलन व भ्रष्टाचाराच्या निमित्ताने लिहित असलेला विषय संपत असतानाच मुंबईतली घटना घडली आणि त्यातून जे प्रश्न विचारले जाऊ लागले व प्रक्षोभक शंका घेतल्या जाऊ लागल्या. त्यामु्ळे तोच विषय तातडीने घ्यावा असे माझ्या मनात आले. त्यातून मुस्लिम समाजाच्या एकूण वर्तन, त्यातून निर्माण होणारे प्रश्न व शंका आणि त्यांचे सार्वत्रिक संदर्भ मांडायचे असाच, त्या लेखमालेचा हेतू आहे. त्यातून अनेक शंकांचे निरसन व्हावे आणि या विषयांवर अधिकाधिक चर्चा व्हावी, मुस्लिम-मुस्लिमेतर यांच्यात संवाद सुरू व्हावा असाच त्यामागचा हेतू आहे. पण अनेकांना ते कळतेच असे नाही. त्यामुळेच चिडलेल्या काही मुस्लिमांनी नाराजीचे फ़ोन केले. तसेच अनेक हिंदूंनी आपला कडवेपणा दाखवण्यासाठी माझ्यावर मुस्लिम धार्जिणेपणाचाही आरोप केला. पण अशा लोकांची संख्या खुपच नगण्य होती. त्यापेक्षा जास्त वाचक जे दोन्ही समाजातले आहेत, त्यांनी या विषयाला इतके जाहिर तोंड फ़ोडल्याने माझे अभिनंदनही केले. यातल्या प्रत्येकाला माझी मते किंवा निष्कर्ष मान्य असतील असे अजिबात नाही. तसा माझा आग्रहसुद्धा नाही. माझी अपेक्षा या विषयावर अधिकाधिक उहापोह व चर्चा होऊन मोकळा संवाद व्हावा एवढीच आहे. सव्वा दोनशे मुस्लिम वाचकांच्या फ़ोनपैकी पंधरावीस नाराज असले तर बिघडत नाही. पण माझे हेतू किती योग्य आहेत त्याची जमाते इस्लामी सारख्या जबाबदार संघटनेचे प्रतिनिधी, नौशाद उस्मान यांनी दिलेली ग्वाही मला अधिक मोलाची वाटते. म्हणूनच प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून मी त्यांचे लेखवजा पत्र मी इथे शब्दाश: सादर करत आहे. त्यातील मुद्दे व सवाल यांना मी सवडीने उत्तर देणार आहेच. पण प्रामाणिक चर्चा कशी संवाद सुरू करते, ते लक्षात यावे म्हणून ते पत्र वाचकांसमोर मी मांडतो आहे.


  तोरसेकरांना धन्यवाद पण....

    पुण्यनगरीच्या ‘उलट तपा्सणी’ या सदरामध्ये भाऊ तोरसेकर यांनी माझ्याविषयी जी आत्मियता दर्शवली त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी काढलेल्या ‘शोधन’च्या जुन्या आठवणी वाचून माझे डोळे पाणावलेत. परंतू याचा अर्थ मी त्यांच्या सर्वच विचारांशी सहमत आहे असे नाही. याच सदरात त्यांनी मागील काही लेखांमध्ये वस्तुस्थितीचा विचार न करता काही मुद्दे मांडलेले आहेत. परंतु विचारांना विचारांनीच प्रतिवाद करायचा असतो, या त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची देखील आम्ही कदर करतो. तसेच ‘मुस्लिम म्हणजे कोण?’ या इस्लामदर्शन संकेतस्थळावरील माझ्या लेखातील उतारा लाखो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जगातल्या जवळपास दोनशे कोटी मुस्लिमांतर्फ़े त्यांचे आभार मानतो. 

   डॉ.जाकीर नाईक यांच्याविषयीच्या लेखात त्यांनी आमचा उल्लेख केला. डॉ. नाईक किंवा त्याच्या आय. आर. एफ़. (इस्लामिक रिसर्च फ़ाऊंडेशन)चे आम्ही कार्यकर्ते नाहीत. डॉ. नाईक यांची एकूण प्रचार पद्धत, त्यांची शैली व त्यांच्या सर्वच विचारांशी आम्ही सहमत असूच असे अनिवार्य नाही. त्यांच्या रोखठोक प्रचार पद्धतीत अलिकडे त्यांनी स्वत:च सुधारणा केल्याचे आजकाल स्पष्ट जाणवते. आता ते पुर्वीसारखे आक्रमक बोलत नाहीत, हा त्यांच्यात सकारात्मक बदल म्हणावा लागेल. तोरसेकरांनी उल्लेख केलेला यु ट्युबवर जो व्हिडीओ अपलोड केलेला आहे, तो फ़ार पुर्वीचा आहे.

   पण तोरसेकर म्हणतात तसे डॉ. नाईक यांनी हिंदू देवदेवतांही टिंगल उडवू नये, ही त्यांची मागणी मी समजू शकतो. परंतू प्रेषित महंमद सलम यांच्याविषयी अतिशय आक्षेपार्ह चित्रफ़ित बनवणार्‍या वर्णवादी अमेरिकन दिग्दर्शकाशी डॉ. नाईक यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण डॉ. नाईक यांनी दुसर्‍या धर्माच्या कोणत्याही महापुरूषाच्या शयनगृहातील पोर्नोग्राफ़ीक (नग्न) दृष्ये चित्रित केलेली नाही. ते तसे करूच शकत नाहीत. कोणत्याही मुस्लिमाने तसे केले असते तर आम्हीच त्याचा विरोध केला असता. एम. एफ़ हुसेन या चित्रकाराला पत्र लिहून लहानपणीच आम्ही स्वत: विरोध व्यक्त केला होता. पण त्या चित्रकाराला देशाबाहेर काढून घुसखोर बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिनला भारत सरकार गोमुत्र का म्हणून पाजत आहे, तेच समजत नाही.

   डॉ. नाईक यांनी गणपतीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा तोरसेकरांनी नक्कीच प्रतिवाद करावा. पण त्या प्रतिउत्तरादाखल "हिंदू पुराण, वेद किंवा ख्रिश्चन बायबल जेवढे अनाकलनिय आहे, तेवढ्याच अनाकलनिय गोष्टी व कथा इस्लामी ग्रंथामध्ये शोधून दाखवता येतील" हा तोरसेकरांनी केलेला खोटा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही. इस्लामी साहित्य म्हणुन काही वर्णवादी ज्यू लोकांनी नक्कीच काही खोट्या गोष्टी इस्लामच्या नावाने पुस्तके छापून घुसडल्या आहेत. पण त्या गोष्टी खर्‍या की खोट्या, याची चाचपणी करण्यासाठी कुराण हा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडतो. कुराण हे जगातले एकमेव अपरिवर्तित इश्वरी ग्रंथ असल्यामुळे इस्लामची मूळ शिकवण अबाधित राहिली आहे. म्हणून मूळ इस्लामी विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते आणि त्या चिकित्सेत मूळ इस्लामी साहित्य (कुराण व हदिस) हे पुर्णपणे खरे उतरतात. लेखकांनी त्यात अवैज्ञानिक असे काही पाहिले असेल, तर त्यांनी बिनधास्त त्याचा उल्लेख करावा. आम्ही त्याचा प्रतिवाद करू. धर्माचा असा बाऊ बनवू नये. तर त्यावर दिलखुलास चर्चा व्हावी. पण याचा अर्थ कोणत्याहीही महापुरूषाच्या शयनगृहातील नग्नदृष्ये चित्रित करावी असे नाही. हा प्रकार पाहून कोणत्याही समाजाच्या भावना भडकणे स्वाभाविक आहे. त्याचा जगभर उद्रेक होणे स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असाही नाही, की भावना दुखावल्या म्हणून निष्पाप लोकांना मारून टाकण्याचे प्रत्येकाला लायसन्स मिळाले आहे. अल्लाह कुराणात सांगतो की-
   "एखाद्या गटाच्या शत्रूने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये, की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे" (कुरआन  ५:८)
   म्हणून कोणत्याही धर्माला मानणारा असो, जर त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर वैचारिक प्रतिवाद करावा, शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत अणि दोषी लोकांना कायदेशीर मार्गाने शिक्षा देण्यास संबंधित सरकारांना बाध्य करावे.
डॉ. नाईक यांनी हिंदू देवतांविषयी प्रश्न उपस्थित करताना कदाचित त्यांची शैली उपहासात्मक वाटत असेल तर त्यांनी नक्कीच त्यात सुधारणा करावी. पण त्यांनी कोणतेही नवे प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. तर दस्तुरखुद्द ब्राहमण हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील पुराणांना शौचकूप संबोधले आहे त्याचे काय? ( संदर्भ: देवळांचा धर्म व धर्माची देवळे, पान क्र,१६). एवढेच नव्हेतर भागवताला चक्क "छीं भागवत" ही शिवी दिलेली आहे. (संदर्भ: देवाचा धर्म व धर्माची देवळे पान क्र. १५) आता बाळासाहेबांच्या वडीलांच्या विरोधात बोलण्याची हिंमत तोरसेकरांनी दाखवावी. हीच गोष्ट जर एखाद्या ब्राह्मणेतर नाईकाने केली तर ती नक्कीच झोंबणार, हे स्वाभाविक आहे. तसेच डॉ. इक्बाल यांच्यासारख्या कट्टर इस्लामनिष्ठ कविने मुस्लिमांच्या एकंदर परिस्थितीला पाहून 
"ये मुसलमान,
जिन्हे देखकर शरमाये यहुद"
   असे म्हटले होते. पॅलेस्टिनच्या मुस्लिमांवर अत्याचार करणार्‍या यहुदी लोकांशी डॉ. इक्बाल हे मुस्लिमांची तुलना करतात, पण हीच तुलना एखाद्या मुस्लिमेतर तोरसेकरांनी केली असती तर ती नक्कीच आम्हा मुस्लिमांना झोंबली असती. हा मनुष्य स्वभाव बदलण्याची गरज आहे. आपल्या जातीतल्या, धर्माच्या व्यक्तीने टिका केली तर चालते, पण दुसर्‍या समाजातील व्यक्तीने ती टीका करू नये, ही मानसिकता खरेच बदलण्याची गरज आहे. सत्य स्विकारण्याची, ते पचवण्याची मानसिकता तयार होण्याची गरज आहे. 

   तोरसेकरांना विद्यमान मुस्लिम समाजात सकारात्मक बदल हवे आहेत, तसे ते आम्हालाही हवे आहेत. आमच्या जमाते इस्लामी हिंदसारख्या चळवळी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. खर्‍या इस्लामी शिकवणीच्या प्रचार व प्रसारानेच हे बदल शक्य आहेत. ह्या प्रचारामुळे मुस्लिम समाजच नाही तर मोदींसारख्याचेही मनपरिवर्तन होऊ शकते अशी आशा आम्ही बाळगतो. तोरसेकरांसारख्या सुज्ञ लेखकांनी इस्लामचा आणखी अभ्यास करावा, मुस्लिम समाजाशी आणखी एकरुप व्हावं आणि समाज सुधारणेच्या या जिहादमध्ये त्यांनी आमचं सहकार्य करावं, ही विनंती. मुस्लिमांच्या प्रेमापोटी पोटतिडकीने लिहिलेल्या त्यांच्या लेखनप्रपंचासाठी त्रिवार अभिनंदन.             -नौशाद उस्मान   
  ( क्रमश:)
भाग  ( ४७ )  २/१०/१२

३ टिप्पण्या:

  1. स्वत:च्या धार्मिक समजुतींमधील उणीवा स्विकारून त्यात सुधारणांसाठी प्रयत्न करायला एक प्रकारची सहिष्णुताच अंगात भिनलेली लागते. झालीर नाईक काय किंवा हे नौशाद उस्मान काय यांच्यापैकी एकाही मधे ती सहिष्णुता नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी उगाच मोठेपणाचा आव आणून वक्तव्ये करू नयेत.

    उत्तर द्याहटवा
  2. "जो हमारा है वही सही है और जो तुम्हारा है वो गलत है" हेच ज्यांचे ब्रीदवाक्य आहे त्यांच्या कडून आणखी वेगळी अपेक्षा नव्हतीच! हिंदू धर्मात कुणालाही आपले मत आजमावण्याचा व व्यक्त करण्याचा हक्क आहे; अगदी परमेश्वराच्याही अस्तित्वाला आव्हान देण्याची सोय आहे. चार्वाक,बुद्ध,महावीर,कबीर,एकनाथ,महात्मा फुले, आंबेडकर,प्रबोधनकार अशी प्रचंड मोठी फौज सुधारकांची होऊन गेली व अजूनही सुधारणांचा हा संघर्ष सुरूच आहे. परिवर्तनातून तावून- सुलाखून आम्ही इथवर पोहोचलो आहोत. ५०० वर्षे दुसऱ्या धर्मांच्या राजवटीतहि जिवंत राहिलो , पण तुमचे काय ? तुम्हाला न परधर्म सहिष्णुता,न दुसऱ्याबद्दल काही आदर, एऊन -जाऊन माकड म्हणते माझीच लाल ! सुधारणा आणि बदल.. तोबा तोबा!! दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्यातले मुसळ दिसत नाही हेच खरे. "बात निकलेगी तो दूर तलक जायेगी !" बाळासाहेबांच्या 'प्रेमातूनच' आपण हा पत्रप्रपंच केला हे वेगळ सांगणे न लगे.

    उत्तर द्याहटवा