शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिमाला इतरांपासून अलिप्त रहाणे भाग आहे


   कालच्या लेखाचा शेवट करतानाचे माझे वाक्य होते, ‘आपणच मुस्लिम म्हणून सर्वांशी फ़टकून वागतोय का, याचाही विचार व्हायला हवा आहे.’ म्हणजे मुस्लिमांनीच याचा विचार करावा असेच मला म्हणायचे होते. आपल्याला चांगली वागणूक मिळत नाही, मुस्लिम म्हणून आपल्याशी भेदभाव-पक्षपात होतो, अशा तक्रारी नव्या नाहीत. तेराशे वर्षाचा मुस्लिमांचा इतिहास पाहिला तर पहिल्या दिवसापासून तशा तक्रारी वाचायला मिळतील आणि त्या आजही संपलेल्या नाहीत. पण त्यामुळे मुस्लिमांचे एक समाज म्हणून किती कल्याण झाले तेही शोधावेच लागेल. कारण याच तक्रारीमुळे सतत मुस्लिम समाज बहुधर्मिय लोकसंख्येत अलग पडत गेला आहे आणि शक्यतो त्याने मिळून मिसळून वागू नये याची काळजी त्या समाजाचे धार्मिक नेते घेत असतात. अगदी इस्लामच्या आरंभाचा इतिहास वाचला तर आरंभीच्या मुस्लिमांचाही मक्केत कुरेशांनी प्रचंड छळ केला अशी तक्रार वाचायला मिळेल. आणि आज अमेरिका असो, की आपल्या शेजारचा म्यानमार असो तशीच तक्रार मुस्लिम करताना दिसतील. पण नेमकी तशीच तक्रार जिथे मुस्लिमांची लोकसंख्या निर्णायक बहुमताची आहे; तिथे मुस्लिमेतरांकडूनही ऐकू येईल. मात्र त्यात एक ठळक फ़रक आहे. जिथे मुस्लिम राष्ट्र किंवा मुस्लिम सत्ता असते, तिथे मुस्लिमेतरांना धार्मिक स्वातंत्र्य अन्य देशांप्रमाणे मिळू शकत नाही. अलिकडेच पाकिस्तानातील एका ख्रिश्चन मुलीने पवित्र कुराणाची विटंबना केली अशी तक्रार झाली होती. तात्काळ स्थानिक ‘धर्मनिंदा’ कायद्यान्वये त्या अल्पवयीन मुलीवर कठोर कारवाई सुरू झाली. पण पुढे ते सर्वच कुभांड असल्याचे दिसून आले. मुद्दा त्या एका मुलीचा नाही. नुसते कुभांड असूनही तिच्यावर कठोर कारवाई सरकारनेच सुरू केली. पाकिस्तानात इस्लामिक कायदा काही प्रमाणात लागू आहे. तिथे तो धर्मनिंदा कायदा कमालीचा वादग्रस्त ठरला आहे. कारण त्या कायद्याचा आधार घेऊन कोणीही मुस्लिमेतराला सतावू शकतो. ह्या ख्रिश्चन मुलीचे उदाहरण त्याचाच नमुना आहे. पण त्याला कोणी मुस्लिम विचारवंत धार्मिक भेदभाव म्हणणार नाही. पाकिस्तानातील सुशिक्षित वर्ग व उच्चभ्रूवर्ग त्या छळवादी कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्याचा परिणाम म्हणून तिथल्या एका गव्हर्नरची त्याच्याच अंगरक्षकाने हत्या केली.

   ते पाकिस्तानचे सरकार, तसा कायदा करणारे राज्यकर्ते किंवा खोटेनाटे आरोप करणारे जे कोणी मौलवी असतात, त्यांना आमचे मित्र नौशाद उस्मान काय म्हणणार आहेत? सच्चे मुस्लिम की डुप्लिकेट मुस्लिम? कारण इथे विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा आग्रही विचार नौशादभाईंनी मला पाठवलेल्या प्रदिर्घ पत्रातून मांडला आहे. अर्थात पाकिस्तानात काय होते, त्यासाठी मी एका मराठी भाषिक मुंबईतल्या मुस्लिमाला जबाबदार धरणे किंवा जाब विचारणे अन्याय नाही काय, असेच कोणीही म्हणेल. त्या आक्षेपाची मला जाणीव आहे. पण तरीही मी असा सवाल का विचारला? नौशादभाई पाकिस्तानातील कुणा मुस्लिमाच्या वा मौलवीच्या कृत्याला जबाबदार असू शकतात का? ते कोणी ठरवायचे? किंवा त्यांना जबाबदार धरणारा मी कोण? हे प्रश्न विचारले जातील किंवा वाचकाच्या मनात येतील, याची मला पुर्ण खात्री आहे. आणि मी अत्यंत जबाबदारीने तसे विधान केले आहे. कारण सच्चा मुस्लिम आणि डुप्लिकेट मुस्लिम ही नौशादभाईंचीच संकल्पना आहे, जी त्यांनी ‘मुस्लिम म्हणजे कोण’ या उतार्‍यातून मांडली आहे. ज्यांना मुस्लिम असणे म्हणजे एक काटेकोर भूमिका असते, हे ठाऊक नाही किंवा त्यानुसार वागता येत नाही, त्यांना नौशादभाई तथाकथित वा डुप्लिकेट मुस्लिम म्हणतात. मग जे काही पाकिस्तानात एक मौलवी मुस्लिमेतर मुलीला त्रास देण्यासा्ठी करतो, त्याला सच्चा म्हणायचे की डुप्लिकेट मुस्लिम म्हणायचे, याचे उत्तर त्यांनीच द्यायला हवे ना? आणि त्यांनीच का द्यावे? तर माझ्या या एकूण लेखमालेतून जो वैचारिक उहापोह मी करतो आहे किंवा त्यांच्या उतार्‍याला मी प्रसिद्धी दिली, म्हणून नौशादभाईंनी माझ जे आभार मानले; ते व्यक्तिगत पातळीवर मानलेले नाहीत, तर जगातल्या दोनशे कोटी मुस्लिमांच्या वतीने नौशादभाई माझे आभार मानतात, तेव्हा ते त्या सर्व मुस्लिम लोकसंख्येच्या वतीनेच बोलत असतात ना? मग त्या दोनशे कोटी मुस्लिमापैकी कोणी असे गैरवर्तन करीत असेल तर त्याचा जाबही नौशादभाईंनाच विचारणे गैर आहे काय?

   अर्थात मला एकट्या नौशादभाई किंवा दुसर्‍या कोणाला एकाला असा जाब विचारण्याची गरज वाटत नाही. कारण जगातला प्रत्येक मुस्लिम अशाच भाषेत बोलत असतो. तो स्वत:च्या वतीने बोलत नाही, तर समस्त मुस्लिमांच्या वतीने बोलत असल्याचे निदान भासवत तरी असतो. जसा पाकिस्तानचा तेव्हाचा कर्णधार शोएब मलिक, क्रिकेटमधील पाकच्या पराभवासाठी जगभरच्या मुस्लिमांची माफ़ी मागत होता, तसेच नौशादभाई माझे जगभरच्या मुस्लिमांतर्फ़े आभार मानतात ना? मग त्यात कुठल्या मुस्लिमांचा समावेश होतो? सच्चे इस्लामची भूमिका पाळणारे दोनशे कोटी मुस्लिम जगात आहेत आणि त्याचेच प्रतिनिधीत्व नौशाद व शोएब करतात का? की ज्यांची नावे फ़क्त अरबी-उर्दू आहेत व जन्मदाते मुस्लिम आहेत अशा निव्वळ डुप्लिकेट मुस्लिमांचेही प्रतिनिधीत्व केले जात असते? ज्यांच्याकडून गैरकृत्ये होतात व त्यामुळे इस्लाम व मुस्लिम समाजाचे नाव खराब होते, त्यांना खड्यासारखे बाजूला कोणी करायचे? ते काम मुस्लिम समाज व त्यांच्या धुरिणांकडून होत राहिले असते तर आमच्यासारख्यांना या विषयावर लिहिण्याची व जाहिर उहापोह करण्याची वेळ आलीच नसती. आम्हाला ती चर्चा करावी लागते, कारण नौशादभाई ज्याला डुप्लिकेट मुस्लिमांची वाईट कृत्ये म्हणतात, त्याचे दुष्परिणाम आमच्या सारख्या मुस्लिमेतरांपर्यंत येऊन पोहोचत असतात. त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागत असतात. मग त्याकडे पाठ फ़िरवून बसता येत नाही. विशेषत: ज्याचा उदभव धर्मातुन होत नसला तरी धर्माच्या नावाने होत असतो, तेव्हा त्या कृत्यांकडे धर्माशी संबंधित म्हणून बघितले जाणारच. त्यापासून अलिप्त रहाता येत नाही. आणि जेव्हा त्याचा विचार करावाच लागतो, तेव्हा मुस्लिमांच्या धार्मिक अलिप्ततेचाही विचार करणे भाग पडते.

   काश्मिरचे एक उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. स्वायत्त काश्मिर ही काश्मिरींची मागणी आहे असे भासवले जात असते. आणि त्यासाठी गेली काही दशके घुमाकु्ळ चालू आहे. कित्येक हजार लोकांचा त्यात बळी पडला आहे. पण त्या काश्मिरच्या लढ्यात कोण नेमका मुस्लिमेतर काश्मिरी आहे? बहुतांश मुस्लिमेतर काश्मिरी जीव वाचवण्यासाठी पलायन करून आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन जगत आहेत. गुजरातच्या दंगलीबद्दल नेहमी कल्लोळ चालतो. पण अजून लाखो मुस्लिम गुजरातमध्ये स्थायिक आहेत. कुणावर गाशा गुंडाळून पळून जाण्याची वेळ आलेली नाही. उलट काश्मिरचे लाखो हिंदू दिल्लीच्या रस्त्यावर निर्वासित म्हणुन पडले आहेत. पण त्या हिंदूंच्या दुर्दशेबद्दल कोणी शब्द तरी बोलतो का? काश्मिरी लढ्यात कोण मुस्लिमेतर आहेत? म्हणजेच तो लढा धार्मिक नाही काय? धर्म आणि राजकारणाची तिथे गल्लत चालू नाही काय? असे का होऊ शकते? मुस्लिमांचे सर्वच राजकीय लढे धर्माच्याच आधारावर होत नाहीत काय? आणि असे होऊ शकते, कारण मुस्लिम समाजाला  धर्माच्या नावाने अलिप्त ठेवण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत असतात. त्याचे कारणही छुपे अजिबात नाही. इस्लाम धर्म राजकारणापासून अलिप्त असू शकत नाही. कारण धर्मातच राजकीय विचारसरणी समाविष्ट आहे असे इस्लामचे अभ्यासक सय्यद इफ़्तिकार अहमद यांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. नौशादभाई ज्या ‘शोधन’ साप्ताहिकाचे काम करतात त्याचेच जुने संपादक म्हणून सय्यद इफ़्तिकार यांनी काम केलेले आहे. तेच म्हणतात, ‘इस्लाम एक धर्म (रिलिजन) नसून ती परिपुर्ण सामाजिक, राजकीय आणि सर्वार्थाने सर्वसमावेशक जीवनव्यवस्था आहे. अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर त्या जीवनव्यवस्थेला आपल्या वैयक्तीक तसेच सामुहिक जीवनात स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत’ ; तेव्हा मग मुस्लिम समाजाला अन्य धर्मियांच्या राजकारणात मिळून मिसळून वागता-जगता येईल काय? त्याला धर्माच्या सोयीनुसारच अन्य पक्ष व संघटनांमध्ये जाऊन काम करता येईल आणि ते काम करताना, त्या संघटनेच्या उद्देश किंवा ध्येयानुसार काम करता येणार नाही, तर इस्लामच्या राजकीय भूमिकेला पुरक असेल, त्याच पद्धतीने व मर्यादेत अन्य पक्ष वा संघट्नेत काम करावे लागेल. आणि तसे करायचे तर मुस्लिमाला सतत आपले मुस्लिम हे अस्तित्व अलिप्तपणे प्रत्येक बाबतीत दाखवावेच लागणार. कारण तसे न केल्यास त्याच्या धर्मपालनात बाधा येत असते. असे अनेक बारकावे मुस्लिमांबद्द्ल आक्षेप घेण्यापुर्वी समजून घेण्याची गरज आहे.   ( क्रमश:)
भाग  ( ५२ )   ७/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा