रविवार, १४ ऑक्टोबर, २०१२

धर्मचिकित्सा माझ्या चर्चेचा विषयच नाही


मी नौशाद उस्मान यांना सय्यद इफ़्तिकार अहमद यांचा प्रबंध वाचण्याचे आवाहन का केले? कारण त्यांनी लेखनाच्या मर्यादा, व्याप्ती व उद्देश याबद्दल त्यात उत्तम स्पष्टीकरण लिहिले आहे. त्यांनीही मला एक इमेल लिहून ते माझी लेखमाला अतिशय बारकाईने वाचत असल्याचे कळवले आहे. त्याचप्रमाणे आपले मत कळवणार असल्याचेही त्यात नमुद केले आहे. मी त्यांचे आभार मानून त्यांना जरूर प्रतिसाद द्यावा, असे ताबडतोब इमेलद्वारे कळवले सुद्धा आहे. त्याला आता आठवड्याचा कालावधी होऊन गेला, तरी त्यांनी घाईघाईने कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा अर्थच ते अत्यंत सुक्ष्म दृष्टीने माझे लेखन वाचत असून स्वत:चे मत बनवत आहेत, असेच म्हणायला हवे. पण इथे आज त्यांचे नाव घेण्याचे कारण शेषराव मोरे यांच्या पुस्तकाच्या प्रदिर्घ अभिप्रायामध्ये आरंभीच इफ़्तिकार म्हणतात,

   ‘कोणत्याही धर्माचा अभ्यास करण्यामागे नेमकी जी भूमिका असते त्यापासून त्यामागील उद्दिष्टे समजू शकतात. अर्थात, एखाद्या धर्माची शिकवण आणि त्या धर्माच्या अनुयायांचे मन स्वत: समजून घ्यायचे नि ते इतरांना समजून द्यायचे आहे, या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. स्वाभाविकच त्यामागील उद्दिष्टे भिन्नभिन्न्न असणार. अभ्यास केल्यानंतर त्याचे जे आकलन होते ते आणि आकलन करून त्याचा अभ्यास करणे ही दोन वेगवेगळी उद्दिष्टे होत. कोणत्याही धर्माच्या अनुयायांचे समाज-मन समजून घेण्यासाठी त्या धर्माचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. कारण, धार्मिक शिकवणी आपल्या अनुयायांचे समाज-मन घडवण्यात पायाभूत ठरतात, यात दुमत नाही.’ 

   लेखन वा अभ्यास यामागची मूळ भूमिका कशी ठरते याचा इतका उत्तम खुलासा दुसरा असू शकत नाही. पण इथे ही लेखमाला मी लिहितो आहे, त्यामागे धर्माचा अभ्यास वा त्या धर्माच्या अनुयायाचे समाज-मन समजून घेण्याचा किंवा अन्य कुणाला समजून देण्याचा विषयच नाही. त्यामुळेच अभ्यास करून आकलन होईल ते समजावणे किंवा आकलन करून मग अभ्यास करणे असाही विषय नाही. पण तरीही इफ़्तिकार नेमके काय म्हणतात ते समजून घेणे अगत्याचे ठरावे. आजच्या नव्या पिढीतील अभ्यासक व पत्रकारांमध्ये तो दोष आढळून येतो, त्यावर इफ़्तिकार यांनी नेमके बोट ठेवले आहे. आकलन म्हणजे काय? आकलन म्हणजे एखाद्या बाबतीतले तुमचे बनलेले मत होय. म्हणजे ज्याबद्दल तुम्ही एक मत बनवले आहे. आता ते मत तुम्ही अभ्यास करून बनवले आहे, की आधीच तसे तुमचे मत आहे? आधीच तुमचे मत बनलेले असेल, तर मग तुम्ही त्याच नजरेने किंवा दिशेने अभ्यास करत जाता. सहाजिकच तुम्ही समोर जे काही येत असते, ते सर्वच बघायला तयार नसता. तर त्यातले तुमच्या मताला उपयुक्त आहे तेवढेच उचलून घेत असता आणि अन्य तपशीलाकडे पाठ फ़िरवत असता. उलट जेव्हा तुम्ही कुठलेही मत न बनवता, आधी अभ्यास करता तेव्हा त्यातून जे समजून घेतले वा लक्षात आले, त्यानुसार तुमचे मत बनवता, तेव्हा ते अभ्यासानंतर झालेले तुमचे मत म्हणजे आकलन असते. असे दोन फ़रक इफ़्तिकार यांनी सांगितलेले आहेत. आजच्या माध्यमांतील बातम्या किंवा विश्लेषणाकडे आपण बारकाईने बघितले, तर त्याचा वारंवार अनुभव येत असतो. जे कोणी तिथे लिहित किंवा बोलत असतात, त्यांनी आधीच आपले मत बनवलेले असते आणि नंतरच ते तपशील तपासत असतात. मग त्यांच्या आधीच काढलेल्या निष्कर्षाला उपयोगी नसतील ते मुद्दे किंवा तपशील बाजूला फ़ेकले जातात.

   उदाहरणार्थ कुठल्याही वाहिनी किंवा बातम्यांमध्ये सरसकट होणारा जिहादी, तालिबानी अशा शब्दांचा वापर. तेवढ्याच सहजपणे संघिय, हिंदुत्व, ब्राह्मणी अशा शब्दांचा सढळ वापर, त्या अभ्यासाआधीच्या आकलनाचे नमुने आहेत. म्हणजे त्या शब्दांकडे एका ठरलेल्या अर्थाने बघितले जात असते आणि त्याचे लेबल लावले, मग विषय संपून जातो. मग अशी मजेशीर गोष्ट होते की ‘चुकीची माहिती आणि त्यावर ठाम मत’. कर्नाटकामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेने बार किंवा पबमध्ये गेलेल्या तरूण मुलींना मारहाण केली. लगेच त्या गुंडगिरीला हिंदू तालिबानी कृत्य ठरवण्याची स्पर्धाच सुरू झाली. त्यासाठी कोणाला तालीबान म्हणजे नेमका काय शब्द आहे; ते समजून घेण्याची गरजही वाटली नाही. मनूवादी या शब्दाचा असाच सढळ वापर होतो. पण किती लोकांनी मनुस्मृती ग्रंथामध्ये ब्राह्मण या शब्दाची व्याख्या खरेच वाचलेली आहे? तेव्हा मुद्दा असा, की अभ्यास आणि आकलन यांची जी गल्लत होते, त्यातून समजावणे बाजूला रहाते आणि अधिक गैरसमज मात्र निर्माण केले जातात. याचे एक कारण असे, की सामन्य लोकांना त्यांच्या बुद्धीला पचेल असे समजावणे भाग असते. त्यांना आकलन होऊ शकेल, अशाच पद्धतीने विषयाची मांडणी करावी लागते. अन्यथा विषयाचा विचका होतोच. पण त्याहीपेक्षा अनर्थ अधिक होऊ शकतो. इथे मी ज्या कारणस्तव ही लेखमाला लिहितो आहे, त्याचा खुलासा मी वारंवार करतो त्याचे तेच कारण आहे. त्यामागे इस्लाम धर्माचा अभ्यास किंवा त्याचे आकलन करून ते इतरांना समजावणे असा माझा अजिबात हेतू नाही. तर ज्याप्रकारचे वर्तन मुस्लिमांकडुन होत असते आणि त्याचे जे परिणाम अन्य समाजाच्या वाट्याला येतात, तेवढ्यापुरता माझा लेखनप्रपंच मर्यादित आहे. त्यात अन्य कुठल्या धर्माशी इस्लामची तुलना करणे किंवा त्यातले गुणदोष सांगणे, असा हेतूच नाही. हजारो वर्षे ज्या जीवनशैली विकसित झाल्या आहेत व त्यामागचे तत्वज्ञान व कार्यकारणभाव उत्क्रांत झाला आहे, त्याचे इतक्या सहजासहजी विवेचन करणे सोपे काम नाही. आणि तेवढी माझी बौद्धीक कुवतही नाही.

   शेकडो वर्षांची परंपरा आणि करोडो लोकांना प्रभावित करणार्‍या घटना व तत्वांचा उहापोह करण्याचे काम माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाचे असू शकत नाही. म्हणुनच मी स्वत:च्या आकलनासाठी इस्लाम व त्याचे धर्मग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यावर भाष्य़ करावे इतका जाणकार नाही. तो माझा अधिकारही नाही. पण मुस्लिम म्हणून जी मंडळी माझ्या अवतीभवती वागत व जगत असतात, त्यांच्या मुस्लिम म्हणुन वागण्याचा जो प्रभाव माझ्या जीवनावर किंवा माझ्या सामुहिक जीवनावर पडत असतो; त्याचे आकलन व विवेचन करणे मला भाग पडते. याचे कारण माझी त्या परिणामांपासून सुटका नसते. उदाहरणार्थ अजमल कसाब व त्याची टोळी जे काही इथे येऊन धर्माच्या नावाने करते, त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागतात ना? आणि मी जर त्यापैकीच एक मुंबईकर असतो, तर मला त्या कसाबच्या वर्तनाची दखल घ्यावीच लागते. अगदी तशीच दखल गुजरातच्या वा मुंबईतल्या दंगलीचीही घ्यावी लागते. यापैकी गुजरात किंवा मुंबईच्या दंगलीचे वेळोवेळी मी लिखाण केलेले आहे. ते अनेक मुस्लिम वाचकांनी वाचलेले नसेल तर त्यांना मी फ़क्त मुस्लिमांच्याच संदर्भाने लिहितो असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ऑगस्टमध्ये मुंबईत जे घडले, यानंतर लिहिताना गुजरातचे संदर्भ आवश्यक तिथे आलेले आहेत. आणि आसामचे वा म्यानमारचेच असेल तर मी थेट सिरिया किंवा काश्मिरात मारल्या जाणार्‍या मुस्लिमांचाही अगत्याने उल्लेख केला आहे. माझा मुद्दा अकारण मारल्या जाणार्‍या माणसांपुरता आहे. त्यांच्या धर्माशी संबंधित नाही. पण जेव्हा त्यात पक्षपात होतो तेव्हा मी शंका उपस्थित केली आहे. कारण तिथे मला मुस्लिम म्हणून होणार्‍या वर्तनात तफ़ावत दिसली आहे. म्यानमारच्या मुस्लिम हत्याकांडासाठी चिडणार्‍या मुस्लिमांच्या भावना सिरियात मारल्या जाणार्‍या निरपराध मुस्लिमांविषयी थंड का, असा प्रश्न विचारण्यात गैर काय?

   मी इस्लामचा अभ्यास करून त्याचे आकलन मांडण्यासाठी ही लेखमाला लिहित नाही. तर एक भारतीय म्हणुन माझ्या वाट्याला जो मुस्लिम बांधवांच्या वर्तनाचा अनुभव येतो, त्यातून ज्या शंका निर्माण होतात, त्यात जे विरोधाभास दिसतात, तेच मांडण्याचा माझा उद्देश आहे. जावेद आनंद, सईद नकवी, अब्दुल कादर मुकादम इत्यादी अनेक मुस्लिम लेखक पत्रकारही अगदी तेवढ्याच मुक्तपणे हिंदूंच्या वर्तनाचा उहापोह खुलेपणाने करीत असतात. आणि त्यात गैर काहीच नाही. म्हणुनच ही सगळी लेखमाला ही धर्मविषयक चर्चा नाही, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली जे वर्तन होते, त्याबद्दलची चर्चा आहे. आणि ती सुद्धा त्या वर्तनाचे परि्णाम माझ्यापर्यंत येतात तेवढयापुरती मर्यादित आहे. आणि म्हणुनच धर्माचा अभ्यास वा आकलन हा माझा विषयच नाही. सर्वसामान्य बिगर मुस्लिमाच्या मनात ज्या शंका आहेत, त्याचा उच्चार व त्याबद्दल मुस्लिमांमध्ये खुली चर्चा व्हावी एवढाच त्यामागचा हेतू आहे. जी खुप आधीपासून व्हायला हवी होती. दुर्दैव असे, की तेच नेमके टाळले जाते. आणि प्रतिवाद सुद्धा पळवाटा शोधून केला मग खुलाश्यापेक्षा गफ़लती अधिक होतात.    ( क्रमश:)
भाग  ( ६० )   १५/१०/१२

1 टिप्पणी:

 1. आदरणीय तोरसेकर काका, आदाब!
  आजचा तुमचा लेख वाचला. वाचून बरे वाटले. पण 'सर्वसामान्य बिगर मुस्लिमांच्या मनात ज्या शंका आहेत, त्याचा उच्चार व त्याबद्दल मुस्लिमांमध्ये खुली चर्चा व्हावी एवढाच त्यामागचा हेतू आहे,' असे आपण सांगता, पण बिगर मुस्लिमांच्या शंका दूर करण्यासाठी आम्ही केलेला प्रतिवाद तुम्ही जशाला तसा 'पूर्ण' सादर करत नसाल तर एकतर्फी चर्चा तर होऊ शकते पण 'खुली' चर्चा होऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीला जसे आपण माझा लेख प्रसिद्ध केला होता, तसा कृपया आम्ही केलेला प्रतिवाद हा जसाचा तसा तुमच्या सदरात प्रसिद्ध करावा. सोयीनुसार काही भाग लपवून काही सारांश देत असाल तर यापुढे आमचा उल्लेख करून चर्चा करणे बंद करा.
  अनुकूल प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
  तुमचाच पुतण्या,
  - नौशाद उस्मान,
  (सह-संपादक: शोधन),
  मुंबई.

  प्रत्युत्तर द्याहटवा