मलाला युसूफ़जाई या किशोरवयीन मुलीला गोळ्या घालण्यापर्यंत तालिबान म्हणवून घेणार्याची मजल का जावी? कुठल्यातरी गॅंगवॉरमध्ये जशी सुपारी देऊन नि:शस्त्र व्यक्तीची हत्या करतात, असा हा मामला नाही. त्या हत्याकांडात जो गोळ्या झाडतो त्याला खुन करण्याचा मोबदला मिळत असतो. इथे ज्याने मलाला हिच्यावर गोळ्या झाडल्या, त्याला कसलाही मोबदला मिळणार नव्हता. त्याला मिळालीच तर कोणाची तरी शाबासकी मिळणार होती. तेवढ्यासाठी त्याने कायद्याच्या भाषेत ज्याला गुन्हा म्हणता येईल असा धोका पत्करला होता. कदाचित पकडला गेल्यास कोर्टकचेरीची भानगड मागे लागेल, याचेही त्याला भान होते. म्हणूनच त्या हल्ल्यातून ती मुलगी बचावली, तरी पुढल्या हल्ल्यातून ती वाचणार नाही; असे तालिबान प्रवक्त्याने सांगितले आहे. हा प्रवक्ता किंवा त्याचा जो कोणी नेता असेल; ते छोटा राजन वा छोटा शकील यांच्यासारखे गुन्हेगार टोळीवाले नाहीत. ते एका हेतूने अशी हत्याकांडे घडवून आणत असतात. मग तो मलाला हिच्यासारख्या कोवळ्या बालिकेचा खुन असो, किंवा एखादा सामुहिक हत्याकांडाचा घातपात असो. जो कोणी मरणार आहे किंवा किती लोक त्यात मारले जाणार आहेत, याचाशी ते कृत्य करणार्याला कसलेही कर्तव्य नसते. त्यात मरणार्यांशी त्यांचे कुठलेही व्यक्तीगत वैर नसते. मग ही माणसे अशी हत्याकांडे का करतात? अजमल कसाबचेही तसेच आहे. त्याने आपल्या टोळीसह मुंबईत येऊन जे भीषण हत्याकांड घडवले, त्यात मारल्या जाणार्यांना कसाब वा त्याचे सहकारी ओळखतही नव्हते. त्यांची कुठली व्यक्तीगत दुष्मनीही नव्हती. दुसरीकडे त्या कृत्यामध्ये कसाबचे नऊ सहकारी आपले प्राणही गमावून बसले. मग ही माणसे अशी का वागली? कसाबपासून मलाला हिच्यावर गोळ्या झाडणार्यापर्यंत अशा लोकांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. कारण आपण त्यांच्याकडे गुन्हेगार, खुनी म्हणून बघत असलो तरी काही लोक त्यांच्याकडे शहीद वा हुतात्मे म्हणुन बघणारेही आहेत. कारण हे असे मारेकरी व्यक्तीगत हेतूने हत्या करत नसतात, तसेच मोबदला मिळावा म्हणून असे कृत्य करीत नसतात. मग त्यांनी तसे का करावे?
आपण कोणते तरी महान पवित्र कार्य करतो आहोत, अशीच त्यांची धारणा असते. आणि त्यांचे कृत्य पवित्र स्वरूपाचे आहे असे मानणारेही असतात. म्हणुनच त्यांच्याकडे शहिद म्हणुन बघितले जाते. प्रेषित महंमदांच्या विकृत व्हिडीओचे निमित्त होऊन इजिप्तमध्ये मध्यंतरी मोठी हिंसक निदर्शने झाली. त्यात एक सामान्य घरातला मुलगा मारला गेला, तसाच एक पोलिसही मारला गेला. त्या दोघांच्या घरच्यांचा आक्रोश ‘अल जजीरा’ वाहिनीवर दाखवण्यात आला. दोघांचे कुटुंबीय टाहो फ़ोडून रडत होते आणि दोन्ही कुटुंबांना समजावणारे मात्र मृतांना शहादत मिळाल्याची समजूत काढत होते. मात्र मृतांच्या आप्तांना त्यातली शहादत कळत नव्हती. इथेही मलालावर हल्ला करणारा उद्या मारला गेला, तर काय बोलले जाईल? त्यालाही हौतात्म्य मिळाले. दुसरीकडे मलाला बचावली नसती, तर तिलाही शहिद ठरवण्याची स्पर्धाच लागली असती. हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे. कारण हे असे हत्याकांड व्यक्तीगत नसते तर कुठल्यातरी विचारसरणीतून आलेले असते. मग एकाच्या हाती शस्त्र असेल आणि दुसरा नि:शस्त्र असेल. पण दोघेही आपणच सत्यकथन करीत असल्याच्या आवेशात असतात. थोडक्यात दोन्ही बाजू सत्याग्रहीच असतात. फ़रक इतकाच, की एक सत्याग्रही तोंड लपवलेला असतो तर दुसरा निर्भयपणे सत्य सांगायचे धाडस करत असतो. पण दोघेही परिणामांना घाबरत नसतात. एक जीवावरचा धोका शस्त्राशिवाय पत्करत असतो, तर दुसरा शस्त्रावर विसंबून असतो. एक शस्त्र उगारून सत्याचा आग्रह धरत असतो आणि दुसरा शस्त्राच्या धाकातही सत्याचा पाठपुरावा करत जीव धोक्यात घालत असतो. पण दोघेही सत्याग्रहीच असतात.
मला खात्री आहे, की असा युक्तीवाद किंवा दावा अनेकांना रुचणारा नाही. कारण आपल्या मनात सत्याग्रह म्हणजे गांधीजी म्हणतात, तसा अहिंसक सत्याग्रह अशी एक ठाम कल्पना घट्ट मूळ धरून रुजलेली आहे. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह; असा त्याचा अर्थ असला तरी सत्य काय व कोणते, हे ठरवायचे कोणी? आज केजरीवाल आणि मंडळी आपण सांगतो तेच सत्य; असा अट्टाहास करीत रस्त्यावर रोजच उतरत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे सर्वच आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत, असा त्यांच्या विरोधकांचा दावा आहे. पण गंमत कशी आहे बघा, केजरीवाल आपल्या सत्याच्या आग्रहासाठी असे कृत्य करतात, की समोरच्या प्रशासनाला त्यांच्यावर लाठी व कायद्याचा बडगा उगारण्याची पाळी ते आणतात. आणि तसे झाले मग सरकारी अत्याचाराचाही आरोप करतात. त्यांना जे सत्य वाटते, तेच सत्य अंतिम मानावे, असा त्यांचा आग्रह असायला हरकत नाही. पण त्या आग्रहाच्या मागे धावताना त्याचाच अट्टाहास कधी होऊन जातो, त्याचे भान केजरीवाल यांना रहात नाही. म्हणूनच मग त्यांच्या सत्याग्रहाचा दुराग्रह होऊन जातो. इथे अजून एकमेकांवर शस्त्र उगारण्यापर्यंत अट्टाहास वा दुराग्रह गेलेला नाही, म्हणून हिंसक परिणाम दिसत नाहीत. पण जे काही चालते त्याला सत्याग्रह नक्कीच म्हणता येणार नाही. गांधीजी यांच्या सत्याग्रहाची कल्पना आग्रहाने मांडण्यापर्यंतच मर्यादित होती. केजरीवाल गांधीवादाचा मुखवटा लावत असले, तरी त्यांच्या आग्रहाने कधीच अट्टाहासाचे रुप धारण केले आहे. त्याचीच पुढली पायरी दुराग्रहाची असते. आणि दुराग्रहाने डोके वर काढले मग आपण म्हणु तेच सत्य आणि तेच समोरच्याने निमूटपणे पटवून घेतले पाहिजे, अशी सक्ती सुरू होत असते. मलाला त्याचाच बळी आहे. कारण तिच्यावर हल्ला करणारेही दुराग्रही सत्याग्रहीच आहेत. त्यांना जो इस्लाम कळला आहे व आकलन झाला आहे; त्याच्या आग्रहातून त्यांनी मुलींच्या शिक्षणाविषयी एक ठराविक भूमिका घेतली आहे. तशी त्यांची भूमिका असूच नये असे कोणी म्हणणार नाही. पण आपली भूमिकाच दुसर्याने निमूटपणे मान्य करावी, असा अट्टाहास ही समस्या असते. अशी धारणा किंवा अट्टाहास कुठून सुरू होतो? प्रसिद्ध जर्मन कवि, तत्ववेत्ता हेनरिक हायने म्हणतो. ‘सत्यावर काहीजणांचे इतके उत्कट प्रेम आसते की सत्याचा विजय व्हावा यासाठी कसलेही असत्य सांगण्यापर्यंत त्यांची मजल जाते’.
मलाला किंवा मुलींची शाळा चालविणारे तिचे वडील असोत, तेही तेवढेच निष्ठावान मुस्लिम आहेत; जेवढे तालिबान इस्लामनिष्ठ आहेत. दोघांनी कुठेही इस्लामच्या मूळ ग्रंथ किंवा इस्लामी साहित्याला झुगारण्याचा प्रमाद केलेला नाही. पण दोघांनी आपापल्या पद्धतीने इस्लाम समजून घेताना ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्यातून त्याचे वेगवेगळे अर्थ त्यांना सापडले असतील. पण एकाने दुसर्यावर आपलाच इस्लाम खरा अशी सक्ती करण्यातून समस्या उभी राहिली आहे. त्यापैकी मलाला हिने आपल्या समजूतीनुसार धर्माचे पालन करण्याचा हट्ट केलेला आहे, पण आपल्याला गवसलेले सत्य दुसर्या कोणावर लादण्याचा अट्टाहास केलेला नाही. उलट तालिबान मंडळी आहेत, त्यांनी मात्र आपल्यालाच खरा इस्लाम कळल्याचा अट्टाहास धरून मलाला किंवा अन्य मुस्लिमांनी, आपण म्हणू तसेच धर्मपालन करावे अशी सक्ती चालविली आहे. त्यातून समस्या सुरू झाली आहे. मलाला किंवा तिच्या समर्थकांचा सत्याचा आग्रह स्वत:पुरता मर्यादित आहे. पण तिच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या तालिबानांचा सत्याचा आग्रह सर्वांसाठीचा आहे. तिथून समस्या सुरू होते. तालिबान आहेत, त्यांनी कसे जगावे, त्यांनी कसा इस्लाम पाळावा, यासाठी मलालाने सक्ती केलेली नाही. त्यामुळेच तिचे धर्मपालन सर्वांसाठी सुसह्य आहे. त्याबद्दल जे तालिबान आहेत, त्यांनी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. कारण त्यांच्या जीवनात, व्यवहारात, धर्मपालनात मलालाने कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही. आपली मते तालिबानांवर लादलेली नाहीत. पण उलट पाहिल्यास तालिबान मात्र तीच सवलत मलालासारख्या मुलींना नाकारत आहेत. आपले मत हेच अंतिम, आपण म्हणून तेच खरे आणि आपण सांगू तेच सत्य; अशा अट्टाहासाने अनेक समस्या सुरू होतात. आज मुस्लिमांच्या संदर्भातील अनेक समस्या त्यातूनच उदभवलेल्या दिसतील. मग त्या मुस्लिम देशांच्या अंतर्गत असोत, मुस्लिम पंथांच्या अंतर्गत असोत किंवा मुस्लिम बिगर मुस्लिमांच्या संदर्भात समोर आलेल्या असोत. आपण सांगतो वा आपल्याला वाटते तेच सत्य; अशा अट्टाहासाने यातल्या बहुतांश समस्या आलेल्या आहेत. त्याचे धागेदोरे शोधताना थेट ओसामा बिन लादेनपर्यंत जाऊन पोहोचता येते. ( क्रमश:)
भाग ( ६३ ) १८/१०/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा