रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

मुस्लिमांच्या अलिप्ततेची मूलभूत कारणे


   मुस्लिम माणुस एकटा असतो तेव्हा तुमच्या आमच्यात सहजपणे मिसळून जातो. पण जेव्हा तो जमात म्हणजे घोळका करून असतो वा एकत्र येतो; तेव्हा तो स्वत:ला अन्य लोकांपेक्षा वेगळा समजूनच वागतो, हे कोणी नाकारू शकणार नाही. आणि म्हणूनच तो कळप वा जमाव म्हणुन जमतो, तेव्हाचे त्याचे वर्तन आणि व्यक्तीगत वर्तन यांची तुलना चुकीची असते. ही बाब चटकन कोणी मान्य करणार नाही, पण तीच वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ, मी ही लेखमाला लिहू लागल्यापासून मुस्लिमांच्या धर्माला किंवा धर्मभावनेला कुठलाही स्पर्श न करता केवळ मुस्लिमांच्या वर्तनासंबंधीच लिहितो आहे. पण त्यावरच्या प्रतिक्रिया किती बोलक्या आहेत. बहुतेक मुस्लिम आपल्या धर्माविषयी कमालीचा हळवा म्हणजेच कडवा असतो. किंबहुना त्याला तसे असावेच लागते. अन्यथा तो मुस्लिम राहूच शकत नाही. धर्माची शिकवण बाजूला ठेवून तो परस्पर व्यक्तीगत निर्णय घेऊ शकत नाही. नौशाद उस्मान त्याचीच ग्वाही देतात. नुसत्या नावाने कोणी ख्रिश्चन वा हिंदू असू शकतो. पण अरबी वा उर्दू नाव आहे म्हणून किंवा मुस्लिम जन्मदात्यांच्या पोटी जन्म घेतल्याने कोणी मुस्लिम होऊ शकत नाही. इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. असे नौशादभाई आग्रहाने सांगतात, याचा अर्थ मुस्लिम असतो त्याला ठराविक पद्धतीने व भूमिकेतूनच जगावेच लागते. अन्यथा तो मुस्लिम असूच शकत नाही, मुस्लिम राहू शकत नाही.

   ऐकायला हे साधे शब्द वाटतील, पण ते साधे शब्द नाहीत. त्यात मोठा गर्भितार्थ आहे. तुम्ही हिंदू असाल तर नियमित देवळात जाण्याची सक्ती तुमच्यावर कोणी करू शकत नाही. आरती वा भजनाला जाण्याचा हट्ट कोणी करू शकत नाही. आणि असे कुठलेही धार्मिक कार्य न करताही तुम्ही हिंदू असू शकता. तो तुमचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. काही प्रमाणात बौद्ध वा ख्रिश्चनांचेही तसेच म्हणता येईल. पण तशा सवलती किंवा मुभा मुस्लिमाला आहेत काय? कोणी ख्रिश्चन वा हिंदू उठून आपल्या धर्मशास्त्राला आव्हान देऊ शकतो, त्याची सत्यासत्यता तपासून बघायची हिंमत करू शकतो. तशी मुभा कुणा मुस्लिमाला आहे काय? इथेच मोठा फ़रक पडतो. "परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे." म्हणजे मुस्लिमाला अन्य धर्माप्रमाणे असे कुठलेही स्वातंत्र्य मिळू शकत नाही. तसे स्वातंत्र्य त्याने घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची खैर नसते. मला पाठवलेल्या (आणि पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या) पत्रात नौशादभाईंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. नुसता उल्लेख न करता नौशादभाई यांनी मला प्रबोधनकारांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हानही दिले आहे. पण त्याची गरज आहे काय? प्रबोधनकार किंवा त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे किंवा मी भाऊ तोरसेकर ज्या हिंदू धर्मीय जन्मदात्यांच्या पोटी जन्माला आलो, म्हणुन हिंदू असतो. त्यांना त्यांच्या धर्माची भूमिका खुलेपणाने व चिकित्सक वृत्तीने तपासण्याची मुभा आहे. नौशादभाईं इस्लामबद्दल किंवा त्याच्या भूमिकेबद्दल बोलत नसून हिंदूंच्या धार्मिक भूमिकेबद्दाल बोलत आहेत, याचे त्यांना भान उरलेले नसावे. मी जो सवाल डॉ झाकीर नाईक यांच्या संदर्भाने विचारला होता, तो स्पष्ट होता. आपण जेव्हा स्वत:च्या धर्माविषयी कर्मठ हळवे असतो, तेव्हा अन्य धर्मियांच्या भावनांबद्दल चिकित्सक होऊन चालेल काय; असा माझा सवाल होता. हिंदू धर्मियात प्रबोधनकार किंवा अन्य सुधारकांनी उपस्थित केलेले सवाल ऐकून घेण्याचा संयम व सहिष्णूता आहे. तस्लिमा नसरिन वा सलमान रश्दी यांना सहन करणे मुस्लिमांना शक्य होत नाही, हा सवाल आहे. ज्यांना ते सहन होत नाही, त्यांनी दुसर्‍यांची चिकित्सक धार्मिक तपासणी करावी काय, असा सवाल आहे.

   उदाहरणार्थ नौशादभाई किंवा तत्सम मुस्लिम विचारवंत कशी दिशाभुल करू बघतात, त्याचाही तपशील थोडा तपासून बघायला हरकत नसावी. त्यांनी मला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, "१) डॉ. नाईक यांनी हिंदू देवतांविषयी प्रश्न उपस्थित करताना कदाचित त्यांची शैली उपहासात्मक वाटत असेल तर त्यांनी नक्कीच त्यात सुधारणा करावी. २)एम. एफ़ हुसेन या चित्रकाराला पत्र लिहून लहानपणीच आम्ही स्वत: विरोध व्यक्त केला होता. पण त्या चित्रकाराला देशाबाहेर काढून घुसखोर बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिनला भारत सरकार गोमुत्र का म्हणून पाजत आहे, तेच समजत नाही." इथे तस्लिमाला गोमुत्र पाजण्याची भाषा कशासाठी? त्यातला उपहास लपून रहातो काय? आणि तेच नौशादभाई स्वत:च झाकीर नाईक यांची शैली उपहासात्मक असेल तर सुधारली पाहिजे असेही म्हणतात. मग यातला कुठ्ला शब्द विश्वासार्ह मानायचा? त्यांनी गोमुत्र म्हणुन केलेला उपहास योग्य आणि नाईकांचा गणपतीविषयक उपहास अयोग्य असतो काय? कुठल्या निकषाने हे युक्तीवाद मोजायचे? आणखी एक मुद्दा आहे, तो चित्रकार हुसेन यांच्याविषयीचा. नौशादभाई म्हणतात तसे भारत सरकारने हुसेन यांना देशाबाहेर काढलेले नाही. कोणा खाजगी व्यक्तीने त्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली, तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार अटक होण्याच्या भयाने स्वत: हुसेनच देश सोडून परागंदा झालेले होते. त्यात सरकारचा हात नाही. मग नौशादभाई अशी परस्पर विरोशी विधा्ने का करतात?

   तस्लिमाला गोमुत्र पाजण्य़ाचा उल्लेख अनवधानाने आलेला आहे असे मला वाटत नाही. अत्यंत विचारपुर्वक केलेली ती शब्दयोजना आहे. त्यातून तस्लिमाला आश्रय देणारे भारत सरकार हिंदू धर्माचे पालन करणारे आहे असेच नौशादना सुचवायचे आहे. त्याचवेळी हिंदू म्हणुनच या भारत सरकारने हुसेन यांना देशाबाहेर हाकलले असेही धडधडीत खोटे कथन करायचे आहे. म्हणजे एक खोटा तपशील द्यायचा आणि त्यातून दुसरा खोटा अर्थ निघून दिशाभूल व्हावी असा धुर्त प्रयत्न करायचा असाच हा प्रयत्न नाही काय? कालच मी पाकिस्तानातील कुराण फ़ाडल्याच्या खोट्या आरोपाखाली तिथल्या कोर्टाने केलेली कठोर कारवाई कथन केली होती आणि आज इथे नौशादभाई यांच्यासारखा बुद्धीवादी मुस्लिमही कसा बेधडक असत्य दडपून सांगतो; त्याला पुरावा दिला आहे. जर असेच कथन व विवेचन मुस्लिम बांधवांच्या वाट्याला धार्मिक नेते व विचारवंतांकडुन येत असेल; तर त्यांना वास्तवाचे भान होणार कसे? आणि अशीच भूमिका असेल तर चिकित्सक वा तर्कशुद्ध चर्चा होऊच कशी शकेल? यातला फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना सलमान रश्दी यांचे वादग्रस्त पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्याच्या प्रतिसुद्धा भारतात आलेल्या नव्हत्या. पण सय्यद शहाबुद्दीन यांच्या एका पत्रातील मागणीवरून इथल्या सेक्युलर राजीव सरकारने रश्दींच्या पुस्तकावर बंदी घातली होती. पण त्याच भारत सरकारने हुसेन यांच्या चित्रावर कुठली बंदी घातली नाही, की हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या त्याची दखल घेऊन हुसेन यांच्यावर कायद्याचा बडगा उगारलेला नाही. म्हणजेच ज्या सरकारने मुस्लिमांसाठी पक्षपात केला आणि हिंदूंच्या भावनांची पर्वा केली नाही, त्याच्यावरही नौशदभाई बेधडक हिंदू आचरणाचा आरोप उपहासाने करत आहेत. हीच मोठी गंभीर बाब असते. मुस्लिमांना एकूण समाजापासून अलिप्त ठेवण्याची संथ प्रक्रिया अशीच होत असते.

   थोडक्यात जो अन्याय मुस्लिमांवर झालेलाच नाही, तो सांगून नौशादभाई सहानूभूती मिळवतानाच दुसरे काय सुचवू पहात आहेत? हुसेनला देशाबाहेर हाकलले, असा प्रचार कशासाठी? मुस्लिमांच्या मनात अकारण  भयगंड निर्माण करण्यासाठी का? जर त्यांनी हुसेनचा नुसता निषेध न करता त्यालाही कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली असती तर गोष्ट वेगळी. नाईक यांचा बचाव नग्नते आडून करणारे नौशादभाई, हुसेनचा बचाव करू शकत नाहीत. पण त्याला सरकारने देशाबाहेर काढले अशी लोणकढी थाप कशाला मारतात? जे भारत सरकार हिंदूंच्या भावनाची कधीच पर्वा करत नाही, आणि जेम्स लेनच्या पुस्तकावरही बंदी घातली तर ती बंदी उठवणारा निर्णय ज्या देशाचे न्यायालय देऊ शकते, त्या देशाच्या कायदे व न्यायालयावर तरी विश्वास ठेवायला हरकत नसावी ना? त्याच भारत सरकारने जयपुर येथील महोत्सवात सलमान रश्दी यांना भारतात येण्यास बंदी कोणासाठी केली होती? मुस्लिमांच्याच भावनांची जपणूक करण्यासाठी ना? मग त्या्च सरकारवर तस्लिमाला गोमुत्र पाजण्य़ाचा उपहासात्मक आरोप करून नौशादभाई काय साधू बघत आहेत? हा जो दुटप्पी व विसंगत फ़सवा युक्तिवाद मुस्लिम विचारवंत करतात, त्यातूनच मुस्लिम समाजाला अलिप्त राखण्याची प्रक्रिया सुरू होत असते. कारण अशा लहानसहान गोष्टीतून त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना जोपासली जात असते. त्याचाच पुढे भयगंड तयार होत असतो. आणि त्याला जमाव म्हणुन रस्त्यावर उतरवणे सोपे जात असते.    ( क्रमश:)
भाग  ( ५३ )   ८/१०/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा